व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा सहनशील परमेश्‍वर आहे

यहोवा सहनशील परमेश्‍वर आहे

यहोवा सहनशील परमेश्‍वर आहे

“परमेश्‍वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर [आहे].”—निर्गम ३४:६.

१, २. (अ) गतकाळात कोणाला यहोवाच्या सहनशीलतेमुळे फायदा झाला? (ब) “सहनशीलता” या शब्दाचा काय अर्थ होतो?

 नोहाच्या काळातील लोक, मोशेसोबत अरण्यातून जाणारे इस्राएल लोक, येशू पृथ्वीवर असतानाच्या काळातील यहूदी लोक—हे सर्व लोक वेगवेगळ्या परिस्थितीत जगणारे लोक होते. पण त्या सर्वांना यहोवाच्या एका प्रेमपूर्ण गुणामुळे फायदा झाला. काहींना तर तो जीवनदायक ठरला. यहोवाची सहनशीलता आपल्याकरता देखील जीवनदायक ठरू शकते.

सहनशीलता म्हणजे काय? यहोवा ती कोणत्या परिस्थितीत दाखवतो व का? सहनशीलतेची व्याख्या, “अन्याय किंवा चिथवणूक धीराने सोसणे आणि बिघडलेल्या नातेसंबंधात सुधार होण्याची आशा कधीही न सोडणे” अशी करण्यात आली आहे. त्याअर्थी, सहनशीलता दाखवण्यामागे एक उद्देश आहे. खासकरून, सहनशील व्यक्‍ती समस्या निर्माण करणाऱ्‍या व्यक्‍तीचे भले इच्छिते. पण सहनशील असण्याचा अर्थ अयोग्य वर्तनाकडे दुर्लक्ष करणे असा होत नाही. सहनशील असण्याचा उद्देश साध्य झाल्यावर किंवा विशिष्ट परिस्थितीत सहनशील असण्यात काहीच अर्थ नसल्यास सहनशीलता संपुष्टात येते.

३. यहोवाने आजपर्यंत कोणत्या उद्देशाने सहनशीलता दाखवली आहे आणि तो ती केव्हापर्यंत दाखवेल?

मानव देखील सहनशील असू शकतात, पण यहोवाच या गुणाचा परमश्रेष्ठ आदर्श आहे. पापामुळे यहोवा व त्याच्या मानवी सृष्टीचे संबंध बिघडले तेव्हापासून आजपर्यंत आपल्या निर्माणकर्त्याने धीराने सोसण्याची वृत्ती दाखवली आहे आणि पश्‍चात्तापी मनुष्ये त्याच्यासोबतचा संबंध सुधारू शकतील अशाप्रकारची तजवीज देखील त्याने केली आहे. (२ पेत्र ३:९; १ योहान ४:१०) पण देवाच्या सहनशीलतेचा उद्देश साध्य झाल्यावर मात्र तो मुद्दामहून पाप करणाऱ्‍यांविरुद्ध कारवाई करेल व सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा शेवट करेल.—२ पेत्र ३:७.

देवाच्या मुख्य गुणांशी सुसंगत

४. (अ) सहनशीलतेची कल्पना इब्री शास्त्रवचनांत कशाप्रकारे व्यक्‍त करण्यात आली आहे? (तळटीप देखील पाहा.) (ब) संदेष्टा नहूम यहोवाचे कसे वर्णन करतो आणि यावरून यहोवाच्या सहनशीलतेविषयी काय दिसून येते?

इब्री शास्त्रवचनांत, सहनशीलतेची संकल्पना दोन इब्री शब्दांनी व्यक्‍त केली जाते; यांचा शब्दशः अर्थ “नाकपुड्यांची लांबी” असा असून नवे जग भाषांतर (इंग्रजी) यात त्यांचे भाषांतर “मंदक्रोध” असे करण्यात आले आहे. * देवाच्या सहनशीलतेविषयी सांगताना संदेष्टा नहूम याने म्हटले: “परमेश्‍वर मंदक्रोध व महापराक्रमी आहे; तरी तो पाप्यांस शासन केल्यावाचून राहणार नाही.” (नहूम १:३) त्याअर्थी यहोवाची सहनशीलता म्हणजे दुबळेपणाचे लक्षण नाही व तिला मर्यादा आहेत. सर्वशक्‍तिमान देव महापराक्रमी असून देखील मंदक्रोध आहे, यावरून काही उद्देशामुळे तो आपला क्रोध आवरत असल्याचे दिसून येते. त्याला शिक्षा देण्याचा अधिकार असूनही, चूक करणाऱ्‍याला बदलण्याची संधी मिळावी म्हणून तो लगेच शिक्षा देत नाही. (यहेज्केल १८:३१, ३२) त्याअर्थी यहोवाची सहनशीलता त्याच्या प्रेमाचा व तो आपल्या सामर्थ्याचा सुबुद्धीने वापर करतो याचा पुरावा आहे.

