व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या हृदयाचे रक्षण करा

आपल्या हृदयाचे रक्षण करा

आपल्या हृदयाचे रक्षण करा

“सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यांत जीवनाचा उगम आहे.”—नीतिसूत्रे ४:२३.

१, २. हृदयाचे रक्षण करण्याची का गरज आहे?

 एका कॅरिबियन बेटावर आलेले जोरदार वादळ शमल्यावर एक म्हातारा माणूस आपल्या घरातून बाहेर आला. वादळामुळे बरीच नासधूस झाली होती. आपल्या घराभोवती नजर फिरवल्यावर त्याला आढळले की घरासमोरील फाटकाजवळ कित्येक वर्षांपासून उभा असलेला विशाल वृक्ष कोसळला होता. त्या माणसाच्या मनात विचार आला, ‘जवळपासची लहान लहान झाडे वादळात टिकून राहिली, मग हा मोठा वृक्ष कसा काय कोसळला?’ पण, पडलेल्या वृक्षाच्या बुंध्याकडे पाहताच त्याला या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले. अढळ दिसणारा तो वृक्ष आतून पूर्णपणे कुजला होता; वादळाने केवळ ही न दिसणारी वस्तूस्थिती उघडकीस आणली होती.

ख्रिस्ती जीवनाच्या मार्गात अगदी अढळपणे मुळावलेला वाटणारा एखादा खरा उपासक विश्‍वासाच्या परीक्षेला बळी पडतो तेव्हा अत्यंत वाईट वाटते. पण बायबल म्हणते ते अगदी खरे आहे; ते असे, की “मानवाच्या मनांतल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात.” (उत्पत्ति ८:२१) याचा अर्थ, सतत जागरूक न राहिल्यास सर्वात सात्विक हृदय देखील एखाद्या वाईट गोष्टीच्या मोहाला बळी पडू शकते. कोणत्याही अपरिपूर्ण मनुष्याचे हृदय भ्रष्ट होऊ शकते; म्हणूनच ‘सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण करण्याचा’ सल्ला आपण मनावर घेण्याची गरज आहे. (नीतिसूत्रे ४:२३) पण आपल्या लाक्षणिक हृदयाचे रक्षण आपण कसे करू शकतो?

नियमित तपासणी—अत्यावश्‍यक

३, ४. (अ) शारीरिक हृदयाविषयी कोणते प्रश्‍न विचारले जाऊ शकतात? (ब) लाक्षणिक हृदयाचे परीक्षण आपण कसे करू शकतो?

शारीरिक तपासणी करून घेण्याकरता तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा सहसा ते तुमच्या हृदयाची तपासणी करतील. तुमच्या एकंदर प्रकृतीवरून तसेच तुमच्या हृदयाच्या स्थितीवरून तुमच्या शरीराला आवश्‍यक पोषण मिळत आहे असे दिसून येते का? तुमचा रक्‍तदाब सामान्य आहे का? हृदयाचे ठोके नियमित आणि स्पष्ट आहेत का? तुमच्या शरीराला पुरेसा व्यायाम मिळतो का? तुमच्या हृदयावर अनावश्‍यक तणाव तर नाही?

जर शारीरिक हृदयाची वेळोवेळी तपासणी करणे आवश्‍यक आहे तर मग लाक्षणिक हृदयाविषयी काय? यहोवा त्याची तपासणी करतो. (१ इतिहास २९:१७) आणि आपणही केली पाहिजे. ती कशी? आपण स्वतःला पुढील प्रश्‍न विचारले पाहिजेत: नियमित वैयक्‍तिक अभ्यास आणि सभांना नियमित उपस्थित राहण्याद्वारे माझ्या हृदयाला पुरेसे आध्यात्मिक अन्‍न मिळत आहे का? (स्तोत्र १:१, २; इब्री लोकांस १०:२४, २५) ‘हाडात कोंडलेला अग्नी जळत असल्यासारखा’ यहोवाचा संदेश माझ्या हृदयात ज्वलंत आहे का व तो मला राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात पुरेपूर सहभाग घेण्यास प्रेरित करतो का? (यिर्मया २०:९; मत्तय २८:१९, २०; रोमकर १:१५, १६) मी सेवेत यत्नशील आहे का, शक्य झाल्यास कोणत्या न कोणत्या प्रकारे पूर्ण-वेळेच्या सेवेत सहभाग घेण्यास मी उत्सुक असतो/असते का? (लूक १३:२४) मी माझ्या लाक्षणिक हृदयाला कोणत्या प्रकारच्या गोष्टींच्या संपर्कात येऊ देतो/देते? जे लोक पूर्ण हृदयाने खरी उपासना करत आहेत त्यांच्याच सहवासाची मला ओढ आहे का? (नीतिसूत्रे १३:२०; १ करिंथकर १५:३३) यांपैकी कोणत्याही बाबतीत आपण कमी पडत आहोत असे आढळल्यास, आपण लगेच स्वतःत सुधारणा केली पाहिजे.

