व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अब्राहाम—विश्‍वासाचा कित्ता

अब्राहाम—विश्‍वासाचा कित्ता

अब्राहाम—विश्‍वासाचा कित्ता

‘जे लोक विश्‍वास ठेवतात, त्या सर्वांचा अब्राहाम बाप होता.’—रोमकर ४:११.

१, २. (अ) आज खरे ख्रिस्ती अब्राहामला का म्हणून स्मरतात? (ब) अब्राहामला ‘जे लोक विश्‍वास ठेवतात, त्या सर्वांचा बाप’ का म्हणण्यात आले आहे?

 तो एका शक्‍तिशाली राष्ट्राचा पूर्वज, संदेष्टा, व्यापारी आणि नेता होता. पण आज ख्रिस्ती लोकांमध्ये त्याला त्याच्या अशा एका गुणावरून स्मरले जाते ज्यामुळे देवाने त्याला आपला मित्र म्हटले, अर्थात त्याचा अढळ विश्‍वास. (यशया ४१:८; याकोब २:२३) त्याचे नाव होते अब्राहाम आणि बायबल त्याला ‘विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांचा बाप म्हणते.’—रोमकर ४:११.

अब्राहामाच्याआधी हाबेल, हनोख आणि नोहा यांना विश्‍वास नव्हता का? होता. पण पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांनी आशीर्वादित व्हावे म्हणून देवाने अब्राहामासोबत करार केला होता. (उत्पत्ति २२:१८) अशारितीने, ज्यांनी वचन दिलेल्या संततीवर विश्‍वास ठेवला त्या सर्वांचा तो लाक्षणिक अर्थाने पिता ठरला. (गलतीकर ३:८, ९) एका अर्थाने, अब्राहाम आपलाही पिता आहे कारण त्याने आपल्याकरता विश्‍वासाचा कित्ता घालून दिला आहे ज्याचे आपण अनुकरण केले पाहिजे. त्याचे सबंध जीवनच विश्‍वासाची एक अभिव्यक्‍ती होती कारण त्याला जीवनात कित्येक परीक्षांना व आव्हानांना तोंड द्यावे लागले. किंबहुना त्याच्या जीवनातल्या सर्वात बिकट परीक्षेला सामोरे जाण्याआधी, अर्थात आपला पुत्र इसहाक याला बळी देण्याची आज्ञा मिळण्याआधी देखील अब्राहामने कित्येक लहानमोठ्या परीक्षांना यशस्वीपणे तोंड देऊन आपला विश्‍वास सिद्ध केला होता. (उत्पत्ति २२:१, २) या सुरवातीच्या काही परीक्षांकडे आपण थोडे बारकाईने लक्ष देऊया आणि पाहूया की यातून आपल्याला कोणते धडे शिकायला मिळतात.

ऊर नगर सोडण्याची आज्ञा

३. बायबलमध्ये अब्रामच्या पूर्वजीवनाबद्दल काय सांगण्यात आले आहे?

बायबलमध्ये अब्रामचा (नंतर अब्राहाम बनलेला) पहिल्यांदा उल्लेख उत्पत्ति ११:२६ येथे आढळतो: “तेरह सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला अब्राम, नाहोर व हारान हे झाले.” अब्राम देवाला भिणाऱ्‍या शेमचा वंशज होता. (उत्पत्ति ११:१०-२४) उत्पत्ति ११:३१ या वचनानुसार, अब्राम आपल्या कुटुंबासोबत ‘खास्द्यांच्या ऊर’ या वैभवशाली नगरात राहत होता. हे शहर एकेकाळी फरात नदीच्या पूर्व दिशेला वसलेले होते. * त्याअर्थी, अब्रामाचे लहानपण तंबूंत राहणाऱ्‍या भटक्या जमातीत नव्हे तर शहरात गेले, आणि तेसुद्धा एका ऐश्‍वर्यवान शहरात. ऊर शहरातील बाजारांत अनेक परदेशी वस्तू देखील विकत घेता येत होत्या. शहरातील रस्त्यांच्या कडेला प्रशस्त, पांढरी रंगवलेली १४ खोल्यांची व नळे इत्यादी सोयींनी युक्‍त अशी घरे होती.

