व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अधिवेशने—आपल्या बंधुत्वाचा पुरावा देणारे आनंदी मेळावे

अधिवेशने—आपल्या बंधुत्वाचा पुरावा देणारे आनंदी मेळावे

संपूर्ण आणि दृढनिश्‍चयी असे स्थिर राहा

अधिवेशने—आपल्या बंधुत्वाचा पुरावा देणारे आनंदी मेळावे

पन्‍नास वर्षांचे जोसेफ एफ. रदरफोर्ड, तुरुंगात जवळजवळ एक वर्षाची अन्यायी शिक्षा भोगून सुटले होते; दुर्बल अवस्थेतही ते अगदी आनंदाने बेलहॉपचे काम करत आहेत. आपल्या सह-ख्रिश्‍चनांच्या सूटकेसेस उचलून हॉटेलमधील प्रत्येकाच्या खोल्यांपर्यंत ते उत्साहाने पोहंचवत आहेत. त्यांच्यासोबत तुरुंगात असलेले दोघेजण—सह-बायबल विद्यार्थी—एका मोठ्या जमावाला खोल्या देण्याचे काम करत आहेत. मध्यरात्रीपर्यंत पळापळ होत राहते. सगळेच जण उत्साहाच्या भरात आहेत. हा कोणता प्रसंग आहे?

वर्ष आहे १९१९; बायबल विद्यार्थी (आज यहोवाचे साक्षीदार या नावाने ओळखले जाणारे) क्रूर छळातून सावरत आहेत. आपल्या बंधूवर्गाचा उत्साह पुनरुज्जीवित करण्यासाठी ते अमेरिकेच्या ओहायो, सिडर पॉईंट येथे १९१९ साली सप्टेंबर १ पासून ८ पर्यंत एक अधिवेशन भरवत आहेत. अधिवेशनाच्या शेवटल्या दिवशी, ७,००० आवेशी प्रेक्षकांनी बंधू रदरफोर्ड यांचे भाषण लक्ष देऊन ऐकले; त्यांनी अधिवेशनाला हजर असलेल्या प्रत्येकाला या शब्दांत प्रोत्साहन दिले: “तुम्ही राजांचा राजा व प्रभुंचा प्रभू याचे राजदूत असून लोकांना . . . आपल्या प्रभूच्या वैभवशाली राज्याची घोषणा करत आहात.”

यहोवाच्या लोकांमध्ये, प्राचीन इस्राएलपासून अधिवेशने भरवली गेली आहेत. (निर्गम २३:१४-१७; लूक २:४१-४३) हे मेळावे आनंदाचे प्रसंग होते आणि उपस्थित असलेल्या सर्वांना देवाच्या वचनावर आपले मन केंद्रित करण्यास मदत करत होते. त्याचप्रमाणे, आधुनिक काळातील यहोवाच्या साक्षीदारांमधील अधिवेशने आध्यात्मिक गोष्टींवर केंद्रित असतात. या आनंदी मेळाव्यांना पाहून प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना निश्‍चित खात्री पटते की, साक्षीदारांमध्ये ख्रिस्ती बंधुत्वाचे दृढ बंधन आहे.

उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न

आधुनिक ख्रिश्‍चनांना हे कळते की, त्यांची अधिवेशने म्हणजे आध्यात्मिक तजेला आणि देवाच्या वचनाबद्दल शिक्षण देणारे प्रसंग आहेत. ते मानतात की, हे मोठे मेळावे त्यांना, ‘देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार परिपूर्ण व दृढनिश्‍चयी असे स्थिर राहण्यास’ मदत करण्यासाठी आवश्‍यक आहेत. (कलस्सैकर ४:१२) यास्तव, साक्षीदार या मेळाव्यांना मनःपूर्वक पाठिंबा देतात आणि त्यांना उपस्थित राहण्यासाठी धडपड करतात.

काहींना, केवळ या अधिवेशनांना उपस्थित राहण्यासाठी विश्‍वास प्रदर्शित करावा लागतो आणि पर्वतासमान अडखळणांवर मात करावी लागते. ऑस्ट्रियातील एका वृद्ध साक्षीदार बहिणीचे उदाहरण पाहा. तिला मधुमेह आहे आणि त्यासाठी दररोज तिला इंसुलिनची इंजेक्शने घ्यावी लागतात; तरीपण तिच्या देशातील प्रांतीय अधिवेशनाच्या सर्व दिवसांना ती आर्वजून उपस्थित राहिली. भारतामध्ये, एक मोठे साक्षीदार कुटुंब होते; गरिबीमुळे त्यांना अधिवेशनाला जाणे अगदी अशक्य होते. पण त्या कुटुंबातल्या एका सदस्येने मदत केली. ती म्हणते, “मला हे अधिवेशन चुकवायचं नव्हतं म्हणून मी माझ्या सोन्याचं कानातलं विकून टाकलं. पण हा त्याग खरोखर सार्थ ठरला कारण तिथं मिळालेला सहवास आणि वेगळे अनुभव ऐकून आमचा विश्‍वास आणखी दृढ झाला.”

