व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रकाशाच्या शहरात ज्योतीसारखे दिसा

प्रकाशाच्या शहरात ज्योतीसारखे दिसा

प्रकाशाच्या शहरात ज्योतीसारखे दिसा

फ्लूकट्यूआट नेक मरगीतूर, किंवा “तिच्यावर लाटा आदळतात तरीही ती बुडत नाही,” असे पॅरिस नगरीबद्दल म्हटले जाते.

एखाद्या जहाजाप्रमाणे, गेल्या २,००० हून अधिक वर्षांपासून पॅरिस हे शहर असंख्य परदेशी वादळे आणि आंतरिक विद्रोह झेलून शाबूत राहिले आहे. आज जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी असलेले पॅरिस उत्कृष्ट वास्तुकला, दुतर्फी झाडांच्या रांगांनी नटलेले रुंद रस्ते आणि जग-प्रसिद्ध संग्रहालयांकरता नावाजले जाते. काहींना ते कवी, चित्रकार आणि तत्त्वज्ञांचे माहेरघर वाटते. तर इतरजण तेथील रुचकर पदार्थ आणि ओट कुटुअरचे अर्थात फॅशनचे भोक्‍ते आहेत.

इतिहास पाहिल्यास, पॅरिस शहर कॅथलिक धर्माचा बालेकिल्ला आहे. दोनशे वर्षांआधी, प्रबोधनाच्या बौद्धिक युरोपियन चळवळीत पॅरिसची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याकारणाने त्याला प्रकाशाचे शहर हे नाव पडले. आज, बहुतेक पॅरिसवासियांवर कळत नकळत धर्मापेक्षा त्या काळातील तत्त्वज्ञानाचा जास्त प्रभाव पडलेला दिसतो.

परंतु, मानवी बुद्धीमुळे लोकांचे जीवन अपेक्षिल्याप्रमाणे प्रज्वलित झालेले नाही. अनेकजण आज वेगळ्या मार्गाने प्रबोधन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज जवळजवळ ९० वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार पॅरिसमध्ये ‘ज्योतीसारखे दिसत’ आहेत. (फिलिप्पैकर २:१५) आपल्या जहाजांमध्ये “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु” नेण्यासाठी त्यांना अनुभवी खलाशांप्रमाणे सतत बदलत्या प्रवाहांशी किंवा घटनांशी जुळवून घ्यावे लागत आहे.—हाग्गय २:७.

आव्हानात्मक शहर

१८५० मध्ये, पॅरिस शहरात ६,००,००० रहिवासी होते. परंतु आज पॅरिसच्या उपनगरांसहित त्याची लोकसंख्या ९० लाखांहून अधिक आहे. या वाढीमुळे पॅरिस शहर फ्रान्सचे सर्वात वैविध्यपूर्ण शहर बनले आहे. उच्च शिक्षणासाठी ते जगातले केंद्रस्थान आहे, जगातील सर्वात जुने विद्यापीठ तेथेच आहे आणि जवळजवळ २,५०,००० विद्यार्थ्यांचे ते आश्रयस्थान आहे. परंतु, पॅरिसच्या गगनचुंबी इमारती असलेल्या काही उपनगरांतील गुन्हेगारी आणि बेकारी ही पॅरिस शहराची वाईट बाजू आहे. त्यामुळेच, वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या लोकांना आवडेल अशा पद्धतीने सुवार्ता सादर करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना वाकबगार असावे लागते आणि परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते.—१ तीमथ्य ४:१०.

दरवर्षी दोन कोटींहून अधिक पर्यटक पॅरिसला भेट देतात. ते उत्साहाने आयफल टॉवर चढतात, सेन नदीच्या काठावर फेरफटका मारतात किंवा रस्त्याकडेच्या कॅफे आणि बिस्ट्रोंमध्ये बसून वातावरणाचा आनंद लुटतात. पण, पॅरिसच्या रहिवाशांचे दररोजचे जीवन धकाधकीचे असते. एक पूर्ण-वेळेचे सेवक, क्रिस्टान

म्हणतात, “लोक सतत घाईत असतात. कामाहून घरी परतल्यावर ते थकलेले असतात.” अशा व्यस्त लोकांशी बोलणे काही सोपे काम नाही.

