व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला प्रशिक्षित विवेकबुद्धीची गरज आहे

तुम्हाला प्रशिक्षित विवेकबुद्धीची गरज आहे

तुम्हाला प्रशिक्षित विवेकबुद्धीची गरज आहे

अंटार्टिकाकडे रवाना झालेल्या एयर न्यूझीलंड फ्लाईट ९०१ या विमानातील प्रवाशांकरता व विमानातील सर्व कर्मचाऱ्‍यांकरता तो दिवस अविस्मरणीय ठरणार असे दिसत होते. लोक अत्यंत उत्साहात आपापला कॅमरा घेऊन सज्ज होते; अंटार्टिकाचा श्‍वेत खंड जवळ येऊ लागला तेव्हा सर्वांना अंटार्टिकाचे विहंगम दर्शन जवळून घेता यावे म्हणून डीसी-१० विमानाने सूर मारला.

विमानाचा कप्तान, १५ वर्षांपासून एकूण ११,००० पेक्षा अधिक तासांच्या उड्डाणाचा अनुभव असलेला वैमानिक होता. उत्थान (टेक-ऑफ) करण्याआधी त्याने विमानातील संगणकाला उड्डाणासंबंधी काळजीपूर्वक सूचना दिल्या होत्या; पण आपल्याला देण्यात आलेली निर्देशके चुकीची आहेत हे त्या कप्तानाला माहीत नव्हते. समुद्रसपाटीपासून ६०० मीटरपेक्षा जराशा कमी उंचीवर, एका ढगातून उडत असताना डीसी-१० विमान माऊंट एरेबस पर्वताच्या नीचतर उतारांवर आदळले आणि विमानातील एकूण एक म्हणजे २५७ जण या दुर्घटनेत ठार झाले.

आधुनिक विमाने ज्याप्रमाणे आकाशात उडताना संगणकांच्या मार्गदर्शनावर अवलंबून असतात त्याचप्रमाणे मानवांना देखील जीवनाच्या प्रवासात मार्गदर्शन करण्याकरता विवेकबुद्धी देण्यात आली आहे. आणि या विवेकबुद्धीच्या संबंधात फ्लाईट ९०१ च्या भयंकर शोकांतिकेवरून आपण बरेच काही शिकू शकतो. उदाहरणार्थ, विमानाची सुरक्षा ज्याप्रमाणे व्यवस्थित कार्य करणाऱ्‍या उड्डाण यंत्रणेवर व अचूक निर्देशकांवर अवलंबून असते त्याचप्रमाणे आपली आध्यात्मिक, नैतिक आणि शारीरिक सुरक्षा देखील अचूक नैतिक निर्देशकांनुसार कार्य करणाऱ्‍या संवेदनशील विवेकबुद्धीवर अवलंबून आहे.

दुःखाची गोष्ट म्हणजे आजच्या जगात अशी नैतिक निर्देशके झपाट्याने नाहीशी होत चालली आहेत किंवा त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. एका अमेरिकन शिक्षणतज्ज्ञेने म्हटले: “अमेरिकेतील सर्वसामान्य शाळकरी मुलाला धड वाचता येत नाही, लिहिता येत नाही आणि नकाशावर फ्रांस देश कोठे आहे हे देखील सांगणे कठीण वाटते असेही अलीकडे ऐकण्यात येऊ लागले आहे. पण एवढेच नाही. आज या शाळकरी मुलांना चांगले आणि वाईट यातला फरक ओळखणे देखील कठीण जात आहे. अक्षरांच्या व आकड्यांच्या बाबतीतच केवळ ते अशिक्षित नाहीत. त्यांच्या शैक्षणिक समस्यांच्या यादीत गंभीर नैतिक अनिश्‍चिततेची समस्या देखील जोडावी लागेल.” त्यांनी असेही म्हटले की “आजकालच्या तरुणांची नैतिक दृष्टी धूसर झाली आहे. खात्री करून घ्यायची असेल, तर ‘योग्य व अयोग्य’ म्हणून काही असते का असे त्यांच्यापैकी एखाद्याला विचारून पाहा. तुमच्यासमोरचा तो तरुण अचानक गोंधळात पडेल, त्याला काय बोलावे सुचणार नाही, काहीसा अस्वस्थ आणि घाबरल्यासारखा तो होईल. . . . शिवाय, शालेय जीवन संपवून महाविद्यालयात गेल्यावर ही संदिग्धता कमी होण्याऐवजी अधिकच वाढते.”

