आम्ही जमेल तितका प्रयत्न करतो!
आम्ही जमेल तितका प्रयत्न करतो!
“जमेल तितका प्रयत्न करा.” हा व्यवहारोपयोगी सल्ला एकदा यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या एका सदस्याने एका मिशनरी बांधवाला दिला होता. पण एका अनुभवी सेवकाला इतका मूलभूत सल्ला देण्याची का गरज पडली? मिशनरी तर कोणत्याही परिस्थितीला न घाबरणारे, दररोज कीडेमाकोडे, साप-विंचू, उष्णता, आजार आणि वेगवेगळ्या कठीण अडचणींना धैर्याने तोंड देणारे म्हणून प्रसिद्ध नाहीत का?
यहोवाच्या साक्षीदारांतील मिशनरी सर्वसामान्य स्त्रीपुरुष आहेत. यहोवाबद्दल व सहमानवांबद्दल मनापासून प्रेम असल्यामुळे, परदेशात सेवा करण्यास प्रेरित झालेले ख्रिस्ती. ते आपल्या परीने होईल तितक्या चांगल्याप्रकारे यहोवाची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठी ते त्याच्याच शक्तीवर अवलंबून राहतात.—इफिसकर ६:१०.
मिशनरी कार्याकडे जवळून पाहण्याकरता पश्चिम आफ्रिकेतील एका मिशनरी गृहात आम्ही एक दिवस घालवत आहोत अशी कल्पना करू या.
मिशनऱ्यांसोबत एक दिवस
सकाळी सात वाजता आम्ही मिशनरी गृहात पोचलो तेव्हा दैनंदिन वचनाची चर्चा सुरू होण्याच्या बेतात होती. मिशनरी गृहातील दहा मिशनऱ्यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले आणि जेवणाच्या टेबलावर आम्हाला जागा करून दिली. आम्ही एकमेकांशी ओळखपाळख करून घेत असतानाच, एक मिशनरी बहीण, जी अनेक वर्षांपासून आपल्या नियुक्त देशात सेवा करत आहे, तिने सेवेत आलेला एक मजेशीर अनुभव सांगण्यास सुरवात केली. पण तेवढ्यात त्या दिवशीची चर्चा संचालित करणाऱ्या बांधवाने गप्पागोष्टी करण्यात रमलेल्या सर्वांना दैनंदिन चर्चा सुरू करण्याची वेळ झाली असल्याची सूचना दिली आणि आमचे संभाषण अर्ध्यातच राहून गेले. दैनंदिन वचनाची चर्चा फ्रेंच भाषेतून होती. आम्हाला ती भाषा येत नाही पण त्या परदेशी बांधवांच्या बोलण्याच्या शैलीवरून अगदी स्पष्ट दिसून आले की त्यांनी फ्रेंच भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवले आहे.
शास्त्रवचनाच्या चर्चेनंतर, मनःपूर्वक प्रार्थना करण्यात आली; आता न्याहारीची वेळ झाली होती. आम्ही भरपूर सिरियल घेतले. आमच्या शेजारी बसलेल्या मिशनरी भावाने आम्हाला सिरियलमध्ये केळ्याच्या चकत्या घालून खाण्याचा आग्रह केला. आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला तशी केळी फार आवडत नाहीत पण त्यांनी आम्हाला खात्री दिली की इथल्या खास केळ्यांची चव घेतल्यावर आम्हाला नक्कीच केळी आवडू लागतील. म्हणून आम्ही त्यांच्या सांगण्यावरून सिरियलमध्ये केळ्याच्या चकत्या घातल्या. त्यांचे म्हणणे अगदी खरे होते! केळ्यांची चव खरच अप्रतिम होती, अगदी आईस्क्रीमसारखी! टेबलावर असलेला फ्रेंच ब्रेड, मिशनरी गृहाच्या समोरच असलेल्या एक लहानशा दुकानात पहाटेच बनवण्यात आला आहे अशी आम्हाला खात्री करून देण्यात आली.
न्याहारीनंतर आम्ही एका मिशनरी जोडप्यासोबत (त्यांची नावे बेन व कॅरन आहेत असे आपण समजू या) दिवसभर काम करण्यासाठी निघालो. पश्चिम आफ्रिकेच्या या देशातील फलदायी क्षेत्राबद्दल आम्ही बरेच काही ऐकले आहे, त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास आम्ही अर्थातच उत्सुक होतो.
