व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘सहनशीलता धारण करा’

‘सहनशीलता धारण करा’

‘सहनशीलता धारण करा’

“करूणायुक्‍त हृदय . . . सहनशीलता ही धारण करा.”—कलस्सैकर ३:१२.

१. सहनशीलतेच्या एका उत्तम उदाहरणाचे वर्णन करा.

 नैर्ऋत्य फ्रान्समध्ये राहणारे रेझीस १९५२ साली यहोवाचे समर्पित साक्षीदार बनले. त्यांनी यहोवाची सेवा करू नये म्हणून कित्येक वर्षांपर्यंत त्यांच्या पत्नीने त्यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा हरतऱ्‍हेने प्रयत्न केला. त्यांना सभेला जाता येऊ नये म्हणून कधीकधी ती त्यांच्या गाडीची चाके पंक्चर करायची; एकदा तर ते बायबल संदेशाचा घरोघर प्रचार करण्यास गेले तेव्हा तीही त्यांच्या मागोमाग प्रत्येक घरी गेली, आणि ते घरमालकांशी राज्याच्या सुवार्तेविषयी बोलत असताना ती त्यांची थट्टा करायची. असा निरंतर विरोध होत असूनही रेझीस सहनशीलता दाखवत राहिले. त्यांचे उदाहरण सर्व ख्रिस्ती लोकांकरता अत्यंत अनुकरणीय आहे कारण आपल्या सर्व उपासकांनी इतरांशी वागताना सहनशील असावे अशी अपेक्षा यहोवा त्यांच्याकडून करतो.

२. “सहनशीलता” याकरता असलेल्या ग्रीक शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे आणि तो काय सूचित करतो?

“सहनशीलता” याकरता असलेल्या ग्रीक शब्दाचा शब्दशः अर्थ “आत्म्याची दीर्घता” असा आहे. इंग्रजीतील नवे जग भाषांतर यात या शब्दाचे दहा ठिकाणी “सहनशीलता,” तीन ठिकाणी “धीर” आणि एका ठिकाणी “धीर धरणे” असे भाषांतर करण्यात आले आहे. इब्री व ग्रीक या दोन्ही भाषांत “सहनशीलता” याकरता असलेल्या शब्दांत धीर, संयम आणि मंदक्रोध या अर्थछटांचा समावेश आहे.

३. सहनशीलतेच्या बाबतीत ख्रिस्ती लोकांचा दृष्टिकोन पहिल्या शतकातील ग्रीक लोकांच्या मतांपेक्षा कशाप्रकारे वेगळा होता?

पहिल्या शतकातील ग्रीक लोकांत सहनशीलता हा सद्‌गुण समजला जात नव्हता. स्तोईक तत्त्वज्ञान्यांनी तर हा शब्द कधीही उपयोगात आणला नाही. बायबल अभ्यासक विल्यम बार्कले यांच्यानुसार, सहनशीलता “ग्रीक मानसिकतेनुसार सद्‌गुणाच्या अगदी उलट आहे.” कारण ग्रीकांच्या मते “कोणत्याही प्रकारचा अपमान किंवा अन्याय खपवून न घेणे” हा खरा सद्‌गुण आहे. बार्कले पुढे म्हणतात: “ग्रीकांच्या मते, आदर्श पुरुष तोच की जो अन्यायाचा कोणत्याही किंमतीवर बदला घेतो. पण ख्रिस्ती लोकांच्या मते आदर्श पुरुष तोच, जो बदला घेणे शक्य असूनही तसे करत नाही.” ग्रीकांच्या मते कदाचित सहनशीलता दुर्बल व्यक्‍तिमत्त्वाचे लक्षण असावे, पण इतर बऱ्‍याच गोष्टींप्रमाणेच या संदर्भात देखील “देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे; आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे.”—१ करिंथकर १:२५.

ख्रिस्ताच्या सहनशीलतेचा आदर्श

४, ५. येशूने आपल्यापुढे सहनशीलतेचा उत्कृष्ट आदर्श कशाप्रकारे ठेवला?

