व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कृतज्ञ असा व आनंदी राहा

कृतज्ञ असा व आनंदी राहा

कृतज्ञ असा व आनंदी राहा

कॅल्गरी हेरल्ड या कॅनडाच्या एका वृत्तपत्रात असे म्हणण्यात आले, की “कृतज्ञतेची भावना प्रत्येकाने अनुभवलेली एक स्वाभाविक भावना आहे.” सदर वृत्तपत्रात काही नऊ वर्षीय शाळकरी मुलामुलींचे शब्द उद्धृत करण्यात आले होते. या मुलांच्या शिक्षिकेने त्यांना कोणकोणत्या गोष्टींबद्दल कृतज्ञता वाटते ते लिहिण्यास सांगितले. एका मुलाने लिहीले की त्याला आपल्या कुटुंबाबद्दल कृतज्ञता वाटते कारण ‘त्यांनी आजपर्यंत त्याची काळजी घेतली आहे.’ एका मुलीनेही आपल्या कुटुंबाप्रती या शब्दांत कृतज्ञता व्यक्‍त केली: “ते मला सुरक्षित ठेवतात, माझ्या आरोग्याची काळजी घेतात, माझी देखभाल करतात, माझ्यावर प्रेम करतात, माझे पालनपोषण करतात, आणि जर माझे आईबाबा नसते तर मी या जगात आलेच नसते.”

कृतघ्न व्यक्‍ती मात्र कायम असमाधानी असते. तत्त्ववेत्ता जे. आय. पॅकर यांच्या मते, “आपण देवावर आणि एकमेकांवर अवलंबून राहावे अशारितीनेच आपली निर्मिती करण्यात आली आहे.” यावरून आपल्याला कित्येक शतकांपूर्वी बायबलने दिलेल्या या सुज्ञ सल्ल्याची आठवण होते: “कृतज्ञ असा.” (कलस्सैकर ३:१५) आभार मानल्यामुळे आणि मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्‍त केल्यामुळे घनिष्ट नाती जुळण्यात हातभार लागतो.

शिवाय आपण एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करतो आणि एकमेकांची कदर करतो तेव्हा आपण यहोवाप्रती आपली कृतज्ञता व्यक्‍त करत असतो आणि तो देखील या गोष्टीची दखल घेतो. बायबल सांगते: “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.” (२ इतिहास १६:९) देव आपल्याला आश्‍वासन देतो, की मानवांपैकी जे कोणी त्याच्या नावाविषयी प्रीती असल्याचे दाखवतात त्यांची तो आठवण ठेवेल आणि त्यांची काळजी घेईल. (इब्री लोकांस ६:१०) होय, कृतज्ञता व्यक्‍त करणे सुज्ञपणाचे लक्षण आहे कारण हा सद्‌गुण आपण दररोज आपल्या वर्तनातून प्रगट करतो तेव्हा यहोवाला आनंद होतो आणि आपणही आनंदी राहू शकतो. नीतिसूत्रे १५:१३ येथे सांगितल्याप्रमाणे: “आनंदी मनाने मुख प्रसन्‍न होते.”