व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपल्याला आपले दिवस गणण्यास शिकवतो

यहोवा आपल्याला आपले दिवस गणण्यास शिकवतो

यहोवा आपल्याला आपले दिवस गणण्यास शिकवतो

“आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.”—स्तोत्र ९०:१२.

१. ‘आपले दिवस गणण्यास शिकवण्याची’ यहोवाला विनंती करणे का योग्य आहे?

 यहोवा देव आपला निर्माणकर्ता आणि जीवनदाता आहे. (स्तोत्र ३६:९; प्रकटीकरण ४:११) त्यामुळे आपल्या आयुष्याचा आपण सुज्ञपणे कसा उपयोग करू शकतो हे त्याच्यापेक्षा उत्तमरित्या आणखी कोण सांगू शकेल? म्हणूनच स्तोत्रकर्त्याने देवाला अशी याचना केली: “आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.” (स्तोत्र ९०:१२) ही प्रार्थना ९० व्या स्तोत्रात आढळते आणि या स्तोत्रात विचारात घेण्याजोगे अनेक मुद्दे आहेत. पण पहिल्यांदा आपण देवाने प्रेरित केलेल्या या स्तोत्राचा सारांश पाहू या.

२. (अ) नव्वदाव्या स्तोत्राच्या लेखनाचे श्रेय कोणाला देण्यात आले आहे आणि हे स्तोत्र केव्हा लिहिण्यात आले असावे? (ब) नव्वदाव्या स्तोत्राच्या वाचनाने जीवनाविषयीच्या आपल्या दृष्टिकोनावर कसा परिणाम झाला पाहिजे?

“देवाचा भक्‍त मोशे ह्‍याची ही प्रार्थना” असे ९० व्या स्तोत्राच्या उपरिलेखनात नमूद आहे. हे स्तोत्र विशेषतः जीवनाच्या क्षणभंगुरतेविषयी सांगत असल्यामुळे कदाचित इस्राएल लोक ईजिप्तच्या दास्यातून मुक्‍त झाल्यावर व ४० वर्षे अरण्यात भ्रमंती करत असताना हजारो लोकांचा मृत्यू होऊन एका अविश्‍वासू पिढीचा नाश झाला त्यादरम्यान लिहिण्यात आले असावे. (गणना ३२:९-१३) वस्तुस्थिती काहीही असो, पण स्तोत्र ९० यावरून अगदी स्पष्टपणे दिसून येते की अपरिपूर्ण मनुष्याचे जीवन अल्पावधीचे आहे. साहजिकच, आपण आपल्या जीवनातील मोलवान दिवसांचा विचारपूर्वक उपयोग केला पाहिजे.

३. नव्वदाव्या स्तोत्रात प्रामुख्याने कोणत्या विषयांचा समावेश आहे?

नव्वदाव्या स्तोत्रातील १-६ वचनांत यहोवा पिढ्यान्‌पिढ्या आपले निवासस्थान असल्याचे सांगितले आहे. ७-१२ वचने, आपण जीवनाच्या क्षणभंगूर वर्षांचा उपयोग देवाला स्वीकार्य अशा मार्गाने कसा करू शकतो हे सांगतात. आणि १३-१७ वचनांत सांगितल्याप्रमाणे, यहोवाची प्रेमकृपा व आशीर्वाद मिळवण्याची आपली मनःपूर्वक इच्छा व्यक्‍त करण्यात आली आहे. अर्थात यहोवाच्या प्रत्येक सेवकाचे अनुभव या स्तोत्रात सांगितल्याप्रमाणेच असतील असे गृहित धरता येत नाही. पण तरीसुद्धा आपल्यापैकी प्रत्येकाने यातील प्रार्थनाशील भाव मनावर घेऊन त्यांचे अनुकरण केले पाहिजे. यासाठी आता आपण देवाला समर्पित असणाऱ्‍यांच्या दृष्टिकोनातून नव्वदाव्या स्तोत्राचे जवळून परीक्षण करू या.

