व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे आमंत्रण स्वीकारल्याचे फायदे

यहोवाचे आमंत्रण स्वीकारल्याचे फायदे

जीवन कथा

यहोवाचे आमंत्रण स्वीकारल्याचे फायदे

मारिया डो सेऊ झनार्दी यांच्याद्वारे कथित

“यहोवा जे काही करतो त्याची त्याला पूर्ण जाणीव असते. त्याच्याकडून हे आमंत्रण आलं असेल तर तू नम्रपणे ते स्वीकारलं पाहिजेस.” सुमारे ४५ वर्षांआधी माझ्या बाबांच्या या शब्दांमुळे यहोवाच्या संघटनेकडून पूर्ण-वेळेचे सेवक म्हणून कार्य करण्याचे पहिलेच आमंत्रण मी स्वीकारले. बाबांनी दिलेल्या या सल्ल्याबद्दल मी आजही कृतज्ञ आहे कारण यहोवाची आमंत्रणे स्वीकारल्यामुळे मला समृद्ध आशीर्वाद प्राप्त झाले.

बाबांनी १९२८ साली टेहळणी बुरूजची वर्गणी केली होती आणि बायबलबद्दल त्यांची आस्था वाढू लागली. परंतु ते मध्य पोर्तुगालमध्ये राहत असल्यामुळे, पोस्टाने मिळणारी प्रकाशने आणि माझ्या आजी-आजोबांचे एक बायबल हाच तेवढा देवाच्या मंडळीशी त्यांचा संपर्क होता. १९४९ साली, मी १३ वर्षांची असताना आमचे कुटुंब ब्राझीलला राहायला गेले. माझी आई ब्राझीलची होती. आम्ही रिओ दी झानेरु शहराजवळ स्थायिक झालो.

आमच्या नवीन शेजाऱ्‍यांनी आम्हाला त्यांच्या चर्चमध्ये बोलावले आणि आम्ही एक-दोनदा गेलोही. बाबा मुद्दामहून त्यांना नरकाग्नी, आत्मा, पृथ्वीचे भविष्य यांबद्दलचे प्रश्‍न विचारायचे—पण त्यांना उत्तर देता येत नव्हते. बाबा म्हणायचे, “खऱ्‍या बायबलच्या विद्यार्थ्यांकरता आपल्याला थांबूनच राहावं लागेल.”

एकदा एक आंधळे गृहस्थ आमच्या घरी आले आणि त्यांनी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिके दिली. बाबांनी त्यांनाही तीच प्रश्‍ने विचारलीत पण त्यांनी मात्र बायबलमधून योग्य उत्तरे दिली. त्यानंतरच्या आठवडी आणखी एक यहोवाची साक्षीदार आमच्याकडे आली. तिला विचारलेल्या आणखी प्रश्‍नांची उत्तरे तिने दिल्यावर ती म्हणाली आता मला प्रचाराला जायचे आहे. तिने मत्तय १३:३८ हे वचन दाखवून म्हटले, की हा प्रचार संपूर्ण जगात करायचा आहे. बाबांनी लगेच विचारले: “मीसुद्धा येऊ शकतो का?” “हो, जरूर,” ती म्हणाली. बायबल सत्य पुन्हा मिळाल्याचा आम्हाला अत्यानंद झाला होता! पुढच्याच अधिवेशनात बाबांचा बाप्तिस्मा झाला आणि त्यानंतर लगचेच नोव्हेंबर १९५५ मध्ये माझा बाप्तिस्मा झाला.