यहोवाच्या पाठोपाठ सहनशीलतेचा सर्वात उत्तम आदर्श ख्रिस्त येशूचाच आहे. भयंकर दबावाखाली असताना देखील येशूने दाखवलेला संयम आश्‍चर्यचकित करणारा आहे. त्याच्याविषयी असे भाकीत करण्यात आले होते: “त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंडसुद्धा उघडिले नाही; वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्‍यापुढे गप्प राहणाऱ्‍या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडिले नाही.”—यशया ५३:७.

पृथ्वीवरील आपल्या सेवेच्या सबंध काळात येशूने किती उल्लेखनीय सहनशीलता बाळगली! त्याच्या शत्रूंनी कपटीपणे त्याला प्रश्‍न विचारले व त्याच्या विरोधकांनी त्याचा अपमान केला तेव्हा त्याने संयम सोडला नाही. (मत्तय २२:१५-४६; १ पेत्र २:२३) त्याचे शिष्य, सर्वात श्रेष्ठ कोण यावरून सतत आपसांत भांडायचे तरीसुद्धा येशू त्यांच्याशी अत्यंत सहनशीलतेने वागला. (मार्क ९:३३-३७; १०:३५-४५; लूक २२:२४-२७) तसेच, त्याला धरून देण्यात आले त्या रात्री पेत्र व योहान यांना “जागृत राहा” असे सांगितल्यावरही ते झोपी गेले तेव्हा येशूने त्यांच्याप्रती दाखवलेला आत्मसंयम खरोखर प्रशंसनीय नाही का?—मत्तय २६:३६-४१.

६. येशूच्या सहनशीलतेपासून पौलाला कशाप्रकारे फायदा झाला आणि यावरून आपण काय शिकतो?

मृत्यू व पुनरुत्थान झाल्यानंतरही येशू सहनशीलतेने वागला. खासकरून प्रेषित पौलाला याचा अनुभव आला कारण पूर्वी तो ख्रिस्ती लोकांना छळणारा होता. पौलाने लिहिले: “ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला, हे वचन विश्‍वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे; त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्‍वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली.” (१ तीमथ्य १:१५, १६) आपला गतकाळ कसाही असो, पण जर आपण येशूवर विश्‍वास ठेवला तर तो आपल्याला देखील सहनशीलता दाखवेल; अर्थात यासोबत तो “पश्‍चात्तापास शोभतील अशी कृत्ये” करण्याची आपल्याकडून अपेक्षा देखील करेल. (प्रेषितांची कृत्ये २६:२०; रोमकर २:४) ख्रिस्ताने आशिया मायनर येथील सात मंडळ्यांना पाठवलेल्या संदेशांतून हेच दिसून येते, की तो सहनशील असला तरीसुद्धा सुधारणा करावी अशी निश्‍चितच अपेक्षा करतो.—प्रकटीकरण, अध्याय २ व.

आत्म्याचे एक फळ

७. सहनशीलता व पवित्र आत्मा कशाप्रकारे संबंधित आहेत?

गलतीकरांना लिहिलेल्या पाचव्या अध्यायात पौलाने देहाच्या कर्मांसोबत आत्म्याच्या फळाची तुलना केली. (गलतीकर ५:१९-२३) सहनशीलता यहोवाच्या गुणांपैकी एक असल्यामुळे तोच तिचा उगम आहे व त्याच्या आत्म्याच्या फळात तिचा समावेश आहे. (निर्गम ३४:६, ७) किंबहुना, “प्रीति, आनंद, शांती, . . . ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” या आत्म्याच्या फळातील गुणांचा उल्लेख करताना पौलाने सहनशीलतेला चवथे स्थान दिले. (गलतीकर ५:२२, २३) देवाचे सेवक त्याच्यासारखाच धीर अथवा सहनशीलता दाखवतात तेव्हा ते पवित्र आत्म्याच्या प्रभावामुळे असे करतात.

