व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चांगले करण्याचे सोडू नका

चांगले करण्याचे सोडू नका

चांगले करण्याचे सोडू नका

“चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये [“आपण सोडू नये,” Nw] कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.”गलतीकर ६:९.

१, २. (अ) देवाची सेवा करताना सहनशक्‍ती असणे का आवश्‍यक आहे? (ब) अब्राहामने कशाप्रकारे सहनशक्‍ती दाखवली आणि असे करण्यात त्याला कशामुळे मदत मिळाली असावी?

 यहोवाचे साक्षीदार या नात्याने देवाची इच्छा करण्यात आपण आनंद मानतो. तसेच शिष्यपणाचे “जू” स्वतःवर घेतल्यामुळेही आपल्याला तजेला मिळतो. (मत्तय ११:२९) पण ख्रिस्तासोबत यहोवाची सेवा करणे नेहमीच सोपे नसते. प्रेषित पौलाने हे स्पष्ट केले; त्याने सहख्रिस्ती बांधवांना असे आर्जवले: “तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ति करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्‍तीचे अगत्य आहे.” (इब्री लोकांस १०:३६) सहनशक्‍ती असणे फार आवश्‍यक आहे, कारण देवाची सेवा करताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते.

अब्राहामाच्या जीवनावर एक नजर टाकल्यास या वस्तुस्थितीचा पुरावा मिळतो. अनेकदा त्याला कठीण निर्णय घ्यावे लागले व अनेक तणावपूर्ण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. ऊर येथील ऐषआरामाचे जीवन सोडून देण्याची आज्ञा मिळणे तर केवळ एक सुरवात होती. लवकरच त्याला दुष्काळाचा सामना करावा लागला, शेजाऱ्‍यांच्या शत्रुत्वाला तोंड द्यावे लागले, एकदा तर त्याने आपल्या पत्नीला जवळजवळ गमवलेच होते, शिवाय काही नातलगांचा द्वेषभाव त्याला सहन करावा लागला आणि युद्धातील क्रूरतेलाही तोंड द्यावे लागले. आणि पुढे याहीपेक्षा भयंकर समस्या त्याच्यासमोर येणार होत्या. पण चांगले करणे अब्राहामने कधीही सोडले नाही. हे खासकरून उल्लेखनीय आहे, कारण आज आपल्याजवळ आहे त्याप्रमाणे त्याच्याजवळ देवाचे वचन नव्हते. पण त्याला देवाची पहिली भविष्यवाणी माहीत होती; या भविष्यवाणीत देवाने असे घोषित केले होते: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन.” (उत्पत्ति ३:१५) ही भाकीत संतती अब्राहामाच्या वंशातून येणार असल्यामुळे साहजिकच सैतानाचा रोष त्याच्यावर येणार होता. हे समजून घेतल्यामुळे निश्‍चितच अब्राहामाला सर्व परीक्षांना आनंदाने तोंड देणे शक्य झाले असेल.

३. (अ) आज यहोवाचे लोक त्यांच्यासमोर परीक्षाप्रसंग येण्याची अपेक्षा का करू शकतात? (ब) गलतीकर ६:९ येथे कोणते प्रोत्साहन देण्यात आले आहे?

आज यहोवाचे लोकही त्यांच्यासमोर परीक्षा येण्याची अपेक्षा करू शकतात. (१ पेत्र १:६, ७) कारण प्रकटीकरण १२:१७ येथे आपल्याला सूचित करण्यात आले आहे, की सैतान अभिषिक्‍त शेषजनांसोबत ‘लढाई करत’ आहे. आणि “दुसरी मेंढरे” या अभिषिक्‍त जनांसोबत सहकार्य करत असल्यामुळे ते देखील सैतानाचे शत्रू बनतात. (योहान १०:१६) ख्रिस्ती लोकांना त्यांच्या सार्वजनिक सेवेत तर विरोधाला तोंड द्यावेच लागते, शिवाय आपल्या वैयक्‍तिक जीवनात देखील त्यांना अनेक परीक्षांचा व दबावांचा सामना करावा लागतो. पण पौल आपल्याला असे प्रोत्साहन देतो: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये [“आपण सोडू नये,” NW] कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” (गलतीकर ६:९) होय, सैतान आपला विश्‍वास खचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण आपण त्याचा प्रतिकार केला पाहिजे आणि विश्‍वासात खंबीर राहिले पाहिजे. (१ पेत्र ५:८, ९) विश्‍वासूपणे आपल्या सेवेत टिकून राहिल्यामुळे काय परिणाम होईल? याकोब १:२, ३ सांगते: “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्‍वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्‍न होतो.”