माझे पहिले आमंत्रण

दीड एक वर्षानंतर रिओ दी झानेरु येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराकडून एक मोठे तपकिरी रंगाचे पाकीट मला मिळाले; त्यामध्ये पूर्ण-वेळेच्या प्रचारकार्यात उतरण्याचे आमंत्रण होते. त्या वेळी आईची प्रकृती खूपच खालावली होती, म्हणून मी बाबांना काय करावे ते विचारले. बाबा अगदी ठामपणे म्हणाले, “यहोवा जे काही करतो त्याची त्याला पूर्ण जाणीव असते. त्याच्याकडून हे आमंत्रण आलं असेल तर तू नम्रपणे ते स्वीकारलं पाहिजेस.” या शब्दांनी मला उत्तेजन मिळाले; मी अर्ज भरला आणि जुलै १, १९५७ रोजी पूर्ण-वेळेच्या सेवेत प्रवेश केला. माझी पहिली नेमणूक होती ट्रेस रिऊस—रिओ दी झानेरु राज्यातील एक नगर.

सुरवातीला, ट्रेस रिऊस येथील लोक आमचा संदेश ऐकायला तयार नव्हते कारण आमच्याजवळ कॅथलिक बायबल नव्हते. पण, झराल्डु रामाल्यु नावाच्या एका कॅथलिक गृहस्थाबरोबर आम्ही बायबलचा अभ्यास सुरू केल्यावर आम्हाला मदत मिळाली. त्यांच्या मदतीने मला तिथल्या पाळकांची सही असलेले एक बायबल प्राप्त करता आले. त्यानंतर, कोणीही आक्षेप घेतल्यावर मी लगेच त्यांना पाळकांची सही दाखवायचे आणि मग सगळेजण गप्प राहायचे. झराल्डु यांचा नंतर बाप्तिस्मा झाला.

ट्रेस रिऊसच्या अगदी केंद्रीय भागात १९५९ साली विभागीय संमेलन भरवले गेले तेव्हा मला खूप आनंद झाला. त्या वेळी बायबलचा अभ्यास करणारे पोलिस अधिकारी यांनी संपूर्ण शहरात या कार्यक्रमाची जाहिरात करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्याचीही व्यवस्था केली. ट्रेस रिऊस येथे तीन वर्षे सेवा केल्यावर मला साऊ पाउलुच्या पश्‍चिमेकडे ११० किलोमीटर अंतरावर असलेल्या इटु येथे एका नवीन नेमणुकीचे आमंत्रण मिळाले.

लाल, निळी, पिवळी पुस्तके

थोडीफार शोधाशोध केल्यावर शहराच्या अगदी मध्यभागी मारिया नावाच्या एका मायाळू विधवेच्या घरात आम्हाला सोयीस्कर राहण्याचे ठिकाण मिळाले. मारिया आम्हाला तिच्या मुलींसारखीच वागवायची. पण लगेच, इटुचे रोमन कॅथलिक बिशप तिच्याकडे आले आणि आम्हाला पाठवून द्यावे असे तिला सांगितले; मारिया मात्र खंबीरपणे म्हणाली: “माझे पती वारले तेव्हा तुम्ही कुणीच माझं सांत्वन करायला आला नाहीत. पण या यहोवाच्या साक्षीदारांनी, मी त्यांच्या धर्मातली नसतानाही मला किती मदत दिली.”

त्याच दरम्यान, एका स्त्रीकडून आम्हाला कळाले की, इटुच्या कॅथलिक पाळकांनी आपल्या चर्चमधील लोकांना “सैतानाचं लाल पुस्तक” घेऊ नका असे सांगितले होते. ते “देव सत्य होवो” या बायबल आधारित प्रकाशनाविषयी म्हणत होते, कारण तेच प्रकाशन आम्ही त्या आठवड्यात लोकांना देत होतो. पाळकांनी लाल पुस्तकावर “बंदी” घातल्यामुळे आम्ही निळ्या पुस्तकाचा वापर करू लागलो (“नवे आकाश आणि नवी पृथ्वी,” इंग्रजी). नंतर, पाळकांना याचीही खबर लागली तेव्हा आम्ही पिवळे पुस्तक (धर्माने मानवजातीसाठी काय केले?, इंग्रजी) वापरू लागलो. आमच्याकडे विविध रंगात अनेक पुस्तके होती याचा पुष्कळ फायदा झाला.

