व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात कशाप्रकारे अधिकार करू शकते?

ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात कशाप्रकारे अधिकार करू शकते?

ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात कशाप्रकारे अधिकार करू शकते?

“ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य [“अधिकार,” पं.र.भा.] करो; तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे.”—कलस्सैकर ३:१५.

१, २. “ख्रिस्ताची शांती” कशाप्रकारे एका ख्रिस्ती व्यक्‍तीच्या अंतःकरणात अधिकार करते?

 अधिकार हा शब्द बऱ्‍याच जणांना आवडत नाही कारण त्यावरून जुलूम आणि जबरदस्ती करणाऱ्‍या व्यक्‍तीचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. त्यामुळे पौलाने कलोसे येथील सहख्रिस्ती बांधवांना “ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य [अधिकार] करो” असे म्हटले हे काही जणांना खटकते. (कलस्सैकर ३:१५) आपण स्वतंत्र नैतिक प्राणी आहोत ना? मग आपल्या अंतःकरणावर कशाचा किंवा कोणाचा अधिकार का असावा?

पौल कलस्सैकरांना आपले इच्छास्वातंत्र्य त्यागण्याचा सल्ला देत नव्हता. कलस्सैकर ३:१५ येथे “अधिकार” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा संबंध त्या काळातील खेळांत पारितोषिक देणाऱ्‍या पंचाकरता वापरल्या जाणाऱ्‍या शब्दाशी आहे. खेळात भाग घेणाऱ्‍यांना, खेळातील नियमांच्या चौकटीत काही प्रमाणात स्वातंत्र्य होते, पण खेळाच्या नियमांचे कोणी पालन केले आणि त्यामुळे पारितोषिक कोणाला मिळेल याचा निर्णय शेवटी पंचाचा होता. त्याचप्रकारे आपल्यालाही जीवनात अनेक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे पण असे करताना ख्रिस्ताच्या शांतीने नेहमी पंचाप्रमाणे आपले मार्गदर्शन केले पाहिजे, किंवा भाषांतरकार एड्‌गर जे. गुडस्पीड यांनी म्हटल्याप्रमाणे, ही शांती आपल्या अंतःकरणात “राज्य करणारी शक्‍ती” असली पाहिजे.

३. “ख्रिस्ताची शांती” म्हणजे काय?

“ख्रिस्ताची शांती” म्हणजे काय? ही एक स्थिरतेची किंवा स्वस्थतेची भावना आहे जी येशूचे शिष्य बनल्यावर आणि यहोवा देवाची व त्याच्या पुत्राची स्वीकृती आपल्याला आहे हे जाणल्यावर आपल्याला प्राप्त होते. आपल्या शिष्यांना सोडून जाण्याच्या काही वेळाआधी येशूने त्यांना म्हटले: “मी आपली शांति तुम्हास देतो . . . तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.” (योहान १४:२७) जवळजवळ २,००० वर्षांपासून ख्रिस्ताच्या शरीरातील विश्‍वासू अभिषिक्‍त सदस्यांनी ही शांती अनुभवली आहे आणि आज त्यांचे सोबती, अर्थात “दुसरी मेंढरे” देखील ती अनुभवत आहेत. (योहान १०:१६) या शांतीचा आपल्या अंतःकरणांवर अधिकार असला पाहिजे. आपल्यावर कठीण परीक्षा येतात तेव्हा ही शांती आपल्याला भीतीने गर्भगळीत होण्यापासून किंवा अनावश्‍यकपणे अस्वस्थ होण्यापासून राखेल. आपल्याला अन्याय सहन करावा लागतो, चिंता आपल्याला वेढतात किंवा कमीपणाच्या भावना आपल्याला सतावतात तेव्हा ही शांती कशाप्रकारे आपले रक्षण करते हे आता आपण पाहू या.

आपल्यावर अन्याय होतो तेव्हा

४. (अ) पृथ्वीवरील अन्यायाशी येशू कशाप्रकारे परिचित झाला? (ब) ख्रिश्‍चनांना अन्याय सहन करावा लागला तरीसुद्धा त्यांची काय प्रतिक्रिया होती?

