व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आनंदी जगाचे रहस्य

आनंदी जगाचे रहस्य

आनंदी जगाचे रहस्य

टाईम पत्रिकेने म्हटले, “मागील दोन सहस्त्रकांतच नव्हे, तर सबंध मानव इतिहासात सर्वात प्रभावशाली व्यक्‍ती कोण होती तर—नासरेथचा येशू.” येशू या पृथ्वीवर होता तेव्हा त्याची महानताच नाही तर इतरांबद्दल त्याला वाटणारी चिंता ही हजारो प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांच्या नजरेत पडली. त्यामुळे, त्याला राजा बनवायची त्यांची इच्छा होती यात काही नवल नाही. (योहान ६:१०, १४, १५) तरीही, आधीच्या लेखात सांगितल्यानुसार येशूने राजकारणात भाग घेण्यास नकार दिला.

येशूची प्रतिक्रिया कमीतकमी तीन कारणांवर आधारित होती: मानवी इच्छा-स्वातंत्र्याच्या प्रकारांविषयी (ज्यामध्ये मानवी शासनाचाही समावेश होतो) त्याच्या पित्याचा दृष्टिकोन; शासन करणाऱ्‍या सर्वात चांगल्या मानवी प्रयत्नांविरुद्ध कार्य करत असलेली शक्‍तिशाली, गुप्त शक्‍ती; आणि सबंध पृथ्वीवर शासन करणारे स्वर्गीय सरकार स्थापन करण्याचा देवाचा उद्देश. या तीन मुद्द्‌यांचे आपण जवळून परीक्षण केल्यास जगात सुधार घडवण्यात मानवी प्रयत्नांना यश का लाभले नाही हे आपल्याला कळेल. तसेच, यश कशाप्रकारे प्राप्त केले जाईल हे देखील आपल्याला समजेल.

मानव स्वतःवर राज्य करू शकतात का?

देवाने मानवांना निर्माण केले तेव्हा त्याने त्यांना प्राणीमात्रांवर अधिकार दिला. (उत्पत्ति १:२६) परंतु मानवजातीवर देवाचे सार्वभौमत्व होते. पहिल्या पुरुषाने आणि स्त्रीने एका विशिष्ट झाडाचे अर्थात “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे” फळ न खाण्याची आज्ञा पाळून देवाला आपण आज्ञाधारक आहोत हे सिद्ध करायचे होते. (उत्पत्ति २:१७) पण दुःखाची गोष्ट म्हणजे, आदाम आणि हव्वेने आपल्या इच्छा स्वातंत्र्याचा गैरफायदा उचलून देवाची आज्ञा मोडली. मना केलेले फळ खाणे ही केवळ चोरीच नव्हती तर देवाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध बंड होते. उत्पत्ति २:१७ या वचनावर द न्यू जेरूसलेम बायबल यातील तळटीप म्हणते की, आदाम आणि हव्वेने, “संपूर्ण नैतिक स्वातंत्र्य [मागितले] ज्याकरवी मनुष्य आपण निर्मित आहोत हे स्वीकारायला तयार होत नाही . . . हे पहिले पाप देवाच्या सार्वभौमत्वावर एक हल्ला होता.”

यात महत्त्वपूर्ण नैतिक वादविषय गोवलेले असल्यामुळे देवाने आदाम आणि हव्वेला तसेच त्यांच्या संततीला स्वतःची जीवनपद्धत स्वतः निवडू दिली आणि योग्य आणि अयोग्य यांसंबंधी त्यांनी स्वतःचे दर्जे ठरवले. (स्तोत्र १४७:१९, २०; रोमकर २:१४) तेव्हापासून खरे तर स्वतः निर्णय घेण्याच्या मनुष्याच्या प्रयोगाला सुरवात झाली. तो यशस्वी ठरला का? हजारो वर्षांचा गत इतिहास पाहिल्यास याचे नकारार्थी उत्तर येते! उपदेशक ८:९ म्हणते: “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” मानवाने स्वतःवरच चालवलेल्या राज्याचा हा दुःखमय इतिहास यिर्मया १०:२३ मधील शब्दांची सत्यता पटवून देतो: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” इतिहासाने हे शाबीत केले आहे की, निर्माणकर्त्याविना यशस्वीरित्या शासन करण्याची क्षमता मानवांमध्ये नाही.