यहोवा—आपले “खरे निवास्थान”

४-६. यहोवा आपल्याकरता “खरे निवासस्थान” आहे असे आपण का म्हणू शकतो?

स्तोत्रकर्ता असे म्हणून सुरवात करतो: “हे यहोवा, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला खरे निवासस्थान आहेस. पर्वतांचा जन्म झाला त्यापूर्वी, तू वेणा देऊन पृथ्वी व जग ही उत्पन्‍न केली त्यापूर्वीच अनिश्‍चित काळापासून अनिश्‍चित काळापर्यंत तू देव आहेस.”स्तोत्र ९०:१, २, NW तळटीप.

“सनातन देव” यहोवा आपल्याकरता एक “खरे निवासस्थान” अर्थात एक आध्यात्मिक आश्रय आहे. (रोमकर १६:२६) आपण सुरक्षितता अनुभवतो कारण ‘प्रार्थना ऐकणारा’ या नात्याने तो आपल्याला मदत करण्यासाठी सदैव तयार असतो. (स्तोत्र ६५:२) आपण आपल्या पित्यावर, त्याच्या परमप्रिय पुत्राद्वारे सर्व चिंतांचा भार सोपवतो; त्यामुळे ‘सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती आपल्या अंतःकरणांचे व विचारांचे रक्षण करते.’—फिलिप्पैकर ४:६, ७; मत्तय ६:९; योहान १४:६, १४.

आपण आध्यात्मिक सुरक्षितता अनुभवतो कारण लाक्षणिक अर्थाने यहोवा आपल्याकरता एक “खरे निवासस्थान” आहे. तसेच त्याने ‘खोल्या’ देखील पुरवल्या आहेत, ज्यांचा अर्थ कदाचित त्याच्या लोकांच्या मंडळ्यांशी जवळून संबंधित असावा. या आध्यात्मिक आश्रयस्थानांत प्रेमळ मेंढपाळ आपल्या या सुरक्षिततेच्या भावनेत आणखीनच भर घालतात. (यशया २६:२०; ३२:१, २; प्रेषितांची कृत्ये २०:२८, २९) शिवाय, आपल्यापैकी काहीजण देवाच्या सेवेचा कित्येक वर्षांचा इतिहास असलेल्या कुटुंबांतून आलो आहोत आणि तो ‘पिढ्यानपिढ्या आपल्याकरता खरे निवासस्थान’ असल्याचे आपण स्वतः अनुभवले आहे.

७. पर्वतांचा “जन्म” झाला व पृथ्वी “वेणा देऊन” उत्पन्‍न करण्यात आली याचा काय अर्थ होतो?

पर्वतांचा “जन्म” होण्याआधी किंवा “वेणा देऊन” पृथ्वी उत्पन्‍न करण्याआधी यहोवा अस्तित्वात होता. मनुष्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, पृथ्वी व तिच्यातील सर्व वस्तू, रासायनिक प्रक्रिया आणि गुंतागुंतीच्या यंत्रणा उत्पन्‍न करणे मोठ्या परिश्रमाचे काम होते. पर्वतांचा “जन्म” झाला आणि पृथ्वी “वेणा देऊन” उत्पन्‍न करण्यात आली असे म्हणताना स्तोत्रकर्ता, या सर्व गोष्टी परिश्रमाने निर्माण करणाऱ्‍या यहोवाबद्दल आदर व्यक्‍त करत आहे. आपल्यालाही निर्माणकर्त्या यहोवाच्या निर्मितीकृत्यांविषयी असाच आदर व कृतज्ञता वाटू नये का?

यहोवा आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो

८. यहोवा “अनिश्‍चित काळापासून अनिश्‍चित काळापर्यंत” देव आहे याचा काय अर्थ होतो?

