व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा”

“शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा”

“शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा”

“शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.”—रोमकर १२:१८.

१, २. मनुष्याने आणलेली शांती फार काळ का टिकू शकत नाही?

 अशा एखाद्या घराची कल्पना करा ज्याचा पाया कच्चा आहे, तुळया कुजलेल्या आहेत आणि छत देखील पडण्याच्या बेतात आहे. अशा घरात राहायला जाण्याचा तुम्ही विचार कराल का? कदाचित नाही. या घराची रंगरंगोटी केली तरीसुद्धा परिस्थिती सुधारणार नाही कारण मुळातच हे घर पक्के नाही. आज न उद्या ते पडणार हे निश्‍चित.

आजच्या या जगात मिळणारी शांती त्या घरासारखीच आहे. तिचा पायाच मुळात कच्चा आहे, कारण “ज्याच्याठायी काही तारण नाही” अशा मनुष्याच्या आश्‍वासनांच्या आणि योजनांच्या आधारावर ती उभी आहे. (स्तोत्र १४६:३, पं.र.भा.) इतिहास म्हणजे वेगवेगळ्या राष्ट्रांतील व जातीजमातींतील संघर्षाची एक लांबलचक यादी आहे. अधूनमधून शांतीचे काळ आले हे खरे आहे, पण ही कशाप्रकारची शांती होती? दोन देशांत युद्ध चालले असताना, एक देश पराजित झाल्यास किंवा युद्ध सुरू ठेवण्यात काही उपयोग नाही याची दोन्ही देशांना जाणीव झाल्यास, युद्धविराम घोषित केला जातो. पण या शांतीला काही अर्थ आहे का? कारण मुळात युद्ध ज्यांमुळे सुरू झाले त्या द्वेषाच्या, अविश्‍वासाच्या आणि हेव्यादाव्याच्या भावना तशाच राहतात. ती शांती म्हणजे केवळ शत्रुत्व लपवण्यासाठी केलेली वरवरची ‘रंगरंगोटी’ असते. अशी शांती फार काळ टिकत नाही.—यहेज्केल १३:१०.

३. देवाच्या लोकांमध्ये असलेली शांती मनुष्यांकडून मिळणाऱ्‍या शांतीपेक्षा वेगळी का आहे?

पण या अशांत जगातही खरी शांती आहे. कोठे? येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून त्याच्या शिकवणुकींनुसार वागण्याचा आणि त्याच्या आदर्शाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये. (१ करिंथकर ११:१; १ पेत्र २:२१) खऱ्‍या ख्रिश्‍चनांमधील वेगवेगळ्या जातीय, सामाजिक आणि राष्ट्रीय पार्श्‍वभूमीच्या सदस्यांमध्ये असलेली ही शांती खरी आहे कारण ती देवासोबत असलेल्या त्यांच्या शांतीपूर्ण संबंधातून उत्पन्‍न होते आणि ती येशू ख्रिस्ताच्या खंडणी अर्पणावरील त्यांच्या विश्‍वासावर आधारित आहे. त्यांच्यामध्ये असलेली ही शांती मनुष्यांनी नव्हे तर देवाने प्रदान केलेली आहे. (रोमकर १५:३३; इफिसकर ६:२३, २४) “शांतीचा अधिपति” येशू ख्रिस्त याच्या अधीन झाल्यामुळे आणि “प्रीतीचा व शांतीचा देव” यहोवा याची उपासना करत असल्यामुळे ही शांती प्राप्त होते.—यशया ९:६; २ करिंथकर १३:११.

४. ख्रिस्ती व्यक्‍ती कशाप्रकारे शांतीचा ‘मार्ग धरू शकते?’