५. यहोवाची सहनशीलता त्याच्या न्यायाशी कशाप्रकारे सुसंगत आहे?

यहोवाची सहनशीलता त्याच्या न्यायाशी व धार्मिकतेशी देखील सुसंगत आहे. त्याने मोशेला स्वतःविषयी सांगताना म्हटले की ‘परमेश्‍वर दयाळू, कृपाळू देव, मंदक्रोध [किंवा, सहनशील], दयेचा व सत्याचा सागर आहे.’ (निर्गम ३४:६) कित्येक वर्षांनंतर मोशेने यहोवाची या शब्दांत स्तुती गायिली: “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्‍वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे.” (अनुवाद ३२:४) होय यहोवाची दया, सहनशीलता, न्याय आणि सरळता हे सर्व गुण एकवाक्यतेत कार्य करतात.

जलप्रलयापूर्वी यहोवाची सहनशीलता

६. यहोवाने आदाम व हव्वा यांच्या वंशजांना त्याच्या सहनशीलतेचा कोणता उल्लेखनीय पुरावा दिला आहे?

एदेन बागेत आदाम व हव्वा यांनी यहोवाविरुद्ध विद्रोह केल्यानंतर त्यांचा प्रेमळ निर्माणकर्ता यहोवा याच्यासोबतचा त्यांचा मोलवान नातेसंबंध कायमचा तुटला. (उत्पत्ति ३:८-१३, २३, २४) यहोवापासून दुरावल्यामुळे त्यांच्या वंशजांवरही याचा दुष्परिणाम झाला व त्यांना पाप, अपरिपूर्णता व मृत्यू वारशाने मिळाला. (रोमकर ५:१७-१९) पहिल्या मानवी जोडप्याने जाणूनबुजून पाप केले असले तरीसुद्धा यहोवाने त्यांना मुले उत्पन्‍न करू दिली. नंतर, आदाम व हव्वेच्या वंशजांना त्याच्यासोबत पुन्हा समेट करावा याकरता त्याने प्रेमळपणे तजवीजही केली. (योहान ३:१६, ३६) प्रेषित पौलाने याविषयी खुलासा केला: “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्‍ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहो. कारण आपण शत्रु असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहो.”—रोमकर ५:८-१०.

७. यहोवाने जलप्रलयाआधी कशाप्रकारे सहनशीलता दाखवली आणि जलप्रलयाआधीच्या पिढीचा नाश करणे न्यायसंगत का होते?

यहोवाची सहनशीलता नोहाच्या दिवसांत दिसून आली. जलप्रलयाच्या एका शतकाआधी “देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडविली होती.” (उत्पत्ति ६:१२) तरीसुद्धा काही काळ यहोवाने मानवांप्रती सहनशीलता दाखवली. त्याने म्हटले: “मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशेवीस वर्षांचा काळ देईन.” (उत्पत्ति ६:३) या १२० वर्षांमुळे विश्‍वासू नोहाला कुटुंब वाढवणे शक्य झाले आणि मग देवाचा हुकूम मिळाल्यावर तारू बांधणे व त्याच्या काळातील लोकांना जलप्रलयाची सूचना देणे शक्य झाले. प्रेषित पेत्राने लिहिले: “पूर्वी नोहाच्या दिवसांत तारु तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता त्यावेळी . . . त्या तारवात केवळ आठ जण पाण्यातून वाचविण्यात आले.” (१ पेत्र ३:२०) अर्थात, नोहाच्या स्वतःच्या कुटुंबाखेरीज कोणीही त्याच्या प्रचाराकडे “लक्ष दिले नाही.” (मत्तय २४:३८, ३९, NW) पण नोहाला तारू बांधायला लावून व त्याला “नीतिमत्त्वाचा उपदेशक” म्हणून अनेक दशके सेवा करायला लावून यहोवाने नोहाच्या काळातील लोकांना आपल्या हिंसाचारी मार्गाविषयी पश्‍चात्ताप करून त्याची सेवा करण्याची भरपूर संधी दिली. (२ पेत्र २:५; इब्री लोकांस ११:७) शेवटी जेव्हा त्याने त्या दुष्ट पिढीचा नाश केला तेव्हा तो पूर्णपणे न्यायसंगत होता.

