व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनपेक्षित घटनांनी भरलेले यहोवाच्या सेवेतील जीवन

अनपेक्षित घटनांनी भरलेले यहोवाच्या सेवेतील जीवन

जीवन कथा

अनपेक्षित घटनांनी भरलेले यहोवाच्या सेवेतील जीवन

एरीक आणि हेझल बेवरिज यांच्याद्वारे कथित

“मी तुम्हाला सहा महिन्यांची कैद सुनावत आहे.” हे शब्द माझ्या कानात घुमत होते; मला इंग्लंडच्या मँचेस्टर येथील स्ट्रेंजवेज तुरुंगात नेण्यात आले. १९५० सालचा तो डिसेंबर महिना होता; मी त्या वेळी १९ वर्षांचा होतो. माझ्या तारुण्यातील सर्वात कठीण परीक्षेचा मी नुकताच सामना केला होता—लष्करात भरती व्हायला मी नकार दिला होता.—२ करिंथकर १०:३-५.

मी यह वाच्या साक्षीदारांमध्ये पूर्ण वेळेचा पायनियर सेवक होतो. त्यामुळे, आम्हाला लष्करी सेवा माफ असायला हवी होती, पण ब्रिटिश कायद्याला हे मान्य नव्हते. आणि अशाप्रकारे मी तुरुंगात आलो; मला एकट्यालाच एका खोलीत ठेवण्यात आले. मला बाबांची आठवण झाली. खरे तर, माझ्या तुरुंगात येण्याला बाबाच अप्रत्यक्षपणे कारणीभूत होते.

त्याचे काय आहे की, माझे बाबा—एक तुरुंग अधिकारी—ठाम मतवादी आणि तत्त्वनिष्ठ असलेले यॉर्कशायरवासी होते. लष्करात आणि तुरुंगात अनेक वर्षे सेवा करताना आलेल्या अनुभवांमुळे त्यांना कॅथलिक धर्माबद्दल जबरदस्त तिरस्कार होता. १९३० च्या दशकाच्या सुरवातीला, प्रथमच त्यांची भेट साक्षीदारांबरोबर झाली; दारावर आलेल्या साक्षीदारांना हाकलून द्यायला ते गेले खरे पण येताना हातात त्यांची काही पुस्तके घेऊन आले! नंतर त्यांनी कॉन्सोलेशन (आता सावध राहा!) मासिकाची वर्गणी केली. साक्षीदार दरवर्षी येऊन नवीन वर्गणी भरायला त्यांना उत्तेजन देत असत. मी सुमारे १५ वर्षांचा होतो तेव्हा एकदा ते साक्षीदार बाबांसोबत एका विषयावर चर्चा करत होते; आणि त्या वेळी मी साक्षीदारांची बाजू घेतली. तेव्हापासूनच मी बायबलचा अभ्यास करू लागलो.

मार्च १९४९ साली, मी १७ वर्षांचा झाल्यावर यहोवाला माझ्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतला. त्याच वर्षी नंतर माझी भेट जॉन आणि मायकल शरूक यांच्याशी झाली; गिलियड मिशनरी प्रशालेतून ते नुकतेच पदवीधर झाले होते आणि नायजेरियाला चालले होते. त्यांचा मिशनरी आत्मा पाहून मी खूप प्रभावित झालो. तोच आत्मा त्यांनी माझ्यातही रुजवला—पण कदाचित त्यांना ते कळालेही नसेल.

बायबलचा अभ्यास करताना, विद्यापीठातील शिक्षणामध्ये मला रस उरला नाही. लंडनमधील सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरी करण्यासाठी घर सोडून मला एक वर्षही पूर्ण झाले नव्हते तोवर मला असे वाटू लागले की, नोकरी करत राहून मी देवाला केलेले समर्पण पूर्ण करू शकणार नाही. मी राजीनामा दिला तेव्हा बऱ्‍याच वर्षांपासून कार्यालयात नोकरी करणाऱ्‍या एकाने माझे अभिनंदन केले कारण मी “मनाला नाशकारक असणारी नोकरी” सोडत होतो.