इटुमध्ये एक वर्षभर राहिल्यावर, मला बेथेलमध्ये—रिओ दी झानेरु येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात—राष्ट्रीय संमेलनाच्या तयारीकरता तात्पुरत्या काळासाठी कामाला येण्याचे आमंत्रण देणारी एक तार मिळाली. मी आनंदाने ते आमंत्रण स्वीकारले.

अधिक सुहक्क आणि आव्हाने

बेथेलमध्ये तेव्हा भरपूर काम होते आणि कोणतेही काम करण्याची माझी तयारी होती. दररोज सकाळी दैनिक वचनाची चर्चा आणि सोमवारी संध्याकाळी टेहळणी बुरूज अभ्यास किती ज्ञानवर्धक होते! ओटो एस्टलमन आणि बेथेल कुटुंबातील इतर अनुभवी सदस्यांच्या मनःपूर्वक प्रार्थना अगदी हृदयाला भिडणाऱ्‍या होत्या.

राष्ट्रीय संमेलन पार पडल्यावर मी इटुला परत जाण्यासाठी सामानाची बांधाबांध केली, पण शाखा सेवक, ग्रँट मिलर यांनी मला बेथेल कुटुंबाची कायमची सदस्या होण्याचे आमंत्रण असलेले एक पत्र दिले; मला तर आश्‍चर्याचा धक्काच बसला. माझ्यासोबत सिस्टर होझा याझेदजियन राहत होत्या; त्या अजूनही ब्राझील बेथेलमध्ये आहेत. त्या काळी बेथेल कुटुंब फार लहान होते. आम्ही सगळे मिळून फक्‍त २८ लोक होतो आणि आम्ही सगळेजण मित्र-मैत्रिणींसारखे होतो.

सन १९६४ मध्ये, झ्वाउँ झनार्दी—एक तरुण पूर्ण-वेळेचा सेवक—बेथेलला प्रशिक्षणासाठी आला. त्यानंतर त्याला विभागीय सेवक किंवा प्रवासी पर्यवेक्षक म्हणून जवळपासच्या क्षेत्रात नेमण्यात आले. तो बेथेलमध्ये अहवाल द्यायला यायचा तेव्हा आमची भेट काही वेळा होत असे. शाखा सेवकाने झ्वाउँला सोमवार संध्याकाळी कौटुंबिक अभ्यासाला येण्याची परवानगी दिली आणि म्हणून आम्हा दोघांना भेटायला आणखी वेळ मिळायचा. ऑगस्ट १९६५ साली झ्वाउँ आणि माझा विवाह झाला. माझ्या पतीसोबत विभागीय कार्यात जाण्याचे आमंत्रणही मी आनंदाने स्वीकारले.

त्या काळी, ब्राझीलच्या आतल्या भागांमधले प्रवासी कार्य म्हणजे साहसी प्रवास होता. अरान्हा मिनास जेरायस राज्यातील प्रकाशकांच्या गटाला दिलेल्या भेटी मी कधीच विसरणार नाही. तिथे जायला आधी आम्हाला एक ट्रेन पकडावी लागायची आणि उर्वरित प्रवास पायी करावा लागायचा—तेही सूटकेसेस, टाईपराइटर, स्लाईड प्रोजेक्टर, प्रचाराच्या बॅगा, साहित्य वगैरे सगळे सामान उचलून. पण लुरीव्हाल शान्टाल नावाचे एक वयस्कर बांधव नेहमी आम्हाला मदत करायला स्टेशनावर यायचे. त्यांना पाहून आम्हाला खूप आनंद व्हायचा.