आम्ही बस स्टॉपला आलो तेव्हा तेथे दहाबारा लोक आधीच थांबलेले होते. आमच्यासोबत असलेले मिशनरी लगेच एका स्त्रीसोबत व तिच्या मुलासोबत बायबलच्या एका विषयावर अगदी उत्साहाने बोलू लागले. फ्रेंच येत नसल्यामुळे आम्ही मात्र तिथे उभे राहून नुसतेच हसत होतो. ती स्त्री मिशनऱ्यांनी दिलेले टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके घेतच होती तेवढ्यात बस आली आणि सर्वजण एकाच वेळी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागले! आम्हीपण कसेबसे सर्वांसोबत बसमध्ये चढू लागलो; मागून येणारे लोक आम्हाला पुढे ढकलत होते. हळूहळू आम्ही बसच्या मागच्या भागाकडे सरकू लागलो पण आम्हाला नीट उभे राहणेही कठीण झाले होते. ड्रायव्हरने गाडी सुरू करताच आम्ही जे हातात सापडले ते घट्ट धरून उभे राहिलो; मनात धाकधूक होतीच. अधूनमधून गाडी थांबत होती आणि आधीच खचाखच भरलेल्या बसमध्ये आणखी लोक चढत होते. आम्ही आमच्या आजूबाजूला असलेल्या प्रवाशांकडे पाहून हसत होतो आणि ते देखील आम्हाला पाहून हसत होते. पण आपल्याला त्यांच्या भाषेत बोलता आले असते तर किती बरे झाले असते असे सारखे वाटत होते.
बस वेगाने पुढे जात होती; आम्ही खाली वाकून रस्त्यांवरील वर्दळ पाहात होतो. दोन स्त्रिया डोक्यावर जड ओझे घेऊन जाताना आम्हाला दिसल्या. एकीच्या डोक्यावर पाण्याचा मोठा टब होता. रस्त्याच्या कडेला एका मनुष्याने जमिनीवर ब्लँकेट अंथरून त्यावर छोट्या छोट्या वस्तू विकायला मांडल्या होत्या. जेथे पाहावे तेथे लोकांची गर्दी होती आणि विकता येईल आणि विकत घेता येईल अशी जवळजवळ प्रत्येक वस्तू त्या बाजारात होती.
अचानक, माझ्या बाजूला उभ्या असलेल्या बेनला पायाला काहीतरी टोचल्याचा भास झाला. काय असावे? अर्थात, बसमध्ये गर्दी होती पण तरी हे पुन्हा पुन्हा पायाला काय टोचत असावे? त्याने खाली पाहिले. त्याच्या पायाशी ठेवलेल्या एका बॅगेत एक जिवंत बदक होते. तेच अधूनमधून बॅगेतून डोके काढून त्याला टोचा मारत होते! बेनने आम्हाला सांगितले की बदकाचा मालक त्याला कदाचित बाजारात विकायला नेत असावा.
आम्ही सेवेच्या क्षेत्रात पोचलो तेव्हा आम्हाला हे जाणून आनंद झाला की आम्ही ज्या क्षेत्रात आलो होतो ते अस्सल आफ्रिकी क्षेत्र होते. पहिल्या घराजवळ आलो तेव्हा बेन मोठ्याने टाळ्या वाजवू लागला. या देशात म्हणे “दार वाजवण्याची” हीच पद्धत आहे. तेवढ्यात घरातून एक तरुण बाहेर आला आणि त्याने सांगितले की सध्या तो कामात आहे पण थोड्या वेळाने आम्ही आलो तर त्याला चालेल.
