व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या तारुण्यात यश मिळवणे

तुमच्या तारुण्यात यश मिळवणे

तुमच्या तारुण्यात यश मिळवणे

सौंद , धनसंपत्ती आणि तारुण्य या तिन्हींपैकी तुम्हाला काय निवडायला आवडेल असे एका युरोपियन देशातील रहिवाशांना विचारण्यात आले. बहुतेक लोकांनी तारुण्य हे निवडले. होय, सर्व वयोगटातील लोक किशोर वयातील वर्षे आणि विशीतल्या सुरवातीची वर्षे खास समजतात. आणि तरुणांनी बालपणातून प्रौढपणात यशस्वीरित्या पदार्पण करावे असेच सर्वांना वाटते. पण हे त्यांना कसे करता येईल?

यासाठी बायबलमधील मार्गदर्शन सहायक ठरू शकेल का? निश्‍चितच. आता आपण अशा दोन पैलूंचा विचार करू या ज्यांमध्ये देवाचे वचन तरुणांसाठी विशेष फायद्याचे असू शकते किंवा इतर कोणत्याही वयोगटातल्या लोकांपेक्षा तरुणांनाच अधिककरून मदतीचे असू शकते.

सर्वांबरोबर मिळून मिसळून राहणे

युजेन्ट २००० या वृत्तात जर्मनीतील ५,००० पेक्षा अधिक तरुणांची मनोवृत्ती, मूल्ये आणि वर्तनाचा वेध घेतला आहे. या वृत्तानुसार, तरुण लोक विरंगुळ्यासाठी संगीत ऐकतात, खेळांमध्ये भाग घेतात किंवा फक्‍त भटकतात तेव्हा सहसा एकटे नसतात. इतर कोणत्याही वयोगटातील लोकांच्या तुलनेत, तरुणांना आपल्या वयाच्या लोकांसोबत जास्त वेळ घालवायला आवडते. त्यामुळे, तरुणपणात यशस्वी होण्याचे एक रहस्य म्हणजे इतरांशी मिळून मिसळून राहणे.

परंतु, हे नेहमीच सोपे नसते. आणि तरुण मुले-मुली हे मान्य करतात की, लोकांसोबत व्यवहार करताना सहसा त्यांना समस्या येतात. याबाबतीत, बायबल खरोखर मदत करू शकते. देवाच्या वचनात तरुणांकरता संतुलित नातेसंबंध निर्माण करण्याविषयी आवश्‍यक मार्गदर्शन दिले आहे. बायबल याविषयी काय म्हणते?

मानवी नातेसंबंधांचे सर्वात महत्त्वाचे एक तत्त्व म्हणजे सुवर्ण नियम: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.” इतरांशी आदराने, सन्मानाने आणि नम्रतेने वागल्याने तुम्हालाही ते तशीच वागणूक देतील. नम्र वर्तनाने मतभेद आणि तणाव दूर होतो. इतरांबद्दल तुम्ही विचारशील आहात हे लोकांना समजल्यावर ते तुमच्याकडे खास लक्ष देतील आणि तुम्हाला स्वीकारतील. इतरांकडून मान्यता मिळाल्याने तुम्हाला आनंद वाटणार नाही का?—मत्तय ७:१२.

बायबल असा सल्ला देते की, “आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” आपण स्वतःवर प्रीती करतो, म्हणजे स्वतःची काळजी घेतो आणि स्वतःला फार मोठा किंवा फार लहान न समजता माफक प्रमाणात आत्म-सन्मान बाळगतो. हे का आवश्‍यक आहे? कारण जर तुम्हाला आत्म-सन्मान नसला तर तुम्ही इतरांची टीका करू लागाल आणि यामुळे चांगले नातेसंबंध बिघडतात. पण, योग्य प्रमाणात बाळगलेला आत्म-सन्मान हा एक आधार आहे ज्याच्यावर दृढ मित्रसंबंध बांधता येतात.—मत्तय २२:३९.

