व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“फ्रान्समध्ये काय चालले आहे?”

“फ्रान्समध्ये काय चालले आहे?”

“फ्रान्समध्ये काय चालले आहे?”

“स्वतंत्रता, प्रिय स्वतंत्रता.” हे आहेत “ला मार्सेयाज,” या फ्रेंच राष्ट्रगीतातील शब्द. स्वतंत्रता सर्वांना प्रिय वाटते यात शंका नाही. पण फ्रान्समध्ये अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटनांमुळे, नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यांची पायमल्ली होत असल्याविषयी काळजी व्यक्‍त केली जात आहे. म्हणूनच, नोव्हेंबर ३, २००० शुक्रवार रोजी १ लाखाहून अधिक यहोवाच्या साक्षीदारांनी मिळून एका विशेष पत्रिकेच्या एकूण १.२ कोटी प्रतींचे वितरण केले; “फ्रान्समध्ये काय चालले आहे? स्वातंत्र्य परतेल का?” हे या खास पत्रिकेचे शीर्षक होते.

मागील काही वर्षांपासून फ्रान्समधील अनेक राजकीय नेत्यांनी व धार्मिक पंथविरोधी गटांनी यहोवाच्या साक्षीदारांना आपले लक्ष्य बनवले आहे. यामुळे साक्षीदारांपैकी कित्येक वैयक्‍तिकांना, त्यांच्या मंडळ्यांना व राष्ट्रीय पातळीवर साक्षीदारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पण जून २३, २००० रोजी कॉन्से डेटा, या फ्रान्सच्या सर्वोच्च प्रशासकीय न्यायालयाने एक निर्णायक निकाल जाहीर केला; न्यायालयाच्या या निर्णयामुळे १,१०० पेक्षा अधिक खटल्यांसंबंधी ३१ कनिष्ठ न्यायालयांनी व्यक्‍त केलेल्या समान मताला पुष्टी मिळाली. यहोवाच्या साक्षीदारांची उपासना फ्रेंच कायद्यांच्या पूर्ण एकवाक्यतेत असून इतर धर्मांना मिळणाऱ्‍या सवलती त्यांच्या राज्य सभागृहांना देखील लागू होतात याला सदर वरिष्ठ न्यायालयाने पुष्टी दिली.

परंतु या निर्णयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फ्रेंच अर्थव्यवस्था खात्याने सर्व धार्मिक संस्थांना कायद्याने देऊ केलेली करमुक्‍तीची सवलत यहोवाच्या साक्षीदारांना देण्यास नकार दिला आहे. उलट या खात्याने फ्रान्समधील १,५०० मंडळ्यांशी संबंधित असलेल्या साक्षीदारांनी व इतर हितचिंतकांनी दिलेल्या देणग्यांवर ६०-टक्के कर लादला आहे. हा वाद सध्या न्यायालयापुढे आला आहे.

याआधी उल्लेख केलेल्या मोहिमेचा हाच उद्देश होता की फ्रान्समधील या न्यायालयीन विसंगतीचा पर्दाफाश केला जावा; तसेच सर्वांच्याच धार्मिक स्वातंत्र्याची पायमल्ली करू पाहणारे जाचक कर आणि प्रस्तावित कायदे मुळात किती धोकेदायक ठरू शकतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले जावे. *

व्यस्त दिवस

काही मंडळ्यांनी पहाटे दोनलाच रेल्वे स्थानकांच्या आणि कारखान्यांच्या समोर आणि नंतर विमानतळांवर पत्रिकेचे वितरण सुरू केले. सकाळी सहा वाजता पॅरिस शहर जागे झाले. जवळजवळ ६,००० स्वयंसेवक, कामाला जायला निघालेल्या प्रवाशांना भेटता येईल अशी मोक्याची ठिकाणे पाहून उभे होते. एका तरुणीने साक्षीदारांना म्हटले: “धार्मिक स्वातंत्र्याकरता तुम्ही जे करत आहात ते फार चांगले आहे. कारण हा फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांचा प्रश्‍न नाहीये.” मार्से शहरात ३५० साक्षीदारांनी भुयारी रेल्वे स्थानकांवर आणि रस्त्यांवर माहितीपत्रके वितरीत केली. एका तासाच्या आत, राष्ट्रीय आकाशवाणी केंद्रावरून साक्षीदारांच्या या मोहिमेविषयी घोषणा करण्यात आली व यहोवाचे साक्षीदार कदाचित तुम्हालाही थांबवून पत्रिका देतील असे ऐकणाऱ्‍यांना सूचित करण्यात आले. मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयाचे माहेरघर असलेल्या स्ट्रॅस्बोर्ग शहरात सेंट्रल स्टेशनवर प्रवाशांनी ओळीत उभे राहून माहितीपत्रके स्वीकारली. एका वकिलाने अशी टिप्पणी केली की त्याला आपले विश्‍वास जरी पटत नसले तरीसुद्धा त्याला आपल्या या केसविषयी बरीच उत्सुकता आहे कारण ही लढाई महत्त्वाची आहे आणि न्यायसंगत आहे.