परंतु, पॅरिसमध्ये यहोवाच्या साक्षीदारांसमोर सर्वात मोठी समस्या म्हणजे लोक घरी भेटत नाहीत. काही इमारतींमध्ये इंटरकॉमची व्यवस्था असते. परंतु, गुन्हेगारीचे वातावरण वाढू लागल्यामुळे तेथील इमारतींच्या प्रवेशद्वारात सहसा इलेक्ट्रॉनिक सुरक्षा व्यवस्था असते आणि म्हणून इमारतीत जाता येत नाही. यामुळेच तर काही भागांमध्ये प्रत्येक १,४०० लोकांमध्ये फक्‍त १ व्यक्‍ती साक्षीदार आहे. त्याकरता, टेलिफोनवरून किंवा अनौपचारिक पद्धतीने साक्ष देण्याची पद्धत अधिकाधिक उपयोगात आणली जाऊ लागली आहे. यहोवाचे साक्षीदार इतर मार्गांनी आपला ‘प्रकाश पाडू’ शकले आहेत का?—मत्तय ५:१६.

अनौपचारिक साक्षकार्यासाठी भरपूर संधी आणि ठिकाणेही उपलब्ध आहेत. एकदा मार्टीनला बसस्टॉपवर एक बाई दिसली जी खूप दुःखी वाटत होती. त्या बाईची एकुलती एक मुलगी नुकतीच वारली होती. मार्टीनने त्या स्त्रीला बायबलमधील पुनरुत्थानाच्या आशेचा सांत्वनदायक संदेश असलेले माहितीपत्रक दिले. त्यानंतर, त्या स्त्रीबरोबर काही महिने तिचा काहीच संपर्क नव्हता. मार्टीनला ती स्त्री दुसऱ्‍यांदा भेटली तेव्हा तिच्याबरोबर ती बायबल अभ्यास सुरू करू शकली. त्या स्त्रीच्या पतीकडून विरोध असतानाही ती शेवटी साक्षीदार बनली.

फलदायी अनौपचारिक साक्षकार्य

पॅरिस येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जगातील सर्वात उत्तम सेवांपैकी एक आहे. तेथील सुप्रसिद्ध मेट्रोत दररोज ५०,००,००० यात्रेकरू प्रवास करतात. पॅरिसचे भुयारी केंद्र स्टेशन, शाटले-ले-आल हे जगातले सर्वात मोठे आणि गर्दीचे स्टेशन आहे असे म्हटले जाते. तेथे लोकांना भेटायला पुष्कळ वाव आहे. ॲलेक्झांड्रा दररोज मेट्रोने प्रवास करून कामाला जाते. एकदा ती एका तरुणाशी बोलत होती ज्याला ल्यूकेमिया हा प्राणघातक रोग झाला होता. ॲलेक्झांड्राने त्याला परादीसची आशा असलेली हस्तपत्रिका दिली. त्यानंतर सहा आठवड्यांपर्यंत त्याच वेळी आणि ठिकाणी त्यांच्यात बायबलवर चर्चा झाली. मग, अचानक एक दिवशी तो तरुण आला नाही. त्यानंतर लगेचच ॲलेक्झांड्राला त्या तरुणाच्या पत्नीचा फोन आला आणि तिने तिला हॉस्पिटलमध्ये बोलावले कारण तिचा पती गंभीर स्थितीत होता. परंतु, ॲलेक्झांड्रा तेथे पोचली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर ती स्त्री नैर्‌ऋत्य फ्रान्समध्ये बॉर्दो येथे राहायला गेली आणि तेथील साक्षीदारांनी तिला तेथे भेट दिली. एका वर्षानंतर ॲलेक्झांड्राला अशी आनंदाची बातमी ऐकायला मिळाली की, ती विधवा स्त्री बाप्तिस्मा घेऊन यहोवाची ख्रिस्ती सेवक बनली होती; आणि आता तिला आपल्या पतीचे पुनरुत्थान पाहायची आशा मिळाली होती!—योहान ५:२८, २९.

एका वृद्ध ख्रिस्ती स्त्रीला, पॅरिसहून मध्य फ्रान्स येथील लीमोझला जाणाऱ्‍या ट्रेनमध्ये रेनाटा हिच्याशी बोलायला संधी मिळाली. रेनाटा मूळची पोलंड येथील होती; तेथे तिने वेदान्त, इब्री आणि ग्रीक या विषयांचा पाच वर्षे अभ्यास केला होता मात्र देवावरून तिचा विश्‍वास उडाला होता. पण तीन महिन्यांआधी तिने देवाला प्रार्थना केली होती. त्या वृद्ध स्त्रीच्या बोलण्यात रेनाटाला मुळीच रस नव्हता आणि ती आपल्याला काही फोन करणार नाही असे समजून तिने तिला स्वतःचा टेलिफोन नंबर दिला. पण त्या बहिणीने प्रयत्न सोडले नाहीत; लवकरात लवकर रेनाटाला भेट दिली जाईल याची तिने खात्री केली. एक साक्षीदार दांपत्य रेनाटाला भेटायला आले तेव्हा तिला वाटले, ‘हे काय मला शिकवणार?’ रेनाटाचे सेमिनरीत शिक्षण झाले होते तरीही बायबलमधील सत्य तिने लीनतेने स्वीकारले. ती म्हणते, “मला लगेच कळालं की हेच सत्य आहे.” आज, बायबलमधील संदेश इतरांना सांगायला तिला आनंद होतो.

