व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलांना वळण लावताना यहोवाचे अनुकरण करा

मुलांना वळण लावताना यहोवाचे अनुकरण करा

मुलांना वळण लावताना यहोवाचे अनुकरण करा

“सगळेच आईवडील आपल्या मुलांच्या चुका दुरुस्त करीत नाहीत का?”—इब्री लोकांस १२:७, कन्टेम्प्ररी इंग्लिश व्हर्शन.

१, २. आईवडिलांना आपल्या मुलांना वाढवणे आजकाल इतके कठीण का जाते?

 काही वर्षांपूर्वी जपानमध्ये घेण्यात आलेल्या एका सर्व्हेमध्ये मुलाखत घेतलेल्या निम्म्या प्रौढांचे असे मत होते, की आईवडील व त्यांच्या मुलांमध्ये सुसंवाद होत नाहीत आणि आईवडील आपल्या मुलांना नको तितकी मोकळीक देतात. जपानमध्येच घेतलेल्या दुसऱ्‍या एका सर्व्हेत सहभागी झालेल्यांपैकी एक चतुर्थांश लोकांनी कबूल केले, की मुलांशी कसे वागावे हे त्यांना कळत नाही. ही परिस्थिती केवळ पौर्वात्य देशांपुरतीच मर्यादित नाही. द टोरोन्टो स्टार वृत्तपत्रानुसार “कित्येक कनेडियन पालकांनी कबूल केले की चांगले आईवडील होणे म्हणजे नेमके काय हे त्यांना माहीत नाही.” जगाच्या सर्व भागांत आईवडिलांना आपल्या मुलांचे संगोपन करणे कठीण वाटू लागले आहे.

मुलांना वाढवणे आईवडिलांना कठीण का जात आहे? याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण ‘शेवटल्या काळात’ राहात असल्यामुळे ‘दिवस कठीण’ आहेत. (२ तीमथ्य ३:१) शिवाय बायबल सांगते त्यानुसार, “मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात.” (उत्पत्ति ८:२१) तसेच, सैतान हा “गर्जणाऱ्‍या सिंहासारखा” कम-अनुभवी लोकांच्या मागावर आहे आणि तरुण मुले विशेषतः त्याला सहज बळी पडू शकतात. (१ पेत्र ५:८) आणि ख्रिस्ती आईवडील, “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” आपल्या मुलांचे संगोपन करण्याचे हाती घेतात तेव्हा तर हमखास त्यांच्या मार्गात असंख्य अडथळे येतात. (इफिसकर ६:४) मग आपल्या मुलांना “चांगले आणि वाईट” यांतला फरक ओळखता यावा आणि ते यहोवाचे परिपक्व सेवक बनावेत म्हणून आईवडील त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतात?—इब्री लोकांस ५:१४.

३. मुलांचे यशस्वीरित्या संगोपन करण्यात आईवडिलांकडून प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणे का आवश्‍यक आहे?

बुद्धिमान राजा शलमोन याने म्हटले: “बालकाच्या हृदयांत मूर्खता जखडलेली असते.” (नीतिसूत्रे १३:१; २२:१५) ही मूर्खता हृदयातून काढून टाकण्यासाठी मुलांची त्यांच्या आईवडिलांकडून प्रेमळपणे सुधारणूक होणे आवश्‍यक आहे. पण सहसा तरुण मुलामुलींना त्यांचे दोष दाखवले जाणे आवडत नाही. सल्ला देणारा कोणीही असो, ते त्याचा रागच करतात. म्हणून आईवडिलांनी ‘मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला देण्यास’ शिकले पाहिजे. (नीतिसूत्रे २२:६) मुले या शिक्षणाला जडून राहिल्यास ते त्यांच्यासाठी जीवनदायक ठरू शकते. (नीतिसूत्रे ४:१३) तरुण मुलांना वळण लावण्यात कशाचा समावेश आहे हे आईवडिलांना माहीत असणे किती महत्त्वाचे आहे!

शिस्त म्हणजे नेमके काय?

४. बायबलमध्ये वापरल्यानुसार “शिस्त” या शब्दाचा मुख्यतः काय अर्थ होतो?