अरान्हा येथील सभा एका भाडोत्री घरात होत असत. आम्ही मागच्या बाजूला असलेल्या एका लहानशा खोलीत झोपायचो. एका बाजूला, स्वयंपाकासाठी आणि पाणी गरम करण्यासाठी चूल होती; बांधव आमच्यासाठी बादल्यांतून पाणी आणून द्यायचे. आणि जवळच्याच बांबूच्या बेटात जमिनीत खणलेला खड्डा म्हणजे आमचे शौचालय. बार्बर बीटल नावाच्या कीटकांपासून (या कीटकांमुळे चागास रोग होऊ शकतो) संरक्षणासाठी आम्ही रात्रभर गॅसलाईट सुरू ठेवायचो. सकाळी उठल्यावर आमच्या नाकात धुराची काजळी जमलेली असायची. एक आगळावेगळाच अनुभव होता तो.

पराना राज्यातील एका विभागात कार्य करत असताना, आम्हाला पुन्हा एकदा शाखा दफ्तराकडून एक मोठे तपकिरी पाकीट मिळाले. यहोवाच्या संघटनेकडून मिळालेले हे आणखी एक आमंत्रण होते—या वेळी पोर्तुगालमध्ये सेवा करण्याचे ते आमंत्रण होते! पत्रामध्ये आम्हाला लूक १४:२८ मधील तत्त्वावर विचार करायला आणि ही नेमणूक स्वीकारण्याआधी खर्चाचा अंदाज करायला सांगितले होते कारण तेथे आमच्या ख्रिस्ती सेवेवर बंदी होती आणि पोर्तुगीज सरकाराने आधीच पुष्कळ बांधवांना अटक केली होती.

अशाप्रकारचा विरोध असलेल्या ठिकाणी आम्ही जाणार होतो का? “आपले पोर्तुगीज बांधव जर तिथं राहून यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करू शकतात तर आपण का बरं करू शकत नाही?” असे झ्वाउँ म्हणाले. माझ्या बाबांचे उत्तेजनात्मक शब्द आठवून मीसुद्धा तयार होऊन म्हणाले: “यहोवाकडून हे आमंत्रण आलंय तर मग ते स्वीकारून आपण त्याच्यावर आपला भरवसा प्रकट केला पाहिजे.” लवकरच, आम्ही साओ पाउलुमधील बेथेलमध्ये पुढील सूचना आणि प्रवासासाठी कागदपत्रे तयार करायला गेलो.

झ्वाउँ मारिया आणि मारिया झ्वाउँ

आमची बोट, एउझेन्यू सी, साउ पाउलु राज्यातील सान्तोस बंदरातून सप्टेंबर ६, १९६९ रोजी निघाली. समुद्रात नऊ दिवस प्रवास केल्यावर आम्ही पोर्तुगालमध्ये पोहंचलो. सुरवातीला आम्ही पुष्कळ महिने लिसबनच्या जुन्या जिल्ह्यातील आल्फामा आणि मोरारियाच्या चिंचोळ्या आळींमध्ये अनुभवी बांधवांसोबत कार्य केले. पोलिसांनी आपल्याला पकडू नये म्हणून त्यांनी आम्हाला सावध राहायला शिकवले.

साक्षीदारांच्या घरांमध्ये मंडळ्यांच्या सभा भरवल्या जात असत. शेजारीपाजारी शंका घेऊ लागले आहेत असे दिसताच सभांचे ठिकाण लागलीच बदलण्यात येई, जेणेकरून घरावर छापा पडणार नाही किंवा बांधवांना अटक केली जाणार नाही. आमच्या सहली, म्हणजे संमेलने, लिसबनच्या बाहेर मोंसान्टु पार्कमध्ये आणि किनारपट्टीच्या जवळ दाट झाडी असलेल्या कोस्टा डे कापारिका येथे भरवली जात असत. आम्ही सगळेजण सहलीला जात असल्याप्रमाणे कपडे घालायचो आणि काही ठराविक सोयीच्या ठिकाणी काही सेवक पहारा देण्यासाठी थांबून राहायचे. यामुळे, कोणी संशयी व्यक्‍ती आली तर लगेच एखादा खेळ सुरू करायला, सहलीचे वातावरण निर्माण करायला किंवा एखादे लोकगीत सुरू करायला आम्हाला वेळ मिळायचा.