स्तोत्रकर्ता म्हणतो, “अनिश्‍चित काळापासून अनिश्‍चित काळापर्यंत तू देव आहेस.” ‘अनिश्‍चित काळ’ ही संज्ञा अशा गोष्टींच्या संदर्भातही वापरण्यात आली आहे, ज्यांना अंत आहे पण त्यांचा कालावधी निश्‍चित नाही. (निर्गम ३१:१६, १७, NW; इब्री लोकांस ९:१५) पण स्तोत्र ९०:२ आणि इतर काही वचनांत ही संज्ञा ‘सर्वकाळास’ सूचित करते. (उपदेशक १:४, NW) देव अनादिकाळापासून कसा अस्तित्वात आहे हे समजणे आपल्या बुद्धीपलीकडे आहे. पण यहोवाला सुरवात नाही आणि त्याचा कधी अंतही होणार नाही. (हबक्कूक १:१२) तो सदासर्वदा जिवंत राहील आणि आपल्याला मदत करण्यास सदैव तयार राहील.

९. स्तोत्रकर्ता मानवाच्या अस्तित्वाच्या एक हजार वर्षांची तुलना कशाशी करतो?

सर्वकाळापासून अस्तित्वात असलेल्या निर्माणकर्त्याच्या अनुभवाच्या तुलनेत मानवी अस्तित्वाची हजार वर्षे अगदीच अल्पावधीची आहेत असे म्हणण्यास स्तोत्रकर्ता प्रेरित झाला. देवाला उद्देशून त्याने लिहिले: “तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवितोस [“धूळ करितोस,” पं.र.भा.], आणि म्हणतोस, अहो मानवांनो, परत जा. कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.”स्तोत्र ९०:३, ४.

१०. देव कोणत्या अर्थाने मनुष्याची ‘पुन्हा धूळ करतो?’

१० माणसाचे जीवन नश्‍वर आहे आणि देव मनुष्याची ‘पुन्हा धूळ करितो.’ याचा अर्थ, मनुष्य चुरडलेल्या, नष्ट झालेल्या मातीप्रमाणे ‘धुळीस’ मिळतो. जणू काय यहोवा त्याला म्हणतो: ‘तुला मातीपासून बनवण्यात आले, मातीत परत जा.’ (उत्पत्ति २:७; ३:१९) आणि हे सर्वांनाच अनुभवावे लागते, मग ते बलशाली असोत वा दुर्बल, श्रीमंत असोत वा गरीब—कारण कोणत्याही अपरिपूर्ण मनुष्याला ‘आपल्या भावाला मुक्‍त करिता येत नाही किंवा त्याने सर्वदा जगावे म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही.’ (स्तोत्र ४९:६-९) पण आपण किती कृतज्ञ आहोत कारण ‘देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे’!—योहान ३:१६; रोमकर ६:२३.

११. आपल्याला दीर्घ वाटणारा काळ देवाच्या नजरेत अगदीच अल्प आहे असे का म्हणता येते?

११ यहोवाच्या दृष्टिकोनातून ९६९ वर्षांचा मथुशलेह देखील पूर्ण एक दिवस जगला नाही. (उत्पत्ति ५:२७) एक हजार वर्षे, गेलेल्या दिवसासारखी आहेत—जणू काय, फक्‍त २४ तासांचा अवधी. स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो की देवाच्या नजरेत एक हजार वर्षे, एखाद्या छावणीत रात्रीच्या वेळी दिल्या जाणाऱ्‍या पहाऱ्‍याच्या, चार तासांच्या प्रहरासारखी आहेत. (शास्ते ७:१९) स्पष्टपणे आपल्याला अतिशय दीर्घ वाटणारा काळ सनातन देव यहोवा याच्याकरता अगदीच अल्प आहे.

१२. देव मानवांना कोणत्या अर्थाने ‘घेऊन जातो’?

