आध्यात्मिक प्रकाश मध्य पूर्वेत चमकतो
जीवन कथा
आध्यात्मिक प्रकाश मध्य पूर्वेत चमकतो
नेगीब सालम यांच्याद्वारे कथित
सा.यु. पहिल्या शतकात, देवाच्या वचनाचा प्रकाश मध्य पूर्वेतून चमकला आणि पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पसरला. २० व्या शतकादरम्यान, तो प्रकाश जगाच्या त्या भागामध्ये पुन्हा एकदा चमकला. हे कसे घडले ते मी तुम्हाला सांगतो.
माझा जन्म १९१३ साली, उत्तर लेबनन येथील अम्यून नगरात झाला. जागतिक स्थिरता आणि शांतीचे ते शेवटचेच वर्ष म्हणावे लागेल कारण पुढच्याच वर्षी पहिले महायुद्ध सुरू झाले. १९१८ साली, युद्ध संपले तेव्हा मध्य पूर्वेचा रत्न म्हणून ओळखला जाणारा लेबनन आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या एकदम रसातळाला गेला होता.
१९२० मध्ये, लेबननमध्ये पोस्टाचे कार्य पुन्हा एकदा सुरू झाल्यावर बाहेरगावी राहणाऱ्या लेबनीझ लोकांकडून पत्रे मिळू लागली. माझे दोन मामा, अब्दुल्ला आणि जॉर्ज घान्तूस यांनी देखील पत्रे पाठवली. त्यांचे वडील (म्हणजे माझे आजोबा), हबीब घान्तूस यांना त्यांनी पत्र लिहून देवाच्या राज्याविषयी सांगितले. (मत्तय २४:१४) माझ्या आजोबांनी गावकऱ्यांना पत्रातला मजकूर सांगताच लोक त्यांची थट्टामस्करी करू लागले. गावकरी अशी अफवा पसरू लागले की, हबीबच्या पोरांनी आपल्या बापाला जमीनजुमला विकून, एक गाढव खरेदी करून प्रचाराला जायला सांगितले.
सुरवातीच्या काळात प्रकाशाची चमक
पुढच्या वर्षी, म्हणजे १९२१ मध्ये मिशेल आबुद जे अमेरिकेत न्यूयॉर्क, ब्रुकलिन येथे राहत होते ते लेबनन येथील ट्रायपॉलीला परतले. ते बायबल विद्यार्थी (यहोवाच्या साक्षीदारांचे तेव्हाचे नाव) बनले होते. बंधू आबुद यांच्या मित्रमंडळीतील आणि नातेवाईकांमधील बहुतेकांनी बायबलमधील संदेशाला प्रतिसाद दिला नाही; परंतु, दोन प्रसिद्ध
लोकांनी मात्र प्रतिसाद दिला. एक होते प्राध्यापक इब्राहीम आतेया आणि दुसरे होते दंतवैज्ञ, हाना शामास. डॉ. शामास यांनी तर आपल्या घरात आणि दवाखान्यात ख्रिस्ती सभा चालवायला परवानगी दिली.आमच्या अम्यून नगरात बंधू आबुद आणि बंधू शामास यांनी भेट दिली तेव्हा मी लहानच होतो. परंतु, त्यांच्या भेटीचा माझ्यावर गहिरा प्रभाव पडला आणि मी बंधू आबुदबरोबर प्रचार कार्याला जाऊ लागलो. १९६३ साली बंधू आबुदचा मृत्यू झाला तोपर्यंत म्हणजे ४० वर्षे आम्ही दोघांनी एकत्र प्रचार कार्य केले.
१९२२ आणि १९२५ दरम्यान, बायबल सत्याचा प्रकाश उत्तर लेबननमधील अनेक गावांमध्ये पसरला होता. जवळजवळ २० ते ३० लोक खासगी घरांमध्ये (जसे की, अम्यूनमध्ये आमच्या घरात) एकत्र येऊन बायबलवर चर्चा करायचे. आमच्या सभांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी तिथले पाळक लहान मुलांना आमच्या घराबाहेर पत्र्याचे डबे वाजवून आरडाओरडा करायला पाठवून द्यायचे. म्हणून काही वेळा आम्ही पाईन वृक्षांच्या जंगलात एकत्र जमायचो.