राजा शलमोन याने म्हटले: “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” (उपदेशक ८:९) हे शब्द किती खरे आहेत हे येशूला चांगले ठाऊक होते. स्वर्गात असताना, मानव एकमेकांवर किती भयंकर अन्याय करतात हे त्याने पाहिले होते. पृथ्वीवर आल्यावर त्याला स्वतःला सर्वात मोठा अन्याय सहन करावा लागला कारण निष्पाप असूनही त्याच्यावर ईशनिंदेचा आरोप लावण्यात आला आणि एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्याला मृत्यूदंड भोगावा लागला. (मत्तय २६:६३-६६; मार्क १५:२७) आजही अन्याय सर्वत्र पाहायला मिळतो आणि खऱ्‍या ख्रिश्‍चनांना तर खासकरून अत्यंत अन्यायी वागणूक सहन करावी लागली आहे कारण ‘सर्व राष्ट्रे त्यांचा द्वेष करतात.’ (मत्तय २४:९) पण नात्सी छळ छावण्यांतील व सोव्हिएत श्रम शिबिरांतील भयंकर अनुभव, जमावांचे हल्ले, खोटे दोषारोप हे सर्व सहन करूनही ख्रिस्ताच्या शांतीने त्यांना दृढ राहण्यास मदत केली आहे. त्यांनी येशूचे अनुकरण केले आहे, ज्याच्याविषयी आपण असे वाचतो: “त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.”—१ पेत्र २:२३.

५. मंडळीत काही अन्याय झाला आहे असे आपण ऐकतो तेव्हा आपण आधी कोणता विचार केला पाहिजे?

यापेक्षा अगदी कमी प्रमाणात पाहिल्यास, आपल्याला कदाचित असे वाटत असेल की ख्रिस्ती मंडळीत कोणीतरी आपल्याशी अन्यायाने वागला आहे. अशा परिस्थितीत कदाचित आपल्याला प्रेषित पौलाप्रमाणे वाटत असेल: “एखादा अडखळविला गेला तर मला संताप येत नाही काय?” (२ करिंथकर ११:२९) अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? आपण स्वतःला असे विचारले पाहिजे, ‘आपण ज्याला अन्याय समजत आहोत तो खरोखरच अन्याय आहे का?’ सहसा आपल्याला पूर्ण वस्तूस्थिती माहीत नसते. आणि कदाचित त्या समस्येविषयी सर्व काही माहीत असल्याचा दावा करणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीचे ऐकून आपण त्वेषाने आपली प्रतिक्रिया जाहीर करत असू. म्हणूनच बायबल म्हणते: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवितो.” (नीतिसूत्रे १४:१५) तेव्हा, आपण सावध राहिले पाहिजे.

६. मंडळीत अन्याय झाला आहे असे आपल्याला वाटते तेव्हा आपण काय करू शकतो?

पण समजा आपल्या स्वतःवर अन्याय झाला आहे असे आपल्याला वाटत असेल तर? ख्रिस्ताची प्रीती ज्याच्या अंतःकरणात आहे, तो या परिस्थितीला कशाप्रकारे तोंड देईल? कदाचित ज्या व्यक्‍तीने आपल्या भावना दुखावल्या आहेत त्या व्यक्‍तीशी प्रत्यक्ष बोलणे आवश्‍यक आहे असे आपल्याला वाटत असेल. पण त्या व्यक्‍तीशी बोलल्यानंतर, जो कोणी ऐकायला तयार असेल त्या प्रत्येकाशी या समस्येविषयी चर्चा करण्याऐवजी ही बाब प्रार्थनेत यहोवाला कळवून तोच न्याय करेल असा भरवसा बाळगणे योग्य ठरणार नाही का? (स्तोत्र ९:१०; नीतिसूत्रे ३:५) कदाचित असे केल्यानंतर आपण आपल्याच मनाशी ठरवून ‘शांत राहू.’ (स्तोत्र ४:४, पं.र.भा.) बहुतेक वेळा पौलाचा सल्ला आपण लागू करू शकतो: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.”—कलस्सैकर ३:१३.

