व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अँडीजमध्ये जीवनरक्षक पाण्याचा प्रवाह

अँडीजमध्ये जीवनरक्षक पाण्याचा प्रवाह

अँडीजमध्ये जीवनरक्षक पाण्याचा प्रवाह

अँडीज पर्वतांची रांग पेरू देशातून गेल्यामुळे पश्‍चिमेकडे समुद्रकिनाऱ्‍याचा वाळवंटी प्रदेश आणि पूर्वेकडे बहरणारे हिरवेगार जंगल आहे. पाठीच्या कण्यासारखे एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत पसरलेल्या या पर्वतांमध्ये पेरूतील २.७ कोटी लोकसंख्येतील एक तृतीयांशाहून अधिक लोक राहतात. त्यांनी एकतर अँडीज पर्वतांवरील उंच पठारांवर आणि उभ्या कडांवर वस्ती केली आहे किंवा त्या दंतुर पर्वतरांगेतील खोल खिंडींमध्ये आणि सुपीक दऱ्‍यांमध्ये वस्ती केली आहे.

अँडीजच्या खडबडीत डोंगराळ प्रदेशात सहजासहजी प्रवेश करणे कठीण आहे. त्यामुळे, तेथे राहत असलेले लाखो लोक जगापासून दुरावलेले आहेत; बाहेरच्या जगातील घटनांचा आणि घडामोडींचा त्यांच्यावर फारसा फरक पडत नाही.

ओहोळांच्या काठावर लहान लहान गावे वसली आहेत; या पाण्यावर पीके बहरतात आणि इलामा, अल्पाका, व्हिकुना आणि मेंढ्यांचे कळप जगतात. परंतु, अँडीजमध्ये आणखी एक महत्त्वाचा पाण्याचा प्रवाह आहे अर्थात, “जिवंत पाण्याचा झरा” असलेल्या यहोवाकडील तजेला देणाऱ्‍या आध्यात्मिक पाण्याचा प्रवाह. (यिर्मया २:१३) अँडीज पर्वतांमधील उंच वसतींमध्ये राहणाऱ्‍या लोकांना देवाविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी अचूक ज्ञान मिळावे म्हणून देव त्याच्या साक्षीदारांचा उपयोग करत आहे.—यशया १२:३; योहान १७:३.

“सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे” अशी देवाची इच्छा असल्यामुळे बायबलमधील जीवनरक्षक संदेश या कठीण ठिकाणांपर्यंत पोहंचवण्यासाठी हे सेवक कोणतीही कसर ठेवत नाहीत. (१ तीमथ्य २:४) बायबलवर आधारित असलेला हा संदेश ज्ञानवर्धक आणि उदात्त आहे. या संदेशाने प्रामाणिक लोकांच्या मनातून, मेलेल्या लोकांची, दुरात्म्यांची आणि नैसर्गिक शक्‍तींची भीती निर्माण करणाऱ्‍या अंधश्रद्धा, रीतीरिवाज आणि कल्पना दूर केल्या आहेत. यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या संदेशाने त्यांना परादीस पृथ्वीवर अंतहीन जीवनाची भव्य आशा दिली आहे.

प्रयत्न करणे

या दूरच्या ठिकाणी भेटी देणाऱ्‍या राज्य प्रचारकांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. लोकांच्या अंतःकरणापर्यंत संदेश पोहंचवण्याकरता या बायबल शिक्षकांना क्वेचुआ किंवा आयमारा या दोन स्थानिक भाषांचे ज्ञान असावे लागते.

अँडीजमधील गावांपर्यंत पोहंचणे सोपे नाही. त्या भागांपर्यंत रेल्वेची फारशी सोय नाही. प्रवास धोक्याचा आहे आणि प्रतिकूल हवामान व असाधारण प्रदेश यांमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. मग, राज्याचा संदेश घेऊन साक्षीदार लोकांपर्यंत कसे पोहंचतात?

सुवार्तेच्या धीट प्रचारकांनी हे आव्हान स्वीकारून संदेष्ट्या यशयासारखा आत्मा दाखवून म्हटले आहे: “हा मी आहे, मला पाठीव.” (यशया ६:८) तीन चाकांवरील घरांचा उपयोग करून उत्तर, मध्य आणि दक्षिण भागांमध्ये त्यांनी प्रवास केला. बायबल आणि बायबल साहित्याने भरलेले डझनावरी कार्टन सोबत घेऊन या आवेशी पायनियरांनी किंवा पूर्ण-वेळेच्या सेवकांनी तेथे राहणाऱ्‍या मनमिळाऊ, आतिथ्यप्रिय व प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांमध्ये बायबलमधील सत्याचे बीज पेरले आहे.