एकदा मैत्री प्रस्थापित झाली की मग दोन्ही पक्षांनी प्रयत्न करून ती दृढ करायची असते. मैत्रीसाठी वेळ देण्यामध्ये तुम्हाला आनंद वाटला पाहिजे कारण “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” देण्याचा एक प्रकार म्हणजे क्षमा करणे; म्हणजेच, क्षुल्लक चुकांकडे दुर्लक्ष करणे आणि इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा न करणे. बायबल आपल्याला सांगते: “तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो.” होय, “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.” कोणा मित्राने तुमची एखादी चूक दाखवली तर? तुमची काय प्रतिक्रिया असते? बायबलमधील हा व्यावहारिक सल्ला लक्षात घ्या: ‘मन उतावळे होऊ देऊन रागावू नका’ कारण ‘मित्राने केलेले घाय खऱ्‍या प्रेमाचे असतात.’ तुमचे विचार, बोलणे आणि वर्तन यांवर तुमच्या मित्रांचा प्रभाव पडतो हे खरे नाही का? म्हणूनच, बायबल असा इशारा देते: “कुसंगतीने नीति बिघडते.” पण, ‘सुज्ञांची सोबत धरणारा सुज्ञ होतो.’—प्रेषितांची कृत्ये २०:३५; फिलिप्पैकर ४:५; रोमकर १२:१७, १८; उपदेशक ७:९; नीतिसूत्रे १३:२०; २७:६; १ करिंथकर १५:३३.

मार्को म्हणतो: “इतरांसोबत चांगले नातेसंबंध बाळगण्यासाठी बायबलची तत्त्वे खूप फायदेकारक आहेत. मला काही लोक ठाऊक आहेत जे केवळ स्वतःसाठी जगतात आणि प्रत्येक गोष्टीत फक्‍त स्वतःचा स्वार्थ पाहतात. पण बायबल आपल्याला स्वतःचा नव्हे तर इतरांचा विचार करायला शिकवते. माझ्या मते, चांगले नातेसंबंध टिकवण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे.” मार्कोप्रमाणेच इतरही पुष्कळ तरुण-तरुणींना असेच वाटते.

मार्कोसारखे तरुण बायबलमधून जे काही शिकतात त्याचा त्यांना केवळ तारुण्यातच नव्हे तर भविष्यातील वर्षांतही फायदा होतो. आणि भविष्याच्या संदर्भात तरुण पिढीला बायबलचा आणखी एका गोष्टीत खास फायदा होऊ शकतो.

भविष्याची चिंता

पुष्कळ तरुण लोकांची जिज्ञासू मनोवृत्ती असते. इतर कोणत्याही वयोगटातील लोकांपेक्षा, काय चालले आहे आणि का हे जाणण्याची उत्सुकता सर्वात जास्त त्यांनाच असते. बायबलशिवाय इतर कोणतेही पुस्तक, जगाची परिस्थिती अशी का आहे व भविष्यात काय घडणार आहे या संदर्भात स्पष्टीकरण देत नाही. आणि तरुण पिढीला याचेच उत्तर हवे आहे. असे आपण खात्रीने का म्हणू शकतो?

तरुण लोक उद्याची चिंता करत नाहीत अशी सर्वसामान्य समज असली तरीही काही सर्वेक्षणांतून वेगळे चित्र पाहायला मिळते. त्यातून असे दिसून येते की, तरुण लोक आपल्या भोवतालच्या परिस्थितीची दखल घेतात आणि मग भविष्यात कशी परिस्थिती असेल याबाबतीत स्वतःचेच निष्कर्ष काढतात. याचा पुरावा म्हणजे, ४ पैकी ३ तरुण पुरुष आणि स्त्रिया भविष्याविषयी “बऱ्‍याचदा” किंवा “बहुतेकदा” विचार करतात. आणि सहसा तरुण लोक आशावादी असले तरी बहुतेक तरुण भविष्याबद्दल थोड्याफार प्रमाणात चिंतीत आहेत.