५. विश्‍वासाची पारख करणाऱ्‍या परीक्षांतून कोणता चांगला हेतू साध्य होऊ शकतो?

बऱ्‍याचदा आपल्याला असे अनुभव येतात, ज्यांमुळे आपला विश्‍वास पारखला जातो. हे अनुभव आपल्याला आपल्या हृदयाचे परीक्षण करण्याची संधी देतात. इस्राएली लोक प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याच्या बेतात असताना मोशेने त्यांना म्हटले: “तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळिशील की नाही ह्‍याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्‍वर ह्‍याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालविले ह्‍याचे स्मरण कर.” (अनुवाद ८:२) आपल्यावर अनपेक्षित किंवा मोहात पाडणारे प्रसंग येतात, तेव्हा आपल्या मनात येणाऱ्‍या भावना, इच्छा किंवा आपली प्रतिक्रिया पाहून कधीकधी स्वतःलाच आश्‍चर्य वाटत नाही का? यहोवा आपल्यावर ज्या परीक्षा येऊ देतो, त्या निश्‍चितच आपल्याला आपल्या उणीवांची जाणीव करून देऊ शकतात आणि यामुळे आपल्याला सुधारणा करण्याची संधी मिळते. (याकोब १:२-४) तेव्हा, आपल्यावर येणाऱ्‍या परीक्षांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो याचा आपण नेहमी प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे.

आपल्या बोलण्यातून काय दिसून येते?

६. ज्या विषयांवर आपल्याला बोलायला आवडते त्यावरून आपल्या हृदयाविषयी काय दिसून येते?

आपल्या हृदयाच्या भांडारात आपण काय साठवले आहे हे कसे ठरवता येते? येशूने म्हटले: “चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो; तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.” (लूक ६:४५) आपण कोणत्या विषयांवर सहसा बोलतो यावरून आपल्या मनातील संकल्प सहज स्पष्ट होतात. आपण सहसा भौतिक गोष्टींविषयी आणि जगिक दृष्टीने यश संपादन करण्याविषयी बोलत असतो का? की आपली संभाषणे बहुतेक वेळा आध्यात्मिक गोष्टींविषयी आणि ईश्‍वरशासित ध्येयांविषयी असतात? इतरांच्या चुकांची दवंडी पिटण्याऐवजी त्या प्रेमळपणे झाकून टाकण्याची आपली प्रवृत्ती आहे का? (नीतिसूत्रे १०:११, १२) तात्त्विक आणि वैचारिक मुद्द्‌यांवर संभाषण करण्याऐवजी आपल्याला नेहमी व्यक्‍तींविषयी आणि त्यांच्या जीवनातील घडामोडींविषयी बोलण्याची सवय आहे का? इतरांच्या खासगी बाबींत आपण अनावश्‍यक रस घेत आहोत असे तर यावरून सूचित होत नसावे?—१ पेत्र ४:१५.

७. हृदयाचे रक्षण करण्याविषयी योसेफाच्या दहा भावांच्या वृत्तान्तावरून आपण काय शिकू शकतो?

