व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा

यहोवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा

यहोवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा

“देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.

१, २. (अ) भीती बाळगल्यामुळे आपल्याला शारीरिकरित्या कशाप्रकारे संरक्षण मिळू शकते? (ब) जाणते आईवडील आपल्या मुलांच्या मनात सुदृढ भीती निर्माण करण्याचा प्रयत्न का करतात?

 लियोनार्डो डा विन्ची याने एकदा म्हटले: “धैर्यामुळे जीव धोक्यात येतो, तर भीती बाळगल्याने त्याचे संरक्षण होते.” फाजील धैर्यामुळे माणूस धोकेदायक परिस्थितीकडे पाहून न पाहिल्यासारखे करतो, पण भय त्याला सांभाळून पाऊल उचलण्याची आठवण करून देते. उदाहरणार्थ, एखाद्या डोंगराच्या अगदी कडेला उभे राहून खाली पाहिल्यावर खोल दरी दिसताच आपण लगेच मागे होतो. त्याचप्रकारे, सुदृढ भीती बाळगल्यामुळे आपण देवासोबत एक चांगला नातेसंबंध जोपासू शकतो; इतकेच नव्हे तर ही भीती इजा होण्यापासूनही आपले संरक्षण करते.

पण आधुनिक जीवनातील बऱ्‍याच धोकेदायक गोष्टींची भीती बाळगायला आपल्याला शिकावे लागते. लहान मुलांना विजेच्या किंवा शहरातील वाहतुकीच्या धोक्यांविषयी कल्पना नसल्यामुळे त्यांचा गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. * म्हणूनच जाणते आईवडील आपल्या मुलांच्या मनात या धोकेदायक गोष्टींविषयीचे सुदृढ भय निर्माण करण्यासाठी त्यांना वारंवार सूचना देत असतात. ही भीती बाळगल्यामुळे मुलांचे जीवन वाचू शकते याची आईवडिलांना जाणीव असते.

३. यहोवा आपल्याला आध्यात्मिक धोक्यांविषयी का व कशी सूचना देतो?

यहोवालाही आपल्या सुरक्षेविषयी काळजी वाटते. एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे तो आपल्याला त्याच्या वचनाद्वारे व त्याच्या संघटनेद्वारे आपल्याकरता हितकारक असणाऱ्‍या मार्गाने चालण्यास शिकवतो. (यशया ४८:१७) देवाच्या या शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक धोक्यांचे सुदृढ भय विकसित करता यावे म्हणून त्यांपासून सावध राहण्याची “वारंवार” आठवण करून दिली जाते. (२ इतिहास ३६:१५, NW; २ पेत्र ३:१) लोकांनी ‘देवाचे भय धरणारे व त्याच्या सर्व आज्ञांचे पालन करणारे हृदय उत्पन्‍न केले असते’ तर इतिहासातील कितीतरी आध्यात्मिक शोकांतिका घडल्याच नसत्या. (अनुवाद ५:२९, NW) या ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांत’ आपण देवाचे भय धरणारे हृदय कसे उत्पन्‍न करू शकतो आणि त्याद्वारे आध्यात्मिक धोक्यांपासून सुरक्षित कसे राहू शकतो?—२ तीमथ्य ३:१.

वाईटाकडे पाठ फिरवणे

४. (अ) ख्रिश्‍चनांनी कोणत्या प्रकारचा द्वेष निर्माण करावा? (ब) पापपूर्ण आचरणाविषयी यहोवाला कसे वाटते? (तळटीप पाहा.)