१२ देवाच्या सनातन अस्तित्वाच्या तुलनेत सध्याचे मानवी जीवन खरोखरच अल्पावधीचे आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो: “तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस; ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्‍या गवताप्रमाणे ते आहेत; सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते.” (स्तोत्र ९०:५, ६) मोशेने हजारो इस्राएल लोकांना अरण्यात मरताना पाहिले; जणू देव त्यांना पुराप्रमाणे “घेऊन” गेला. सदर स्तोत्राच्या या भागाचे असेही भाषांतर करण्यात आले आहे: “तू मनुष्यांना मृत्यूच्या निद्रेत वाहून नेतो.” (न्यू इंटरनॅशनल व्हर्शन) दुसरीकडे पाहता, अपरिपूर्ण मनुष्यांचे आयुष्य अल्पावधीच्या “निद्रेप्रमाणे”—जणू एका रात्रीच्या झोपेप्रमाणे आहे.

१३. आपण कोणत्या अर्थाने “गवताप्रमाणे” आहोत आणि यामुळे आपल्या विचारसरणीवर कसा परिणाम झाला पाहिजे?

१३ आपण ‘सकाळी उगवणाऱ्‍या गवताप्रमाणे’ आहोत जे संध्याकाळ होईपर्यंत तळपत्या उन्हात वाळून जाते. होय, आपले जीवन एका दिवसात कोमेजून जाणाऱ्‍या गवताइतके क्षणभंगूर आहे. म्हणूनच आपण हे मोलवान धन व्यर्थ घालवू नये. उलट या व्यवस्थीकरणातील आपली उर्वरित वर्षे कशी घालवावीत याविषयी आपण देवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

यहोवा आपल्याला ‘दिवस गणण्यास’ मदत करतो

१४, १५. स्तोत्र ९०:७-९ ही वचने इस्राएल लोकांच्या बाबतीत कशाप्रकारे पूर्ण झाली?

१४ देवाविषयी स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो: “कारण आम्ही तुझ्या क्रोधाने भस्म होतो, तुझ्या संतापाने आम्ही घाबरून जातो, तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेविले आहेत; आमची गुप्त पातके आपल्या मुखप्रकाशात ठेविली आहेत. तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात; आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवितो.”—स्तोत्र ९०:७-९.

१५ अविश्‍वासू इस्राएल लोक देवाच्या ‘क्रोधाने भस्म झाले.’ त्याच्या संतापाने ‘ते घाबरून गेले.’ देवाच्या न्यायदंडांमुळे त्यांच्यापैकी काहीजणांचा “रानात नाश झाला.” (१ करिंथकर १०:५) यहोवाने ‘त्यांचे अपराध आपल्यापुढे ठेविले.’ त्यांच्या जाहीर चुकांकरता तर त्याने त्यांच्याकडून जाब विचारलाच, पण त्यांची “गुप्त पातके” देखील त्याने त्याच्या ‘मुखप्रकाशात ठेविली.’ (नीतिसूत्रे १५:३) देवाचा क्रोध त्यांच्यावर आल्यामुळे अपश्‍चात्तापी इस्राएल लोकांनी त्यांचे ‘आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालविले.’ आपले अल्पायुष्य देखील जणू ओठांतून निघणाऱ्‍या उसाशासारखे आहे.

१६. कोणी गुप्तपणे पाप करत असल्यास त्यांनी काय करावे?

१६ आपल्यापैकी कोणीही गुप्तपणे पाप करत असेल तर कदाचित काही काळ आपण आपले दुर्वर्तन इतरांपासून लपवू शकू. पण आपले गुप्त दुराचरण यहोवाच्या ‘मुखप्रकाशात’ असेल आणि आपल्या कृत्यांमुळे त्याच्याबरोबरचा आपला संबंध बिघडेल. यहोवासोबत पुन्हा एकदा घनिष्ट संबंध कायम करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करून त्याची क्षमा मागावी लागेल, आपल्या चुका सुधाराव्या लागतील आणि ख्रिस्ती वडिलांकडून मिळणारी आध्यात्मिक मदत कृतज्ञपणे स्वीकारावी लागेल. (नीतिसूत्रे २८:१३; याकोब ५:१४, १५) आणि असे करणेच आपल्याकरता श्रेयस्कर ठरेल; अन्यथा आपण सार्वकालिक जीवनाची आपली आशा धोक्यात घालून ‘चंचल ध्वनीप्रमाणे आयुष्य घालवू!’