याच्या आधी माझ्यासमोर आणखी एक कठीण प्रश्‍न होता—ही चांगली नोकरी सोडून पूर्ण-वेळेच्या सेवेत उतरण्याची माझी इच्छा आहे हे बाबांना कसे सांगावे? एकदा मी सुटीला घरी गेलो होतो, त्या वेळी ही धक्केदायक बातमी मी घरी ऐकवली. मला वाटले बाबा मला चांगलेच सुनावतील. पण ते मला फक्‍त एवढेच म्हणाले: “तुला जो निर्णय घ्यायचा तो घे, पण त्याचे परिणामही तुलाच सहन करावे लागतील. कुठं काही बिघडलं तर मग माझ्याकडे धावत यायचं नाही.” जानेवारी १, १९५० या तारखेसाठी माझ्या डायरीत अशी नोंद आहे: “बाबांना पायनियरींगबद्दल सांगितलं. त्यांचा समजूतदारपणा आणि मदत करायची प्रवृत्ती पाहून एकदम आश्‍चर्याचा धक्का बसला. त्यांचा चांगुलपणा पाहून मला रडू आवरले नाही.” मी नोकरीला राजीनामा दिला आणि पूर्ण-वेळेची पायनियर नियुक्‍ती स्वीकारली.

“बंगल्यातली” नियुक्‍ती

त्यानंतर, ईश्‍वरनिष्ठेतील पुढची परीक्षा आली. वेल्स येथील सह-ख्रिश्‍चन, लॉईड ग्रिफीथ्स यांच्यासोबत लांकाशायर येथे एका “बंगल्यात” राहून पायनियरींग करण्याची नियुक्‍ती मला देण्यात आली. त्या बंगल्याविषयी मनात स्वप्ने रंगवून मी, पावसाने चिंब भिजलेल्या बेकप या अनाकर्षक शहरात उतरलो. ज्याला मी बंगला समजत होतो ते तळघर होते हे पाहून माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला! रात्रीच्या वेळी, उंदरं आणि झुरळं आमच्यासोबतीला असायची. आल्या पावली घरी परतावे असे मला वाटत होते. पण, या परीक्षेला तोंड देण्यासाठी मी मनातल्या मनात प्रार्थना करून देवाला मदतीची याचना केली. अचानक, माझे मन स्थिरावले आणि मी वास्तविक दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहू लागलो. ही नियुक्‍ती मला यहोवाच्या संघटनेकडून मिळालेली होती. त्यामुळे मदतीसाठी मी त्याच्यावरच विसंबून राहायचे ठरवले. त्या परिस्थितीत टिकून राहिल्याचा मला आनंद होतो कारण मी जर टिकून राहिलो नसतो तर माझे संपूर्ण आयुष्य बदलले असते!—यशया २६:३, ४.

लष्करी सेवा नाकारल्यामुळे मला तुरुंगात नेण्याआधी जवळजवळ नऊ महिने मी आर्थिकदृष्टीने मंदी असलेल्या रोसंडेल व्हॅलीत (त्या काळी या नावाने ओळखले जात होते) प्रचार केला. दोन आठवडे स्ट्रेंजवेज तुरुंगात काढल्यावर, इंग्लंडच्या दक्षिण किनारपट्टीवरील लुईस तुरुंगात मला हलवण्यात आले. सरतेशेवटी, त्या ठिकाणी आम्ही एकूण पाच साक्षीदार होतो आणि तुरुंगातच आम्हाला ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक दिन साजरा करता आला.

बाबा मला एकदा भेटायला आले. एक सुप्रसिद्ध तुरुंग अधिकारी तुरुंगात डांबलेल्या आपल्या मुलाला पाहायला येतात ही त्यांच्या अभिमानाची परीक्षाच असावी! बाबांच्या त्या भेटीसाठी मी नेहमी ऋणी राहीन. शेवटी, एप्रिल १९५१ मध्ये माझ्या सुटकेचा दिवस आला.

