व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपला आश्रय आहे

यहोवा आपला आश्रय आहे

यहोवा आपला आश्रय आहे

‘परमेश्‍वर माझा आश्रय आहे असे तू म्हटले . . . म्हणून कोणतेहि अरिष्ट तुझ्यावर येणार नाही.’—स्तोत्र ९१:९, १०.

१. यहोवा आपला आश्रय आहे असे आपण का म्हणू शकतो?

 यहोवा आपल्या लोकांकरता खरा आश्रय आहे. आपण त्याला पूर्णपणे समर्पित असू तर ‘आपल्यावर चोहोकडून संकटे आली तरी आपला कोंडमारा होणार नाही; घोटाळ्यात पडलो तरी निराश होणार नाही; आपला पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात येणार नाही; खाली पडलेले असलो तरी आपला नाश होणार नाही.’ का? कारण यहोवा आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देतो. (२ करिंथकर ४:७-९) होय, आपला स्वर्गीय पिता आपल्याला धार्मिक जीवन जगण्यास मदत करतो; आपण स्तोत्रकर्त्याच्या या शब्दांवर मनन करू शकतो: “परमेश्‍वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे म्हणून कोणतेहि अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीहि व्याधि तुझ्या तंबूजवळ येणार नाही.”—स्तोत्र ९१:९, १०.

२. स्तोत्र ९१ विषयी काय म्हणता येते आणि यात कोणते आश्‍वासन देण्यात आले आहे?

स्तोत्र ९१ यातील शब्द मोशेने लिहिले असण्याची शक्यता आहे. नव्वदाव्या स्तोत्राचा लेखक मोशे असल्याचे त्या स्तोत्राच्या उपरिलेखनात नमूद आहे; नव्वदाव्या स्तोत्रानंतर लगेच एक्याण्णवावे स्तोत्र सुरू होते आणि या दोन स्त्रोत्रांच्या मध्ये दुसऱ्‍या लेखकाचे नाव देण्यात आलेले नाही. ९१ स्तोत्र कदाचित ॲन्टिफोनिक पद्धतीने गायिले जात असावे; याचा अर्थ एक जण सुरवातीला गात असेल (९१:१, २) आणि त्याच्या मागून गायनसमूह गात असेल (९१:३-८). यानंतर केवळ एक जण गात असेल (९१:९अ) आणि त्याला समूह प्रतिसाद देत असेल (९१:९ब-१३). मग शेवटचे बोल एकच गायक गात असेल (९१:१४-१६). वस्तूस्थिती काहीही असो, पण ९१ वे स्तोत्र अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांच्या गटाला आध्यात्मिक सुरक्षिततेचे तसेच त्यांच्या समर्पित साथीदारांनाही सामूहिकरित्या आश्‍वासन देते. * यहोवाच्या अशा सर्व सेवकांच्या दृष्टिकोनातून आता आपण या स्तोत्राचा विचार करू या.

‘देवाच्या गुप्त स्थली’ सुरक्षित

३. (अ) ‘परात्पराचे गुप्त स्थल’ काय आहे? (ब) ‘सर्वसमर्थाच्या सावलीत राहण्याद्वारे’ आपण काय अनुभवतो?

स्तोत्रकर्ता म्हणतो: “जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. परमेश्‍वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो; तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो.” (स्तोत्र ९१:१, २) ‘परात्पराचे गुप्त स्थल’ हे आपल्याकरता एक लाक्षणिक सुरक्षास्थान आहे आणि विशेषतः अभिषिक्‍त जनांकरता कारण दियाबल त्यांना आपले खास निशाण बनवतो. (प्रकटीकरण १२:१५-१७) आध्यात्मिक अर्थाने देवाचे पाहुणे म्हणून त्याच्यासोबत वसती करणारे या नात्याने आपल्याला त्याचे संरक्षण लाभले आहे; अन्यथा सैतानाने केव्हाच आपल्या सर्वांचा नाश केला असता. ‘सर्वसमर्थाच्या सावलीत राहण्याद्वारे’ आपण देवाची सुरक्षादायक छाया किंवा सावली अनुभवतो. (स्तोत्र १५:१, २; १२१:५) आपल्या सार्वभौम प्रभू यहोवापेक्षा अधिक सुरक्षित आश्रय किंवा अधिक शक्‍तिशाली दुर्ग असूच शकत नाही.—नीतिसूत्रे १८:१०.