शांतीने राहणे अपरिपूर्ण मनुष्यांना आपोआप शक्य होत नाही. म्हणूनच पेत्राने असे म्हटले की प्रत्येक ख्रिश्‍चनाने “शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.” (१ पेत्र ३:११) पण हे आपण कसे करू शकतो? एका प्राचीन भविष्यवाणीत आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर सापडते. यशयाच्याद्वारे यहोवाने म्हटले: “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांति प्राप्त होईल.” (यशया ५४:१३; फिलिप्पैकर ४:९) होय, जे यहोवाच्या शिकवणुकींकडे लक्ष देतात त्यांना खरी शांती प्राप्त होते. शिवाय, “प्रीति, आनंद, . . . सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” यांसोबत देवाच्या आत्म्याच्या फळात शांतीचा देखील समावेश आहे. (गलतीकर ५:२२, २३) पण निष्ठुर, चिडखोर, उतावीळ, निर्दयी, दुष्ट, अविश्‍वासू, हिंसक किंवा असंयमी व्यक्‍तीला ही शांती प्राप्त होऊ शकत नाही.

‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहा’

५, ६. (अ) शांतीपूर्ण असणे आणि शांती प्रस्थापित करणे यात काय फरक आहे? (ब) कोणाबरोबर शांती प्रस्थापित करण्याचा ख्रिस्ती लोक प्रयत्न करतात?

शांतीची व्याख्या, स्थिरता किंवा निःस्तब्धतेची स्थिती याप्रकारे करण्यात आली आहे. ही व्याख्या बऱ्‍याच संघर्षविरहीत परिस्थितींना लागू होते. मृत व्यक्‍तीलाही शांती मिळाली आहे असे म्हणतात! पण खऱ्‍या शांतीचा अनुभव घेण्यासाठी केवळ शांतताप्रिय असणे पुरेसे नाही. डोंगरावरील प्रवचनात येशूने म्हटले: “शांती प्रस्थापित करणारे ते धन्य कारण त्यांना देवाचे पुत्र म्हणण्यात येईल.” (मत्तय ५:९, सुबोध भाषांतर) येशू अशा व्यक्‍तींबद्दल बोलत होता, ज्यांना देवाचे [आध्यात्मिक] पुत्र होऊन स्वर्गात अमर जीवन प्राप्त करण्याची संधी मिळणार होती. (योहान १:१२; रोमकर ८:१४-१७) आणि शेवटी, स्वर्गीय आशा नसलेल्या सर्व विश्‍वासू मानवांनासुद्धा “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” मिळेल. (रोमकर ८:२१) केवळ शांती प्रस्थापित करणारेच अशी आशा बाळगू शकतात. शांतिमय (म्हणजे शांत) आणि शांती प्रस्थापित करणारे यांत फरक आहे. बायबलनुसार शांती प्रस्थापित करण्याचा अर्थ शांतीला बढावा देण्याकरता खटपट करणे आणि प्रसंगी, शांती नसलेल्या परिस्थितीत शांती आणणे.

हे लक्षात ठेवून, पौलाने रोमकरांना दिलेला सल्ला विचारात घ्या. “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा [“शांती प्रस्थापित करा,” NW].” (रोमकर १२:१८) पौल रोमकरांना केवळ शांत मनोवृत्ती बाळगण्याचा सल्ला देत नव्हता, अर्थात असे करणेही त्यांना सहायक ठरले असते. तो त्यांना शांती प्रस्थापित करण्याचे उत्तेजन देत होता. कोणाबरोबर? “सर्व माणसांबरोबर.” कौटुंबिक सदस्य, ख्रिस्ती बांधव, इतकेच काय तर जे त्यांचे विश्‍वास मानत नव्हते अशा लोकांचाही यात समावेश होता. त्याने रोमकरांना असा सल्ला दिला की “शक्य तर” इतरांबरोबर शांती प्रस्थापित करा. अर्थात, त्यांनी आपल्या विश्‍वासांसंबंधाने तडजोड करावी अशी पौलाची इच्छा नव्हती. पण इतरांना विनाकारण चिडवण्याऐवजी त्यांनी शांतीपूर्ण उद्देशाने लोकांशी वागावे अशी त्याची इच्छा होती. मंडळीच्या आत व बाहेर कोठेही लोकांशी व्यवहार करताना ख्रिश्‍चनांनी असे करायचे होते. (गलतीकर ६:१०) म्हणूनच पौलाने असे लिहिले: “सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा.”—१ थेस्सलनीकाकर ५:१५.