७. आपल्या बांधवांशी व्यवहार करताना आपण नेहमी काय आठवणीत ठेवले पाहिजे?

काहीही केले तरीसुद्धा, आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की जे काही घडले त्यावर आपण नियंत्रण करू शकत नसलो तरीही आपल्या स्वतःच्या प्रतिक्रियेवर मात्र आपण नियंत्रण करू शकतो. अन्याय झाला असे आपल्याला वाटत असल्यामुळे जर आपण आपले संतुलन गमावून बसलो तर समस्येऐवजी यानेच आपली शांती भंग होईल. (नीतिसूत्रे १८:१४) ही घटना आपल्याकरता एक अडखळणही बनू शकते; आपल्या मनाप्रमाणे योग्य न्याय दिला जात नाही तोपर्यंत, आपण मंडळीसोबत संबंधही तोडण्याची शक्यता आहे. स्तोत्रकर्त्याने असे लिहिले की यहोवाच्या नियमांवर प्रीती करणाऱ्‍यांना “अडखळण्याचे कारण पडणार नाही.” (स्तोत्र ११९:१६५) वस्तुस्थिती अशी आहे की वेळोवेळी प्रत्येकालाच कोणत्या न कोणत्या प्रकारचा अन्याय सहन करावा लागतो. तेव्हा, अशा कटू अनुभवांमुळे यहोवाच्या सेवेत कदापि बाधा येऊ देऊ नका. उलट ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणांवर अधिकार करो.

आपण चिंताक्रांत होतो तेव्हा

८. कोणत्या कारणांमुळे एक व्यक्‍ती चिंताक्रांत होऊ शकते आणि चिंतांमुळे काय परिणाम होऊ शकतो?

या “शेवटल्या काळी” चिंता प्रत्येकाच्या जीवनात अभिन्‍नपणे गोवलेल्या आहेत. (२ तीमथ्य ३:१) अर्थात येशूने म्हटले होते, की “आपण काय खावे अशी आपल्या जिवाची, अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराची चिंता करीत बसू नका.” (लूक १२:२२) पण चिंता या केवळ भौतिक गोष्टींमुळेच निर्माण होत नसतात. उदाहरणार्थ, लोट हा सदोमच्या लोकांचा नीचपणा पाहून ‘विटला’ होता. (२ पेत्र २:७) पौलाला “सर्व मंडळ्यांविषयीची चिंता” होती. (२ करिंथकर ११:२८) येशूही आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री दुःखाने इतका व्याकूळ झाला की “रक्‍ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता.” (लूक २२:४४) तेव्हा, सर्वच प्रकारच्या चिंता कमजोर विश्‍वासामुळे येत नाहीत. पण चिंतांचे कारण काहीही असो, त्या तीव्र स्वरूपाच्या असल्या आणि बऱ्‍याच काळापर्यंत आपल्या मनात घोळत राहिल्या तर साहजिकच आपली शांती त्या हिरावून घेऊ शकतात. काही तर या चिंतांमुळे इतके दबून गेले की यहोवाच्या सेवेतील जबाबदाऱ्‍या हाताळणे आपल्याला शक्य होणार नाही अशा निष्कर्षावर ते पोचले. बायबल म्हणते: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते.” (नीतिसूत्रे १२:२५) मग जर आपण चिंताक्रांत झालेले असू तर आपण काय करू शकतो?

९. चिंतांपासून मुक्‍त होण्यासाठी आपण कोणते व्यावहारिक उपाय करू शकतो पण चिंता उत्पन्‍न करणाऱ्‍या कोणत्या गोष्टी आपण आता पूर्णपणे काढू शकत नाही?

