व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचा आशीर्वाद तुम्हाला गाठेल का?

यहोवाचा आशीर्वाद तुम्हाला गाठेल का?

यहोवाचा आशीर्वाद तुम्हाला गाठेल का?

“तू जर यहोवा तुझा देव याची वाणी [“सतत,” NW] ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्यावर येऊन तुला गाठतील.”— वाद २८:२, पं.र.भा.

१. इस्राएली लोकांना आशीर्वाद मिळतील किंवा शाप हे कशावर अवलंबून होते?

 चाळीस वर्षे अरण्यात भटकल्यानंतर इस्राएली लोकांनी मवाबाच्या पठारावर तळ ठोकला. त्यांच्यापुढे प्रतिज्ञात देश होता. याच दरम्यान मोशेने अनुवाद हे पुस्तक लिहिले; या पुस्तकात अनेक आशीर्वाद व शाप यांविषयी सांगितले आहे. इस्राएलातील लोकांनी ‘यहोवाची वाणी ऐकल्यास त्यांना त्याचे आशीर्वाद’ ‘गाठणार’ होते. यहोवा त्यांना आपली “खास प्रजा” मानून त्यांच्यावर प्रीती करत होता आणि त्यांच्याकरता तो आपल्या सामर्थ्याचा उपयोग करू इच्छित होता. पण जर त्यांनी त्याचे सतत ऐकले नाही तर मात्र तितक्याच निश्‍चितपणे त्यांच्यावर शाप येणार होते.—अनुवाद ८:१०-१४; २६:१८; २८:२, १५.

२. अनुवाद २८:२ येथे वापरण्यात आलेले ‘सतत ऐकणे’ व ‘गाठणे’ या दोन इब्री क्रियापदांचा काय अर्थ होतो?

अनुवाद २८:२ येथे “[सतत] ऐकशील” असे भाषांतर केलेल्या इब्री क्रियापदावरून निरंतर सुरू असणारी क्रिया सूचित होते. यहोवाच्या लोकांनी केवळ अधूनमधून त्याचे ऐकू नये तर त्याची वाणी ऐकणे त्यांच्या जीवनाचा भाग बनले पाहिजे. तरच देवाचे आशीर्वाद त्यांना गाठणार होते. “गाठतील” असे भाषांतर केलेले इब्री क्रियापद शिकारीच्या संदर्भात वापरले जात होते व सहसा त्याचा अर्थ “पकडणे” किंवा “पोचणे” असा होतो.

३. आपण कशाप्रकारे यहोशवासारखे होऊ शकतो आणि हे अत्यंत महत्त्वाचे का आहे?

इस्राएली लोकांचे नेतृत्त्व करणाऱ्‍या यहोशवाने यहोवाची वाणी ऐकली आणि यामुळे त्याला अनेक आशीर्वाद मिळाले. यहोशवाने म्हटले: “तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा . . . मी आणि माझे घराणे तर परमेश्‍वराची सेवा करणार.” हे ऐकल्यावर लोकांनी उत्तर दिले: “परमेश्‍वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो.” (यहोशवा २४:१५, १६) यहोशवाच्या चांगल्या मनोवृत्तीमुळे तो, प्रतिज्ञात देशात प्रवेश करणाऱ्‍या त्याच्या पिढीतील फार कमी लोकांपैकी एक होता. आज आपण त्याहीपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ अशा प्रतिज्ञात देशाच्या, अर्थात परादीस पृथ्वीच्या उंबरठ्यावर उभे आहोत, ज्यात देवाची संमती मिळवणाऱ्‍यांना यहोशवाच्या दिवसातील आशीर्वादांपेक्षा कैक पटीने उत्तम आशीर्वाद प्राप्त होतील. हे आशीर्वाद तुम्हाला गाठतील का? तुम्ही यहोवाची वाणी सतत ऐकल्यास निश्‍चितच ते तुम्हाला गाठतील. असे करण्याचा पक्का निर्धार करण्यासाठी प्राचीन इस्राएलचा राष्ट्रीय इतिहास तसेच काही बोधपर वैयक्‍तिक उदाहरणे लक्षात घ्या.—रोमकर १५:४.

आशीर्वाद की शाप?