मी लहान होतो तेव्हा प्रचारकार्याबद्दल आणि प्रत्येक ख्रिस्ती सभेला उपस्थित राहण्याबद्दल माझा आवेश पाहून मला तीमथ्य हे नाव पडले होते. माझ्या शाळा संचालकांनी “त्या सभांना” तू जायचे बंद कर असे मला बजावून सांगितले. मी नकार दिल्यावर माझी शाळेतून हकालपट्टी झाली.
बायबल देशांमध्ये साक्ष देणे
१९३३ साली माझ्या बाप्तिस्म्यानंतर लगेचच, मी पायनियरींग अर्थात यहोवाच्या साक्षीदारांमधील पूर्ण-वेळेची सेवा सुरू केली. त्या वेळी आम्ही खूप कमी लोक होतो तरीपण उत्तर लेबननमधील गावांमध्ये प्रचार करण्याखेरीज आम्ही बैरूट आणि आसपासच्या उपनगरांपासून दक्षिण लेबननपर्यंत प्रचार केला. त्या काळी, आम्ही सहसा पायी किंवा गाढवावर बसून (येशू ख्रिस्ताने आणि त्याच्या पहिल्या शतकातल्या अनुयायांप्रमाणे) प्रवास करायचो.
१९३६ साली, अमेरिकेत अनेक वर्षांपासून स्थाईक असलेले युसुफ राखाल लेबननला भेट द्यायला आले. त्यांनी आपल्यासोबत ध्वनी साधन आणि दोन फोनोग्राफ आणले. आम्ही हे साधन फोर्ड मोटारीवर (१९३१ चे मॉडेल) बसवले आणि लेबनन व सिरियातून फेऱ्या मारून अगदी दूरच्या परिसरातही राज्याचा संदेश नेला. त्याचा आवाज १० किलोमीटरपर्यंत ऐकू जात होता. हा आवाज कोठून येत आहे हे पाहायला लोक आपल्या घरांच्या छतांवर चढायचे; काही लोक म्हणायचे की, स्वर्गातून वाणी होत आहे. शेतात काम करणारे हातातले काम सोडून संदेश ऐकायला जवळ यायचे.
युसफ राखाल यांच्यासोबत मी सिरियाच्या आलेप्पो येथे १९३७ सालाच्या हिवाळ्यात शेवटल्या दौऱ्यावर गेलो. अमेरिकेला पुन्हा जाण्याआधी आम्ही दोघे पॅलेस्टाईनलाही गेलो. आम्ही हायफा आणि जेरूसलेम येथील शहरांमध्ये आणि काही गावांमध्येही गेलो. तेथे आम्ही इब्राहीम शिहादी यांना भेट दिली; त्यांच्याबरोबर पत्रव्यवहाराने माझी आधी ओळख झाली होती. इब्राहीम यांनी बायबलच्या ज्ञानात इतपत प्रगती केली की, आमच्या भेटीदरम्यान त्यांनी घरोघरच्या प्रचारातही सहभाग घेतला.—प्रेषितांची कृत्ये २०:२०.
मला प्राध्यापक खलील क्रोब्रोसी यांना भेटण्याची फार उत्कंठा होती; ते कट्टर कॅथलिक होते आणि यहोवाच्या साक्षीदारांसोबत पत्रव्यवहाराने बायबलचा अभ्यास करत होते. लेबननमधील साक्षीदारांचा पत्ता त्यांना कसा मिळाला? हायफामध्ये एका दुकानात, दुकानदाराने खलील यांच्या वस्तू यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनाच्या कागदात गुंडाळून दिले होते. त्या कागदावर आमचा पत्ता होता. त्यांना भेटून आम्हाला आनंद झाला आणि नंतर १९३९ मध्ये, त्यांनी ट्रायपॉलीत येऊन बाप्तिस्मा घेतला.