बायबल स्पष्टपणे सांगते की “परमेश्‍वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय.” (नीतिसूत्रे ८:१३) एका बायबल शब्दकोषात केलेल्या व्याख्येनुसार द्वेष म्हणजे “ज्या व्यक्‍तींबद्दल किंवा वस्तूंबद्दल एखाद्याला शत्रुत्व, घृणा अथवा तिरस्कार वाटतो आणि ज्यांसोबत कोणताही संपर्क किंवा संबंध ठेवावासा वाटत नाही अशांप्रती असलेली भावनिक मनोवृत्ती.” त्याअर्थी, देवाचे भय बाळगणे म्हणजे यहोवाच्या नजरेत वाईट असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनातून तिटकारा किंवा घृणा वाटणे. * (स्तोत्र ९७:१०) डोंगराच्या कड्यावरून खाली पाहताच ज्याप्रमाणे आपल्या मनात आपोआपच धोक्याची घंटा वाजते आणि आपण लगेच दोन पावले मागे होतो, त्याचप्रमाणे वाईटाविषयी वाटणारी द्वेषाची भावना आपल्याला वाईट गोष्टींकडे पाठ फिरवण्यास प्रवृत्त करते. बायबल म्हणते: “परमेश्‍वराचे भय बाळगिल्याने मनुष्ये दुष्कर्मांपासून दूर राहतात.”—नीतिसूत्रे १६:६.

५. (अ) आपण आपल्या मनात देवाचे भय व वाईट गोष्टींविषयीचा द्वेष वाढवण्यासाठी काय करू शकतो? (ब) या संदर्भात इस्राएल राष्ट्राच्या इतिहासावरून आपल्याला काय शिकायला मिळते?

पापी आचरणामुळे शेवटी काय दुष्परिणाम होतात यावर मनन केल्यामुळे देवाविषयीचे हितकारक भय आणि वाईट गोष्टींविषयी द्वेष आपल्या मनात आपोआपच वाढेल. बायबल खात्रीपूर्वक सांगते, की आपण जे काही पेरतो—मग ते देहस्वभावासाठी असो अथवा आत्मिक गोष्टींसाठी असो आपल्याला त्यानुसारच फळ मिळेल. (गलतीकर ६:७, ८) म्हणूनच यहोवाने, त्याच्या आज्ञांकडे दुर्लक्ष केल्यामुळे व खरी उपासना सोडून दिल्यामुळे होणाऱ्‍या निश्‍चित परिणामांविषयी अगदी स्पष्टपणे वर्णन केले. देवाच्या संरक्षणाशिवाय इस्राएलचे लहानसे, दुर्बल राष्ट्र त्यांच्या क्रूर व शक्‍तिशाली शेजारी राष्ट्रांच्या सहज कह्‍यात येतील असे यहोवाने सांगितले होते. (अनुवाद २८:१५, ४५-४८) इस्राएलच्या आज्ञाभंजक वृत्तीमुळे त्यांना भोगाव्या लागलेल्या दुःखद परिणामांविषयी बायबलमध्ये “आपल्या बोधासाठी” सविस्तर वर्णन केले आहे जेणेकरून आपण त्यांच्या उदाहरणावरून धडा घ्यावा आणि देवाचे भय मानण्यास शिकावे.—१ करिंथकर १०:११.

६. देवाचे भय मानायला शिकण्यासाठी आपण कोणत्या शास्त्रवचनीय उदाहरणांवर विचार करू शकतो? (तळटीप पाहा.)

सबंध इस्राएल राष्ट्राच्या बाबतीत काय घडले हे सांगण्याव्यतिरिक्‍त बायबल आपल्याला अशा अनेक जणांचे वास्तविक वैयक्‍तिक अनुभव देखील सांगते जे मत्सर, अनैतिकता, लोभ किंवा गर्वाला बळी पडले. * यांपैकी काहीजणांनी कित्येक वर्षे यहोवाची सेवा केली होती पण त्यांच्या जीवनातील कोणत्यातरी महत्त्वाच्या वळणावर त्यांच्या मनात देवाचे भय हवे तितके प्रबळ नसल्यामुळे त्यांना दुःखद परिणाम भोगावे लागले. अशा उदाहरणांवर मनन केल्यास, त्यांच्यासारख्याच चुका न करण्याचा आपला निर्धार अधिकच बळावतो. देवाचा सल्ला मनावर घेण्याकरता आपण स्वतःच्या जीवनात अशाप्रकारची एखादी दुःखद घटना घडेपर्यंत थांबलो तर ते खरोखर किती दुर्दैवी ठरेल! अनुभव सर्वात उत्तम शिक्षक असतो असे सर्वसामान्यपणे मानले जाते, पण सगळ्याच प्रकारच्या अनुभवांविषयी—खासकरून स्वैराचारी वागणुकीविषयी असे म्हणता येत नाही.—स्तोत्र १९:७.

