व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘नीट मार्गाने’ चाल

‘नीट मार्गाने’ चाल

‘नीट मार्गाने’ चाल

यशया संदेष्ट्याने म्हटले, “धार्मिकांविषयी म्हणा की त्याचे कल्याण होणार; कारण ते आपल्या कृत्यांचे फळ उपभोगणार.” यशया असेही म्हणाला: “धार्मिकाचा मार्ग नीट आहे.” (यशया ३:१०; २६:७) स्पष्टतः, आपल्या कृत्यांचे चांगले फळ मिळवायचे असल्यास, आपण देवाच्या नजरेत जे योग्य ते केले पाहिजे.

परंतु, आपण नीट मार्गाने कसे चालू शकतो? असे केल्याने कोणते आशीर्वाद आपल्याला मिळतील? आणि देवाच्या धार्मिक दर्जांचे आपण पालन केल्यास इतरांना कसा फायदा होईल? बायबलमधील नीतिसूत्रे या पुस्तकाच्या १० व्या अध्यायात, प्राचीन इस्राएलचा राजा शलमोन, धार्मिक आणि दुष्ट यांच्यातील भेद दाखवताना या प्रश्‍नांची उत्तरे देतो. त्यात त्याने ‘धार्मिक’ या शब्दाचा १३ वेळा वापर केला आहे. यांतील नऊ उल्लेख १५ ते ३२ वचनांमध्ये आढळतात. म्हणून, नीतिसूत्रे १०:१५-३२ या वचनांवर विचार केल्यास आपल्याला प्रोत्साहन मिळेल. *

बोध स्वीकारा

धार्मिकतेचे महत्त्व काय ते शलमोन दाखवतो. तो म्हणतो: “धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय, परंतु गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्‌यांत आहे. धार्मिकाचा उद्योग जीवनप्रद आहे. दुर्जनाची समृद्धि पापाला कारण होते.”—नीतिसूत्रे १०:१५, १६.

तटबंदीच्या नगरातील रहिवाशांना काही प्रमाणात सुरक्षा मिळते त्याचप्रमाणे जीवनातल्या काही अनिश्‍चित क्षणी धन सुरक्षा देऊ शकते. आणि अनपेक्षित प्रसंग ओढवतात तेव्हा गरिबी नाशकारक ठरू शकते. (उपदेशक ७:१२) परंतु, सुज्ञ राजा, धनिकपणा आणि गरिबी या दोघांमुळे निर्माण होणाऱ्‍या धोक्याबद्दल सुचवत असावा. धनवान मनुष्य असा विचार करील की, त्याचे धन “उंच तटासारखे” आहे आणि म्हणून तो त्यावर पूर्ण भरवसा ठेवत असेल. (नीतिसूत्रे १८:११) आणि कदाचित गरीब मनुष्याचा असा गैरसमज असेल की, गरिबीमुळे त्याचे भविष्य निरर्थक आहे. अशातऱ्‍हेने, ते दोघेही देवाच्या नजरेत चांगले नाव कमावण्यास उणे पडतील.

दुसऱ्‍या बाजूला पाहता, धार्मिक मनुष्य धनवान असला किंवा नसला तरी त्याचा सरळ मार्ग जीवन देतो. कशाप्रकारे? त्याच्याजवळ जे काही असते त्यात तो समाधानी असतो. आपल्या आर्थिक परिस्थितीला तो देवाबरोबरील चांगल्या नातेसंबंधाच्या आड येऊ देत नाही. धार्मिक मनुष्याच्या—मग तो धनवान असो नाहीतर गरीब—मार्गाक्रमणामुळे त्याला सध्या आनंद मिळतो आणि भविष्यासाठी सार्वकालिक जीवनाची आशा मिळते. (ईयोब ४२:१०-१३) दुष्टाला धनप्राप्ती झाली तरीही त्याला काही लाभ होत नाही. धन सुरक्षा देते म्हणून त्याची कदर करून देवाच्या इच्छेनुसार जगण्याऐवजी तो पापी जीवन जगण्यासाठी आपल्या धनाचा उपयोग करतो.

“जो बोध घेतो तो जीवनाच्या मार्गात आहे, आणि जो वाग्दंड नाकारतो तो चुकतो,” असे इस्राएलचा राजा म्हणतो. (नीतिसूत्रे १०:१७, पं.र.भा.) एका बायबल विद्वानानुसार, या वचनाचे दोन अर्थ होऊ शकतात. एक शक्यता अशी आहे की, बोध ऐकून धार्मिकतेचा अवलंब करणारी व्यक्‍ती जीवनाच्या मार्गात राहते, परंतु सल्ला झिडकारणाऱ्‍या व्यक्‍तीचा मार्ग चुकतो. या वचनाचा असाही अर्थ होऊ शकतो की, “बोधाकडे लक्ष देणारा जीवनाचा मार्ग दाखवतो [इतरांना मार्ग दाखवतो कारण त्याच्या चांगल्या उदाहरणाचा त्यांना फायदा होतो] पण वाग्दंड नाकारणारा इतरांना चुकीचे मार्गदर्शन करतो.” (नीतिसूत्रे १०:१७, न्यू इंटरनॅश्‍नल व्हर्शन) दोन्ही बाबतीत, बोध स्वीकारणे आणि वाग्दंडाकडे दुर्लक्ष न करणे किती महत्त्वाचे आहे!

द्वेषाऐवजी प्रेम निर्माण करा

त्यानंतर शलमोन असाच अर्थबोध असलेले दोन भागांचे एक नीतिसूत्र सांगतो; याचा दुसरा भाग पहिल्या भागाला पुष्टी देतो. तो म्हणतो: “गुप्तपणे द्वेष करणाऱ्‍याची वाणी असत्य असते.” एकाला दुसऱ्‍याबद्दल द्वेष असला आणि तो वरवर गोड बोलत असेल किंवा खोटी स्तुती करत असेल तर तो फसवा आहे—त्याची “वाणी असत्य” आहे. पुढे सुज्ञ राजा असे म्हणतो: “चहाडी करणारा मूर्ख असतो.” (नीतिसूत्रे १०:१८) काहीजण आपला द्वेष मनातल्या मनात ठेवण्याऐवजी, संबंधित व्यक्‍तीवर खोटे आरोप लावतात किंवा तिच्याविषयी तुच्छतेने बोलतात. हे मूर्खपणाचे आहे कारण अशाप्रकारे खोटे बोलून एखाद्याचे नाव खराब केल्याने ती व्यक्‍ती बदलत नसते. शिवाय, कोणत्याही शहाण्या व्यक्‍तीला खोट्या भाषणातील मत्सर दिसून येईल आणि वाईट बोलणाऱ्‍याबद्दल तिचा आदर कमी होईल. त्यामुळे, एखाद्याचे नाव खराब करणारी व्यक्‍ती स्वतःचेच नुकसान करून घेते.

फसवेगिरी किंवा चहाडी करून एखाद्याचे नाव खराब न करणे हाच धार्मिक मार्ग आहे. देवाने इस्राएलांना सांगितले: “आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको.” (लेवीय १९:१७) आणि येशूने आपल्या ऐकणाऱ्‍यांना सल्ला दिला: “तुम्ही आपल्या वैऱ्‍यांवर [देखील] प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गांतील पित्याचे पुत्र व्हावे.” (मत्तय ५:४४, ४५) त्यामुळे, आपले मन द्वेषाने भरण्याऐवजी प्रेमाने भरणे किती उत्तम आहे!

‘जीभ ताब्यात ठेवा’

जीभेवर नियंत्रण ठेवण्याच्या गरजेवर जोर देऊन सुज्ञ राजा म्हणतो: “बोलणे जास्त म्हणजे पापाचा संभव; जीभ ताब्यात ठेवणाराच शहाणा.”—नीतिसूत्रे १०:१९, मराठी कॉमन लँग्वेज.

“मूर्ख फार वाचाळपणा करितो.” (उपदेशक १०:१४) त्याच्या मुखातून “मूर्खता बाहेर पडते.” (नीतिसूत्रे १५:२) याचा अर्थ प्रत्येक बडबडी व्यक्‍ती मूर्ख असते असे नाही. पण बडबडी व्यक्‍ती, अगदी सहजपणे चहाडी किंवा अफवा पसरवण्यात सहभागी होऊ शकते! मूर्खतेच्या बोलण्यामुळे एखाद्याचे नाव खराब होऊ शकते, कोणाचे मन दुखावले जाऊ शकते, नातेसंबंध बिघडू शकतात आणि शारीरिक हानी देखील घडू शकते. “पुष्कळ बोलण्यात पापाचा तोटा नाही.” (नीतिसूत्रे १०:१९, पं.र.भा.) शिवाय, प्रत्येक गोष्टीबद्दल आपले मत प्रकट करणाऱ्‍या व्यक्‍तीची सर्वांना चीड येतेच. म्हणून आपण वाचाळ असू नये.

जीभ ताब्यात ठेवणारी व्यक्‍ती फक्‍त खोटेपणा टाळत नाही तर सुज्ञतेने वागते. अशी व्यक्‍ती विचार करून मगच बोलते. यहोवाच्या मार्गांबद्दल प्रेम आणि सह-मानवाला मदत करण्याची मनस्वी इच्छा असल्यामुळे आपल्या शब्दांचा इतरांवर काय प्रभाव पडेल याचा ती विचार करते. ती प्रेमाने आणि नम्रतेने बोलते. आपण जे काही बोलतो ते रुचकर आणि मदतदायी कसे करावे याचा ती विचार करते. तिचे शब्द “रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे” असल्यासारखे प्रत्येक वेळी कुशलतेने बोललेले आदरपूर्वक शब्द असतात.—नीतिसूत्रे २५:११.

‘बहुताचे पोषण करणे’

शलमोन पुढे म्हणतो, “धार्मिकाची जिव्हा उत्कृष्ट रुप्यासारखी आहे; दुर्जनांचे हृदय कवडीमोल आहे.” (नीतिसूत्रे १०:२०) धार्मिक जे काही बोलतात ते निर्मल, उत्कृष्ट, शुद्ध केलेल्या चांदीसारखे गाळरहित असते. यहोवाच्या सेवकांच्या बाबतीत तर हे निश्‍चितच खरे ठरते कारण देवाच्या वचनातील जीवन-रक्षक ज्ञान ते इतरांना देतात. त्यांचा महान शिक्षक, यहोवा देव याने त्यांना शिक्षण दिले आहे आणि ‘शिणलेल्यांस बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून त्यांना सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे.’ (यशया ३०:२०; ५०:४) खरोखर, बायबल सत्याविषयी ते बोलतात तेव्हा त्यांची जीभ उत्कृष्ट चांदीसारखीच आहे. दुष्टाच्या हेतूंपेक्षा त्यांचे शब्द प्रामाणिक लोकांकरता किती मोलवान असतात! देवाचे राज्य आणि देवाची अद्‌भुत कृत्ये यांविषयी इतरांना बोलण्याची आपण उत्सुकता बाळगू या.

धार्मिक मनुष्य त्याच्या भोवतीच्या लोकांकरता आशीर्वादासारखा असतो. शलमोन पुढे म्हणतो, “धार्मिकाची वाणी बहुताचे पोषण करिते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात.”—नीतिसूत्रे १०:२१.

‘धार्मिक बहुताचे पोषण’ कसे करतो? येथे वापरलेल्या इब्री शब्दातून ‘कळपाचे पालन’ करण्याचा अर्थ सूचित होतो. प्राचीन काळातील मेंढपाळ आपल्या मेंढरांची जशी काळजी घ्यायचा त्याप्रमाणे या शब्दातून मार्ग दाखवण्याचा तसेच पोषण करण्याचा अर्थ सुचवला जातो. (१ शमुवेल १६:११; स्तोत्र २३:१-३; गीतरत्न १:७) धार्मिक व्यक्‍ती इतरांना धार्मिकतेचा मार्ग दाखवते आणि तिचे बोलणे ऐकणाऱ्‍यांचे पोषण करते. परिणामतः, त्यांचे जीवन आनंदी, समाधानी होते; त्यांना सार्वकालिक जीवन देखील मिळू शकते.

परंतु, मूर्ख माणसाबद्दल काय? मूर्खपणामुळे त्याचे हेतू वाईट आहेत किंवा त्याच्या मार्गाक्रमणाच्या परिणामांची त्याला चिंता नाही हे तो दाखवून देतो. असा मनुष्य परिणामांचा विचार न करता आपल्या मनात येईल तसाच वागतो. म्हणून त्याला आपल्या कृत्यांचे परिणाम भोगावे लागतात. धार्मिक मनुष्य इतरांना जीवन मिळवून देण्याचा प्रयत्न करतो परंतु मूर्ख मनुष्य स्वतःलाही जीवन देऊ शकत नाही.

दुष्कर्म टाळा

एखाद्याच्या पसंती-नापसंतीवरून त्याचे व्यक्‍तिमत्त्व कसे आहे ते सहसा कळून येते. या संदर्भात इस्राएलचा राजा म्हणतो: “मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते.”—नीतिसूत्रे १०:२३.

काही लोकांना दुष्कर्म म्हणजे खेळ वाटतो आणि केवळ “मौजेखातर” ते असे वागतात. असे लोक देवाकडे दुर्लक्ष करतात, सर्व लोकांना त्याला जाब द्यायचा आहे हे मानत नाहीत आणि स्वतःच्या चुकीच्या मार्गाकडे कानाडोळा करतात. (रोमकर १४:१२) देव आपले अपराध पाहत नाही असे गृहीत धरण्याइतपत ते चुकीचा विचार करतात. आपल्या कार्यांनी ते जणू असे म्हणत असतात की, “देव नाही.” (स्तोत्र १४:१-३; यशया २९:१५, १६) किती मूर्खपणा!

दुसऱ्‍या बाजूला पाहता, सुज्ञ मनुष्याला हे कळते की, दुष्कर्म खेळ नाही. त्याला ठाऊक असते की, त्यामुळे देव असंतुष्ट होतो आणि देवासोबतचा त्याचा नातेसंबंध बिघडू शकतो. अशाप्रकारचे वर्तन मूर्खपणाचे आहे कारण त्यामुळे लोक आत्म-सन्मान गमावून बसतात, त्यांचे विवाह मोडतात, मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम घडतात आणि आध्यात्मिक गोष्टींबद्दल कदर राहत नाही. दुष्कर्म टाळून प्रिय वाटणाऱ्‍या बहिणीप्रमाणे बुद्धीबद्दल आवड निर्माण करणे सुज्ञतेचे आहे.—नीतिसूत्रे ७:४.

चांगल्या पायावर बांधणी करा

आपले जीवन चांगल्या पायावर बांधणे किती महत्त्वाचे आहे याविषयी शलमोन म्हणतो: “दुर्जन ज्याला भितो ते त्याजवर येईल, आणि धार्मिकांची इच्छा पूर्ण होते. वावटळीच्या सपाट्याने दुर्जन नाहीसा होतो, पण धार्मिक सर्वकाळ टिकणाऱ्‍या पायासारखा आहे.”—नीतिसूत्रे १०:२४, २५.

दुष्ट व्यक्‍तीचा इतरांवर दरारा असू शकतो. परंतु, शेवटी त्याला ज्याची भीती वाटत असते तेच घडते. धार्मिक तत्त्वांचा पाया नसल्यामुळे, एखाद्या मोठ्या वादळात कोसळून पडणाऱ्‍या अस्थिर इमारतीसारखा तो आहे. तणावाखाली तो टिकत नाही. दुसरीकडे पाहता, धार्मिक मनुष्य येशूच्या बोलण्याप्रमाणे वागणाऱ्‍या मनुष्यासारखा आहे. तो ‘सुज्ञ मनुष्यासारखा आहे ज्याने आपले घर खडकावर बांधले.’ येशू म्हणाला, “मग पाऊस पडला, पूर आला, वाराहि सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.” (मत्तय ७:२४, २५) अशी व्यक्‍ती स्थिर असते—तिचे विचार, कृती देवाच्या तत्त्वांवर भक्कमपणे आधारित असतात.

दुष्ट आणि धार्मिक यांच्यातला आणखी भेद दाखवण्याआधी सुज्ञ राजा सुटसुटीत शब्दांत परंतु महत्त्वाची सूचना देतो. तो म्हणतो: “जशी आंब दातांस, जसा धूर डोळ्यांस, तसा सुस्त मनुष्य त्याला पाठविणाऱ्‍यांस आहे.” (नीतिसूत्रे १०:२६) आंब दातांना त्रासदायक वाटते. त्यामधील असेटिक आम्लामुळे तोंडाला आंबटपणा येतो आणि दात आंबतात. धुरामुळे डोळे जळतात. त्याचप्रमाणे, जो आळशी मनुष्याला कामावर घेतो किंवा त्याला आपला प्रतिनिधी बनवतो त्याला निश्‍चितच त्रास होईल आणि आर्थिक नुकसानही सहन करावे लागेल.

‘परमेश्‍वराचा मार्ग दुर्गरूप आहे’

इस्राएलचा राजा पुढे म्हणतो: “परमेश्‍वराचे भय आयुष्य वाढविते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात. धार्मिकांची आशा आनंदप्रद होईल, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल.”—नीतिसूत्रे १०:२७, २८.

धार्मिक मनुष्याला ईश्‍वरी भय असते आणि आपले विचार, शब्द आणि कार्यांद्वारे तो यहोवाला संतुष्ट करायचा प्रयत्न करतो. देवाला अशा मनुष्याची काळजी वाटते आणि तो त्याच्या धार्मिक अपेक्षा पूर्ण करतो. तथापि, दुष्ट व्यक्‍ती अधर्माचे जीवन जगते. काही वेळा आपल्या आशा पूर्ण झाल्या आहेत असे तिला वाटेल पण ते फक्‍त तात्पुरते असते कारण सहसा हिंसेमुळे किंवा तिच्या जीवनशैलीने संभवणाऱ्‍या आजारामुळे तिचे आयुष्य अर्ध्यातच संपते. तिचा मृत्यू होतो त्या दिवशी तिच्या सर्व आशा नष्ट होतात.—नीतिसूत्रे ११:७.

शलमोन म्हणतो, “परमेश्‍वराचा मार्ग सात्विकाला दुर्गरूप आहे, पण दुष्कर्म करणाऱ्‍यांस तो नाशकारक आहे.” (नीतिसूत्रे १०:२९) येथे यहोवाचा मार्ग म्हणजे आपण ज्यावर चालले पाहिजे तो जीवनाचा मार्ग नसून देवाची मानवजातीसोबत व्यवहार करण्याची पद्धत आहे. मोशे म्हणाला, “तो दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.” (अनुवाद ३२:४) देवाचे न्यायाचे मार्ग धार्मिकांकरता सुरक्षा आणि दुष्टांकरता नाश ठरतात.

आपल्या लोकांकरता यहोवा आश्रयदुर्ग आहे! “धार्मिक कधीहि ढळणार नाही, पण दुर्जन देशांत वसणार नाहीत. धार्मिकाच्या मुखावाटे ज्ञान निघते, पण उन्मत्त जिव्हा छाटली जाईल. धार्मिकाच्या वाणीला जे काही ग्राह्‍य आहे तेच कळते, पण दुर्जनांचे मुख उन्मत्तपणा वदते.”—नीतिसूत्रे १०:३०-३२.

धार्मिकांचे निश्‍चितच चांगले होते आणि सरळतेच्या मार्गात चालल्याने त्यांना आशीर्वाद मिळतो. खरोखर, “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.” (नीतिसूत्रे १०:२२) तर मग आपण ईश्‍वरी तत्त्वांनुरूप चालायचा निश्‍चय करू या. आपण आपली जीभ देखील ताब्यात ठेवू या आणि देवाच्या वचनातील जीवन-रक्षक सत्याने इतरांचे पोषण करू या व त्यांना धार्मिकतेचा मार्ग दाखवू या.

[तळटीप]

^ नीतिसूत्रे १०:१-१४ या वचनांवरील सविस्तर चर्चेसाठी टेहळणी बुरूज, जुलै १५, २००१, पृष्ठे २४-७ पाहा.

[२६ पानांवरील चित्र]

जीभ “उत्कृष्ट रुप्यासारखी” असू शकते