४. (अ) ऊर नगरात खऱ्‍या देवाच्या उपासकांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागत असे? (ब) अब्रामने कशाप्रकारे यहोवावर विश्‍वास ठेवण्यास सुरवात केली?

पण भौतिक दृष्टिकोनातून ऊर हे सुखसंपन्‍न ठिकाण असले तरीसुद्धा खऱ्‍या देवाची सेवा करू इच्छिणाऱ्‍यांना मात्र येथे अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत होते. हे शहर मूर्तिपूजा आणि अंधविश्‍वासांत आकंठ बुडालेले होते. शहरात उठून दिसणारी एक इमारत म्हणजे नन्‍ना या चंद्र देवतेकरता बांधलेले प्रचंड झिगुरात (मंदिर-मनोरा). साहजिकच, अशा या भ्रष्ट उपासनेत सामील होण्याचा अब्रामवर पुष्कळ दबाव आला असेल; कदाचित त्याच्या नातलगांनीही त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असेल. काही पारंपरिक यहूदी आख्यायिकांनुसार अब्रामचा पिता तेरह हा स्वतः मूर्ति बनवणारा होता. (यहोशवा २४:२, १४, १५) पण अब्राम मात्र भ्रष्ट उपासनेत सामील झाला नाही. त्याचा वृद्ध पूर्वज शेम अद्यापही जिवंत होता आणि त्याने नक्कीच खऱ्‍या देवाविषयीचे ज्ञान अब्रामला दिले असेल. म्हणूनच अब्रामने नन्‍नावर नव्हे तर यहोवावर विश्‍वास ठेवला!—गलतीकर ३:६.

विश्‍वासाची पारख

५. अब्राम अद्याप ऊर येथे असताना देवाने त्याला कोणती आज्ञा व वचन दिले?

अब्रामचा विश्‍वास लवकरच पारखला जाणार होता. देवाने त्याला दर्शन दिले आणि त्याला अशी आज्ञा दिली: “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा; मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील; तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”—उत्पत्ति १२:१-३; प्रेषितांची कृत्ये ७:२, ३.

६. ऊर नगर सोडण्याकरता अब्रामला खरा विश्‍वास असण्याची आवश्‍यकता का होती?

अब्राम वृद्ध आणि अपत्यहीन होता. मग, त्याच्यापासून “मोठे राष्ट्र” निर्माण होणे कसे शक्य होते? आणि त्याला देवाने ज्या देशात जाण्याची आज्ञा दिली ते ठिकाण नेमके कोठे होते? देवाने त्या वेळी या प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे, वैभवी ऊर नगर आणि तेथील आरामशीर जीवनाचा त्याग करण्यासाठी खऱ्‍या विश्‍वासाची आवश्‍यकता होती. कुटुंब, प्रेम आणि बायबल (इंग्रजी) या पुस्तकाच्या लेखकाने प्राचीन काळाविषयी अशी टिप्पणी केली आहे: “एखादा गंभीर गुन्हा केलेल्या व्यक्‍तीला दिली जाणारी सर्वात भयंकर शिक्षा त्या काळी जर कोणती होती तर ती होती कुटुंबातून त्या व्यक्‍तीला बहिष्कृत करणे, किंवा कुटुंबाचे ‘सदस्यत्व’ तिच्याकडून काढून घेणे. . . . म्हणूनच अब्राहामने देवाच्या आज्ञेनुसार केवळ आपला देशच नव्हे तर आपल्या रक्‍ताच्या नातलगांना सोडून दिले यावरून त्याचा असामान्य आज्ञाधारकपणा आणि देवावर असलेला त्याचा पूर्ण भरवसा दिसून येतो.”

७. अब्रामवर आल्या त्याप्रकारच्या परीक्षा आज ख्रिश्‍चनांवरही कशाप्रकारे येऊ शकतात?