कशाची चिंता? प्रौढांच्या भावी पिढीतील पुष्कळजण आताच गुन्हेगारी, हिंसा आणि अंमली पदार्थांच्या स्वाधीन झाले आहेत. एका अतिशय स्पर्धात्मक समाजात चांगली, पक्की नोकरी मिळण्याबाबत तरुणांना चिंता आहे. शाळेमध्ये चांगले मार्क मिळवण्याचा किंवा कामामध्ये अत्यंत यशस्वी असण्याचा दबाव आपल्यावर आणला जातो असे त्यांना वाटते. एका १७ वर्षांच्या तरुणीने खेदाने असे म्हटले: “आज आम्ही निर्दयी आणि स्वार्थी वृत्तीच्या समाजात राहत आहोत. प्रत्येक जण आपल्या मनाला वाटेल तसा वागतो. आपली क्षमता प्रत्येक वेळी सिद्ध करून दाखवावी लागते आणि यानेच मी विटून गेले आहे.” २२ वर्षांच्या आणखी एकाने म्हटले: “यशस्वी ठरणारे उत्तरोत्तर प्रगती करतात आणि आरामात जीवन जगू शकतात. पण, फुटक्या नशिबाचे लोक कोणत्या न कोणत्या कारणामुळे मागेच राहतात.” जीवनात इतकी स्पर्धा का आहे? जीवन असेच चालत राहील का?

वास्तविक स्पष्टीकरण

समाजाबद्दल तरुण लोकांना चिंता वाटते तेव्हा ते खरे तर—कळत नकळत—बायबलशी सहमत होत असतात. आजचा ‘निर्दयी आणि स्वार्थी वृत्तीचा समाज’ या काळाचे चिन्ह आहे असे बायबल दाखवते. प्रेषित पौलाने आपल्या दिवसाविषयी तीमथ्य नावाच्या एका तरुणाला पत्रात असे लिहिले: “कठीण दिवस येतील हे समजून घे.” कठीण दिवस येतील असे का म्हटले आहे? कारण पौलाने पुढे लिहिले, माणसे “स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, . . . उपकार न स्मरणारी, अपवित्र, . . . क्रूर” होतील. आजकाल बहुतेक लोक असेच वागत नाहीत का?—२ तीमथ्य ३:१-३.

बायबल सांगते की, हे कठीण दिवस “शेवटल्या काळी” म्हणजे सबंध मानवी समाजात लक्षणीय बदल घडण्याआधी येतील. या बदलांचा अबालवृद्ध अशा सर्वांवर परिणाम होईल. पण हे बदल म्हणजे नेमके काय? लवकरच, एक स्वर्गीय सरकार मानवी व्यवहारांचे शासन आपल्या हाती घेईल आणि मग त्याच्या प्रजेला “उदंड शांतिसुखाचा” आनंद घेता येईल. “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” तेव्हा चिंता आणि धोका राहणार नाही.—स्तोत्र ३७:११, २९.

केवळ बायबल आपल्या भविष्याविषयी विश्‍वसनीय माहिती देऊ शकते. पुढील काही वर्षांमध्ये काय घडेल हे एखाद्या तरुणाला ठाऊक असल्यास तो पुढची तयारी करू शकतो, त्याला अधिक सुरक्षित वाटेल आणि आपल्या जीवनावर त्याचे अधिक नियंत्रण असेल. त्यामुळे, तणाव आणि चिंता कमी होईल. या अर्थाने, तरुण पिढीची खास गरज, अर्थात समाजाला समजून घेणे आणि भविष्यात काय घडेल ते जाणून घेणे, याविषयी बायबलमध्ये सांगितले आहे.