७, ८. ख्रिस्ती लोक त्यांचे विश्‍वास न मानणाऱ्‍यांसोबतही कशाप्रकारे आणि का शांती प्रस्थापित करतात?

जे आपल्या विश्‍वासात नाहीत आणि जे लोक आपल्या विश्‍वासांचा विरोध करतात अशा लोकांसोबतही आपण शांती कशी प्रस्थापित करू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे, आपण श्रेष्ठ आहोत असे कधीही भासवू नये. उदाहरणार्थ, विशिष्ट लोकांविषयी अपमानास्पद रितीने बोलणे शांती प्रस्थापित करण्याच्या अगदी विरोधात ठरेल. यहोवाने जगातल्या संस्थांविरुद्ध आणि वेगवेगळ्या वर्गाच्या लोकांविरुद्ध आपले न्यायदंड घोषित केले आहेत, पण एखादी व्यक्‍ती जणू या न्यायदंडास पात्र आहे अशाप्रकारे बोलण्याचा आपल्याला मुळीच हक्क नाही. न्याय करणारे आपण नाही; आपल्या विरोधकांचाही न्याय आपण करत नाही. पौलाने तीताला क्रेत येथील ख्रिश्‍चनांना मानवी अधिकाऱ्‍यांशी त्यांच्या व्यवहारांसंबंधी मार्गदर्शन करण्यास व त्यांना अशी आठवण करून देण्यास सांगितले, की “कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे.”—तीत ३:१, २.

आपले विश्‍वास न मानणाऱ्‍यांसोबत शांती प्रस्थापित केल्यामुळे आपण सत्याविषयी त्यांचे अनुकूल मत होण्याच्या दिशेने हातभार लावतो. अर्थात ज्यांच्या संगतीमुळे “नीती बिघडते” अशा लोकांशी आपण मैत्री करू नये. (१ करिंथकर १५:३३) पण आपण आदरशील असले पाहिजे आणि सर्व माणसांचा मान राखून त्यांच्याशी माणुसकीने वागले पाहिजे. पेत्राने लिहिले: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्‍यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हांविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.”—१ पेत्र २:१२.

सेवाकार्यात शांती प्रस्थापित करणे

९, १०. अविश्‍वासी लोकांसोबत शांतीने वागण्यासंबंधी प्रेषित पौलाने कशाप्रकारे आपल्याकरता आदर्श मांडला?

पहिल्या शतकातील ख्रिस्ती निर्भय होते आणि ही गोष्ट सर्वज्ञात होती. त्यांनी केव्हाही आपल्या संदेशाची तीव्रता कमी केली नाही आणि त्यांना विरोध करण्यात आला तेव्हा देखील मनुष्यांपेक्षा परमेश्‍वराची आज्ञा मानण्याच्या दृढसंकल्पावर ते कायम राहिले. (प्रेषितांची कृत्ये ४:२९; ५:२९) पण निर्भय असण्याचा अर्थ लोकांशी उद्धटपणे वागणे असा त्यांनी कधीही घेतला नाही. पौलाने राजा हेरोद अग्रिप्पा दुसरा याच्यापुढे आपल्या विश्‍वासाचे समर्थन करताना कशी भूमिका घेतली हे लक्षात घ्या. हेरोद अग्रिप्पा याचे बर्निस या आपल्या बहिणीसोबत अगम्यगमनी संबंध होते. पण पौलाने अग्रिप्पाला नैतिकतेविषयी भाषण देण्यास सुरवात केली नाही. उलट त्याने अशा मुद्द्‌यांवर जोर दिला ज्यावर त्या दोघांचेही एकमत होते, तसेच त्याने यहुदी चालीरितींत विशेष जाणता असल्याबद्दल व संदेष्ट्यांवर विश्‍वास असल्याबद्दल अग्रिप्पाला श्रेय दिले.—प्रेषितांची कृत्ये २६:२, ३, २७.