येशू याच्याशी पूर्णपणे सहमत होता. देवापासून स्वतंत्र असण्याची कल्पनासुद्धा त्याला तिरस्करणीय वाटत होती. तो म्हणाला: “मी आपण होऊन काही करीत नाही . . . जे [देवाला] आवडते ते मी सर्वदा करितो.” (योहान ४:३४; ८:२८, २९) यास्तव, मनुष्यांकडून राजपद मिळवण्याची देवाकडून कसलीही परवानगी न मिळाल्यामुळे येशूने ते राजपद स्वीकारण्याचा विचार देखील केला नाही. याचा अर्थ, तो आपल्या सह-मानवाला मदत करण्यास मागेपुढे पाहत होता असे नाही. उलट, तेव्हा आणि भवितव्यात लोकांना सर्वात मोठा आनंद मिळवून देण्यात त्याने आपली सर्व शक्‍ती खर्च केली. त्याने मानवजातीकरता आपले जीवनही दिले. (मत्तय ५:३-११; ७:२४-२७; योहान ३:१६) पण येशूला ठाऊक होते की, ‘सर्वांचा उचित काळ असतो;’ देवाला आपले सार्वभौमत्व मानवजातीवर प्रस्थापित करण्यालाही विशिष्ट काळ आहे. (उपदेशक ३:१; मत्तय २४:१४, २१, २२, ३६-३९) पण, एदेन बागेत आपल्या मूळ पालकांनी, एका दृश्‍य सर्पाद्वारे बोलणाऱ्‍या दुष्ट आत्मिक प्राण्याने सांगितल्याप्रमाणे केले. हे दुसरे एक कारण आहे ज्यामुळे येशू राजकारणापासून दूर राहिला.

जगाचा अज्ञात शासक

बायबल सांगते की, सैतानाला एकदा नमन करण्याच्या ऐवजात त्याने येशूला जगातली “सर्व राज्ये व त्यांचे वैभव” देऊ केले. (मत्तय ४:८-१०) याचा अर्थ, येशूपुढे जगाची सत्ता ठेवण्यात आली होती—पण त्याला दियाबलाच्या अटी मान्य करायच्या होत्या. या मोहाला येशू भाळला नाही. पण हा खरोखरच मोह होता का? इतके मोठे बक्षीस सैतान खरोखर देऊ शकत होता का? निश्‍चितच, कारण खुद्द येशूनेच दियाबलाला “जगाचा अधिकारी” म्हटले आणि प्रेषित पौलाने त्याला ‘ह्‍या युगाचा दैवत’ म्हटले.—योहान १४:३०; २ करिंथकर ४:४; इफिसकर ६:१२.

अर्थात, येशूला चांगले ठाऊक होते की, दियाबलाला मानवजातीचे कल्याण व्हावे अशी मुळीच इच्छा नव्हती. उलट त्याने सैतानाला “मनुष्यघातक” आणि “लबाड व लबाड असलेल्या सर्व गोष्टींचा बाप” म्हटले. (योहान ८:४४, दि ॲमप्लिफाईड बायबल) स्पष्टतः, अशा दुष्ट आत्म्याच्या “वश” असलेले जग कधीही खऱ्‍या अर्थाने आनंदी असू शकत नाही. (१ योहान ५:१९) परंतु, दियाबलाकडे सदासर्वकाळ हा अधिकार राहणार नाही. सध्या शक्‍तिशाली आत्मिक प्राणी असलेला येशू लवकरच सैतान आणि त्याचा प्रभाव पूर्णपणे काढून टाकील.—इब्री लोकांस २:१४; प्रकटीकरण २०:१-३.