लुईस येथून सुटल्यावर मी ट्रेन पकडून वेल्सच्या कार्डीफ येथे गेलो; बाबा तेथे तुरुंगात प्रमुख अधिकारी म्हणून होते. आम्हा चार भावंडांपैकी म्हणजे तीन भाऊ आणि एक बहीण यांच्यापैकी मी सर्वात थोरला होतो. पायनियरींगमध्ये राहण्यासाठी मला माझा खर्च भागवणारी अर्ध-वेळेची नोकरी करावी लागली. मी एका कपड्याच्या दुकानात काम करू लागलो पण माझ्या जीवनात एकच ध्येय होते—ख्रिस्ती सेवा. या दरम्यान आमची आई आम्हाला सोडून गेली. या घटनेमुळे बाबांना आणि आम्हा मुलांना हादरा बसला; त्या वेळी आम्ही ८ ते १९ च्या वयात होतो. दुःखाची गोष्ट म्हणजे, आमच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला.

चांगली पत्नी मिळालेला. . .

मंडळीत अनेक पायनियर होते. त्यांच्यापैकी, कोळशाच्या खाणी असलेल्या ऱ्‍होंडा व्हॅलीच्या ठिकाणाहून दररोज कामाला आणि त्यानंतर प्रचार कार्याला येणारी एक बहीण होती. तिचे नाव होते हेझल ग्रीन; ती एक उत्तम पायनियर होती. हेझल माझ्या आधी कित्येक वर्षांपासून सत्य जाणून होती—तिचे आईवडील १९२० च्या दशकापासून बायबल विद्यार्थ्यांच्या (आता, यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जाणारे) सभांना उपस्थित राहत होते. पण तिच्याच तोंडून तिची कहाणी ऐका.

“१९४४ मध्ये रिलिजन रीप्स द व्हर्लवींड ही पुस्तिका वाचेपर्यंत मी बायबलचा कधीच गंभीरतेने विचार केला नव्हता. माझ्या आईने मला कार्डीफ येथील एका विभागीय संमेलनाला जायला गळ घातली. बायबलविषयी काहीच ज्ञान नसताना, मुख्य बाजार पेठेत गळ्यात एक प्लाकार्ड घालून एका जाहीर भाषणाची घोषणा करण्यात मी भाग घेतला. पाळकांनी आणि इतरांनी आम्हाला खूप त्रास दिला तरीही मी कशीबशी त्यातून निभावले. १९४६ साली माझा बाप्तिस्मा झाला आणि त्याच वर्षाच्या डिसेंबरमध्ये मी पायनियरींग करू लागले. मग १९५१ साली, कार्डीफमध्ये एक तरुण पायनियर आला; नुकताच तुरुंगातून सुटून आलेला. तो होता एरीक.

“आम्ही दोघं सोबत प्रचाराला जायचो. आमचं चांगलं जमायचं. आमची ध्येयेसुद्धा एकच होती—देव राज्यासंबंधी गोष्टींना बढावा देणे. म्हणून १९५२ साली आम्ही लग्न केले. आम्ही दोघं पूर्ण-वेळेच्या पायनियरींग सेवेत होतो आणि आमची मिळकतही मोजकीच होती तरीही गरजेच्या वस्तूंची चणचण आम्हाला कधीच भासली नाही. काही वेळा असे होत असे की, कोणा साक्षीदार बहिणीने किराणाच्या सामानात जास्त जॅम किंवा साबण मागवल्यामुळे ते आम्हाला दिले जात असे—आणि तेही अगदी आम्हाला हवे असायचे तेव्हाच! अशाप्रकारे व्यावहारिक पद्धतीने केलेल्या मदतीबद्दल आम्ही नेहमी कदर बाळगली. पण याहून अधिक अनपेक्षित घटना समोर होत्या.”

