नोहाचा विश्वास जगाला दोषी ठरवतो
नोहाचा विश्वास जगाला दोषी ठरवतो
संपूर्ण पृथ्वीवर आलेल्या जलप्रलयातून जीवन वाचवण्यासाठी जहाज बांधणाऱ्या नोहा या देवभीरू मनुष्याचे नाव तुम्ही कधी ऐकले होते का? ही गोष्ट अगदी प्राचीन काळची असली तरी कोट्यवधी लोकांच्या परिचयाची आहे. परंतु, लोकांना एक गोष्ट मात्र कळत नाही, की नोहाच्या जीवनाचा आपल्याकरता अर्थ आहे.
हजारो वर्षांपूर्वीच्या जुन्या अहवालात आपण रस का घेतला पाहिजे? नोहाच्या आणि आपल्या परिस्थितीत काही साम्य आहे का? असल्यास, आपण त्याच्या उदाहरणातून काय शिकू शकतो?
नोहाच्या दिवसांतील जग
बायबलच्या कालगणनेनुसार, नोहाचा जन्म सा.यु.पू. २९७० मध्ये म्हणजे आदामाच्या मृत्यूनंतर १२६ वर्षांनी झाला. नोहाच्या दिवसांपर्यंत पृथ्वीवर सर्वत्र हिंसा वाढली होती; आदामाच्या वंशजांपैकी बहुतेकांनी त्यांचा जनक आदाम, याच्या स्वार्थी जीवनाचे अनुकरण करण्याची निवड केली होती. त्यामुळे, “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले.”—उत्पत्ति ६:५, ११, १२.
मानवाने बंड केले म्हणून केवळ यहोवा नाराज झाला नव्हता. उत्पत्तीचा अहवाल पुढे म्हणतो: “मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी [“खऱ्या देवाच्या पुत्रांनी,” NW] पाहिले, व त्यांतल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. . . . त्या काळी भूतलावर महाकाय होते; पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांस पुत्र झाले, ते प्राचीन काळचे महावीर [“नेफिलीम,” NW] असून नामांकित पुरुष होऊन गेले.” (उत्पत्ति ६:२-४) या वचनांची तुलना प्रेषित पेत्राने जे म्हटले त्या वाक्याशी केल्यावर असे सूचित होते, की ‘खऱ्या देवाचे पुत्र’ हे आज्ञाभंजक देवदूत होते. नेफिलीम ही बंडखोर देवदूतांनी मानवरूप धारण करून स्त्रियांबरोबर अनैतिक लैंगिक संबंध ठेवल्यानंतर उत्पन्न झालेली संकरित संतती होती.—१ पेत्र ३:१९, २०.
“नेफिलीम” याचा अर्थ “पाडणारे” असा होतो व तो, इतरांना पाडणाऱ्या लोकांना लागू होतो. हे नेफिलीम धाकधपटशा करणारे गुंडप्रवृत्तीचे होते आणि त्यांच्या कामासक्त पित्यांच्या पापांची तुलना सदोम व गमोरातील लैंगिक विकृतींशी करण्यात आली आहे. (यहूदा ६, ७) नोहा आणि सदोम व गमोरा या दोन्ही काळच्या लोकांमुळे पृथ्वीवर दुष्टाई अतिशय वाढली होती.
“आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान”
दुष्टाई प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे देवाने मानवजातीचा नाश करण्याचा निश्चय केला. परंतु, ईश्वरप्रेरित अहवाल म्हणतो: “नोहावर परमेश्वराची कृपादृष्टि होती. . . . नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.” (उत्पत्ति ६:८, ९) केवळ नाशास पात्र असलेल्या अभक्त जगात ‘देवाबरोबर चालणे’ कसे शक्य होते?
नोहा आपला पिता लामेख याच्याकडून बरेच काही शिकला असेल, यात काही शंका नाही. लामेख देखील देवाचा एक विश्वासू सेवक होता व तो आदामाच्या काळातला होता. लामेखने आपल्या पुत्राचे नाव नोहा (म्हणजे “आराम” किंवा “सांत्वन” असा अर्थ असल्याचे समजले जाते) ठेवताना अशी भविष्यवाणी केली: “जी भूमि परमेश्वराने शापिली तिच्यासंबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट याविषयी हा आमचे सांत्वन करील.” भूमीला दिलेला शाप यहोवाने काढून टाकला तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झाली.—उत्पत्ति ५:२९; ८:२१.
