देवाच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील?
देवाच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील?
“पहिल्याने त्याने आपणावर प्रीति केली, म्हणून आपण प्रीति करितो.”—१ य हान ४:१९.
१, २. (अ) आपल्यावर कोणाचे प्रेम आहे ही जाणीव महत्त्वाची का आहे? (ब) आपल्याला कोणाच्या प्रेमाची सर्वात जास्त गरज आहे?
आपल्यावर कोणीतरी प्रेम करते ही जाणीव तुम्हाला किती महत्त्वाची वाटते? बाळपणापासून प्रौढावस्थेपर्यंत मानवांना प्रेमाची गरज असते. आईने कुशीत घेतलेल्या बाळाला कधी तुम्ही पाहिले आहे का? आजूबाजूला काय चालले आहे याचे त्याला काही भान नसते; आईच्या हसऱ्या डोळ्यात पाहात ते अगदी बिनधास्त, आरामशीर बसलेले असते कारण आईच्या वात्सल्याची त्याला जाणीव असते. किंवा, मग किशोरवयात पदार्पण केल्यावर जीवनाच्या कठीण वळणावरून जात असताना कधीकधी तुम्ही कसे वागत होता हे तुम्हाला आठवते का? (१ थेस्सलनीकाकर २:७) कधीकधी तर आपल्याला काय हवे आहे किंवा आपल्याला नेमके काय वाटत आहे हे देखील तुम्हाला नीट कळत नव्हते. पण त्या वेळी तुमच्या आईवडिलांचे तुमच्यावर प्रेम आहे ही भावना अतिशय दिलासा देणारी नव्हती का? तुम्हाला कोणतीही समस्या आली किंवा कोणताही प्रश्न तुमच्यासमोर आला तरी तुम्ही निःसंकोच त्यांच्याजवळ जाऊ शकता ही जाणीव सांत्वनदायक नव्हती का? खरोखर कोणीतरी आपल्यावर प्रेम करावे हीच सबंध जीवनात आपली सर्वात मोठी गरज असते. यामुळे आपल्याला खात्री पटते की आपली कदर केली जाते याची आपल्याला यामुळे खात्री पटते.
२ सर्व परिस्थितीत आईवडील आपल्या मुलांवर प्रेम दाखवतात तेव्हा मुलांच्या संतुलित विकासाला यामुळे नक्कीच हातभार लागतो. पण आपला स्वर्गीय पिता यहोवा आपल्यावर प्रेम करतो याची खात्री वाटणे हे आपल्या आध्यात्मिक व भावनिक सुदृढतेकरता कितीतरी पटीने अधिक महत्त्वाचे आहे. या नियतकालिकाच्या काही वाचकांना कदाचित आईवडिलांच्या प्रेमाची सावली लाभली नसेल. जर तुमची ही परिस्थिती असेल, तर निराश होऊ नका. तुम्हाला आईवडिलांचे प्रेम मिळाले नसेल किंवा त्यांनी तुमच्यावर हवे तितके प्रेम केले नसेल तरीसुद्धा देवाचे एकनिष्ठ प्रेम तुमची ही गरज भरून काढेल.
३. यहोवाने आपल्या लोकांना आपल्या प्रेमाची कशाप्रकारे खात्री दिली आहे?
३ आपला संदेष्टा यशया याच्याद्वारे यहोवाने असे सांगितले की एखाद्या वेळी आईलासुद्धा आपल्या पोटच्या मुलाचा “विसर पडेल” पण तो कधीही आपल्याला लोकांना विसरणार नाही. (यशया ४९:१५) त्याचप्रकारे, दाविदानेही आत्मविश्वासाने म्हटले: “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्वर मला जवळ करील.” (स्तोत्र २७:१०) हे किती दिलासा देणारे आहे! तुमची परिस्थिती काहीही असो, पण जर तुम्ही यहोवा देवासोबत एक समर्पित नातेसंबंध जोडला असेल तर तुम्ही नेहमी आठवणीत ठेवू शकता की कोणत्याही मनुष्यापेक्षा त्याला तुमच्यावर कितीतरी जास्त पटीने प्रेम आहे!