आजही ख्रिस्ती लोकांसमोर अशाचप्रकारच्या परीक्षा येऊ शकतात. अब्रामप्रमाणे आपल्यावरही ईश्‍वरशासित गोष्टींपेक्षा भौतिक स्वार्थांना प्राधान्य देण्याचा दबाव येऊ शकतो. (१ योहान २:१६) अविश्‍वासी कौटुंबिक सदस्य आपला विरोध करू शकतात; यात बहिष्कृत नातलगांचाही समावेश असू शकतो जे आपल्याला आध्यात्मिकरित्या धोकेदायक संगतीत ओढण्याचा प्रयत्न करू शकतात. (मत्तय १०:३४-३६; १ करिंथकर ५:११-१३; १५:३३) याबाबतीत अब्रामने आपल्याकरता उत्तम आदर्श मांडला आहे. त्याने इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा, रक्‍ताच्या नात्यांपेक्षाही देवासोबतच्या आपल्या मैत्रीसंबंधाला प्राधान्य दिले. देवाच्या प्रतिज्ञा केव्हा, कशा किंवा कोठे पूर्ण होतील याविषयी त्याच्याजवळ स्पष्ट माहिती नव्हती. पण तरीसुद्धा त्या प्रतिज्ञांवर तो आपला जीवही पणाला लावण्यास तयार होता. आज आपल्या जीवनात देवाच्या राज्याला प्राधान्य देण्याचे किती चांगले प्रोत्साहन आपल्याला अब्रामच्या उदाहरणातून मिळते.—मत्तय ६:३३.

८. अब्रामच्या विश्‍वासाचा त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर कसा प्रभाव पडला आणि यावरून आपण काय शिकू शकतो?

अब्रामच्या कुटुंबातील सदस्यांविषयी काय? अब्रामचा विश्‍वास आणि भरवसा पाहून त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला असेल यात शंका नाही. कारण देवाच्या आज्ञेनुसार ऊर सोडताना त्याची बायको साराय आणि त्याचा अनाथ पुतण्या लोट देखील त्यांच्याबरोबर गेले. अब्रामचा भाऊ नाहोर आणि त्याच्या काही मुलाबाळांनी देखील कालांतराने ऊर सोडले व ते हारान येथे येऊन राहू लागले व तेथे त्यांनी यहोवाची उपासना केली. (उत्पत्ति २४:१-४, १०, ३१; २७:४३; २९:४, ५) इतकेच नव्हे, तर अब्रामचा पिता तेरह देखील आपल्या मुलासोबत जाण्यास तयार झाला! म्हणूनच कनानला जाण्याकरता आपल्या कुटुंबासोबत ऊर सोडण्याचे श्रेय कुटुंबप्रमुख या नात्याने, तेरहला देण्यात आले आहे. (उत्पत्ति ११:३१) आपणही व्यवहारचातुर्याचा उपयोग करून आपल्या नातेवाईकांना साक्ष देण्याचा प्रयत्न केल्यास यामुळे चांगले परिणाम मिळू शकतील का?

९. प्रवासाकरता अब्रामला कदाचित कोणती तयारी करावी लागली असेल आणि यासाठी त्याला बराच त्याग का करावा लागला असेल?

प्रवासाला निघण्याआधी अब्रामला बरीच कामे करायची होती. त्याला जमीन, मालमत्ता विकायची होती आणि तंबू, उंट, अन्‍नधान्य विकत घ्यायचे होते. कमी वेळात या सर्व व्यवस्था करायच्या असल्यामुळे कदाचित त्याला आर्थिक नुकसानही झाले असावे पण यहोवाची आज्ञा पाळण्यात त्याने आनंद मानला. शेवटी सर्व तयारी पूर्ण झाली आणि अब्रामचा काफला ऊरच्या वेशीजवळ प्रवासाला निघण्यासाठी सज्ज होता. तो किती महत्त्वाचा दिवस होता! फरात नदीला वळसा घालून काफला वायव्येकडे निघाला. बरेच आठवडे प्रवास करून जवळजवळ १,००० किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर त्यांचा काफला मेसोपोटेमियाच्या उत्तरेकडे असलेल्या हारान शहरात आला. या ठिकाणी सहसा सगळे काफले येऊन थांबत.