पालक देवभीरू आहेत याचा अर्थ त्यांची मुले देखील आध्यात्मिक मनोवृत्तीची असतील याची शाश्वती नसते; कारण, प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून यहोवाबरोबर नातेसंबंध जोडला पाहिजे. देवाची संमती असलेल्या मार्गाचे आचरण करण्याद्वारे नोहा “देवाबरोबर चालला.” नोहा देवाबद्दल ज्या गोष्टी शिकला होता त्यामुळे देवाची सेवा करण्यास तो प्रवृत्त झाला. ‘ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी प्रलयाचे पाणी आणून नाहीसे’ करण्याचा आपला उद्देश आहे असे देवाने नोहाला सांगितले तेव्हा नोहाचा विश्वास डगमगला नाही.—उत्पत्ति ६:१३, १७.
हा अभूतपूर्व नाश जरूर येईल असा विश्वास बाळगूनच नोहाने, “तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर; त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव” या यहोवाने दिलेल्या आज्ञेचे पालन केले. (उत्पत्ति ६:१४) तारू किंवा जहाज बांधण्याविषयी देवाने दिलेल्या सूचना पाळणे म्हणजे तोंडाची गोष्ट नव्हती. तरीसुद्धा, “नोहाने तसे केले.” खरे तर “देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्पत्ति ६:२२) आपली पत्नी, तीन पुत्र शेम, हाम व याफेथ आणि त्यांच्या बायका यांच्या साहाय्याने नोहाने हे काम पार पाडले. नोहाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल यहोवाने त्याला आशीर्वाद दिला. आज सर्व कुटुंबांसाठी किती हे उत्तम उदाहरण!
जहाज बांधण्यात काय काय समाविष्ट होते? यहोवाने नोहाला, जलरोधक, तिमजली, कप्पे असलेले, सुमारे १३३ मीटर लांब, २२ मीटर रुंद आणि १३ मीटर उंच असे एक जहाज बांधायला सांगितले. (उत्पत्ति ६:१५, १६) या जहाजाची क्षमता, आधुनिक दिवसांतील विविध मालवाहू जहाजांच्या क्षमतेइतकीच असली असावी.
किती प्रचंड प्रकल्प होता हा! इतके मोठे जहाज बांधण्याकरता साहजिकच, हजारो वृक्ष तोडून जिथे जहाज बांधले जाणार होते त्या ठिकाणी ते आणायचे होते आणि मग त्यांच्या फळ्या किंवा तुळया कापायच्या होत्या. सुरवातीला त्यांना परांची बनवावी लागली असेल, खिळे, खुंट्या बनवाव्या लागल्या असतील, जहाज जलरोधक करण्याकरता डांबर मिळवावा लागला असेल, वेगवेगळे पात्र, साधने बनवावी लागली असतील. या कामासाठी त्यांना व्यापाऱ्यांबरोबर काही बोलाचाल करावी लागली असेल, वस्तू व कामे करवून घेण्यासाठी पैसे मोजावे लागले असतील. फळ्या, तुळया अचूकपणे जोडण्याकरता, बसवण्याकरता आणि भक्कम असे जहाज
बनवण्याकरता सुतारकामात निष्णात असण्याची गरज होती. आणि विचार करा, जहाज बांधायचे हे काम सुमारे ५० किंवा ६० वर्ष चालले!त्यानंतर, पुरेसे अन्न आणि चारा यांचा साठा करण्याकडेसुद्धा नोहाला लक्ष द्यावे लागले असावे. (उत्पत्ति ६:२१) त्याला, सर्व प्रकारचे प्राणी गोळा करून मग जहाजात त्यांना शिस्तीने आत न्यावे लागले असेल. देवाने आज्ञा केल्याप्रमाणे नोहाने सर्व काही करून काम संपविले. (उत्पत्ति ६:२२) यहोवाच्या आशीर्वादाने सर्व काम यशस्वी झाले.
“नीतिमत्त्वाचा उपदेशक”
नोहाला जहाज बांधण्याव्यतिरिक्त लोकांना नाशाची सूचना देखील द्यायची होती; “नीतिमत्त्वाचा उपदेशक” म्हणून तो विश्वासूपणे देवाची सेवा करत राहिला. परंतु, ‘जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत लोकांनी लक्ष दिले नाही.’—२ पेत्र २:५; मत्तय २४:३८, ३९, NW.
त्या काळातील लोकांच्या आध्यात्मिक व नैतिक स्थितीचा विचार केल्यावर आपल्याला समजून येईल, की शंकेखोर शेजारी नोहाच्या कुटुंबाला पाहून हसत असावेत, त्यांची थट्टा व टीका करत असावेत. लोकांनी त्यांना वेड्यात काढले असावे. पंरतु, नोहाचे कुटुंब या अभक्त लोकांप्रमाणे हिंसक, अनैतिक, बंडखोर बनले नाही, यावरून हे सिद्ध होते की नोहा आपल्या कुटुंबाला आध्यात्मिक प्रोत्साहन व आधार देण्यात शंभर टक्के यशस्वी ठरला. त्याच्या वागण्यावरून व बोलण्यावरून व्यक्त झालेल्या त्याच्या विश्वासाद्वारे नोहाने त्या काळच्या जगाला दोषी ठरवले.—इब्री लोकांस ११:७.
