खरा विश्वास आजही बाळगणे शक्य आहे का?
खरा विश्वास आजही बाळगणे शक्य आहे का?
“विश्वास म्हणजे देवाच्या कृपेवरील जिवंत, धाडसी आत्मविश्वास; तो इतका पक्का आणि ठाम असतो की विश्वास करणारी व्यक्ती त्याकरता हजार वेळा देखील जीवाचा धोका पत्करेल.”—मार्टिन लुथर, १५२२.
“आपला समाज धर्मनिरपेक्ष बनला आहे, ख्रिस्ती विश्वास आणि प्रथा जवळजवळ नाहीशा झाल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही.”—लूडोव्हिक केनेडी, १९९९.
विश्वासाबद्दल लोकांची फार वेगळी मते आहेत. पूर्वी, देवावर विश्वास ठेवणे फार सर्वसामान्य गोष्ट होती. पण आज, संशयी प्रवृत्तीच्या आणि दुःखाच्या जगात, देवावरील आणि बायबलवरील खरा विश्वास झपाट्याने नाहीसा होत आहे.
खरा विश्वास
अनेकांच्या मते, धार्मिक विश्वास किंवा उपासनेची एक पद्धत असणे म्हणजे “विश्वास” होय. परंतु, बायबलमध्ये वापरण्यात आल्यानुसार “विश्वास” याचा मूळ अर्थ पूर्ण भरवसा अर्थात देवावर आणि त्याच्या अभिवचनांवर दृढ, न डगमगणारा आत्मविश्वास असा होतो. हे येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचे वैशिष्ट्य आहे.
एकदा, येशू ख्रिस्ताने प्रार्थना करण्याच्या गरजेविषयी आणि ‘खचून न जाण्याच्या गरजेविषयी’ सांगितले. हे सांगताना, त्याने असा प्रश्न केला की, आपल्या दिवसात खरा विश्वास मुळात असेल का? त्याने विचारले: “मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर [हा] विश्वास आढळेल काय?” पण, त्याने असा प्रश्न का विचारला असावा?—लूक १८:१, ८.
उडालेला विश्वास
अनेक कारणांमुळे लोकांचा विश्वास उडू शकतो. दररोजच्या जीवनातल्या अघटित आणि अडीअडचणीचे प्रसंग हे एक कारण असू शकते. उदाहरणार्थ, १९५८ साली म्युनिक येथे विमान अपघाताचा दुःखद प्रसंग घडला त्या वेळी मायकल गोल्डर हे इंग्लंडच्या मँचेस्टर येथे एका भागात पाळक होते; त्या अपघातात, मँचेस्टर युनायटेड या फुटबॉल संघातील बहुतांश खेळाडू ठार झाले होते. बीबीसीवरील एका टीव्ही कार्यक्रमात, सादरकर्ती जोन बेकवेल म्हणाली की, गोल्डर यांना “लोकांच्या असह्य दुःखापुढे हतबल झाल्यासारखे वाटले.” त्यामुळे, “मानवांना मदत करणारा देव आहे यावरून [त्यांचा] विश्वास उडाला.” गोल्डर यांनी आपले विचार अशाप्रकारे मांडले: “बायबल . . . देवाचे निर्दोष वचन नाही” तर
“मनुष्याचे सदोष वचन आहे ज्याला अधूनमधून दैवी प्रेरणा मिळालेली आहे.”काही वेळा, विश्वास हळूहळू नाश पावतो. लेखक आणि प्रसारकर्ता लूडोव्हिक केनेडी यांच्या बाबतीत हेच घडले. ते म्हणतात की, लहानपणापासून माझ्या “मनात [देवाविषयी] शंकाकुशंका आणि अनिश्चितता अधूनमधून डोकवायची आणि [माझा] अविश्वास वाढत गेला.” त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे कोणीच देऊ शकले नाही. त्यांचे वडील समुद्रप्रवासाच्या दरम्यान मरण पावल्यामुळे आधीपासूनच कमजोर असलेल्या त्यांच्या विश्वासाला आणखीनच धक्का पोहंचला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, प्रवासी जहाजात परिवर्तन केलेल्या नौकेतून त्यांचे वडील प्रवास करत असताना जर्मन युद्धनौकांनी तिच्यावर हल्ला करून ती नष्ट केली; तेव्हा “समुद्रातल्या संकटांपासून आणि शत्रुंच्या हिंसेपासून आम्हाला वाचव” या प्रार्थना अनुत्तरित राहिल्या.—सगळा मनाचा भ्रम—देवाला तिलांजली (इंग्रजी).
या अनुभवांमध्ये नवीन असे काही नाही. प्रेषित पौल म्हणतो, “सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही.” (२ थेस्सलनीकाकर ३:२) तुम्हाला काय वाटते? संशयी वृत्ती वाढत असलेल्या या जगात देवाबद्दल आणि त्याच्या वचनाबद्दल खरा विश्वास बाळगणे अजूनही शक्य आहे का? या बाबतीत पुढील लेख काय म्हणतो त्याचे परीक्षण करा.