४. शलमोनाच्या प्रार्थनेच्या उत्तरात देवाने त्याला काय दिले आणि अशाप्रकारच्या आशीर्वादांविषयी आपला दृष्टिकोन कसा असावा?

शलमोन राजाच्या कारकीर्दीतील बराच काळ इस्राएली लोकांना यहोवाकडून अनेक चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त झाले. ते सुरक्षिततेत नांदत होते आणि अनेक चांगल्या गोष्टी त्यांना विपुलतेने मिळाल्या. (१ राजे ४:२५) शलमोनाचे ऐश्‍वर्य जगप्रसिद्ध झाले, पण मुळात त्याने देवाला भौतिक संपत्तीचे वरदान मागितले नव्हते. उलट, वयाने व अनुभवाने अद्याप लहान असतानाच त्याने यहोवाला एक आज्ञाधारक हृदय मागितले; यहोवाने त्याची ही विनंती स्वीकारून त्याला बुद्धी व ज्ञान दिले. यामुळे शलमोन लोकांचा चांगल्याप्रकारे न्याय करू शकला आणि चांगले व वाईट यातील भेद योग्यप्रकारे ओळखू शकला. देवाने त्याला धन आणि वैभव देखील दिले पण तरुण शलमोनाच्या नजरेत मात्र आध्यात्मिक धन सर्वात मोलाचे होते. (१ राजे ३:९-१३) आज आपल्याकडे भौतिक संपत्ती असो किंवा नसो, आपल्यावर यहोवाचे आशीर्वाद असतील व आध्यात्मिकरित्या आपण श्रीमंत असू तर यासाठी आपण कृतज्ञ असू शकतो!

५. इस्राएल व यहुदाच्या लोकांनी यहोवाची वाणी सतत ऐकली नाही तेव्हा काय झाले?

इस्राएली लोकांनी यहोवाच्या आशीर्वादांबद्दल कृतज्ञता दाखवली नाही. ते त्याची वाणी ऐकत राहिले नाहीत आणि यामुळे यहोवाने भाकीत केल्याप्रमाणे निरनिराळ्या शापांनी त्यांना गाठले. त्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर विजय मिळवला आणि इस्राएल व यहुदा राष्ट्राच्या लोकांना बंदिवासात जावे लागले. (अनुवाद २८:३६; २ राजे १७:२२, २३; २ इतिहास ३६:१७-२०) पण देवाचे आशीर्वाद केवळ त्याची वाणी सतत ऐकणाऱ्‍यांनाच मिळतात हा धडा हे सर्व शाप सोसल्यानंतर ते लोक शिकले का? सा.यु.पू. ५३७ साली आपल्या मायभूमीला परतलेल्या यहुदी शेषांना हे दाखवण्याची संधी होती की त्यांनी “सुज्ञ अंतकरण” प्राप्त केले असून देवाची वाणी सतत ऐकणे किती आवश्‍यक आहे याची त्यांना जाणीव झाली आहे.—स्तोत्र ९०:१२.

६. (अ) यहोवाने हाग्गय व जखऱ्‍या या संदेष्ट्यांना आपल्या लोकांकडे का पाठवले? (ब) हाग्गयद्वारे देवाने दिलेल्या संदेशावरून कोणते तत्त्व स्पष्ट होते?

परतलेल्या यहुद्यांनी एक वेदी बांधली आणि जेरुसलेमच्या मंदिराच्या पुनर्निर्मितीच्या कार्याला सुरवात केली. पण शक्‍तिशाली शत्रूंकडून त्यांना विरोध होऊ लागला तेव्हा त्यांचा उत्साह मावळू लागला आणि बांधकाम थांबले. (एज्रा ३:१-३, १०; ४:१-४, २३, २४) ते स्वतःचेच जीवन अधिक आरामदायक बनवण्याला प्राधान्य देऊ लागले. त्यामुळे देवाने आपल्या लोकांकडे हाग्गय व जखऱ्‍या या संदेष्ट्यांना पाठवले जेणेकरून त्यांनी खऱ्‍या उपासनेकरता त्यांचा निवळलेला उत्साह पुन्हा जागृत करावा. हाग्गयद्वारे यहोवाने म्हटले: “इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्‍तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? . . . तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, . . . मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकितो.” (हाग्गय १:४-६) भौतिक स्वार्थांच्या पाठीमागे लागून आध्यात्मिक गोष्टींचा बळी दिल्यास यहोवाचे आशीर्वाद मिळत नाहीत.—लूक १२:१५-२१.