आठ वाजता, मुसळधार पाऊस सुरू असूनही ५०७ साक्षीदारांनी ग्रेनोबल या आल्पाईन शहरात रस्त्यांवरील लोकांना माहितीपत्रके दिली किंवा पत्र पेट्यांमध्ये ती टाकली. कार व ट्रॅम चालक काय चालले आहे हे पाहायला थांबत होते व पत्रिका मागत होते. पश्‍चिमेकडील पॉइट्ये या शहरात नऊ वाजता रेल्वेने आलेल्या प्रवाशांजवळ आधीच पत्रिका होत्या कारण ते ज्या ठिकाणाहून निघाले होते तेथेच त्यांना त्या देण्यात आल्या होत्या. जर्मन सीमेजवळील मल्हाऊस येथे ४०,००० प्रती देण्यात आल्या होत्या.

दहा वाजेपर्यंत बऱ्‍याच मंडळ्यांची निम्मी माहितीपत्रके वितरीत करून झाली होती. फार कमी लोकांनी पत्रिका घेण्यास नकार दर्शवला आणि बऱ्‍याच लोकांसोबत साक्षीदारांना चांगले संभाषण करता आले. स्विट्‌झर्लंडच्या सीमेपासून फक्‍त ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेसानकोन या ठिकाणी एका तरुणाने बायबलविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली आणि देवाने दुःखाला अनुमती का दिली असा प्रश्‍न विचारला. साक्षीदाराने त्याला जवळच्याच एका राज्य सभागृहात जाऊन याविषयी अधिक चर्चा करण्याचे सुचवले आणि त्याच्यासोबत देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या पत्रिकेतून लगेच अभ्यास सुरू करण्यात आला.

दुपारी अनेक साक्षीदारांनी जेवणाच्या सुटीचा वेळ एक ते दोन तास प्रचार करण्याकरता उपयोगात आणला. दुपारभर पत्रिकेचे वितरण सुरूच होते आणि बऱ्‍याच मंडळ्यांनी दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत हे कार्य संपवले. शँपेनच्या उत्पादनाकरता सुप्रसिद्ध असलेल्या रीम्स या शहरात पूर्वी यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास केलेल्या किंवा त्यांच्या सभांना उपस्थित राहिलेल्या लोकांनी पुन्हा एकदा मंडळीसोबत संपर्क करण्याची इच्छा प्रदर्शित केली. बॉर्डो येथे तीन गृह बायबल अभ्यास सुरू करण्यात आले. त्याच शहरात एक साक्षीदार बहीण वृत्तपत्र विकत घेण्याकरता एका दुकानात शिरली तेव्हा तिला काउन्टरवर आपल्या पत्रिकांचा ढीग दिसला. हे दुकान चालवणारी स्त्री पूर्वी साक्षीदार होती आणि पत्रिका मिळाल्यावर त्याचे महत्त्व ओळखून तिने स्वतःहूनच वितरण करण्याकरता त्यांच्या झेरॉक्स प्रती काढल्या होत्या.

नॉर्मंडी येथील ला हेव्र नावाच्या ठिकाणी, एका प्रॉटेस्टंट स्त्रीने जेव्हा रेडिओवर ऐकले की यहोवाच्या साक्षीदारांच्या देणग्यांवर अवास्तव कर्ज लादण्यात आले आहेत तेव्हा तिला धक्काच बसला. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल तिने साक्षीदारांचे अभिनंदन केले. संध्याकाळी ७:२० वाजता लियोन्स येथील प्रादेशिक टीव्ही प्रक्षेपणात पत्रिका वितरणासंबंधी असे म्हणण्यात आले: “आज सकाळी पावसाचे थेंब चुकवणे एकवेळ सोपे वाटत होते पण यहोवाच्या साक्षीदारांच्या पत्रिका नाहीत.” दोन साक्षीदारांची मुलाखत घेण्यात आली आणि या मोहिमेचा उद्देश समजावून सांगण्याची त्यांना विनंती करण्यात आली.