एका मोठ्या कुटुंबात काय घडले ते पाहा. याकोबाची दहा थोरली मुले, त्यांचा धाकटा भाऊ योसेफ याच्याशी “सलोख्याचे भाषण करीनासे झाले.” का? कारण तो वडिलांचा लाडका असल्यामुळे ते त्याचा द्वेष करत होते. नंतर योसेफावर यहोवाची कृपा होऊन त्याला स्वप्ने पडली, तेव्हा तर ते त्याचा “अधिकच द्वेष करू लागले.” (उत्पत्ति ३७:४, ५, ११) त्यांनी शेवटी त्याला गुलाम म्हणून विकून टाकण्याचा दुष्टपणा केला. नंतर आपला हा दुष्कर्म लपवण्यासाठी, योसेफाला एका हिंस्र पशूने मारून टाकले असे त्यांनी आपल्या पित्याला खोटे सांगितले. योसेफाच्या दहा भावांनी आपल्या हृदयाचे रक्षण केले नाही. आपणही जर वरचेवर इतरांची टीका करत असू, तर मनातल्या मनात आपण त्यांचा द्वेष किंवा हेवा करतो असे तर यावरून सूचित होत नसावे? आपण काय बोलतो याविषयी नेहमी सतर्क राहून, चुकीच्या भावना आपण लगेच मनातून काढून टाकल्या पाहिजेत.

८. आपण खोटे बोलण्याच्या मोहाला बळी पडलोच तर आपण कशाप्रकारे आपल्या हृदयाचे परीक्षण करू शकतो?

“खोटे बोलणे देवाला अशक्य आहे,” पण अपरिपूर्ण मनुष्यामध्ये खोटे बोलण्याची प्रवृत्ती असते. (इब्री लोकांस ६:१८) स्तोत्रकर्त्याने खेदाने म्हटले, की “सर्व माणसे लबाड आहेत.” (स्तोत्र ११६:११) प्रेषित पेत्राने देखील खोटे बोलून येशूला ओळखत असल्याचे तीन वेळा नाकारले. (मत्तय २६:६९-७५) यावरून स्पष्ट होते की आपण खोटे न बोलण्याची खास काळजी घेतली पाहिजे कारण यहोवाला ‘लबाड बोलणाऱ्‍या जिव्हेचा’ वीट आहे. (नीतिसूत्रे ६:१६-१९) खोटे बोलण्याच्या मोहाला आपण बळी पडलोच, तर आपण याचे कारण तपासून पाहिले पाहिजे. मनुष्याची भीती मनात आल्यामुळे आपण खोटे बोललो का? शिक्षा मिळेल अशी आपल्याला भीती वाटली का? कदाचित आपली चांगली प्रतिमा टिकवून ठेवण्याच्या इच्छेमुळे किंवा निव्वळ स्वार्थामुळे ही समस्या निर्माण झाली असावी का? कारण काहीही असो, पण याबाबतीत आपण विचार केला पाहिजे, आपली चूक कबूल केली पाहिजे आणि यहोवाकडे क्षमेची याचना करून या उणीवेवर मात करण्यासाठी त्याची मदत मागितली पाहिजे. याबाबतीत ‘मंडळीचे वडील’ सर्वात उत्तम मदत देऊ शकतील.—याकोब ५:१४.

९. प्रार्थना आपल्या हृदयाविषयी काय दाखवू शकतात?

तरुण राजा शलमोन याने बुद्धी व सुज्ञान देण्याची विनंती केली तेव्हा यहोवाने त्याला म्हटले: “ज्याअर्थी असा तुझा मानस [हृदयातली इच्छा] आहे म्हणजे तू धनसंपत्ति व ऐश्‍वर्य ही मागितली नाहीत, . . . त्याअर्थी चातुर्य व ज्ञान ही तर तुला देतोच; यांखेरीज . . . धनसंपत्ति व ऐश्‍वर्य मी तुला देईन.” (२ इतिहास १:११, १२) शलमोनाने जे मागितले आणि जे मागितले नाही त्यावरून त्याच्या हृदयात काय आहे हे यहोवाला कळले. आपण देवाला आपल्या मनातल्या भावना कळवतो तेव्हा त्याला आपल्या हृदयाविषयी काय कळून येते? सुज्ञान, बुद्धी व विचारशीलता मिळवण्यास आपण उत्सुक आहोत हे आपल्या प्रार्थनांवरून दिसून येते का? (नीतिसूत्रे २:१-६; मत्तय ५:३) देवाच्या राज्याला बढावा देणाऱ्‍या गोष्टींना आपण मनात प्राधान्य देतो का? (मत्तय ६:९, १०) आपल्या प्रार्थना यांत्रिक झाल्या असल्यास, आपण यहोवाच्या कृत्यांविषयी मनन करण्याकरता अधिक वेळ देण्याची गरज आहे असे सूचित होते. (स्तोत्र १०३:२) आपल्या प्रार्थना आपल्या हृदयाच्या स्थितीविषयी काय दाखवून देतात हे समजून घेण्यास सर्व ख्रिश्‍चनांनी सतर्क असले पाहिजे.