७. “आपल्या मार्गाकडे लक्ष लावा” असे यहोवाने यहुद्यांना का म्हटले?

दैनंदिन जीवनाच्या काळजीत दबून यहुदी लोक विसरून गेले की विरोधाला तोंड देऊनही जर ते देवाला सतत आज्ञाधारक राहिले तरच पाऊस व फलदायक ऋतूंच्या रूपात देवाचे आशीर्वाद त्यांना गाठणार होते. (हाग्गय १:९-११) म्हणूनच “आपल्या मार्गाकडे लक्ष लावा!” अशी यहोवाने त्यांना दिलेली ताकीद अगदी समयोचित होती. (हाग्गय १:७) दुसऱ्‍या शब्दांत यहोवा त्यांना असे म्हणत होता की ‘जरा विचार करा! माझे उपासनामंदिर ओसाड पडले असताना तुमचे शेतांत परिश्रम करणे किती व्यर्थ आहे हे ओळखा.’ यहोवाच्या संदेष्ट्यांचे प्रेरित शब्द शेवटी त्या लोकांच्या हृदयाला भिडले. त्यांनी मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरू केले आणि सा.यु.पू. ५१५ साली ते पूर्ण झाले.

८. यहोवाने मलाखीच्या काळातील यहुद्यांना कोणते आवाहन केले व का?

नंतर मलाखीच्या काळात यहुदी लोक पुन्हा एकदा आध्यात्मिकदृष्ट्या डगमगू लागले; ते देवाला अस्वीकारयोग्य अर्पणे देऊ लागले. (मलाखी १:६-८) म्हणूनच यहोवाने त्यांना आवाहन केले की त्यांनी आपल्या उत्पन्‍नातून दशमांश त्याच्या भांडारात आणावा आणि तो आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद त्यांच्यावर वर्षितो की नाही याची प्रतीति पाहावी. (मलाखी ३:१०) यहुदी लोक खरोखर मूर्ख होते; देवाची वाणी सतत ऐकल्यास त्यांना तो विपुलतेने जे देणार होता तेच मिळवण्यासाठी ते काबाडकष्ट करत होते!—२ इतिहास ३१:१०.

९. आपण बायबलमधील कोणत्या तीन व्यक्‍तींच्या जीवनाचे परीक्षण करणार आहोत?

इस्राएल राष्ट्राच्या इतिहासाचे वर्णन करण्यासोबतच बायबलमध्ये अशा अनेक व्यक्‍तींच्या जीवनाचे वर्णन आढळते ज्यांना यहोवाचे ऐकल्यामुळे किंवा न ऐकल्यामुळे आशीर्वाद किंवा शाप मिळाले. यांपैकी बवाज, नाबाल व हन्‍ना या तीन व्यक्‍तींकडून आपण काय शिकू शकतो हे आता पाहूया. त्यासाठी तुम्ही रूथचे पुस्तक तसेच १ शमुवेल १:१–२:२१ आणि १ शमुवेल २५:२-४२ वाचू शकता.

बवाजने देवाचे ऐकले

१०. बवाज व नाबाल यांच्यात कोणत्या गोष्टी सारख्या होत्या?

१० बवाज व नाबाल हे समकालीन पुरूष नव्हते तरीसुद्धा त्यांच्या जीवनात काही गोष्टी समान होत्या. उदाहरणार्थ, हे दोघेही पुरुष यहुदा राष्ट्रात राहात होते. ते श्रीमंत होते, त्यांच्याजवळ जमीनजुमला होता आणि त्या दोघांनाही काही गरजू लोकांची मदत करण्याची संधी मिळाली होती. या व्यतिरिक्‍त त्यांच्यात काहीही सारखे नव्हते.

११. बवाजने कशाप्रकारे दाखवून दिले की तो सतत यहोवाचे ऐकत होता?