नोकरीवरून परतताना या कार्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्‍या काही साक्षीदारांनी, कामावरून परतणाऱ्‍या प्रवाशांना काही पत्रिका दिल्या आणि इतरांनी पत्रपेट्यांमध्ये पत्रिका टाकल्या. ब्रेस्ट आणि चिनीमातीच्या वस्तूंकरता प्रसिद्ध असलेल्या लिमोजस या गावांत रात्री ११:०० वाजता सिनेमागृहातून बाहेर पडणारे लोक त्या दिवशी पत्रिका प्राप्त करणाऱ्‍या शेवटच्या लोकांपैकी होते. उरलेल्या पत्रिका गोळा करून दुसऱ्‍या दिवशी सकाळी वितरीत करण्यात आल्या.

परिणाम

एका साक्षीदाराने असे म्हटले: “आपल्या शत्रूंना असे वाटते की ते आपल्याला खचवू शकतात. पण त्याउलटच घडत आहे.” बऱ्‍याच मंडळ्यांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक सदस्यांनी त्या दिवशी पत्रिका वितरणाच्या कार्यात सहभाग घेतला. काहींनी या कार्यात १०, १२ किंवा १४ तास खर्च केले. उत्तर फ्रान्समधील एम शहरात एका साक्षीदार बांधवाने रात्र पाळी केल्यानंतर सकाळी पाच वाजेपासून दुपारी तीनपर्यंत पत्रिका वाटपात सहभाग घेतला. येथपासून जवळच असलेल्या डनेन येथे १९०६ सालापासून असलेल्या मंडळीतील ७५ साक्षीदारांनी शुक्रवारी या कार्यात एकूण २०० तास खर्च केले. इतर बरेच जण वृद्ध, अपंग असूनही आणि हवामान खराब असूनही या कार्यात सहभाग घेण्यात अतिशय उत्सुक होते. उदाहरणार्थ ला मॅन्स येथे, ८० ओलांडलेल्या तीन बहिणींनी दोन तास घरोघरी जाऊन पत्रपेट्यांमध्ये पत्रिका टाकल्या आणि एका साक्षीदाराने आपल्या व्हीलचेअरवर बसून रेल्वेस्थानकाबाहेर येणाऱ्‍या-जाणाऱ्‍यांना पत्रिका दिल्या. तसेच, पूर्वी अक्रियाशील झालेल्या बऱ्‍याच साक्षीदारांनी देखील या खास कार्यात सहभाग घेतल्याचे पाहून खूप प्रोत्साहन मिळाले!

सदर पत्रिकेच्या वाटपामुळे फार मोठ्या प्रमाणात साक्ष देण्यात आली यात शंका नाही. सर्व प्रकारच्या लोकांना, ज्यांपैकी कित्येकांना साक्षीदार त्यांच्या घरी भेटू शकले नव्हते त्यांना देखील पत्रिकेची प्रत मिळाली. हे कार्य केवळ साक्षीदारांच्याच हितांच्या संरक्षणार्थ नव्हते असे कित्येक जणांनी मत व्यक्‍त केले. बऱ्‍याच जणांच्या दृष्टीने हे सर्व फ्रेंच नागरिकांच्या विवेकबुद्धीच्या व धार्मिक स्वातंत्र्याच्या संरक्षणार्थ होते. याचा पुरावा म्हणजे कित्येक लोकांनी आपल्या मित्रांना, सहकाऱ्‍यांना किंवा नातेवाईकांना देण्याकरता जादा प्रती मागितल्या.

होय, फ्रान्समधील यहोवाच्या साक्षीदारांना यहोवाच्या नावाची घोषणा करण्यास व राज्य हितांचे संरक्षण करण्यास गर्व वाटतो. (१ पेत्र ३:१५) ते प्रामाणिकपणे आशा बाळगतात की त्यांना ‘सुभक्‍तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करणे’ शक्य होईल आणि आणखी हजारो लोक त्यांचा स्वर्गीय पिता, यहोवा याची स्तुती करण्याकरता त्यांच्यात सामील होतील.—१ तीमथ्य २:२.

[तळटीप]

^ याच प्रकारची एक मोहीम जानेवारी १९९९ मध्येही राबवण्यात आली होती; या मोहिमेचा उद्देश धार्मिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा होता. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या ऑगस्ट १, १९९९ अंकातील पृष्ठ ९ व २००० यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिकपुस्तक, (इंग्रजी) पृष्ठे २४-६ पाहा.