जलप्रलयातून बचाव
पावसाला सुरवात होण्याच्या काही दिवस आधी देवाने नोहाला पूर्ण झालेल्या जहाजात जायला सांगितले. नोहा आपल्या कुटुंबासह व प्राण्यांसह जहाजात गेल्यावर “परमेश्वराने त्याला आत बंद केले,” व एकप्रकारे थट्टा करणाऱ्यांची तोंडे देखील बंद केली. जलप्रलय आला तेव्हा अवज्ञाकारी देवदूतांनी आपली मानव शरीरे टाकून पुन्हा आत्मिक शरीरे धारण केली व नाशापासून निसटले. पण इतरांचे काय झाले? नेफिलीमसह जहाजाबाहेर असलेल्या हरएक जिवंत प्राण्याचा नाश झाला! फक्त नोहा आणि त्याचे कुटुंब वाचले.—उत्पत्ति ७:१-२३.
नोहा आणि त्याचे कुटुंब जहाजात एक चान्द्र वर्ष आणि दहा दिवस होते. प्राण्यांना खाऊ-पिऊ घालण्यात, त्यांची घाण काढण्यात आणि वेळेची नोंद ठेवण्यात ते व्यस्त होते. जहाजाच्या नोंदवहीत जशी आपल्याला त्याच्या प्रवासाची अचूक माहिती मिळते त्याचप्रमाणे उत्पत्तीच्या पुस्तकात, जलप्रलयाच्या टप्प्या टप्प्याने घडलेल्या घटनांची स्पष्ट माहिती दिली आहे.—उत्पत्ति ७:११, १७, २४; ८:३-१४.
जहाजात असताना, नोहाने निश्चितच आपल्या कुटुंबाबरोबर
आध्यात्मिक गोष्टींची चर्चा केली असेल, देवाचे आभार मानले असतील. नोहा आणि त्याच्या कुटुंबामुळेच तर जलप्रलयाआधीचा इतिहास शाबूत राहिला. विश्वसनीय मौखिक परंपरा किंवा त्यांच्याजवळ असलेल्या लिखित ऐतिहासिक हस्तलिपी यांवर ते जलप्रलयादरम्यान विचारविनिमय करू शकले असावेत; आणि यामुळे त्यांना लाभ झाला असावा.नोहा आणि त्याच्या कुटुंबाला पुन्हा एकदा कोरड्या जमिनीवर पाय ठेवण्यास किती आनंद झाला असेल! सर्वात आधी त्याने एक वेदी उभारली आणि आपल्या कुटुंबाचा याजक बनून ज्याने त्यांना वाचवले होते त्याच्यासाठी होमार्पण केले.—उत्पत्ति ८:१८-२०.
“नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे”
येशू ख्रिस्त म्हणाला: “नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.” (मत्तय २४:३७) नोहाप्रमाणेच आजही ख्रिस्ती लोक नीतिमत्त्वाचे उपदेशक आहेत; लोकांना पश्चात्ताप करायला ते आर्जवतात. (२ पेत्र ३:५-९) ही साम्यता गृहीत धरून आपण विचार करू शकतो, की जलप्रलय येण्याच्या आधी नोहाच्या मनात कोणकोणते प्रश्न आले असावेत. आपले प्रचार कार्य निरर्थक आहे असे त्याला कधी वाटले असेल का? कधीकधी त्याला प्रचार करायचा कंटाळा येत असावा का? बायबल असे काही सांगत नाही. बायबलमध्ये आपल्याला फक्त इतकेच सांगितले आहे, की नोहाने देवाची आज्ञा पाळली.
नोहाच्या आणि आपल्या परिस्थितीत तुम्हाला काही साम्यता आढळते का? विरोधात व संकटातही त्याने यहोवाची आज्ञा पाळली. म्हणूनच तर यहोवाने त्याला धार्मिक लेखले. यहोवा देव जलप्रलय नक्की केव्हा आणेल हे नोहाच्या कुटुंबाला माहीत नव्हते परंतु जलप्रलय नक्की येईल याची त्यांना पक्की खात्री होती. कष्टमय वर्षांत टिकून राहण्यास व निरर्थक वाटणारा प्रचार करत राहण्यास देवावरील विश्वासाने नोहाला साहाय्य केले. म्हणूनच आपल्याला असे सांगण्यात येते, की: “जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्त्व त्याचा तो वतनदार झाला.”—इब्री लोकांस ११:७.