८. सहनशीलतेसहित, आत्म्याचे फळ उत्पन्‍न करण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

अर्थात यहोवा कोणा व्यक्‍तीवर आपला आत्मा जबरदस्तीने लादत नाही. त्याच्या आत्म्याच्या प्रभावाला आपण स्वेच्छेने वश झाले पाहिजे. (२ करिंथकर ३:१७; इफिसकर ४:३०) आत्म्याच्या फळातील सर्व गुण संपादन करण्याद्वारे आपण पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात कार्य करू देतो. देहाची कर्मे व आत्म्याच्या फळाचा उल्लेख केल्यानंतर पौलाने पुढे म्हटले: “आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.” (गलतीकर ५:२५; ६:७, ८) सहनशीलता उत्पन्‍न करण्यात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपण पवित्र आत्मा ख्रिस्ती व्यक्‍तींत उत्पन्‍न करत असलेले बाकीचे गुण देखील संपादन केले पाहिजेत.

“प्रीति सहनशील आहे”

९. “प्रीति सहनशील आहे” असे पौलाने करिंथकरांना का सांगितले असावे?

“प्रीति सहनशील आहे,” असे म्हणताना पौलाने दाखवले की प्रीति आणि सहनशीलता यात एक खास संबंध आहे. (१ करिंथकर १३:४) बायबल अभ्यासक ॲल्बर्ट बार्न्स यांनी असे सुचवले की करिंथ येथील ख्रिस्ती मंडळीत असलेले मतभेद व संघर्ष यांमुळे पौलाने या गोष्टीवर जोर दिला. (१ करिंथकर १:११, १२) बार्न्स सांगतात: “[सहनशीलतेकरता] या ठिकाणी वापरलेला शब्द उतावीळपणाच्या: अर्थात असंयमी बोल व कृती तसेच चिडचिडेपणाच्या विरुद्धार्थी आहे. कोणी छळल्यास किंवा चिडवल्यास बराच काळ सहन करण्यास समर्थ असलेल्या मनःस्थितीला हा शब्द सूचित करतो.” प्रीती व सहनशीलता ख्रिस्ती मंडळीच्या शांतीला मोठा हातभार लावतात.

१०. (अ) प्रीती आपल्याला सहनशील असण्यास कशाप्रकारे मदत करते आणि प्रेषित पौल यासंबंधात काय सल्ला देतो? (ब) देवाच्या सहनशीलतेविषयी व परोपकाराविषयी एक बायबल अभ्यासक काय विवेचन करतात? (तळटीप पाहा.)

१० “प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीति . . . स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही.” अशारितीने, प्रीती आपल्याला सहनशील असण्यास बऱ्‍याच मार्गांनी मदत करते. * (१ करिंथकर १३:४, ५) आपल्याठायी प्रीती असल्यास आपण एकमेकांच्या चुका सहन करू शकतो आणि आपण सर्वच अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्या सर्वांमध्ये काही न काही दोष व कमतरता आहेत हे आठवणीत ठेवू शकतो. तसेच प्रीती आपल्याला विचारशील आणि क्षमाशील असण्यास साहाय्य करते. प्रेषित पौल आपल्याला असे प्रोत्साहन देतो की “पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या; आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा.”—इफिसकर ४:१-३.

११. ख्रिस्ती समूहांत सहनशीलता खासकरून महत्त्वपूर्ण का आहे?

११ ख्रिस्ती लोकांचे समूह मग ते मंडळ्यांच्या रूपात असोत किंवा बेथेल गृहे, मिशनरी गृहे, बांधकाम गट किंवा प्रशालांच्या रूपात असोत, त्यांच्या सदस्यांच्या सहनशीलतेमुळेच त्यांच्यात शांती व आनंद राहू शकतो. वेगवेगळी व्यक्‍तिमत्त्वे, आवडीनिवडी, लहानपणीचे संस्कार, सभ्यतेविषयी किंवा स्वच्छतेविषयी वेगवेगळे विचार यांसारख्या कारणांमुळे वेळोवेळी लहानमोठ्या तक्रारी होणे साहजिक आहे. कुटुंबातही हेच घडू शकते. तेव्हा, मंदक्रोध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (नीतिसूत्रे १४:२९; १५:१८; १९:११) सहनशीलतेने, म्हणजेच संयमाने धीर धरणे व सुधारणेची आशा करत राहणे सर्वांकरता गरजेचे आहे.—रोमकर १५:१-६.