४. ‘पारधी’ अर्थात सैतान कोणत्या कुयुक्‍त्‌यांचा वापर करतो आणि आपण त्याच्या तावडीतून कसे सुटू शकतो?

स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो: “तो [यहोवा] पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील.” (स्तोत्र ९१:३) प्राचीन इस्राएलात पारधी सहसा पाश किंवा जाळ्यांचा उपयोग करून पक्षी धरायचे. सैतान हा देखील एक ‘पारधी’ आहे आणि त्याचे पाश म्हणजे त्याची दुष्ट संघटना आणि त्याचे ‘डावपेच.’ (इफिसकर ६:११) आपल्याला दुष्टतेकडे ओढून आध्यात्मिक दृष्टीने आपला नाश करण्यासाठी आपल्या मार्गात अनेक गुप्त पाश ठेवण्यात आले आहेत. (स्तोत्र १४२:३) पण आपण अधार्मिकतेचा अव्हेर केला असल्यामुळे ‘आपला जीव पारध्यांच्या पाशांतून मुक्‍त झालेल्या पक्ष्याप्रमाणे आहे.’ (स्तोत्र १२४:७, ८) यहोवा दुष्ट ‘पारध्यापासून’ आपली सुटका करतो याकरता आपण किती कृतज्ञ आहोत!—मत्तय ६:१३.

५, ६. कोणत्या ‘मरीमुळे’ आपल्याला “घातक” परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे, पण यहोवाचे लोक याला बळी का पडत नाहीत?

स्तोत्रकर्ता ‘घातक मरीचा’ उल्लेख करतो. साथीच्या रोगाप्रमाणे मानवी कुटुंबाकरता व यहोवाच्या सार्वभौमत्वास उंचवणाऱ्‍यांकरता “घातक” असे काहीतरी आहे. इतिहासकार आर्नोल्ड टॉइन्बी यांनी असे लिहिले: “पहिले महायुद्ध संपल्यानंतर राष्ट्रीयवादामुळे स्थानिक स्वतंत्र राष्ट्रांची संख्या दुप्पट झाली आहे.  . . मनुष्याची मानसिकता अधिकाधिक संघर्षात्मक होऊ लागली आहे.”

शतकानुशतके काही शासकांनी आंतरराष्ट्रीय द्वेषाच्या आगीत सरपण घालण्याचे काम केले आहे. विशिष्ट मूर्ती व प्रतीकांच्या माध्यमांतून त्यांची पूजा केली जावी अशीही त्यांनी मागणी केली. पण यहोवाने आपल्या विश्‍वासू लोकांना कधीही अशा ‘मरीला’ बळी पडू दिलेले नाही. (दानीएल ३:१, २, २०-२७; ६:७-१०, १६-२२) प्रेमळ आंतरराष्ट्रीय बंधुसमाजाच्या रूपात आपण यहोवाची अनन्य भक्‍ती करतो, बायबलमध्ये सांगितल्यानुसार तटस्थ राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या लोकांविषयी पूर्वग्रह न बाळगता हे मानतो की “प्रत्येक राष्ट्रात जो त्याची [देवाची] भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; निर्गम २०:४-६; योहान १३:३४, ३५; १७:१६; १ पेत्र ५:८, ९) ख्रिस्ती असल्यामुळे होणाऱ्‍या छळाच्या रूपात आपल्याला “घातक” परीक्षांना तोंड द्यावे लागते हे जरी खरे असले तरीसुद्धा आपण आनंदी आहोत आणि “परात्पराच्या गुप्त स्थली” आध्यात्मिकरित्या सुरक्षित आहोत.

७. यहोवा आपल्यावर ‘पाखर घालून’ कशाप्रकारे संरक्षण देतो?

