व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सिथियन इतिहासजमा झालेली एक रहस्यमय जमात

सिथियन इतिहासजमा झालेली एक रहस्यमय जमात

सिथियन इतिहासजमा झालेली एक रहस्यमय जमात

वेगाने, धूळ उडवीत, लुटीने भरलेल्या पिशव्या आपल्या घोड्यांवर लादून एका भटक्या जमातीची पलटण आली. युरेशियातील स्टेप गवताळ प्रदेशावर सा.यु.पू. ७०० ते ३०० पर्यंत या रहस्यमय लोकांचा अंमल होता. कालांतराने ते नामशेष झाले—पण त्यांनी आपल्याकरता इतिहासात एक स्थान कायम केले होते. बायबलमध्येसुद्धा त्यांचा उल्लेख आढळतो. हे होते सिथियन लोक.

अनेक शतकांपर्यंत, पूर्व युरोपातील कार्पेथियन पर्वतांपासून सध्याच्या आग्नेय रशियापर्यंत विस्तारलेल्या गवताळ प्रदेशांत विविध भटक्या जमाती व जंगली घोड्यांच्या कळपांचा संचार होता. सा.यु.पू. आठवे शतक आले तोवर, शुइआन या चिनी सम्राटाच्या लष्करी कारवायांमुळे लोकांचे हळूहळू पश्‍चिमेकडे आप्रवासन होऊ लागले. सिथियन लोकांनीही आपला मोर्चा पश्‍चिमेकडे वळवला आणि कॉकसस व काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील प्रदेशांवर नियंत्रण करत असलेल्या सिमेरियन लोकांशी युद्ध करून त्यांना हाकलून लावले.

धनसंपत्तीच्या शोधात, सिथियन लोकांनी निनवे या अस्सिरियन राजधानी शहराची लुटालूट केली. नंतर अस्सिरियाशी दोस्ती करून त्यांनी मिडिया, बॅबिलोनिया व इतर राष्ट्रांवर हल्ला केला. उत्तर ईजिप्तपर्यंतही त्यांनी मजल मारली. ईशान्य इस्राएलातील बेथ-शान या शहराला सिथोपोलिस नाव पडले यावरून कदाचित या प्रदेशावरही काही काळ सिथियन लोकांचा अंमल असावा असे सूचित होते.—१ शमुवेल ३१:११, १२.

शेवटी, सिथियन लोक सध्याच्या रोमानिया, मॉलडोव्हा, युक्रेन व दक्षिण रशिया येथे असलेल्या स्टेप गवताळ प्रदेशांत स्थायिक झाले. येथे, ग्रीक लोक व सध्याच्या युक्रेन व दक्षिण रशिया येथील धान्य उत्पादक यांच्यामध्ये मध्यस्थी करून त्यांनी बरेच धन मिळवले. धान्य, मध, फर व गुरे यांच्या ऐवजात ते ग्रीकांकडून द्राक्षरस, कापड, हत्यारे व कलाकुसरीच्या वस्तू घेत असत. अशारितीने त्यांनी अमाप संपत्ती गोळा केली.

तरबेज घोडेस्वार

वाळवंटातील लोकांकरता उंट असतो, तसा स्टेप प्रदेशातील या युद्धप्रवीण जमातीच्या लोकांकरता घोडा होता. सिथियन लोक उत्तम घोडेस्वार होते व खोगीर आणि रिकीब वापरणारे पहिलेच होते. ते घोड्यांचे मांस खात आणि घोडीचे दूध पीत होते. ते घोड्यांचे यज्ञही करत होते. सिथियन योद्ध्‌याचा मृत्यू झाल्यास त्याच्या घोड्याला देखील मारले जायचे आणि पूर्ण सन्मानाने—सरंजाम व सजावटीच्या आभूषणांसहित त्याला दफन केले जायचे.

इतिहासकार हेरोडोटसच्या वर्णनांवरून सिथियन लोकांत बऱ्‍याच क्रूर प्रथा रूढ असल्याचे दिसून येते; उदाहरणार्थ ते आपल्या शत्रूची कवटी, पिण्याचे पात्र म्हणून उपयोगात आणीत. शत्रूंवर झंझावाती हल्ला करून लोखंडी तलवारी, कुऱ्‍हाडी, भाले आणि कातडी चिरणाऱ्‍या काटेरी बाणांनी ते त्यांचा नाश करीत.