१९३७ मध्ये, पत्रोस लागाकोस आणि त्यांची पत्नी ट्रायपॉलीला आले. त्यानंतरच्या दोन-तीन वर्षांमध्ये आम्ही लेबनन आणि सिरियातील बहुतेक ठिकाणी लोकांच्या घरी
जाऊन राज्याचा संदेश सांगितला. १९४३ साली, बंधू लागाकोस यांचा मृत्यू झाला तेव्हा लेबनन, सिरिया आणि पॅलेस्टाईनमधील बहुतेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये आध्यात्मिक प्रकाश पोहंचला होता. काही वेळा, आम्ही जवळजवळ ३० जण कारने किंवा बसने दूरदूरच्या भागांमध्ये जायचो; त्यासाठी कधीकधी आम्ही पहाटे ३ वाजता प्रवास सुरू करायचो.१९४० च्या दशकात, इब्राहीम आतेया अरेबिकमध्ये टेहळणी बुरूज मासिकाचे भाषांतर करायचे. त्यानंतर, मी त्या मासिकाच्या चार हस्तलिखित प्रती तयार करून पॅलेस्टाईन, सिरिया आणि ईजिप्त येथील साक्षीदारांना त्या पाठवायचो. त्या काळी, दुसऱ्या महायुद्धादरम्यान, आमच्या प्रचारकार्याला बराच विरोध होता पण आम्ही मध्य पूर्वेतील बायबल सत्याच्या चाहत्यांच्या संपर्कात मात्र राहत होतो. मी स्वतः शहरांचे आणि आसपासच्या गावांचे नकाशे तयार केले आणि तेथे जाऊन आम्ही सुवार्ता सांगितली.
१९४४ साली, दुसरे महायुद्ध अद्याप चालले असताना, मी माझ्या पायनियर साथीदाराच्या अर्थात मिशेल आबुद यांच्या मुलीशी, इव्हलिनशी विवाह केला. कालांतराने आम्हाला एक मुलगी आणि दोन मुलगे अशी एकंदर तीन मुले झाली.
मिशनऱ्यांसोबत कार्य
युद्ध संपल्यानंतर लगेचच, मिशनऱ्यांच्या गिलियड प्रशालेतील पहिले पदवीधर लेबननमध्ये आले. त्यामुळे, लेबनन येथे पहिली मंडळी स्थापन करण्यात आली आणि मला कंपनी सर्व्हंट म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर, १९४७ साली, नेथन एच. नॉर आणि त्यांचे सचिव, मिल्टन जी. हेन्शल यांनी लेबननला भेट दिली आणि तेथील बांधवांना बरेच प्रोत्साहन दिले. त्यानंतर, पुष्कळ मिशनरी आले आणि त्यांच्यामुळे पद्धतशीररित्या सेवाकार्य संघटित करण्यामध्ये व मंडळीच्या सभा चालवण्यामध्ये आम्हाला मोठी मदत झाली.
सिरियातील एका दूरच्या भागाच्या दौऱ्यात, आम्हाला तेथील बिशपकडून विरोध झाला. आम्ही “यहूदी प्रकाशने” वितरित करत आहोत असा त्यांनी आमच्यावर आरोप लावला. उपरोधिक गोष्ट म्हणजे, १९४८ च्या आधी, पाळक सहसा आम्हाला “कम्युनिस्टवादी” म्हणायचे. या प्रसंगी आम्हाला अटक करून दोन तास आमची चौकशी करण्यात आली; या वेळी एक उत्तम साक्ष देण्यात आली.
