व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगात सुधार तुम्ही घडवून आणू शकता का?

जगात सुधार तुम्ही घडवून आणू शकता का?

जगात सुधार तुम्ही घडवून आणू शकता का?

“राजकारणाच्या माध्यमाने समाजाची घडी बसणे अशक्य आहे. पारंपरिक नैतिक विश्‍वास पुन्हा स्थापण्याची कुवत त्यात नाही. सरकारी धोरणे कितीही आदर्श वाटत असली तरीसुद्धा ती प्रणय व वैवाहिक संबंध यांशी निगडीत असणारी जुनी मूल्ये पुन्हा स्थापित करू शकत नाहीत, ती वडिलांना मुलांची जबाबदारी घेण्यास शिकवू शकत नाहीत, पूर्वीप्रमाणे अनुचित गोष्टींबद्दल त्वेष किंवा लज्जा निर्माण करू शकत नाहीत . . . आपल्या बहुतेक नैतिक समस्या सोडवणे कायद्याला शक्य नाही.”

अमेरिकेतील एका सरकारी संस्थेच्या भूतपूर्व संस्थापकांचे वरील शब्द तुम्हाला पटतात का? ते शब्द तुम्हाला पटत असतील तर, लोभ, कुटुंबांमध्ये प्रेम थंडावणे, अनैतिक वर्तन, अज्ञान यांमुळे निर्माण होणाऱ्‍या समस्यांवर आणि समाजातील एकी नष्ट करणाऱ्‍या इतर कारणांवर काय तोडगा आहे? काहींच्या मते, यावर काही तोडगा नाही आणि म्हणून आपल्या परीने होता होईल तितका प्रयत्न करून जगण्याचा ते प्रयत्न करतात. इतरांची अशी आशा आहे की, एके दिवशी एक प्रभावशाली आणि बुद्धिमान नेता—किंवा कदाचित धार्मिक नेता—जन्माला येईल आणि तो लोकांना योग्य दिशा दाखवेल.

खरे म्हणजे, दोन हजार वर्षांआधी, लोक येशू ख्रिस्ताला राजा करू पाहत होते कारण त्याला देवाने पाठवले आहे आणि तो अगदी लायक शासक ठरेल हे त्यांनी ताडले. परंतु, येशूला त्यांचा हेतू कळाल्यावर तो लागलीच तेथून निघून गेला. (योहान ६:१४, १५) एका रोमी सुभेदाराला येशूने नंतर याचे कारण सांगितले: “माझे राज्य ह्‍या जगाचे नाही.” (योहान १८:३६) परंतु, येशूने घेतलेली ही भूमिका सहसा कोणी घेत नाही—अगदी त्याचे अनुयायी असल्याचा दावा करणारे धार्मिक पुढारी देखील. यांतल्या काहींनी, राजकीय नेत्यांवर दबाव आणून किंवा स्वतःच राजकीय पद हाती घेऊन या जगात सुधार घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. १९६० च्या आणि १९७० च्या दशकांमधील घटनांकडे पाहून हे लक्षात येते.

जग सुधारण्यासाठी धार्मिक प्रयत्न

लॅटिन अमेरिकन देशांमधील काही धर्मविद्वानांनी १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात गरीब आणि शोषित लोकांसाठी संघर्ष करायचे ठरवले. हे साध्य करण्यासाठी त्यांनी ख्रिस्ताला फक्‍त बायबलनुसार तारक मानले नाही तर राजकीय आणि आर्थिकदृष्ट्याही तो तारक आहे असे शिकवून मुक्‍तीचे धर्मशास्त्र विकसित केले. अमेरिकेत, ढासळत्या नैतिक मूल्यांविषयी चिंताग्रस्त असलेल्या अनेक चर्च पुढाऱ्‍यांनी मिळून मॉरल मेजॉरिटी (नैतिक बहुमत) नावाची संघटना स्थापली. कुटुंबासाठी हितकर असलेल्या मूल्यांना कायद्याचे स्वरूप देतील अशा लोकांना राजकीय पदावर आणणे हे या संस्थेचे उद्दिष्ट होते. त्याचप्रमाणे, अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये, कुराणचे तंतोतंत पालन करण्याचे उत्तेजन देऊन काही गटांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा आणि स्वैराचार टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

अशा सर्व प्रयत्नांमुळे जगात सुधार घडून येईल असे तुम्हाला वाटते का? वस्तुस्थिती पाहिल्यास असे दिसून येते, की नैतिक मूल्ये ढासळत चालली आहेत आणि श्रीमंत तसेच गरीब राष्ट्रांमधील अंतर वाढत चालले आहे; मुक्‍तीचे धर्मशास्त्र ज्या देशांमध्ये प्रामुख्याने मानले जात होते तेथे देखील हीच गत आहे.

अमेरिकेत, मॉरल मेजॉरिटी ही संघटना आपले मुख्य हेतू पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याचे संस्थापक जेरी फॉल्वेल यांनी १९८९ साली संघटनेच्या कारभाराचा गाशा गुंडाळला. तिच्या जागी इतर संघटना तयार झाल्या आहेत. परंतु, “मॉरल मेजॉरिटी” हा शब्दांश तयार करणाऱ्‍या पॉल वेरीच यांनी आजचा ख्रिस्ती धर्म (इंग्रजी) या मासिकात असे लिहिले: “राजकीय विजय मिळाल्यावरही, आपल्याला महत्त्वपूर्ण वाटणारी धोरणे वास्तवात उतरवण्यात आपण अपयशी ठरतो.” त्यांनी असेही लिहिले: “ही संस्कृती दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्‍या गटारासारखी आहे. आज संस्कृतीचा अभूतपूर्व प्रमाणात ऱ्‍हास होत आहे आणि हा ऱ्‍हास राजकारणाच्याही आटोक्याबाहेरचा आहे.”

स्तंभलेखक आणि लेखक कॅल टॉमस यांच्या मते, राजकारणाद्वारे समाजाला वर आणण्यात एक मूलभूत दोष म्हणजे: “खरे परिवर्तन, निवडणुका जिंकल्याने नव्हे तर लोकांच्या हृदयांमध्ये होत असते कारण आपल्या मुख्य समस्या आर्थिक आणि राजकीय स्वरूपाच्या नव्हे तर नैतिक आणि आध्यात्मिक स्वरूपाच्या आहेत.”

परंतु, जेथे मानक नाहीत, जेथे लोक आपल्यासाठी बरे काय आणि वाईट काय हे स्वतःच ठरवतात अशा जगात नैतिक आणि आध्यात्मिक समस्या कशा सोडवता येतील? प्रभावशाली आणि चांगला हेतू बाळगणारे लोक—मग ते धार्मिक असोत अगर नसोत—या जगाला चांगले ठिकाण बनवण्यात अपयशी ठरले आहेत तर मग हे कोण साध्य करू शकते? पुढील लेखात आपण याचे उत्तर पाहणार आहोत. किंबहुना, माझे राज्य या जगाचे नाही असे म्हणण्यास येशूला प्रवृत्त करण्यामागील हेच प्रमुख कारण होते.

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

मुखपृष्ठ: दूषित पाणी: WHO/UNICEF photo; पृथ्वीचा गोल: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

मुले: UN photo; पृथ्वीचा गोल: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.