या गोंधळामागचे एक कारण म्हणजे नैतिक सापेक्षतावाद. अर्थात, व्यक्‍तिपरत्वे व संस्कृतीपरत्वे नैतिक आदर्श देखील बदलू शकतात हा प्रचलित दृष्टिकोन. जरा कल्पना करा, की वैमानिकांना उड्डाणात मार्गदर्शित करण्याकरता स्थिर निर्देशकांऐवजी, केव्हाही कोणत्याही दिशेला बदलणाऱ्‍या आणि कधीकधी दिसेनाशा होणाऱ्‍या शलाकांवर अवलंबून राहावे लागले असते तर! तर माऊंट एरेबससारख्या दुर्घटना वारंवार घडल्या असत्या. त्याचप्रकारे, सर्व नैतिक आदर्शांना झिडकारणाऱ्‍या मानव समाजाला, अनैतिक संबंधांमुळे विस्कळीत होणारी कुटुंबे, तसेच एड्‌स किंवा इतर लैंगिकरित्या संक्रमित होणाऱ्‍या रोगांना बळी पडणारे कोट्यवधी लोक यांच्या रूपात आज भारी किंमत मोजावी लागत आहे.

नैतिक सापेक्षतावाद कदाचित वरवर अतिशय अत्याधुनिक भासेल, पण खरी वस्तुस्थिती पाहिल्यास, हा दृष्टिकोन बाळगणारे लोक पुरातन काळातील निनवेच्या लोकांप्रमाणे आहेत की ज्यांना ‘उजव्याडाव्या हाताचा भेद’ देखील कळत नव्हता. नैतिक सापेक्षतावादाचे अनुयायी धर्मत्यागी इस्राएली लोकांसारखे आहेत जे “वाईटाला बरे व बऱ्‍याला वाईट” म्हणत होते.—योना ४:११; यशया ५:२०.

मग आपली विवेकबुद्धी एक विश्‍वसनीय मार्गदर्शक बनावी म्हणून तिला प्रशिक्षित करण्याकरता सुस्पष्ट व असंदिग्ध नियम व तत्त्वे आपल्याला कोठे सापडतील? लाखो लोकांना जाणीव झाली आहे की बायबल याकरता अगदी उपयुक्‍त आहे. नैतिकता, बालसंगोपन यांसारख्या विषयांपासून देवाच्या उपासनेपर्यंत कोणताही महत्त्वाचा विषय बायबलमध्ये सुटलेला नाही. (२ तीमथ्य ३:१६) कित्येक शतकांपासून हा ग्रंथ पूर्णपणे विश्‍वसनीय शाबीत झाला आहे. बायबलचे नैतिक आदर्श विश्‍वातील सर्वोच्च अधिकारपदावर असणाऱ्‍या आपल्या निर्माणकर्त्याने स्थापित केलेले असल्यामुळे ते सर्व मानवांकरता उपयोगी आहेत. त्यामुळे नैतिक बाबींविषयी आपल्याला संदिग्धता वाटण्याची गरजच नाही.

पण सध्याच्या काळात तुमच्या विवेकबुद्धीवर कधी नव्हे इतका चोहोबाजूने हल्ला होत आहे. असे आपण का म्हणतो? आणि तुम्हाला तुमच्या विवेकबुद्धीचे रक्षण कशाप्रकारे करता येईल? पहिले पाऊल म्हणजे हा हल्ला करणारा कोण आणि तो कोणत्याप्रकारचे डावपेच उपयोगात आणतो हे जाणून घेणे. पुढच्या लेखात याच विषयावर चर्चा केली जाईल.