इस्राएल राष्ट्राप्रती अनुकरणीय सहनशीलता

८. यहोवाने इस्राएल राष्ट्राप्रती सहनशीलता कशी दाखवली?

इस्राएलप्रती तर यहोवाने १२० वर्षांपेक्षा कितीतरी अधिक काळापर्यंत सहनशीलता दाखवली. देवाचे निवडलेले लोक या नात्याने त्यांच्या १,५०० पेक्षा अधिक वर्षांच्या इतिहासात बहुतेकवेळा इस्राएल लोक देवाच्या सहनशक्‍तीची परीक्षा पाहत होते. इजिप्तमधून चमत्कारिकरित्या सुटका झाल्यानंतर काही आठवड्यांतच त्यांनी मूर्तिपूजा करून आपल्या मुक्‍तिदात्या परमेश्‍वराचा अवमान केला. (निर्गम ३२:४; स्तोत्र १०६:२१) यानंतरच्या काही दशकांत इस्राएली लोकांनी अरण्यात यहोवाने चमत्कारिकपणे पुरवलेल्या अन्‍नाविषयी कुरकूर केली, मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध तक्रार केली, यहोवाची निंदा केली, विधर्मी लोकांशी व्यभिचार केला; इतकेच नव्हे तर बआल उपासनेतही ते सामील झाले. (गणना ११:४-६; १४:२-४; २१:५; २५:१-३; १ करिंथकर १०:६-११) यहोवाने आपल्या लोकांचा उच्छेद केला असता तर ते पूर्णपणे न्यायसंगत ठरले असते, पण त्याने मात्र त्यांच्याप्रती सहनशीलता दाखवली.—गणना १४:११-२१.

९. शास्त्यांच्या व राजांच्या काळात, यहोवा एक सहनशील देव आहे हे त्याने कसे दाखवून दिले?

शास्त्यांच्या काळात इस्राएली लोक वारंवार मूर्तिपूजेकडे वळले. त्यांनी मूर्तिपूजा केल्यास यहोवा त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती देत असे. पण त्यांनी पश्‍चात्ताप करून त्याचा धावा केल्यास तो त्यांच्याकरता शास्ते उभे करी व ते त्यांची सुटका करत. (शास्ते २:१७, १८) इस्राएलात बऱ्‍याच काळापर्यंत राजे राज्य करत होते; या राजांपैकी फार कमी राजांनी एकनिष्ठपणे यहोवाची उपासना केली. विश्‍वासू राजांच्या काळातही लोकांनी बहुतेकवेळा खऱ्‍या उपासनेत खोट्या उपासनेची भेसळ करण्याचा प्रयत्न केला. लोकांना त्यांच्या अविश्‍वासूपणापासून परावृत्त करण्यासाठी यहोवाने संदेष्टे उभे केले तेव्हा लोकांनी त्यांच्याऐवजी भ्रष्ट याजकांचे व खोट्या संदेष्ट्यांचे ऐकणे पसंत केले. (यिर्मया ५:३१; २५:४-७) इतकेच काय, तर इस्राएल लोकांनी यहोवाच्या विश्‍वासू संदेष्ट्यांचा छळ केला आणि त्यांच्यापैकी काहींचा तर वध देखील केला. (२ इतिहास २४:२०, २१; प्रेषितांची कृत्ये ७:५१, ५२) एवढे होऊनही यहोवा त्या लोकांप्रती सहनशीलता दाखवत राहिला.—२ इतिहास ३६:१५.

यहोवाची सहनशीलता संपुष्टात आली नाही

१०. यहोवाची सहनशीलता केव्हा कळसास पोचली?