थेट हल्ला

४. देवाच्या लोकांचा विश्‍वास खचवण्यासाठी सैतानाने कशाप्रकारे त्यांच्यावर थेट हल्ले केले आहेत?

ख्रिस्ती व्यक्‍तीला जीवनात “नाना प्रकारच्या परीक्षांना” तोंड द्यावे लागू शकते हे अब्राहामाच्या जीवनावरून दिसून येते. उदाहरणार्थ शिनारच्या सैन्याच्या हल्ल्याला त्याला तोंड द्यावे लागले. (उत्पत्ति १४:११-१६) आज देखील सैतान देवाच्या लोकांचा छळ करण्याद्वारे त्यांच्यावर थेट हल्ला करतो. दुसरे महायुद्ध संपुष्टात आल्यापासून कितीतरी देशांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती शैक्षणिक कार्यावर सरकारी प्रतिबंध लादले आहेत. २००१ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी) यात अंगोला येथील ख्रिश्‍चनांना शत्रूंकडून किती क्रूरता सहन करावी लागली याविषयी माहिती आहे. पण या देशांतही आपले बांधव यहोवावर विसंबून राहून खंबीरपणे आपले कार्य करतच आहेत! हिंसाचार किंवा बंड करण्याद्वारे प्रत्युत्तर देण्याऐवजी ते सुज्ञतेने प्रचाराच्या कार्यात टिकून राहिले आहेत.—मत्तय २४:१४.

५. ख्रिस्ती तरुणांना शाळेत कशाप्रकारच्या छळाला तोंड द्यावे लागू शकते?

पण छळ म्हणजे नेहमी हिंसाचार नसतो. अब्राहामला इश्‍माएल व इसहाक ही दोन मुले झाली. उत्पत्ति २१:८-१२ यात एका प्रसंगाचे वर्णन केले आहे, जेव्हा इश्‍माएल इसहाकवर ‘खिदळत’ होता. गलतीकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाने स्पष्ट केले हे मुलांचे आपसातले हसणे खिदळणे नव्हते कारण इश्‍माएलने इसहाकचा छळ केला असे तो सांगतो! (गलतीकर ४:२९) शाळासोबत्यांकडून होणारी थट्टा आणि विरोधकांचे उपहासात्मक बोलणे याला देखील छळ म्हणता येईल. रायन नावाचा एक ख्रिस्ती मुलगा आपला अनुभव आठवून सांगतो: “दररोज शाळेला जाताना व येताना १५ मिनिटांचा बसप्रवास कधी एकदाचा संपेल असे मला वाटायचे, कारण माझे वर्गसोबती सतत मला बरेवाईट बोलायचे. सिगरेटच्या लाईटरने पिना गरम करून ते मला चटके द्यायचे.” ही क्रूर वागणूक त्याला का दिली जायची? “मला मिळालेल्या ईश्‍वरशासित प्रशिक्षणामुळे शाळेतील इतर मुलांपेक्षा मी वेगळा होतो.” पण रायनने त्याच्या आईवडिलांच्या मदतीने ही परीक्षा विश्‍वासूपणे सहन केली. तरुणांनो, तुमचे मित्र व सोबती तुमची थट्टा करतात तेव्हा तुम्ही हताश होता का? हिंमत हारू नका! विश्‍वासूपणे या परीक्षा सहन केल्यास तुम्हाला येशूच्या पुढील शब्दांची पूर्णता अनुभवता येईल: “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य.”—मत्तय ५:११.

दररोजच्या चिंता

६. आज सहख्रिस्ती बांधवांचे संबंध कशामुळे बिघडू शकतात?