आपण मुलांशी—शारीरिक, शाब्दिक किंवा भावनिकरित्या—दुर्व्यवहार करतो असे लोक म्हणतील या भीतीने बरेच आईवडील मुलांना शिक्षा द्यायला कचरतात. पण आपण अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. बायबलमध्ये “शिस्त” हा शब्द ज्याप्रकारे वापरण्यात आला आहे, त्यावरून कोणत्याही प्रकारचा दुर्व्यवहार किंवा क्रूर वागणूक सूचित होत नाही. “शिस्त” याकरता असलेल्या ग्रीक शब्दाचा मुख्यतः मार्गदर्शन, शिक्षण, सुधारणूक आणि कधीकधी कडक पण प्रेमळपणे शिक्षा करण्याशी संबंध आहे.

५. यहोवाने आपल्या लोकांशी कशाप्रकारे व्यवहार केला यावर विचार करणे का फायद्याचे ठरू शकते?

या अर्थाने शिस्त लावण्याच्या बाबतीत यहोवा देव आपल्याकरता एक परिपूर्ण आदर्श आहे. प्रेषित पौलाने यहोवाची तुलना एका मानवी पित्याशी करून असे लिहिले: “सगळेच आईवडील आपल्या मुलांच्या चुका दुरुस्त करीत नाहीत का? . . . आपले मानवी पिता काही काळापुरत्याच आपल्या चुका दुरुस्त करतात आणि त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे करतात. पण देव आपल्याच भल्याकरता आपल्या चुका दुरुस्त करतो कारण आपण पवित्र असावे असे त्याला वाटते.” (इब्री लोकांस १२:७-१०, कॉन्टेम्प्ररी इंग्लिश व्हर्शन) होय, यहोवा आपल्या लोकांना या उद्देशाने शिक्षा करतो की त्यांनी पवित्र किंवा शुद्ध व्हावे. मुलांना शिस्त लावण्याच्या संदर्भात, यहोवाने त्याच्या लोकांचे कशाप्रकारे मार्गदर्शन केले यावर विचार केल्याने निश्‍चितच आपल्याला बरेच काही शिकायला मिळू शकते.—अनुवाद ३२:४; मत्तय ७:११; इफिसकर ५:१.

प्रेम—प्रेरक शक्‍ती

६. आईवडिलांना यहोवाच्या प्रेमाचे अनुकरण करणे का जड जाऊ शकते?

प्रेषित योहानाने म्हटले, “देव प्रीति आहे.” त्याअर्थी यहोवा जेव्हाही मार्गदर्शन पुरवतो तेव्हा प्रीती ही त्यामागची प्रेरक शक्‍ती असते. (१ योहान ४:८; नीतिसूत्रे ३:११, १२) आईवडिलांना तर आपल्या मुलांवर स्वाभाविकतःच प्रेम असते, त्यामुळे त्यांना आपल्या मुलांना वळण लावण्याच्या बाबतीत यहोवाचे अनुकरण साहजिकच सोपे जाईल, असे म्हणता येते का? नाही, असे घडेलच असे म्हणता येत नाही. देवाचे प्रेम हे तत्त्वांवर आधारित असलेले प्रेम आहे. आणि एका ग्रीक विद्वानाने खुलासा केल्याप्रमाणे हे प्रेम “नेहमीच स्वाभाविक भावनांच्या सामंजस्यात नसते.” देव कधीही भावनांच्या आहारी जाऊन तडजोड करत नाही. आपल्या लोकांसाठी सर्वात उत्तम काय आहे याचाच तो नेहमी विचार करतो.—यशया ३०:२०; ४८:१७.

७, ८. (अ) आपल्या लोकांशी व्यवहार करताना तत्त्वनिष्ठ प्रेम दाखवण्याच्या बाबतीत यहोवाने कशाप्रकारे आदर्श ठेवला? (ब) मुलांना बायबलच्या तत्त्वांचे पालन करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मदत करताना पालक यहोवाचे कसे अनुकरण करू शकतात?