पापुआ न्यू गिनीत, बाप्तिस्मा न घेतलेल्या आस्थेवाईक लोकांच्या एका गटाने त्या देशाच्या राजधानीत प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहायचा निर्धार केला होता. त्यांच्या गावामध्ये एका मनुष्याकडे सार्वजनिक गाडी होती; त्याच्याकडे जाऊन त्यांनी अधिवेशनाला जायला किती खर्च लागेल असे विचारले. त्याने सांगितलेला खर्च देण्याची त्यांची ऐपत नसल्यामुळे ते त्या व्यक्‍तीच्या स्वयंपाकघरामध्ये काही बांधकाम करून द्यायला तयार झाले. अशाप्रकारे, ते प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहू शकले आणि संपूर्ण कार्यक्रमापासून लाभ मिळवू शकले.

अधिवेशनांना उपस्थित राहण्याची इच्छा असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांकरता अंतर ही अशक्यप्राय समस्या नाही. १९७८ साली, फ्रान्समधील लिल येथील अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी एक तरुण पोलंडहून सहा दिवस सायकलीवरून १,२०० किलोमीटरचा प्रवास करून आला. १९९७ च्या उन्हाळ्यात, मंगोलियातील दोन साक्षीदारांनी रशियातील इर्कुत्स्क येथे एका ख्रिस्ती मेळाव्याला येण्यासाठी १,२०० किलोमीटर प्रवास केला.

खऱ्‍या बंधुत्वाचा पुरावा

अधिवेशनात साक्षीदारांमधील ऐक्य आणि बंधुत्व, पूर्वग्रह न बाळगणाऱ्‍यांच्या चटकन लक्षात येते. अधिवेशनाला आलेल्या लोकांमध्ये पक्षपात नाही, आणि अगदी पहिल्याच वेळी भेटत असलेल्या लोकांमध्येही खरे प्रेम आहे हे पाहून पुष्कळजण प्रभावित झाले आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये अलीकडे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनादरम्यान, पर्यटन करणाऱ्‍या अधिवेशन प्रतिनिधींसोबत एक आठवडा राहिलेल्या एका टूर गाईडने म्हटले की, त्याला त्यांचा सहवास खूप आवडला आणि म्हणून त्याला त्यांच्यासोबत आणखी काही दिवस घालवावेसे वाटतात. त्यांच्यातले प्रेम आणि ऐक्य पाहून तो खूप प्रभावित झाला; अनोळखी व्यक्‍ती असूनही ते इतके मिळून मिसळून राहतात यावर त्याचा विश्‍वासच बसेना. त्याची जाण्याची वेळ आली तेव्हा त्याने त्या सर्वांना बोलवले, त्यांना “बंधू-बहिणी” असे उद्देशून तो त्यांचे आभार मानू लागला पण त्याला इतके गहिवरून आले की पुढे काही बोलताच येईना आणि तो चक्क रडू लागला.

१९९७ साली, श्रीलंकेत प्रथमच एका मोठ्या स्टेडियममध्ये तीन भाषांमध्ये प्रांतीय अधिवेशन भरवण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम एकाच वेळी इंग्रजी, सिन्हाली आणि तामीळ या भाषांमध्ये सादर करण्यात आला. जातीय भेदभाव वाढत असलेल्या ठिकाणी, तीन भाषांच्या लोकांनी अशाप्रकारे एकत्र जमणे हे लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. एका पोलिसाने एका बांधवाला विचारले: “हे अधिवेशन नेमकं कोण चालवतंय, सिन्हाली, तामीळ की इंग्रजी बोलणारे?” “कोणताही एक गट नाही. आम्ही सगळे मिळून हे चालवतोय,” असे त्या बांधवाने उत्तर दिले. पोलिसाला हे ऐकून विश्‍वास बसेना. तिन्ही भाषेच्या लोकांनी शेवटची प्रार्थना केल्यावर एकाच वेळी “आमेन” म्हटले तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरवात केली. प्रेक्षकांमध्ये असा एकही नव्हता ज्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू नव्हते. खरोखर, अधिवेशनांमध्ये आपल्या आनंददायक बंधुत्वाचा प्रत्यय येतो.—स्तोत्र १३३:१. *

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक (इंग्रजी), या पुस्तकाची पृष्ठे ६६-७७, २५४-८२ पाहा.