आपल्यासमोर येणाऱ्‍या बहुतेक समस्या दैनंदिन चिंतांशी संबंधित असतात. अब्राहामला देखील त्याच्या व त्याचा पुतण्या लोट याच्या गुराख्यांमध्ये उत्पन्‍न झालेल्या तणावाला तोंड द्यावे लागले होते. (उत्पत्ति १३:५-७) तशाचप्रकारे आजही वैयक्‍तिक मतभेदांमुळे आणि लहानमोठ्या हेव्यादाव्यांमुळे बांधवांचे आपसांतील संबंध बिघडू शकतात आणि यामुळे मंडळीतली शांती देखील भंग होण्याची शक्यता आहे. “जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.” (याकोब ३:१६) म्हणूनच निराश न होता, आपण स्वतःच्या अहंकारापेक्षा मंडळीच्या शांतीला अधिक महत्त्व दिले पाहिजे आणि अब्राहामप्रमाणे इतरांच्या भल्याचा विचार केला पाहिजे.—१ करिंथकर १३:५; याकोब ३:१७.

७. (अ) एखाद्या ख्रिस्ती बांधवाने भावना दुखवल्या असल्यास काय करावे? (ब) इतरांसोबत चांगले संबंध टिकवून ठेवण्याच्या बाबतीत अब्राहामने उत्तम उदाहरण कशाप्रकारे मांडले?

एखादा बंधू आपल्याशी अन्यायाने वागला आहे असे आपल्याला वाटते तेव्हा शांती राखणे एक आव्हान बनू शकते. नीतिसूत्रे १२:१८ म्हणते: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो.” अविचाराने बोललेले शब्द, मग ते वाईट हेतूने बोललेले नसतील तरीही मनाला लागू शकतात. त्यातल्या त्यात जेव्हा लोक निर्दयपणे आपल्याबद्दल साफ खोटी माहिती पसरवतात किंवा चहाडी करतात तेव्हा अधिकच दुःख होते. (स्तोत्र ६:६, ७) पण दुखावलेल्या भावनांमुळे निराश होऊन ख्रिस्ती व्यक्‍तीने चांगले ते करण्याचे सोडता कामा नये! तुम्ही अशा परिस्थितीत असाल, तर ही समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या आणि तुमचे मन ज्याने दुखावले त्या व्यक्‍तीला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. (मत्तय ५:२३, २४; इफिसकर ४:२६) तिला क्षमा करण्यास तयार असा. (कलस्सैकर ३:१३) पोटात राग न धरल्यामुळे आपल्या दुखावलेल्या भावना देखील लवकरच सामान्य होतात आणि आपल्या बांधवासोबतचा आपला संबंधही सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा होतो. अब्राहामने लोटाविरुद्ध मनात राग बाळगला नाही. उलट, संकट आले तेव्हा तो लोट व त्याच्या घराण्याच्या मदतीला धावून गेला.—उत्पत्ति १४:१२-१६.

स्वतःवर ओढवून घेतलेल्या परीक्षा

८. (अ) ख्रिस्ती ‘स्वतःस पुष्कळशा खेदांनी कशाप्रकारे भोसकून’ घेण्याची शक्यता आहे? (ब) अब्राहाम भौतिक गोष्टींविषयी संतुलित दृष्टिकोन कशामुळे ठेवू शकला?

आपल्यावर येणाऱ्‍या काही परीक्षा आपण स्वतः ओढवून घेतलेल्या असतात हे कबूल करावेच लागेल. उदाहरणार्थ, येशूने आपल्या अनुयायांना अशी आज्ञा दिली की: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ति साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करितात, आणि चोर घर फोडून चोरी करितात.” (मत्तय ६:१९) पण काही बांधव देवाच्या राज्याला प्राधान्य देण्याऐवजी भौतिक गोष्टींना जीवनात प्राधान्य देतात आणि यामुळे ‘स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतात.’ (१ तीमथ्य ६:९, १०) देवाला संतुष्ट करण्यासाठी अब्राहाम भौतिक गोष्टींचा, ऐषआरामाचा त्याग करण्यास तयार होता. “परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्‍वासाने जाऊन राहिला, त्याच वचनाचे सहभागी वारीस इसहाक व याकोब ह्‍यांच्याबरोबर डेऱ्‍यात त्याची वस्ती होती. कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता.” (इब्री लोकांस ११:९, १०) अब्राहामला भविष्यातील ‘नगरावर’ अर्थात देवाच्या सरकारवर विश्‍वास होता आणि यामुळे त्याला भौतिक संपत्तीवर विसंबून न राहण्यास मदत मिळाली. आपणही असेच करणे सुज्ञपणाचे ठरणार नाही का?