मृत्योपरांत जीवनाकरता सुसज्ज कबरा

सिथियन लोक जादूटोणा करीत आणि शामान धर्म पाळीत होते; ते अग्नी आणि एका देवीचे उपासक होते. (अनुवाद १८:१०-१२) कबर हे मृत व्यक्‍तीचे घर आहे असा त्यांचा समज होता. त्यामुळे मेलेल्या मालकाच्या सोयीसाठी गुलाम व पशूंचा बळी दिला जायचा. सरदाराचा मृत्यू झाल्यास त्याची धनसंपत्ती आणि गुलाम देखील त्याच्या सोबत “पुढच्या जगात” जातात अशी त्यांची धारणा होती. एका शाही कबरेत पाच गुलाम, जणू लगेच उठून कामाला लागता येईल अशाप्रकारे त्यांच्या मालकाच्या दिशेने पाय करून पडलेले आढळले.

राजाचा मृत्यू झाल्यावर त्याला दफन करतेवेळी अनेक नजराणे देखील अर्पण केले जायचे; शोक करण्याच्या काळात सिथियन लोक आपले रक्‍त सांडत आणि केस कापून टाकत. हेरोडटस याने लिहिले: “ते आपले कान कापायचे, मुंडन करायचे, हातावर वार करायचे, कपाळ आणि नाकावर जखमा करायचे आणि आपल्या डाव्या हाताला बाणाने छिद्र करायचे.” याच्या अगदी विरोधात, देवाने त्याच कालखंडातील इस्राएल लोकांना अशी आज्ञा दिली होती: “कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका.”—लेवीय १९:२८.

सिथियन लोकांची हजारो कूर्गन (थडगी) सापडली आहेत. या कूर्गनमध्ये सापडलेल्या अनेक शोभिवंत वस्तू सिथियन लोकांच्या दैनंदिन जीवनाची झलक दाखवतात. पीटर द ग्रेट नावाच्या रशियन झारने १७१५ साली अशा पुरातन वस्तूंचा संग्रह करण्यास सुरवात केली; आज या शोभिवंत वस्तू रशिया व युक्रेनच्या वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळतात. या ‘प्राणी कलेत’ घोडे, गरुड, बहिरीससाणे, मांजरी, पँथर, एल्क, हरिण, काल्पनिक पक्षी व सिंहांच्या (एका प्राण्याचे शरीर व दुसऱ्‍या प्राण्याचे डोके असलेले, पंख असलेले वा नसलेले काल्पनिक प्राणी) कलाकृती आढळतात.

सिथियन लोक व बायबल

बायबलमध्ये सिथियन लोकांचा स्पष्ट उल्लेख केवळ एका ठिकाणीच आढळतो. कलस्सैकर ३:११ येथे असे म्हटले आहे: “हेल्लेणी व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही; तर ख्रिस्त सर्व काही, आणि सर्वात आहे.” ख्रिस्ती प्रेषित पौलाने हे शब्द लिहिले तेव्हा “स्कुथी” (अर्थात, सिथियन) असे भाषांतरित केलेला मूळ ग्रीक शब्द कोणत्याही विशिष्ट राष्ट्राच्या लोकांच्या संदर्भात नव्हे तर असंस्कृत लोकांच्या बाबतीत वापरला जात असे. अशाप्रकारचे लोक देखील यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या म्हणजेच त्याच्या कार्यकारी शक्‍तीच्या प्रभावामुळे सुभक्‍तीशील व्यक्‍तिमत्त्व विकसित करू शकतात, या गोष्टीवर पौल जोर देत होता.—कलस्सैकर ३:९, १०.

काही पुरातत्त्ववेत्त्यांचे असे म्हणणे आहे की यिर्मया ५१:२७ येथे आढळणारे आष्कनाज हे नाव आशगुझे या अस्सिरियन शब्दाचा तत्सम असून हे नाव सिथियन लोकांना देण्यात आले होते. या लोकांनी मान्‍नाई जमातीच्या लोकांशी हातमिळवणी करून सा.यु.पू. सातव्या शतकात अस्सिरियाविरुद्ध उठाव केल्याचा काही पुरातन कीलाकार शिलालेखांत उल्लेख आढळतो. यिर्मयाने भविष्यवाणी करण्यास सुरवात करण्याच्या केवळ काही काळाआधी सिथियन लोक ईजिप्तला जाताना व तेथून परतताना, कोणत्याही प्रकारचा उपद्रव न करता यहूदा राष्ट्रामार्गे जात असत. त्यामुळे यहूदावर उत्तरेकडून हल्ला होईल असे यिर्मयाने भाकीत केले तेव्हा बऱ्‍याच जणांनी या भाकीताच्या सत्यतेविषयी शंका घेतली असावी.—यिर्मया १:१३-१५.