१७. सर्वसामान्य लोकांचे आयुष्यमान किती आहे आणि आपल्या आयुष्याची वर्षे कशी असतात?

१७ अपरिपूर्ण मनुष्यांच्या जीवनकाळाविषयी स्तोत्रकर्ता म्हणतो: “आमचे आयुष्य सत्तर वर्षे—आणि शक्‍ति असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.” (स्तोत्र ९०:१०) सर्वसाधारणपणे लोकांचे आयुष्यमान ७० वर्षांचे असते; ८५ वर्षांच्या कालेबने आपल्या असाधारण ताकदीचा उल्लेख केला होता. अहरोन (१२३), मोशे (१२०), आणि यहोशवा (११०) हे काही अपवाद होते. (गणना ३३:३९; अनुवाद ३४:७; यहोशवा १४:६, १०, ११; २४:२९) पण ईजिप्तमधून बाहेर पडलेल्या अविश्‍वासू पिढीपैकी २० वर्षांच्या वरील वयाच्या लोकांचा चाळीस वर्षांच्या आत मृत्यू झाला. (गणना १४:२९-३४) आजही अनेक देशांतील लोकांचे सरासरी आयुष्यमान स्तोत्रकर्त्याने दिलेल्या मर्यादेतच आहे. आपल्या आयुष्याची वर्षे “कष्टमय व दुःखमय” असतात. ती लवकर सरून जातात आणि ‘आपण निघून जातो.’—ईयोब १४:१, २.

१८, १९. (अ) ‘सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल अशाप्रकारे दिवस गणण्याचा’ काय अर्थ होतो? (ब) सुज्ञ अंतःकरणाने वागल्यामुळे आपल्याला काय करण्याची प्रेरणा मिळेल?

१८ स्तोत्रकर्ता पुढे असे गातो: “तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते? आणि तुझे भय बाळगण्याइतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे? ह्‍याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.” (स्तोत्र ९०:११, १२) देवाच्या क्रोधाचे बळ किंवा त्याच्या कोपाची सीमा कोणालाही माहीत नाही; यामुळे आपल्याला यहोवाविषयी अधिकच आदरमिश्रित भय वाटले पाहिजे. किंबहुना यामुळे आपल्याला यहोवाला अशी विनंती करण्याची प्रेरणा झाली पाहिजे, “आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हाला सुज्ञ अंत:करण प्राप्त होईल.”

१९ असे म्हणण्याद्वारे स्तोत्रकर्ता यहोवाला प्रार्थना करत होता, की त्याने त्याच्या लोकांना सुज्ञपणे वागण्यास शिकवावे जेणेकरून ते आपले उर्वरीत दिवस मोलवान जाणून त्याला संतोष वाटेल अशा पद्धतीने त्यांचा उपयोग करतील. ७० वर्षांच्या आयुष्यात जवळजवळ २५,५०० दिवस मिळण्याची आपण अपेक्षा करू शकतो. आपले वय कितीही असले तरीसुद्धा, ‘आपल्याला उद्याचे समजत नाही; आपले आयुष्य ते काय? आपण वाफ आहोत ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.’ (याकोब ४:१३-१५) ‘समय व प्रसंग सर्वांवर येतात,’ त्यामुळे आपण आणखी किती जगू हे सांगता येत नाही. म्हणून आपण अशी प्रार्थना करू या की यहोवाने आपल्याला परीक्षांना तोंड देण्याची, इतरांशी योग्यप्रकारे वागण्याची आणि आताच म्हणजे आज यहोवाच्या सेवेत होता होईल तितके करण्याची सुज्ञता द्यावी! (उपदेशक ९:११; याकोब १:५-८) यहोवा आपल्याला त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे व त्याच्या संस्थेद्वारे मार्गदर्शन देतो. (मत्तय २४:४५-४७; १ करिंथकर २:१०; २ तीमथ्य ३:१६, १७) सुज्ञ अंतःकरणाने वागल्यास आपल्याला ‘पहिल्याने देवाच्या राज्याचा शोध’ करण्याची आणि यहोवाचे गौरव व्हावे व त्याचे मन आनंदित व्हावे अशारितीने आपल्या आयुष्यातील दिवसांचा उपयोग करण्याची प्रेरणा मिळेल. (मत्तय ६:२५-३३; नीतिसूत्रे २७:११) पूर्ण अंतःकरणाने त्याची उपासना केल्यामुळे अर्थातच आपल्या सर्व समस्या दूर होणार नाहीत, पण निश्‍चितच आपल्याला खूप आनंद प्राप्त होईल.