डोंगरांमधील रस्त्यांची वळणे तर खासकरून धोक्याची आहेत. त्यामुळे गाड्यांना नागमोडी पद्धतीने जावे लागते. एकदा अशा नागमोडी पद्धतीने जाताना मागच्या सीटवर बसलेल्या एका मिशनरीने खिडकीच्या बाहेर वाकून पाहिले तर मागचे चाक अगदी कडेवरून जात होते आणि खाली ६०० फूट खोल दरी होती! त्याने पटकन डोळे मिटले आणि बस पुढे जाईपर्यंत डोळे उघडले नाहीत.

काही रस्ते खराब झालेले आहेत आणि फार चिंचोळे आहेत. एकदा अशाच खडबडीत, चिंचोळ्या रस्त्यावरून एक मोबाईल होम खाली जात असताना उलट दिशेने एक ट्रक आला. मग मोबाईल होमला पाठमोरेच वर जावे लागले आणि दोन्ही गाड्यांना पार व्हायला जेमतेम जागा मिळेल अशा ठिकाणी थांबावे लागले.

पण, अशा अथक प्रयत्नांचे फार उल्लेखनीय परिणाम मिळाले. या प्रयत्नांविषयी तुम्हाला आणखी जाणून घ्यायला आवडेल का?

तितिकाका सरोवराचे “सिंचन”

अँडीज पर्वतांच्या कुशीत, समुद्र पातळीच्या ३,८०० मीटर उंचीवर असलेले तितिकाका सरोवर जगातले सर्वात उंच नौकानयनयोग्य सरोवर आहे. तितिकाका सरोवराला पाण्याचा पुरवठा करणाऱ्‍या २५ नद्यांपैकी बहुतेक नद्या बर्फाच्छादित पर्वत शिखरांमुळे (ज्यांतील काही ६,४०० मीटरहून उंच आहेत) निर्माण झाल्या आहेत. या उंच ठिकाणी वातावरण थंड असते आणि त्या भागाचे रहिवासी नसलेल्यांना उंच ठिकाणाचा त्रास होतो.

काही वर्षांआधी, क्वेचुआ आणि आयमारा भाषा बोलणारे काही पायनियर तितिकाका सरोवराच्या आमानतानी आणि ताकिले द्वीपांवर गेले. त्यांनी “चर्चेसचा वेध”—ख्रिस्ती धर्मजगताच्या खोट्या शिकवणुकींचे प्रामाणिक परीक्षण करणारे स्लाईड प्रदर्शन सोबत नेले. याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. एका मनुष्याने बांधवांचे स्वागत करून त्याच्या घरातली एक मोठी, ऐसपैस खोली खास तेथे राहून बायबलविषयी शिकवण्यासाठी बांधवांना देऊ केली.

आमानतानी येथील पहिल्या सभेला १०० लोक आले होते; ताकिले येथील सभेला १४० लोक हजर राहिले. येथे केलेले स्लाईडचे प्रदर्शन क्वेचुआ भाषेत होते. पूर्वी मेनलँडवर राहणाऱ्‍या एका दांपत्याने म्हटले: “तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांनी आमच्याकडं यावं म्हणून आम्ही केव्हापासून प्रार्थना करत होतो!”

या दोन मोठ्या द्वीपांशिवाय, तितिकाका सरोवरातील अंदाजे ४० ‘तंरगत्या’ द्वीपांवर सुवार्ता पोहंचवण्यात आली आहे. “तरंगते” द्वीप? होय, हे द्वीप, सरोवराच्या उथळ भागांमध्ये वाढणाऱ्‍या टोटोरा या पाण्यात वाढणाऱ्‍या वनस्पतीने तयार केले जातात. टोटोरा पाण्याच्या वर, उंच वाढतात. द्वीप बनवण्यासाठी येथील स्थानिक लोक, सरोवराच्या तळाशी मुळावलेल्या या वनस्पतींना मुडपून विणतात ज्यामुळे एकप्रकारचा मंच तयार होतो. मग या मंचात चिखल घालून तो घट्ट केला जातो आणि आणखी कापलेल्या वनस्पती त्यात रुजवून पक्का केला जातो. त्यावर पाण-वनस्पतींनीच बांधलेल्या झोपड्यांमध्ये लोक राहतात.

तितिकाका सरोवराच्या द्वीपांवरील लोकांना प्रचार करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी एक बोट आणली होती. या बोटीत १६ लोक बसू शकत होते. तरंगत्या द्वीपांजवळ बोट उभी करून, हे साक्षीदार या वनस्पतीच्या मंचावरून घरोघरी जात होते. चालताना हा मंच थोडासा हलतो असे त्यांचे म्हणणे आहे. जलप्रवासाचा त्रास होणाऱ्‍यांनी येथे जरा सांभाळूनच राहावे!