१० अग्रिप्पा आपल्याला कैदेतून सुटका देऊ शकतो हे ओळखून पौल त्याची फाजील तारीफ करत होता का? नाही. पौल स्वतःच्याच सल्ल्याप्रमाणे सत्याला धरून बोलत होता. तो हेरोद अग्रिप्पाला जे बोलला त्यात असत्य असे काहीच नव्हते. (इफिसकर ४:१५) पण पौल शांती प्रस्थापित करू इच्छित होता आणि “सर्वांना सर्व काही” कसे व्हावे हे त्याला माहीत होते. (१ करिंथकर ९:२२) येशूविषयी प्रचार करण्याच्या आपल्या हक्काचे समर्थन करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. एका चांगल्या शिक्षकाप्रमाणे त्याने अशा मुद्द्‌याने सुरवात केली ज्यावर त्या दोघांचेही एकमत होऊ शकत होते. अशारितीने पौलाने त्या अनैतिक राजाला ख्रिस्ती धर्माविषयी पूर्वीपेक्षा चांगले मत बाळगण्यास मदत केली.—प्रेषितांची कृत्ये २६:२८-३१.

११. आपण सेवाकार्यात शांती कशाप्रकारे प्रस्थापित करू शकतो?

११ आपण आपल्या सेवाकार्यात कशाप्रकारे शांती प्रस्थापित करू शकतो? पौलाप्रमाणेच आपणही लोकांशी वाद करू नये. अर्थात, कधीकधी ‘देवाचे वचन निर्भयपणे सांगणे,’ आपल्या विश्‍वासाचे निर्भयपणे समर्थन करणे आवश्‍यक असते. (फिलिप्पैकर १:१४) पण सहसा आपला मुख्य उद्देश सुवार्तेची घोषणा करण्याचा असतो. (मत्तय २४:१४) देवाच्या उद्देशांविषयी आपण जे सांगतो त्यात सत्य आहे हे एखाद्या व्यक्‍तीला दिसल्यास ती व्यक्‍ती आपल्या खोट्या धार्मिक कल्पनांचा त्याग करून अशुद्ध चालीरितींपासून स्वतःला शुद्ध करण्यास सुरवात करू शकते. म्हणूनच शक्य तोवर आपला संदेश ऐकणाऱ्‍यांना कोणत्या गोष्टी ऐकण्यास आवडतील हे ओळखून त्यांवर जोर देणे आणि ज्या गोष्टींवर आपले त्यांच्यासोबत एकमत आहे त्यांनीच सुरवात करणे चांगले ठरेल. कारण एखाद्या व्यक्‍तीला चिडवल्यास उलट परिणाम होण्याची शक्यता आहे, पण जर आपण व्यवहारचातुर्याने बोललो तर तीच व्यक्‍ती कदाचित आपला संदेश शांतपणे ऐकून घेईल.—२ करिंथकर ६:३.

कुटुंबात शांती प्रस्थापित करणे

१२. आपण कुटुंबात कशाप्रकारे शांती प्रस्थापित करू शकतो?

१२ पौलाने म्हटले होते की जे विवाह करतात त्यांना “संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील.” (१ करिंथकर ७:२८) त्यांच्यासमोर अनेक समस्या येतील. यांपैकी एक म्हणजे, काही पतीपत्नींत वारंवार होणारे मतभेद. हे मतभेद कशाप्रकारे सोडवले जावेत? शांती प्रस्थापित होईल अशाच मार्गाने. शांती प्रस्थापित करू इच्छिणारी व्यक्‍ती, वाद चिघळू नये म्हणून जास्तीतजास्त प्रयत्न करते. हे कसे करता येते? सर्वात आधी, जिभेचा सांभाळून उपयोग करण्याद्वारे. टोमणे मारण्याकरता किंवा अपमानास्पद रितीने बोलण्याकरता जेव्हा जिभेचा वापर केला जातो तेव्हा आपल्या शरीरातले हे लहानसे अंग ‘शांतिरहित, दुष्ट आणि प्राणघातक विषाने भरलेले’ असे सिद्ध होईल. (याकोब ३:८) शांती प्रस्थापित करणारा आपल्या जिभेचा वापर इतरांच्या भावनांच्या चिंध्या करण्यासाठी नव्हे तर उत्तेजन मिळेल अशाप्रकारेच करतो.—नीतिसूत्रे १२:१८.