यहोवा आपला आश्रय असल्यामुळे आपल्याला पुढील शब्दांतून सांत्वन मिळते: “तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य [“खरेपण,” NW] तुला ढाल व कवच [“तट,” NW] आहे.” (स्तोत्र ९१:४) पक्षी आपल्या पिलांवर सुरक्षा देण्यासाठी तळपत असतात त्याप्रमाणे देव आपले संरक्षण करतो. (यशया ३१:५) ‘तो आपल्यावर पाखर घालतो.’ पक्षी आपल्या पिलांवर पंख पसरून शिकारी पशूपक्ष्यांपासून त्यांचे संरक्षण करतात. लहान पिलांप्रमाणे आपण यहोवाच्या लाक्षणिक पंखांखाली सुरक्षित आहोत कारण आपण त्याच्या खऱ्‍या ख्रिस्ती संघटनेत आश्रय घेतला आहे.—रूथ २:१२; स्तोत्र ५:१, ११.

८. यहोवाचे “खरेपण” मोठ्या ढालीप्रमाणे व तटाप्रमाणे आहे असे आपण का म्हणू शकतो?

आपण ‘खरेपणावर’ किंवा विश्‍वासूपणावर भरवसा ठेवतो. ते आपल्याकरता प्राचीन काळातील ढालीसारखे आहे जी सहसा दाराच्या आकाराची असून माणसाच्या सबंध शरीराचे रक्षण करण्याइतकी मोठी असे. (स्तोत्र ५:१२) अशा संरक्षणाची खात्री असल्यामुळे आपण भयापासून मुक्‍त होतो. (उत्पत्ति १५:१; स्तोत्र ८४:११) आपल्या विश्‍वासाप्रमाणे, देवाचे खरेपण देखील एका मोठ्या संरक्षणात्मक ढालीसारखे आहे जी सैतानाच्या जळत्या बाणांपासून व शत्रूंच्या हल्ल्यांपासून आपल्याला संरक्षण देते. (इफिसकर ६:१६) ते एका तटाप्रमाणे देखील आहे अर्थात संरक्षणाकरता बांधलेल्या पक्क्या बांधाऱ्‍याप्रमाणे ज्याच्यामागे आपण धैर्याने उभे राहू शकतो.

‘आपल्याला भीती वाटणार नाही’

९. रात्रीची वेळ भयावह का असू शकते पण आपल्याला भीती का वाटत नाही?

देवाकडून मिळणाऱ्‍या सुरक्षिततेविषयी स्तोत्रकर्ता म्हणतो: “रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्‍यांची तुला भीति वाटणार नाही.” (स्तोत्र ९१:५, ६) बहुतेक दुष्कृत्ये रात्रीच्या अंधारात केली जात असल्यामुळे रात्रीची वेळ भयावह असू शकते. आज सबंध पृथ्वीवर पसरलेल्या अंधारात आपले शत्रू आपली आध्यात्मिकता नष्ट करण्यासाठी व आपले प्रचार कार्य बंद करण्यासाठी बहुतेकदा अगदी बेमालूमपणे कारवाई करतात. पण ‘आपल्याला रात्रीच्या समयीचे भय वाटणार नाही’ कारण यहोवा आपले रक्षण करतो.—स्तोत्र ६४:१, २; १२१:४; यशया ६०:२.

१०. (अ) “दिवसा सुटणारा बाण” याचा काय अर्थ असावा आणि याला आपली काय प्रतिक्रिया असते? (ब) “काळोखात फिरणारी मरी” कशाप्रकारची आहे आणि आपल्याला तिची भीती का वाटत नाही?