आयमारा भाषा बोलणारे लोक, सरोवराच्या किनाऱ्‍यावर आणि द्वीपकल्पावर असलेल्या असंख्य वसत्यांमध्ये आणि गावांमध्ये राहतात. येथे जमिनीवरून जाण्यापेक्षा बोटीने जाणे अधिक सोयीस्कर पडते. असा अंदाज केला जातो की, राज्याचा संदेश जेथे बोटीने पोहंचवला जातो त्या प्रदेशांमध्ये सुमारे ४,००,००० लोक राहतात. त्यामुळे काही काळापर्यंत या बोटी व्यस्त राहतील.

आध्यात्मिक तहान भागवणे

अँडीजमध्ये हुल्याकाजवळ सँता लुसिया गावामध्ये फ्लाव्हियो राहत होता. त्याच्या इव्हँजिलिकल चर्चमध्ये नरकाग्नीविषयी त्याला शिकवले गेले होते. या अनंतकालिक अग्नीमय शिक्षेची भीती तो कित्येक वर्षे मनात बाळगून होता. एक प्रेमळ देव अनिश्‍चित काळापर्यंत मानवांना आगीत यातना कशाप्रकारे देऊ शकतो याचे त्याला कोडे पडले होते. पण, यहोवाच्या साक्षीदारांचा पूर्ण-वेळेचा सेवक, टीटो त्याच्या गावात गेला तेव्हा तो फ्लाव्हियोच्या घरी गेला.

फ्लाव्हियोने सर्वात आधी असा प्रश्‍न विचारला, “तुमच्या धर्मात लोकांना नरकाग्नीत यातना दिली जाईल असे शिकवले जाते का?” टीटोने उत्तर दिले की, ही कल्पना निर्माणकर्त्याला तिरस्करणीय वाटते व प्रेमळ देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या यहोवाच्या नावावर कलंक आहे. फ्लाव्हियोच्याच बायबलमधून टीटोने त्याला दाखवले की, मृत लोकांना कशाचीही शुद्ध नसते आणि देवाच्या राज्यात पृथ्वीवर त्यांचे पुनरुत्थान होईल. (उपदेशक ९:५; योहान ५:२८, २९) हे ऐकून फ्लाव्हियोचे जणू डोळे उघडले. त्याने लागलीच बायबल अभ्यास स्वीकारला आणि लवकरच बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती बनला.

कृतज्ञ गाव

बायबल कधीही न पाहिलेल्या किंवा यहोवाच्या साक्षीदारांविषयी किंवा ते प्रचार करत असलेल्या सुवार्तेविषयी कधीही न ऐकलेल्या गावांमध्ये प्रचार करणे किती आनंददायक असेल याची कल्पना करा! असाच अनुभव रोझा, आलिस्या आणि सेसिल्या या तीन पायनियर बहिणींना आला. त्यांनी ३,६०० मीटरहून जास्त उंचीवर असलेल्या मध्य पेरूतील इस्कुचाका आणि कोनायका गावांमध्ये प्रचार केला.

पहिल्या गावात आल्यावर त्यांना राहायला कोठेही जागा नव्हती. मग त्यांनी तेथील पोलिस कमांडरशी बातचीत करून त्यांचा तेथे येण्यामागील उद्देश सांगितला. याचा परिणाम? त्याने त्यांना पोलिस ठाण्यात एक रात्र राहण्याची परवानगी दिली. दुसऱ्‍या दिवशी या पायनियरांना एक चांगले घर मिळाले आणि तेच त्यांच्या कार्याचे केंद्र बनले.

ख्रिस्ताच्या मृत्यूचा वार्षिक स्मारकविधी जवळ आला होता. पायनियरांनी इस्कुचाका गावातील सर्व घरांना भेटी दिल्या होत्या, अनेक बायबल वितरित केले होते आणि पुष्कळ बायबल अभ्यासही सुरू केले होते. स्मारकविधीच्या आधी त्यांनी या घटनेच्या आमंत्रण पत्रिका लोकांना दिल्या आणि हा विधी का साजरा केला जातो तसेच या विधीदरम्यान वापरण्यात येणाऱ्‍या बोधचिन्हांचा काय अर्थ होतो हे समजावून सांगितले. या प्रसंगी मदत करण्यासाठी काही बांधवांना बोलवण्यात आले आणि त्यांच्यापैकी एकाने भाषण दिले. या खास प्रसंगी त्या लहानशा गावातील ५० लोक हजर राहिलेले पाहून किती आनंद झाला! प्रभूच्या सांजभोजनाचा नेमका अर्थ काय आहे हे त्या लोकांना पहिल्यांदाच कळाले. त्याचप्रमाणे, त्या लोकांच्या हातात देवाचे वचन होते ही त्यांच्याकरता केवढी बहुमोलाची गोष्ट!