यहोवाचा आशीर्वाद आपल्याला आनंद देतो

२०. (अ) देवाला कोणत्या अर्थाने ‘खेद वाटतो’? (ब) आपल्या हातून गंभीर चूक झाली, पण आपण खरा पश्‍चात्ताप दाखवला तर यहोवा आपल्याशी कशाप्रकारे वागेल?

२० कल्पना करा, आपल्या सबंध उर्वरीत जीवनात आपल्याला आनंदी राहता आले तर! यासंदर्भात मोशे अशी याचना करतो, “हे यहोवा, परत फीर; किती वेळ लावशील? आपल्या सेवकांविषयी तुला खेद वाटू दे. तू आपल्या प्रेमकृपेने [किंवा, “एकनिष्ठ प्रीतीने”] आम्हाला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही आनंद कल्लोळ करू व आमचे सर्व दिवस आनंदात घालवू.” (स्तोत्र ९०:१३, १४; NW तळटीप) देवाकडून कधीही चुका होत नाहीत. पण त्याला ‘खेद वाटतो,’ अर्थात, पश्‍चात्तापी पातक्यांनी त्याच्या न्यायदंडाच्या इशाऱ्‍याकडे लक्ष देऊन आपली मनोवृत्ती बदलल्यास तो आपल्या क्रोधापासून व त्यांना शिक्षा देण्यापासून ‘परावृत्त होतो.’ (अनुवाद १३:१७) तेव्हा, आपण काही गंभीर चूक केली तरीसुद्धा जर आपण खरा पश्‍चात्ताप दाखवला तर यहोवा आपल्याला त्याच्या ‘प्रेमकृपेने तृप्त करेल’ जेणेकरून आपण “आनंद कल्लोळ करू.” (स्तोत्र ३२:१-५) सदोदीत नीतिमान मार्गावर चालल्यामुळे, देवाला आपल्याबद्दल वाटणारी एकनिष्ठ प्रीती आपल्याला जाणवेल आणि आपण आपले “सर्व दिवस,” होय आपले उर्वरीत आयुष्य “आनंदात घालवू” शकू.

२१. स्तोत्र ९०:१५, १६ येथे दिलेल्या शब्दांत, मोशे काय विनंती करत असावा?

२१ स्तोत्रकर्ता कळकळीने प्रार्थना करतो: “जेवढे दिवस तू आम्हाला पीडिले, जेवढी वर्षे आम्ही अरिष्ट पाहिले त्या मानाने आम्हाला आनंदित कर. तुझी कृति तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रगट होऊ दे.” (स्तोत्र ९०:१५, १६) कदाचित मोशे देवाला अशी प्रार्थना करत असावा की इस्राएल राष्ट्राच्या पीडेचा किंवा त्यांच्यावरील संकटांचा काळ जितका लांब होता त्याच मानाने देवाने त्यांना आशीर्वादित करावे. त्याने अशी विनंती केली की इस्राएलास आशीर्वादित करण्याची देवाची “कृति” त्याच्या सेवकांना दिसून यावी आणि त्याचे वैभव त्यांच्या मुलांना अर्थात संततीला प्रगट व्हावे. आपणही प्रार्थना करू शकतो की देवाच्या प्रतिज्ञात नव्या जगात आज्ञाधारक मानवजातीवर आशीर्वादांचा वर्षाव व्हावा.—२ पेत्र ३:१३.