आम्ही पुढच्या घरी गेलो; तिथे भेटलेली बाई जी पोटभाषा बोलत होती ती बेनला येत नव्हती. तिने आपल्या मुलाला बोलावले आणि त्याला भाषांतर करायला सांगितले. बेनचे बोलणे संपल्यावर त्या स्त्रीने बायबल विषयांवर आधारित असलेले एक माहितीपत्रक घेतले आणि तिच्या मुलाने त्यातून वाचून तिला समजावून सांगण्याचे कबूल केले. तिसऱ्या घरी बरेच तरुण घराबाहेर अंगणात बसलेले होते. त्यांपैकी दोघांनी लगेच उठून आम्हा पाहुण्यांना बसायला खुर्च्या दिल्या. त्यांच्याशी आम्ही उपासनेत क्रॉसचा वापर करण्यासंदर्भात छान चर्चा केली. पुढच्या आठवड्यात पुन्हा येऊन याविषयी बोलण्याचे ठरवण्यात आले. यानंतर आम्ही पहिल्या घरात भेटलेल्या, फार कामात असलेल्या तरुणाला भेटायला गेलो. आम्ही त्या परिसरातील तरुणांशी केलेल्या चर्चेविषयी त्याला आधीच कोणीतरी सांगितले होते. त्याला बायबलसंबंधी अनेक प्रश्न होते, आणि त्याने बायबल अभ्यास करण्याची इच्छा दाखवली. बेनने आपले कॅलेंडर पाहिले आणि पुढच्या आठवडी त्याच वेळी परत येऊ म्हणून सांगितले. दुपारच्या जेवणाकरता मिशनरी गृहाला परत जाताना बेन व कॅरनने आम्हाला सांगितले की बायबल अभ्यास चालवण्याकरता त्यांना फार काळजीपूर्वक आराखडा तयार करावा लागतो कारण कधीकधी इतके अभ्यास मिळतात की त्या सर्वांना वेळ देणे त्यांना अशक्य होते.
फ्रेंच भाषेवर प्रभुत्व मिळवल्याबद्दल त्या दोघांची आम्ही प्रशंसा केली. बेनने सांगितले की कॅरन व त्याने मिशनरी सेवा सुरू करून सहा वर्षे झाली आहेत, त्यामुळे आता त्यांना फ्रेंच भाषा बऱ्यापैकी बोलता येऊ लागली आहे. नवीन भाषा शिकणे अर्थातच त्यांना सोपे गेले नाही पण सातत्याने प्रयत्न केल्यामुळे त्यांना यश मिळाले असे त्यांनी आम्हाला सांगितले.
साडेबारा वाजता, सर्व मिशनरी जेवायला एकत्र आले. सकाळच्या व दुपारच्या जेवणाचा स्वयंपाक करण्यासाठी आणि जेवणानंतर ताटेवाट्या धुण्यासाठी
दररोज एकेका मिशनरी बांधवाला नेमले जाते असे आम्हाला सांगण्यात आले. आज एका मिशनरी बहिणीने अतिशय चविष्ट फ्राइड चिकन, फ्रेंच फ्राइज (बटाट्याचे तळलेले तुकडे) आणि तिची खासियत असलेले टोमॅटो सॅलड केले होते!बेन आणि कॅरन यांचा दुपारचा बेत काय म्हणून आम्ही त्यांना विचारले. त्यांनी आम्हाला सांगितले की या देशात दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत सर्वजण उन्हापासून संरक्षण म्हणून सहसा घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे मिशनरी देखील दुपारचा हा वेळ अभ्यास करण्याकरता किंवा विश्रांती घेण्याकरता वापरतात. कॅरनने आम्हाला सांगितले की नवीन मिशनऱ्यांना दुपारी घरी राहण्याची ही प्रथा लगेच भावते. याचे आम्हाला आश्चर्य वाटले नाही!
दुपारी थोडी झोप घेतल्यानंतर आम्ही पुन्हा क्षेत्र सेवेला निघालो. आम्ही ज्या घरी गेलो, तेथे राहणाऱ्या माणसाने सत्याबद्दल आवड दाखवली होती; बऱ्याचदा प्रयत्न करूनही बेनला त्याला भेटता आले नव्हते आणि आजही तो घरी नव्हता. पण बेनने टाळ्या वाजवल्या तेव्हा दोन तरुण बाहेर आले. त्यांनी सांगितले की घराच्या मालकाने त्यांना बेनविषयी सांगितले होते आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे बायबल अभ्यासाकरता तयार केलेले पुस्तक त्याच्याकडून घेण्यास आवर्जून सांगितले होते. आम्ही आनंदाने त्यांना या पुस्तकाची एक प्रत दिली. मग आम्ही बस पकडून दुसऱ्या एका भागात गेलो जेथे कॅरन एका आस्थेवाईक स्त्रीसोबत बायबलचा अभ्यास घेत होती.
