आपल्या विवेकबुद्धीचे रक्षण करा
आपल्या विवेकबुद्धीचे रक्षण करा
चुकीची माहिती भरण्यात आलेल्या संगणकाच्या आधारावर विमान चालवण्याची कल्पना भयावह आहे. पण कल्पना करा की एखाद्या व्यक्तीने मुद्दामहून विमानातील मार्गदर्शन यंत्रणेत बिघाड केला आहे किंवा जाणूनबुजून त्यात चुकीची माहिती भरली आहे! लाक्षणिक अर्थाने, तुमची विवेकबुद्धी भ्रष्ट करण्याचा कोणीतरी आज असाच प्रयत्न करत आहे. तुम्हाला नैतिक मार्गदर्शन देणारी यंत्रणा नष्ट करण्याचा त्याचा उद्देश आहे. तुमची देवासोबत विनाशकारक टक्कर होईल अशा मार्गाने तो तुम्हाला जाण्यास लावू इच्छितो!—ईयोब २:२-५; योहान ८:४४.
पण असे विध्वंसक हेतू बाळगणारी ही दुष्ट व्यक्ती आहे तरी कोण? बायबलमध्ये त्या व्यक्तीला ‘सर्व जगाला ठकविणारा, दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप’ असे संबोधण्यात आले आहे. (प्रकटीकरण १२:९) एदेन बागेत त्याने कशाप्रकारे कार्य केले हे आपल्याला माहीत आहे. अत्यंत लाघवी भाषणाने त्याने हव्वेला, योग्य मार्ग माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यास व देवाच्या विरोधात जाण्यास प्रवृत्त केले. (उत्पत्ति ३:१-६, १६-१९) तेव्हापासून आतापर्यंत त्याने आपल्या कावेबाज बुद्धीचा वापर करून कपटी सामाजिक संस्थाने निर्माण केली आहेत जेणेकरून लोकांनी सामूहिकरित्या देवाशी वैर करावे. यातील सर्वात निंद्य संस्थान म्हणजे खोटा धर्म.—२ करिंथकर ११:१४, १५.
खोट्या धर्मामुळे विवेकबुद्धी भ्रष्ट होते
बायबलमधील प्रकटीकरण या पुस्तकात, खोट्या धर्माला मोठी बाबेल म्हटलेल्या एका लाक्षणिक कलावंतिणीच्या रूपात दाखवण्यात आले आहे. तिच्या शिकवणुकींनी बऱ्याच लोकांच्या नैतिक जाणिवेचा विपर्यास करून, त्यांना इतर लोकांचा द्वेष करण्यास व आपल्यापेक्षा वेगळे विश्वास असलेल्या लोकांविरुद्ध हिंसाचार देखील करण्यास प्रवृत्त केले आहे. किंबहुना, प्रकटीकरणानुसार देव खोट्या धर्माला आपल्या उपासकांच्या व ‘पृथ्वीवर वधलेल्या सर्वांच्या’ रक्ताबद्दल दोषी ठरवतो.—प्रकटीकरण १७:१-६; १८:३, २४.
खोटा धर्म काही लोकांच्या नैतिक जाणिवेचा कितपत विपर्यास करेल याविषयी येशूने आपल्या शिष्यांना अशी ताकीद दिली होती: “तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल, अशी वेळ येत आहे.” अशाप्रकारचे हिंसाचारी लोक नैतिकरित्या खरोखर किती आंधळे झालेले आहेत! येशूने म्हटले: ‘त्यांनी पित्याला व मलाहि ओळखले नाही.’ (योहान १६:२, ३) येशूने वरील विधान केल्याच्या थोड्या काळानंतरच, काही धर्मपुढाऱ्यांच्या चिथावणीवरून त्याची हत्या करण्यात आली. आपण काही चूक करत आहोत असे या धर्मपुढाऱ्यांना वाटले नाही. (योहान ११:४७-५०) पण दुसरीकडे पाहता येशूने असेही सांगितले की त्याचे खरे उपासक आपसांतील प्रेमामुळे ओळखले जातील. पण त्यांचे प्रेम केवळ एकमेकांपुरते मर्यादित नाही; तर ते आपल्या शत्रूंवरही प्रेम करतील.—मत्तय ५:४४-४८; योहान १३:३५.
खोट्या धर्माने आणखी एका मार्गाने अनेकांची विवेकबुद्धी नष्ट केली आहे. अर्थात, विशिष्ट काळात प्रचलित असलेल्या नैतिक किंवा अनैतिक कल्पनांना बढावा देण्याद्वारे. याविषयी भाकीत करताना प्रेषित पौलाने म्हटले: “ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून ते २ तीमथ्य ४:३, ४.