७. यहोवा आपल्या लाक्षणिक मंडपात कोणाला आमंत्रित करतो?

देवाचे भय उत्पन्‍न करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण असे आहे की आपण देवासोबतचा आपला नातेसंबंध जोपासू इच्छितो. आपल्याला त्याची मैत्री बहुमोल वाटत असल्यामुळे त्याला नाखुष करायला आपण भितो. देव कोणाला आपला मित्र मानतो, त्याच्या लाक्षणिक मंडपात तो कोणाला आमंत्रित करतो? केवळ अशा माणसाला “जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो.” (स्तोत्र १५:१, २) जर आपल्याला आपल्या निर्माणकर्त्यासोबतचा आपला संबंध मोलाचा वाटत असेल तर आपण सदैव त्याच्या नजरेत निष्कलंक राहण्याची काळजी घेऊ.

८. मलाखीच्या काळातील काही इस्राएल लोकांनी कशाप्रकारे देवाच्या मैत्रीचे मोल जाणले नाही?

मलाखीच्या काळात, दुःखाची गोष्ट म्हणजे अनेकांनी देवासोबतच्या आपल्या मैत्रीचे मोल जाणले नाही. यहोवाचे भय मानण्याऐवजी व त्याचा सन्मान करण्याऐवजी त्यांनी त्याच्या वेदीवर रोगट आणि पांगळ्या पशूंचा बळी दिला. देवाविषयी त्यांच्या मनात पुरेशी भीती नव्हती हे विवाहाविषयीच्या त्यांच्या मनोवृत्तीतूनही प्रतिबिंबित झाले. तरुण स्त्रियांशी लग्न करण्यासाठी ते क्षुल्लक कारणांसाठी आपल्या तरुणपणाच्या बायकांना सूटपत्र देत होते. मलाखीने त्यांना सांगितले की यहोवाला “सूटपत्राचा” तिटकारा असून त्यांच्या विश्‍वासघातीपणामुळे ते देवापासून दुरावले होते. लाक्षणिक अर्थाने देवाची वेदी, सोडून दिलेल्या पत्नींच्या आसवांनी झाकली गेली होती, मग यहोवाने त्यांच्या बलिदानांवर कृपादृष्टी करणे कसे शक्य होते? यहोवाच्या दर्जांची या टोकापर्यंत पायमल्ली केल्यामुळे यहोवाने त्यांना विचारले: “माझे भय कोठे आहे?”—मलाखी १:६-८; २:१३-१६.

९, १०. आपल्याला यहोवाची मैत्री मोलाची वाटते हे आपण कसे दाखवू शकतो?

आजदेखील, स्वार्थी आणि अनैतिक पती व वडील किंवा पत्नी व माता यांमुळे ज्यांचे जीवन उध्वस्त झाले आहे अशा असंख्य निर्दोष जोडीदारांचे व मुलांचे दुःख यहोवाला दिसते. त्यालाही अतीव दुःख होत असेल यात शंका नाही. ज्याची देवाशी मैत्री आहे अशी व्यक्‍ती या गोष्टीकडे देवाच्याच दृष्टिकोनातून पाहील, आपले विवाहबंधन मजबूत बनवण्याचा कसोशीने प्रयत्न करेल, विवाहबंधनाला क्षुल्लक लेखणाऱ्‍या जगिक विचारसरणीचा धिक्कार करील आणि ‘जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढेल.’—१ करिंथकर ६:१८.

१० विवाह व जीवनातील इतर बाबींतही यहोवाच्या नजरेत वाईट असलेल्या सर्व गोष्टींचा द्वेष करून त्याच्या मैत्रीबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता बाळगल्यास आपल्यावर यहोवाची कृपादृष्टी होईल आणि तो आपल्याविषयी संतुष्ट होईल. प्रेषित पेत्राने ठामपणे म्हटले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) शास्त्रवचनांत आपल्याला अशा कित्येक जणांची उदाहरणे सापडतात ज्यांना वेगवेगळ्या कठीण परिस्थितींत देवाचे भय मानल्यामुळे योग्य ते करण्याची प्रेरणा मिळाली.