सहनशीलता आपल्याला धीर धरण्यास मदत करते

१२. कठीण परिस्थितीत सहनशीलता का महत्त्वाची आहे?

१२ कधीकधी काही कठीण परिस्थितींचा अंतच नाही किंवा त्यांवर काही तत्कालिक उपायच नाही असे भासते; अशा परिस्थितीत सहनशीलता आपल्याला धीर धरण्यास मदत करते. सुरवातीला रेझीस यांचा उल्लेख करण्यात आला होता, त्यांच्याबाबतीत असेच घडले. कित्येक वर्षे त्यांची पत्नी, यहोवाची सेवा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना खीळ घालण्यासाठी त्यांना विरोध करतच राहिली. पण शेवटी एका दिवशी ती स्वतःहून त्यांच्याजवळ येऊन रडत रडत म्हणाली: “हेच सत्य आहे याची मला खात्री पटली आहे. मला मदत करा. मला बायबलचा अभ्यास करायचा आहे.” कालांतराने तिचा बाप्तिस्मा झाला व तीही एक साक्षीदार बनली. रेझीस म्हणतात: “इतकी वर्षं केलेला संघर्ष, धीर आणि सहनशीलतेला यहोवाने आशीर्वादित केले हेच यावरून सिद्ध झाले.” त्यांच्या सहनशीलतेचे त्यांना प्रतिफळ मिळाले.

१३. पौलाला धीर धरण्यास कशामुळे मदत झाली, आणि त्याचे उदाहरण आपल्याला धीर धरण्यास कशाप्रकारे मदत करू शकते?

१३ सा.यु. पहिल्या शतकात, प्रेषित पौलाने सहनशीलतेचे अनुकरणीय उदाहरण मांडले. (२ करिंथकर ६:३-१०; १ तीमथ्य १:१६) त्याच्या जीवनाच्या शेवटी शेवटी, त्याने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेला सोबती तीमथ्य याला सल्ला दिला तेव्हा त्याला स्पष्ट इशारा दिला की सर्व ख्रिस्ती लोकांना परीक्षांतून जावे लागेल. स्वतःचे उदाहरण देऊन पौलाने धीर धरण्याकरता आवश्‍यक असलेल्या काही ख्रिस्ती गुणांची शिफारस केली. त्याने लिहिले: “तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्‍वास, सहनशीलता, प्रीति, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस; मला अंत्युखियांत, इकुन्यांत व लुस्त्रांत जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस; त्या सर्वांतून प्रभूने मला सोडविले. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीमथ्य ३:१०-१२; प्रेषितांची कृत्ये १३:४९-५१; १४:१९-२२) धीर धरण्याकरता आपल्या सर्वांना विश्‍वास, प्रीती व सहनशीलता असणे आवश्‍यक आहे.

सहनशीलता धारण केलेले

१४. देवाला आवडणाऱ्‍या सहनशीलतेसारख्या गुणांची तुलना पौलाने कशासोबत केली आणि त्याने कलस्सैकर येथील ख्रिश्‍चनांना काय सल्ला दिला?

१४ प्रेषित पौलाने सहनशीलता व देवाला आवडणाऱ्‍या इतर गुणांची तुलना वस्त्रांशी केली; ख्रिस्ती लोकांनी ‘जुन्या मनुष्यांत’ असलेले गुण काढून टाकल्यानंतर चांगल्या गुणांची ही वस्त्रे धारण केली पाहिजेत. (कलस्सैकर ३:५-१०) पौलाने लिहिले: “तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करूणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.” (कलस्सैकर ३:१२-१४)

१५. ख्रिस्ती जेव्हा सहनशीलता व देवाला आवडणारे इतर गुण ‘धारण करतात’ तेव्हा काय परिणाम घडून येतात?