काही वेळा आपण या समस्येवर व्यावहारिक मार्गाने उपाय करू शकतो. जर आपल्या प्रकृतीमुळे आपल्याला चिंता वाटत असेल तर मग त्याकडे लक्ष देणे शहाणपणाचे ठरेल; अर्थात, हा एक वैयक्‍तिक प्रश्‍न आहे. * (मत्तय ९:१२) जर आपल्यावर असणाऱ्‍या जबाबदाऱ्‍यांच्या ओझ्यामुळे आपण चिंताक्रांत झालेले असू तर मग आपण यांपैकी काही जबाबदाऱ्‍या इतरांवर सोपू शकतो. (निर्गम १८:१३-२३) पण काहीजणांवर अशाही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्‍या असतात ज्या इतरांवर सोपवता येत नाही, उदाहरणार्थ आईवडील. त्यांनी काय करावे? विरोध करणाऱ्‍या विवाह जोडीदारासोबत राहणाऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीबद्दल काय? जे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहतात किंवा युद्ध होत असलेल्या भागांत राहतात अशा कुटुंबाविषयी काय? चिंता उत्पन्‍न करणाऱ्‍या सर्व समस्या आपण या व्यवस्थीकरणात नाहीशा करू शकत नाही हे तर स्पष्टच आहे. पण आपण आपल्या अंतःकरणात ख्रिस्ताची शांती टिकवून ठेवू शकतो? ती कशी?

१०. कोणत्या दोन मार्गांनी एक ख्रिस्ती व्यक्‍ती चिंतांपासून मुक्‍त होण्याचा प्रयत्न करू शकते?

१० एक मार्ग म्हणजे देवाच्या वचनात सांत्वन शोधणे. राजा दावीद याने लिहिले: “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.” (स्तोत्र ९४:१९) यहोवाकडून लाभणारे “सांत्वन” आपल्याला बायबलमध्ये सापडते. या प्रेरित ग्रंथातून दररोज मार्गदर्शन घेतल्याने ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात टिकवून ठेवण्यास मदत मिळते. बायबल म्हणते: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) त्याचप्रमाणे, पौलाने लिहिले: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) मनःपूर्वक, नियमित प्रार्थना आपली शांती टिकवून ठेवण्यास हातभार लावेल.

११. (अ) प्रार्थनेच्या बाबतीत येशूने कशाप्रकारे उत्तम आदर्श आपल्यापुढे ठेवला? (ब) प्रार्थनेविषयी आपला कसा दृष्टिकोन असावा?

११ या बाबतीत येशूने उत्तम आदर्श आपल्यापुढे ठेवला. काही वेळा तर तो अनेक तास आपल्या स्वर्गीय पित्याशी प्रार्थनेत बोलत होता. (मत्तय १४:२३; लूक ६:१२) प्रार्थनेने त्याला सर्वात कठीण परीक्षांनाही तोंड देण्यास मदत केली. त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री तो दुःखाने अतिशय व्याकूळ झाला. मग त्याने काय केले? त्याने “अधिक आग्रहाने” प्रार्थना केली. (लूक २२:४४) होय, देवाच्या परिपूर्ण पुत्राचीही प्रार्थनाशील मनोवृत्ती होती. मग आपण म्हणजे त्याच्या अपरिपूर्ण अनुयायांनी नियमित प्रार्थना करण्याची सवय लावणे अधिकच महत्त्वाचे नाही का? येशूने आपल्या शिष्यांना असे शिकवले की त्यांनी “सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये.” (लूक १८:१) आपण स्वतःबद्दल जाणत नाही इतक्या चांगल्याप्रकारे आपल्याला जाणणाऱ्‍या यहोवा देवाशी प्रार्थनेद्वारे आपण संवाद साधू शकतो व असे करणे आपल्याकरता अत्यंत आवश्‍यक आहे. (स्तोत्र १०३:१४) ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात टिकवून ठेवायची असेल, तर आपण ‘निरंतर प्रार्थना’ करू.—१ थेस्सलनीकाकर ५:१७.

आपल्या कमतरतांवर मात करणे

१२. कोणत्या कारणांमुळे काहीजणांना असे वाटेल की आपण यहोवाची चांगल्याप्रकारे सेवा करू शकत नाही?