देवाला भिऊन वागलेले तीन जण

११. अब्राहामला कोणत्या परिस्थितीत “देवाला भिऊन चालणारा” असे म्हणण्यात आले?

११ बायबलमध्ये एका माणसाविषयी सांगितले आहे ज्याला यहोवाने स्वतःचा मित्र म्हटले. हा होता कुलपिता अब्राहाम. (यशया ४१:८) अब्राहामापासून एक मोठे राष्ट्र बनवण्याचे अभिवचन यहोवा ज्याच्याद्वारे पूर्ण करणार होता, त्या अब्राहामच्या एकुलत्या एक पुत्राचा, अर्थात इसहाकाचा बळी देण्यास यहोवाने सांगितले तेव्हा अब्राहामला यहोवाविषयी वाटणाऱ्‍या भयाची परीक्षा घेण्यात आली. (उत्पत्ति १२:२, ३; १७:१९) “देवाचा मित्र” ही दुःखदायक परीक्षा यशस्वीपणे पार करणार होता का? (याकोब २:२३) अब्राहामने इसहाकचा वध करण्याकरता आपल्या हातातील सुरा उचलताक्षणी यहोवाच्या देवदूताने म्हटले: “तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको; कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासहि माझ्यापासून राखून ठेवले नाही, यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले.”—उत्पत्ति २२:१०-१२.

१२. अब्राहामला देवाचे भय मानण्यास कशामुळे प्रेरणा मिळाली आणि आपणही अशी मनोवृत्ती कशी दाखवू शकतो?

१२ अब्राहामने पूर्वी देखील आपण यहोवाला भिऊन चालणारे असल्याचे सिद्ध केले होते तरीसुद्धा त्या प्रसंगी त्याने अतिशय विलक्षणरित्या देवाबद्दल त्याला असलेले भय दाखवले. इसहाकचा बळी देण्यास तयार होणे हे केवळ आदरपूर्वक आज्ञाधारकतेची बाब नव्हती. या कृतीतून, आपला स्वर्गीय पिता त्याचे अभिवचन निश्‍चित पूर्ण करेल आणि त्यासाठी आवश्‍यकता पडल्यास इसहाकला पुन्हा जिवंतही करेल याविषयी अब्राहामला संपूर्ण भरवसा होता हे दिसून आले. पौलाने लिहिल्याप्रमाणे, “देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासहि समर्थ आहे अशी [अब्राहामची] पक्की खातरी होती.” (रोमकर ४:१६-२१) देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता मोठे त्याग करावे लागले तरीसुद्धा आपण ती पूर्ण करण्यास तयार असतो का? यहोवा ‘त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना प्रतिफळ देणारा’ आहे हे माहीत असल्यामुळे त्याला आज्ञाधारक राहिल्यास दीर्घ पल्ल्यात आपला फायदाच होईल याची आपल्याला पूर्ण खातरी वाटते का? (इब्री लोकांस ११:६) देवाचे खरे भय हेच आहे.—स्तोत्र ११५:११.

१३. योसेफ स्वतःला “देवाचे भय बाळगणारा” का म्हणू शकला?

१३ आता आपण देवाचे भय मानणाऱ्‍या आणखी एका ज्वलंत उदाहरणाचे परीक्षण करू. हे आहे योसेफाचे उदाहरण. योसेफ पोटीफराच्या घरात दास असल्यामुळे त्याला जारकर्म करण्याच्या दबावाला दररोज तोंड द्यावे लागत होते. असे दिसते की, त्याला आपल्या मालकाच्या पत्नीसोबत संपर्क टाळता येण्यासारखा नव्हता, आणि ती सतत त्याला अनैतिक कृत्य करण्याची गळ घालत होती. शेवटी तिने ‘त्याचे वस्र धरले,’ तेव्हा “तो आपले वस्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला.” वाईट कृत्याकडे ताबडतोब पाठ फिरवण्यास कोणत्या गोष्टीने योसेफला प्रेरित केले? निश्‍चितच यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे त्याच्या मनात देवाचे भय होते, “एवढी मोठी वाईट गोष्ट करून . . . देवाच्या विरुद्ध पाप” न करण्याची इच्छा होती. (उत्पत्ति ३९:७-१२) म्हणूनच योसेफाने स्वतःचे वर्णन “देवाचे भय बाळगणारा” असे केले ते अगदी योग्य होते.—उत्पत्ति ४२:१८.