यहोवाने इस्राएल लोकांशी व्यवहार करताना कशाप्रकारे प्रेम दाखवले याचा विचार करा. इस्राएल राष्ट्र अद्याप बाल्यावस्थेत असताना यहोवाने त्यांच्यावर कशाप्रकारे प्रेम केले याचे वर्णन करण्यासाठी मोशेने एक हृदयस्पर्शी रूपक वापरले. त्याने म्हटले: “गरुड पक्षीण आपले कोटे हालविते, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले पंख पसरून त्यांवर त्यांना घेते व आपल्या पंखावर वाहते, त्याप्रमाणे परमेश्‍वरानेच [याकोबाला] चालविले.” (अनुवाद ३२:९, ११, १२) आपल्या पिलांना उडायला शिकवण्यासाठी गरुड पक्षीण “आपले कोटे हालविते;” घरट्यातून बाहेर पडण्यास पिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ती आपले पंख जोरजोराने फडफडवते. पिलाने घरट्यातून (जे सहसा उंच डोंगराच्या कड्यावर असते) एकदाची भरारी मारली, की आई सतत आपल्या पिलावर “तळपत असते.” नुकतेच पंख फुटलेले ते पिलू जमिनीवर पडणार असे दिसताच आई क्षणार्धात झेप घेऊन त्याला आपल्या ‘पंखांवर’ उचलून घेते. इस्राएलच्या नवजात राष्ट्राची यहोवाने अशाच प्रकारे काळजी वाहिली. त्याने त्यांना मोशेचे नियमशास्त्र दिले. (स्तोत्र ७८:५-७) यानंतर देवाने या राष्ट्रावर बारकाईने नजर ठेवली; ते संकटात आहे असे पाहताच तो त्यांना सावरून घेत असे.

ख्रिस्ती आईवडील यहोवाच्या प्रेमाचे कसे अनुकरण करू शकतात? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी देवाच्या वचनातील तत्त्वे व आदर्श आपल्या मुलांना शिकवले पाहिजेत. (अनुवाद ६:४-९) आपल्या मुलांना बायबल तत्त्वांशी सुसंगत असे निर्णय घेता यावेत म्हणून त्यांना मदत करण्याचा आईवडिलांचा उद्देश असतो. असे करताना, प्रेमळ आईवडील जणू आपल्या मुलांवर तळपत असतात, म्हणजे शिकलेल्या तत्त्वांचे मुले कशाप्रकारे पालन करतात यावर ते नजर ठेवून असतात. मुले मोठी होऊ लागतात आणि त्यांना जास्त स्वातंत्र्य दिले जाते तेव्हा काळजी वाहणारे आईवडील धोका संभवताच “पंख पसरून” आपल्या पिलांना “पंखावर वाहण्यास” तयार असतात. पण मुलांना कोणत्या प्रकारचा धोका संभवू शकतो?

९. प्रेमळ पालकांनी कोणत्या एका खास धोक्याविषयी सतर्क राहिले पाहिजे? उदाहरण द्या.

यहोवाने इस्राएल लोकांना कुसंगतीच्या दुष्परिणामांविषयी बजावले होते. (गणना २५:१-१८; एज्रा १०:१०-१४) आजही वाईट संगती एक सामान्य समस्या आहे. (१ करिंथकर १५:३३) ख्रिस्ती आईवडिलांनी या बाबतीत यहोवाचे अनुकरण करावे. लिसा नावाची एक पंधरा वर्षांची मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली; लिसाच्या कुटुंबाच्या नैतिक व आध्यात्मिक विश्‍वासांपेक्षा या मुलाचे विश्‍वास वेगळे होते. लिसा सांगते, “माझ्या आईवडिलांनी माझ्या वागण्याबोलण्यातील फरक चटकन ताडला आणि त्यांनी याविषयी काळजी व्यक्‍त केली. कधी ते माझी चूक माझ्या लक्षात आणून द्यायचे तर कधी प्रेमळपणे मला दिलासा द्यायचे.” लिसाच्या आईवडिलांनी तिच्यासोबत बसून तिचे धीराने ऐकून घेतले आणि त्यामुळे तिची खरी समस्या काय हे ओळखून ते तिला मदत करू शकले. तिची खरी समस्या म्हणजे—ती आपल्या मित्रमैत्रिणींची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करत होती. *

सुसंवाद साधा

१०. इस्राएल लोकांशी सुसंवाद साधण्याच्या बाबतीत यहोवाने कशाप्रकारे एक उत्तम उदाहरण ठेवले?