ओझे हलके होते

बायबलमधील सत्याचे ताजे पाणी खोट्या धर्माच्या बंदिवानांना देणे नेहमीच आनंददायक असते. पायसक हे ठिकाण प्राचीन इंका साम्राजाचा बालेकिल्ला होता. आज तेथे राहणाऱ्‍या बहुतेक लोकांना नरकाग्नीची अशास्त्रवचनीय शिकवण शिकवली गेली आहे. त्यांचे पाळक त्यांना असे सांगतात की, केवळ पाळकांनी मध्यस्थी केली तरच ते स्वर्गात जाऊ शकतील.

साहजिकच, हे लोक बायबलमधील सत्याच्या ताज्या पाण्यासाठी तान्हेले आहेत. यहोवाच्या साक्षीदारांचा एक पूर्ण वेळेचा सेवक, सान्तिगो याला घरोघरच्या प्रचारकार्यात एका मनुष्याला हे समजवण्याची संधी मिळाली की, धार्मिक लोकांसाठी बागेसमान पृथ्वीवर राहण्याचे भवितव्य आहे. (स्तोत्र ३७:११) सान्तिगोने बायबलमधून दाखवले की, मृतांचे पुनरुत्थान केले जाईल आणि सार्वकालिक जीवनाच्या आशेसोबतच त्यांना यहोवाच्या परिपूर्ण मार्गांची शिकवण देण्यात येईल. (यशया ११:९) तो मनुष्य कॅथलिक होता, तो जादूटोणा करायचा आणि दारूडाही होता. पण आता त्याला बायबलमधली आशा मिळाली होती. त्याच्या जीवनाला उद्देश मिळाला होता; परादीसमध्ये जगणे हा तो उद्देश होता. त्याने जादूटोण्याचे सर्व साहित्य जाळून टाकले आणि पिणे सोडले. त्याने आपले कुटुंब एकत्र आणून बायबल अभ्यास स्वीकारला. कालांतराने त्या कुटुंबातल्या सर्वांनी यहोवा देवाला स्वतःचे समर्पण केले आणि बाप्तिस्मा घेतला.

आदरातिथ्याचा स्वीकार

हे पहाडी लोक पाहुणचार दाखवण्यात पहिले असतात. ते गरीब असतात आणि लहान लहान घरांमध्ये राहतात तरीसुद्धा पाहुण्यांना आपल्याजवळ असेल ते देतात. बायबलमधील उच्च दर्जांविषयी शिकण्याआधी घरमालक पाहुण्यांशी बोलताना त्यांना कोकोची पाने खायला देतात. पण, साक्षीदार बनल्यावर एक चमचाभर साखर दिली जाते; त्या दूरस्थ भागांमध्ये कोकोच्या पानांइतकेच साखरेचे मूल्य आहे.

एका बांधवाने एकदा एका मिशनरीला आपल्यासोबत पुनर्भेटीला यायला सांगितले. डोंगराच्या उभ्या कडेवरील कठीण वाटेवरून वर गेल्यावर त्यांनी टाळी वाजवली आणि घरमालकाला ते आलेत असे कळवले. त्या झोपडीत त्यांना आत बोलवण्यात आले; झोपडीच्या लहानशा दरवाजातून त्यांना वाकून आत जावे लागले. ते एकदम सांभाळून आत गेले कारण सारवलेल्या जमीनीवर घराच्या मध्यभागी एक खड्डा खणून त्यात रजई घालून त्या घरातल्या स्त्रीने आपले बाळ ठेवले होते. खळग्यातून बाहेर येऊ न शकणारे बाळ आनंदाने आवाज करत होते आणि बाकीचे मोठे लोक चर्चा करण्यात मग्न होते. राज्याच्या आशीर्वादांविषयी छान चर्चा झाल्यावर त्या घरातल्या स्त्रीने एका उंच पात्रात तिथले एकप्रकारचे पेय आणले. त्यानंतर हे बांधव डोंगराच्या कडेवरून खाली उतरून आणखी पुनर्भेटी करायला निघून गेले.

विपुल पीक

आता या भागात जवळजवळ शंभर दूरस्थ गट असून हजारहून अधिक लोक यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करत आहेत. लिमा येथील सेवा प्रशिक्षण प्रशालेतील पदवीधारकांना अशा ठिकाणांतील गटांच्या मंडळ्या तयार करण्यासाठी तेथे पाठवले जात आहे. कित्येक वर्षांपासून खोटा धर्म आणि अंधविश्‍वास यांमुळे बंदिस्त असलेल्या प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना राज्याच्या सुवार्तेकरवी सुटका मिळाली आहे! (योहान ८:३२) त्यांची सत्याच्या पाण्याची तहान भागवली जात आहे.

[१० पानांवरील चित्र]

तितिकाका सरोवराच्या ‘तरंगत्या’ द्वीपांवर साक्षकार्य