१५ मंडळीतील सदस्य करुणा, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता व प्रीती ‘धारण करतात’ तेव्हा त्यांना आपसांतील समस्या सोडवणे शक्य होते आणि ते ऐक्याने यहोवाच्या सेवेत वाटचाल करू शकतात. ख्रिस्ती पर्यवेक्षकांनी सहनशील असण्याची खास गरज आहे. काही प्रसंगांत त्यांना एखाद्या ख्रिस्ती बांधवाचा दोष दाखवणे भाग पडेल, हे कबूल आहे; पण हे बऱ्‍याच मार्गांनी करता येते. सर्वात उत्तम मनोवृत्ती कोणती, याचे पौलाने तीमथ्याला लिहिताना वर्णन केले होते: “सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने [“शिक्षणाच्या कलेने,” NW] दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.” (२ तीमथ्य ४:२) होय, यहोवाच्या मेंढरांना नेहमी सहनशीलतेने, आदराने व कोमलतेने वागवले गेले पाहिजे.—मत्तय ७:१२; ११:२८; प्रेषितांची कृत्ये २०:२८, २९; रोमकर १२:१०.

“सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा”

१६. “सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा” या सल्ल्याचे आपण पालन केल्यास काय घडण्याची शक्यता आहे?

१६ यहोवाने मानवजातीबद्दल सहनशीलता दाखवल्यामुळे आपल्यावर ‘सर्वांबरोबर सहनशीलतेने वागण्याची’ नैतिक जबाबदारी येते. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) याचा अर्थ, साक्षीदार नसलेले आपले कौटुंबिक सदस्य, शेजारी, सहकर्मचारी, वर्गसोबती या सर्वांसोबत आपण सहनशीलतेने वागले पाहिजे. सहकर्मचाऱ्‍यांकडून व शाळासोबत्यांकडून खोचक विधाने किंवा उघड विरोध कधीकधी वर्षानुवर्षे निमूटपणे सहन केल्यामुळे, या लोकांच्या मनातील बरेच गैरसमज दूर करण्यात साक्षीदारांना शेवटी यश आल्याची अनेक उदाहरणे आहेत. (कलस्सैकर ४:५, ६) प्रेषित पेत्राने लिहिले: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्‍यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हांविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.”—१ पेत्र २:१२.

१७. आपण यहोवाच्या प्रीतीचे व सहनशीलतेचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो आणि आपण असे का केले पाहिजे?

१७ यहोवाच्या सहनशीलतेमुळे कोट्यवधी लोकांना तारण प्राप्त होईल. (२ पेत्र ३:९, १५) यहोवाच्या प्रीतीचे व सहनशीलतेचे अनुकरण केल्यास, आपण धीराने देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत राहू व ख्रिस्ताच्या राज्य शासनाच्या अधीन होण्याकरता लोकांना शिक्षण देत राहू. (मत्तय २८:१८-२०; मार्क १३:१०) आपण प्रचार करण्याचे थांबवल्यास याचा असा अर्थ होईल जणू यहोवाने आता अधिक सहनशीलता दाखवू नये असे आपण सुचवत आहोत; तसेच, लोकांना पश्‍चात्ताप करण्याची संधी मिळावी हा यहोवाच्या सहनशीलतेचा उद्देश आहे हे आपल्याला समजलेले नाही असा याचा अर्थ होईल.—रोमकर २:४.

१८. पौलाने कलस्सैकरांसाठी काय प्रार्थना केली?

१८ आशिया मायनर येथील कलस्सैच्या ख्रिस्ती बांधवांना लिहिलेल्या पत्रात पौलाने असे म्हटले: “आम्हीहि ते ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्‍यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे; अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धि व्हावी; सर्व प्रकारचा धीर व सहनशक्‍ति ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे.”—कलस्सैकर १:९-११.

१९, २०. (अ) यहोवाने आजपर्यंत दाखवलेली सहनशीलता आपल्याला एक परीक्षा वाटू नये म्हणून आपण काय करू शकतो? (ब) आपण सहनशील राहिल्यास कोणते फायदे मिळतील?