१३, १४. आपल्या तोंडून चुकीचे काहीतरी निघून जाते किंवा भावना उत्तेजित होतात तेव्हा आपण शांती कशाप्रकारे प्रस्थापित करू शकतो?

१३ अपरिपूर्ण असल्यामुळे कधी न कधी आपल्या सर्वांच्याच तोंडून असे काहीतरी निघून जाते ज्याचा नंतर आपल्याला पस्तावा होतो. पण असे घडल्यास, आपण लवकरात लवकर दिलगिरी व्यक्‍त करून, शांती प्रस्थापित केली पाहिजे. (नीतिसूत्रे १९:११; कलस्सैकर ३:१३) “शब्दयुद्ध” आणि “एकसारखी [“क्षुल्लक गोष्टींविषयी” NW] भांडणे” आवर्जून टाळा. (१ तीमथ्य ६:४, ५) उलट, वरवर जे दिसते त्यापेक्षा खोलवर जाऊन विचार करा आणि तुमच्या पतीच्या किंवा पत्नीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्याशी कठोर शब्दांत बोलले जाते तेव्हा तुम्हीही तशाचप्रकारे उत्तर देऊ नका. “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते,” हे आठवणीत असू द्या.—नीतिसूत्रे १५:१.

१४ कधीकधी तुम्हाला नीतिसूत्रे १७:१४ येथे दिलेला सल्ला विचारात घ्यावा लागेल: “भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी [“निघून जावे,” NW].” स्फोटक परिस्थितीतून काढता पाय घ्या. नंतर भावना थंड झाल्यावर कदाचित तुम्हाला शांतचित्ताने समस्या सोडवता येईल. काही वेळा एखाद्या प्रौढ ख्रिस्ती वडिलांची मदत घेणे उपयोगी ठरेल. वैवाहिक संबंधांतील शांती भंग होण्याची भीती असते तेव्हा हे अनुभवी आणि सहानुभूतिशील बांधव सांत्वन व मदत देऊ शकतात.—यशया ३२:१, २.

मंडळीत शांती प्रस्थापित करणारे

१५. याकोबानुसार, काही ख्रिश्‍चनांमध्ये कोणती वाईट मनोवृत्ती होती आणि ती “ऐहिक, पाशवी, पैशाच्चिक” का होती?

१५ दुःखाने म्हणावे लागते, की पहिल्या शतकातील काही ख्रिस्ती लोक तीव्र मत्सर आणि तट पाडण्याच्या स्वभावाने वागले; हे शांतीच्या अगदी विरोधात होते. याकोबाने म्हटले: “हे ज्ञान वरून उतरत नाही; तर ते ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडले [“पाशवी, पैशाच्चिक,” NW] आहे. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.” (याकोब ३:१४-१६) काहींचे असे म्हणणे आहे की “तट पाडण्याचा स्वभाव” असे भाषांतर केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा संबंध स्वार्थी महत्त्वाकांक्षा आणि विशिष्ट पदवी मिळवण्यासाठी डावपेच खेळण्याच्या स्वभावाशी आहे. म्हणूनच याकोब याला “ऐहिक, पाशवी, पैशाच्चिक” म्हणतो. सबंध मानव इतिहासात जगिक शासकांनी तट पाडण्याच्या स्वभावाने एकमेकांशी जंगली पशूंप्रमाणे लढाया केल्या. तट पाडण्याचा स्वभाव खरोखरच “ऐहिक” आणि “पाशवी” आहे. आणि तो “पैशाच्चिक” देखील आहे. सत्तेसाठी हपापलेल्या एका देवदूताने सर्वप्रथम ही कपटी वृत्ती दाखवली होती; हा देवदूत यहोवा देवाच्या विरोधात उभा राहिला व नंतर तो सर्व पिशाच्चांचा सरदार सैतान बनला.