सुरक्षा दलाच्या पोलिसांना आम्हाला पटकन ओळखता येऊ नये म्हणून आम्ही आमची खरी नावे वापरायचे टाळत होतो. बांधव आम्हाला झ्वाउँ मारिया आणि मारिया झ्वाउँ या नावांनी ओळखत असत. कोणत्याही पत्रव्यवहारात किंवा नोंदणीसाठी आमची नावे वापरली जात नव्हती. तर आम्हाला नंबर देण्यात आले होते. मी मुद्दामहून बांधवांच्या घरांचे पत्ते आठवणीत न ठेवायचा प्रयत्न करायचे. म्हणजे, मला अटक झालीच तर मी त्यांना काही माहिती देऊ शकणार नाही.

हे सर्व प्रतिबंध असतानाही, झ्वाउँ आणि मी साक्ष देण्याची एकही संधी सोडत नव्हतो कारण आमचे स्वातंत्र्य आमच्याकडून कधीही हिरावून घेतले जाईल याची आम्हाला जाणीव होती. आम्ही आमचा स्वर्गीय पिता, यहोवा याच्यावर विसंबून राहायला शिकलो. आमचा रक्षणकर्ता यानात्याने त्याने आपल्या देवदूतांचा अशातऱ्‍हेने वापर केला की, आम्हाला “जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा” प्रत्यय आला.—इब्री लोकांस ११:२७.

एकदा, पोर्टो येथे घरोघरच्या प्रचारकार्यात एक मनुष्य भेटला आणि त्याने आम्हाला त्याच्या घरात यायचा आग्रह केला. माझ्यासोबत असलेली बहीण लगेच तयार झाली, त्यामुळे मलाही आत जाणे भाग पडले. आत जाताच लष्करी पोषाखातील कोणा एका व्यक्‍तीचा फोटो अडकवलेला पाहून माझे धाबे दणाणले. आता काय करायचे? घरमालकाने आम्हाला बसायला सांगितले आणि मग त्याने मला विचारले: “तुमच्या मुलाला लष्करात भरती व्हायला सांगितले तर तुम्ही त्याला पाठवाल का?” स्थिती जरा नाजूक होती. मी शांतपणे पण मनातल्या मनात प्रार्थना केल्यावर असे उत्तर दिले: “मला मुलं नाहीत, त्यामुळे असा काल्पनिक प्रश्‍न मी जर तुम्हाला विचारला असता तर तुम्हीसुद्धा माझ्यासारखंच उत्तर दिलं असतं.” त्यावर तो गप्प झाला. मग मीच पुढे म्हटले: “पण जर तुम्ही मला, तुमचा भाऊ किंवा तुमचे वडील मरण पावल्यावर तुम्हाला कसं वाटेल, असा एखादा प्रश्‍न विचारलात तर मी तुम्हाला याचं उत्तर देऊ शकते कारण माझा भाऊ आणि माझे वडील दोघंही वारले आहेत.” त्याच्याशी बोलताना माझे डोळे भरून आले होते आणि त्याच्या डोळ्यातही पाणी तरळल्याचे मी पाहिले. त्याने सांगितले, की त्याची पत्नी अलीकडेच वारली होती. मी त्याला पुनरुत्थानाच्या आशेविषयी समजावून सांगितले तेव्हा तो लक्ष देऊन ऐकत होता. मग आम्ही त्याचा निरोप घेऊन सुरक्षितपणे तेथून बाहेर पडलो आणि सगळे काही यहोवाच्या हाती सोपवून दिले.

