“तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो”
“तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो”
प्रकाशाबद्दल आपण सहसा जास्त विचार करत नाही; पण वीजपुरवठ्यात खंड पडतो आणि आपल्या आजूबाजूचा सर्व परिसर काळोखात बुडतो तेव्हा मात्र लगेच आपल्याला प्रकाशाचे महत्त्व कळते. परंतु, आकाशातील ‘शक्तीकेंद्र’ असलेल्या सूर्याकडून मिळणाऱ्या प्रकाशात केव्हाही खंड पडत नसल्यामुळे आपण नेहमी त्यावर अवलंबून राहू शकतो, ही आनंदाची गोष्ट आहे. सूर्यप्रकाशामुळे आपण पाहू शकतो, खाऊ शकतो, श्वास घेऊन जिवंत राहू शकतो.
जिवंत राहण्याकरता प्रकाशाची आवश्यकता असल्यामुळे निर्मितीच्या पहिल्या दिवशीच देवाने प्रकाशाची निर्मिती केल्याचे उत्पत्तिच्या अहवालात आपल्याला वाचायला मिळते यात काही आश्चर्य नाही. “देव बोलला, ‘प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला.’” (उत्पत्ति १:३) राजा दावीदासारख्या धार्मिक लोकांना नेहमी याची जाणीव झाली, की यहोवा जीवन व प्रकाशाचा उगम आहे. दावीदाने लिहिले: “जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे; तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो.”—स्तोत्र ३६:९.
दावीदाचे शब्द शाब्दिक व लाक्षणिक अर्थानेही लागू होतात. एनसायक्लोपिडिआ ब्रिटानिका म्हणतो: “दृष्टीच्या ज्ञानेंद्रियासाठी प्रकाश निश्चित्तच जबाबदार आहे. इतर ज्ञानेंद्रियांपेक्षा डोळ्यांमुळेच खरे तर मानवी मेंदूला बहुतेक माहिती मिळते.” दृष्टीच्या वरदानामुळे आपण बहुतेक गोष्टी शिकू शकत असल्यामुळे आणि यासाठी योग्य प्रकाशाची आवश्यकता असल्यामुळे शास्त्रवचनांमध्ये लाक्षणिक अर्थाने प्रकाशाचा उपयोग करण्यात आला आहे.
म्हणूनच येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” (योहान ८:१२) येशूने लाक्षणिक अर्थाने ज्या प्रकाशाचा उल्लेख केला तो प्रकाश सत्याचा संदेश आहे जो लोकांचे मन व त्यांची अंतःकरणे प्रज्वलित करू शकतो. अनेक वर्षे आध्यात्मिक अंधकारात राहिल्यानंतर, येशूचे शिष्य मानवजातीसाठी असलेला देवाचा उद्देश आणि राज्याची आशा समजू शकले. हे ‘जीवनाच्या प्रकाशामुळे’ शक्य झाले होते कारण हे ज्ञान त्यांना चिरकालिक जीवनाच्या मार्गाकडे नेऊ शकले. आपल्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करताना येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) तेव्हा, या आध्यात्मिक प्रकाशाला आपण केव्हाही क्षुल्लक लेखू नये!