१६. पहिल्या शतकातील काहींनी कशाप्रकारे सैतानासारखी मनोवृत्ती दाखवली?

१६ याकोबाने ख्रिश्‍चनांना तट पाडण्याच्या वृत्तीचा प्रतिकार करण्याचे प्रोत्साहन दिले कारण ही वृत्ती शांती प्रस्थापित करण्यात बाधा बनते. त्याने लिहिले: “तुम्हांमध्ये लढाया व भांडणे कशांतून उत्पन्‍न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करितात त्यांतून की नाही?” (याकोब ४:१) या वचनात उल्लेख केलेल्या “वासना” भौतिक वस्तूंची हाव किंवा अभिलाषा किंवा प्रामुख्य, अधिकार किंवा प्रतिष्ठा मिळण्याची उत्कट इच्छा असू शकते. येशूने म्हटले होते की त्याचे खरे अनुयायी स्वतःला “कनिष्ठ” समजतील पण सैतानाप्रमाणेच ख्रिस्ती मंडळ्यांमधील काहींना सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याची इच्छा होती. (लूक ९:४८) अशी ही वृत्ती मंडळीतील शांती भंग करू शकते.

१७. खिस्ती आज मंडळीत शांती कशी प्रस्थापित करू शकतात?

१७ आज आपण देखील भौतिकवादी, मत्सरी किंवा गर्विष्ठ महत्त्वाकांक्षा बाळगण्याच्या वृत्तीचा प्रतिकार केला पाहिजे. आपण खऱ्‍या अर्थाने शांती प्रस्थापित करणारे असल्यास, मंडळीतील कोणी विशिष्ट गोष्टींमध्ये आपल्यापेक्षा निपुण आहे हे पाहून आपण अस्वस्थ होणार नाही; किंवा त्यांच्या हेतूंविषयी शंका घेऊन आपण इतरांपुढे त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणार नाही. आपल्याकडे काही खास गुण किंवा कौशल्य असल्यास आपण त्याचा उपयोग, इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी करणार नाही; अर्थात, आपल्या कौशल्यामुळे किंवा बुद्धीमुळेच मंडळीची प्रगती होईल असे सुचवण्याचा आपण प्रयत्न करणार नाही. अशी वृत्ती शांती आणण्यास नव्हे तर फूट पाडण्यास कारणीभूत ठरेल. शांती प्रस्थापित करणारे आपल्या कौशल्यांचा टेंभा मिरवण्याऐवजी त्यांचा उपयोग आपल्या बांधवांची सेवा करण्यासाठी आणि यहोवाला गौरव आणण्यासाठी करतात. त्यांना जाणीव आहे की शेवटी काही झाले तरी एका खऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीची ओळख त्याच्या कौशल्यामुळे नव्हे तर त्याच्याठायी असलेल्या प्रीतीमुळे होते.—योहान १३:३५; १ करिंथकर १३:१-३.

“तुजवर शांति सत्ता चालवील”

१८. मंडळीतील वडील आपसांत शांती टिकवून ठेवण्याकरता काय करतात?