११ इस्राएलात शास्ते होते त्या काळात बवाज हयात होता. तो इतरांशी आदराने वागत असे आणि त्याच्या शेतात कापणी करणारे कामगार त्याचा खूप आदर करत होते. (रूथ २:४) नियमशास्त्रानुसार, कापणी केल्यानंतर गरीब लोकांकरता काही पीक आपल्या शेतांत राहू देण्यास बवाज विसरत नव्हता. (लेवीय १९:९, १०) रूथ व नामी यांच्याविषयी बवाजला कळले व रूथ आपल्या वृद्ध सासूची काळजी घेण्यासाठी किती मेहनत करत होती हे त्याने पाहिले तेव्हा त्याने काय केले? त्याने रूथकडे खास लक्ष देऊन तिला सहानुभूती दाखवली आणि तिला शेतात सरवा वेचू द्यावे अशी आपल्या माणसांना आज्ञा दिली. आपल्या शब्दांतून व प्रेमळ कृतींतून बवाजने दाखवून दिले की तो एक आध्यात्मिक प्रवृत्तीचा माणूस होता व तो यहोवाचे ऐकत होता. म्हणूनच त्याला देवाची कृपा व आशीर्वाद मिळाले.—लेवीय १९:१८; रूथ २:५-१६.

१२, १३. (अ) वतन सोडविण्याच्या संदर्भात असलेल्या यहोवाच्या नियमांविषयी बवाजने कशाप्रकारे मनःपूर्वक आदर दाखवला? (ब) बवाजला देवाच्या कोणत्या आशीर्वादांनी गाठले?

१२ बवाज निःस्वार्थ बुद्धीने सतत यहोवाचे ऐकत राहिला याचा सर्वात उल्लेखनीय पुरावा, त्याने वतन सोडवण्याविषयी देवाच्या नियमाचे पालन केल्यामुळे मिळाला. नामीचा मृत पती व आपला आप्त, अलीमलेख याच्या घराण्याचे वतन त्याच्याच घराण्यात कायम राहावे म्हणून बवाजने आपल्या हातात जेवढे होते ते सर्व केले. इस्राएल लोकांत “दिराचे कर्तव्य” म्हणून मृत भावाच्या विधवेशी लग्न करण्याची प्रथा होती; या विवाहातून होणारा पुत्र, मृत झालेल्या भावाचे वतन कायम ठेवत असे. (अनुवाद २५:५-१०; लेवीय २५:४७-४९) नामीने मुले प्रसवण्याचे वय ओलांडले असल्यामुळे रूथ लग्नासाठी पुढे येते. अलीमलेखच्या एका जवळच्या आप्ताने नामीला मदत करण्यास नकार दिल्यानंतर बवाज रूथला पत्नी म्हणून स्वीकारतो. त्यांचा पुत्र ओबेद याला नामीचाच पुत्र म्हटले जाते व तो अलीमलेखचा कायदेशीर वारस बनतो.—रूथ २:१९, २०; ४:१, ६, ९, १३-१६.

१३ बवाजने देवाच्या नियमाचे निःस्वार्थ पालन केल्यामुळे त्याला अनेक आशीर्वादांनी गाठले. त्याला व रूथला, ओबेद या त्यांच्या पुत्राच्या माध्यमाने येशू ख्रिस्ताचे पूर्वज होण्याचा बहुमान प्राप्त झाला. (रूथ २:१२; ४:१३, २१, २२; मत्तय १:१, ५, ६) बवाजच्या निःस्वार्थ कृत्यांवरून आपल्याला हे शिकायला मिळते की जे इतरांना प्रेम दाखवतात आणि देवाच्या नियमांप्रमाणे वागतात त्यांनाच आशीर्वाद गाठतात.

नाबालने ऐकले नाही

१४. नाबाल कशाप्रकारचा माणूस होता?