देवाच्या प्रेमात टिकून राहा
४. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना कशाप्रकारे देवाच्या प्रीतीची खात्री देण्यात आली?
४ तुम्हाला यहोवाच्या प्रेमाविषयी सर्वप्रथम केव्हा समजले? कदाचित तुमचाही अनुभव पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांसारखाच असावा. पौलाने रोमकरांना लिहिलेल्या पत्रातील ५ व्या अध्यायात, एकेकाळी देवापासून दुरावलेल्या पातक्यांना कशाप्रकारे यहोवाच्या प्रेमाची ओळख झाली याचे अतिशय सुंदर वर्णन आढळते. ५ व्या वचनात आपण असे वाचतो: “आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.” ८ व्या वचनात पौल पुढे म्हणतो: “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.”
५. तुम्हाला देवाच्या महान प्रेमाची कशाप्रकारे जाणीव झाली?
५ त्याच प्रकारे, देवाच्या वचनातील सत्य तुम्हाला सांगण्यात आले आणि तुम्ही विश्वास करू लागला तेव्हा यहोवाचा पवित्र आत्मा तुमच्या हृदयात कार्य करू लागला. त्यामुळे, यहोवाने आपल्या परमप्रिय पुत्राला तुमच्याकरता मरण्यासाठी पाठवण्याद्वारे किती विलक्षण उदारपणा दाखवला आहे याची तुम्हाला मनापासून कदर वाटू लागली. अशारितीने यहोवाने तुम्हाला हे समजून घेण्यास मदत केली की तो मानवजातीवर किती प्रेम करतो. यहोवापासून दुरावलेल्या एका पापी व्यक्तीच्या रूपात तुमचा जन्म झाला असूनही, यहोवाने मानवांना धार्मिक घोषित करण्याचा आणि त्यांना सार्वकालिक जीवनाची आशा देण्याचा मार्ग मोकळा केला आहे हे तुम्हाला समजले तेव्हा तुमचे मन भरून आले नाही का? तुम्हाला यहोवाबद्दल प्रेम वाटू लागले नाही का?—रोमकर ५:१०.
६. कधीकधी आपल्याला यहोवापासून दुरावल्यासारखे का वाटू शकते?
६ स्वर्गीय पित्याच्या प्रेमाने आकर्षित होऊन तुम्ही आपले जीवन त्याच्या इच्छेच्या सामंजस्यात आणण्याकरता आवश्यक फेरबदल केले आणि आपले जीवन देवाला समर्पित केले. आता तुमचा देवासोबत शांतीचा संबंध जुळला आहे. पण कधीकधी तुम्हाला यहोवापासून दुरावल्यासारखे वाटते का? हे आपल्यापैकी कोणाच्याही बाबतीत घडू शकते. पण नेहमी आठवणीत असू द्या, देव बदलत नाही. त्याचे प्रेम सूर्यासारखे स्थिर आहे; सूर्य सतत पृथ्वीवर आपली उबदार प्रकाश किरणे पाडतच राहतो. (मलाखी ३:६; याकोब १:१७) आपल्याबाबतीत पाहता, थोड्या काळासाठीच का होईना पण आपण बदलू शकतो. पृथ्वी फिरते तेव्हा तिचा अर्धा भाग अंधारात बुडतो. त्याचप्रमाणे आपण देवापासून, थोडी जरी पाठ फिरवली तरीसुद्धा त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध तितका जवळचा राहिलेला नाही अशी जाणीव होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत काय करावे?
७. आत्मपरीक्षण केल्यामुळे आपल्याला देवाच्या प्रेमात कायम राहण्यास कशी मदत होते?