मिशेल ड्रायव्हिंग शिकत होती. तिच्या ड्रायव्हिंग वर्गातले इतर विद्यार्थी विवाहाआधी लैंगिक संबंध ठेवण्याविषयी बोलत होते. मिशेलने आपली नापंसती व्यक्‍त केली. एक आठवड्यानंतर, ड्रायव्हिंगचे शिक्षण देणारी सिल्व्ही हिने तिला विचारले: “तू यहोवाची साक्षीदार आहेस का?” मिशेलचा बायबल आधारित दृष्टिकोन ऐकून सिल्व्ही प्रभावित झाली होती. तेव्हाच बायबल अभ्यास सुरू करण्यात आला आणि एक वर्षाने सिल्व्हीचा बाप्तिस्मा झाला.

पॅरिसमधील असंख्य बागा आणि उद्याने लोकांशी बोलायला आल्हाददायक स्थळे आहेत. झोझेट एकदा सुटीच्या वेळेत एका बागेत गेली आणि तेथे ॲलीन नावाची एक वृद्ध स्त्री फेरफटका मारायला आली होती. झोझेटने तिला बायबलमधील अद्‌भुत अभिवचनांविषयी सांगितले. त्यानंतर बायबल अभ्यासाची व्यवस्था करण्यात आली आणि पाहता पाहता ॲलीनने बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती केली. आता ७४ वर्षांच्या वयातही ॲलीन एक फलदायी सामान्य पायनियर सेवक आहे आणि इतरांना ख्रिस्ती सत्याविषयी सांगायला तिला फार आनंद होतो.

सर्व राष्ट्रांकरता प्रकाश

पॅरिसमधील साक्षीदारांना समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा आनंद लुटण्यासाठी दूरदेशी प्रवास करून जावे लागत नाही. येथील जवळजवळ २० टक्के लोकसंख्या परदेशांतील आहे. येथे सुमारे २५ वेगवेगळ्या भाषांच्या ख्रिस्ती मंडळ्या आणि गट आहेत.

या खास सुवार्तेच्या नेमणुकीत कुशलता आणि कल्पकता यांमुळे चांगले परिणाम मिळतात. एका फिलिपिनो साक्षीदार बहिणीने आपले स्वतःचे एक क्षेत्र बनवले. बाजारहाट करताना दुकानामध्ये आलेल्या इतर फिलिपिनो लोकांशी बोलून तिने अनेक बायबल अभ्यास सुरू केले आहेत.

प्रचारकामात पुढाकार घेतल्याचे प्रयत्न सार्थ ठरतात. डिसेंबर १९९६ मध्ये, एक जगप्रसिद्ध सर्कस आपल्या शहरात येत आहे असे कळताच एका परदेशी भाषेतील मंडळीच्या साक्षीदारांनी सर्कसमध्ये काम करणाऱ्‍या लोकांना भेटायचे ठरवले. एकदा संध्याकाळी खेळ संपल्यावर हे साक्षीदार हॉटेलवर परतणाऱ्‍या कलाकारांशी बोलू शकले. अशा तऱ्‍हेने पुढाकार घेतल्यामुळे ते २८ बायबल, ५९ ख्रिस्ती पुस्तके, १३१ माहितीपत्रके आणि २९० मासिके देऊ शकले. तीन आठवड्यांच्या शेवटी, एका कलाकाराने विचारले: “मला यहोवाचा साक्षीदार बनण्यासाठी काय करावं लागेल?” दुसऱ्‍या एका गृहस्थाने म्हटले: “मी माझ्या देशात जाऊन प्रचार करीन!”

