व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दियाबल—अस्तित्वात आहे का?

दियाबल—अस्तित्वात आहे का?

दियाबलअस्तित्वात आहे का?

“आज काही लोकांना (ज्यांची संख्या कमी होत चालली आहे) ‘देव’ जशी खरी आणि प्रभावशाली व्यक्‍ती वाटते त्याचप्रमाणे ख्रिस्ती चर्चच्या इतिहासात एक वेळ अशी होती जेव्हा दियाबल अर्थात बालजबूल किंवा दुष्टांचा राजा सैतान हा देखील खरा आणि प्रभावशाली वाटत होता; अवतीभोवतीच्या दुष्टाईचा खुलासा करण्यासाठी यहुद्यांनी आणि प्रारंभिक ख्रिश्‍चनांनी अर्धे मानवाचे आणि अर्धे प्राण्याचे शरीर असलेली एक प्रतिमा तयार केली. नंतर ख्रिश्‍चनांना कळाले की, ही केवळ एक काल्पनिक प्रतिमा आहे, त्यात काहीच तथ्य नाही आणि त्यांनी गुप्तपणे ही कल्पना त्यागली.”—“मनाचा भ्रम—देवाचा निरोप” (इंग्रजी), लेखक लूडोव्हिक केनेडी.

लेखक आणि प्रसारकर्ता लूडोव्हिक केनेडी यांनी म्हटले की, कित्येक शतकांपर्यंत ख्रिस्ती धर्मजगतातील लोकांना दियाबलाच्या अस्तित्वाविषयी मुळीच शंका नव्हती. उलट, प्राध्यापक नॉर्मन कोन यांच्या मते, काही वेळा ख्रिश्‍चनांचा, “सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांवर ठाम विश्‍वास” होता. (युरोपचे आंतरिक दुरात्मे) (इंग्रजी) हा अंधविश्‍वास केवळ सामान्य, अडाणी शेतकऱ्‍यांमध्येच आढळत नव्हता. उदाहरणार्थ, दियाबल एखाद्या प्राण्याचे रूप धारण करतो व दुष्ट आणि अश्‍लील प्रथांचे नेतृत्व करतो ही धारणा “बहुसंख्येतील अडाणी लोकांची नव्हे तर सुशिक्षित उच्चभ्रू लोकांची होती,” असे प्राध्यापक कोन म्हणतात. याच “सुशिक्षित उच्चभ्रू” लोकांच्या वर्गाने (ज्यामध्ये सुशिक्षित पाद्री देखील सामील होते) १५ ते १७ व्या शतकात युरोपभर चेटकणींचा शोध घेतला होता; या वेळी चर्च आणि मुलकी अधिकाऱ्‍यांनी चेटूक करण्याचा आरोप असलेल्या सुमारे ५०,००० लोकांचा छळ केला आणि त्यांना ठार मारले.

म्हणूनच, अनेकांनी दियाबलाविषयीच्या कल्पना अतिशयोक्‍तीचे अंधविश्‍वास आहेत असे समजून त्या मनातून झटकून टाकल्या आहेत. १७२६ साली देखील, डॅनिएल डेफो यांनी दियाबल हा “वटवाघळाचे पंख, शिंगे, खुरे असलेले पाय, लांब शेपटी, दुभंगलेली जीभ इत्यादि असलेला” भयंकर राक्षस आहे या लोकांच्या धारणेची थट्टा केली. त्यांच्या मते, या कल्पना “दियाबलाचे समर्थक आणि निर्माते” असलेल्या लोकांच्या “तर्कहीन कल्पना” आहेत ज्यांनी “स्वतःच दियाबलाची प्रतिमा निर्माण करून अज्ञानी लोकांना फसवले.”

तुमचा दृष्टिकोन असाच आहे का? “आपल्या पापीपणासाठी कोणाला तरी जबाबदार धरण्यासाठी मानवांनीच दियाबलाची कल्पना बनवली” असे तुम्ही मानता का? हे वाक्य द झॉन्डरव्हान पिक्टोरियल एन्सायक्लोपिडिया ऑफ द बायबल यात आढळते आणि ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या पुष्कळांचा हाच विचार आहे. जेफ्री बर्टन रस्सल यांच्या मते, सर्वसाधारणपणे पाहता, ख्रिस्ती धर्मजगताच्या तत्त्ववेत्त्यांनी “दियाबल आणि दुरात्म्यांची कल्पना कालबाह्‍य अंधविश्‍वास म्हणून फेटाळून लावली.”

तरीपण, काही लोकांना दियाबल खरोखर अस्तित्वात आहे असे वाटते. ते असा तर्क करतात की, मानवी इतिहासात वारंवार घडणाऱ्‍या दुष्कृत्यांमागे निश्‍चितच एक अलौकिक, घातकी शक्‍ती असली पाहिजे. रस्सल म्हणतात, “विसाव्या शतकात घडलेल्या भयंकर घटना” एक कारण आहेत ज्यांमुळे “इतक्या दीर्घ अवधीनंतर दियाबलावरील लोकांचा विश्‍वास पुन्हा एकदा वाढत आहे.” लेखक डॉन लुईस यांच्या मते, अंधविश्‍वास आणि भीती बाळगल्यामुळे आपल्या “अशिक्षित पूर्वजांची थट्टा करणारे” आधुनिक विचारांचे, सुशिक्षित लोक आता “पुन्हा एकदा अलौकिक जगातील दुष्ट शक्‍तीने भारावून गेले आहेत.”—युगांदरम्यानचा धार्मिक अंधविश्‍वास (इंग्रजी).

मग खरी वस्तुस्थिती काय आहे? दियाबल हा फक्‍त एक अर्थहीन अंधविश्‍वास आहे का? की २१ व्या शतकातही जिच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही अशी ती व्यक्‍ती आहे?

[४ पानांवरील चित्र]

गुस्ताव डोरे यांच्या खोदीवकामात दर्शवल्याप्रमाणे जुन्या अंधविश्‍वासांनुसार दियाबलाला अर्धा मानव, अर्धा प्राणी असे दाखवले गेले

[चित्राचे श्रेय]

The Judecca—Lucifer/The Doré Illustrations For Dante’s Divine Comedy/Dover Publications Inc.