७ आपण देवाच्या प्रेमापासून दुरावत चाललो आहोत अशी जाणीव झाल्यास आपण स्वतःला हे प्रश्न केले पाहिजेत: ‘मला देवाच्या प्रेमाबद्दल कदर वाटते का? मी जिवंत व प्रेमळ देवापासून हळूहळू पाठ फिरवली आहे का व माझा विश्वास कमकुवत झाला असल्याचे वेगवेगळ्या मार्गांनी दाखवले आहे का? “आध्यात्मिक गोष्टींकडे” मन लावण्याऐवजी मी “दैहिक गोष्टींकडे” चित्त लावले आहे का?’ (रोमकर ८:५-८; इब्री लोकांस ३:१२) जर आपण स्वतःला यहोवापासून दूर नेले असेल तर मग आपण पुन्हा एकदा त्याच्यासोबत जवळचा प्रेमळ नातेसंबंध जोडण्याकरता पावले उचलू शकतो. याकोब आपल्याला आर्जवून सांगतो: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:८) यहूदाचे शब्द मनावर घ्या: “प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा . . . आणि आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा.”—यहूदा २०, २१.
परिस्थिती बदलल्यामुळे देवाच्या प्रेमावर परिणाम होत नाही
८. जीवनात कोणते आकस्मिक बदल होऊ शकतात?
८ या व्यवस्थीकरणात आपल्या जीवनात केव्हाही कोणताही बदल होऊ शकतो. राजा शलमोनाने सांगितले की सर्वकाही “समय व प्रसंग” यांवर अवलंबून आहे. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) अगदी एका रात्रीत आपले जीवन बदलू शकते. आज आपण निरोगी असतो, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काहीतरी गंभीर आजार होऊ शकतो. आज आपली नोकरी अगदी व्यवस्थित चालली असते आणि उद्या आपण बेकार होऊ शकतो. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मृत्यू आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला हिरावून नेतो. एखाद्या देशात ख्रिश्चन अगदी शांतीपूर्ण परिस्थितीत राहात असतात आणि मग अचानक क्रूर छळ होऊ लागतो. कधीकधी आपल्यावर खोटे आरोप लावले जातात आणि यामुळे आपल्याला काही प्रमाणात अन्याय सहन करावा लागतो. होय, जीवन हे अतिशय अस्थिर व अनिश्चित आहे.—याकोब ४:१३-१५.
९. रोमकर ८ व्या अध्यायातील काही भागावर विचार करणे का उपयोगी ठरेल?
९ अशा दुःखद घटना जीवनात घडतात तेव्हा आपला कोणीही सांभाळ करणारा नाही असे आपल्याला वाटू शकते; देवाचे आपल्यावर पूर्वीइतके प्रेम राहिलेले नाही अशीही आपण कल्पना करू लागण्याची शक्यता आहे. याप्रकारच्या घटना आपल्यापैकी कोणाच्याही जीवनात घडण्याची शक्यता असल्यामुळे रोमकर ८ व्या अध्यातील प्रेषित पौलाचे अत्यंत सांत्वनदायक शब्द आपण सर्वांनी विचारपूर्वक वाचले पाहिजेत. हे शब्द मुळात आत्म्याने अभिषिक्त असलेल्या ख्रिश्चनांना संबोधण्यात आले होते. पण त्यांतील तत्त्व हे दुसऱ्या मेंढरांनाही लागू होते, ज्यांना ख्रिस्तपूर्व काळातील अब्राहामप्रमाणे देवाचे मित्र म्हणून धार्मिक घोषित करण्यात आले आहे.—रोमकर ४:२०-२२; याकोब २:२१-२३.
१०, ११. (अ) शत्रू कधीकधी देवाच्या लोकांविरुद्ध कोणते आरोप करतात? (ब) या आरोपांमुळे ख्रिश्चनांवर काही फरक का पडत नाही?