१० पण देवाच्या सहनशीलतेला मर्यादा आहे हे आपल्याला इतिहासावरून दिसून येते. सा.यु.पू. ७४० मध्ये त्याने अश्‍शूरला इस्राएलच्या दहा गोत्रांच्या राज्याचा पराजय करण्यास व त्यांना बंदिवासात नेण्यास परवानगी दिली. (२ राजे १७:५, ६) आणि सा.यु.पू. ६०७ साली त्याने बॅबिलोनला यहुदाच्या दोन-गोत्रांच्या राज्यावर प्रभुत्व मिळवून जेरुसलेमचा व तेथील मंदिराचा नाश करू दिला.—२ इतिहास ३६:१६-१९.

११. न्यायदंड आणतानाही सहनशीलता दाखवण्यास वाव होता हे यहोवाने कसे दाखवले?

११ पण इस्राएल व यहुदा यांच्याविरुद्ध न्यायदंड आणताना देखील यहोवा सहनशीलता दाखवण्यास विसरला नाही. आपला संदेष्टा यिर्मया याच्याद्वारे त्याने आपल्या निवडलेल्या लोकांच्या पुनर्वसनाविषयी भाकीत केले. त्याने म्हटले: “बाबेलची सत्तर वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हास या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्यासंबंधाने पूर्ण करीन. . . . मी तुम्हास पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकात व ज्या सर्व स्थळी मी तुम्हास हाकून लाविले आहे तेथून तुम्हास एकत्र करीन.”—यिर्मया २९:१०, १४.

१२. यहुदी शेषांचे यहुदाला परतणे मशीहाच्या येण्याच्या संदर्भात कशाप्रकारे अनुकूल ठरले?

१२ यहोवाने भाकीत केल्याप्रमाणे, बंदिवासात गेलेल्या यहुद्यांपैकी खरोखर काही शेषजन यहुदाला परत आले व त्यांनी यहोवाची उपासना पुनरुज्जीवित करून जेरुसलेम येथील मंदिराची पुनर्बांधणी केली. यहोवाच्या उद्देशांच्या पूर्णतेत हे शेषजन, तजेला व समृद्धी आणणाऱ्‍या ‘परमेश्‍वरापासून येणाऱ्‍या दहिवराप्रमाणे’ ठरणार होते. तसेच ते ‘वनपशूंत सिंहाप्रमाणे’ निर्भय व बलवंत ठरणार होते. (मीखा ५:७, ८) या दुसऱ्‍या अभिव्यक्‍तीची पूर्तता मॅकबी लोकांच्या काळात झाली असावी जेव्हा मॅकबी घराण्याच्या नेतृत्त्वाखाली यहुद्यांनी प्रतिज्ञात देशातून आपल्या शत्रूंना हाकलून लावले आणि भ्रष्ट करण्यात आलेल्या मंदिरास पुनःसमर्पित केले. अशारितीने त्यांचा देश व मंदिर टिकून राहिले आणि त्यामुळे देवाचा पुत्र मशीहा म्हणून तेथे आला तेव्हा आणखी एक विश्‍वासू शेषांचा गट त्याचे स्वागत करू शकला.—दानीएल ९:२५; लूक १:१३-१७, ६७-७९; ३:१५, २१, २२.

१३. यहुद्यांनी आपल्या पुत्राचा वध केल्यानंतरसुद्धा यहोवा त्यांच्याप्रती सहनशीलता कशाप्रकारे दाखवत राहिला?

१३ यहुद्यांनी आपल्या पुत्राचा वध केल्यावरही यहोवाने आणखी साडेतीन वर्षे त्यांच्याप्रती सहनशीलता दाखवली व अब्राहामाच्या आध्यात्मिक वंशाचा भाग बनण्याची संधी एकमेवपणे त्यांना देऊ केली. (दानीएल ९:२७) * सा.यु. ३६ सालाच्या आधी व नंतर काही यहुद्यांनी या संधीचा फायदा करून घेतला आणि म्हणूनच पौलाने यासंदर्भात नंतर असे म्हटले की “कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे.”—रोमकर ११:५.

१४. (अ) सा.यु. ३६ साली अब्राहामच्या आध्यात्मिक वंशात सामील होण्याचा सुहक्क कोणाला देण्यात आला? (ब) यहोवा ज्याप्रकारे आध्यात्मिक इस्राएलच्या सदस्यांना निवडतो त्याविषयी पौलाने आपल्या भावना कशाप्रकारे व्यक्‍त केल्या?

