व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरा विश्‍वास तुम्ही बाळगू शकता

खरा विश्‍वास तुम्ही बाळगू शकता

खरा विश्‍वास तुम्ही बाळगू शकता

सारा जेन १९ वर्षांची असताना तिला बीजकोषाचा कर्करोग असल्याचे कळाले. शस्त्रक्रियेनंतर, तिला बरे वाटू लागले व तिला स्वतःची स्थिती आशादायक वाटली. तिला इतकी खात्री वाटली की २० वर्षांची झाल्यावर तिची मागणी झाली आणि ती लग्नाची तयारीसुद्धा करू लागली. परंतु, त्याच वर्षी तिच्यामध्ये पुन्हा एकदा कर्करोग आढळला आणि ती फक्‍त काही आठवड्यांसाठी जिवंत राहील असे तिला कळाले. सारा जेन जून २००० साली—२१ वर्षे पूर्ण होण्याच्या काही काळाआधीच—मरण पावली.

दवाखान्यात सारा जेनला भेटायला जाणारे लोक भविष्याविषयी तिची शांत प्रवृत्ती आणि आत्मविश्‍वास, देव आणि त्याचे वचन अर्थात बायबलवरील तिचा गहिरा विश्‍वास पाहून प्रभावित होत असत. इतके मोठे दुःख ओढवले असतानाही पुनरुत्थानाच्या आशेची तसेच आपल्याला आपल्या मित्रांना पुन्हा पाहायला मिळेल याची तिला पक्की खात्री होती. (योहान ५:२८, २९) “देवाच्या नवीन राज्यात मी पुन्हा तुम्हा सर्वांना भेटेन,” असे ती म्हणाली.

काही लोकांना वाटते की, असा विश्‍वास म्हणजे फक्‍त भ्रम आहे. लूडोव्हिक केनेडी म्हणतात, “मृत्यूपश्‍चात जीवनाचा विश्‍वास म्हणजे नेमके काय तर, केवळ असुरक्षित लोकांची समजूत, की शेवटची तुतारी वाजेल तेव्हा आनंदाचा समय असेल, चांगल्या गोष्टी असतील आणि एखाद्या रम्य ठिकाणी पूर्वी मरण पावलेल्या आणि नंतर मरण पावणाऱ्‍या लोकांसोबत आनंदाचे क्षण घालवता येतील.” पण, या विधानाच्या संदर्भात आपण असा उलट प्रश्‍न विचारला पाहिजे की, केनेडींच्या म्हणण्याप्रमाणे “आपले जीवन सध्यापुरतेच मर्यादित असल्यामुळे आताच त्याचा पूर्ण लाभ घ्यावा” असा विश्‍वास धरणे योग्य आहे की देवावर आणि पुनरुत्थानाच्या त्याच्या अभिवचनावर विश्‍वास ठेवणे अधिक योग्य आहे? सारा जेनने देवावर आणि पुनरुत्थानाच्या त्याच्या अभिवचनावर विश्‍वास ठेवण्याची निवड केली. हा विश्‍वास तिने कसा वाढवला?

‘देवाचा शोध करा आणि त्याला प्राप्त करा’

एखाद्यावर विश्‍वास आणि भरवसा वाढवण्यासाठी, त्याला जाणणे, त्याची विचार करण्याची आणि कार्य करण्याची पद्धत जाणणे आवश्‍यक आहे. आणि यामध्ये हृदय आणि मन दोघांचा समावेश होतो. देवावर खरा विश्‍वास वाढवण्याच्याबाबतीतही हेच तत्त्व लागू होते. त्याला जाणण्याची, त्याचे गुण आणि व्यक्‍तिमत्त्व समजून घेण्याची तसेच त्याच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये तो खरोखर भरवशालायक आणि विश्‍वसनीय ठरला आहे का हे पाहण्याची गरज आहे.—स्तोत्र ९:१०; १४५:१-२१.