१० रोमकर ८:३१-३४ वाचा. पौल विचारतो: “देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण?” अर्थात, सैतान व त्याचे दुष्ट जग आपल्या विरोधात आहे हे खरे आहे. शत्रू कधीकधी आपल्यावर खोटे आरोप लावतात, कधीकधी तर देशांतील न्यायालयातही ते आपल्याला खेचतात. काही ख्रिस्ती पालकांवर असा आरोप लावला जातो की ते आपल्या मुलांचा द्वेष करतात कारण देवाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे ते विशिष्ट वैद्यकीय उपचारपद्धत वापरण्याची परवानगी देत नाही किंवा त्यांना गैरख्रिस्ती उत्सवांमध्ये सहभागी होऊ देत नाहीत. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; २ करिंथकर ६:१४-१६) इतर काही विश्वासू ख्रिश्चनांवर असा आरोप लावण्यात आला की ते देशद्रोही आहेत कारण त्यांनी युद्धात सहमानवांचे रक्त सांडण्यास किंवा राजकारणात सहभागी होण्यास नकार दिला. (योहान १७:१६) काही विरोधकांनी तर प्रसार माध्यमांतून खोटी माहिती पसरवून आपली बदनामी करण्याचा व यहोवाचे साक्षीदार म्हणजे एक समाजकंटक गुप्त पंथ असल्याचा खोटा आरोप लावण्याचा प्रयत्न केला आहे.
११ पण विसरू नका की प्रेषितांच्या काळात असे म्हणण्यात आले होते: “ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हाला ठाऊक आहे.” (प्रेषितांची कृत्ये २८:२२) पण या खोट्या आरोपांमुळे आपल्याला फरक पडतो का? खऱ्या ख्रिश्चनांना ख्रिस्ताच्या बलिदानावरील त्यांच्या विश्वासायोगे नीतिमान ठरवणारा स्वतः देव आहे. स्वतःच्या परमप्रिय पुत्राची सर्वात मोलवान देणगी आपल्या उपासकांना देणारा यहोवा त्यांच्यावर प्रेम करण्याचे का म्हणून थांबवेल? (१ योहान ४:१०) ख्रिस्ताला मृतांतून उठवण्यात आले आहे आणि त्याला देवाच्या उजवीकडे बसवण्यात आले आहे; तो मोठ्या हिरीरीने ख्रिश्चनांचे समर्थन करतो. आपल्या अनुयायांचे ख्रिस्ताने केलेले समर्थन अथवा यहोवाने आपल्या विश्वासू सेवकांना दिलेल्या अनुकूल न्यायाला कोण यशस्वीपणे आव्हान देऊ शकेल? कोणीही नाही!—यशया ५०:८, ९; इब्री लोकांस ४:१५, १६.
१२, १३. (अ) कोणती परिस्थिती आपल्याला देवाच्या प्रेमापासून विलग करू शकत नाही? (ब) आपल्यावर संकटे आणण्यामागचा दियाबलाचा काय उद्देश आहे? (क) ख्रिस्ती लोक कशामुळे पूर्णपणे विजयी होऊ शकतात?
१२ रोमकर ८:३५-३७ वाचा. आपल्या स्वतःच्या व्यतिरिक्त आणखी काही किंवा आणखी कोणी आपल्याला यहोवाच्या व त्याचा पुत्र ख्रिस्त येशू याच्या प्रेमापासून विलग करू शकेल का? सैतान पृथ्वीवरील आपल्या हस्तकांच्याद्वारे कदाचित ख्रिस्ती लोकांच्या मार्गात अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करेल. मागच्या शतकात, आपल्या अनेक ख्रिस्ती बांधवांचा व बहिणींचा कित्येक देशांत भयंकर छळ करण्यात आला. शिवाय काही देशांत आपल्या बांधवांना दररोज आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. काहींना तर अन्न व वस्त्र यांसारख्या मूलभूत गोष्टी देखील मिळत नाहीत. या कठीण परिस्थिती आणून सैतान काय साध्य करू इच्छितो? असे करण्यामागचा त्याचा एक उद्देश म्हणजे यहोवाच्या खऱ्या उपासनेत खंड पाडणे. सैतान आपल्याला असा विचार करायला लावू इच्छितो, की देवाचे आपल्यावरील प्रेम थंडावले आहे. पण हे खरे आहे का?