जीवन बदलून टाकणारी अनपेक्षित घटना

नोव्हेंबर १९५४ साली, आमच्या जीवनात एक अनपेक्षित घटना घडली; लंडनमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरातून मला एक अर्ज आला होता; त्यामध्ये प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने प्रत्येक आठवडी एका नवीन मंडळीला भेट देण्यासाठी मला विचारण्यात आले होते. ही नक्कीच चूक झाली आहे अशी आम्हाला अगदी खात्री होती म्हणून मंडळीत आम्ही कोणालाही याविषयी सांगितले नाही. पण, तो फॉर्म मी भरून पाठवून दिला आणि काय होते ते पाहू म्हणून थांबून राहिलो. काही दिवसांनी आम्हाला उत्तर आले, “प्रशिक्षणासाठी लंडनला या”!

लंडनच्या दफ्तरात पोहंचल्यावर, अवघ्या २३ वर्षांच्या वयात आपण प्राईस ह्‍यूझ, एमलन वाईन्स, अर्नी बीवर, अर्नी गायव्हर, बॉब गोह, ग्लीन पार, स्टॅन आणि मार्टिन वुडबर्न तसेच इतर अनेक आध्यात्मिकतेत मजबूत असलेल्या उल्लेखनीय बांधवांसोबत प्रशिक्षण घेणार आहोत हे पाहून मला विश्‍वासच बसेना. त्यांपैकीचे बरेच बांधव आता हयात नाहीत. १९४० आणि १९५० च्या दशकांमध्ये ब्रिटन येथे त्यांनी आवेश आणि सचोटीचा पक्का पाया घातला.

इंग्लंडमधील विभागीय कार्य —कधीच कंटाळवाणे नव्हते

आमचे प्रवासी कार्य १९५४/५५ च्या अतिशय थंड हिवाळ्यात सुरू झाले. आम्हाला पूर्व अँग्लिया येथे नियुक्‍त करण्यात आले; हा इंग्लंडमधील एक सपाट प्रदेश होता जेथे उत्तर समुद्रावरील थंड वारे वाहत असत. त्या काळी, ब्रिटनमध्ये केवळ ३१,००० साक्षीदार होते. पहिल्या विभागातील नेमणूक आमच्यासाठी कठीण अनुभव होता. पण आम्ही भेट देत असलेल्या बांधवांनाही कठीणच होते. माझा कमी अनुभव आणि यॉर्कशायरच्या सडेतोडपणामुळे मी काही वेळा बांधवांना दुखावले. हळूहळू मला हे शिकावे लागले की, कार्यक्षमतेपेक्षा नम्रता अधिक महत्त्वाची आहे आणि नियमांपेक्षा लोक जास्त महत्त्वाचे आहेत. येशूप्रमाणे इतरांना विसावा देण्याचा प्रयत्न मी अजूनही करतो पण नेहमीच मला हे जमत नाही.—मत्तय ११:२८-३०.

पूर्व अँग्लिया येथे १८ महिने कार्य केल्यावर इंग्लंडच्या ईशान्येकडे टाईन नदीकाठी वसलेले न्यूकॅसेल आणि नॉथंबरलंडमधील विभागात सेवा करण्याची नियुक्‍ती आम्हाला मिळाली. त्या रम्य भागातील प्रेमळ लोक मला खूप आवडले. अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील सीएटल येथून आलेले डॉन वॉर्ड या प्रांतीय पर्यवेक्षकांमुळे मला बरीच मदत मिळाली. ते गिलियडच्या २० व्या वर्गातील पदवीधर होते. मी भाषण देताना एकदम एक्सप्रेस्स गाडीसारखा धडाधड बोलून जायचो. त्यांनी मला हळू कसे बोलायचे, बोलताना कसे थांबायचे आणि शिकवायचे ते दाखवले.

जीवन बदलून टाकणारी आणखी एक अनपेक्षित घटना

आम्हाला १९५८ साली एक पत्र मिळाले आणि आमचे जीवन एकदम बदलून गेले. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील साऊथ लान्सिंग येथे गिलियड प्रशालेला उपस्थित राहायला आम्हाला बोलवण्यात आले होते. आम्ही आमची १९३५ सालाची ऑस्टिन सेव्हन मोटार विकली आणि न्यूयॉर्कला जहाजाने प्रवास करण्यासाठी तिकिटे खरेदी केली. प्रथम आम्ही न्यूयॉर्क सिटीत यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिलो. तेथून ओन्टारियोतील पीटरबरो येथे जाऊन सहा महिने पायनियरींग केली आणि मग गिलियड प्रशालेसाठी दक्षिणेकडे गेलो.

