व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

इब्री लोकांस ४:९-११ येथे सांगितलेला ‘विसावा’ कोणता आहे आणि त्या ‘विसाव्यात येणे’ कसे शक्य आहे?

पहिल्या शतकातील इब्री ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने लिहिले: “देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेहि, जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा, आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे, म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा.”—इब्री लोकांस ४:९-११.

देवाने आपल्या कामापासून विसावा घेतला असे पौलाने म्हटले तेव्हा तो निश्‍चितच उत्पत्ति २:२ मधील गोष्टीबद्दल उद्देशून बोलत होता. तेथे असे लिहिले आहे: “देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपविले, केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला.” यहोवाने “सातव्या दिवशी विसावा घेतला” तो का? त्याने “केलेल्या सर्व कामापासून” थकवा घालवण्यासाठी निश्‍चितच नाही. पुढच्या वचनात एक सुगावा मिळतो: “देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला; कारण सृष्टि निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला.”—उत्पत्ति २:३; यशया ४०:२६, २८.

‘सातव्या दिवसाला’ देवाने आशीर्वाद देऊन पवित्र केले होते अर्थात विशिष्ट उद्देशासाठी तो राखला होता किंवा समर्पित केला होता त्याअर्थी तो आधीच्या सहा दिवसांपासून वेगळा होता. तो उद्देश काय होता? आधी, देवाने मानवजातीकरता आणि पृथ्वीकरता आपला उद्देश प्रकट केला होता. पहिला पुरुष आणि त्याची पत्नी यांना देव म्हणाला: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” (उत्पत्ति १:२८) देवाने मानवजातीला आणि पृथ्वीला परिपूर्ण असे निर्माण केले असले तरी देवाच्या उद्देशानुसार संपूर्ण पृथ्वीला सत्तेखाली आणून परिपूर्ण मानवांनी भरलेल्या परादीसात बदलण्यासाठी वेळ लागणार होता. त्याअर्थी, आपण निर्माण केलेले सर्वकाही आपल्या इच्छेनुसार वाढू देण्यासाठी देवाने “सातव्या दिवशी” पृथ्वीवर आणखी निर्मिती कार्ये करण्यापासून विसावा घेतला. त्या ‘दिवसाच्या’ शेवटी देवाने उद्देशिल्याप्रमाणे सर्वकाही वास्तविकतेत उतरणार होते. तो विसावा किती काळाचा असेल?

इब्री लोकांस या पुस्तकातील पौलाच्या विधानाकडे पुन्हा एकदा लक्ष दिल्यास आपल्याला कळेल की तो म्हणाला, “देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे.” आणि त्याने आपल्या सह-ख्रिश्‍चनांना “त्या विसाव्यात येण्याचा” आटोकाट प्रयत्न करायला उत्तेजन दिले. यावरून दिसून येते की, पौलाने ते शब्द लिहिले तेव्हा देवाच्या विसाव्याचा ‘सातवा दिवस’—जो सुमारे ४,००० वर्षांआधी सुरू झाला होता तो—चालूच होता. आणि जोवर, “शब्बाथाचा धनी” येशू ख्रिस्त याच्या हजार वर्षांच्या राजवटीच्या शेवटी मानवजात आणि पृथ्वीसंबंधी देवाचा उद्देश पूर्ण होत नाही तोवर तो दिवस संपणार नाही.—मत्तय १२:८; प्रकटीकरण २०:१-६; २१:१-४.

ती अद्‌भुत प्रत्याशा लक्षात ठेवून पौलाने देवाच्या विसाव्यात येणे कसे शक्य आहे याविषयी स्पष्टीकरण दिले. त्याने लिहिले: “जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेहि, . . . आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे.” यावरून आपल्याला कळते की, जरी मानवजातीची परिपूर्ण सुरवात झाली असली तरी संपूर्ण मानवजात देवाच्या विसाव्यात आली नव्हती. कारण आदाम आणि हव्वेने देवाची व्यवस्था स्वीकारण्याद्वारे “सातव्या दिवशी” त्याचा विसावा फार काळ पाळला नाही. उलट, त्यांनी बंड केले. देवापासून त्यांना स्वतंत्र व्हायचे होते. देवाचे प्रेमळ मार्गदर्शन स्वीकारण्याऐवजी त्यांनी सैतानाच्या योजनांना पाठिंबा दिला. (उत्पत्ति २:१५-१७) परिणामतः, परादीस पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची प्रत्याशा ते गमावून बसले. तेव्हापासून संपूर्ण मानवजात पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वात आली.—रोमकर ५:१२, १४.

मनुष्याच्या बंडाळीमुळे देवाचा उद्देश निष्फळ ठरला नाही. त्याच्या विसाव्याचा दिवस अजूनही चालू आहे. यहोवाने आपला पुत्र, येशू ख्रिस्त याच्याकरवी खंडणीची प्रेमळ तरतूद केली; त्यामुळे, विश्‍वासाच्या आधारे त्याचा स्वीकार करणारा प्रत्येकजण पाप आणि मृत्यूच्या बंधनातून सुटका आणि विसावा मिळण्याची अपेक्षा करू शकतो. (रोमकर ६:२३) त्यासाठी पौलाने सह-ख्रिश्‍चनांना ‘आपल्या कृत्यांपासून विसावा घ्यायला’ उत्तेजन दिले. तारण प्राप्त करण्यासाठी त्यांना आदाम आणि हव्वेप्रमाणे स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतःचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न न करता देवाची तरतूद स्वीकारण्याची आवश्‍यकता होती. त्याचप्रमाणे, स्वतःची धार्मिकता सिद्ध करण्याचाही प्रयत्न करण्याचे त्यांनी टाळले पाहिजे.

देवाची इच्छा करण्यासाठी स्वतःच्या स्वार्थी किंवा सांसारिक इच्छा मागे टाकल्यामुळे खरोखर तजेला आणि विसावा मिळतो. येशूने हे आमंत्रण दिले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”—मत्तय ११:२८-३०.

देवाच्या विसाव्याविषयी आणि त्यात येणे कसे शक्य आहे याविषयी पौलाने केलेली चर्चा जेरूसलेममधील इब्री ख्रिश्‍चनांकरता निश्‍चितच उत्तेजनाचा स्रोत होती; या ख्रिश्‍चनांनी आपल्या विश्‍वासाकरता पुष्कळ छळ आणि उपहास सहन केला होता. (प्रेषितांची कृत्ये ८:१; १२:१-५) त्याचप्रमाणे, आजही ख्रिश्‍चनांकरता पौलाच्या शब्दांमुळे उत्तेजन मिळू शकते. आपल्या धार्मिक राज्यामध्ये पृथ्वीला परादीसमय करण्याच्या देवाच्या अभिवचनाची पूर्णता समीप आली आहे हे जाणून आपण देखील आपल्या कार्यांपासून विसावा घेऊन त्या विसाव्यात येण्याचा होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.—मत्तय ६:१०, ३३; २ पेत्र ३:१३.

[३१ पानांवरील चित्रे]

देवाच्या विसाव्याच्या दिवसाच्या शेवटी परादीसमय पृथ्वीबद्दल देवाने दिलेले अभिवचन साकारले जाईल