नोहाने असा विश्वास कोठून मिळवला होता? यहोवाविषयी त्याला जी काही माहिती होती त्यावर मनन करण्यास त्याने निश्चितच वेळ काढला आणि या माहितीनुसार त्याने स्वतःला मार्गदर्शित केले. नोहाने प्रार्थनेद्वारे देखील देवाशी संवाद केला. खरे तर, यहोवाशी त्याचा इतका घनिष्ट परिचय झाला की तो ‘देवाबरोबर चालला.’ कुटुंब प्रमुख या नात्याने नोहाला आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यास, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास आनंद वाटत होता. आपल्या पत्नीच्या, आपल्या तीन मुलांच्या व तीन सुनांच्या आध्यात्मिकतेकडे लक्ष देण्यात तो आनंदी होता.
नोहाप्रमाणे आज खऱ्या ख्रिश्चनांना माहीत आहे, की यहोवा देव फार लवकर या अभक्त व्यवस्थीकरणाचा अंत करणार आहे. तो कोणत्या दिवशी, कोणत्या घडीला नाश आणणार हे आपल्याला माहीत नाही; परंतु आपल्याला याची जाणीव आहे, की या ‘नीतिमत्त्वाच्या उपदेशकाच्या’ विश्वासाचे व आज्ञाधारकतेचे अनुकरण केल्यास आपल्या ‘जीवाचे तारण’ होईल.—इब्री लोकांस १०:३६-३९.
[२९ पानांवरील चौकट]
प्रलय खरोखरच आला होता का?
मानववंशशास्त्रज्ञांनी जवळजवळ सर्व जाती व राष्ट्रांतून निदान २७० जलप्रलयाच्या दंतकथा गोळा केल्या आहेत. क्लॉस वेस्टरमन नामक विद्वान म्हणतात: “जलप्रलयाची कथा संपूर्ण जगभरात सांगितली जाते. सृष्टीच्या कथेनुसार, जलप्रलयाची कथा ही आपल्या मूलभूत सांस्कृतिक वारशाचा हिस्सा आहे. सबंध पृथ्वीवर आपल्याला अतिप्राचीन प्रलयाच्या कथा ऐकायला मिळतात, ही गोष्ट किती अचंबित करणारी आहे.” याचे कारण काय असावे? एनरिको गॅलबीटी नामक एक विवेचनकर्ता म्हणतात: “संपूर्ण पृथ्वीवरील वेगवेगळ्या आणि इतरत्र विखुरलेल्या लोकांमध्ये जलप्रलयाचा विश्वास परंपरांच्या मुळाशी असलेल्या ऐतिहासिक वास्तविकतेचे सूचक आहे.” परंतु, विद्वानांच्या विवेचनांपेक्षा, येशू ख्रिस्ताने स्वतः जलप्रलयाच्या घटनेचा उल्लेख केला, ही गोष्ट ख्रिश्चनांना महत्त्वपूर्ण वाटते.—लूक १७:२६, २७.
[३० पानांवरील चौकट]
दंतकथेतील नेफिलीम?
देवता आणि मानव यांचे मिलन आणि त्यांच्या मिलनातून जन्मलेले—“वीर” अथवा “गंधर्व”—यांच्या दंतकथांचा उल्लेख ग्रीक, ईजिप्त, युगारिटीक, हरीयन आणि मेसोपोटेमियन लोकांच्या दंतकथांमध्ये असल्यामुळे तेथील लोकांना या दंतकथा परिचयाच्या आहेत. ग्रीक दंतकथांमधील दैवतांना मानवी शरीरे होती व ते अतिशय सुंदर होते. ते खायचे, प्यायचे, झोपायचे, संभोग करायचे, युद्ध करायचे, झगडायचे, फसवायचे आणि बलात्कारही करायचे. त्यांना पवित्र समजले जात असले तरी फसवेगिरी आणि गुन्हेगारी करण्याची विकृती त्यांच्याजवळ होती. असे म्हटले जाते, की अकिलीझ सारख्या वीरांचा दैवी तसेच मानवी उगम होता आणि त्याच्याजवळ अलौकिक क्षमता होती परंतु त्याला अमरत्व देण्यात आले नव्हते. तेव्हा, नेफिलिमविषयी उत्पत्तीच्या पुस्तकातील अहवाल आपल्याला अशा दंतकथांचा उगम काय असला असावा किंवा काय असला असेल याची स्पष्ट माहिती देतो.