१२ यहोवाच्या नजरेत त्याच्या सेवकांपैकी प्रत्येकजण मोलवान आहे. (हाग्गय २:७, पं.र.भा.) पण बऱ्‍याच जणांना हे मानणे जड जाते. काहीजण वाढत्या वयामुळे, कौटुंबिक जबाबदाऱ्‍या वाढल्यामुळे किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे निराश झाले असतील. इतरांना आपल्या लहानपणी आलेल्या वाईट अनुभवांमुळे कमीपणाच्या भावना आल्या असतील. तर असेही काहीजण असतील ज्यांचे मन गतकाळात केलेल्या चुकांमुळे त्यांना खात असेल; यहोवा आपल्याला कधी क्षमा करेल का असे कदाचित त्यांना वाटत असेल. (स्तोत्र ५१:३) अशा भावना आपल्याला सतावतात तेव्हा आपण काय करावे?

१३. कमीपणाच्या भावनांनी ग्रासलेल्यांना शास्त्रवचनांतून कोणते सांत्वन मिळते?

१३ ख्रिस्ताची शांती आपल्याला यहोवाच्या प्रेमाची खात्री करून देईल. येशूने कधीही असे म्हटले नाही की इतरांच्या सेवेशी आपल्या सेवेची तुलना करून आपले मोल ठरवले जाते; या वस्तुस्थितीवर मनन केल्यामुळे आपण हरवलेली शांती पुन्हा मिळवू शकतो. (मत्तय २५:१४, १५; मार्क १२:४१-४४) पण त्याने एकनिष्ठतेवर मात्र जोर दिला. आपल्या शिष्यांना त्याने म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्तय २४:१३) येशूलाही लोकांनी ‘तुच्छ मानले’ पण आपला पिता आपल्यावर प्रीती करतो याविषयी त्याने कधीही शंका घेतली नाही. (यशया ५३:३; योहान १०:१७) आणि आपल्या शिष्यांनाही त्याने सांगितले की ते देवाला प्रिय होते. (योहान १४:२१) यावर जोर देण्याकरता येशूने म्हटले: “दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्यावाचून त्यातून एकहि भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.” (मत्तय १०:२९-३१) यहोवाच्या प्रीतीचे हे किती प्रेमळ आश्‍वासन आहे, नाही का?

१४. यहोवाच्या दृष्टीने आपल्यापैकी प्रत्येकजण मोलवान आहे याची आपण का खात्री बाळगू शकतो?

१४ येशूने असेही म्हटले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहान ६:४४) ज्याअर्थी यहोवाने आपल्याला येशूकडे आकर्षिले त्याअर्थी आपले तारण व्हावे असे त्यालाही निश्‍चितच वाटते. येशूने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “ह्‍या लहानांतील एकाचाहि नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.” (मत्तय १८:१४) त्यामुळे जर तुम्ही पूर्ण मनाने यहोवाची सेवा करत असाल तर तुम्ही आपल्या भल्या कार्यांत आनंदी होऊ शकता. (गलतीकर ६:४) जर गतकाळात केलेल्या चुकांमुळे तुम्ही अस्वस्थ होत असाल तर खात्री बाळगा की जे मनापासून पश्‍चात्ताप करतात त्यांना यहोवा “भरपूर” क्षमा करील. (यशया ४३:२५; ५५:७) जर इतर कोणत्याही कारणामुळे तुम्ही निराश झाला असाल, तर नेहमी हे आठवणीत असू द्या की “परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.”—स्तोत्र ३४:१८.

१५. (अ) सैतान आपली शांती हिरावून घेण्याचा कशाप्रकारे प्रयत्न करतो? (ब) आपण यहोवावर कशाविषयी भरवसा बाळगू शकतो?

१५ आपण आपली शांती गमवावी हीच सैतानाची प्रबळ इच्छा आहे. आपल्या सर्वांना ज्याविरुद्ध झगडावे लागते त्या उपजत पापाचे मूळ कारण तोच आहे. (रोमकर ७:२१-२४) आपल्या अपरिपूर्णतेमुळे देव आपली सेवा स्वीकारणार नाही असाच तुम्ही विचार करावा असे त्याला वाटते. दियाबलाला कधीही अशाप्रकारे तुमचे धैर्य खचवू देऊ नका! त्याचे डावपेच ओळखा आणि ते ओळखून आपल्या विश्‍वासात शेवटपर्यंत टिकून राहण्याचा निर्धार करा. (२ करिंथकर २:११; इफिसकर ६:११-१३) लक्षात असू द्या, “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे, त्याला सर्व काही कळते.” (१ योहान ३:२०) यहोवा केवळ आपल्या कमतरता पाहात नाही. तर तो आपले हेतू आणि उद्देश देखील पाहतो. तर मग, स्तोत्रकर्त्याचे पुढील शब्द तुमचे सांत्वन करोत: “परमेश्‍वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही; तो आपले वतन सोडून देणार नाही.”—स्तोत्र ९४:१४.