२२. स्तोत्र ९०:१७ यानुसार आपण कशासाठी प्रार्थना करणे योग्य आहे?

२२ नव्वदावे स्तोत्र या विनंतीने संपुष्टात येते: “परमेश्‍वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो; आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीस ने, आमच्या हातचे काम सिद्धीस ने.” (स्तोत्र ९०:१७) या शब्दांवरून दिसून येते की देवाच्या सेवेतील आपल्या प्रयत्नांवर त्याचा आशीर्वाद असावा म्हणून त्याला प्रार्थना करणे योग्य आहे. अभिषिक्‍त ख्रिस्ती किंवा त्यांचे सोबती “दुसरी मेंढरे” या नात्याने आपण आनंदी आहोत कारण ‘यहोवाचा प्रसाद’ आपल्यावर आहे. (योहान १०:१६) आपण किती आनंदित आहोत कारण राज्य उद्‌घोषक म्हणून आपण करत असलेल्या कार्यावर व इतर मार्गांनीही देवाने ‘आपल्या हातचे काम सिद्धीस नेले आहे!’

आपले दिवस गणत राहू या

२३, २४. नव्वदाव्या स्तोत्रावर मनन केल्यामुळे आपल्याला कशाप्रकारे फायदा होईल?

२३ नव्वदाव्या स्तोत्रावर मनन केल्यामुळे आपल्याकरता “खरे निवासस्थान” असलेल्या यहोवा देवावर आपण अधिक अवलंबून राहण्यास शिकले पाहिजे. जीवनाच्या क्षणभंगूरतेविषयी त्याने जे लिहिले त्यावर मनन केल्यावर आपले दिवस गणण्याकरता देवाचे मार्गदर्शन किती आवश्‍यक आहे याची आपल्याला अधिक प्रकर्षाने जाणीव झाली पाहिजे. जर आपण देवाच्या बुद्धीकरता प्रार्थना करत राहिलो आणि त्यानुसार वागलो तर आपल्याला त्याची प्रेमकृपा आणि आशीर्वाद अवश्‍य प्राप्त होतील.

२४ यहोवा आपल्याला दिवस गणण्यास पुढेही शिकवत राहील. जर आपण त्याच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद दिला तर आपल्याला सर्वकाळ आपले दिवस गणणे शक्य होईल. (योहान १७:३) सार्वकालिक जीवनाची आपली आशा पूर्ण व्हावी अशी इच्छा असल्यास आपण यहोवाला आपले आश्रयस्थान मानले पाहिजे. (यहूदा २०, २१) ९१ व्या स्तोत्रात या मुद्द्‌यावर अधिक प्रकाश टाकण्यात आला आहे व पुढच्या लेखात आपण याविषयी अधिक चर्चा करू.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• यहोवा आपल्याकरता “खरे निवासस्थान” आहे असे का म्हणता येते?

• यहोवा आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो असे आपण का म्हणू शकतो?

• यहोवा आपल्याला ‘आपले दिवस गणण्यास’ कशी मदत करतो?

• आपल्याला आपले ‘सर्व दिवस आनंदात घालवणे’ कसे शक्य होईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील चित्र]

“पर्वतांचा जन्म झाला त्यापूर्वी” यहोवा देव अस्तित्वात होता

[१२ पानांवरील चित्र]

यहोवाच्या दृष्टीने ९६९ वर्षांचा मथुशलेह देखील एका दिवसापेक्षा कमी काळ जगला

[१४ पानांवरील चित्रे]

यहोवाने आपल्या ‘हातचे काम सिद्धीस नेले आहे’