१० “दिवसा सुटणारा बाण” हा शाब्दिक हल्ल्यास सूचित करत असावा. (स्तोत्र ६४:३-५; ९४:२०) पण आपल्या पवित्र सेवेला केला जाणारा हा विरोध व्यर्थ ठरतो कारण सत्याविषयीची माहिती देण्यापासून आपण माघार घेत नाही. शिवाय आपल्याला ‘काळोखात फिरणाऱ्‍या मरीचीही’ भीती वाटत नाही. ही मरी लाक्षणिक असून, नैतिक व आध्यात्मिकरित्या रोगट झालेल्या व सैतानाला वश झालेल्या या जगात तिचा प्रादुर्भाव होतो. (१ योहान ५:१९) यहोवाविषयी, त्याच्या उद्देशांविषयी आणि त्याच्या प्रेमळ तरतुदींविषयी अंधारात असल्यामुळे लोकांचे मन व हृदय मेल्यागत होते. (१ तीमथ्य ६:४) या अंधकारमय वातावरणात आपल्याला भीती वाटत नाही कारण आपल्याला विपुल प्रमाणात आध्यात्मिक प्रकाश मिळत आहे.—स्तोत्र ४३:३.

११. कोणाचा ‘भर दुपारी नाश’ होतो?

११ ‘भर दुपारी नाश करणाऱ्‍या पटकीची’ देखील आपल्याला भीती वाटत नाही. “भर दुपारी” या संज्ञेतून या जगातील तथाकथित प्रबोधन सूचित होऊ शकते. जे या जगातील भौतिकवादी विचारांना बळी पडतात त्यांचा आध्यात्मिकरित्या नाश होतो. (१ तीमथ्य ६:२०, २१) आपण निर्भयतेने राज्याचा संदेश घोषित करत असताना आपल्याला कोणत्याही शत्रूंची भीती वाटत नाही कारण यहोवा आपला संरक्षक आहे.—स्तोत्र ६४:१; नीतिसूत्रे ३:२५, २६.

१२. कोणाच्या बाजूस सहस्रावधी ‘पडतात’ आणि कशाप्रकारे?

१२ स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो: “तुझ्या बाजूस सहस्रावधि पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधि पडले, तरी ती तुला भिडणार नाही; मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल.” (स्तोत्र ९१:७, ८) यहोवाला आपला आश्रय न केल्यामुळे कित्येकजण आपल्या “बाजूस” आध्यात्मिक मृत्यू होऊन ‘पडतील.’ या अर्थाने आज आध्यात्मिक इस्राएलांच्या “उजव्या हातास लक्षावधि पडले” आहेत. (गलतीकर ६:१६) आपण अभिषिक्‍तांपैकी असो वा त्यांच्या समर्पित साथीदारांपैकी देवाच्या “गुप्त स्थली” आपण सुरक्षित आहोत. आज व्यापारी, धार्मिक आणि इतर क्षेत्रांत ‘दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल आपल्या दृष्टीस पडत आहे.’—गलतीकर ६:७.

“कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही”

१३. कोणती अरिष्टे आपल्यावर येणार नाहीत आणि का?

१३ या जगातील सुरक्षितता झपाट्याने ढासळत आहे, पण आपण देवाला प्राधान्य देतो आणि स्तोत्रकर्त्याच्या या शब्दांतून धैर्य मिळवतो: “परमेश्‍वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे म्हणून कोणतेहि अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीहि व्याधि तुझ्या तंबूजवळ येणार नाही.” (स्तोत्र ९१:९, १०) होय यहोवा आपला आश्रय आहे. आपण परात्पर देवाला ‘आपले निवासस्थान’ मानतो आणि त्याच्याठायी आपल्याला सुरक्षितता मिळते. आपण विश्‍वाचा सार्वभौम म्हणून यहोवाचे गौरव करतो, त्याला आपला संरक्षक मानून त्याच्या आश्रयात ‘राहतो’ आणि त्याच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करतो. (मत्तय २४:१४) त्यामुळे ‘कोणतेही अरिष्ट आपल्यावर येणार नाही,’ अर्थात या स्तोत्रात आधी उल्लेख केलेली कोणतीही संकटे आपल्याला भेडसावणार नाहीत. इतरांप्रमाणे आपल्यावरही भूकंप, वादळे, पूर, दुष्काळ आणि युद्धजन्य समस्यांसारखी विविध संकटे कोसळतात तरीसुद्धा यामुळे आपला विश्‍वास किंवा आपली आध्यात्मिक सुरक्षितता नष्ट होत नाही.

१४. यहोवाचे सेवक या नात्याने आपल्याला घातक व्याधींचा संसर्ग का होत नाही?