१४. योसेफने दाखवलेल्या दयेतून त्याला देवाविषयी वाटणारे भय कशाप्रकारे दिसून आले?

१४ कित्येक वर्षांनंतर, योसेफाला दास्यात विकणारे त्याचे भाऊ त्याला पुन्हा भेटले. ते अन्‍नास मोताद आहेत हे पाहून योसेफ सहज त्यांच्या लाचारीचा फायदा उचलून आपल्यावर केलेल्या अन्यायाचा बदला घेऊ शकत होता. पण जे लोकांशी क्रूरतेने वागतात ते आपल्या मनात देवाचे भय असल्याचे दाखवत नाहीत. (लेवीय २५:४३) म्हणूनच, आपले भाऊ आता बदलले आहेत याची खातरी पटल्यावर योसेफाने त्यांना दयाळूपणे क्षमा केले. योसेफप्रमाणेच देवाविषयी वाटणारी भीती आपल्याला बऱ्‍याने वाईटाला जिंकण्याची प्रेरणा देईल आणि वाईट गोष्टी करण्याच्या मोहाला बळी पडण्यापासून आपल्याला आवरेल.—उत्पत्ति ४५:१-११; स्तोत्र १३०:३, ४; रोमकर १२:१७-२१.

१५. ईयोबाच्या आचरणामुळे यहोवाचे मन का संतुष्ट झाले?

१५ देवाचे भय बाळगणाऱ्‍यांपैकी आणखी एक उल्लेखनीय उदाहरण ईयोबाचे होते. यहोवाने दियाबलाला म्हटले: “माझा सेवक ईयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.” (ईयोब १:८) अनेक वर्षांपर्यंत ईयोबाच्या निष्कलंक आचरणामुळे त्याच्या स्वर्गीय पित्याचे अर्थात यहोवाचे हृदय त्याच्याविषयी संतुष्ट होते. ईयोब देवाचे भय मानत होता कारण हेच योग्य आहे आणि हाच जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे हे त्याला माहीत होते. ईयोबाने म्हटले: “पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.” (ईयोब २८:२८) ईयोब एक विवाहित पुरुष असल्यामुळे त्याने कधीही तरुण स्त्रियांकडे अनुचित नजरेने पाहिले नाही किंवा आपल्या मनात व्यभिचारी कल्पनांना थारा दिला नाही. तो श्रीमंत असूनही त्याने आपल्या धनसंपत्तीवर भरवसा ठेवला नाही आणि सर्व प्रकारच्या मूर्तिपूजेचा त्याने धिक्कार केला.—ईयोब ३१:१, ९-११, २४-२८.

१६. (अ) ईयोबाने कशाप्रकारे दया दाखवली? (ब) ईयोबाने आपण क्षमा करण्यास तयार आहोत हे कसे दाखवले?