१०, ११. (अ) अब्राम काही काळ हारान येथे का राहिला असावा? (ब) वृद्ध आईवडिलांची काळजी घेणाऱ्‍या ख्रिस्ती बांधवांना कोणते प्रोत्साहन देता येईल?

१० अब्राम हारान येथे स्थायिक झाला. कदाचित आपल्या वयोवृद्ध पित्याचा विचार करून अब्रामने असे केले असावे. (लेवीय १९:३२) आज बऱ्‍याच ख्रिस्ती लोकांनाही आपल्या वृद्ध किंवा आजारी आईवडिलांची काळजी घेण्याचा बहुमान मिळाला आहे आणि काहींना यासाठी बऱ्‍याच तडजोडी देखील कराव्या लागतात. पण अशी आवश्‍यकता भासल्यास त्यांनी खात्री बाळगावी की त्यांचे प्रेमळ त्याग देवाच्या दृष्टीने “मान्य” आहेत.—१ तीमथ्य ५:४.

११ काळ सरत होता. “तेरहाचे वय दोनशेपाच वर्षांचे होऊन तो हारान येथे मरण पावला.” अब्रामला नक्कीच आपल्या पित्याच्या मृत्यूचे खूप दुःख झाले असेल, पण शोक करण्याचा काळ गेल्यानंतर तो लगेच तेथून निघाला. “हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय पंचाहत्तर वर्षांचे होते. आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळविलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळविलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला.”—उत्पत्ति ११:३२; १२:४, ५.

१२. हारान येथे राहात असताना अब्रामने काय केले?

१२ लक्ष देण्याजोगी एक गोष्ट म्हणजे, हारान येथे असताना अब्रामने ‘मालमत्ता मिळवली.’ ऊर सोडताना त्याने अनेक भौतिक त्याग केले असले तरीही हारान सोडताना मात्र तो एक श्रीमंत माणूस होता. स्पष्टपणे हे देवाच्या आशीर्वादामुळेच घडले होते. (उपदेशक ५:१९) आज जरी देवाने आपल्या सर्व लोकांना श्रीमंत बनवण्याची प्रतिज्ञा दिली नसली तरीसुद्धा जे राज्याकरता ‘घरदार, बहीणभाऊ’ सोडतात त्यांच्या गरजा भागवण्याची त्याची प्रतिज्ञा तो विश्‍वासूपणे पूर्ण करतो. (मार्क १०:२९, ३०) अब्रामने ‘माणसेही मिळवली’ अर्थात त्याच्याकडे बरेच सेवक होते. जेरूसलेम टार्गम आणि कॅल्डी पॅराफ्रेज यात असे म्हटले आहे की अब्रामने ‘धर्मप्रसार केला.’ (उत्पत्ति १८:१९) तुमचा विश्‍वास तुम्हाला तुमच्या शेजाऱ्‍यांशी, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्‍यांशी किंवा शाळासोबत्यांशी राज्याविषयी बोलण्यास प्रवृत्त करतो का? स्थायिक होऊन देवाची आज्ञा विसरून जाण्याऐवजी अब्रामने हारान येथे असताना आपल्या वेळेचा सदुपयोग केला. पण आता हारानमध्ये त्याचा काळ पूर्ण झाला होता. तेव्हा “परमेश्‍वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला.”—उत्पत्ति १२:४.

फरात नदीच्या पलीकडे

१३. अब्रामने फरात नदी केव्हा पार केली आणि ही घटना महत्त्वपूर्ण का होती?