१४ सा.यु. ३६ साली अब्राहामाच्या आध्यात्मिक वंशाचे भाग बनण्याचा सुहक्क, यहुदी किंवा यहुदी मतानुसारी नसलेल्या लोकांना पहिल्यांदाच देऊ करण्यात आला. हे आमंत्रण स्वीकारणाऱ्‍यांना यहोवाची अपात्री कृपा व सहनशीलता अनुभवायला मिळाली. (गलतीकर ३:२६-२९; इफिसकर २:४-७) यहोवाच्या दयाळू सहनशीलतेमुळेच आध्यात्मिक इस्राएलांची एकूण संख्या पूर्ण होऊ शकली; यहोवाच्या सहनशीलतेमागे असलेली त्याची बुद्धी व तिचा उद्देश यांविषयी मनःपूर्वक प्रशंसा व्यक्‍त करताना पौलाने म्हटले: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!”—रोमकर ११:२५, २६, ३३; गलतीकर ६:१५, १६.

त्याच्या नावाकरता सहनशीलता

१५. देवाचे सहनशीलता दाखवण्याचे प्रमुख कारण कोणते आहे आणि कोणत्या वादाचे समाधान करण्याकरता बराच काळ जाऊ देण्याची आवश्‍यकता होती?

१५ यहोवा सहनशीलता का दाखवतो? मुख्यतः त्याच्या पवित्र नावाचे गौरव करण्याकरता व त्याच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करण्याकरता. (१ शमुवेल १२:२०-२२) यहोवा आपल्या सार्वभौमत्त्वाचा कशाप्रकारे वापर करतो यासंदर्भात सैतानाने उपस्थित केलेल्या नैतिक वादाचे सबंध निर्मितीपुढे व्यवस्थित समाधान होण्याकरता बराच काळ जाऊ देण्याची आवश्‍यकता होती. (ईयोब १:९-११; ४२:२, ५, ६) म्हणूनच जेव्हा ईजिप्तमध्ये यहोवाच्या लोकांवर जुलूम केला जात होता तेव्हा त्याने फारोला सांगितले: “आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव साऱ्‍या पृथ्वीवर प्रगट व्हावे यासाठीच मी तुला राखिले आहे.”—निर्गम ९:१६.

१६. (अ) यहोवाच्या सहनशीलतेमुळे त्याच्या नावाकरता लोक निवडणे कसे शक्य झाले? (ब) यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण व त्याच्या सार्वभौमत्त्वाचे दोषनिवारण कशाप्रकारे केले जाईल?

१६ देवाच्या पवित्र नावाच्या गौरवात त्याच्या सहनशीलतेची भूमिका समजावून सांगताना प्रेषित पौलाने, फारोला यहोवाने बोललेले शब्द उद्धृत केले. व त्यानंतर पौलाने लिहिले: “आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्‍त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले, आणि ज्या आपल्याला केवळ यहूद्यांतून नव्हे तर परराष्ट्रियांतूनहि पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्‍त करावी असे त्याला वाटत असेल, तर काय? तो होशेयाच्या पुस्तकात हेहि म्हणतो की, ‘जे माझे लोक नव्हत त्यांना मी आपले लोक म्हणेन.’” (रोमकर ९:१७, २२-२५) यहोवाने सहनशीलता दाखवल्यामुळेच तो राष्ट्रांतून “आपल्या नावाकरिता काही लोक” निवडून घेऊ शकला. (प्रेषितांची कृत्ये १५:१४) हे ‘पवित्र जन’ आपले मस्तक येशू ख्रिस्त याच्या नेतृत्वाखाली यहोवाच्या राज्याचे वारस आहेत ज्याद्वारे तो आपल्या महान नावाचे पवित्रीकरण आणि त्याच्या सार्वभौमत्वाचे दोषनिवारण करील.—दानीएल २:४४; ७:१३, १४, २७; प्रकटीकरण ४:९-११; ५:९, १०.

यहोवाच्या सहनशीलतेमुळे तारण

१७, १८. (अ) काय केल्यामुळे आपण नकळत, सहनशीलता दाखवण्याबद्दल यहोवाची टीका करण्याची शक्यता आहे? (ब) यहोवाच्या सहनशीलतेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहण्याचे प्रोत्साहन आपल्याला देण्यात आले आहे?