आपल्या कृतींवरून काय दिसून येते?

१०, ११. (अ) व्यभिचार व जारकर्म कोठून उत्पन्‍न होतात? (ब) ‘आपल्या मनातही जारकर्म’ न करण्याची काळजी आपण कशी घेऊ शकतो?

१० शब्दांपेक्षा आपल्या कृती अधिक बोलक्या असतात असे म्हटले जाते. विशेषतः आपण आतून कसे आहोत याविषयी आपल्या कृती बरेच काही दाखवतात. उदाहरणार्थ, नैतिकतेच्या बाबतीत हृदयाचे रक्षण करण्यासाठी केवळ जारकर्म किंवा व्यभिचाराचे कृत्य टाळणे पुरेसे नाही. डोंगरावरील उपदेशात येशूने असे म्हटले: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२८) आपल्या मनातही व्यभिचार न करण्याची काळजी आपण कशी घेऊ शकतो?

११ विश्‍वासू कुलपिता ईयोब याने ख्रिस्ती स्त्रीपुरुषांकरता उत्तम आदर्श ठेवला. ईयोबाचे तरुण स्त्रियांसोबत निश्‍चितच सामान्य संबंध असतील आणि गरज पडल्यास तो त्यांना साहाय्यही करत असेल. पण त्यांच्याविषयी प्रणय भावना मनात आणणे या विश्‍वासू पुरुषाकरता अशक्य होते. का? कारण स्त्रियांना कामेच्छेने न न्याहाळण्याचा त्याने मनाशी निश्‍चय केला होता. त्याने म्हटले: “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?” (ईयोब ३१:१) आपणही आपल्या डोळ्यांशी असाच करार करून आपल्या हृदयाचे रक्षण करूया.

१२. हृदयाचे रक्षण करण्याच्या बाबतीत लूक १६:१० येथील तत्त्व कसे लागू करता येईल?

१२ देवाच्या पुत्राने म्हटले: “जो अगदी थोडक्याविषयी विश्‍वासू तो पुष्काळाविषयीहि विश्‍वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीहि अन्यायी आहे.” (लूक १६:१०) होय, दररोजच्या जीवनातील क्षुल्लक वाटणाऱ्‍या गोष्टींत, किंवा आपल्या घराच्या चार भिंतींआड होणाऱ्‍या गोष्टींतही आपण आपल्या आचरणाचे परीक्षण करणे आवश्‍यक आहे. (स्तोत्र १०१:२) “पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्‍यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये; तसेच अमंगळपण बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्‍यांचाहि उच्चार न होवो, ती उचित नाहीत, तर त्यांपेक्षा उपकारस्तुति होवो,” ही बायबलची ताकीद आपण घरात बसलेले असताना, टीव्ही पाहताना, इंटरनेटच्या साईट्‌स चाळताना आठवणीत ठेवतो का? (इफिसकर ५:३, ४) तसेच, टीव्ही किंवा व्हिडिओ गेम्सवरील हिंसक साहित्याविषयी काय? स्तोत्रकर्त्याने म्हटले: “परमेश्‍वर नीतिमानाला कसास लावितो; त्याला दुर्जनाचा व आततायी [“हिंसाचाराची आवड धरणाऱ्‍या,” NW] माणसाचा वीट येतो.”—स्तोत्र ११:५.

१३. आपल्या हृदयातून काय बाहेर पडते यावर विचार करताना कोणत्या इशाऱ्‍याकडे लक्ष दिले पाहिजे?