१६ पण देवाचे भय मानण्याचा अर्थ केवळ वाईटापासून दूर राहणेच नव्हे तर चांगली कृत्ये करणे असाही होतो. ईयोबाला अंधळ्या, लुळ्या आणि गोरगरिबांविषयी कळकळ होती. (लेवीय १९:१४; ईयोब २९:१५, १६) त्याला याची जाणीव होती, की “गलित झालेल्यावर दया करणे हा मित्रधर्म आहे; न केल्यास तो सर्वसमर्थाचे भय सोडून द्यावयाचा.” (ईयोब ६:१४) कोणाला क्षमा करण्यास नकार देणे किंवा कोणाविरुद्ध मनात अढी बाळगणे देखील दया न करण्यासारखेच आहे. ईयोबाच्या तीन मित्रांनी त्याला इतके दुःख देऊनसुद्धा देवाच्या निर्देशनानुसार त्याने त्यांच्या वतीने प्रार्थना केली. (ईयोब ४२:७-१०) कदाचित एखाद्या बांधवाने आपल्या भावना दुखावल्या असतील; मग आपणही ईयोबासारखी क्षमाशील मनोवृत्ती दाखवू शकतो का? आपले मन दुखवणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल प्रांजळपणे प्रार्थना केल्यास आपल्याला त्याच्याविरुद्धच्या कटू भावनांवर मात करण्यास मदत होईल. देवाचे भय मानल्यामुळे ईयोबाला जे उदंड आशीर्वाद मिळाले ते खरे तर ‘यहोवाचे भय धरणाऱ्‍यांकरिता त्याने साठवून ठेविलेल्या त्याच्या थोर चांगुलपणाची’ झलक देतात.—स्तोत्र ३१:१९; याकोब ५:११.

देवाचे भय विरुद्ध मनुष्याचे भय

१७. मनुष्याचे भय बाळगल्याने आपल्यावर कसा परिणाम होतो पण हे दूरदर्शीपणाचे का नाही?

१७ देवाचे भय आपल्याला योग्य ते करण्याची प्रेरणा देते पण मनुष्याचे भय मात्र आपल्या विश्‍वासाला कमकुवत करते. याच कारणामुळे प्रेषितांना आवेशीपणे सुवार्ता सांगण्याचे प्रोत्साहन देताना येशूने त्यांना म्हटले: “जे शरीराचा घात करितात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्‍या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या.” (मत्तय १०:२८) येशूने समजावल्याप्रमाणे मनुष्याचे भय मानणारे दूरदर्शी नाहीत कारण खरे पाहिल्यास मनुष्य भविष्यातील जीवनाची आशा आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाहीत. शिवाय, सर्व मानवी राष्ट्रांचे बळ एकवटले तरीसुद्धा ते यहोवाच्या विस्मयकारी सामर्थ्यापुढे नगण्य आहे याची आपल्याला जाणीव असल्यामुळे आपण त्याचे भय धरतो. (यशया ४०:१५) यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना पुनरुत्थित करण्यास समर्थ आहे या गोष्टीवर आपल्याला अब्राहामप्रमाणे पूर्ण विश्‍वास आहे. (प्रकटीकरण २:१०) म्हणूनच आपण पूर्ण विश्‍वासानिशी म्हणतो: “देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण?”—रोमकर ८:३१.

१८. यहोवा आपले भय मानणाऱ्‍यांना कशाप्रकारे प्रतिफळ देतो?

१८ आपला विरोध करणारा कुटुंबातील सदस्य असो वा धाकदपटशा करणारा शाळासोबती असो, “परमेश्‍वराचे भय धरिल्याने श्रद्धा दृढ होते” याची आपल्याला सत्यता पटेल. (नीतिसूत्रे १४:२६) देवाने आपल्याला शक्‍ती द्यावी म्हणून आपण त्याला प्रार्थना करू शकतो कारण तो आपल्या प्रार्थना ऐकेल हे आपल्याला माहीत आहे. (स्तोत्र १४५:१९) यहोवा त्याचे भय बाळगणाऱ्‍यांना कधीही विसरत नाही. आपला संदेष्टा मलाखी याच्याद्वारे तो आपल्याला असे आश्‍वासन देतो: “तेव्हा परमेश्‍वराचे भय बाळगणारे एकमेकांस बोलले; ते परमेश्‍वराने कान देऊन ऐकले, व परमेश्‍वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.”—मलाखी ३:१६.

१९. कोणत्या प्रकारचे भय नाहीसे होईल पण कोणते भय सदासर्वकाळ टिकून राहील?

