व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दियाबल—फक्‍त अंधविश्‍वास नाही

दियाबल—फक्‍त अंधविश्‍वास नाही

दियाबलफक्‍त अंधविश्‍वास नाही

“सबंध नव्या करारात देव आणि चांगली शक्‍ती तसेच सैतानाच्या नेतृत्वाखालील दुष्ट शक्‍ती यांच्यात विरोध असल्याचे दाखवले आहे. ही, एका-दोघा लेखकांची कल्पना नाही तर हे समान मत आहे. . . . म्हणून नव्या कराराची साक्ष स्पष्ट आहे. सैतान खरोखर अस्तित्वात असलेली घातकी व्यक्‍ती आहे जी सतत देवाला आणि देवाच्या लोकांना विरोध करत राहते.”—“द न्यू बायबल डिक्शनरी.”

असे आहे तर मग, स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे पुष्कळजण—जे बायबलवर विश्‍वास करत असल्याचा दावा करतात—दियाबल खरोखर अस्तित्वात आहे असे का मानत नाहीत? कारण बायबल हे देवाचे वचन आहे हेच ते मुळात मानत नाहीत. (यिर्मया ८:९) त्यांच्या मते, बायबलच्या लेखकांनी त्यात अवतीभोवतीच्या राष्ट्रांतील तत्त्वज्ञान सामील केले आणि देवाकडील अचूक सत्य दिले नाही. उदाहरणार्थ, कॅथलिक तत्त्ववेत्ता, हान्स कुंग लिहितात: “सैतान व त्याच्या दुरात्म्यांची सेना या दंतकथेतील कल्पना बॅबिलोनी दंतकथांमधून यहूदी धर्मात आणि तेथून नव्या करारात शिरल्या.”—ऑन बीईंग अ ख्रिश्‍चन.

परंतु बायबल हे मनुष्यांचे वचन नाही. ते खरोखर देवाचे प्रेरित वचन आहे. म्हणूनच, दियाबलाविषयी त्यात दिलेली माहिती आपण गंभीरतेने घेतली तर सुज्ञपणाचे ठरेल.—२ तीमथ्य ३:१४-१७; २ पेत्र १:२०, २१.

येशूचा काय विचार होता?

दियाबल हा खरा आहे असे येशू ख्रिस्त मानत होता. त्याची परीक्षा त्याच्यामधील दुष्ट प्रवृत्तीने घेतली नाही. पण, त्याच्यावर एका खऱ्‍या व्यक्‍तीने हल्ला केला ज्याला त्याने नंतर “जगाचा अधिकारी” म्हटले. (योहान १४:३०; मत्तय ४:१-११) इतर आत्मिक प्राणी देखील सैतानाच्या दुष्कृत्यांमध्ये सामील होते असेही तो मानत होता. त्याने ‘भूतग्रस्त’ लोकांना बरे केले. (मत्तय १२:२२-२८) ए रॅशनलिस्ट एन्सायक्लोपिडिया या नास्तिकवादी प्रकाशनानेही या उल्लेखनीय गोष्टीविषयी लिहिले की: “शुभवर्तमानांतील येशू दुरात्म्यांना मानत होता हे तत्त्ववेत्त्यांनाही स्पष्ट करता येत नाही.” येशूने दियाबल आणि त्याच्या दुरात्म्यांविषयी सांगितले तेव्हा तो बॅबिलोनी दंतकथांमधील अंधविश्‍वासांचा केवळ उल्लेख करत नव्हता. पण ते खरोखर अस्तित्वात होते हे त्याला ठाऊक होते.

येशूने त्याच्या काळातील धार्मिक पुढाऱ्‍यांना उद्देशून म्हटलेल्या शब्दांवरून आपण दियाबलाविषयी पुष्कळ काही शिकतो: “तुम्ही आपला बाप सैतान [“दियाबल,” NW] ह्‍यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.”—योहान ८:४४.

यानुसार, दियाबल—ज्याचा अर्थ “निंदक” असा होतो—“लबाड व लबाडीचा बाप” होता. (तिरपे वळण आमचे.) देवाविषयी सर्वप्रथम तोच एदेन बागेत खोटे बोलला. यहोवाने म्हटले की, आपल्या मूळ पालकांनी बऱ्‍यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाल्ले तर ते ‘खास मरतील.’ पण सर्पाद्वारे सैतान म्हणाला की, देव जे बोलला ते खरे नव्हते. (उत्पत्ति २:१७; ३:४) म्हणूनच, त्याला ‘दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप’ म्हटले आहे.—प्रकटीकरण १२:९.