सैतानाला स्वतःला हे ठाऊक आहे की, जगाचा शासक या नात्याने त्याचा समय समाप्त होत चालला आहे. त्यामुळे, नोहाच्या काळात जलप्रलयाआधी त्याने केले होते त्याचप्रमाणे लोक सुधारणार नाहीत अशाप्रकारे त्यांना भ्रष्ट करण्यासाठी तो हरतऱ्‍हेचा प्रयत्न करत आहे. (उत्पत्ति ६:१-५; यहूदा ६) प्रकटीकरण १२:१२ म्हणते, “पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” बायबलमधील भविष्यवाण्या आणि जागतिक घटना यांवरून दिसून येते की, ‘थोडा काळ’ असलेल्या समयाच्या शेवटी आपण आलो आहोत. (२ तीमथ्य ३:१-५) लवकरच सुटका मिळणार आहे.

आनंद आणण्यासाठी सरकार

येशूने राजकारणात सहभाग घेतला नाही याचे तिसरे कारण असे आहे की, भविष्यातील एका नियोजित वेळी, या पृथ्वीवर शासन करण्यासाठी देव एका स्वर्गीय सरकाराची स्थापना करील हे त्याला ठाऊक होते. या सरकाराला बायबलमध्ये देवाचे राज्य म्हटले आहे आणि येशूच्या शिकवणीचा तो मुख्य विषय होता. (लूक ४:४३; प्रकटीकरण ११:१५) येशूने आपल्या शिष्यांना ते राज्य येण्यासाठी प्रार्थना करायला शिकवले कारण फक्‍त याच राज्यात ‘स्वर्गाप्रमाणे पृथ्वीवरही देवाच्या इच्छेप्रमाणे होईल.’ (मत्तय ६:९, १०) ‘हे सरकार संपूर्ण पृथ्वीवर राज्य करणार असेल तर मानवी सरकारांचे काय होईल?’ असा प्रश्‍न तुम्हाला पडेल.

याचे उत्तर दानीएल २:४४ येथे सापडते: “[सद्य व्यवस्थीकरणाच्या शेवटी शासन करणाऱ्‍या] त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व [मानवनिर्मित] राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (तिरपे वळण आमचे.) देवाच्या राज्याला पृथ्वीवरील राज्यांचे “चूर्ण” का करावे लागेल? कारण ही राज्ये, एदेन बागेत सैतानाने चेतवलेल्या आत्म-निर्णयाच्या देव-विरोधी आत्म्याला प्रोत्साहन देतात. हा आत्मा, मानव कल्याणाच्या विरोधात तर आहेच, शिवाय याला प्रोत्साहन देणारे लोक निर्माणकर्त्याच्या विरोधात जाणारा मार्ग पत्करतात. (स्तोत्र २:६-१२; प्रकटीकरण १६:१४, १६) म्हणून आपण स्वतःला विचारले पाहिजे की, ‘आपण देवाच्या शासनाच्या बाजूने आहोत की त्याच्या विरोधात?’

तुम्ही कोणाचे सार्वभौमत्व निवडाल?

शासनाविषयी लोकांना योग्य माहितीच्या आधारे निर्णय घ्यायला मदत करण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना सद्य व्यवस्थीकरणाचा अंत येण्याआधी “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची . . . सुवार्ता” गाजवण्याची कामगिरी दिली. (मत्तय २४:१४) देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी जगभर कोण प्रसिद्ध आहेत? यहोवाचे साक्षीदार. इतकेच नव्हे तर, या मासिकाच्या मुखपृष्ठावर कित्येक वर्षांपासून “यहोवाच्या राज्याचा प्रकाशक” हे शब्द दिसतात. आज, २३० देशांहून अधिक देशांमध्ये सुमारे ६० लाख साक्षीदार, लोकांना त्या राज्याविषयी अचूक ज्ञान घ्यायला मदत करत आहेत. *