बंदी असतानाही प्रामाणिक लोकांना सत्याचे ज्ञान घेण्यासाठी मदत करण्यात येत होती. पोर्टोमध्ये असताना, माझ्या पतीने ओरासयू नावाच्या एका व्यापाऱ्‍यासोबत अभ्यास सुरू केला; त्याने फार लवकर प्रगती केली. नंतर त्याचा मुलगा एमील्यू—एक कुशल डॉक्टर—याने देखील यहोवाला स्वीकारले आणि बाप्तिस्मा घेतला. खरोखर, यहोवाच्या पवित्र आत्म्याला कोणीही रोखू शकत नाही.

“यहोवा कशाला अनुमती देईल हे सांगता येत नाही”

सन १९७३ मध्ये, झ्वाउँ आणि मला, बेल्जियममधील ब्रस्सल्स येथील “ईश्‍वरी विजय” आंतरराष्ट्रीय संमेलनाकरता आमंत्रण मिळाले. हजारोंच्या संख्येत स्पॅनिश आणि बेल्जियन बांधव आणि मोझांबिक, अंगोला, केप व्हर्दे, मदिरा, अझोरेस येथील प्रतिनिधीसुद्धा आले होते. आपल्या समारोपाच्या विवेचनात, न्यूयॉर्क येथील मुख्यालयातर्फे आलेले बंधू नॉर म्हणाले: “विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत राहा. यहोवा कशाला अनुमती देईल हे सांगता येत नाही. कोण जाणे, पुढचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन पोर्तुगालमध्येच होईल!”

त्याच्या पुढील वर्षातच पोर्तुगालमध्ये प्रचारकार्याला सरकाराकडून मान्यता प्राप्त झाली. आणि बंधू नॉर यांनी म्हटल्याप्रमाणेच, १९७८ मध्ये आम्ही लिसबन येथे आमचे पहिले आंतरराष्ट्रीय अधिवेशन भरवले. प्लाकार्ड, मासिके आणि जाहीर भाषणाच्या निमंत्रणांसह लिसबन शहरातून मोर्चा काढून साक्ष देण्याचा किती मोठा सुहक्क होता! ते जणू काही साकारलेले स्वप्नच होते!

आमच्या पोर्तुगीज बांधवांशी आमची सलगी वाढली होती; यांतल्या पुष्कळशा बांधवांनी ख्रिस्ती तटस्थतेमुळे तुरुंगातली शिक्षा आणि मार सहन केला होता. आम्हाला पोर्तुगालमध्येच राहून सेवा करायची इच्छा होती. पण, ते होऊ शकले नाही. सन १९८२ मध्ये, झ्वाउँला गंभीर प्रकारचा हृदयविकार जडला आणि शाखा दफ्तराने आम्हाला ब्राझीलला परतण्यास सुचवले.

कठीण काळ

ब्राझील शाखा दफ्तरातील बांधवांनी आम्हाला खूप मदत केली आणि साउ पाउलु राज्यातील टाउबाटे येथील किरीरीम मंडळीत सेवा करण्याची नेमणूक दिली. झ्वाउँची प्रकृती खालावतच गेली. नंतर तर ते घराबाहेरही पडू शकत नव्हते. आस्थेवाईक व्यक्‍ती आमच्या घरी येऊन बायबल अभ्यास करायचे आणि दररोजच्या क्षेत्र सेवेच्या सभा तसेच साप्ताहिक पुस्तक अभ्यासही घरीच होत होता. या तरतुदींमुळे आम्हाला आमची आध्यात्मिकता टिकवून ठेवता आली.

ऑक्टोबर १, १९८५ साली झ्वाउँचे निधन झाले; त्यांनी मरेपर्यंत आपल्या परीने जमेल तितके केले. त्यांच्या मृत्यूमुळे मी खूप दुःखी आणि निराश झाले पण मी माझी नेमणूक सोडायची नाही असा निश्‍चय केला होता. पण एप्रिल १९८६ साली आणखी एक दुर्घटना घडली; चोरांनी आमचे घर फोडले आणि होते नव्हते ते सगळे काही लुटून नेले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला एकटेपणा जाणवला; मी खूप घाबरले होते. एका जोडप्याने मला त्यांच्याबरोबर काही दिवस राहायला बोलावले; त्यांची मी सदैव ऋणी राहीन.