१० मुलांना वळण लावण्यात यशस्वी होण्याकरता आईवडिलांनी आपल्या मुलांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या अंतःकरणांत काय आहे हे यहोवाला पूर्णपणे माहीत असूनही तो आपल्याला प्रार्थनेद्वारे त्याच्याशी बोलण्याचे प्रोत्साहन देतो. (१ इतिहास २८:९) इस्राएल लोकांना नियमशास्त्र दिल्यानंतर, यहोवाने त्यांना मार्गदर्शन देण्याकरता लेव्यांना नेमले आणि त्यांची समजूत घालण्यासाठी व त्यांना ताडन करण्यासाठी त्याने संदेष्ट्यांना देखील पाठवले. तसेच त्याने त्यांच्या प्रार्थना देखील ऐकून घेण्याची तयारी दाखवली.—२ इतिहास १७:७-९; स्तोत्र ६५:२; यशया १:१-३, १८-२०; यिर्मया २५:४; गलतीकर ३:२२-२४.

११. (अ) आईवडील आपल्या मुलांशी सुसंवाद साधण्याकरता काय करू शकतात? (ब) आपल्या मुलांशी सुसंवाद साधण्यासाठी आईवडिलांनी मुलांचे ऐकून घेण्याची सवय लावणे का महत्त्वाचे आहे?

११ आपल्या मुलांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करताना आईवडील यहोवाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतात? सर्वप्रथम त्यांनी आपल्या मुलांकरता वेळ काढला पाहिजे. मुलांचा उपहास करणारी अविचारी विधाने आईवडिलांनी आवर्जून टाळावीत, उदाहरणार्थ, “बस्स, इतकंच होतं तर? मला वाटलं काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहेस;” “याला काही अर्थ नाही;” “आणखी काय होणार? तू अजून लहान मूल आहेस हे विसरू नकोस.” (नीतिसूत्रे १२:१८) मुलांना आपल्याजवळ मन मोकळे करण्याचे प्रोत्साहन देण्याकरता सुज्ञ आईवडील, त्यांचे लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतात. जे आईवडील आपली मुले लहान असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांची मुले मोठी झाल्यावर कदाचित त्यांच्याकडे दुर्लक्ष करतील. यहोवाने आपल्या लोकांचे ऐकून घेण्याची सदैव तयारी दाखवली. जे नम्रपणे त्याला प्रार्थना करतात त्यांच्या प्रार्थनेला तो नेहमी कान देतो.—स्तोत्र ९१:१५; यिर्मया २९:१२; लूक ११:९-१३.

१२. आईवडिलांनी कोणते गुण दाखवल्यास मुलांना त्यांच्याकडे मनमोकळेपणाने भावना व्यक्‍त करणे सोपे जाईल?

१२ देवाच्या व्यक्‍तिमत्त्वातील काही गुणांमुळे त्याच्या लोकांना त्याच्याकडे मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्‍त करणे कशाप्रकारे सोपे जाते याचाही विचार करा. उदाहरणार्थ, प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याने बथशेबासोबत व्यभिचार करून अतिशय गंभीर पाप केले. अपरिपूर्ण असल्यामुळे दाविदाने आपल्या जीवनात इतरही गंभीर पातके केली. पण यहोवाची क्षमा व ताडन मिळावे म्हणून त्याला प्रार्थना करण्यास दावीद कधीही चुकला नाही. निश्‍चितच देवाच्या प्रेमळकृपेमुळे व दयेमुळे दाविदाला यहोवाकडे परत येणे सोपे गेले असेल. (स्तोत्र १०३:८) त्याचप्रकारे, सहानुभूती व दया यांसारखे देवाचे गुण प्रदर्शित केल्यामुळे आईवडील, मुलांच्या हातून चुका होतात तेव्हा देखील त्यांच्यासोबत सुसंवाद कायम ठेवू शकतील.—स्तोत्र १०३:१३; मलाखी ३:१७.

सौम्य असा

१३. सौम्य असण्यात कशाचा समावेश आहे?