१३ पुन्हा एकदा अब्रामचा प्रवास सुरू झाला. हारान मागे सोडल्यावर त्याचा काफला पश्‍चिमेकडे जवळजवळ ९० किलोमीटर अंतर पार करून गेला. कदाचित त्याने आपल्या काफल्यासह फरात नदीवर एका विशिष्ट ठिकाणी मुक्काम केला असावा. या ठिकाणाहून नदीच्या पलीकडे कारकेमिश हे प्राचीन व्यापार केंद्र होते. सहसा या ठिकाणाहून बरेच काफले फरात नदीच्या पलीकडे जायचे. * अब्रामचे काफले कोणत्या दिवशी फरात नदी पार करून गेले? बायबल असे सूचित करते की सा.यु.पू. १५१३ साली निसान १४ तारखेला यहूदी ईजिप्तमधून बाहेर पडले. या तारखेच्या ४३० वर्षांआधी अब्रामने फरात नदी पार केली. निर्गम १२:४१ म्हणते: “चारशेतीस वर्षे संपली त्याच दिवशी परमेश्‍वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या.” (तिरपे वळण आमचे.) त्याअर्थी, अब्रामने देवाच्या आज्ञेनुसार फरात नदी पार केली तेव्हा सा.यु.पू. १९४३ साली निसान १४ तारखेला अब्रामसोबत केलेला करार क्रियाशील झाला.

१४. (अ) अब्राम आपल्या विश्‍वासाच्या आधारावर काय पाहू शकत होता? (ब) आज देवाचे लोक कोणत्या अर्थाने अब्रामापेक्षा अधिक आशीर्वादित आहेत?

१४ अब्रामने एक वैभवी नगर सोडले होते. पण आता तो ‘[“खरे,” NW] पाये असलेल्या नगरावर’ दृष्टी लावू शकत होता; हे नगर म्हणजे मानवजातीवर राज्य करणारे एक नीतिमान सरकार. (इब्री लोकांस ११:१०) होय, अब्रामजवळ सर्व तपशील नव्हते, पण तरीही मृत्यूच्या दास्यातून मानवजातीला सोडवण्यासाठी देवाने केलेल्या उद्देशाचे काही मूलभूत पैलू त्याला समजू लागले होते. आपली स्थिती मात्र अब्रामसारखी नाही, उलट आपण आशीर्वादित आहोत कारण आपल्याला देवाच्या उद्देशांविषयी बरीच सविस्तर माहिती देण्यात आली आहे. (नीतिसूत्रे ४:१८) अब्राम ज्याची वाट पाहात होता ते ‘नगर’ अर्थात राज्य सरकार आता वास्तवात उतरले आहे—१९१४ पासून ते स्वर्गात स्थापित झाले आहे. हे लक्षात घेऊन, आपण आपल्या कृतींतून यहोवावर विश्‍वास आणि भरवसा दाखवण्यास प्रेरित व्हायला नको का?

वचनयुक्‍त देशातील तात्पुरता मुक्काम

१५, १६. (अ) यहोवासाठी वेदी बांधण्याकरता अब्रामला धैर्याची आवश्‍यकता का होती? (ब) आज ख्रिस्ती लोक अब्रामप्रमाणे धैर्याने कसे वागू शकतात?

१५ उत्पत्ति १२:५, ६ येथे असे सांगितले आहे: “कनान देशात ते जाऊन पोहोचले. अब्राम त्या देशातून शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापाशी गेला.” शखेम हे जेरूसलेमच्या उत्तर दिशेला ५० किलोमीटर अंतरावर, एका सुपीक खोऱ्‍यात वसले होते. या प्रदेशाला “पवित्र देशातील स्वर्ग” म्हणण्यात आले आहे. पण “त्या काळी त्या देशात कनानी लोक राहात होते.” कनानी लोक अनैतिक असल्यामुळे त्यांच्या नीतिभ्रष्ट प्रभावापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी अब्रामला बराच त्रास सहन करावा लागणार होता.—निर्गम ३४:११-१६.