१४ अभिषिक्‍त ख्रिस्तीजन या व्यवस्थीकरणात सामील न होता, तंबूंत राहणाऱ्‍या परदेशवासियांप्रमाणे आहेत. (१ पेत्र २:११) ‘कोणतीही व्याधी त्यांच्या तंबूजवळ येत नाही.’ आपली आशा स्वर्गातील असो वा पृथ्वीवरील, आपण या जगापासून वेगळे आहोत; आणि यातील अनैतिकता, भौतिकवाद, खोटा धर्म, आणि “श्‍वापद” व त्याची ‘मूर्ती’ म्हणजेच संयुक्‍त राष्ट्रसंघ यांची उपासना यांसारख्या आध्यात्मिकरित्या घातक व्याधींचा आपल्याला संसर्ग होत नाही.—प्रकटीकरण ९:२०, २१; १३:१-१८; योहान १७:१६.

१५. कोणकोणत्या बाबतींत आपण देवदूतांची मदत अनुभवतो?

१५ आपल्याला मिळणाऱ्‍या संरक्षणाबाबत स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो: “तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरितील.” (स्तोत्र ९१:११, १२) आपले रक्षण करण्याचे सामर्थ्य देवदूतांना देण्यात आले आहे. (२ राजे ६:१७; स्तोत्र ३४:७-९; १०४:४; मत्तय २६:५३; लूक १:१९) आपल्या “सर्व मार्गांत” ते आपले रक्षण करतात. (मत्तय १८:१०) राज्य उद्‌घोषक या नात्यानेही आपल्याला देवदूतांचे मार्गदर्शन आणि संरक्षण प्राप्त होते आणि त्यामुळे आध्यात्मिकरित्या आपल्याला ठेच लागत नाही. (प्रकटीकरण १४:६, ७) आपल्या कामावर आणला जाणारा प्रतिबंध व यांसारख्या ‘धोंड्यांमुळेही’ आपण कधी ठेच लागून देवाच्या कृपादृष्टीतून पडत नाही.

१६. “तरुण सिंह” व “नाग” यांची हल्ला करण्याची पद्धत कशाप्रकारे वेगवेगळी असते आणि आपण या हल्ल्यांना कशी प्रतिक्रिया दाखवतो?

१६ स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो: “तू तरुण सिंह व नाग ह्‍यांच्यावर पाय देऊन चालशील; आयाळ असलेला तरुण सिंह व मोठा सर्प ह्‍यांना तुडवीत चालशील.” (स्तोत्र ९१:१३, NW) तरुण सिंह आपल्या सावजावर थेट हल्ला करतो त्याप्रमाणे आपले काही शत्रू, आपले प्रचाराचे कार्य थांबवण्याच्या हेतूने केलेले कायदे जारी करण्याद्वारे त्यांचा विरोध अगदी उघडउघड व्यक्‍त करतात. पण कधीकधी लपलेल्या ठिकाणातून अचानक वर येणाऱ्‍या नागाप्रमाणे आपल्यावर काही अनपेक्षित हल्ले देखील होतात. पदद्याच्या मागे राहून कधीकधी पाळकवर्ग, कायदे जारी करणाऱ्‍यांच्या, न्यायाधीशांच्या व इतरांच्या माध्यमाने आपल्यावर हल्ला करतात. पण आपल्याला यहोवाचा आधार असल्यामुळे आपण शांतीपूर्ण माध्यमांनी न्यायालयांकडून साहाय्य मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि ‘सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देतो व तिचे कायदेशीर समर्थन करतो.’ (फिलिप्पैकर १:७, NW; स्तोत्र ९४:१४, २०-२२)

१७. ‘आयाळ असलेल्या तरुण सिंहाला’ आपण कशाप्रकारे तुडवतो?