१३ आपल्या मुलांचे ऐकून घेताना आईवडिलांनी सौम्य असावे आणि ‘वरून येणाऱ्‍या ज्ञानानुसार’ वागावे. (याकोब ३:१७) प्रेषित पौलाने लिहिले: “तुमची सहनशीलता [“सौम्यता,” NW] सर्वांना कळून येवो.” (फिलिप्पैकर ४:५) सौम्य असण्याचा काय अर्थ होतो? “सौम्य” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाची एक व्याख्या म्हणजे “नियमांच्या अक्षरांना चिकटून न राहणे.” नैतिक व आध्यात्मिक आदर्शांशी तडजोड न करताही आईवडील सौम्य कशाप्रकारे असू शकतात?

१४. लोटाच्या बाबतीत यहोवाने सौम्यपणा कसा दाखवला?

१४ सौम्य असण्याच्या बाबतीत आपल्यापुढे यहोवाचे अत्युत्तम उदाहरण आहे. (स्तोत्र १०:१७) सदोम शहराचा नाश होणे ठरलेले असल्यामुळे त्याने लोट व त्याच्या कुटुंबाला तेथून निघून जाण्याचा आग्रह करूनही लोट “दिरंगाई करू लागला.” नंतर, जेव्हा यहोवाच्या दूताने लोटाला डोंगराकडे पळ काढण्यास सांगितले तेव्हा लोट म्हणाला: “मला डोंगराकडे पळून जाववणार नाही. . . . पळून जाण्यास हे नगर [सोअर] जवळ असून लहान आहे; पाहा ते किती लहान आहे; तिकडे मला पळून जाऊ दे.” यावर यहोवाची काय प्रतिक्रिया होती? त्याने म्हटले: “पाहा, तुझ्या याहि गोष्टीला मी मान्य आहे; तू म्हणतोस त्या नगराचा मी नाश करणार नाही.” (उत्पत्ति १९:१६-२१, ३०) लोटाची विनंती मान्य करण्यास यहोवा तयार होता. यहोवा देवाने त्याच्या वचनात अर्थात बायबलमध्ये घालून दिलेल्या आदर्शांचे आईवडिलांनी काटेकोरपणे पालन करणे निश्‍चितच आवश्‍यक आहे. पण तरीसुद्धा बायबलच्या तत्त्वांचे उल्लंघन होत नसेल तर मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यास काही हरकत नाही.

१५, १६. यशया २८:२४, २५ येथील उदाहरणातून आईवडील कोणता धडा शिकू शकतात?

१५ मुलांनी आपला सल्ला स्वीकारावा म्हणून त्यांच्या मनाची तयारी करणे हे देखील सौम्य असण्यात समाविष्ट आहे. एका उदाहरणातून हे समजवताना यशयाने यहोवाची तुलना एका शेतकऱ्‍याशी केली व म्हटले: “पेरण्यासाठी नांगरणारा सतत नांगरीत, तास पाडीत व ढेकळे फोडीत राहतो काय? जमीन सारखी केल्यावर तीत तो काळे जिरे टाकितो, जिरे विखरितो, गहू रांगेने व जव नेमल्या जागी पेरितो व कडेला काठ्या गहू पेरितो की नाही?”—यशया २८:२४, २५.

१६ यहोवा ‘पेरण्यासाठी नांगरतो’ आणि ‘तास पाडून ढेकळे फोडतो.’ याचा अर्थ आपल्या लोकांचे मार्गदर्शन करण्याआधी तो त्यांच्या मनाची तयारी करतो. मग मुलांच्या चुका दुरुस्त करताना आईवडील त्यांचे हृदय कशाप्रकारे ‘नांगरू’ शकतात? एका पित्याने आपल्या चार वर्षांच्या मुलाची चूक सुधारताना यहोवाचे अनुकरण केले. आपल्या मुलाने शेजारच्या एका मुलाला मारले तेव्हा पित्याने प्रथम आपल्या मुलाच्या सगळ्या सबबी ऐकून घेतल्या. मग जणू आपल्या मुलाचे हृदय ‘नांगरण्यासाठी’ त्याने त्याला एका लहान मुलाची गोष्ट सांगितली ज्याला एक दांडगाई करणारा मुलगा खूप त्रास देत असे. गोष्ट ऐकल्यानंतर मुलाने स्वतःहूनच म्हटले की दांडगाई करणाऱ्‍या मुलाला शिक्षा झाली पाहिजे. अशाप्रकारे ‘नांगरल्यामुळे’ पित्याने आपल्या मुलाच्या मनाची तयारी केली व यामुळे त्याला हे समजून घेणे सोपे गेले की शेजारच्या मुलाला मारणे दांडगाई करण्यासारखे होते व ते चुकीचे होते.—२ शमुवेल १२:१-१४.