९, १०. (अ) मंडळीत मान-सन्मान मिळवण्याची इच्छा कशाप्रकारे एक परीक्षा बनू शकते? (ब) आज एखादा बांधव स्वतःला “कनिष्ठ” कसा समजू शकतो?

दुसऱ्‍या एका गोष्टीचा विचार करा. बायबल सडेतोडपणे म्हणते: “आपण कोणी नसता कोणी तरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो.” (गलतीकर ६:३) शिवाय, आपल्याला असाही सल्ला देण्यात येतो, की “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.” (फिलिप्पैकर २:३) काहीजण या सल्ल्यानुसार न वागल्यामुळे स्वतःवर परीक्षा ओढवून घेतात. ‘चांगले काम’ करण्याचा नव्हे तर मंडळीत मान-सन्मान मिळवण्याच्या उद्देशाने कार्य करत असल्यामुळे, मंडळीत जेव्हा त्यांना विशिष्ट विशेषाधिकार मिळत नाहीत तेव्हा ते निराश होतात आणि कुरकूर करू लागतात.—१ तीमथ्य ३:१.

१० ‘आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक न मानण्याबद्दल’ अब्राहामने आपल्यासमोर उत्तम आदर्श मांडला. (रोमकर १२:३) मलकीसदेक याला अब्राहाम भेटला तेव्हा, यहोवाची आपल्यावर विशेष कृपा असल्यामुळे आपण श्रेष्ठ आहोत असे अब्राहामने भासवले नाही. उलट त्याने मलकीसदेकचे श्रेष्ठ स्थान ओळखून त्याला दशमांश दिला. (इब्री लोकांस ७:४-७) आज ख्रिश्‍चनांनी देखील सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, स्वतःला “कनिष्ठ” समजण्यास तयार असले पाहिजे. (लूक ९:४८) मंडळीत पुढाकार घेणारे तुम्हाला काही विशेषाधिकार मुद्दाम देत नाहीत असे वाटत असल्यास, प्रामाणिकपणे आत्म-परीक्षण करून पाहा की तुम्हाला तुमच्या व्यक्‍तिमत्त्वात किंवा वागण्याच्या पद्धतीत कोणकोणत्या सुधारणा करता येतील. आपल्याजवळ जे विशेषाधिकार नाहीत त्यांविषयी नाराज होण्याऐवजी जो विशेषाधिकार तुमच्याजवळ आहे त्याचा, अर्थात इतरांना यहोवाचे ज्ञान घेण्यात मदत करण्याच्या विशेषाधिकाराचा पुरेपूर फायदा घ्या. होय, “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्‍यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे.”—१ पेत्र ५:६.

न पाहिलेल्या गोष्टींवर विश्‍वास

११, १२. (अ) मंडळीतील काहीजण या काळाची निकड कोणत्या कारणांमुळे विसरू शकतात? (ब) देवाच्या प्रतिज्ञांवरील विश्‍वासाच्या आधारावर आपले जीवन उभे करण्याच्या बाबतीत अब्राहामने कशाप्रकारे उत्तम आदर्श मांडला?

११ दुसऱ्‍या प्रकारची एक परीक्षा या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंताला उशीर लागत आहे असे वाटण्याशी संबंधित आहे. २ पेत्र ३:११ या वचनानुसार, ख्रिश्‍चनांनी “देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत [“त्याची सतत अपेक्षा करीत,” NW]” राहिले पाहिजे. पण बऱ्‍याच जणांनी अनेक वर्षांपासून, किंबहुना अनेक दशकांपासून या ‘दिवसाची’ वाट पाहिली आहे. यामुळे काहीजण निराश झाले आहेत आणि काळाची निकड विसरून बसले आहेत.

१२ पुन्हा एकदा अब्राहामच्या उदाहरणाचा विचार करा. त्याने आपले सबंध जीवन देवाच्या प्रतिज्ञांवरील विश्‍वासाच्या आधारावर उभे केले आणि तेसुद्धा त्याच्या जीवनकाळात या प्रतिज्ञा पूर्ण होण्याची शक्यता नसताना त्याने असे केले. अर्थात, त्याचा पुत्र इसहाक मोठा होईपर्यंत तो जिवंत होता. पण त्याची संतती “आकाशातील ताऱ्‍यांइतकी” किंवा “समुद्रतीरीच्या वाळूइतकी” झाली आहे असे कित्येक शतकांनंतरच म्हणता येणार होते. (उत्पत्ति २२:१७) पण यामुळे अब्राहाम असंतुष्ट किंवा निराश झाला नाही. म्हणूनच प्रेषित पौलाने अब्राहामबद्दल आणि इतर कुलपित्यांबद्दल असे म्हटले: “हे सर्व जण विश्‍वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ति झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले.”—इब्री लोकांस ११:१३.