गुप्त धन अजून हाती लागायचे आहे

पॅरिसमध्ये जाणाऱ्‍या पर्यटकांना नजर फिरेल तेथे एकापेक्षा एक सुंदर वास्तुकला असलेल्या प्राचीन इमारती दिसतील. परंतु, याहून मौल्यवान वस्तू अजून मिळायच्या बाकी आहेत. अनीझा आपल्या मामाबरोबर (जे राजदूत आहेत) फ्रान्सला आली होती. आपल्या घरी ती नियमाने बायबलचे वाचन करायची. एकदा ती घरातून लगबगीने कुठेतरी जायला निघाली तेव्हा एका पायनियरने तिला बायबलवर भरवसा का ठेवावा? ही हस्तपत्रिका दिली. पुढच्या आठवडी तिने भेटण्याची व्यवस्था केली आणि त्यावरून बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. अनीझाच्या कुटुंबाने तिचा खूप विरोध केला. तिने बाप्तिस्मा घेण्यापर्यंत प्रगती केली. इतरांना सत्याविषयी सांगण्याच्या सुसंधीबद्दल तिचे काय मत असावे? “सुरवातीला मला प्रचारकाम जड वाटायचं कारण मी बुजऱ्‍या स्वभावाची आहे. तरीपण, मी बायबल वाचते तेव्हा मला खूप प्रेरणा मिळते. शांत राहणं मला शक्य होत नाही.” पॅरिसमधील अनेक साक्षीदारांचा हाच दृष्टिकोन आहे; ‘प्रभूच्या कामात अधिकाधिक करण्याजोगे’ त्यांच्याजवळ पुष्कळ आहे.—१ करिंथकर १५:५८.

बायबलचे सत्य पॅरिसच्या सीमेवरील परिसरातही चमकते आणि तेथेही अनेक “रत्न” दिसून येतात. काही रेकॉर्डिंग उसने घेण्यासाठी ब्रुस आपल्या एका मित्राकडे गेला जो नुकताच यहोवाचा साक्षीदार बनला होता. तेथे ब्रुसचा मित्र त्याच्या काही ओळखीच्या लोकांबरोबर बायबलविषयी चर्चा करत होता; ब्रुसने त्यांचे संभाषण ऐकले. मग तो बायबल अभ्यास करायला तयार झाला पण त्याच्या काही समस्या होत्या. “माझ्या परिसरात मला सगळे लोक चांगले ओळखत होते. माझा थोरला भाऊ नेहमी मारामाऱ्‍या करायचा आणि मी डान्स पार्ट्या ठेवायचो जिथं खूप धांगडधिंगा चालायचा. मी अचानक साक्षीदार बनल्याचे ऐकून इतरांना काय वाटेल?” ब्रुसला पार्ट्या ठेवायला पुष्कळ लोक येऊन वारंवार सांगायचे पण त्याने ते सगळे बंद केले. एका महिन्यानंतर तो प्रचाराला जाऊ लागला: “त्या परिसरातल्या सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं की मी साक्षीदार का बनलो?” त्यानंतर काही काळातच त्याचा बाप्तिस्मा झाला. कालांतराने, तो सेवा प्रशिक्षण प्रशालेत उपस्थित राहू शकला.

धनाचा शोध लावण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. पण या कार्यात यश मिळते तेव्हा किती आनंद मिळतो! झाकी, ब्रुनो आणि दाम्येन पॅरिसमध्ये एका बेकरीत कामाला होते. “आम्हाला भेटणं शक्यच नव्हतं कारण आम्ही नेहमी कामावर असल्यामुळे घरी कधीच नसायचो,” असे झाकी म्हणतो. पॅट्रिक नावाच्या एका पायनियरला एकदा एका इमारतीवर काही लहान खोल्या दिसल्या आणि त्यांपैकी निदान एका खोलीत कोणी राहत असावे असे त्याला वाटले. त्याने वारंवार केलेल्या प्रयत्नाचे त्याला फळ मिळाले; एकदा दुपारी, त्याला झाकी भेटला, जो तेथे तात्पुरता राहत होता. याचा परिणाम? हे तिन्ही मित्र साक्षीदार बनले आणि मग त्यांनी, ईश्‍वरशासित कार्यात पूर्ण भाग घेता यावा म्हणून दुसरे काम पाहिले.

वादळ शांत करणे

अलीकडे, फ्रान्समधील काही प्रसारमाध्यमांनी यहोवाचे साक्षीदार एक धोकेदायक पंथ आहेत अशाप्रकारची टीका केली. १९९६ साली, साक्षीदारांनी यहोवाचे साक्षीदार—तुम्हाला काय जाणून घेतले पाहिजे (इंग्रजी) या खास माहितीपत्रकाच्या ९० लाखाहून अधिक प्रती वितरीत केल्या. त्याचे सकारात्मक परिणाम घडले.