१३ यिर्मयाने इशारा दिला, “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” (यिर्मया १७:९) कधीकधी आपण आपल्या चुका लपवण्याकरता निमित्ते सांगतो, किंवा आपल्या चुकांचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच्या व्यक्‍तिमत्त्वातील गंभीर दोषही तर्कसंगत असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करतो किंवा स्वतःच्या यशाचे फुगवून वर्णन करतो; ही सर्व हृदयाच्या कपटीपणाचीच लक्षणे आहेत. असाध्य रोगाने ग्रस्त असलेले आपले हृदय कधीकधी दुटप्पी भूमिका देखील घेण्याची शक्यता आहे—लाघवीपणे एक गोष्ट बोलणे आणि कृती त्याच्या एकदम विरोधात करणे. (स्तोत्र १२:२; नीतिसूत्रे २३:७) आपल्या हृदयातून काय बाहेर पडते याचे प्रामाणिकपणे परीक्षण करणे खरोखर किती महत्त्वाचे आहे!

आपला डोळा निर्दोष आहे का?

१४, १५. (अ) “निर्दोष” डोळा म्हणजे काय? (ब) डोळा निर्दोष राखल्यामुळे हृदयाचे रक्षण करण्याकरता आपल्याला कशाप्रकारे मदत होते?

१४ येशूने म्हटले: “डोळा शरीराचा दिवा आहे.” पुढे त्याने म्हटले, “ह्‍यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल.” (मत्तय ६:२२) निर्दोष डोळा म्हणजे एकाच ध्येयावर किंवा उद्दिष्टावर केंद्रित असलेला, व इतर गोष्टींनी विचलित किंवा पथभ्रष्ट न होणारा डोळा. आपली नजर निश्‍चितच ‘पहिल्याने [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यावर’ केंद्रित असली पाहिजे. (मत्तय ६:३३) आपला डोळा निर्दोष नसल्यास आपल्या लाक्षणिक हृदयावर याचा काय परिणाम होऊ शकतो?

१५ उदरनिर्वाहाकरता पैसा कमवण्याच्या उदाहरणावर विचार करा. आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवणे ही एका ख्रिस्ती व्यक्‍तीची जबाबदारी आहे. (१ तीमथ्य ५:८) पण अन्‍न, वस्त्र व निवारा यांसारख्या व इतर गरजा भागवताना जर आपल्याला अत्याधुनिक, सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात लोकप्रिय प्रकारच्या वस्तू मिळवण्याची आकांक्षा असल्यास काय म्हणता येईल? यामुळे आपले हृदय व मन या लोभी इच्छांचे गुलाम बनून, आपली उपासना अर्धवट मनानेच केल्यासारखी होणार नाही का? (स्तोत्र ११९:११३; रोमकर १६:१८) कुटुंब, व्यवसाय आणि भौतिक गोष्टीच आपल्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट बनण्याइतपत आपण आपल्या शारीरिक गरजा भागवण्यात का गढून जावे? हा प्रेरित सल्ला आठवणीत असू द्या: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल.”—लूक २१:३४, ३५.

१६. डोळ्यांसंबंधी येशूने कोणता सल्ला दिला व का?

१६ मनाला व हृदयाला केल्या जाणाऱ्‍या संदेशवहनात डोळ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आपले डोळे ज्या गोष्टींवर केंद्रित असतात त्यांमुळे आपल्या विचारांवर, भावनांवर व कृतींवर बराच परिणाम होतो. डोळ्यांवाटे येणारे प्रलोभन किती शक्‍तिशाली असू शकते हे स्पष्ट करण्याकरता येशूने एक रूपक वापरले: “तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्‍यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.” (मत्तय ५:२९) अयोग्य गोष्टींकडे नजर लावण्यापासून डोळ्यांना आवरले पाहिजे. उदाहरणार्थ, अनैतिक वासना व इच्छा जागृत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साहित्यावर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी आपण आपल्या डोळ्यांना देऊ नये.

१७. कलस्सैकर ३:५ यातील सल्ल्याचे पालन केल्यामुळे हृदयाचे रक्षण करण्यास आपल्याला कशी मदत मिळते?