१७ स्तोत्रकर्ता “आयाळ असलेला तरुण सिंह व मोठा सर्प” यांना तुडवण्याविषयी उल्लेख करतो. आयाळ असलेला तरुण सिंह अतिशय हिंस्र असतो आणि मोठे सर्प कधीकधी अतिशय महाकाय असतात. (यशया ३१:४) पण थेट हल्ला करताना हा आयाळ असलेला तरुण सिंह कितीही हिंस्र असला तरीसुद्धा सिंहासारख्या लोकांवर किंवा संस्थांवर विश्‍वास ठेवण्याऐवजी आपण देवाला आज्ञाधारक राहतो तेव्हा आपण लाक्षणिक अर्थाने त्याला पायाखाली तुडवतो. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) त्यामुळे हा भीतीदायक “सिंह” आपल्याला आध्यात्मिक इजा करत नाही.

१८. “मोठा सर्प” यावरून आपल्याला कशाची आठवण होते आणि आपल्यावर हल्ला होत असल्यास आपण काय केले पाहिजे?

१८ ग्रीक सेप्टुअजिन्ट भाषांतरात ‘मोठ्या सर्पाला’ “अजगर” म्हटले आहे. यावरून आपल्याला निश्‍चितच ‘मोठा अजगर . . . जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप’ आठवेल. (प्रकटीकरण १२:७-९; उत्पत्ति ३:१५) तो एका महाकाय सरिसृपासारखा आहे जो आपल्या सावजाला वेटोळे घालून चिरडतो व मग गिळंकृत करतो. (यिर्मया ५१:३४) सैतान आपल्याभोवती वेटोळे घालून या जगाच्या दबावाखाली आपल्याला चिरडून गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून या ‘मोठ्या सर्पाला’ पायाखाली तुडवले पाहिजे. (१ पेत्र ५:८) अभिषिक्‍त शेषवर्गाने रोमकर १६:२० याच्या पूर्णतेत सहभागी होण्याकरता नेमके हेच केले पाहिजे.

यहोवा—आपला तारणकर्ता

१९. आपण यहोवाचा आश्रय का घेतो?

१९ खऱ्‍या उपासकाविषयी स्तोत्रकर्ता देवाच्या वतीने असे म्हणतो: “माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्‍त करीन; त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन.” (स्तोत्र ९१:१४) “मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन” अर्थात, शत्रूचे हात पोचणार नाहीत अशा ठिकाणी ठेवीन. यहोवाचे उपासक या नात्याने आपण त्याचा आश्रय घेतो याचे मुख्य कारण म्हणजे आपले ‘त्याच्यावर प्रेम आहे.’ (मार्क १२:२९, ३०; १ योहान ४:१९) यामुळे देव आपल्या शत्रूंपासून ‘आपल्याला मुक्‍त करतो.’ या पृथ्वीवरून आपण कधीही नाहीसे होणार नाही. उलट, आपल्याला देवाचे नाव माहीत असल्यामुळे आणि आपण पूर्ण विश्‍वासानिशी त्याचे नाव घेत असल्यामुळे आपले तारण होईल. (रोमकर १०:११-१३) ‘यहोवाच्या नावाने सदासर्वकाळ चालण्याचा’ आपला निर्धार आहे.—मीखा ४:५, NW; यशया ४३:१०-१२.

२०. स्तोत्र ९१ च्या शेवटी यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकाला काय आश्‍वासन देतो?

२० स्तोत्र ९१ च्या शेवटी यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकाविषयी म्हणतो: “तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्‍त करीन, मी त्याला गौरव देईन; त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन.” (स्तोत्र ९१:१५, १६) आपण देवाच्या इच्छेच्या सामंजस्यात त्याच्या नावाचा धावा करतो, त्याला प्रार्थना करतो, तेव्हा तो आपल्याला उत्तर देतो. (१ योहान ५:१३-१५) सैतानाने चिथावलेल्या शत्रुत्वामुळे आपण आधीच बरेच दुःख सहन केले आहे. पण “संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन” हे शब्द आपल्याला भविष्यातील परीक्षांकरता सुसज्ज करतात आणि आपल्याला यावरून आश्‍वासन मिळते की या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश होईल तेव्हा देव आपला बचाव करेल.

२१. आता देखील अभिषिक्‍त जनांचा कशाप्रकारे गौरव झाला आहे?