१४ बवाजच्या अगदी उलट, नाबालने यहोवाचे ऐकले नाही. “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर,” या देवाच्या नियमाचे त्याने उल्लंघन केले. (लेवीय १९:१८) नाबाल आध्यात्मिक प्रवृत्तीचा नव्हता; तो “कठोर व वाईट चालीचा होता.” त्याची स्वतःची माणसे देखील त्याला “अधम” समजत होती. त्याच्या नावाचा अर्थ देखील “निर्बुद्ध” किंवा “मूर्ख” असा होता. (१ शमुवेल २५:३, १७, २५) मग जेव्हा एका गरजू व्यक्‍तीला, अर्थात यहोवाचा अभिषिक्‍त दावीद याला दया दाखवण्याची त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने काय केले असावे?—१ शमुवेल १६:१३.

१५. नाबाल दावीदाशी कशाप्रकारे वागला आणि या बाबतीत अबीगईल आपल्या पतीपेक्षा कशाप्रकारे वेगळी होती?

१५ नाबालची माणसे जेथे मेंढरे राखत होती त्याच परिसरात दावीद व त्याच्या माणसांनी तळ ठोकला होता; त्यांनी कोणताही मोबदला न घेता नाबालच्या माणसांचे व मेंढरांचे आक्रमक टोळ्यांपासून संरक्षण केले. नाबालच्याच एका मेंढपाळाने म्हटले, “आम्ही त्यांच्याबरोबर शेरडेमंढरे राखीत होतो तोवर ते रात्रंदिवस आम्हांस तटबंदीसारखे होते.” पण दाविदाने पाठवलेल्या माणसांनी जेव्हा अन्‍नसामग्री देण्याची विनंती केली तेव्हा नाबाल त्यांच्या “अंगावर ओरडला” आणि त्यांना रिकाम्या हाती परत पाठवले. (१ शमुवेल २५:२-१६) नाबालची पत्नी अबीगईल हिने लगेच जाऊन दाविदाला अनेक खाद्य पदार्थ भेट म्हणून दिले. दावीद अत्यंत क्रोधिष्ट होऊन नाबाल व त्याच्या माणसांची कत्तल करायला निघालाच होता. अबीगईलने विचारपूर्वक पाऊल उचलल्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचला व दावीदाचाही रक्‍तपात करण्यापासून बचाव झाला. पण नाबालचा स्वार्थीपणा आणि निष्ठुरता टोकाला पोचली होती. दहा दिवसांनतर “परमेश्‍वराकडून नाबालास असा तडाका मिळाला की तो मृत्यु पावला.”—१ शमुवेल २५:१८-३८.

१६. आपण बवाजचे अनुकरण कसे करू शकतो आणि नाबालसारखे वागण्याचे कसे टाळू शकतो?

१६ बवाज आणि नाबाल यांच्यात किती फरक होता! आपण नाबालप्रमाणे निष्ठुर व स्वार्थी कधीही होऊ नये तर बवाजच्या दयाळुपणाचे व निःस्वार्थ प्रवृत्तीचे अनुकरण केले पाहिजे. (इब्री लोकांस १३:१६) पौलाच्या पुढील सल्ल्याप्रमाणे वागल्यास आपण असे करू शकतो: “जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) आज येशूच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांना,’ अर्थात पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्या ख्रिस्ती लोकांना, यहोवाच्या अभिषिक्‍तांकरता अर्थात ज्यांना स्वर्गात अमरत्व दिले जाईल अशा १,४४,००० यांतील शेषांकरता भली कृत्ये करण्याची सुसंधी व बहुमान आहे. (योहान १०:१६; १ करिंथकर १५:५०-५३; प्रकटीकरण १४:१,) येशूच्या नजरेत ही प्रेमळ कृत्ये त्याच्यासाठीच केल्यासारखी आहेत आणि ती केल्यामुळे यहोवाचा समृद्ध आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.—मत्तय २५:३४-४०; १ योहान ३:१८.

हन्‍नाची कठीण परिस्थिती व आशीर्वाद

१७. हन्‍नाला कोणत्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले व तिने कशी मनोवृत्ती बाळगली?