१३ स्तोत्र ४४:२२ येथील शब्द उद्धृत करणाऱ्या पौलाप्रमाणे आपण देखील देवाच्या लिखित वचनाचा अभ्यास केला आहे. आपल्याला हे समजले आहे की आपण देवाची ‘मेंढरे’ असल्यामुळे त्याच्या नावाकरता या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. या गोष्टींशी देवाच्या नावाच्या पवित्रीकरणाचा व त्याच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाच्या दोषनिवारणाचा संबंध आहे. देवाचे आपल्यावर पूर्वीसारखे प्रेम नसल्यामुळे नव्हे, तर या महत्त्वाच्या वादविषयांमुळेच त्याने या सर्व परीक्षा आपल्यावर येऊ देण्याची अनुमती दिली आहे. पण कोणत्याही दुःखद परिस्थितीला तोंड द्यावे लागले तरीसुद्धा आपल्याला खात्री आहे की देवाचे त्याच्या लोकांवरील, आपल्या प्रत्येकावरील प्रेम मुळीच बदललेले नाही. आपला पराजय झाला आहे असे भासले तरीसुद्धा, जर आपण विश्वासू राहिलो तर शेवटी विजय आपलाच होईल. यहोवाच्या अतूट प्रेमाची खात्री असल्यामुळे आपल्याला धाडस आणि टिकून राहण्याची शक्ती मिळते.
१४. ख्रिश्चनांना संकटांना तोंड द्यावे लागत असले तरीसुद्धा पौलाला देवाच्या प्रेमाविषयी खात्री का होती?
१४ रोमकर ८:३८, ३९ वाचा. ख्रिश्चनांना देवाच्या प्रेमापासून कोणीही व काहीही विलग करू शकत नाही याची पौलाला कशामुळे खात्री पटली? पौलाला नक्कीच त्याच्या सेवाकार्यात आलेल्या वैयक्तिक अनुभवांमुळेच ही खातरी पटली की आपल्या मार्गात येणाऱ्या संकटांमुळे देवाचे आपल्यावरील प्रेम बदलत नाही. (२ करिंथकर ११:२३-२७; फिलिप्पैकर ४:१३) तसेच पौलाला यहोवाच्या सार्वकालिक उद्देशाविषयी आणि आपल्या लोकांसोबत त्याच्या गतकाळातील व्यवहारांविषयी ज्ञान होते. देवाची एकनिष्ठपणे सेवा केलेल्या सेवकांवरील त्याच्या प्रेमावर खुद्द मृत्यू देखील विजयी होऊ शकतो का? मुळीच नाही! मृत्यू पावलेले हे सर्व विश्वासू जन देवाच्या परिपूर्ण स्मृतीत जिवंत राहतात आणि योग्य वेळी तो त्यांचे पुनरुत्थान करील.—लूक २०:३७, ३८; १ करिंथकर १५:२२-२६.
१५, १६. देवाला त्याच्या सेवकांवर प्रेम करण्याचे थांबवण्यास कोणत्या गोष्टी कधीही भाग पाडू शकत नाहीत त्यांचा उल्लेख करा.
१५ सध्याच्या जीवनात आपल्यावर कोणताही दुर्दैवी प्रसंग ओढावला—अपंगत्व आणणारी दुर्घटना, असाध्य रोग किंवा आर्थिक संकट आले तरीसुद्धा देवाला त्याच्या लोकांवर असलेले प्रेम यांपैकी कोणत्याही गोष्टीमुळे कमी होऊ शकत नाही. अवज्ञा करून सैतान बनलेल्या देवदूताप्रमाणे, शक्तिशाली देवदूत देखील यहोवाला त्याच्या विश्वासू सेवकांवर प्रेम करण्याचे थांबवण्यास भाग पाडू शकत नाहीत. (ईयोब २:३) वेगवेगळ्या देशांचे सरकार कदाचित देवाच्या सेवकांवर बंदी आणतील, त्यांना तुरुंगात टाकतील, गैरवागणूक देतील आणि “परसॉना नॉन ग्रॅटा” (अग्राह्य) ठरवतील. (१ करिंथकर ४:१३) अशाप्रकारच्या अकारण द्वेषाच्या प्रभावात येऊन काही लोक कदाचित आपला विरोध करू लागतील, पण विश्वाचा सार्वभौम कधीही अशाप्रकारच्या प्रभावात येऊन आपल्याला सोडून देणार नाही.