१७. मुलांच्या चुका दुरुस्त करण्याच्या बाबतीत यशया २८:२६-२९ येथे कोणता धडा शिकायला मिळतो?

१७ यहोवा कशाप्रकारे आपल्या लोकांचे ताडन करतो हे दाखवण्यासाठी यशयाने शेतीशी संबंधित असलेल्या आणखी एका प्रक्रियेचे उदाहरण दिले, अर्थात मळणी. मळणी करताना, धान्याचा भुसा किती चिवट आहे यानुसार त्या धान्यासाठी कोणते साधन वापरावे हे शेतकरी ठरवतो. काळे जिरे नाजूक असल्यामुळे त्याच्यासाठी काठी वापरतात, जिऱ्‍यासाठी दांडा, पण चिवट भुशाच्या धान्यासाठी घसरगाडीचा किंवा बैलगाडीच्या चाकाचा वापर करतात. तरीसुद्धा धान्याचा भुगा होईल इतक्या जोराने शेतकरी त्याची मळणी करत नाही. त्याचप्रकारे यहोवाला आपल्या लोकांमधून काही वाईट गुण काढून टाकायचे असतात तेव्हा तो काळाची गरज व परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुरूप वागतो. तो कधीही अंधाधुंद कारवाई करत नाही किंवा निष्ठुरपणे वागत नाही. (यशया २८:२६-२९) काही मुलांसाठी केवळ एक नजर पुरेशी असते; आईवडिलांनी त्यांच्यावर नजर रोखताच आपले काहीतरी चुकले आहे हे त्यांच्या लक्षात येते. इतर मुलांना वारंवार आठवण करून द्यावी लागते, तर काही मुलांसाठी आणखी थोडे कडक व्हावे लागते. सौम्य आईवडील प्रत्येक मुलाच्या गरज ओळखून त्यानुरूप शिक्षा देतील.

कौटुंबिक चर्चा आनंददायक बनवा

१८. आईवडील नियमित कौटुंबिक बायबल अभ्यासाकरता कशाप्रकारे वेळ काढू शकतात?

१८ मुलांना मार्गदर्शन पुरवण्याचे सर्वात उत्तम मार्ग म्हणजे नियमित कौटुंबिक बायबल अभ्यास आणि शास्त्रवचनावर दैनंदिन चर्चा. कौटुंबिक अभ्यास नियमित असतो तेव्हाच तो सर्वात परिणामकारक ठरतो. जमेल तेव्हा करू असे धोरण ठेवल्यास किंवा शेवटच्या मिनिटाला ठरवून केल्यास तुमचा कौटुंबिक अभ्यास क्वचितच होईल. अभ्यासाकरता आईवडिलांनी ‘वेळ विकत घेतला’ पाहिजे. (इफिसकर ५:१५-१७, NW) सर्वांना सोयीस्कर ठरेल अशी निश्‍चित वेळ ठरवणे कठीण असू शकते. एका कुटुंब प्रमुखाला असे दिसून आले की मुले मोठी होऊ लागली तसतशी सगळ्यांची वेळापत्रके बदलली आणि कुटुंबाचे एकत्र येणे कठीण होऊन बसले. पण ज्या दिवशी सभा असतात त्या दिवशी संध्याकाळी सगळेच घरी असायचे. त्यामुळे मग पित्याने एका सभेच्याच दिवशी रात्री कौटुंबिक अभ्यास घ्यायचे ठरवले. हे सर्वांना सोयीस्कर ठरले. आज त्यांची तिन्ही मुले यहोवाचे बाप्तिस्मा झालेले सेवक आहेत.

१९. कौटुंबिक अभ्यास घेताना आईवडील यहोवाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतात?