१६ दुसऱ्‍यांदा, “परमेश्‍वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” ही किती आनंददायक प्रतिज्ञा होती! अर्थात, ज्या प्रतिज्ञेची पूर्णता त्याच्या संततीच्या संदर्भात होणार होती त्याविषयी आनंद मानण्याकरता अब्रामला पूर्ण विश्‍वास असण्याची आवश्‍यकता होती. म्हणूनच त्याने “तेथे परमेश्‍वराची एक वेदी बांधिली.” (उत्पत्ति १२:७) एका बायबल विद्वानाच्या मते: “त्या देशात वेदी बांधण्याचे कृत्य, विश्‍वासाच्या आधारावर मिळालेल्या हक्काने त्या भूमीचा ताबा घेण्याचे सूचक होते.” शिवाय या ठिकाणी वेदी बांधणे एक धैर्याचे कृत्य होते. कालांतराने नियमशास्त्राच्या कराराधीन ज्याप्रकारच्या वेद्या, अर्थात नैसर्गिक दगडाच्या वेद्या बांधण्यास सांगण्यात आले होते, त्याचप्रकारची ही वेदी असेल यात शंका नाही. (निर्गम २०:२४, २५) ही वेदी कनानी लोकांच्या वेद्यांपेक्षा अगदी वेगळी असल्यामुळे उठून दिसत असेल. अशारितीने, लोकांचा राग आणि शारीरिक धोका पत्करून अब्रामने खरा देव यहोवा याचा उपासक म्हणून स्वतःची जाहीररित्या ओळख करून देण्याचा निर्भयपणा दाखवला. आज आपल्याविषयी काय? आपल्यापैकी काहीजण—खासकरून तरुण—इतर लोकांना, उदाहरणार्थ शेजाऱ्‍यांना किंवा शाळासोबत्यांना हे सांगण्यास कचरतात का, की आपण यहोवाचे उपासक आहोत? अब्रामचे निर्भय उदाहरण आपल्या सर्वांना यहोवाचे सेवक असण्यात गर्व मानण्याचे प्रोत्साहन देते!

१७. अब्रामने कसे दाखवले की तो देवाच्या नावाचा घोषक होता आणि यावरून ख्रिश्‍चनांना आज कशाची आठवण करून दिली जाते?

१७ अब्राम जेथे कोठे गेला तेथे त्याने सर्वप्रथम यहोवाच्या उपासनेला महत्त्व दिले. “मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला; त्याच्या पश्‍चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते; तेथे त्याने परमेश्‍वराची वेदी बांधिली आणि परमेश्‍वराच्या नावाने प्रार्थना केली [“यहोवाच्या नावाचा धावा केला,” NW].” (उत्पत्ति १२:८) ‘नावाचा धावा करणे’ या इब्री वाक्यांशाचा अर्थ “नावाची घोषणा (प्रचार) करणे” असाही होतो. निश्‍चितच अब्रामने आपल्या कनानी शेजाऱ्‍यांमध्ये निडरतेने यहोवाच्या नावाची घोषणा केली असेल. (उत्पत्ति १४:२२-२४) अब्रामचे उदाहरण आपल्याला, ‘त्याचे नाव पत्करण्याचे अर्पण करण्याच्या’ कार्यात जास्तीत जास्त सहभाग घेण्याच्या जबाबदारीची आठवण करून देते.—इब्री लोकांस १३:१५; रोमकर १०:१०.

१८. कनानच्या रहिवाशांसोबत अब्रामचे कसे संबंध होते?

१८ यांपैकी कोणत्याही ठिकाणी अब्राम फार काळ राहिला नाही. “तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला.” नेगेब हा यहुदाच्या डोंगरांच्या दक्षिणेकडे असलेला अर्धशुष्क प्रदेश होता. (उत्पत्ति १२:९) सतत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, प्रत्येक नवीन ठिकाणी यहोवाचे उपासक म्हणून स्वतःची ओळख करून देण्याद्वारे अब्राम व त्याच्या घराण्याने “आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले.” (इब्री लोकांस ११:१३) त्यांच्या अवतीभवती असलेल्या मूर्तिपूजक लोकांशी फार जवळीक न करण्याची त्यांनी सतत काळजी घेतली. आज ख्रिश्‍चनांनी देखील ‘जगाचे’ असू नये. (योहान १७:१६) अर्थात आपल्या शेजाऱ्‍यांसोबत व सहकाऱ्‍यांसोबत आपण प्रेमाने व शालीनतेने वागतो पण देवापासून अलिप्त असलेल्या या जगाची प्रवृत्ती प्रदर्शित करणाऱ्‍या कोणत्याही प्रकारच्या वर्तनात सामील न होण्याची आपण नेहमी काळजी घेतो.—इफिसकर २:२, ३.