प्रशाला शिक्षकांमध्ये अल्बर्ट श्रोडर (जे सध्या नियमन मंडळाचे सदस्य आहेत) तसेच मॅक्सवेल फ्रेंड आणि जॅक रेडफर्ड (जे सध्या हयात नाहीत) हे होते. १४ देशांतून आलेल्या ८२ विद्यार्थ्यांचा सहवास अत्यंत उभारणीकारक होता. आम्हाला हळूहळू एकमेकांच्या संस्कृतींविषयी समजू लागले. इंग्रजी बोलता न येणाऱ्‍या परदेशी विद्यार्थ्यांसोबत राहून आम्हाला समजले की, आम्हालाही नवीन भाषा शिकताना असाच त्रास होईल. पाच महिन्यांनी आमचे प्रशिक्षण पूर्ण झाले आणि आम्हाला २७ देशांमध्ये नियुक्‍त करण्यात आले. त्यानंतर पदवीधर होण्याचा दिवस आला. आणि काही दिवसांनी आम्ही पुन्हा न्यूयॉर्क सिटीत युरोपला परतण्यासाठी आमच्या क्वीन एलीझाबेथ नावाच्या जहाजासाठी थांबलो होतो.

आमची पहिली परदेशी नेमणूक

आम्हाला कोणती नेमणूक मिळाली असावी? पोर्तुगाल! नोव्हेंबर १९५९ साली आम्ही लिस्बनमध्ये पोहंचलो. आता एका नवीन भाषेशी आणि संस्कृतीशी जुळवून घेण्याची परीक्षा आमच्यासमोर होती. १९५९ साली, पोर्तुगालमध्ये सुमारे ९० लाखाच्या लोकसंख्येतील ६४३ साक्षीदार सक्रिय होते. पण प्रचारकार्याला कायदेशीर मान्यता नव्हती. राज्य सभागृहे होती परंतु बाहेर काहीच बोर्ड लावलेले नव्हते.

मिशनरी एल्झा पीकोनी यांनी आम्हाला पोर्तुगीज भाषा शिकवल्यावर हेझल आणि मी लिस्बन, फारू, एव्यूरा आणि बेझा येथील आसपासच्या मंडळ्यांना आणि गटांना भेटी देत गेलो. मग १९६१ मध्ये परिस्थिती बदलू लागली. मी झ्वाऊ गोन्साल्व्हीश माटेयुस नावाच्या एका तरुण माणसासोबत बायबलचा अभ्यास करत होतो. त्याने लष्करी सेवेच्या संदर्भात ख्रिश्‍चनाची तटस्थ भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लागलीच मला पोलिस मुख्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले. मग आणखी एक अनपेक्षित घटना घडली. काही दिवसांनी आम्हाला कळवण्यात आले की, देश सोडून जायला आम्हाला फक्‍त ३० दिवसांची मुदत दिली आहे! बाकीचे मिशनरी, एरीक आणि क्रिस्टीना ब्रिटन आणि डोमेनिक आणि एल्झा पीकोनी यांनाही असेच कळवण्यात आले.

मी सुनावणीसाठी अपील केल्यावर आम्हाला गुप्त पोलिसांच्या प्रमुख अधिकाऱ्‍याला भेटायची परवानगी मिळाली. आम्हाला सोडून जायला का सांगितले जात आहे याचे कारण त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले आणि एका व्यक्‍तीचे नावही सांगितले—झ्वाऊ गोन्साल्व्हीश माटेयुस. तोच माझा बायबल विद्यार्थी! त्यांनी पुढे म्हटले की, ब्रिटनमध्ये एखाद्याच्या विवेकाला पटत नसल्यामुळे लष्करी सेवेतून सूट मिळणे शक्य आहे पण पोर्तुगालमध्ये ती सवलत नाही. त्यामुळे आम्हाला पोर्तुगाल सोडावे लागले आणि झ्वाऊशी माझा संपर्क तुटला. पण २६ वर्षांनंतर, पोर्तुगालच्या नव्या बेथेल गृहाच्या समर्पणाच्या वेळी तो, त्याची पत्नी आणि तीन मुली यांना पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला! पोर्तुगालमधील आमची सेवा व्यर्थ ठरली नव्हती तर!—१ करिंथकर ३:६-९.