दियाबलाने बऱ्‍यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाविषयी खोटे सांगितले. त्याने असे म्हटले की, त्या झाडाचे फळ खाण्यावर मनाई घालणे योग्य नव्हते; तो अधिकाराचा दुरुपयोग होता. त्याच्या मते, आदाम आणि हव्वा स्वतःकरता योग्य-अयोग्य याची निवड करून “देवासारखे” बनू शकत होते. सैतान असे सुचवत होता की, इच्छा स्वातंत्र्य असल्यामुळे त्यांना स्वतःसाठी निवड करण्याची पूर्ण मोकळीक असावी. (उत्पत्ति ३:१-५) देवाची राज्य करण्याची पद्धत योग्य आहे की नाही यावर हल्ला केल्यामुळे महत्त्वपूर्ण वादविषय निर्माण झाले. त्यामुळे हे वादविषय मिटण्यासाठी यहोवाने काळ जाऊ दिला. याचा अर्थ, सैतानाला काही काळ जिवंत राहण्यास अनुमती देण्यात आली. त्याचा हा मर्यादित कालावधी आता फार वेगाने संपत चालला आहे. (प्रकटीकरण १२:१२) तरीही, लबाडी आणि फसवेगिरी करून तो मानवजातीला देवापासून दूर करण्याचा प्रयत्न काही सोडत नाही; येशूच्या काळातील शास्त्री-परुश्‍यांसारख्या लोकांचा उपयोग करून तो आपल्या शिकवणींचा प्रसार करतो.—मत्तय २३:१३, १५.

येशूने असेही म्हटले की, दियाबल “प्रारंभापासून मनुष्यघातक होता” आणि “तो सत्यात टिकला नाही.” (तिरपे वळण आमचे.) याचा अर्थ असा होत नाही, की यहोवाने दियाबलाला “मनुष्यघातक” निर्माण केले. देवाच्या विरोधात जाणाऱ्‍या लोकांना जेथे यातना दिल्या जातात त्या अग्निमय ठिकाणाचा राक्षसरूपी अधिकारी म्हणून त्याला निर्माण करण्यात आले नव्हते. किंबहुना, असे ठिकाण आहे असेही बायबल शिकवत नाही. उलट, बायबल दाखवते की, मृत लोक कुठल्यातरी अग्नीमय ठिकाणी अथवा सैतानाच्या परिसरात नव्हे तर मानवजातीच्या सर्वसाधारण कबरेत आहेत.—प्रेषितांची कृत्ये २:२५-२७; प्रकटीकरण २०:१३, १४.

सुरवातीला दियाबल “सत्यात” होता. देवाचा परिपूर्ण आत्मिक पुत्र या नात्याने तो यहोवाच्या स्वर्गीय कुटुंबाचा एक भाग होता. पण तो “सत्यात टिकला नाही.” त्याला आपली मनमानी करायची होती आणि आपल्या खोट्या तत्त्वांनुसार चालायचे होते. “प्रारंभापासून” याचा अर्थ देवाचा स्वर्गदूत-पुत्र म्हणून त्याची उत्पत्ती करण्यात आली तेव्हापासून नव्हे तर त्याने यहोवाविरुद्ध स्वतःहून बंड केले आणि आदाम-हव्वेशी खोटे बोलला तेव्हापासून असा होतो. मोशेच्या काळात यहोवाविरुद्ध बंड केलेल्या लोकांसारखाच दियाबल होता. त्यांच्याविषयी आपण असे वाचतो: “हे बिघडले आहेत, हे त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे.” (अनुवाद ३२:५) हेच सैतानाच्या बाबतीतही म्हटले जाऊ शकते. त्याने बंड केले आणि तो आदाम-हव्वेच्या मृत्यूसाठी—खरे तर, संपूर्ण मानवजातीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला तेव्हा तो “मनुष्यघातक” बनला.—रोमकर ५:१२.

अवज्ञाकारी देवदूत

इतर देवदूतही सैतानाच्या बंडाळीत सामील झाले. (लूक ११:१४, १५) या देवदूतांनी “आपले वसतिस्थान सोडले” आणि नोहाच्या काळात ‘मानवकन्यांशी’ लैंगिक संबंध ठेवण्याकरता मानवी शरीरे धारण केली. (यहूदा ६; उत्पत्ति ६:१-४; १ पेत्र ३:१९, २०) “आकाशातील ताऱ्‍यांपैकी एक तृतीयांश तारे” किंवा अल्पांश आत्मिक प्राण्यांनी हा मार्ग निवडला.—प्रकटीकरण १२:४.