१९ पण अभ्यासादरम्यान शास्त्रवचनांवर आधारित असलेला एखादा लेख घेऊन केवळ त्याची चर्चा करणे पुरेसे नाही. बंदिवासातून परतलेल्या इस्राएल लोकांना यहोवाने याजकांद्वारे शिक्षण दिले; या याजकांनी नियमशास्त्र “स्पष्ट वाचले” आणि “जे वाचले ते ध्यानात आणून देऊन समजावून सांगितले.” (नहेम्या ८:८, पं.र.भा.) आपल्या सातही मुलांना यहोवावर प्रेम करण्यास यशस्वीपणे शिकवू शकलेला एक पिता नेहमी कौटुंबिक अभ्यासाआधी आपल्या खोलीत जाऊन अभ्यासाचे साहित्य आपल्या प्रत्येक मुलाच्या गरजेनुरूप जुळवण्यासाठी पूर्वतयारी करत असे. ते मुलांसाठी कौटुंबिक अभ्यास आनंददायक बनवत. त्यांचा एक मुलगा, जो आता प्रौढ झाला आहे, तो म्हणतो, “अभ्यासात नेहमी मजा यायची. आम्ही बाहेर बॉल खेळत असलो तरी कौटुंबिक अभ्यासाची वेळ झाली म्हणताच आम्ही बॉल टाकून घरात पळत असू. आठवड्यातली ती सर्वात आनंददायक संध्याकाळ असायची.”

२०. मुलांच्या संगोपनाच्या संदर्भात कोणत्या संभाव्य समस्येविषयी विचार करणे आवश्‍यक आहे?

२० स्तोत्रकर्त्याने म्हटले: “पाहा, संतति ही परमेश्‍वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.” (स्तोत्र १२७:३) मुलांना वळण लावण्याकरता बराच वेळ व प्रयत्नांची गरज आहे, पण ही जबाबदारी आपण योग्यपणे पार पाडल्यास त्यामुळे आपल्या मुलांना सार्वकालिक जीवन लाभू शकते. खरोखर हे किती उत्तम प्रतिफळ ठरेल! तर मग, मुलांना वळण लावताना आपण यहोवाचे मनापासून अनुकरण करण्याचा निर्धार करू या! पण ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात [मुलांना] वाढवण्याची’ जबाबदारी जरी आईवडिलांवर सोपवण्यात आली असली तरीसुद्धा ते यशस्वी होतीलच याची शाश्‍वती देण्यात आलेली नाही. (इफिसकर ६:४) अगदी उत्तम काळजी घेऊनही एखादे मूल हाताबाहेर जाऊन, यहोवाची सेवा करण्याचे सोडून देण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काय करता येईल? पुढच्या लेखाचा हाच विषय आहे.

[तळटीप]

^ या व पुढील लेखातील अनुभव कदाचित तुमच्यापेक्षा वेगळी संस्कृती असलेल्या देशातील असतील. तेव्हा या अनुभवांतील तत्त्वे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या विशिष्ट संस्कृतीनुसार त्यांचा अवलंब करा.

तुमचे उत्तर काय आहे?

अनुवाद ३२:११, १२ येथे वर्णन केल्याप्रमाणे आईवडील यहोवाच्या प्रेमाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतात?

• यहोवाने इस्राएल लोकांशी ज्याप्रकारे सुसंवाद साधला त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• यहोवाने लोटाच्या विनंतीची दखल घेतली यातून आपल्याला काय शिकायला मिळते?

यशया २८:२४-२९ यावरून मुलांना शिस्त लावण्याच्या बाबतीत तुम्हाला काय शिकायला मिळाले?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८, ९ पानांवरील चित्र]

यहोवा आपल्या लोकांचे कशाप्रकारे मार्गदर्शन करतो त्याची तुलना मोशेने पिलांना उडायला शिकवणाऱ्‍या गरूड पक्षीणीशी केली

[१० पानांवरील चित्रे]

आईवडिलांनी आपल्या मुलांकरता वेळ काढला पाहिजे

[१२ पानांवरील चित्र]

“आठवड्यातली ती सर्वात आनंददायक संध्याकाळ असायची”