१३. (अ) आज ख्रिस्ती कोणत्या अर्थाने “प्रवासी” आहेत? (ब) यहोवा या व्यवस्थीकरणाचा अंत का करणार आहे?

१३ अद्याप ‘दूर’ असलेल्या प्रतिज्ञांच्या पूर्ततेवर विश्‍वास ठेवून जर अब्राहाम आपले जीवन व्यतीत करू शकला तर मग आज आपण किती अधिक केले पाहिजे; कारण आपण ज्यांची वाट पाहात आहोत त्या गोष्टींची पूर्तता होण्याचा काळ अतिशय जवळ आला आहे! अब्राहामप्रमाणे आपणही सैतानाच्या या व्यवस्थीकरणात स्वतःला केवळ “प्रवासी” मानले पाहिजे आणि स्वार्थी जीवनशैली अनुसरण्याचे टाळले पाहिजे. अर्थात, या व्यवस्थीकरणाचा “शेवट” लवकरात लवकर यावा असे आपल्या सर्वांनाच वाटते. (१ पेत्र ४:७) कदाचित आपल्याला गंभीर आरोग्य समस्या असतील. किंवा आपण आर्थिक दबावांचा सामना करत असू. पण आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की यहोवा अंत आणणार आहे ते केवळ आपल्या दुःखदायक समस्या नाहीशा करण्यासाठी नव्हे तर त्याच्या स्वतःच्या नावाच्या पवित्रीकरणासाठी. (यहेज्केल ३६:२३; मत्तय ६:९, १०) अंत जरूर येईल, पण आपल्याला सोयीस्कर वाटणाऱ्‍या वेळी नाही तर यहोवाच्या उद्देशांकरता योग्य असेल त्या वेळी तो येईल.

१४. देवाच्या धीरामुळे आज ख्रिश्‍चनांना कशाप्रकारे फायदा होतो?

१४ हे देखील लक्षात असू द्या, की “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) देव “तुमचे” अर्थात ख्रिस्ती मंडळीतील सदस्यांचे “धीराने सहन करितो” याकडे लक्ष द्या. “त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून” स्वतःला आवश्‍यक बदल करण्यासाठी आपल्यापैकी काहीजणांना साहजिकच अधिक मुदतीची गरज आहे. (२ पेत्र ३:१४) मग, देव आपले धीराने सहन करतो याबद्दल आपण कृतज्ञ असू नये का?

समस्या असूनही आनंदी राहणे

१५. अनेक परीक्षांना तोंड देऊनही येशूने आपला आनंद का गमवला नाही आणि त्याचे अनुकरण केल्यामुळे आज ख्रिश्‍चनांना कशी मदत मिळेल?

१५ अब्राहामाच्या जीवनातून ख्रिश्‍चनांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्याने केवळ विश्‍वासच नाही तर धीर, विचारशीलपणा, धैर्य आणि निःस्वार्थ प्रेम देखील प्रगट केले. त्याने यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात प्राधान्य दिले. अर्थात आपण आठवणीत ठेवले पाहिजे की आपला सर्वश्रेष्ठ आदर्श येशू ख्रिस्त आहे. त्याने देखील अनेक परीक्षांना तोंड दिले पण सर्वकाही सहन करूनही त्याने आपला आनंद गमवला नाही. का? कारण त्याने आपले लक्ष सतत भविष्यातील आशेवर केंद्रित ठेवले. (इब्री लोकांस १२:२, ३) म्हणूनच पौलाने अशी प्रार्थना केली की: “तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचे गौरव करावे म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे [“ख्रिस्त येशूसारखी मनोवृत्ती बाळगून,” NW] तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे.” (रोमकर १५:५) आपली मनोवृत्ती योग्य असेल तर सैतानाने आपल्या मार्गात कितीही समस्या निर्माण केल्या तरीही आपण आनंदी राहू शकू.

१६. जीवनातल्या समस्यांचा दबाव खूप वाढतो तेव्हा आपण काय करू शकतो?