ख्रिस्ताच्या शांतीमुळे एकजूट

१६. टिकून राहण्याचा प्रयत्न करताना आपण एकाकी नाही असे का म्हणू शकतो?

१६ पौलाने लिहिले, की ख्रिस्ताच्या शांतीने आपल्या अंतःकरणात अधिकार करावा कारण आपल्याला “एक शरीर असे पाचारण्यात आले आहे.” ज्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पौलाने ते पत्र लिहिले होते त्यांना ख्रिस्ताच्या देहाचा भाग होण्याकरता पाचारण्यात आले होते; आज अभिषिक्‍तांपैकी उरलेल्या शेषजनांनाही अशाचप्रकारे पाचारण करण्यात आले आहे. त्यांचे सोबती अर्थात “दुसरी मेंढरे” त्यांच्यासोबत “एक कळप” या नात्याने ‘एका मेंढपाळाच्या’ देखरेखीखाली एकजूट आहेत. (योहान १०:१६) या सर्वांचा मिळून बनलेला सबंध जगातील लाखोंचा “कळप” आज ख्रिस्ताच्या शांतीला आपल्या अंतःकरणात अधिकार करू देत आहेत. आपण एकटे नाही हे जाणल्यामुळे आपल्याला आपल्या विश्‍वासात टिकून राहण्यास मदत मिळते. पेत्राने लिहिले: “[सैतानाविरुद्ध] विश्‍वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हाला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.”—१ पेत्र ५:९.

१७. ख्रिस्ताच्या शांतीला आपल्या अंतःकरणात अधिकार करू देण्याचे कोणते मुख्य कारण आपल्याजवळ आहे?

१७ तर मग आपण सर्वजण देवाच्या पवित्र आत्म्याचे महत्त्वाचे फळ अर्थात शांती उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न करूया. (गलतीकर ५:२२, २३) जे यहोवाच्या नजरेत निष्कलंक, निर्दोष व शांतीत असलेले आढळतील त्यांना, नीतिमत्त्व वास करेल अशा परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद देण्यात येईल. (२ पेत्र ३:१३, १४) तर मग ख्रिस्ताच्या शांतीला आपल्या अंतःकरणात अधिकार करू देण्याचे आपल्याजवळ हरएक कारण आहे.

[तळटीप]

^ काहीवेळा, मानसिक रोगामुळे चिंता उत्पन्‍न होते किंवा तीव्र होते, उदाहरणार्थ नैराश्‍य (क्लिनिकल डिप्रेशन).

तुम्हाला आठवते का?

• ख्रिस्ताची शांती म्हणजे काय?

• आपण अन्याय सहन करतो तेव्हा ख्रिस्ताची शांती कशाप्रकारे आपल्या अंतःकरणात अधिकार करू शकते?

• चिंतांना तोंड देण्याकरता ख्रिस्ताची शांती कशाप्रकारे आपल्याला मदत करू शकते?

• आपल्या मनात कमीपणाच्या भावना येतात तेव्हा ख्रिस्ताची शांती कशाप्रकारे आपले सांत्वन करते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

येशूवर खोटे दोषारोप लावण्यात आले तेव्हा त्याने स्वतःला यहोवाच्या हाती सोपून दिले

[१६ पानांवरील चित्र]

प्रेमळ पिता मुलाला कुशीत घेतो त्याचप्रमाणे आपल्या चिंता सुसह्‍य करण्यासाठी यहोवा आपले सांत्वन करतो

[१८ पानांवरील चित्र]

देवाच्या नजरेत, आपले टिकून राहणे सर्वात महत्त्वाचे आहे