काहींना वाटते की हे शक्यच नाही. ते म्हणतात, देव जरी अस्तित्वात असला तरी त्याचा शोध घेणे आणि त्याला समजणे मुळीच शक्य नाही. संशयवादी व्यक्‍तीला असे वाटते की, “सारा जेनसारख्या ख्रिश्‍चनांना, देव वाटतो तसा तो खरोखर आहे तर मग आमच्यासारख्यांना तो प्रकट का होत नाही?” पण देवाचा शोध घेणे किंवा तो सापडणे अशक्य आहे का? अथेन्स येथील तत्त्वज्ञानी आणि बुद्धिमान लोकांना उद्देशून बोलताना प्रेषित पौल म्हणाला की, “ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले” त्याने ‘त्याचा शोध करण्याकरता व त्याला प्राप्त करण्याकरता’ आवश्‍यक असलेले सर्व काही पुरवले आहे. पौल तर असेही म्हणाला की, “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.”—प्रेषितांची कृत्ये १७:२४-२७.

मग, ‘देवाचा शोध घेणे आणि त्याला प्राप्त करणे’ कसे शक्य आहे? काहींना केवळ आपल्या भोवतालच्या विश्‍वाचे निरीक्षण करून हे शक्य झाले आहे. अनेकांना तर याच्याच आधारे निर्माणकर्ता असल्याची खात्री पटली आहे. * (स्तोत्र १९:१; यशया ४०:२६; प्रेषितांची कृत्ये १४:१६, १७) त्यांना प्रेषित पौलासारखेच वाटते की, “सृष्टीच्या निर्मितीपासून [देवाच्या] अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.”—रोमकर १:२०; स्तोत्र १०४:२४.

तुम्हाला बायबलची आवश्‍यकता आहे

निर्माणकर्त्यावर खरा विश्‍वास वाढवण्यासाठी त्याने पुरवलेल्या आणखी एका गोष्टीची तुम्हाला आवश्‍यकता आहे. ती काय आहे? बायबल! हे देवाचे प्रेरित वचन आहे ज्यामध्ये त्याने आपली इच्छा आणि उद्देश प्रकट केले आहेत. (२ तीमथ्य ३:१६, १७) पण काहीजण म्हणतील, “एक मिनिट, बायबलवर तुम्ही कसा काय विश्‍वास ठेवू शकता? बायबलचे अनुकरण करणारे लोकच अघोर कृत्ये करत नाहीत का?” ख्रिस्ती धर्मजगताने ढोंगीपणा, निर्दयीपणा आणि अनैतिकता यांसंबंधी फार वाईट नाव कमावले आहे हे मान्य आहे. पण कोणत्याही समंजस व्यक्‍तीला हे स्पष्ट दिसून येईल की, ख्रिस्ती धर्मजगत बायबलमधील तत्त्वांचे पालन करण्याचे फक्‍त ढोंग करते.—मत्तय १५:८.

बायबलमध्येच असा इशारा दिला आहे की, अनेक लोक देवाची उपासना करण्याचा दावा करतील परंतु, “ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाहि [ते] नाकारतील.” प्रेषित पेत्राने म्हटले, “त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल.” (२ पेत्र २:१, २) येशू ख्रिस्ताने म्हटले की, हे लोक ‘अनाचार करणारे’ आहेत आणि त्यांच्या दुष्ट कृत्यांवरून ते लगेच ओळखले जातील. (मत्तय ७:१५-२३) ख्रिस्ती धर्मजगताचे नावलौकिक पाहून देवाच्या वचनाला नकार देणे म्हणजे कोणा विश्‍वसनीय मित्राचे पत्र, केवळ एका वाईट माणसाने आणून दिल्यामुळे फेकून देण्यासारखे आहे.