काही अभ्यासकांचे असे मत आहे की यिर्मया ५०:४२ येथे सिथियन लोकांविषयी अप्रत्यक्ष उल्लेख आढळतो. या वचनात म्हटले आहे: “ते धनुष्य व भाले धारण करितात, ते क्रूर आहेत, त्यांस दयामाया नाही; ते सागराप्रमाणे गर्जना करितात, ते घोड्यांवर स्वार झाले आहेत. हे बाबेलकन्ये, ते युद्धास सिद्ध झाल्याप्रमाणे तुजवर येत आहेत.” पण हे शब्द सा.यु.पू. ५३९ साली बाबेलवर विजय मिळवणाऱ्‍या मेद व पारसच्या योद्ध्‌यांच्या संदर्भात होते.

यहेज्केल ३८ व ३९ अध्यायांतील ‘मागोग देश’ सिथियन जमातींच्या संदर्भात असावे असेही काहींनी सुचवले आहे. तथापि, ‘मागोग देश’ या शब्दप्रयोगाचा लाक्षणिक अर्थ आहे. स्वर्गातील लढाईनंतर सैतान व त्याच्या दूतांना जेथे फेकण्यात आले, अर्थात पृथ्वीवरील परिसराला तो सूचित करतो.—प्रकटीकरण १२:७-१७.

निनवेच्या नाशाविषयी नहूमने केलेल्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत सिथियन लोकांचा समावेश होता. (नहूम १:१, १४) खास्दी, सिथियन व मेदी लोकांनी सा.यु.पू. ६३२ साली निनवेचा नाश केला, ज्यामुळे कालांतराने अस्सिरियन साम्राज्याचा अधःपात झाला.

रहस्यमय पतन

सिथियन लोक आज नामशेष झाले आहेत, पण का? एका प्रसिद्ध युक्रेनियन पुरातत्त्ववेत्त्याने सांगितल्यानुसार, “काय झाले असावे हे खरे तर कोणालाही माहीत नाही.” काही अभ्यासकांच्या मते, ऐषोआरामाची चटक असल्यामुळे हळूहळू त्यांचा प्रभाव कमी होत गेला आणि सा.यु.पू. पहिल्या व दुसऱ्‍या शतकात ते सार्मेशियन या आशियाच्या एका नवीन भटक्या जमातीकडून पराभूत झाले असावेत.

काहींचे असे म्हणणे आहे की सिथियन जमातीच्या आपसांतील संघर्षामुळे शेवटी त्यांचे पतन झाले असावे. इतर काही लोक असे म्हणतात की कॉकससचे ऑस्सेन्शियन लोक सिथियन जमातीचेच वंशज असावेत. वस्तुस्थिती काहीही असो, पण हे रहस्यमय लोक मानववंशाच्या इतिहासावर छाप पाडून गेले एवढे मात्र निश्‍चित. एक अशी छाप की जिच्यामुळे सिथियन हा शब्द क्रूरतेचा पर्यायी शब्द बनला.

[२४ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

◻ प्राचीन नगर

• आधुनिक नगर

डॅन्यूब

सिथिया आप्रवासन मार्ग

• कीईव

डिनिप्रो

डिनिस्टर

काळा समुद्र

ऑसेशिया

कॉकसस पर्वतरांगा

कॅस्पियन समुद्र

अस्सिरिया ← आक्रमण मार्ग

◻ निनवे

टायग्रिस

मेद ← आक्रमण मार्ग

मेसोपोटेमिया

बॅबिलोनिया ← आक्रमण मार्ग

◻ बॅबिलोन

युफ्रेटिस

पर्शियन साम्राज्य

◻ सूसा

पर्शियन खाडी

पॅलेस्टाईन

• बेथ-शान (सायथोपोलिस)

ईजिप्त ← आक्रमण मार्ग

नाईल

भूमध्यसमुद्र

ग्रीस

[२५ पानांवरील चित्रे]

सिथियन लढाऊ बाणा असलेले लोक होते

[चित्राचे श्रेय]

The State Hermitage Museum, St. Petersburg

[२६ पानांवरील चित्रे]

ग्रीक कलाकृतींच्या ऐवजात आपल्या उत्पादनांचा व्यापार करण्याद्वारे सिथियन लोकांनी अमाप संपत्ती मिळवली

[चित्राचे श्रेय]

Courtesy of the Ukraine Historic Treasures Museum, Kiev