व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लोकांमध्ये खरोखर एकी निर्माण करणारे काही आहे का?

लोकांमध्ये खरोखर एकी निर्माण करणारे काही आहे का?

लोकांमध्ये खरोखर एकी निर्माण करणारे काही आहे का?

तुमचे धार्मिक विश्‍वास काहीही असले, तरी जवळजवळ सर्व धर्मांमध्ये सत्याचे चाहते आहेत याजशी तुम्ही सहमत असाल. हिंदू, कॅथलिक, ज्यू आणि इतर धर्मांमध्येही सत्याची कदर करणारे आणि सत्याचा शोध घेणारे लोक आढळतात. तरीही, धर्मामुळेच माणसामाणसांत फुटी निर्माण होतात. काहीजण तर धर्माच्या नावाखाली आपले वाईट हेतू देखील साध्य करतात. सात्विकतेची आणि सत्याची आवड धरणारे प्रामाणिक अंतःकरणाचे सर्व धर्मातील लोक कधी एकतेने राहू शकतील का? एक समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना एकजूट करणे शक्य आहे का?

धर्मामुळे फुटी पडाव्यात ही किती निराशाजनक गोष्ट आहे! काही संघर्षांची ही उदाहरणे पाहा. श्रीलंकेत हिंदू धर्मीय, बौद्ध धर्मीयांशी लढतात. प्रोस्टेस्टंट, कॅथलिक आणि ज्यू यांनी विविध संघर्षांमध्ये एकमेकांचा घात केला आहे. इंडोनेशिया, कोसोव्हो, चेचन्या आणि बॉस्निया येथील स्वतःला “ख्रिस्ती” म्हणवणारे लोक मुसलमानांविरुद्ध लढतात. मार्च २००० मध्ये, धर्मामुळे दोन दिवस चाललेल्या दंगलीत ३०० नायजेरियन लोकांचा मृत्यू झाला. खरोखर, धार्मिक द्वेषभावनेने या संघर्षांतील क्रूरतेला अधिक चेतना दिली आहे.

धर्माच्या नावाखाली केली जाणारी कृत्ये पाहून प्रामाणिक अंतःकरणाचे लोक भयभीत होतात. उदाहरणार्थ, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्‍या पाळकांना काही चर्चेसने पदावर राहू दिले आहे हे पाहून चर्चला जाणाऱ्‍या अनेकांना धक्का बसला आहे. तर इतरांना समलिंगी संबंध आणि गर्भपात यांसारख्या वादविषयांवरून तथाकथित ख्रिश्‍चन पंथांमध्ये भेदभाव झालेले पाहून गोंधळ होतो. स्पष्टतः, धर्माने मानवांना एकत्र आणलेले नाही. तरीही, पुढील अनुभवांमध्ये दाखवल्यानुसार अनेक धर्मांमध्ये सत्यप्रिय लोक आहेत.

ते सत्याच्या शोधात होते

ला पाझ, बोलिव्हिया येथे सान फ्रान्सिस्कोच्या कॅथलिक चर्चमध्ये फीदेल्या नावाची एक सच्ची आणि आवेशी भक्‍त होती. ती मरियेला साष्टांग नमस्कार करून क्रूसासमोर तिच्या परीने सर्वात उत्तम प्रतीच्या मेणबत्त्या लावत असे. दर आठवडी, ती पाळकाला गोरगरिबांमध्ये वाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्‍न द्यायची. परंतु, फीदेल्याच्या पाच बाळांचा बाप्तिस्मा होण्याआधीच मृत्यू झाला. पाळकाने तिला सांगितले की, तिची बालके लिंबो येथील अंधकारात यातना भोगत आहेत; तेव्हा ती विचार करू लागली, की ‘जर देव प्रेमळ आहे तर मग तो असे का करेल?’

तारा एक डॉक्टर आहे; नेपाळमधील काठमांडू येथे तिच्यावर लहानपणापासून हिंदू संस्कार झाले होते. शतकानुशतकांपासून तिचे पूर्वज करत आले होते तसे ती देखील हिंदू मंदिरांमध्ये देवतांची व तिच्या घरात ठेवलेल्या मूर्तींची उपासना करत असे. परंतु, इतके दुःख का आहे, लोक का मरतात अशा प्रश्‍नांची उत्तरे तिला सापडली नव्हती. तिला आपल्या धर्मात याची समाधानकारक उत्तरे मिळाली नव्हती.