प्रत्येकाला भेटण्याचा खास प्रयत्न करण्यात आला. अनेक अधिकाऱ्‍यांनी साक्षीदारांबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली. एका नगरपालिका सल्लागाराने लिहिले: “यहोवाच्या साक्षीदारांनी या पत्रिकेचे वितरण केले ते योग्यच आहे. त्यामुळे गैरसमज दूर झाला आहे.” एका डॉक्टरने म्हटले: “यासाठीच मी थांबून होतो!” पॅरिसच्या परिसरातील एका गृहस्थाने लिहिले: “मी खरं तर, योगायोगाने यहोवाचे साक्षीदार—तुम्हाला काय जाणून घेतले पाहिजे ही पत्रिका वाचली. मला आणखी जाणून घ्यायचे आहे आणि मोफत गृह बायबल अभ्यासही घ्यायला मला आवडेल.” आणखी दुसऱ्‍याने लिहिले: “तुमच्या इमानदारपणाबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो.” एका कॅथलिक स्त्रीने साक्षीदारांना सांगितले: “वा! शेवटी, तुम्ही ही लबाडी उघड केलीच!”

१९९७ मध्ये, कॅथलिक वर्ल्ड युथ डेजसाठी पॅरिसच्या परिसरात प्रचार मोहीम आयोजित केल्याचा आनंद अनेक तरुण साक्षीदारांना झाला होता. त्या वेळी तापमान ३५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त होते तरीही २,५०० साक्षीदारांनी यात भाग घेतला. दोन-चार दिवसांमध्ये त्यांनी विविध देशांतील तरुणांना सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक या माहितीपत्रकाच्या १८,००० प्रती वाटल्या. यहोवाच्या नावाची उत्तम साक्ष देण्याव्यतिरिक्‍त आणि सत्याचे बीज पेरण्याव्यतिरिक्‍त या मोहिमेमुळे तरुण साक्षीदारांना अतिशय प्रोत्साहन मिळाले. या खास प्रयत्नात पूर्ण सहभाग घेण्यासाठी आपली सुटी अर्ध्यातच संपवून आलेल्या एका तरुणीने म्हटले: “या पृथ्वीवर यहोवाचे लोक आनंदी लोक आहेत; ते आपल्या सर्व शक्‍तीचा उपयोग त्याच्या नावाच्या गौरवासाठी करतात. हे दोन दिवस इतके फलदायी होते की माझ्या संपूर्ण आयुष्यातील सुट्ट्यांनीही मला इतका आनंद मिळाला नसता! (स्तोत्र ८४:१०)”

फेब्रुवारी २८, १९९८ रोजी, जर्मनीतील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर हिटलरने बंदी आणून ६५ वर्षे पूर्ण झाली होती. त्या तारखेला फ्रान्समधील साक्षीदारांनी जेहोवाज विटनेसेस स्टॅण्ड फर्म अगेन्स्ट नात्झी असॉल्ट हा व्हिडिओ भाड्याने घेतलेल्या सभागृहांमध्ये सादर केला; त्यात यहोवाच्या लोकांना किती छळ सोसावा लागला याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. सुमारे ७० लाख निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या. इतिहासकार आणि बंधनागारांतील सहवासियांनी हृदयस्पर्शी ग्वाही दिली. पॅरिस परिसरात जवळजवळ ५,००० लोक उपस्थित राहिले; यामध्ये पुष्कळ लोक गैर-साक्षीदार होते.

पॅरिसमधील अनेकजण आध्यात्मिक प्रकाशाबद्दल कदर बाळगतात आणि ज्योतीवाहक या नात्याने राज्य प्रचारक आपला प्रकाश चमकवत आहेत याचा त्यांना आनंद होतो. हे येशूने सांगितल्याप्रमाणे आहे: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत.” (मत्तय ९:३७) शहरात प्रचारकार्य करण्याच्या आव्हानांवर मात करून यहोवाच्या साक्षीदारांनी दाखवलेल्या दृढ निश्‍चयामुळे पॅरिस शहर यहोवाला गौरव आणून एका खास अर्थाने प्रकाशाचे शहर बनले आहे.

[९ पानांवरील चित्र]

सिटी हॉल

[९ पानांवरील चित्र]

लुवरे संग्रहालय

[९ पानांवरील चित्र]

ऑपरा गार्नियर

[१० पानांवरील चित्रे]

कोठेही भेटणाऱ्‍या व्यस्त लोकांना बायबलचा संदेश सांगणे