रस्त्यांवरील गर्दीतून आमची बस पुढे जात होती. कॅरन आम्हाला सांगू लागली की एकदा एका टॅक्सीतून बऱ्याच प्रवाशांसोबत प्रवास करताना तिला ही स्त्री भेटली होती. कॅरनने तिला प्रवासात वाचण्याकरता एक पत्रिका दिली. त्या स्त्रीने लगेच ती पत्रिका वाचून काढली आणि दुसरी पत्रिका मागितली. ती तर तिला आणखीनच आवडली. प्रवासाच्या शेवटी कॅरनने त्या स्त्रीच्या घरी जाऊन तिला भेटण्याची व्यवस्था केली आणि तिच्यासोबत देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकातून फलदायी बायबल अभ्यास सुरू केला. त्या दिवशी कॅरन या माहितीपत्रकातील पाचव्या पाठावर तिच्याशी चर्चा करणार होती.
क्षेत्र सेवेत आज आमचा दिवस फारच चांगला गेला होता. पण आमच्या मनात अद्यापही मिशनरी कार्याबद्दल काही प्रश्न होते. बेन व कॅरनने आम्हाला सांगितले की घरी गेल्यावर ते आमच्यासाठी काहीतरी हलकेफुलके खायला करतील आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरेही देतील.
एवढे धकाधकीचे जीवन कसे सांभाळतात
तळलेली अंडी, फ्रेंच ब्रेड आणि चीजचा फडशा पाडीत आम्ही बऱ्याच गप्पा गोष्टी केल्या व आम्हाला मिशनरी जीवनाविषयी खूप काही शिकायला मिळाले. सोमवारच्या दिवशी सहसा मिशनरी सुटी घेतात आणि एकतर विश्रांती करतात किंवा स्वतःची काही कामे करतात. बरेच मिशनरी त्या दिवशी आपल्या कुटुंबियांना व मित्रमैत्रिणींना पत्रे वगैरे लिहितात. घरच्यांचे सकुशल जाणून घेणे त्यांच्याकरता अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यास त्यांना अत्यंत आनंद होतो.
मिशनरी गृहात सर्व मिशनरी सतत एकमेकांच्या सहवासात राहात असल्यामुळे एकमेकांसोबत मिळूनमिसळून राहण्याद्वारे आणि आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करण्याद्वारे आपसांत सुसंवाद कायम राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी ते नियमित वैयक्तिक बायबल अभ्यास तर करतातच पण त्यासोबतच दर सोमवारी सर्व मिशनरी एकत्र मिळून टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या साहाय्याने बायबलचा अभ्यास करतात. बेनने आम्हाला सांगितले की वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले मिशनरी एकत्र राहात असल्यामुळे कधीकधी काही क्षुल्लक मतभेद टाळता येत नाहीत पण कौटुंबिक
अभ्यासाच्या आध्यात्मिक तरतुदीमुळे त्यांच्यामध्ये शांती व सलोखा कायम राहू शकतो. स्वतःला फार महत्त्व न देण्याची प्रवृत्ती ठेवल्यास सहसा समस्या येत नाहीत असे बेनने जोर देऊन सांगितले.नम्रता असणे देखील महत्त्वाचे आहे. मिशनऱ्यांना सेवा करवून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी नियुक्त केले जाते. आमच्या मिशनरी मित्रांचे असे म्हणणे आहे की कोणत्याही भाषेत “माफ करा” म्हणणे सर्वात कठीण जाते; खासकरून वागण्यात किंवा बोलण्यात नकळत झालेल्या चुकीविषयी दिलगिरी व्यक्त करणे अधिकच कठीण जाते. बेनने बायबलमधील अबीगईलचे उदाहरण दिले, जिने आपल्या पतीच्या असभ्य वागणुकीबद्दल क्षमा मागितल्यामुळे फार मोठे संकट टाळले. (१ शमुवेल २५:२३-२८) उत्तम मिशनरी होण्याकरता ‘शांतीने राहण्याची’ प्रवृत्ती असणे फार महत्त्वाचे आहे.—२ करिंथरकर १३:११.
दर महिन्यात एकदा मिशनरी एक सभा ठेवतात, ज्यात ते मिशनरी कुटुंबाशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या बाबींसंबंधी चर्चा करतात तसेच नेमून दिलेल्या कामांत काही बदल करायचे असल्यास त्यांविषयी देखील चर्चा केली जाते. या सभेनंतर सर्वांनी मिळून खाण्यासाठी खास एक गोड पदार्थ केला जातो. या सभेची कल्पना आम्हाला केवळ उपयुक्तच वाटली नाही, तर अगदी मनापासून रुचली.
रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही मिशनरी गृहाला फेरी मारली. साधेच असले तरीही मिशनऱ्यांनी ते अत्यंत स्वच्छ व नीटनेटके ठेवले होते. एक फ्रिज, वॉशिंग मशीन व एक स्टोव्ह ठेवलेला दिसला. कॅरनने आम्हाला सांगितले की पश्चिम आफ्रिकेतील या देशासारख्या उष्णकटिबंधीय भागांत कधीकधी वातानुकुलनाची सोय देखील पुरवली जाऊ शकते. चांगले राहण्याचे ठिकाण, पौष्टिक आहार आणि आरोग्याच्या साध्या नियमांचे पालन केल्यामुळे मिशनऱ्यांना सुदृढ आणि आपल्या कामात परिणामकारक राहणे शक्य होते.
चांगल्या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे
आम्ही आज जे काही पाहिले व अनुभवले त्याची आमच्यावर फार चांगली छाप पडली. आम्हालाही यशस्वी मिशनरी होता येईल का? हे कशावरून ठरवता येईल? बेन व कॅरन यांनी आम्हाला काही गोष्टींवर विचार करायला सांगितले.
त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट ही की ख्रिस्ती मिशनरी काही रोमांच अनुभवण्यासाठी हे काम स्वीकारत नाहीत. ते अशा प्रामाणिक हृदयाच्या लोकांच्या शोधात आहेत जे देवाच्या अद्भुत प्रतिज्ञांबद्दल शिकू इच्छितात. ते दर महिन्याला कमीतकमी १४० तास क्षेत्र सेवेत खर्च करतात त्यामुळे सेवाकार्याविषयी मनापासून आवड असल्याशिवाय त्यांना यशस्वी होता येणार नाही.
‘पण साप, पाली, कीडे . . . ?’ आम्ही विचारले. बेनने आम्हाला सांगितले की बऱ्याच मिशनरी क्षेत्रांत या समस्या असल्या तरीसुद्धा मिशनऱ्यांना या सर्व गोष्टींची सवय होऊन जाते. शिवाय, त्याने म्हटले की प्रत्येक मिशनरी क्षेत्राचे वेगळे आकर्षण असते. कालांतराने, मिशनरी आपल्या नेमलेल्या क्षेत्राच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला शिकतात. सुरवातीला “वेगळ्या” वाटणाऱ्या गोष्टी लवकरच सामान्य वाटू लागतात आणि कधीकधी तर आवडूही लागतात. पश्चिम आफ्रिकेत बरीच वर्षे सेवा केलेल्या एका मिशनरी बहिणीच्या वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे तिला आपली नेमणूक सोडून परत जाणे भाग पडले. तेव्हा तिने सांगितले की अनेक वर्षांपूर्वी घर सोडून येथे येताना जितके वाईट वाटले नव्हते तितके तिला हे क्षेत्र सोडताना वाटले. मिशनरी क्षेत्रच तिचे घर बनले होते.
तुम्ही तयार आहात का?
बेन व कॅरन यांना भेटल्यानंतर आम्ही बराच विचार करू लागलो. तुमच्याविषयी काय? तुम्ही कधी दुसऱ्या देशात जाऊन मिशनरी म्हणून सेवा करण्याविषयी विचार केला आहे का? जर केला असेल, तर तुमचे हे ध्येय तुमच्या कल्पनेपेक्षा सुसाध्य असू शकते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण वेळेच्या सेवेबद्दल तुम्हाला मनापासून प्रेम असले पाहिजे आणि लोकांना मदत करण्यास तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. आठवणीत असू द्या की मिशनरी काही असामान्य शक्ती असलेले लोक नसतात; ते देखील तुमच्या आमच्यासारखेच असतात. पण ते एक अत्यंत महत्त्वाचे कार्य करण्याचा जमेल तितका प्रयत्न करत आहेत.
[२७ पानांवरील चित्रे]
प्रत्येक दिवसाची सुरवात बायबल वचनावरील चर्चेने होते
[२८, २९ पानांवरील चित्रे]
मिशनरी जीवन अत्यंत समाधानकारक आहे
[२९ पानांवरील चित्र]
आफ्रिकेची काही दृश्ये