प्रकटीकरणाच्या लाक्षणिक पुस्तकात दियाबलाचे वर्णन “मोठा अग्निवर्ण अजगर” असे केले आहे. (प्रकटीकरण १२:३) का? तो दिसायला भयानक आणि कुरूप आहे म्हणून त्याचे असे वर्णन करण्यात आलेले नाही. खरे तर, आत्मिक प्राण्यांचे शरीर कसल्या प्रकारचे आहे हे आपल्याला ठाऊक नाही पण या बाबतीत सैतान इतर देवदूतांपेक्षा कदाचित वेगळा नसेल. मात्र “अग्निवर्ण अजगर” हे सैतानाच्या वखवखलेल्या, भयानक, शक्‍तिशाली आणि नाशकारक प्रवृत्तीचे अगदी साजेसे वर्णन आहे.

सध्या सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांवर पुष्कळ प्रतिबंध आहेत. एकेकाळी त्यांना मानवी शरीर धारण करणे शक्य होते; परंतु आता त्यांना तसे करण्याची परवानगी नाही. १९१४ साली ख्रिस्ताकरवी देवाचे राज्य स्थापन करण्यात आल्यावर त्यांना पृथ्वीच्या परिसरात टाकण्यात आले.—प्रकटीकरण १२:७-९.

दियाबल—भयानक शत्रू

तरीपण, दियाबल हा भयानक शत्रू आहे. तो “गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ पेत्र ५:८) आपल्या पापी शरीरात असलेला हा अस्पष्ट दुष्ट घटक नाही. आपल्या स्वतःच्या पापी प्रवृत्तींविरुद्ध आपल्याला लढा द्यावा लागतो हे खरे आहे. (रोमकर ७:१८-२०) तरीही, खरा संघर्ष “सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.”—इफिसकर ६:१२.

दियाबलाचा प्रभाव कोठपर्यंत पसरलेला आहे? प्रेषित योहान म्हणतो, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) अर्थात, दियाबलाच्या विचाराने आपण पछाडले जाण्याची किंवा त्याच्या अंधविश्‍वासी भीतीने गर्भगळीत होण्याची गरज नाही. परंतु, सत्याबद्दल आपल्याला अंधळे करण्याच्या व देवाप्रती आपली सचोटी मोडण्याच्या त्याच्या प्रयत्नांबाबतीत सावधान राहणे सुज्ञपणाचे आहे.—ईयोब २:३-५; २ करिंथकर ४:३, ४.

देवाच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्‍यांवर हल्ला करण्यासाठी दियाबल नेहमीच क्रूरतेचा उपयोग करत नाही. काही वेळा, तो “तेजस्वी देवदूताचे” सोंग घेतो. प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना या धोक्याचा इशारा देत असे लिहिले: “जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्‍यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.”—२ करिंथकर ११:३, १४.

त्यासाठी आपण ‘सावध असावे, जागे राहावे आणि त्याच्याविरुद्ध विश्‍वासांत दृढ असे उभे राहावे.’ (१ पेत्र ५:८, ९; २ करिंथकर २:११) मंत्रतंत्राशी संबंधित असलेल्या कशातही भाग घेऊन सैतानाच्या पाशात पडू नका. (अनुवाद १८:१०-१२) देवाच्या वचनाचा मेहनतीने अभ्यास करणारे विद्यार्थी बना आणि लक्षात ठेवा की, येशू ख्रिस्ताला दियाबलाने परीक्षेत टाकले तेव्हा त्याने वारंवार देवाच्या वचनातून उल्लेख केला. (मत्तय ४:४, ७, १०) देवाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा. आत्म्याचे फळ, सैतानाच्या प्रभावशाली देहाच्या कर्मांना टाळायला मदत करू शकतात. (गलतीकर ५:१६-२४) तसेच, दियाबल आणि त्याच्या दुरात्म्यांचा तुमच्यावर कोणत्या मार्गाने दबाव येत आहे असे वाटल्यास यहोवाला कळकळीने प्रार्थना करा.—फिलिप्पैकर ४:६, ७.

दियाबलाला घाबरण्याचे काहीही कारण नाही. सैतानाच्या प्रत्येक हल्ल्याविरुद्ध खरे संरक्षण देण्याचे अभिवचन यहोवा देतो. (स्तोत्र ९१:१-४; नीतिसूत्रे १८:१०; याकोब ४:७, ८) प्रेषित पौलाने म्हटले, “प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा.” मग, “सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता” येईल.—इफिसकर ६:१०, ११.

[५ पानांवरील चित्र]

येशूला ठाऊक होते की, दियाबल एक खरी व्यक्‍ती आहे

[६ पानांवरील चित्र]

“सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे”

[चित्राचे श्रेय]

NASA photo

[७ पानांवरील चित्रे]

देवाच्या वचनाचा अभ्यास करून आणि नियमित प्रार्थना करून दियाबलाचा विरोध करा