स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवितील . . . अशी वेळ येईल.”—आजकाल काही धर्मपुढारी असे म्हणून लोकांचे कान खाजवू लागले आहेत की विवाहबाह्य लैंगिक संबंध देवाच्या नजरेत निषिद्ध नाहीत. इतरजण समलैंगिकतेला सूट देतात. फार काय, काही पाद्री स्वतःच समलैंगिक आहेत. द टाईम्स नावाच्या ब्रिटिश दैनिकातील एका लेखात असे म्हटले होते की “१३ समलैंगिक पाळकांना” चर्च ऑफ इंग्लंडच्या सामान्य सनदेचे (जनरल सायनड) सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे. जर चर्चचे पुढारी स्वतःच बायबलच्या नीतीनियमांना धाब्यावर बसवतात आणि त्यांची चर्चेस देखील हे डोळे मिटून सहन करतात तर मग त्यांच्या कळपातील सदस्यांनी कोणत्या आदर्शांचे पालन करावे? कोट्यवधी लोक नैतिक प्रश्नांसंबंधी पूर्णपणे गोंधळलेले आहेत यात काय आश्चर्य!
त्यापेक्षा, बायबलमध्ये शिकवल्या जाणाऱ्या नैतिक व आध्यात्मिक सत्यांच्या रूपातील शलाकांचे मार्गदर्शन अनुसरणेच अधिक श्रेयस्कर ठरणार नाही का? (स्तोत्र ४३:३; योहान १७:१७) उदाहरणार्थ, बायबल आपल्याला शिकवते की जारकर्मी व व्यभिचारी “ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) ते असेही सांगते की जे पुरुष व स्त्रिया “शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण” करतात ते देवाच्या नजरेत “अनुचित कर्म” करतात. (रोमकर १:२६, २७, ३२) ही नैतिक सत्ये अपरिपूर्ण मानवांनी कल्पिलेली नव्हेत; तर हे देवाने प्रेरित केलेले आदर्श आहेत जे त्याने आजपर्यंत कधीही बदलले नाहीत. (गलतीकर १:८; २ तीमथ्य ३:१६) पण मानवांची विवेकबुद्धी नष्ट करण्याचे इतरही मार्ग सैतानाजवळ आहेत.
करमणुकीची माध्यमे विचारपूर्वक निवडा
एखाद्या व्यक्तीला वाईट कृत्य करण्यास भाग पाडणे एक गोष्ट आहे, पण ते वाईट कृत्य करण्याची इच्छा त्या व्यक्तीच्या मनात निर्माण करणे ही अगदीच वेगळी गोष्ट आहे. “जगाचा अधिकारी” सैतान, याचा नेमका हाच उद्देश आहे. तो आपली नीच विचारसरणी मूर्ख किंवा भोळ्या व्यक्तींच्या, व खासकरून ज्यांची मने अगदी सहज भेदता येतात अशा तरुणांच्या मनात व हृदयात बिंबवू इच्छितो; आणि यासाठी तो आक्षेपार्ह वाचनसाहित्य, चित्रपट, संगीत, कंप्युटर गेम्स, आणि इंटरनेटवरील अश्लील वेबसाईट्स यांसारख्या साधनांचा उपयोग करतो.—योहान १४:३०; इफिसकर २:२.
पिडियॅट्रिक्स नावाच्या माहितीपत्रकातील एका वृत्तात असे म्हणण्यात आले की “[अमेरिकेतील] तरुण दर वर्षी अंदाजे १०,००० हिंसक कृत्ये पाहतात. आणि लहान मुलांसाठी असलेले कार्यक्रम तर सर्वात हिंसक असल्याचे आढळते.” सदर वृत्तात असेही सांगण्यात आले, की “दर वर्षी, १३-१९ या वयोगटातील मुलेमुली जवळजवळ १५००० लैंगिक दृश्ये, लैंगिक संबंधांविषयी अप्रत्यक्ष उल्लेख व विनोद असलेली दृश्ये पाहतात.” संध्याकाळी ७ ते ११ या मुख्य प्रसारण वेळात देखील “दर तासाला सरासरी ८ लैंगिक दृश्ये दाखवली जातात; १९७६ च्या तुलनेत ही दृश्ये चौपट झाली आहेत.” आणि साहजिकच या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की “असभ्य भाषा देखील अतिशय लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.” पण बायबल आणि इतर अनेक शास्त्रीय अभ्यास देखील ताकीद देतात की अशाप्रकारचे साहित्य नियमित ग्रहण केल्यास व्यक्तीची नैतिकता खालावत जाते. म्हणूनच जर तुम्हाला खरोखर देवाला संतुष्ट करण्याची व आपले भले व्हावे अशी इच्छा आहे तर नीतिसूत्रे ४:२३ येथे दिलेला सल्ला मनावर घ्या: “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे रक्षण कर कारण त्यात जीवनाचा उगम आहे.”—यशया ४८:१७.