आमचा खटला ऐकून शेवटी न्यायाधीशांनी म्हटले: “तुमच्यावर असे आरोप लावल्याबद्दल त्या दाढीवाल्याचा
[बिशपला उद्देशून] धिक्कार असो; पण मी त्याचे आभारही मानतो कारण या निमित्तानं मला तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्या शिकवणींबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली.” त्यानंतर, त्यांनी आम्हाला गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.दहा वर्षांनंतर, मी बैरूटला बसने प्रवास करत असताना, माझ्या शेजारी बसलेल्या माणसाशी बोलू लागलो; तो अग्रिकल्चरल इंजिनियर होता. आमच्या विश्वासांविषयी ऐकल्यावर काही मिनिटांनी तो म्हणाला की सिरियातील त्याचा एक मित्रसुद्धा असेच काहीतरी सांगत होता. तो मित्र कोण असावा? दहा वर्षांआधी आमची केस ज्यांनी ऐकली होती ते न्यायाधीश!
१९५० च्या दशकात, इराकमधल्या साक्षीदारांना मी जाऊन भेटलो आणि त्यांच्यासोबत घरोघरच्या साक्षकार्यात भाग घेतला. मी जॉर्डन आणि वेस्ट बँक या ठिकाणीही पुष्कळदा गेलो. १९५१ साली, आम्ही चार साक्षीदार मिळून बेथलेहेमला गेलो. तेथे आम्ही प्रभूचे सांज भोजन साजरे केले. त्या दिवशी जरा आधी आम्ही सगळेजण बसने जॉर्डन नदीवर गेलो; तेथे यहोवाला केलेल्या समर्पणाचे चिन्ह म्हणून २२ जणांनी बाप्तिस्मा घेतला. त्या परिसरात आम्हाला विरोध व्हायचा तेव्हा आम्ही म्हणायचो: “आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो आहोत की, तुमच्याच राष्ट्रातील एक पुत्र सबंध पृथ्वीवर राजा होणार आहे! मग तुम्हाला इतका राग का येतोय? उलट, तुम्हाला आनंद झाला पाहिजे!”
अडचणींतही प्रचार
मध्य पूर्वेतील लोक सहसा चांगल्या अंतःकरणाचे, नम्र आणि आतिथ्यप्रिय आहेत. पुष्कळ जण देवाच्या राज्याविषयीचा संदेश आस्थेने ऐकतात. खरे तर, बायबलमधील पुढील अभिवचन लवकरच पूर्ण होईल हीच सर्वात दिलासा देणारी गोष्ट असू शकते: “देव स्वतः [आपल्या लोकांबरोबर] राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.
आपल्या कार्याचा विरोध करणाऱ्या बहुतेक लोकांना आपले कार्य आणि आपला संदेश नेमका काय आहे हे कळत
नाही. ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकवर्गाने आपल्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले आहेत! म्हणूनच, १९७५ साली लेबननमध्ये सुरू झालेल्या आणि १५ हून अधिक वर्षे टिकलेल्या मुलकी युद्धात साक्षीदारांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागले.एकदा, मी एका कुटुंबासोबत बायबल अभ्यास चालवत होतो; ते कुटुंब फार आवेशाने चर्चला जायचे. पण बायबलमधील सत्ये शिकल्यावर ते प्रगती करू लागले तेव्हा पाळकांना खूप राग येऊ लागला. त्यामुळे, एके रात्री तिथल्या एका धार्मिक गटाच्या सदस्यांनी त्या कुटुंबाच्या दुकानाला आग लावून सुमारे ४,५०,००० रुपयांचे नुकसान केले. त्याच रात्री त्या टोळीने माझेही अपहरण केले. परंतु, मी त्या गटाच्या पुढाऱ्याशी बोललो, त्याला म्हणालो की, ते खरोखर ख्रिस्ती असते तर त्यांनी असले क्रूर कृत्य केले नसते. त्यावर त्याने लगेच कार थांबवायला सांगितली आणि मला बाहेर उतरायला सांगितले.
दुसऱ्या एका प्रसंगी, चार सैनिकांनी माझे अपहरण केले. त्यांच्या पुढाऱ्याने मला पुष्कळ धमक्या दिल्या होत्या आणि मला तो गोळी झाडून ठार मारेल असेही म्हणाला होता; पण अचानक त्याचे मन बदलले आणि त्याने मला सोडून दिले. यातील दोन लोक खून आणि चोरीच्या आरोपावरून सध्या तुरुंगात आहेत आणि दोघांना देहान्ताची शिक्षा देण्यात आली.