१६ खिस्ती या नात्याने आपण, पौलाने ज्यांस “वर्तमानकाळच्या गोष्टी” म्हटले त्यांची भीती बाळगू नये; या गोष्टी, म्हणजे सध्याच्या व्यवस्थीकरणातील घटना, परिस्थिती व प्रसंग किंवा “भविष्यकाळच्या गोष्टी” देखील देवाचा त्याच्या लोकांसोबत असलेला घनिष्ट संबंध तोडू शकत नाहीत. पृथ्वीवरील व स्वर्गातील बले आपल्याविरुद्ध संघर्ष करत असले तरीसुद्धा देवाची निष्ठावान प्रीती आपला सांभाळ करेल. पौलाने जोर देऊन सांगितल्याप्रमाणे न “उंची” न “खोली” देवाच्या प्रेमात बाधा बनू शकते. होय, ज्या गोष्टी आपल्याला निराशेच्या गर्तेत ओढू शकतात किंवा ज्या आपल्यावर वरचढ होऊ पाहतात अशा कोणत्याही गोष्टी आपल्याला देवाच्या प्रेमापासून विलग करू शकत नाहीत; तसेच कोणतीही सृष्ट वस्तू देखील सृष्टीकर्त्याच्या त्याच्या विश्वासू सेवकांसोबत असलेल्या नातेसंबंधात वितुष्ट आणू शकत नाही. देवाची प्रीती कधीही टळत नाही; ती सार्वकालिक आहे.—१ करिंथकर १३:८.
देवाच्या प्रेमकृपेची सर्वदा कदर बाळगा
१७. (अ) देवाचे प्रेम कशाप्रकारे “जीवनाहून उत्तम” आहे? (ब) आपण देवाच्या प्रेमकृपेची कदर बाळगतो हे कशाप्रकारे दाखवू शकतो?
१७ देवाच्या प्रेमाची तुम्ही कितपत कदर करता? तुमच्याही भावना दाविदाप्रमाणेच आहेत का, ज्याने म्हटले: “तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे; माझे ओठ तुझे स्तवन करितील. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन; तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन”? (स्तोत्र ६३:३, ४) खरोखर देवाची प्रीती व त्याची एकनिष्ठ मैत्री अनुभवण्यापेक्षा या जगातील कोणतीही गोष्ट अधिक चांगली आहे का? उदाहरणार्थ, अमाप पैसा मिळवून देणारे करियर, देवासोबतच्या घनिष्ट नात्यामुळे मिळणाऱ्या मनःशांतीपेक्षा व आनंदापेक्षा अधिक चांगले असू शकते का? (लूक १२:१५) काही ख्रिस्ती बांधवांना, एकतर यहोवाला सोडून द्या किंवा मृत्यूला सामोरे जा असे आवाहन करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नात्सी छळ छावण्यांत कित्येक यहोवाच्या साक्षीदारांना हा अनुभव आला. फार कमी अपवाद वगळता, आपल्या ख्रिस्ती बांधवांनी देवाच्या प्रेमात टिकून राहण्याचेच निवडले आणि यासाठी ते मृत्यूलाही सामोरे जाण्यास तयार होते. जे लोक एकनिष्ठतेने देवाच्या प्रेमात टिकून राहतात ते देवाकडून सार्वकालिक जीवन मिळण्याची खातरी बाळगू शकतात जे या जगाकडून आपल्याला मिळणे शक्य नाही. (मार्क ८:३४-३६) पण हा केवळ सार्वकालिक जीवन मिळवण्याचाच प्रश्न नाही.
१८. सार्वकालिक जीवन इतके इष्ट का आहे?