राज्याच्या प्रजेसाठी आशीर्वाद

येशूने जे काही केले ते नेहमी देवाच्या पद्धतीने केले. त्यामुळे, स्वतंत्र मार्ग निवडण्याऐवजी आणि राजकारणाद्वारे तेव्हाच्या व्यवहारांना दुजोरा देण्याऐवजी किंवा त्यांच्यामध्ये काही सुधार घडवण्याऐवजी त्याने देवाच्या राज्याचा प्रसार करायचा प्रयत्न केला—कारण जगाच्या समस्यांवरील तोच एकमेव उपाय होता. त्याच्या एकनिष्ठतेमुळे त्याला त्या राज्याचा राजा म्हणून स्वर्गात वैभवी राजासनावर बसवण्यात आले. देवाला अधीन राहिल्याचे किती अद्‌भुत बक्षीस!—दानीएल ७:१३, १४.

देवाच्या राज्याला प्राधान्य देणाऱ्‍या आणि त्याच्या इच्छेला स्वाधीन होणाऱ्‍या लाखो लोकांना देखील आज एक अद्‌भुत बक्षीस मिळाले आहे अर्थात देवाच्या राज्याची पार्थिव प्रजा होण्याचा सुहक्क त्यांना प्राप्त झाला आहे. (मत्तय ६:३३) त्या राज्याच्या प्रेममय शासनात त्यांना मानवी परिपूर्णता लाभेल आणि सार्वकालिक जीवनाचे भवितव्य दिले जाईल. (प्रकटीकरण २१:३, ४) १ योहान २:१७ म्हणते: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” सैतान आणि त्याच्या अनुयायांचा सर्वनाश झाल्यावर पृथ्वी एका परादीसात बदलली जाईल आणि माणसामाणसांमध्ये वैर निर्माण करणारा राष्ट्रवाद, भ्रष्ट व्यापारी व्यवस्था व खोटा धर्म राहणार नाहीत तेव्हा पृथ्वीवर सर्वकाळ राहणे किती आनंददायक असेल!—स्तोत्र ३७:२९; ७२:१६.

होय, देवाचे राज्य हेच खरोखर आनंदी जगावर उपाय आहे; म्हणूनच, त्याची घोषणा करणाऱ्‍या संदेशाला उचितपणे सुवार्ता म्हटले जाते. ही सुवार्ता तुम्ही या आधी ऐकली नसल्यास, यहोवाचे साक्षीदार पुढच्या वेळी तुमच्या घरी येतील तेव्हा ही सुवार्ता तुम्ही ऐकू शकता.

[तळटीप]

^ देवाच्या राज्याला पाठिंबा देताना यहोवाचे साक्षीदार राजकारणात भाग घेत नाहीत किंवा जगिक सरकारांविरुद्ध बंड करत नाहीत—त्यांच्यावर बंदी असलेल्या किंवा त्यांचा छळ केला जाणाऱ्‍या देशांमध्येही. (तीत ३:१) त्या उलट, येशूने आणि त्याच्या पहिल्या शतकातील शिष्यांनी केल्याप्रमाणे ते उपयुक्‍त, आध्यात्मिक आणि गैर-राजकीय पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न करतात. ते विविध समाजांतील धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना कुटुंबातील प्रेम, प्रामाणिकपणा, नैतिक शुद्धता आणि कामासूपणा अशी बायबलची हितकर मूल्ये शिकायला मदत करण्याचा प्रयत्न करतात. प्रामुख्याने ते लोकांना बायबलच्या तत्त्वांचे पालन करण्यास आणि देवाचे राज्य हीच मानवजातीची खरी आशा आहे असा विश्‍वास ठेवण्यास शिकवतात.

[५ पानांवरील चित्रे]

देवाविना मानव यशस्वीपणे राज्य करू शकत नाहीत याला इतिहास पुष्टी देतो

[५ पानांवरील चित्र]

सध्याच्या ‘युगावर’ सैतानाचे राज्य असल्यामुळेच तो येशूसमोर “जगातील सर्व राज्ये” ठेवू शकला

[७ पानांवरील चित्रे]

येशूने शिकवले की, देव राज्याच्या शासनाखाली जग एक सुंदर ठिकाण बनेल