२१ सैतानाकडून हिंसक विरोध होत असतानाही आपल्यामध्ये असणाऱ्‍या अभिषिक्‍त जनांची पूर्ण संख्या यहोवाच्या नियुक्‍त वेळी—पृथ्वीवरील ‘दीर्घायुष्यानंतर’ स्वर्गात गौरविली जाईल. होय देवाकडून कित्येकदा मिळालेल्या उल्लेखनीय संरक्षणामुळे आज देखील अभिषिक्‍त जनांचा आध्यात्मिक गौरव झाला आहे. आणि आज या शेवटल्या काळात पृथ्वीवर यहोवाच्या साक्षीदारांचे नेतृत्व करण्याचा केवढा विलक्षण बहुमान त्यांना लाभला आहे! (यशया ४३:१०-१२) यहोवाचे सर्वात उल्लेखनीय बचावाचे कृत्य, हर्मगिदोन या त्याच्या महान लढाईच्या वेळी घडेल जेव्हा तो आपल्या सार्वभौमत्वाचे दोषनिवारण करेल आणि आपल्या पवित्र नावाचे पवित्रीकरण करेल.—स्तोत्र ८३:१८; यहेज्केल ३८:२३; प्रकटीकरण १६:१४, १६.

२२. ‘यहोवाकडून तारण’ कोणाला मिळेल?

२२ आपण अभिषिक्‍त असो व त्यांच्या समर्पित साथीदारांपैकी असो, आपण तारणाकरता देवाचीच आस धरतो. ‘परमेश्‍वराच्या महान व भयंकर दिवशी’ त्याची एकनिष्ठतेने सेवा करणारे बचावतील. (योएल २:३०-३२) देवाच्या नव्या जगात बचावून जाणाऱ्‍या ‘मोठ्या लोकसमुदायांत’ आपल्यापैकी जे असतील आणि जे एका शेवटल्या परीक्षेतही विश्‍वासू राहतील त्यांना ‘तो दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल,’—अर्थात कधीही न संपणारे जीवन त्यांना मिळेल. देव असंख्य लोकांचे पुनरुत्थान देखील करेल. (प्रकटीकरण ७:९; २०:७-१५) येशू ख्रिस्ताद्वारे ‘आपल्याला तारणाचा अनुभव घडवण्यास’ यहोवाला खरोखर अतिशय आनंद होईल. (स्तोत्र ३:८) तर मग, आपल्यापुढे इतक्या भव्य आशा असताना आपण सदोदित त्याच्या गौरवाकरता आपले दिवस गणण्याकरता त्याची मदत मागत राहू या. आपल्या शब्दांतून व कृतींतून आपण सदोदित हे सिद्ध करत राहू या की यहोवा आपला आश्रय आहे.

[तळटीप]

^ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या लेखकांनी ९१ व्या स्तोत्राची चर्चा मशिही भविष्यवाणीच्या दृष्टिकोनातून केली नाही. अर्थात येशू ख्रिस्त मानवरूपात असताना यहोवा निश्‍चितच त्याचा आश्रय व दुर्ग होता; त्याचप्रकारे आज या ‘अंतसमयात’ तो येशूच्या अभिषिक्‍त अनुयायांचा आणि त्यांच्या समर्पित साथीदारांचाही आश्रयदुर्ग आहे.—दानीएल १२:४.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• ‘परात्पराचे गुप्त स्थल’ काय आहे?

• आपल्याला भीती का वाटत नाही?

• कोणत्या अर्थाने ‘आपल्यावर कोणतेही अरिष्ट येणार नाही’?

• यहोवा आपला तारणकर्ता आहे असे आपण का म्हणू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

यहोवाचे खरेपण आपल्याकरता मोठ्या ढालीसारखे कशाप्रकारे आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

[१८ पानांवरील चित्रे]

यहोवा आपल्या सेवकांना अनपेक्षित हल्ले व विरोध होत असतानाही त्यांची सेवा पूर्ण करण्यास मदत करतो

[चित्राचे श्रेय]

नाग: A. N. Jagannatha Rao, Trustee, Madras Snake Park Trust