१७ अर्थात बाहेरच्या जगाशी आपला संबंध जोडणारी डोळ्यांव्यतिरिक्‍त इतरही इंद्रिये आहेत. यात स्पर्श व श्रवणशक्‍तीची देखील भूमिका आहे आणि या क्षमतांशी संबंधित असलेल्या शारीरिक अवयवांचा वापर करण्यासंबंधी देखील आपण दक्षता बाळगणे गरजेचे आहे. प्रेषित पौलाने अशी ताकीद दिली: “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्‍याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा.”—कलस्सैकर ३:५.

१८. अयोग्य विचारांसंबंधी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?

१८ मनातल्या एखाद्या कोपऱ्‍यात कधीकधी अयोग्य वासना निर्माण होऊ शकते. ती वासना आपण मनात घोळवत राहिल्यास, सहसा ती अधिक बळावते आणि हृदयावर प्रभाव करते. “मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते.” (याकोब १:१४, १५) हस्तमैथुन सहसा अशाच प्रकारे घडते असे बरेच जण कबूल करतात. म्हणूनच, आपले मन आध्यात्मिक गोष्टींनी भरत राहणे अत्यंत महत्त्वाचे नाही का? (फिलिप्पैकर ४:८) आणि जर अयोग्य विचार आपल्या मनात आलेच, तर आपण ते त्वरित काढून टाकण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.

‘पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा कर’

१९, २०. आपण यहोवाची पूर्ण हृदयाने सेवा करण्यात कशाप्रकारे यशस्वी होऊ शकतो?

१९ राजा दाविदाने वृद्धापकाळी आपल्या पुत्राला असे सांगितले: “हे शलमोना, माझ्या मुला, तू आपल्या बापाच्या देवाला जाण, आणि पूर्ण हृदयाने व उत्सुक मनाने त्याची सेवा कर; कारण यहोवा सर्व अंतःकरणे शोधून पाहतो व विचारांच्या सर्व कल्पना समजतो.” (१ इतिहास २८:९, पं.र.भा.) शलमोनाने स्वतः देखील एक “समजणारे हृदय” देण्याची यहोवाला प्रार्थना केली होती. (१ राजे ३:९, पं.र.भा.) पण जीवनभर आपले हृदय तसेच ठेवण्याचे कठीण आव्हान त्याच्यापुढे होते.

२० हेच यशस्वीपणे करण्याची आपलीही इच्छा असेल तर आपण केवळ यहोवाच्या मनासारखे हृदय मिळवणेच पुरेसे नाही तर त्याचे रक्षणही करणे महत्त्वाचे आहे. असे करण्यासाठी आपण देवाच्या वचनातील निर्बंध सतत आपल्या हृदयात—“अंतःकरणात” बाळगले पाहिजेत. (नीतिसूत्रे ४:२०-२२) तसेच आपण वेळोवेळी आपल्या हृदयाचे परीक्षण करण्याची, व आपल्या बोलण्यातून व कृतींतून काय दिसून येते यावर प्रार्थनापूर्वक मनन करण्याची सवय लावली पाहिजे. पण आपण केवळ विचार केला, आणि विशिष्ट बाबतीत उणीव दिसून आल्यास त्याबाबतीत सुधारणा करण्याकरता कळकळीने यहोवाची मदत मागितली नाही, तर त्याचा काय उपयोग? शिवाय, आपल्या इंद्रियांकरवी आपण कोणत्या गोष्टी हृदयात ग्रहण करत आहोत याबद्दलही जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे करत असताना आपल्याला हे आश्‍वासन आहे की “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) तर मग, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या हृदयाचे रक्षण करण्याचा आपण संकल्प करू या आणि पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करू या.

तुम्हाला आठवते का?

• हृदयाचे रक्षण करणे का महत्त्वाचे आहे?

• आपण काय बोलतो याचे विचारपूर्वक परीक्षण केल्यामुळे हृदयाचे रक्षण करण्यास आपल्याला कशी मदत होते?

• आपण आपला डोळा “निर्दोष” कसा राखू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्रे]

क्षेत्र सेवेत, सभांमध्ये व घरी आपण सहसा कोणत्या विषयांवर बोलतो?

[२५ पानांवरील चित्रे]

निर्दोष डोळा विचलित होत नाही