१७ अगदी सुरवातीला मानवांनी पाप केले व सबंध मानवजातीवर संकट ओढवले तेव्हापासून आजपर्यंत यहोवाने आपण एक सहनशील परमेश्‍वर असल्याचे दाखवून दिले आहे. जलप्रलयाआधीच्या त्याच्या सहनशीलतेमुळे, लोकांना येणाऱ्‍या नाशाचा इशारा देण्याकरता आणि बचावासाठी तारू बांधण्याकरता पुरेसा वेळ मिळाला. पण एक वेळ अशी आली जेव्हा यहोवाच्या धीराने मर्यादा गाठली आणि जलप्रलय आला. त्याचप्रकारे आज, यहोवा अतिशय उदात्तपणे सहनशीलता दाखवत आहे आणि काहींच्या अपेक्षेपेक्षा जास्त काळपर्यंत त्याने ही सहनशीलता दाखवली आहे. पण निराश होण्याचे कारण नाही. कारण असे करणे हे देवाच्या सहनशीलतेची टीका करण्यासारखे ठरेल. पौलाने विचारले: “देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्‍यांच्या विपुलतेचा अनादर करितोस काय?”—रोमकर २:४.

१८ तारणाकरता देवाची स्वीकृती मिळावी म्हणून आपल्याला देवाच्या सहनशीलतेची कितपत गरज आहे हे आपल्यापैकी कोणीही सांगू शकत नाही. पौल आपल्याला सल्ला देतो की “भीत व कापत आपले तारण साधून घ्या.” (फिलिप्पैकर २:१२) प्रेषित पेत्राने सह ख्रिश्‍चनांना लिहिले: “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” (तिरपे वळण आमचे.)—२ पेत्र ३:९.

१९. आपण यहोवाच्या सहनशीलतेचा कशाप्रकारे फायदा करून घेऊ शकतो?

१९ विशिष्ट बाबी हाताळण्याच्या यहोवाच्या पद्धतीमुळे आपण अधीर होऊ नये. उलट, पेत्राच्या पुढील सल्ल्याचे पालन करून आपण ‘आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजावे.’ कोणाचे तारण? आपले आणि सोबतच अद्याप “राज्याची सुवार्ता” न ऐकलेल्या इतर असंख्य लोकांचेसुद्धा. (२ पेत्र ३:१५; मत्तय २४:१४) अशी मनोवृत्ती ठेवल्यास आपल्याला यहोवाच्या उदात्त सहनशीलतेविषयी कदर बाळगण्यास मदत होईल व इतरांसोबत व्यवहार करताना सहनशील असण्यास आपण प्रेरित होऊ.

[तळटीपा]

^ इब्री भाषेत, “नाक किंवा नाकपुडी याकरता असलेला शब्द” (ॲफ) सहसा लाक्षणिक अर्थाने क्रोधाचे वर्णन करण्याकरता उपयोगात आणला जातो कारण अतिशय क्रोधाविष्ट झालेली व्यक्‍ती नाक फुगवून जोरजोराने श्‍वास घेते किंवा फुरफुरते.

^ या भविष्यवाणीवर अधिक खुलासा मिळण्याकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या या इंग्रजी पुस्तकाची पृष्ठे १९१-४ पाहा.

तुम्ही समजावून सांगू शकता का?

• बायबलमध्ये “सहनशीलता” या शब्दाचा काय अर्थ होतो?

• जलप्रलयाआधी, बॅबिलोनी बंदिवासानंतर व सा.यु. पहिल्या शतकात यहोवाने कशाप्रकारे सहनशीलता दाखवली?

• कोणत्या महत्त्वाच्या कारणांमुळे यहोवाने सहनशीलता दाखवली आहे?

• आपण यहोवाच्या सहनशीलतेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

जलप्रलयापूर्वी यहोवाने सहनशीलता दाखवल्यामुळे लोकांना पश्‍चात्ताप करण्यासाठी पुरेशी संधी मिळाली

[१० पानांवरील चित्र]

बॅबिलोनचे पतन झाल्यानंतर यहुद्यांना यहोवाच्या सहनशीलतेचा फायदा झाला

[११ पानांवरील चित्र]

पहिल्या शतकात, यहुदी व गैरयहुदी लोकांना देखील यहोवाच्या सहनशीलतेचा फायदा झाला

[१२ पानांवरील चित्र]

आज ख्रिस्ती यहोवाच्या सहनशीलतेचा फायदा करून घेत आहेत