देवाच्या वचनाशिवाय खरा विश्‍वास निर्माण करणे अगदी अशक्य आहे. बायबलमधूनच यहोवाने जणू आपली बाजू मांडली आहे. त्याने दुःख आणि त्रासाला अनुमती का दिली आणि त्याविषयी तो काय करणार आहे अशा वारंवार उद्‌भवणाऱ्‍या प्रश्‍नांची तो उत्तरे देतो. (स्तोत्र ११९:१०५; रोमकर १५:४) बायबल हे देवाचे प्रेरित वचन आहे असा विश्‍वास सारा जेनने केला. (१ थेस्सलनीकाकर २:१३; २ पेत्र १:१९-२१) कशाप्रकारे? तिच्या आईवडिलांच्या सांगण्यामुळे नव्हे तर बायबल हे देवाने अद्‌भुतरित्या प्रकट केलेले पुस्तक आहे या पुराव्याचे प्रामाणिकपणे परीक्षण करायला वेळ काढल्यामुळे. (रोमकर १२:२) उदाहरणार्थ, बायबलच्या तत्त्वांचे पालन करणाऱ्‍यांच्या जीवनात बायबल किती प्रभावशाली आहे हे तिने पाहिले. बायबल—देवाचे वचन की मनुष्याचे? * (इंग्रजी) अशा प्रकाशनांच्या साहाय्याने बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिलेले आहे हे सिद्ध करणाऱ्‍या असंख्य आंतरिक पुराव्यांचेही तिने काळजीपूर्वक परीक्षण केले.

‘विश्‍वास वार्तेद्वारे होतो’

परंतु, बायबल जवळ बाळगणे किंवा ते प्रेरित आहे असा विश्‍वास करणे एवढेच पुरेसे नाही. प्रेषित पौल म्हणतो, ‘विश्‍वास वार्तेद्वारे होतो.’ (रोमकर १०:१७) बायबल फक्‍त जवळ बाळगल्यामुळे नव्हे तर ते ऐकल्यामुळे विश्‍वास वाढतो. देवाचे वचन वाचून आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही त्याचे विचार “ऐकता.” अगदी लहान मुलेही हे करू शकतात. पौल म्हणतो की, तीमथ्याला “बालपणापासूनच” त्याच्या आईने आणि आजीने “पवित्र शास्त्राची” शिकवण दिली होती. यावरून, मनावर दडपण आणून मन बदलण्याचा (ब्रेनवॉशचा) अर्थ सूचित होतो का? नाही! तीमथ्याला जबरदस्तीने काहीही शिकवण्यात आले नव्हते किंवा त्याला फसवण्यातही आले नव्हते. ज्या गोष्टी त्याने ऐकल्या आणि वाचल्या होत्या त्यांविषयी त्याची “खातरी झाली” होती.—२ तीमथ्य १:५; ३:१४, १५.

सारा जेनला देखील अशाचप्रकारे खात्री पटली होती. पहिल्या शतकात, बिरुयातील लोकांप्रमाणे तिने “[आपल्या पालकांकडून आणि इतर शिकवणाऱ्‍यांकडून] मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला.” अर्थात लहान असताना, तिने आपल्या पालकांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवला. पण जसजशी ती मोठी होत गेली तसतसे तिला शिकवलेल्या गोष्टी तिने डोळे झाकून किंवा निमूटपणे स्वीकारल्या नाहीत. तिने, ‘ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी शास्त्रात दररोज शोध केला.’—प्रेषितांची कृत्ये १७:११.

तुम्ही खरा विश्‍वास वाढवू शकता

तुम्हीसुद्धा, प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात ज्याविषयी सांगितले तो खरा विश्‍वास वाढवू शकता. त्याने म्हटले की हा विश्‍वास, “आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टीबद्दलची खातरी आहे.” (तिरपे वळण आमचे.) (इब्री लोकांस ११:१) असा विश्‍वास बाळगल्यावर तुम्हाला पक्की खात्री पटेल की, तुमच्या सर्व आशा आणि अपेक्षा, त्याचप्रमाणे देवाने दिलेले पुनरुत्थानाचे वचन पूर्ण होईल. या आशा पक्क्या खात्रीवर आधारलेल्या आहेत, मनोकल्पनांवर नव्हे. तुम्हाला माहीत होईल की, यहोवाने कधीही आपले वचन मोडलेले नाही. (यहोशवा २१:४५; २३.१४; यशया ५५:१०, ११; इब्री लोकांस ६:१८) देवाचे नवीन जग जणू काही आल्याप्रमाणेच तुम्हाला वाटू लागेल. (२ पेत्र ३:१३) आणि विश्‍वासाच्या डोळ्यांनी तुम्ही स्पष्टपणे पाहाल की, यहोवा देव, येशू ख्रिस्त आणि देवाचे राज्य या सर्व वास्तविकता आहेत, भ्रम नाहीत.