१८ यहोवा देवाशिवाय सर्वकाळ जगणे शक्य नाही हे तर अगदी खरे आहे; तरीसुद्धा आपल्या निर्माणकर्त्याशी संबंध नसल्यास, एवढे दीर्घकालीन जीवन कसे असेल याची कल्पना करून पाहा. असे जीवन अगदीच निरर्थक ठरेल त्यात कसलाही अर्थपूर्ण उद्देश नसेल. यहोवाने आपल्या लोकांना या शेवटल्या काळात समाधानकारक कार्य दिले आहे. त्यामुळे महान उद्देश राखणारा यहोवा देव आपल्याला सार्वकालिक जीवन देईल तेव्हा ते निश्चितच कंटाळवाणे नसेल, त्यात आपल्याला शिकण्यासारख्या व करण्यासारख्या असंख्य गोष्टी असतील. (उपदेशक ३:११) येणाऱ्या अनेक सहस्त्रकांत, आपण कितीही ज्ञान मिळवले तरीसुद्धा ‘देवाच्या अगाध बुद्धीचा व ज्ञानाचा’ आपल्याला कधीही थांग लागणार नाही.—रोमकर ११:३३.
पिता तुमच्यावर प्रीती करतो
१९. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचा निरोप घेण्याआधी त्यांना कोणते आश्वासन दिले?
१९ निसान १४, सा.यु. ३३ रोजी येशू आपल्या जीवनाची शेवटली संध्याकाळ ११ प्रेषितांसोबत घालवत होता, तेव्हा त्याने पुढे येणार असलेल्या अनुभवांकरता त्यांची मानसिक तयारी करण्याकरता अनेक सूचना दिल्या. येशूच्या सर्व परीक्षांमध्ये ते त्याच्याबरोबर टिकून राहिले होते आणि त्यांच्याकरता असलेल्या त्याच्या प्रेमाचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला होता. (लूक २२:२८, ३०; योहान १:१६; १३:१) येशूने त्यांना आश्वासन दिले: “पिता स्वतः तुमच्यावर प्रीति करितो.” (योहान १६:२७) येशूच्या या शब्दांमुळे, स्वर्गीय पित्याला त्यांच्याकरता असलेल्या कोमल भावनांची शिष्यांना नक्कीच जाणीव झाली असेल.
२०. तुमचा काय निर्धार आहे आणि तुम्ही कशाविषयी आश्वस्त राहू शकता?
२० आजच्या काळात असे बरेच लोक आहेत ज्यांनी कित्येक दशकांपासून यहोवाची सेवा केली आहे. आणि या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश होण्याआधी आपल्याला आणखी अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागेल यात शंका नाही. पण अशा परीक्षांमुळे किंवा दुःखामुळे तुमच्यावर असलेल्या देवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल कधीही साशंक होऊ नका. यहोवाला तुमच्यावर प्रेम आहे; या गोष्टीवर कितीही जोर दिला तरीही तो कमीच ठरेल. (याकोब ५:११) आपण सर्वजण एकनिष्ठपणे देवाच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे आपली जबाबदारी पूर्ण करू या. (योहान १५:८-१०) त्याच्या नावाचे गौरव करण्याच्या प्रत्येक संधीचा आपण उपयोग करू या. प्रार्थना करण्याद्वारे व देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याद्वारे त्याच्या अधिकाधिक जवळ येण्याचा आपण दृढ संकल्प केला पाहिजे. येणाऱ्या दिवसांत आपल्याला कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यावे लागले तरीसुद्धा जर आपण यहोवाचे मन आनंदित करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत असू तर मग आपले मन शांत राहील आणि त्याच्या कधीही न टळणाऱ्या प्रेमाबद्दल आपण आश्वस्त राहू.—२ पेत्र ३:१४.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• आध्यात्मिक व भावनात्मक संतुलन कायम ठेवण्याकरता आपल्याला खासकरून कोणाच्या प्रेमाची गरज आहे?
• कोणत्या गोष्टींमुळे यहोवा कधीही आपल्या सेवकांवर प्रेम करण्याचे थांबवणार नाही?
• यहोवाचे प्रेम अनुभवणे “जीवनाहून उत्तम” का आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्रे]
देवाच्या प्रेमापासून आपण दुरावलो आहोत असे जाणवल्यास आपण या परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न करू शकतो
[१५ पानांवरील चित्र]
आपला छळ का केला जात आहे हे पौलाला समजले होते