तारुण्यातले यश

तारुण्यातले यश कशाच्या आधारे ठरवले जाते? उच्च शिक्षणाच्या, मालमत्तेच्या की पुष्कळ मित्र-मैत्रिणी असण्याच्या? अनेकांना असेच वाटत असावे. किशोरवयाच्या आणि विशीच्या सुरवातीच्या वर्षांमध्ये तरुणांच्या पुढच्या जीवनाला चांगली सुरवात मिळाली पाहिजे. दुसऱ्‍या शब्दांत, तारुण्यातले यश हे पुढे काय घडेल याचे सूचक असू शकते.

आपण पाहिल्याप्रमाणे, बायबल एका तरुण व्यक्‍तीला आपले तारुण्य यशस्वी बनवण्यात मदत करू शकते. अनेक युवकांना आपल्या जीवनात याचा प्रत्ययही आला आहे. ते दररोज देवाचे वचन वाचतात आणि शिकलेल्या गोष्टींचे पालन करतात. (“यहोवाच्या तरुण सेवकाकडून सल्ला,” पृष्ठ ६ पाहा.) होय, बायबल हे आजच्या तरुण लोकांकरता उत्तम मार्गदर्शक आहे कारण ते त्यांना ‘पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होण्यासाठी’ मदत करू शकते.—२ तीमथ्य ३:१६, १७.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

तारुण्य यशस्वी बनवण्यामागील एक रहस्य म्हणजे सर्वांबरोबर मिळून मिसळून राहणे

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

इतर कोणत्याही वयोगटातील लोकांपेक्षा युवकांनाच, काय घडत आहे आणि का घडत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते

[६, ७ पानांवरील चौकट]

यहोवाच्या तरुण सेवकाकडून सल्ला

ॲलेक्झांडर १९ वर्षांचा आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या कुटुंबात त्याची वाढ झाली. पूर्ण मनाने आपल्या विश्‍वासाचे पालन करण्यात त्याला खूप आनंद मिळतो. पण आधी असे नव्हते. ॲलेक्झांडर म्हणतो:

“मी यहोवाच्या साक्षीदारांशी सहवास राखत होतो पण चक्क सात वर्षांपर्यंत मी बाप्तिस्मा घेतला नव्हता. त्या वेळी, मी पूर्ण मनाने सेवा करत नव्हतो; फक्‍त करायची म्हणून करत होतो. मला वाटतं, स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याचं मला कधी धैर्यच झालं नाही.”

मग ॲलेक्झांडरचा दृष्टिकोन बदलला. तो पुढे म्हणतो:

“माझे आईवडील आणि मंडळीतले मित्र-मैत्रिणी मला दररोज बायबल वाचायला आणि यहोवासोबत वैयक्‍तिक संबंध जोडण्याचे उत्तेजन देऊ लागले. शेवटी, मी प्रयत्न करायचं ठरवलं. मी टीव्ही पाहणं कमी केलं आणि पहाटे बायबल वाचनाचा नित्यक्रम सुरू केला. आणि नंतर, बायबल नेमकं काय पुस्तक आहे हे मला कळू लागलं. माझ्या व्यक्‍तिगत जीवनात त्याचा फायदा कसा होऊ शकतो ते मला पाहायला मिळालं. आणि—सर्वात महत्त्वाचं म्हणजे—मी यहोवाला जाणून घ्यावं ही त्याची इच्छा आहे हे मला कळालं. हे मी गांभिर्यानं घेतलं तेव्हा त्याच्यासोबतचा माझा नातेसंबंध वाढू लागला आणि मंडळीतल्या लोकांसोबतही माझी मैत्री वाढू लागली. बायबलमुळे माझं जीवन पार बदलून गेलं! मला वाटतं, यहोवाच्या प्रत्येक तरुण सेवकानं दररोज बायबलचं वाचन करावं.”

लाखो तरुण लोक यहोवाच्या साक्षीदारांसोबत सहवास राखतात. तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात का? नियमाने बायबलचे वाचन करून तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे का? ॲलेक्झांडरचे किती उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. ज्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नाहीत त्या कमी करून बायबल वाचनाचा नित्यक्रम बनवा. याचा तुम्हाला निश्‍चित फायदा होईल.