१८ मंडळीतील वडील शांती प्रस्थापित करण्यात पुढाकार घेतात. यहोवाने आपल्या लोकांविषयी असे भाकीत केले: “तुजवर शांति सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.” (यशया ६०:१७) या भविष्यसूचक शब्दांच्या अनुषंगाने ख्रिस्ती मेंढपाळ आपसांत आणि कळपामध्ये शांतीला बढावा देण्याकरता झटतात. शांती प्रस्थापित करणाऱ्‍या आणि सौम्य अशा ‘वरून येणाऱ्‍या ज्ञानानुसार’ वागण्याद्वारे मंडळीतील वडील आपसांत शांती टिकवून ठेवतात. (याकोब ३:१७) त्या सर्वांची पार्श्‍वभूमी व जीवनात आलेले अनुभव वेगवेगळे असल्यामुळे कधीकधी विशिष्ट गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. पण याचा अर्थ त्यांच्यातील शांती भंग झाली असा होतो का? ही परिस्थिती योग्यप्रकारे हाताळल्यास असे घडणार नाही. शांती प्रस्थापित करणारे विनयशीलपणे आपले विचार मांडतात आणि मग आदरपूर्वक इतरांचेही विचार ऐकून घेतात. स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे सर्व घडावे असा अट्टहास करण्याऐवजी शांती प्रस्थापित करणारा आपल्या बांधवाच्या दृष्टिकोनावर प्रार्थनापूर्वक विचार करेल. जर बायबलच्या कोणत्या तत्त्वाचे उल्लंघन होत नसेल तर मग वेगवेगळ्या दृष्टिकोनांनुसार कार्य करण्यास हरकत नाही. इतरजण आपल्या दृष्टिकोनाशी सहमत नसल्यास, शांती प्रस्थापित करू इच्छिणारा बहुतेकांचा निर्णय मान्य करून त्यास पाठिंबा देतो. अशारितीने आपण सौम्य वृत्तीचे आहोत हे तो दाखवून देतो. (१ तीमथ्य ३:२, ३) अनुभवी देखरेख्यांना जाणीव असते की स्वतःच्या मताप्रमाणे काही घडवून आणण्यापेक्षा शांती टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.

१९. वडील मंडळीत कशाप्रकारे शांती प्रस्थापित करतात?

१९ वडील कळपातील सदस्यांमध्येही शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते कळपातील सदस्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नांची अनावश्‍यक टीका करत नाहीत. कधीकधी काहींच्या चुका सुधारण्याची गरज पडते हे कबूल आहे. (गलतीकर ६:१) पण ख्रिस्ती देखरेख्याची प्रमुख जबाबदारी चुका सुधारण्याची नाही. तो सहसा बांधवांची प्रशंसा करतो. प्रेमळ वडील इतरांचे चांगले गुण पाहण्याचा प्रयत्न करतात. देखरेखे आपल्या सहविश्‍वासू बांधवांच्या मेहनतीची कदर करतात आणि हे बांधव आपल्यापरीने होईल तितक्या चांगल्याप्रकारे सेवा करत आहेत असा भरवसा ते बाळगतात.—२ करिंथकर २:३, ४.

२०. सर्वजण शांती प्रस्थापित करणारे असल्यास मंडळीला कशाप्रकारे फायदा होईल?

२० अशारितीने, कुटुंबात, मंडळीत आणि जे आपले विश्‍वास मानत नाहीत अशा लोकांशी व्यवहार करताना आपण शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी झटतो. असे केल्यामुळे आपण मंडळीच्या आनंदात भर घालतो. त्याचप्रकारे, असे केल्यामुळे बऱ्‍याच मार्गांनी आपले संरक्षण होईल आणि आपल्याला उत्तेजन मिळेल. कसे ते पुढच्या लेखात पाहूया.

तुम्हाला आठवते का?

• शांती प्रस्थापित करण्याचा काय अर्थ होतो?

• गैर-साक्षीदारांशी व्यवहार करताना आपण शांती कशाप्रकारे प्रस्थापित करू शकतो?

• कुटुंबात शांती प्रस्थापित करण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

• वडील मंडळीत शांती कशाप्रकारे प्रस्थापित करू शकतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

शांती प्रस्थापित करणारे स्वतःला श्रेष्ठ समजत नाहीत

[१० पानांवरील चित्रे]

ख्रिस्ती आपल्या सेवाकार्यात, कुटुंबात आणि मंडळीत शांती प्रस्थापित करतात