१७ यहोवाच्या आशीर्वादांनी हन्‍ना नावाच्या एका धार्मिक स्त्रीला देखील गाठले. ती आपला पती एलकाना याच्यासोबत इफ्राईमच्या डोंगराळ भागात राहायची. एलकानाला पनिन्‍ना नावाची आणखी एक पत्नी होती—नियमशास्त्रात असे करण्याची सूट होती, आणि यासंबंधी काही नियमही होते. त्या दोघींपैकी हन्‍नाला मुले नव्हती आणि इस्राएली स्त्रियांकरता ही एक लाजिरवाणी गोष्ट होती. पनिन्‍नाला मात्र अनेक मुलेबाळे होती. (१ शमुवेल १:१-३; १ इतिहास ६:१६, ३३, ३४) पण हन्‍नाचे सांत्वन करण्याऐवजी पनिन्‍ना तिला हिणवत असे; यामुळे हन्‍ना खूप रडे, इतकेच काय तर तिने खाणेपिणेही सोडून दिले. शिवाय, “वर्षानुवर्ष” असलेल्या परिपाठाप्रमाणे एलकाना आपल्या कुटुंबासोबत शिलो येथे यहोवाच्या मंदिरी गेला की असेच घडायचे. (१ शमुवेल १:४-८) पनिन्‍ना खरोखर किती क्रूर होती आणि हन्‍नाला तिच्यामुळे किती कठीण गेले असेल! पण हन्‍नाने कधीही यहोवाला दोष दिला नाही; किंवा तिचा पती शिलोला जायचा तेव्हा ती कधीही घरी बसली नाही. यामुळे, शेवटी तिला नक्कीच देवाचा समृद्ध आशीर्वाद गाठणार होता.

१८. हन्‍नाने कशाच्या बाबतीत आपल्यापुढे एक चांगला आदर्श ठेवला?

१८ हन्‍नाने आजच्या काळातील यहोवाच्या लोकांकरता एक उत्तम आदर्श मांडला, खासकरून अशांकरता ज्यांना इतरांच्या अविचारी बोलण्यामुळे वाईट वाटत असेल. अशा परिस्थितीत लोकांना टाळणे हा उपाय नाही. (नीतिसूत्रे १८:१) हन्‍नाने आपल्या दुःखद परिस्थितीमुळे मंदिरात, अर्थात जेथे देवाच्या वचनातून मार्गदर्शन केले जात होते व जेथे त्याचे लोक उपासनेकरता एकत्रित होत असत तेथे जाण्याची इच्छा कधीही कमी होऊ दिली नाही. यामुळे आध्यात्मिकरित्या ती दृढ राहिली. १ शमुवेल २:१-१० येथे दिलेल्या तिच्या सुरेख प्रार्थनेतून तिच्या आध्यात्मिकतेची पातळी आपल्याला कळून येते. *

१९. आपण आध्यात्मिक गोष्टींविषयी कृतज्ञता कशी दाखवू शकतो?

१९ यहोवाचे सेवक या नात्याने आपण या काळात प्रार्थनामंडपात उपासना करत नाही. पण आपणही हन्‍नाप्रमाणे आध्यात्मिक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करू शकतो. उदाहरणार्थ, आपण ख्रिस्ती सभा, संमेलने व अधिवेशने यांत नियमितपणे उपस्थित राहून आध्यात्मिक धनाविषयी मनस्वी कृतज्ञता दाखवू शकतो. या प्रसंगांचा फायदा उचलून आपण एकमेकांना यहोवाच्या खऱ्‍या उपासनेकरता प्रोत्साहित केले पाहिजे कारण त्यानेच आपल्याला ‘पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर त्याची सेवा निर्भयपणे करण्याचा’ बहुमान दिला आहे.—लूक १:७४, ७५; इब्री लोकांस १०:२४, २५.

२०, २१. हन्‍नाच्या धार्मिक प्रवृत्तीमुळे तिला कोणते प्रतिफळ मिळाले?

२० यहोवाने हन्‍नाच्या धार्मिक प्रवृत्तीची दखल घेतली आणि तिला विपुलतेने आशीर्वादित केले. एकदा हन्‍ना दरवर्षीप्रमाणे आपल्या कुटुंबासोबत शिलोला गेलेली असताना तिने रडून देवाला प्रार्थना केली व शपथ वाहिली: “हे सेनाधीश परमेश्‍वरा, तू आपल्या ह्‍या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करिशील, माझी आठवण करिशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्‍वराचा व्हावा एतदर्थ मी त्यास समर्पण करीन.” (१ शमुवेल १:९-११) देवाने हन्‍नाची विनवणी ऐकली आणि तिला एक पुत्र देऊन आशीर्वादित केले; तिने या पुत्राचे नाव शमुवेल ठेवले. त्याचे दूध तोडल्यानंतर ती त्याला प्रार्थनामंडपात सेवा करण्यासाठी शिलो येथे घेऊन गेली.—१ शमुवेल १:२०, २४-२८.