आजकालचे बहुतेक लोकप्रिय संगीत देखील विवेकबुद्धी भ्रष्ट करते. बऱ्याच पाश्चात्त्य देशांत ज्याची गाणी लोकप्रियतेच्या चाट्र्सवर पहिल्या क्रमांकावर गेली आहेत अशा एका गायकाबद्दल ऑस्ट्रेलियन दैनिक द संडे मेल यात वाचकांना असे सूचित करण्यात आले की हा गायक गीतांतले बोल श्रोत्यांना “धक्कादायक वाटावेत म्हणून खास प्रयत्न” करतो. लेखात पुढे सांगितले आहे की “त्याच्या गीतांत ड्रग्स, अगम्य संभोग आणि बलात्काराचे गौरव केलेले आहे.” एका गीतात तो “आपल्या पत्नीचा खून करून तिचा देह एका तलावात फेकण्याविषयी” उल्लेख करतो. उदाहरणादाखल दिलेली इतर गीते इतकी बीभत्स आहेत की त्यांचा येथे उल्लेख करता येत नाही. आणि इतके असूनही या गायकाला त्याच्या संगीताप्रीत्यर्थ एक सन्मानित पुरस्कार देण्यात आला. संगिताचा मुलामा लावून सादर केलेले असले किळसवाणे विचार तुम्हाला आपल्या मनात व हृदयात घ्यायला आवडेल का? तुमची अशी इच्छा नसेल अशीच आम्ही आशा करतो. कारण अशाप्रकारचे वर्तन असणारे लोक आपली विवेकबुद्धी भ्रष्ट करून घेतात आणि शेवटी स्वतःत “दुष्ट मन” उत्पन्न करण्याद्वारे देवाचे शत्रू बनतात.—इब्री लोकांस ३:१२; मत्तय १२:३३-३५.
तेव्हा, करमणुकीच्या बाबतीत विचारशील असा. बायबल आपल्याला आग्रह करते की “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.”—फिलिप्पैकर ४:८.
साथीदारांचाही तुमच्या विवेकबुद्धीवर परिणाम होतो
नील व फ्रान्झ यांची लहानपणी अनेक प्रांजळ ख्रिस्ती बांधवांसोबत मैत्री होती. * त्यांचा सहवास त्यांना आवडायचा. पण कालांतराने परिस्थिती बदलली. नील सांगतो, “मी वाईट मुलांसोबत दोस्ती करू लागलो.” शेवटी त्याला पस्तावा झाला कारण या मुलांसोबत राहिल्यामुळे तो गुन्हेगारीत अडकला आणि त्याला तुरुंगात जावे लागले. फ्रान्झच्या बाबतीतही असेच झाले. तो खेदाने सांगतो, “मला वाटायचे, की जगिक मुलांसोबत राहिलो तरी मी स्वतःवर त्यांच्या संगतीचा परिणाम होऊ देणार नाही. पण गलतीकर ६:७ म्हणते ते अगदी खरे आहे, ‘देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.’ एका खडतर अनुभवानंतरच मला जाणीव झाली की मी चुकलो होतो आणि यहोवाचेच बरोबर होते. माझ्या चुकीमुळे मला जन्मठेप झाली आहे.”
नील व फ्रान्झ यांच्यासारखी मुले काही एका रात्रीत गुन्हेगार बनत नाहीत. सुरवातीला, त्यांना ही कल्पनाही अशक्य वाटत होती. वाहवत जाण्याची ही प्रक्रिया हळूहळू घडते; सहसा सुरवात वाईट संगतीने होते. (१ करिंथकर १५:३३) त्यानंतर हे तरुण ड्रग्स किंवा मद्याच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. कोणीतरी विवेकाची अगदी योग्य व्याख्या केली आहे, “[विवेक म्हणजे] व्यक्तिमत्त्वाचा तो भाग आहे जो मद्याच्या प्याल्यात सहज विरघळतो.” हे व्यसन जडल्यावर गुन्हेगारीत किंवा अनैतिकतेत गुंतायला फार वेळ लागत नाही.