आमची पुढील नेमणूक कोणती असावी? तीसुद्धा अनपेक्षितच होती. शेजारील स्पेन देश. फेब्रुवारी १९६२ साली, लिस्बन येथून ट्रेन घेऊन आम्ही मॅड्रीडला निघालो; निरोप घेताना आम्हाला रडू आवरले नाही.

आणखी एका नवीन संस्कृतीशी जुळवून घेणे

स्पेनमध्ये लपूनछपून प्रचारकार्य करण्याच्या आणि सभा भरवण्याच्या पद्धतीची आम्हाला सवय करून घ्यावी लागली. प्रचार करताना आम्ही एका घरी प्रचार केल्यावर त्याच्याच शेजारच्या घरात कधीच प्रचार करत नव्हतो. दुसऱ्‍या आळीत जाऊन किंवा दुसऱ्‍या इमारतीत जाऊन आम्ही प्रचार करायचो. त्यामुळे आम्ही सहजासहजी पोलिसांच्या—किंवा पाळकांच्या—तावडीत सापडत नव्हतो. त्या देशात कॅथलिक हुकूमशाही चालत होती आणि आमच्या प्रचारकार्यावर बंदी होती. आम्ही परदेशी असल्यामुळे ओळखले जाऊ नये म्हणून स्पॅनिश नावे धारण केली होती. माझे नाव पाब्लो तर हेझलचे नाव क्वाना होते.

काही महिने मॅड्रीडमध्ये काम केल्यावर आम्हाला बार्सेलोना येथे विभागीय कार्यासाठी नेमण्यात आले. त्या शहरातल्या विविध मंडळ्यांना आम्ही भेटी दिल्या. पुष्कळदा आम्ही प्रत्येक मंडळीसोबत दोन ते तीन आठवडे राहत असू. कारण प्रत्येक पुस्तक अभ्यास गटाला मंडळीप्रमाणे भेट द्यावी लागायची; त्यामुळे एका आठवड्यात दोन गटांना भेट दिली जायची.

अनपेक्षित आव्हान

आम्हाला १९६३ साली स्पेनमध्ये प्रांतीय कार्य करण्याचे आमंत्रण मिळाले. त्या वेळी सक्रिय असलेल्या ३,००० साक्षीदारांना भेट देण्यासाठी आम्हाला संपूर्ण देशभर जावे लागणार होते; तेव्हा एकूण नऊ विभाग होते. सेवीलजवळ असलेल्या जंगलात, कीकोनजवळ एका मळ्यामध्ये आणि मॅड्रीड, बार्सेलोना व लग्रोन्योच्या नद्यांजवळ गुप्तेत भरवलेली विभागीय संमेलने आमच्या नेहमीच आठवणीत राहतील.

घरोघरचे प्रचारकार्य करताना मी दक्षतेसाठी जवळपासच्या गल्लीबोळा कुठे आणि कशा आहेत ते पाहून घ्यायचो म्हणजे वेळ आलीच तर पळायला मार्ग मिळेल. एकदा मॅड्रीडमध्ये प्रचार करताना, एका साक्षीदारासोबत मी वरच्या मजल्यावर होतो आणि अचानक खालून आम्हाला आरडाओरड ऐकू येऊ लागली. खाली आल्यावर आम्हाला किशोरवयीन मुलींचा एक गट दिसला; त्या, इकास द मारिया (मरियेच्या मुली) या कॅथलिक गटाच्या सदस्या होत्या. त्या शेजाऱ्‍यांना आमच्याबद्दल ताकीद देत होत्या. त्यांच्याशी काही बोलणे व्यर्थ होते, त्यामुळे तेथून लगेच निघून जाण्यातच शहाणपण होते असे मला वाटले; नाहीतर आम्ही पोलिसांच्या तावडीत सापडलो असतो. आम्ही होता होईल तितक्या लवकर तेथून निसटलो!