झ्वाउँचा मृत्यू आणि घरफोडी यांचा माझ्या सेवेवरही परिणाम झाला. मला सेवेत कार्य करण्यासाठी आधीसारखा आत्मविश्‍वास उरला नाही. ही अडचण मी शाखा दफ्तराला लिहून कळवली. भावनिकरित्या मी स्वतःला सावरेपर्यंत शाखेने मला बेथेलमध्ये येऊन राहण्याचे निमंत्रण दिले. त्याने मला खरोखर खूप आधार मिळाला!

मला थोडे बरे वाटताच मी साउ पाउलु राज्यातील इपुआ शहरात एक नेमणूक स्वीकारली. प्रचारकार्यात मी व्यस्त राहिले खरी पण काही वेळा मी निराशही होत असे. कधीकधी, मी किरीरीम येथील बांधवांना फोन करायचे आणि एक कुटुंब काही दिवसांकरता माझ्यासोबत येऊन राहायचे. या भेटींमुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले! इपुआ येथील नेमणुकीतल्या माझ्या पहिल्या वर्षात, ३८ विविध बांधव दूरचा प्रवास करून मला भेटायला आले.

सन १९९२ मध्ये, झ्वाउँच्या मृत्यूच्या सहा वर्षांनंतर, यहोवाच्या संघटनेकडून मला दुसरे एक आमंत्रण मिळाले. हे आमंत्रण, साउ पाउलु राज्यातील फ्रँका येथे पूर्ण-वेळेची सेविका म्हणून कार्य करण्याचे होते. इथले क्षेत्र फार फलदायी आहे. १९९४ साली मी इथल्या नगराध्यक्षांसोबत बायबल अभ्यास सुरू केला. त्या वेळी, ते ब्राझीलच्या महासभेतील जागेसाठी निवडणुकीत उभे राहिले होते; त्यांच्याकडे फारसा वेळ नसतानाही आम्ही प्रत्येक सोमवारी दुपारच्या वेळी अभ्यास करत होतो. अभ्यासाच्या वेळी कोणतेही व्यत्यय येऊ नये म्हणून ते आपला फोन बंद ठेवत असत. हळूहळू त्यांनी राजकारण सोडले. आणि आपला मोडकळीस आलेला विवाह सत्यामुळे सावरला! हे सगळे पाहून मला खूप आनंद होत असे. १९९८ साली त्यांनी व त्यांच्या पत्नीनेही बाप्तिस्मा घेतला.

गत वर्षांचा विचार केल्यावर पूर्ण-वेळेची सेविका यानात्याने माझे जीवन प्रचंड आशीर्वाद व सुहक्कांनी भरलेले आहे असे मी म्हणू शकते. यहोवाने आपल्या संघटनेकरवी दिलेल्या आमंत्रणांचा स्वीकार केल्याने मला खरोखर फायदे मिळाले आहेत. भविष्यातही कोणती आमंत्रणे आली तर मी पूर्वीसारख्याच निश्‍चयाने ती स्वीकारत राहीन.

[२५ पानांवरील चित्रे]

मी १९५७ मध्ये पूर्ण-वेळेच्या सेवेत उतरले तेव्हा, आणि आता

[२६ पानांवरील चित्र]

ब्राझील बेथेल कुटुंबासोबत १९६३ साली

[२७ पानांवरील चित्र]

ऑगस्ट १९६५ मध्ये आमचा विवाह

[२७ पानांवरील चित्र]

कार्यावर बंदी असताना पोर्तुगालमधील एक संमेलन

[२८ पानांवरील चित्र]

लिसबन येथे १९७८ च्या “विजयी ठरलेला विश्‍वास” आंतरराष्ट्रीय अधिवेशनादरम्यान रस्त्यावरील साक्षकार्य करत असताना