पान्या हा बौद्ध होता; थायलंड येथील बँकॉकमध्ये एका कालव्याशेजारी असलेल्या घरात तो लहानाचा मोठा झाला. पूर्वजन्मातील कर्मांमुळे दुःख भोगावे लागते पण मोहमाया सोडून दिल्यास या दुःखातून मुक्‍ती मिळू शकते असे त्याला शिकवण्यात आले होते. तसेच, पहाटेच्या वेळी घरोघरी जाऊन भिक्षा मागणाऱ्‍या भगव्या झग्यातील भिक्षुंचा त्यांच्या सुज्ञपणासाठी आदर करावा ही शिकवण इतर प्रांजळ बौद्धांप्रमाणे त्यालाही देण्यात आली होती. तो ध्यान करत असे आणि बुद्धाच्या मूर्ती गोळा करत असे. यामुळे संरक्षण मिळते असा त्याचा विश्‍वास होता. एका गंभीर अपघातात पान्याचा कमरेपासून खालचा भाग लुळा पडल्यावर तो वेगवेगळ्या बौद्ध मठांमध्ये जाऊ लागला; आपण चमत्कारिकरित्या बरे केले जाऊ अशी त्याला आशा होती. पण तो बरा झाला नाही किंवा त्याला आध्यात्मिक प्रबोधनही लाभले नाही. उलट, तो भूतविद्येच्या संपर्कात आला आणि भूतविद्या करू लागला.

व्हर्जल याचा जन्म अमेरिकेत झाला; कॉलेजात असताना तो ब्लॅक मुस्लिम नावाच्या गटात सामील झाला. तो त्यांच्या पत्रिका आवेशाने वाटायचा ज्यामध्ये अशा आशयाचा संदेश होता की, गोरा माणूस सैतान आहे. म्हणूनच, गोरे लोक काळ्या लोकांवर अत्याचार करतात असा त्यांचा विचार होता. व्हर्जल फार प्रामाणिकपणे हे सर्व विश्‍वास करत असला तरी, अनेक प्रश्‍नांमुळे तो समाधानी नव्हता; जसे की, सर्वच गोरे लोक वाईट असणे कसे शक्य आहे? आणि धार्मिक प्रचाराचा जास्त जोर पैशांवर का असतो?

चारोचे लहानपण कॅथलिक वर्चस्व असलेल्या दक्षिण अमेरिकेत गेले; परंतु ती एक प्रामाणिक प्रोस्टेस्टंट होती. इतर लोकांप्रमाणे आपण मूर्तिपूजा करत नाही याचा तिला आनंद वाटे. चारो दर रविवारी चर्चला न चुकता जात असे; तेथे भावनेच्या भरात केल्या जाणाऱ्‍या उपासनेत तीसुद्धा “हालेलुयाह” अशी जोराने ओरडत असे आणि त्यानंतर होणाऱ्‍या धार्मिक नाच-गाण्यात भाग घेत असे. चारोला मनापासून असे वाटत होते की, तिचे तारण झाले आहे आणि ती पुन्हा जन्मली आहे. आपल्या मिळकतीचा दशांश ती चर्चला देत असे आणि टीव्हीवरील तिच्या आवडत्या सुवार्तिकाने देणग्या मागितल्या की ती आफ्रिकेतील मुलांसाठी त्याला पैसे पाठवून देत असे. पण प्रेमळ देव नरकामध्ये आत्म्यांना का छळतो हा प्रश्‍न तिने आपल्या पाळकाला विचारला तेव्हा त्याला अर्थपूर्ण उत्तर देता आले नाही असे तिला जाणवले. नंतर, तिला हेही कळाले की, तिच्या देणग्या आफ्रिकेतील मुलांना मदत करण्यासाठी वापरल्या जात नव्हत्या.

हे पाचही लोक विविध पार्श्‍वभूमीतील असले तरीही त्यांच्यात एक समानता होती: त्यांना सत्याची आवड होती आणि आपल्या प्रश्‍नांची सत्य उत्तरे शोधण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता. पण ते खरोखर एकत्र येऊन खरी उपासना करू शकत होते का? या प्रश्‍नाचे उत्तर पुढील लेखात दिले जाईल.

[४ पानांवरील चित्र]

वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या लोकांमध्ये खरोखर एकी निर्माण होऊ शकते का?

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

G.P.O., Jerusalem