१९ पृथ्वीवरील सर्व लोक यहोवाची उपासना करण्याची आणि मनुष्याचे भय पूर्णपणे नाहीसे होण्याची वेळ जवळ आली आहे. (यशया ११:९) उपासमार, रोगराई, गुन्हेगारी आणि युद्ध यांसारख्या गोष्टींची भीती देखील नाहीशी होईल. पण देवाचे भय सदासर्वकाळ टिकून राहील कारण स्वर्गात व पृथ्वीवर त्याचे सर्व विश्‍वासू सेवक सदासर्वकाळ त्याला योग्य आदर, आज्ञाधारकपणा आणि सन्मान दाखवत राहतील. (प्रकटीकरण १५:४) दरम्यान, आपण सर्वांनी शलमोनाचा हा प्रेरित सल्ला मनापासून स्वीकारला पाहिजे: “पातक्यांचा हेवा करू नको तर परमेश्‍वराचे भय अहर्निश बाळग; कारण पारितोषिक निश्‍चये मिळणार; तुझी आशा नष्ट होणार नाही.”—नीतिसूत्रे २३:१७, १८.

[तळटीपा]

^ कामाच्या ठिकाणी एखाद्या धोकेदायक परिस्थितीच्या वारंवार संपर्कात यावे लागल्यास काही प्रौढांची त्याविषयी भीती नाहीशी होते. अनेक सुतारांच्या हाताचे एक बोट गायब का असते असे विचारले असता एका अनुभवी कारागिराने असे उत्तर दिले: “अत्यंत वेगाने कार्य करणाऱ्‍या विद्युतचलित आऱ्‍यांची काही काळाने त्यांना भीती राहत नाही.”

^ स्वतः यहोवालाही ही घृणा वाटते. उदाहरणार्थ इफिसकर ४:२९ येथे वाईट भाषेला “कुजके भाषण” म्हटले आहे. “कुजके” असे भाषांतर केलेला ग्रीक शब्द मुळात सडलेली फळे, मासे किंवा मांसाला सूचित करतो. इतरांचा अपमान करणाऱ्‍या किंवा बीभत्स अशा भाषणाबद्दल आपल्याला कशाप्रकारे घृणा वाटली पाहिजे हे या शब्दातून अगदी स्पष्टपणे दिसून येते. त्याचप्रकारे, अनुवाद २९:१७ व यहेज्केल ६:९ यांसारख्या वचनांत वापरलेला “मूर्ती” हा शब्द मूळ इब्री भाषेत “विष्ठेसमान मूर्ती” असा आहे. विष्ठा अथवा मल याविषयी आपल्याला स्वाभाविकपणे किळस वाटते. यावरून, कोणत्याही प्रकारच्या मूर्तिपूजेविषयी देवाच्या कशा भावना आहेत हे समजण्यास आपल्याला मदत होते.

^ उदाहरणार्थ, पुढील व्यक्‍तींविषयी बायबलमधील वृत्तान्त वाचून पाहा: काईन (उत्पत्ति ४:३-१२); दावीद (२ शमुवेल ११:२–१२:१४); गेहजी (२ राजे ५:२०-२७); आणि उज्जिया (२ इतिहास २६:१६-२१).

तुम्हाला आठवते का?

• आपण वाईटाचा द्वेष करण्यास कसे शिकू शकतो?

• मलाखीच्या काळातील काही इस्राएल लोकांनी यहोवाच्या मैत्रीला कशाप्रकारे क्षुल्लक लेखले?

• देवाचे भय मानण्याच्या संदर्भात आपण अब्राहाम, योसेफ व ईयोब यांच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो?

• कोणत्याप्रकारचे भय कधीही संपुष्टात येणार नाही आणि का?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१९ पानांवरील चित्र]

सुज्ञ आईवडील आपल्या मुलांच्या मनात हितकारक भीती निर्माण करतात

[२० पानांवरील चित्र]

भय आपल्याला धोक्यापासून माघार घेण्यास प्रवृत्त करते त्याचप्रमाणे देवाचे भय आपल्याला वाईटाकडे पाठ फिरवण्यास प्रेरित करते

[२३ पानांवरील चित्र]

तीन नाममात्र मित्रांनी ईयोबाला दोषी ठरवले तरीसुद्धा ईयोबाने देवाचेच भय मानले

[चित्राचे श्रेय]

From the Bible translation Vulgata Latina, १७९५