१६ जीवनातल्या समस्यांचा दबाव खूप वाढतो तेव्हा नेहमी या गोष्टीची स्वतःला आठवण करून द्या: जसे देवाचे अब्राहामवर प्रेम होते त्याचप्रमाणे तो तुमच्यावरही प्रेम करतो. तुम्ही यशस्वी व्हावे असे त्याला वाटते. (फिलिप्पैकर १:६) यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा आणि खात्री बाळगा की “तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” (१ करिंथकर १०:१३) देवाच्या वचनाचे दररोज वाचन करण्याची सवय लावा. (स्तोत्र १:२) निरंतर प्रार्थना करत राहा आणि समस्या सहन करण्याकरता यहोवाकडे मदत मागा. (फिलिप्पैकर ४:६) ‘जे मागतात त्यास तो पवित्र आत्मा देईल.’ (लूक ११:१३) आध्यात्मिकरित्या तुमचे पोषण करण्याकरता यहोवाने केलेल्या सर्व तरतुदींचा पुरेपूर फायदा घ्या, उदाहरणार्थ ख्रिस्ती प्रकाशने. तसेच, आपल्या भाऊ बहिणींचा आधार घ्या. (१ पेत्र २:१७) ख्रिस्ती सभांना विश्‍वासूपणे उपस्थित राहा कारण तेथे तुम्हाला तुमच्या परीक्षांना तोंड देण्याकरता आवश्‍यक प्रोत्साहन मिळेल. (इब्री लोकांस १०:२४, २५) तुमच्यासमोर येणाऱ्‍या परीक्षा सहन केल्यामुळे तुम्हाला यहोवाची स्वीकृती मिळेल आणि तुमच्या विश्‍वासूपणामुळे त्याचे हृदय आनंदित होईल याची खात्री बाळगून आनंदी राहा.—नीतिसूत्रे २७:११; रोमकर ५:३-५.

१७. ख्रिस्ती लोक निराश होऊन चांगले ते करण्याचे का सोडत नाहीत?

१७ देवाने अब्राहामला आपला “मित्र” म्हणून त्याच्यावर प्रेम केले. (याकोब २:२३) पण अब्राहामच्या जीवनात एकापाठोपाठ एक तणावदायक परीक्षा व संकटे आली. आज दुष्टाईने भरलेल्या या ‘शेवटल्या काळात’ ख्रिश्‍चनांनाही अशाच परीक्षांची अपेक्षा करता येईल. किंबहुना बायबल अशी ताकीद देते की ‘दुष्ट व भोंदू माणसे ही दुष्टपणात अधिक सरसावतील.’ (२ तीमथ्य ३:१, १३) पण निराश होऊन हाय खाण्याऐवजी, आपल्यावर येणारे दबाव सैतानाच्या दुष्ट जगाचा अंत निकट आल्याचा पुरावा आहेत हे ओळखा. येशू आपल्याला आठवण करून देतो की “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्तय २४:१३) तेव्हा ‘चांगले ते करण्याचे सोडू नका!’ अब्राहामचे अनुकरण करा आणि “विश्‍वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात” त्यांच्यात तुमचाही समावेश होवो!—इब्री लोकांस ६:१२.

याकडे तुम्ही लक्ष दिले का?

• आज यहोवाचे लोक परीक्षा व संकटे येण्याची अपेक्षा का करू शकतात?

• सैतान कशाप्रकारे देवाच्या लोकांवर थेट हल्ला करू शकतो?

• ख्रिस्ती बांधवांचे आपसांतील मतभेद कशाप्रकारे सोडवले जाऊ शकतात?

• गर्विष्ठपणा व अहंकार यांमुळे कशाप्रकारे समस्या उद्‌भवू शकतात?

• देवाच्या अभिवचनांच्या पूर्ततेकरता थांबून राहण्याच्या बाबतीत अब्राहामने कशाप्रकारे उत्तम आदर्श मांडला?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चित्र]

अनेक ख्रिस्ती तरुणांना मित्रमैत्रिणींकडून होणाऱ्‍या थट्टेच्या रूपात छळ सहन करावा लागतो

[२९ पानांवरील चित्र]

अब्राहामच्या काळात देवाच्या अभिवचनांची पूर्तता अद्याप ‘दूर’ होती, तरीसुद्धा अब्राहामने विश्‍वासाच्या आधारावर आपले जीवन उभारले