१९. (अ) भटक्या जीवनशैलीमुळे अब्राम आणि साराय यांच्यासमोर वेगवेगळी आव्हाने का आली असतील? (ब) आणखी कोणती आव्हाने अब्रामसमोर येणार होती?

१९ अशा खडतर भटक्या जीवनाशी जुळवून घेणे अब्राम आणि साराय या दोघांनाही निश्‍चितच सोपे गेले नसेल, हे आपण विसरू नये. ऊरच्या बाजारांतून विकत घेतलेल्या अन्‍नधान्याऐवजी ते खाद्यासाठी आता आपल्या गुराढोरांवर अवलंबून होते, आणि पक्क्या घरात राहण्याऐवजी तंबूंत राहत होते. (इब्री लोकांस ११:९) अब्रामला दररोज बरीच कामे करावी लागत असतील; आपल्या कळपांची आणि सेवकांची देखरेख करण्यासाठी त्याला अनेक जबाबदाऱ्‍या पूर्ण कराव्या लागत असतील. सारायसुद्धा त्यांच्या संस्कृतीनुसार स्त्रियांच्या पारंपरिक जबाबदाऱ्‍या पूर्ण करत असेल; जसे स्वयंपाक करणे, सूत कातणे, कपडे शिवणे इत्यादि. (उत्पत्ति १८:६, ७; २ राजे २३:७; नीतिसूत्रे ३१:१९; यहेज्केल १३:१८) पण लवकरच त्यांच्यावर नवीन परीक्षा येणार होत्या. अब्राम व त्याच्या घराण्यावर एक जीवन-मरणाचा प्रसंग येणार होता! हे आव्हानही अब्रामला यशस्वीरित्या पेलता येणार होते का?

[तळटीपा]

^ आज फरात नदी ऊर शहराच्या पूर्वीच्या ठिकाणापासून पूर्वेकडे १६ किलोमीटर अंतरावर वाहत असली तरीसुद्धा पुराव्यांवरून असे दिसून येते की प्राचीन काळात ही नदी ऊर शहराच्या पश्‍चिमेकडे वाहायची. म्हणूनच अब्राम “[फरात] नदीच्या पलीकडून” आला होता असा नंतर त्याच्याविषयी उल्लेख करण्यात आला.—यहोशवा २४:३.

^ बऱ्‍याच शतकांनंतर अशूरनसिरपाल दुसरा याने कारकेमिशजवळ फरात नदी पार करण्यासाठी तराफ्यांचा वापर केला होता. अब्रामनेही असेच केले, की त्याचा काफला पाण्यातून चालून पलीकडे गेला याविषयी बायबल सांगत नाही.

याकडे तुम्ही लक्ष दिले का?

• अब्रामला ‘जे लोक विश्‍वास ठेवतात, त्या सर्वांचा बाप’ का म्हणण्यात आले आहे?

• खास्द्यांचे ऊर सोडण्याकरता अब्रामला विश्‍वासाची का गरज होती?

• आपण यहोवाच्या उपासनेला सर्वप्रथम महत्त्व देतो हे अब्रामने कशाप्रकारे दाखवले?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

अब्रामचा प्रवास मार्ग

ऊर

हारान

कारकेमिश

कनान

महासमुद्र

[चित्राचे श्रेय]

Pictorial Archive (Near Eastern History) Est. and Survey of Israel यांच्या नकाशावर आधारित

[१५ पानांवरील चित्र]

ऊर येथील आरामशीर जीवन सोडून देण्यासाठी अब्रामला विश्‍वासाची गरज होती

[१८ पानांवरील चित्र]

तंबूंत राहण्याद्वारे, अब्राम व त्याच्या घराण्याने “आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले”