व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचा आशीर्वाद आपल्याला समृद्ध बनवतो

यहोवाचा आशीर्वाद आपल्याला समृद्ध बनवतो

यहोवाचा आशीर्वाद आपल्याला समृद्ध बनवतो

“परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.”—नीतिसूत्रे १०:२२.

१, २. आनंदाचा संबंध भौतिक संपत्तीशी का नाही?

 आज कोट्यवधी लोक केवळ धनसंपत्ती गोळा करण्याकरता जगतात. पण भौतिक गोष्टी मिळवल्याने त्यांना आनंद मिळतो का? दी ऑस्ट्रेलियन विमेन्स वीकली या नियतकालिकेत एका लेखिकेने असे म्हटले: “पूर्वी कधीही लोकांना आपल्या जीवनाविषयी इतके निराश पाहण्यात आले नाही.” या लेखात पुढे असे म्हटले होते: “हा एक विरोधाभास आहे. एकीकडे आम्हाला असे सांगितले जाते की आर्थिकदृष्ट्या ऑस्ट्रेलियात भरभराटीचा काळ आहे, जीवन इतके समृद्ध पूर्वी कधीही नव्हते. . . . आणि तरीसुद्धा सबंध देशात निराशावादाची लाट आली आहे. लोकांना—मग ते पुरुष असोत वा स्त्रिया—जीवनात काहीतरी उणीव असल्याचा भास होतो; काय ते नेमके त्यांना सांगता येत नाही, पण त्यांना असा भास मात्र होतो.” आपल्याजवळ असलेल्या गोष्टींमुळे आनंद किंवा जीवन मिळू शकत नाही असे बायबलमध्ये सांगितले आहे ते किती खरे आहे!—उपदेशक ५:१०; लूक १२:१५.

बायबल असे सांगते की सर्वात जास्त आनंद देवाच्या आशीर्वादांमुळेच मिळतो. या संदर्भात नीतिसूत्रे १०:२२ म्हणते: “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.” सहसा भौतिक धन प्राप्त करण्याच्या हव्यासामुळेच कष्ट सोसावे लागते. म्हणूनच प्रेषित पौलाने अगदी योग्य ताकीद दिली: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्‍वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:९, १०.

३. देवाच्या सेवकांना परीक्षांना तोंड का द्यावे लागते?

जे ‘देवाची वाणी सतत ऐकतात’ त्यांना मात्र अनेक आशीर्वाद गाठतात व त्यासोबत त्यांना कष्ट मिळत नाही. (अनुवाद २८:२) पण काहीजण म्हणतील, ‘यहोवाच्या आशीर्वादांसोबत जर कष्ट मिळत नाही, तर मग त्याच्या सेवकांपैकी अनेकांना जीवनात कष्ट का सोसावे लागते?’ बायबल दाखवून देते, की आपल्यावर येणाऱ्‍या परीक्षांना देव जरी अनुमती देत असला तरीसुद्धा त्या मुळात सैतानामुळे, त्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणामुळे आणि आपल्या स्वतःच्या अपरिपूर्ण स्वभावामुळे आपल्यावर ओढवलेल्या असतात. (उत्पत्ति ६:५; अनुवाद ३२:४, ५; योहान १५:१९; याकोब १:१४, १५) यहोवा “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा आहे. (याकोब १:१७) त्यामुळे त्याचे आशीर्वाद कधीही आपल्याला कष्ट देत नाहीत. आता आपण देवाच्या काही पूर्ण दानांचा विचार करू.

देवाचे वचन—एक अनमोल वरदान

४. यहोवाच्या लोकांना या ‘अंतसमयात’ कोणता आशीर्वाद आणि अतुलनीय दान प्राप्त झाले आहे?

‘अंतसमयाबद्दल’ दानीएलच्या भविष्यवाणीत असे म्हटले आहे, की त्याकाळात “ज्ञानवृद्धी” होईल. पण त्यासोबत एक अट दिली आहे: “दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही; पण जे सुज्ञ आहेत त्यांस तो प्राप्त होईल.” (दानीएल १२:४, १०) विचार करा! देवाचे वचन—विशेषतः त्यातील भविष्यवाण्या—देवाच्या अगाध बुद्धीने लिहिण्यात आल्या आहेत, त्यामुळे दुर्जनांना त्याचा खरा अर्थ समजूच शकत नाही; पण यहोवाच्या लोकांना तो समजतो. देवाच्या पुत्राने आपल्या पित्याला प्रार्थनेत म्हटले: “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करितो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्‍यांच्यापासून ह्‍या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रगट केल्या आहेत.” (लूक १०:२१) देवाच्या लिखित वचनाचे अर्थात बायबलचे अनमोल वरदान आपल्याला लाभले आणि ज्यांना यहोवाने आध्यात्मिक अंतर्दृष्टी दिली आहे अशा लोकांपैकी आपण आहोत हा खरोखर किती अद्‌भुत आशीर्वाद आहे!—१ करिंथकर १:२१, २७, २८; २:१४, १५.

५. बुद्धी म्हणजे काय आणि आपण ती कशी मिळवू शकतो?

पण “वरून येणारे ज्ञान [“बुद्धी,” NW]” आपल्याजवळ नसते तर आपल्याला आध्यात्मिक समज मिळालीच नसती. (याकोब ३:१७) बुद्धी म्हणजे समस्या सोडवण्याकरता, धोकेदायक परिस्थिती टाळण्याकरता, विशिष्ट ध्येये गाठण्याकरता अथवा उपयुक्‍त सल्ला देण्याकरता ज्ञानाचा व ग्रहणशक्‍तीचा उपयोग करण्याची क्षमता. देवाची बुद्धी आपण कशी मिळवू शकतो? नीतिसूत्रे २:६ म्हणते: “ज्ञान [“बुद्धी,” NW] परमेश्‍वर देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात.” होय, ज्याप्रमाणे यहोवाने शलमोन राजाला “बुद्धिमान व विवेकी चित्त दिले” त्याचप्रमाणे जर आपण बुद्धीकरता त्याला निरंतर प्रार्थना करत राहिलो तर तो निश्‍चितच आपल्याला बुद्धी देईल. (१ राजे ३:११, १२; याकोब १:५-८) तसेच, बुद्धी मिळवण्याकरता आपण नियमितपणे यहोवाच्या वचनाचा अभ्यास व त्याचे पालन करण्याद्वारे त्याच्या वाणीला सतत कान दिला पाहिजे.

६. देवाच्या नियमांचे व तत्त्वांचे आपल्या जीवनात पालन करणे सुज्ञतेचे का आहे?

देवाची बुद्धी प्रकट करणारी सर्वात उत्तम उदाहरणे आपल्याला बायबलमधील नियमांत व तत्त्वांत सापडतात. यांमुळे आपल्याला सर्व प्रकारे फायदा होतो—शारीरिकरित्या, मानसिकरित्या, भावनिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या. म्हणूनच स्तोत्रकर्त्याने एका भजनात म्हटले: “परमेश्‍वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करिते; परमेश्‍वराचा निर्बंध विश्‍वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो. परमेश्‍वराचे विधि सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करितात; परमेश्‍वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्‍वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्‍वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत. ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत.”—स्तोत्र १९:७-१०; ११९:७२.

७. देवाच्या नीतिमान आदर्शांचा अनादर केल्यामुळे काय परिणाम होतात?

दुसरीकडे पाहता, जे देवाच्या नीतिमान आदर्शांचा अनादर करतात अशा लोकांना आनंद किंवा त्यांना हवे असलेले स्वातंत्र्य मिळत नाही. आज न उद्या त्यांना अवश्‍य याची जाणीव होते की देवाचा उपहास करता येत नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. (गलतीकर ६:७) बायबलच्या तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्‍या कोट्यवधी लोकांना नको असलेली गर्भधारणा, किळसवाणे रोग किंवा शक्‍तीहीन करणाऱ्‍या व्यसनांच्या रूपात त्याचे पीक मिळत आहे. त्यांनी पश्‍चात्ताप करून आपल्या जीवनात बदल न केल्यास त्यांचे आचरण शेवटी त्यांना मृत्यूकडे आणि देवाच्या हातून होणाऱ्‍या सर्वनाशाकडे नेईल.—मत्तय ७:१३, १४.

८. देवाच्या वचनावर प्रीती करणारे आनंदी का आहेत?

पण जे देवाच्या वचनावर प्रीती करतात आणि त्याचे पालन करतात त्यांना आज व भविष्यातही समृद्ध आशीर्वाद गाठतील. देवाच्या नियमांच्या अधीन राहिल्यामुळे ते स्वातंत्र्य आणि खरा आनंद अनुभवतात; पाप व त्याच्या घातक परिणामांपासून त्यांना मुक्‍तता मिळेल त्या काळाची ते आतुरतेने वाट पाहात आहेत. (रोमकर ८:२०, २१; याकोब १:२५) ही आशा निश्‍चित आहे कारण देवाने मानवजातीला दिलेल्या सर्वात प्रेमळ देणगीवर अर्थात त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर ती आधारित आहे. (मत्तय २०:२८; योहान ३:१६; रोमकर ६:२३) या सर्वोत्कृष्ट देणगीवरून मानवजातीबद्दल देवाला असलेल्या गहिऱ्‍या प्रेमाची प्रचिती येते आणि जे कोणी यहोवाची वाणी सतत ऐकतात त्यांना मिळणार असलेल्या अनंत आशीर्वादांची हमी मिळते.—रोमकर ८:३२.

पवित्र आत्म्याच्या देणगीकरता कृतज्ञ

९, १०. यहोवाने दिलेल्या पवित्र आत्म्याच्या देणगीमुळे आपल्याला कशाप्रकारे लाभ होतो? उदाहरण द्या.

ज्याच्याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे असे देवाकडून मिळालेले आणखी एक प्रेमळ दान म्हणजे त्याचा पवित्र आत्मा. सा.यु. ३३, पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रेषित पेत्राने जेरूसलेम येथील जमावाला उद्देशून असे आर्जवले: “पश्‍चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.” (प्रेषितांची कृत्ये २:३८) आज यहोवाचे समर्पित सेवक पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्याला प्रार्थना करतात आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यास उत्सुक असतात तेव्हा तो त्यांना पवित्र आत्मा देतो. (लूक ११:९-१३) प्राचीन काळात, विश्‍वातील या सर्वात प्रभावी शक्‍तीने, अर्थात देवाच्या पवित्र आत्म्याने किंवा त्याच्या कार्यकारी शक्‍तीने विश्‍वासू स्त्रीपुरुषांना व सुरवातीच्या ख्रिश्‍चनांना बळ दिले. (जखऱ्‍या ४:६; प्रेषितांची कृत्ये ४:३१) आज यहोवाचे लोक या नात्याने आपल्याला अनेक कठीण अडचणींना व आव्हानांना तोंड द्यावे लागते तरीसुद्धा, प्राचीन काळाप्रमाणे देवाचा पवित्र आत्मा आपल्यालाही बळ देऊ शकतो.—योएल २:२८, २९.

१० लॉरेलचे उदाहरण घ्या. पोलिओ झाल्यामुळे तब्बल ३७ वर्षे तिला एका कृत्रिम श्‍वासोच्छावासाच्या यंत्रात झोपून राहावे लागले. * या अतिशय असह्‍य स्थितीतही तिने मृत्यू येईपर्यंत देवाची आवेशाने सेवा केली. कालांतराने यहोवाच्या समृद्ध आशीर्वादांनी लॉरेलला गाठले. उदाहरणार्थ, दिवसाचे चोवीस तास तिला तिच्या श्‍वासोच्छावासाच्या यंत्रात राहावे लागत असे तरीसुद्धा, ती जवळजवळ १७ जणांना बायबल सत्याचे अचूक ज्ञान मिळवण्यास साहय्य करू शकली! तिच्या स्थितीचा विचार केल्यावर प्रेषित पौलाच्या शब्दांची आठवण होते: “जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.” (२ करिंथकर १२:१०) होय, सुवार्तेच्या प्रचारात आपल्याला जे काही यश मिळते ते आपल्या स्वतःच्या बुद्धीने किंवा शक्‍तीने नव्हे तर पवित्र आत्म्याच्या माध्यमाने मिळणाऱ्‍या देवाच्या मदतीनेच शक्य होते; आणि ही मदत तो त्याची वाणी सतत ऐकणाऱ्‍यांना देतो.—यशया ४०:२९-३१.

११. जे “नवा मनुष्य” धारण करतात त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वात देवाचा आत्मा कोणते गुण निर्माण करतो?

११ आपण आज्ञाधारकपणे देवाची वाणी ऐकल्यास त्याचा आत्मा आपल्या व्यक्‍तिमत्त्वात प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता व इंद्रियदमन यांसारखे गुण निर्माण करतो. (गलतीकर ५:२२, २३) ख्रिस्ती व्यक्‍ती आपल्या पूर्वीच्या जीवनात जर काही अघोर, पाशवी गुण असतील तर ते त्यागून “नवा मनुष्य” धारण करते; या नव्या व्यक्‍तिमत्त्वात ‘आत्म्याचे फळ’ समाविष्ट आहे. (इफिसकर ४:२०-२४; यशया ११:६-९) या फळापैकी प्रीतीचा गुण, अर्थात, “पूर्णता करणारे बंधन” अतिशय महत्त्वाचे आहे.—कलस्सैकर ३:१४.

ख्रिस्ती प्रीती—कदर करण्याजोगी देणगी

१२. टबीथा व पहिल्या शतकातील इतर ख्रिश्‍चनांनी प्रीती कशी प्रकट केली?

१२ ख्रिस्ती प्रीती ही यहोवाकडून मिळणारी आणखी एक मोलवान देणगी आहे आणि आपण तिची कदर करतो हे योग्यच आहे. ही प्रीती तत्त्वावर आधारित आहे पण ती इतकी कळकळीची भावना आहे की सहविश्‍वासू बांधवांमध्ये रक्‍ताच्या नात्यांपेक्षाही घनिष्ट संबंध निर्माण करते. (योहान १५:१२, १३; १ पेत्र १:२२) पहिल्या शतकातील टबीथा नावाच्या एका ख्रिस्ती बहिणीचे उदाहरण घ्या. “ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे;” खासकरून मंडळीतल्या विधवांना ती मदत करत असे. (प्रेषितांची कृत्ये ९:३६) या स्त्रियांना कदाचित त्यांचे नातलग असतील, पण टबीथा त्यांना आपल्याकडून होईल ती मदत करण्यास व त्यांना प्रोत्साहन देण्यास उत्सुक होती. (१ योहान ३:१८) टबीथाचे उदाहरण खरोखर किती उत्तम आहे! तसेच, प्रिस्क व अक्विला यांनी देखील बंधुप्रेमामुळे प्रेरित होऊन पौलाकरता “आपला जीव धोक्यात घातला.” याच प्रीतीने एपफ्रास, लूक, अनेसिफर आणि इतरांनाही पौल रोममध्ये बंदिवान असताना त्याला मदत करण्यास प्रेरित केले. (रोमकर १६:३, ४; २ तीमथ्य १:१६; ४:११; फिलेमोन २३, २४) होय, आज या सर्वांचे अनुकरण करणारे ख्रिस्ती ‘एकमेकांवर प्रीति करतात;’ ही प्रीती देवाकडून मिळणारी एक देणगी व आशीर्वाद आहे आणि या प्रीतीमुळेच त्यांची येशूचे खरे शिष्य म्हणून ओळख पटते.—योहान १३:३४, ३५.

१३. आपण आपल्या ख्रिस्ती बंधुसमाजाबद्दल मनापासून कृतज्ञ आहोत हे कसे दाखवू शकतो?

१३ ख्रिस्ती मंडळीत दिसणाऱ्‍या प्रीतीची तुम्ही मनस्वी कदर करता का? सबंध जगभरात असलेल्या आपल्या आध्यात्मिक बंधुसमाजाबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते का? या आशीर्वादित व समृद्धीदायक देणग्या देखील यहोवाकडील आहेत. यांचे मोल आपण जाणतो हे आपण कसे दाखवू शकतो? हे आपण देवाला पवित्र सेवा सादर करण्याद्वारे, ख्रिस्ती सभांमध्ये भाग घेण्याद्वारे आणि प्रीती व देवाच्या आत्म्याची इतर फळे विकसित करण्याद्वारे दाखवू शकतो.—फिलिप्पैकर १:९; इब्री लोकांस १०:२४, २५.

“मानवरूपी देणग्या”

१४. एका ख्रिस्ती पुरुषाला वडील अथवा सेवा सेवक या नात्याने सेवा करायची असल्यास त्याने कोणत्या आवश्‍यकता पूर्ण केल्या पाहिजेत?

१४ वडील अथवा सेवा सेवक या नात्याने आपल्या सहउपासकांची सेवा करू इच्छिणारे ख्रिस्ती पुरूष चांगले ध्येय ठेवतात. (१ तीमथ्य ३:१, ८) हे विशेषाधिकार मिळवण्यास योग्य बनण्यासाठी एका बांधवाने आध्यात्मिक प्रवृत्तीचा असणे, शास्त्रवचनांशी चांगल्याप्रकारे परिचित असणे आणि क्षेत्र सेवेत आवेशी असणे आवश्‍यक आहे. (प्रेषितांची कृत्ये १८:२४; १ तीमथ्य ४:१५; २ तीमथ्य ४:५) त्याने नम्रता, विनयशीलता आणि सहनशीलता दाखवली पाहिजे कारण देवाचे आशीर्वाद गर्विष्ठ आणि महत्त्वाकांक्षी लोकांना गाठत नाहीत. (नीतिसूत्रे ११:२; इब्री लोकांस ६:१५; ३ योहान ९, १०) जर तो विवाहित असेल तर त्याने एक प्रेमळ कुटुंबप्रमुख असले पाहिजे व तो आपल्या सबंध घराण्याची चांगल्या प्रकारे देखरेख करत असला पाहिजे. (१ तीमथ्य ३:४, ५, १२) आध्यात्मिक धनाचे मोल जाणणाऱ्‍या या पुरुषाला यहोवाचे आशीर्वाद मिळतील.—मत्तय ६:१९-२१.

१५, १६. “मानवरूपी देणग्या” कोण आहेत? उदाहरण द्या.

१५ मंडळीत वडील म्हणून सेवा करणारे बांधव प्रचारक, मेंढपाळ व शिक्षक या नात्याने आपल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी झटतात तेव्हा आपोआपच आपल्याला या ‘मानवरूपी देणग्यांबद्दल’ कदर वाटू लागते. (इफिसकर ४:८, ११, NW) त्यांच्या प्रेमळ सेवेचा फायदा उचलणारे सर्वजण कदाचित त्यांना आपली कृतज्ञता व्यक्‍त करणार नाहीत, तरीसुद्धा यहोवा या विश्‍वासू वडिलांचे सर्व परिश्रम पाहतो. त्याच्या लोकांची सेवा करण्याद्वारे त्याच्या नावाबद्दल त्यांनी दाखवलेले प्रेम तो कधीही विसरणार नाही.—१ तीमथ्य ५:१७; इब्री लोकांस ६:१०.

१६ अशाच एका परिश्रमी वडिलांचे उदाहरण घ्या. ते एका ख्रिस्ती मुलीला भेट द्यायला गेले जिची लवकरच मेंदूची शस्त्रक्रिया होणार होती. नंतर या कुटुंबाच्या एका परिचिताने सांगितले, “ते अतिशय दयाळू, साहाय्यशील आणि सहानुभूतीशील होते. त्यांनी आमच्यासाठी यहोवाला प्रार्थना करण्याची परवानगी मागितली. ते प्रार्थना करत होते तेव्हा मुलीचे वडील [जे यहोवाचे साक्षीदार नाहीत] अक्षरशः रडू लागले आणि हॉस्पिटलच्या त्या खोलीत असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्या वडिलांची प्रार्थना किती मनस्वी, किती कळकळीची होती आणि यहोवाने किती प्रेमळपणे त्यांना त्या कठीण घडीला पाठवले होते!” इस्पितळात रुग्ण असलेल्या दुसऱ्‍या एका साक्षीदार स्त्रीने तिला भेटायला आलेल्या वडिलांबद्दल असे म्हटले: “अतिदक्षता विभागात माझ्या पलंगाजवळ मी त्यांना येताना पाहिले तेव्हापासून मला एक खात्री पटली, की आता मी काहीही सहन करू शकेन. मला आपोआप धैर्य आले आणि शांत वाटू लागले.” अशी प्रेमळ काळजी कोणी विकत घेऊ शकेल का? कधीच नाही! ही देवाकडील देणगी आहे जी ख्रिस्ती मंडळीच्या माध्यमाने आपल्याला प्राप्त होते.—यशया ३२:१, २.

क्षेत्र सेवेची देणगी

१७, १८. (अ) यहोवाने आपल्या सर्व लोकांना सेवेची कोणती देणगी देऊ केली आहे? (ब) आपल्याला सेवा पूर्ण करता यावी म्हणून देवाने कोणती मदत पुरवली आहे?

१७ मानवांसाठी, परात्पर देव यहोवा याची सेवा करण्यापेक्षा मोठा बहुमान असूच शकत नाही. (यशया ४३:१०; २ करिंथकर ४:७; १ पेत्र २:९) पण, क्षेत्र सेवेत सहभागी होण्याचा बहुमान, देवाची सेवा करू इच्छिणाऱ्‍या सर्वांकरता आहे मग ते तरुण असोत वा वृद्ध, स्त्री असोत वा पुरूष. या बहुमोल देणगीचा तुम्ही उपयोग करता का? काहीजण कदाचित या कार्यासाठी आपण लायक नाही असे समजून कचरत असतील, पण आठवणीत असू द्या की यहोवा त्याची सेवा करणाऱ्‍यांना पवित्र आत्मा देतो जो आपल्यात असलेल्या कमतरता भरून काढतो.—यिर्मया १:६-८; २०:११.

१८ यहोवाने आपल्या राज्याच्या प्रचाराचे काम, गर्विष्ठ व स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती असलेल्यांना नव्हे, तर त्याच्या नम्र सेवकांना सोपवले आहे. (१ करिंथकर १:२०, २६-२९) नम्र, विनयशील व्यक्‍ती क्षेत्र सेवेत सहभाग घेताना आपल्या मर्यादा स्वीकारून देवाच्या मदतीवर विसंबून राहते. तसेच ही व्यक्‍ती हे देखील ओळखते की देव आपल्या ‘विश्‍वासू कारभाऱ्‍याच्या’ माध्यमाने आध्यात्मिक मदत पुरवतो.—लूक १२:४२-४४; नीतिसूत्रे २२:४.

आनंदी कौटुंबिक जीवन—एक उत्तम देणगी

१९. मुलांचे संगोपन करण्यात यश मिळवण्याकरता कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात?

१९ विवाह व आनंदी कौटुंबिक जीवन देवाकडील देणग्या आहेत. (रूथ १:९; इफिसकर ३:१४, १५) मुले देखील “परमेश्‍वराने दिलेले [मौल्यवान] धन आहे;” त्यांच्यात देवाला आवडणारे गुण विकसित करण्यात यशस्वी ठरणारे आईवडील आनंदी होतात. (स्तोत्र १२७:३) तुम्ही पालक असल्यास आपल्या मुलांना यहोवाच्या वचनानुसार प्रशिक्षण देण्याद्वारे त्याची वाणी सतत ऐकत राहा. असे करणारे पालक यहोवाची मदत आणि समृद्ध आशीर्वाद अवश्‍य अनुभवतील.—नीतिसूत्रे ३:५, ६; २२:६; इफिसकर ६:१-४.

२०. ज्यांची मुले खऱ्‍या उपासनेपासून दूर जातात असे पालक काय करू शकतात?

२० पण देवभीरू आईवडिलांनी मनस्वी प्रयत्न करूनही त्यांच्या मुलांपैकी काही मोठी होऊन खऱ्‍या उपासनेपासून दूर जाण्याचे निवडतील. (उत्पत्ति २६:३४, ३५) यामुळे आईवडिलांना मोठा धक्का बसू शकतो. (नीतिसूत्रे १७:२१, २५) पण पूर्णपणे आशा सोडून देण्याऐवजी हे पालक येशूने सांगितलेला उधळ्या पुत्राचा दृष्टान्त आठवणीत ठेवू शकतात. या मुलाने आपले घर सोडून दिले व तो वाईट मार्गाला लागला पण नंतर तो आपल्या पित्याच्या घरी परतला आणि त्याच्या पित्याने त्याचा आनंदाने व प्रेमळपणे स्वीकार केला. (लूक १५:११-३२) काही झाले तरीही विश्‍वासू ख्रिस्ती पालक याची खात्री बाळगू शकतात की यहोवा त्यांची परिस्थिती जाणतो, त्यांच्याविषयी त्याला प्रेमळ काळजी आहे आणि तो त्यांना नेहमी आधार देईल.—स्तोत्र १४५:१४.

२१. आपण कोणाचे ऐकावे व का?

२१ तर मग, प्रत्येकाने हे ठरवावे की आपल्या जीवनात खरोखर महत्त्वाचे काय आहे? आपण भौतिक संपत्तीच्या मागे लागून स्वतःला व आपल्या कुटुंबाला क्लेश देत आहोत का? की “ज्योतिमंडळाच्या पित्यापासून” मिळणाऱ्‍या ‘प्रत्येक उत्तम देणगीचा व प्रत्येक पूर्ण दानाचा’ आपण पाठलाग करत आहोत? (याकोब १:१७) “लबाडीचा बाप” असणाऱ्‍या सैतानाची हीच इच्छा आहे की आपण भौतिक संपत्तीसाठी परिश्रम करावे आणि आनंद व जीवन दोन्ही गमवून बसावे. (योहान ८:४४; लूक १२:१५) पण यहोवाला आपले भले व्हावे असेच नेहमी वाटते. (यशया ४८:१७, १८) म्हणूनच आपण सतत आपला प्रेमळ स्वर्गीय पिता यहोवा याचे ऐकत राहून त्याच्याठायी ‘आनंद’ करावा. (स्तोत्र ३७:४) या मार्गाने आपण चालत राहिलो तर यहोवाच्या अनमोल देणग्या आणि त्याचे विपूल आशीर्वाद आपल्याला समृद्ध बनवतील—आणि त्यांसोबत थोडेही कष्ट राहणार नाही.

[तळटीप]

^ सावध राहा! नियतकालिकाच्या जानेवारी २२, १९९३ (इंग्रजी) अंकातील पृष्ठे १८-२१ पाहा.

तुम्हाला आठवते का?

• सर्वात अधिक आनंद कोठे मिळू शकतो?

• यहोवा आपल्या लोकांना कोणत्या काही देणग्या देतो?

• क्षेत्र सेवा ही एक देणगी का आहे?

• आपल्या मुलांना वाढवताना देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पालक काय करू शकतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

देवाच्या लिखित वचनाच्या देणगीविषयी तुम्ही कृतज्ञता दाखवता का?

[१७ पानांवरील चित्र]

अतिशय कठीण परिस्थितीतही लॉरल निस्बेत हिने आवेशाने देवाची सेवा केली

[१८ पानांवरील चित्रे]

टबीथाप्रमाणे आजही ख्रिस्तीजन प्रेमळ कृत्यांकरता जाणले जातात

[१९ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती वडील आपल्या सहविश्‍वासू बांधवांबद्दल प्रेमळ काळजी बाळगतात