२१ हन्‍नाने आपले देवावर प्रेम असल्याचे दाखवले आणि शमुवेलाबद्दल तिने देवाला दिलेला शब्द पाळला. आणि एलकाना व तिचा प्रिय पुत्र यहोवाच्या प्रार्थनामंडपात सेवा करत असल्यामुळे त्यांना किती समृद्ध आशीर्वाद प्राप्त झाला याचा विचार करा! अनेक ख्रिस्ती पालकांना आज अशाचप्रकारचा आनंद व आशीर्वाद प्राप्त होतो कारण त्यांची मुले पूर्णवेळेचे पायनियर सेवक किंवा बेथेल कुटुंबाचे सदस्य या नात्याने, किंवा यहोवाला गौरव आणणाऱ्‍या इतर मार्गांनी त्याची सेवा करत आहेत.

यहोवाचे सतत ऐका

२२, २३. (अ) यहोवाची वाणी सतत ऐकत राहिल्यास आपण कोणती खात्री बाळगू शकतो? (ब) पुढच्या लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

२२ आपण यहोवाचे सतत ऐकत राहिलो तर आपण कशाची खात्री बाळगू शकतो? आपण देवाबद्दल मनःपूर्वक प्रीती बाळगली आणि आपल्या समर्पणाला जागलो तर आपण आध्यात्मिकरित्या समृद्ध असू. हे करत असताना आपल्याला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले तरीसुद्धा यहोवाचे आशीर्वाद अवश्‍य आपल्याला गाठतील—कधीकधी तर आपण कल्पनाही केली नसेल इतक्या अद्‌भुत प्रकारे.—स्तोत्र ३७:४; इब्री लोकांस ६:१०.

२३ भविष्यात देवाच्या लोकांवर अनेक आशीर्वादांचा वर्षाव होईल. आज्ञाधारकपणे यहोवाची वाणी ऐकणाऱ्‍या ‘मोठ्या लोकसमुदायाचा मोठ्या संकटातून’ बचाव केला जाईल आणि ते देवाच्या नव्या जगात आनंदी जीवनाचा उपभोग घेतील. (प्रकटीकरण ७:९-१४; २ पेत्र ३:१३) तेथे, यहोवाच्या नीतिमान तत्त्वांच्या अनुरूप असलेल्या त्याच्या सर्व लोकांच्या इच्छा तो सर्वार्थाने पूर्ण करील. (स्तोत्र १४५:१६) पण पुढील लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे, आज देखील जे लोक यहोवाची वाणी सतत ऐकतात त्यांना तो ‘वरून उत्तम देणग्या व पूर्ण दाने’ देतो.—याकोब १:१७.

[तळटीप]

^ हन्‍नाच्या प्रार्थनेतील शब्द, कुमारी मरियेने ती मशीहाची आई होणार असे तिला सांगण्यात आल्यानंतर केलेल्या प्रार्थनेशी मिळतेजुळते आहेत.—लूक १:४६-५५.

तुम्हाला आठवते का?

• इस्राएलच्या इतिहासावरून आपण देवाच्या आशीर्वादांबद्दल काय शिकू शकतो?

• बवाज व नाबाल कशाप्रकारे वेगळे होते?

• आपण हन्‍नाचे अनुकरण कशाप्रकारे करू शकतो?

• आपण यहोवाची वाणी सतत का ऐकली पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

शलमोन राजाने आज्ञाधारक हृदयाची विनंती केली आणि यहोवाने त्याला बुद्धी देऊन आशीर्वादित केले

[१२ पानांवरील चित्र]

बवाज इतरांशी आदराने व दयाळुपणे वागला

[१५ पानांवरील चित्र]

यहोवावर विसंबून राहिल्यामुळे हन्‍नाला समृद्ध आशीर्वाद प्राप्त झाले