साक्ष देण्यासाठी इतर संधी
मला एका देशातून दुसऱ्या देशात विमानाने प्रवास करण्याची सुसंधी पुष्कळदा मिळाली आहे. एकदा बैरूटहून अमेरिकेला विमानाने प्रवास करताना मी लेबननचे भूतपूर्व विदेशी व्यवहार मंत्री, चार्ल्झ मलेक यांच्या शेजारी बसलो होतो. त्यांनी माझे लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि बायबलमधून वाचून दाखवलेल्या प्रत्येक वचनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शेवटी, ते म्हणाले की, ट्रायपॉलीमध्ये त्यांच्या शाळेत इब्राहीम आतेया हे शिक्षक होते; हे तेच शिक्षक होते ज्यांना माझ्या सासऱ्यांनी बायबलमधील सत्य सांगितले होते! श्री. मलेक म्हणाले की, इब्राहीम यांनी बायबलचा आदर करायला त्यांना शिकवले होते.
दुसऱ्या वेळी, विमानाने प्रवास करताना, मी अमेरिकेतील पॅलेस्टाईनच्या प्रतिनिधीशेजारी बसलो होतो. त्यांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याची संधी मला मिळाली. शेवटी, त्यांनी माझी ओळख न्यूयॉर्कमधील त्यांच्या भावाच्या कुटुंबाशी करून दिली आणि मी पुष्कळदा त्यांच्या घरी जात असे. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रे इमारतीत कामाला माझा एक नातेवाईक देखील होता. एकदा मी त्याला भेटायला गेलो तेव्हा त्याच्या ऑफिसात तीन तास बसलो; त्या वेळी मी त्यालाही देवाच्या राज्यासंबंधी साक्ष देऊ शकलो.
आता मी ८८ वर्षांचा झालो आहे आणि अजूनही मंडळीच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात सक्रियतेने भाग घेतो. माझी पत्नी, इव्हलिन अजूनही माझ्यासोबत यहोवाची सेवा करत आहे. आमच्या मुलीने यहोवाच्या साक्षीदारांच्या एका प्रवासी पर्यवेक्षकाशी लग्न केले आणि ते सध्या बैरूट येथील मंडळीत वडील आहेत. त्यांची मुलगीही साक्षीदार आहे. आमचा सर्वात धाकटा मुलगा आणि त्याची पत्नी देखील साक्षीदार आहेत आणि त्यांची मुलगीसुद्धा सत्यात आहे. आमच्या थोरल्या मुलाच्या अंतःकरणातही ख्रिस्ती विश्वास बिंबवण्यात आला होता आणि कालांतराने तोही सत्यात येईल अशी मी आशा धरतो.
१९३३ साली, मला पायनियर म्हणून नियुक्त करण्यात आले—मध्य पूर्वेतील मी पहिलाच पायनियर होतो! गेल्या ६८ वर्षांपासून मी पायनियर म्हणून यहोवाची सेवा केली आहे; यापेक्षा आणखी काही चांगले असेल असे मला वाटत नाही. याच आध्यात्मिक प्रकाशात चालत राहण्याचा माझा निर्धार आहे.
[२३ पानांवरील चित्र]
१९३५ मध्ये नेगीब
[२४ पानांवरील चित्र]
लेबनन पर्वतांमध्ये साऊंड कारसह, १९४०
[२५ पानांवरील चित्रे]
वरती डावीकडून: नेगीब, इव्हलिन, त्यांची मुलगी, भाऊ आबुद आणि नेगीब यांचा थोरला मुलगा, १९५२
खाली (पहिल्या ओळीत): नेगीब यांच्या घरी बंधू शामास, नॉर, आबुद आणि हेन्शल, ट्रायपॉली, १९५२
[२६ पानांवरील चित्र]
नेगीब आणि त्यांची पत्नी इव्हलिन