१९ जर आपण यहोवाच्या ‘इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरलेले’ असू तर त्याने आजपर्यंत दाखवलेली सहनशीलता किंवा संयम आपल्याकरता एक परीक्षा ठरणार नाही कारण “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे,” अशी त्याची इच्छा आहे हे आपण ओळखू. (१ तीमथ्य २:४) आपण ‘प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ’ देत राहू, खासकरून, ‘राज्याच्या सुवार्तेचा’ प्रचार करत राहू. (मत्तय २४:१४) जर आपण विश्‍वासूपणे हे कार्य करत राहिलो, तर यहोवा आपल्याला “सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ” करेल जेणेकरून “सर्व प्रकारचा धीर व सहनशक्‍ति ही [आपल्याला] आनंदासह प्राप्त व्हावी.” आणि असे घडल्यास साहजिकच आपण यहोवाला ‘शोभेल असे वागू’ आणि त्याला ‘सर्वप्रकारे संतोषवीत’ असल्याच्या जाणिवेने आपल्याला शांती प्राप्त होईल.

२० यहोवा सहनशीलता दाखवतो यामागे त्याची अगाध बुद्धी आहे याची आपण पूर्ण खात्री बाळगू या. त्याची सहनशीलता आपल्याला आणि आपल्या प्रचार व शिक्षणाला प्रतिसाद देणाऱ्‍या सर्वांना तारण मिळवून देईल. (१ तीमथ्य ४:१६) आत्म्याचे फळ उत्पन्‍न केल्यामुळे, प्रीती, परोपकार, चांगुलपणा, सौम्यता आणि आत्मसंयम यांसारखे गुण आपल्याला आनंदाने सहन करण्यास साहाय्य करतील. यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत तसेच मंडळीतील भाऊबहिणींसोबत शांतीने राहणे शक्य होईल. सहनशीलता आपल्याला सहकर्मचाऱ्‍यांबरोबर किंवा शाळासोबत्यांबरोबर धीराने वागण्यास मदत करेल. आणि आपल्या सहनशीलतेमुळे एक उद्देश साध्य होईल, अर्थात, अधर्मी लोकांचा बचाव आणि सहनशील देव यहोवा याचे गौरव.

[तळटीप]

^ “प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे” या विधानाविषयी बायबल अभ्यासक गॉर्डन डी. फी यांनी असे लिहिले आहे: “पौलाच्या धर्मशास्त्रात [सहनशीलता आणि परोपकार किंवा ममता] मानवांप्रती देवाच्या मनोवृत्तीचे दोन पैलू आहेत. (पडताळा रोम. २:४) एकीकडे मानवाच्या विद्रोहाबद्दल आपला क्रोध आवरणाऱ्‍या देवाचा प्रेमळ संयम दिसून येतो; तर दुसरीकडे सहस्र मार्गांनी आपल्यावर दया करण्याद्वारे त्याचा परोपकारीपणा दिसून येतो. अशारितीने पौलाचे प्रीतीचे वर्णन देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या या दोन पैलूंच्या वर्णनाने सुरू होते; ख्रिस्ताला पाठवून त्याने आपला संयम व्यक्‍त केला आहे आणि त्याच्या न्यायदंडास पात्र असणाऱ्‍यांवर तो उपकार करतो.”

तुम्ही समजावू शकता का?

• ख्रिस्ताने कोणकोणत्या मार्गांनी सहनशीलतेचे उत्तम उदाहरण ठेवले?

• सहनशीलता उत्पन्‍न करण्यास आपल्याला कशामुळे साहाय्य होईल?

• सहनशीलतेमुळे कुटुंबांना, ख्रिस्ती समूहांना व वडिलांना कशाप्रकारे मदत होते?

• आपण सहनशीलता बाळगल्यास आपल्याला व इतरांना कोणते फायदे मिळतील?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

भयंकर दबावाखाली असताना देखील येशू आपल्या शिष्यांसोबत संयमाने वागला

[१६ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती पर्ववेक्षकांना बांधवांसोबत वागताना सहनशीलतेचा उत्तम आदर्श मांडण्याचे प्रोत्साहन दिले जाते

[१७ पानांवरील चित्र]

आपण यहोवाच्या प्रीतीचे व सहनशीलतेचे अनुकरण केल्यास सुवार्तेचा प्रचार करण्याचे थांबवणार नाही

[१८ पानांवरील चित्र]

पौलाने प्रार्थना केली की ख्रिस्ती लोकांनी “आनंदासह” सहनशीलता दाखवावी