खरा विश्‍वास वाढवण्याकरता तुम्ही एकटे नाहीत. आपले वचन सर्वांना सहजपणे उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्‍त यहोवाने जगव्याप्त ख्रिस्ती मंडळीची व्यवस्था देखील केली आहे; सात्विक अंतःकरणाच्या लोकांना देवावर विश्‍वास वाढवण्यास मदत करणे हेच तिचे ध्येय आहे. (योहान १७:२०; रोमकर १०:१४, १५) त्या संघटनेद्वारे यहोवा देत असलेली सगळी मदत स्वीकारा. (प्रेषितांची कृत्ये ८:३०, ३१) विश्‍वास हे देवाच्या पवित्र आत्म्याचे फळ असल्यामुळे, खरा विश्‍वास वाढवायला मदत करण्यासाठी त्या आत्म्यासाठी सतत प्रार्थना करा.—गलतीकर ५:२२.

देवावर आणि त्याच्या वचनावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या व्यक्‍तीची थट्टा करणाऱ्‍या संशयवाद्यांमुळे माघार घेऊ नका. (१ करिंथकर १:१८-२१; २ पेत्र ३:३, ४) खरे तर, अशा हल्ल्यांविरुद्ध दृढ उभे राहण्याचे बळ देण्यासाठी खरा विश्‍वास अत्यंत मोलाचा आहे. (इफिसकर ६:१६) सारा जेनला याचा प्रत्यय आला; दवाखान्यात तिला भेटायला येणाऱ्‍या लोकांना ती नेहमी विश्‍वास वाढवण्याचे उत्तेजन द्यायची. ती म्हणायची, “सत्य आपलेसे करा. देवाच्या वचनाचा अभ्यास करा. देवाच्या संघटनेच्या समीप राहा. सतत प्रार्थना करा. यहोवाच्या सेवेत क्रियाशील राहा.”—याकोब २:१७, २६.

देवावर आणि पुनरुत्थानावर तिचा किती विश्‍वास आहे हे पाहून एका नर्सने म्हटले: “तुझा खरंच यावर खूप विश्‍वास आहे.” तिच्यावर इतके मोठे संकट येऊनही ती इतकी आशावादी कशी असू शकते असे विचारल्यावर ती म्हणाली: “यहोवावरील विश्‍वास याचे कारण आहे. तो मला एका खऱ्‍या मित्रासारखा आहे आणि माझे त्याच्यावर अपार प्रेम आहे.”

[तळटीपा]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, तुमची काळजी वाहणारा निर्माणकर्ता आहे का? (इंग्रजी) हे पुस्तक पाहा.

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

[६ पानांवरील चित्र]

तीमथ्याला “बालपणापासूनच” त्याच्या आईने आणि आजीने “पवित्र शास्त्राची” शिकवण दिली होती

[६ पानांवरील चित्र]

बिरुयातील लोकांनी शास्त्रवचनांचा दररोज शोध केल्यामुळे त्यांची प्रशंसा करण्यात आली

[चित्राचे श्रेय]

From “Photo-Drama of Creation,” १९१४

[७ पानांवरील चित्रे]

बायबल केवळ जवळ बाळगल्याने नव्हे तर त्यातील गोष्टी ऐकल्याने विश्‍वास वाढतो

[७ पानांवरील चित्र]

“देवाच्या नवीन राज्यात मी पुन्हा तुम्हा सर्वांना भेटेन”