मग ते पहिलेच पाऊल आपण का उचलावे? त्याउलट, ज्यांचे देवावर खरोखर प्रेम आहे अशा सुज्ञ लोकांशी मैत्री करा. ते तुम्हाला तुमचा विवेक अधिक मजबूत करण्यास मदत करतील नीतिसूत्रे १३:२०) नील व फ्रान्झ अजूनही कारागृहात आहेत, पण आता त्यांना जाणीव झाली आहे की विवेकबुद्धी ही देवाने दिलेली एक देणगी आहे आणि तिला योग्यप्रकारे प्रशिक्षित करणे, तिचे जतन करणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर आता ते आपला देव यहोवा याच्यासोबत एक चांगला नातेसंबंध बांधण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करत आहेत. आपण सर्वांनी सुज्ञ होऊन त्यांच्या अनुभवावरून धडा घ्यावा.—नीतिसूत्रे २२:३.
जेणेकरून तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन पुरवू शकेल, आणि पर्यायाने तुमचे अनेक दुःखांपासून संरक्षण होईल. (आपल्या विवेकबुद्धीची जोपासना करा
आपण देवावरील आपली प्रीती आणि विश्वास अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासोबतच त्याचे हितकर भय बाळगतो तेव्हा आपण हे दाखवत असतो की आपण आपल्या विवेकबुद्धीची जोपासना करू इच्छतो. (नीतिसूत्रे ८:१३; १ योहान ५:३) देवावर प्रीती, विश्वास व त्याचे भय नसल्यास साहजिकच आपली विवेकबुद्धी नैतिक दृष्टीने अस्थिर होईल, असे बायबल दाखवून देते. उदाहरणार्थ स्तोत्र १४:१ अशा लोकांविषयी सांगते की जे मनातल्या मनात म्हणतात, “देव नाही.” देवावर विश्वास नसलेल्या या लोकांच्या आचरणावर याचा कशाप्रकारे परिणाम होतो? वचन पुढे असे सांगते की ते “दुष्ट व अमंगळ कर्मे करितात.”
देवावर खरा विश्वास नसलेल्या लोकांजवळ उज्ज्वल भविष्याकरता कोणतीही दृढ अशी आशा नसते. त्यामुळे ते फक्त आल्या दिवसापुरते जगतात आणि आपल्या शारीरिक वासना तृप्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे जीवनाचे तत्त्वज्ञान म्हणजे: “चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे.” (१ करिंथकर १५:३२) दुसरीकडे पाहता, ज्यांची नजर सार्वकालिक जीवनाच्या प्रतिफळावर रोखलेली आहे ते या जगातील क्षणभंगुर सुखांच्या मोहाने आपल्या मार्गातून विचलित होत नाहीत. वैमानिकाच्या अचूक मार्गदर्शक संगणकाप्रमाणे त्यांची प्रशिक्षित विवेकबुद्धी त्यांना एकनिष्ठतेने देवाला आज्ञाधारक राहून याच मार्गाने सतत चालत राहण्यास मदत करते.—फिलिप्पैकर ३:८.
तुमची विवेकबुद्धी सतत तल्लख व अचूक असावी म्हणून तिला देवाच्या वचनाचे नियमित मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. हे मार्गदर्शन आपल्याला कशाप्रकारे मिळते याचे बायबल सचित्र वर्णन करते: “हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किवा डावीकडे जावयाचे असो.” (यशया ३०:२१) तेव्हा, दररोज बायबल वाचण्याकरता वेळ राखून ठेवा. यामुळे, तुम्ही जेव्हा योग्य पाऊल उचलण्याकरता धडपडत असता किंवा जीवनाच्या चिंता व काळजीचे सावट तुमच्यावर येते तेव्हा दररोजचे बायबल वाचन तुम्हाला बळ व प्रोत्साहन पुरवेल. तुम्ही यहोवावर अगदी पूर्ण मनाने भिस्त ठेवली तर तो तुम्हाला नैतिक व आध्यात्मिक मार्गदर्शन अवश्य पुरवेल याची खात्री बाळगा. होय, स्तोत्रकर्त्याप्रमाणे म्हणा: “मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.”—स्तोत्र १६:८; ५५:२२.
[तळटीप]
^ नावे बदलण्यात आली आहेत.
[५ पानांवरील चित्रे]
बायबलमध्ये “मोठी बाबेल” म्हटलेल्या खोट्या धर्माने अनेकांची विवेकबुद्धी मंद केली आहे
[चित्राचे श्रेय]
सैनिकांना आशीर्वाद देणारा पाद्री: U.S. Army photo
[६ पानांवरील चित्रे]
हिंसक व अनैतिक दृश्ये पाहणे तुमच्या विवेकबुद्धीकरता हानीकारक आहे
[७ पानांवरील चित्र]
देवाच्या वचनाच्या नियमित मार्गदर्शनामुळे तुमच्या विवेकबुद्धीचे रक्षण होईल