स्पेनमधील ती वर्षे खरोखर थरारक होती. तेथील बंधू-बहिणींना आणि खास पायनियर सेवकांना आम्ही उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत होतो. देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी आणि मंडळ्या स्थापित करण्यासाठी ते तुरुंगाचा धोका पत्करत असत आणि सहसा त्रासात दिवस काढत असत.

याच दरम्यान आम्हाला एक वाईट बातमीही ऐकायला मिळाली. हेझल म्हणते: “१९६४ मध्ये, माझी आई जी एक विश्‍वासू साक्षीदार होती ती मरण पावली. तिच्या जाण्याचे दुःख तर होतेच पण तिला शेवटचे एकदा भेटायलाही मिळाले नाही. मिशनरी कार्यात असलेल्या अनेकांनी हा त्याग केला आहे.”

एकदाचे स्वातंत्र्य

कित्येक वर्षे छळ सहन केल्यावर जुलै १९७० साली फ्रँकोंच्या सरकाराकडून आमच्या कार्याला कायदेशीर मान्यता मिळाली. राज्य सभागृहे जेव्हा प्रथम उघडण्यात आली तेव्हा हेझल आणि मला खूप आनंद झाला—पहिले सभागृह मॅड्रीड येथे आणि दुसरे बार्सेलोनातील लसेप्स येथे. सहसा या सभागृहांपुढे मोठे बोर्ड लावले जायचे आणि सहसा ते बोर्ड लाईटने सजवलेले असायचे. आम्हाला लोकांना हे दाखवायचे होते की, आम्हाला कायदेशीर मान्यता मिळालेली आहे आणि आम्ही स्पेनमध्ये टिकणार आहोत! या दरम्यान म्हणजे १९७२ साली स्पेनमध्ये जवळजवळ १७,००० साक्षीदार होते.

याच काळात, मला इंग्लंडहून काही उत्तेजनदायक बातमी मिळाली. १९६९ मध्ये माझे बाबा स्पेनमध्ये आम्हाला भेटायला आले होते. स्पॅनिश बांधवांनी दिलेल्या वागणुकीमुळे ते इतके प्रभावित झाले की, इंग्लंडला पोहंचल्यावर त्यांनी बायबलचा अभ्यास सुरू केला होता. मग १९७१ मध्ये मला असे ऐकायला मिळाले की, बाबांनी बाप्तिस्मा घेतला! आम्ही घरी गेलो तेव्हा माझे ख्रिस्ती बांधव या नात्याने बाबांनी जेवणाच्या वेळी प्रार्थना केली. तो क्षण फारच हृदयस्पर्शी होता! २० वर्षांपासून मी त्या दिवसाची वाट पाहत होतो. माझा भाऊ बॉब आणि त्याची पत्नी आयरीस हे १९५८ मध्ये साक्षीदार झाले होते. त्यांचा मुलगा फिलिप सध्या स्पेनमध्ये आपली पत्नी जीन हिच्यासोबत विभागीय पर्यवेक्षकाचे काम करत आहे. त्या सुंदर देशात त्यांना सेवा करताना पाहून आम्हाला खूप आनंद होतो.

सर्वात अलीकडील अनपेक्षित घटना

फेब्रुवारी १९८० मध्ये, नियमन मंडळाचे एक सदस्य परिमंडल पर्यवेक्षक या नात्याने स्पेनला आले. त्यांना माझ्यासोबत सेवा करायची होती हे ऐकून मला आश्‍चर्य वाटले. खरे तर, ते माझी परीक्षा घेत होते याची मला जरासुद्धा माहिती नव्हती! मग सप्टेंबरमध्ये, आम्हाला न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथील जागतिक मुख्यालयात राहण्यासाठी बोलवण्यात आले. आम्हाला आश्‍चर्याचा जबरदस्त धक्का बसला. आमच्या स्पॅनिश बंधूभगिनींचा जड अंतःकरणाने निरोप घ्यावा लागणार होता तरीसुद्धा आम्ही हे आमंत्रण स्वीकारले. त्या वेळी, तेथे ४८,००० साक्षीदार होते!

आम्ही स्पेन सोडले तेव्हा एका बांधवाने मला बक्षीस म्हणून एक पॉकेट वॉच दिले. त्यावर दोन वचने लिहिली होती—“लुकास १६:१०; लुकास १७:१०.” ती माझी मुख्य वचने होती असे ते बांधव म्हणाले. लूक १६:१० मध्ये लहान गोष्टींमध्ये विश्‍वासू असले पाहिजे असे सांगितले आहे; आणि लूक १७:१० म्हणते, की आपण “निरुपयोगी दास आहो” व म्हणून टेंभा मिरवण्याचे काही कारण नाही. यहोवाच्या सेवेत आपण काहीही केले तरी समर्पित ख्रिस्ती या नात्याने हे आपले कर्तव्यच आहे याची जाणीव मला नेहमी झाली आहे.

स्वास्थ्यासंबंधी अनपेक्षित घटना

मला १९९० मध्ये हृदयाचा त्रास सुरू झाला. बंद झालेली माझी एक धमनी मोकळी करण्यासाठी एक नळी बसवावी लागली. आजारपणाच्या या कठीण काळात हेझलने मला बराच आधार दिला; मला उचलता न येणारे सामानसुमान सहसा तीच उचलत असे. मग मे २००० मध्ये माझ्या हृदयात एक पेसमेकर बसवण्यात आले. त्यामुळे केवढा फरक झाला आहे म्हणून सांगू.

गेल्या ५० वर्षांमध्ये हेझलला आणि मला याचा प्रत्यय आला आहे की, यहोवाचा हात कधीच तोकडा नाही आणि तो त्याचे उद्देश त्याच्या योग्य समयी पूर्ण करतो, आपल्या सोयीनुसार नाही. (यशया ५९:१; हबक्कूक २:३) आमच्या जीवनात अनेक आनंद देणाऱ्‍या आणि काही दुःख देणाऱ्‍या अनपेक्षित घटना घडल्या आहेत; पण यहोवाने आम्हाला या सर्वातून पार व्हायला मदत केली आहे. येथे यहोवाच्या लोकांच्या जागतिक मुख्यालयात नियमन मंडळाच्या सदस्यांशी निकट सहवासात राहण्याचा मोठा आशीर्वाद आम्हाला लाभला आहे. कधी कधी मी स्वतःलाच विचारतो, ‘आम्ही खरोखरच इथं आहोत का?’ आम्ही या कृपेसाठी बिलकूल पात्र नाही. (२ करिंथकर १२:९) सैतानाच्या कुयुक्‍त्‌यांपासून यहोवा आमचे संरक्षण करील आणि या पृथ्वीवर त्याची धार्मिक सत्ता येईल त्या दिवसाचा आनंद लुटण्यासाठी आम्हाला वाचवेल याची आम्हाला खात्री आहे.—इफिसकर ६:११-१८; प्रकटीकरण २१:१-४.

[२६ पानांवरील चित्र]

मँचेस्टर येथील स्ट्रेंजवेज तुरुंग जेथे मी प्रथम तुरुंगवास भोगला

[२७ पानांवरील चित्र]

इंग्लंडमध्ये विभागीय कार्यात आमच्या ऑस्टिन सेव्हन मोटारीसोबत

[२८ पानांवरील चित्र]

स्पेनच्या मॅड्रीडमधील थरसीदील्या येथील गुप्त संमेलन, १९६२ साली

[२९ पानांवरील चित्र]

ब्रुकलिन येथे साक्ष देण्याच्या मेजाजवळ