व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुवर्ण नियम व्यावहारिक आहे

सुवर्ण नियम व्यावहारिक आहे

सुवर्ण नियम व्यावहारिक आहे

सुवर्ण नियम येशूने दिलेली नैतिक शिकवण आहे असे पुष्कळांचे मत असले तरीही स्वतः येशू म्हणाला: “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.”—योहान ७:१६.

होय, येशूने दिलेल्या शिकवणींचा तसेच सुवर्ण नियम म्हणून ओळखल्या गेलेल्या शिकवणीचा उगमकर्ता, येशूला पाठवणारा निर्माणकर्ता अर्थात यहोवा देव आहे.

प्रत्येक मानवाला ज्याप्रमाणे वागवलेले आवडेल तसेच त्यानेही इतरांना वागवावे हा देवाचा मूळ उद्देश होता. मानवांची निर्मिती करतेवेळी इतरांच्या हिताची चिंता करण्याचा गुण व्यक्‍त करण्यात त्याने स्वतःचे सर्वश्रेष्ठ उदाहरण मांडले: “देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.” (उत्पत्ति १:२७) याचा अर्थ, देवाचे मानवांवर प्रेम असल्यामुळे त्याने त्यांना काही प्रमाणात त्याचे उल्लेखनीय गुण दिले जेणेकरून शांतीने, आनंदाने आणि एकजुटीने—कदाचित सर्वकाळासाठी—जीवनाचा आनंद त्यांना घेता येईल. देवाने त्यांना दिलेल्या विवेकाला योग्य प्रशिक्षण दिल्यास, स्वतःला ज्याप्रमाणे वागवलेले आवडेल तसेच इतरांनाही वागवण्याचे मार्गदर्शन त्यांना मिळाले असते.

स्वार्थाचे वर्चस्व

मानवजातीला इतकी चांगली सुरवात मिळाली पण शेवटी काय झाले? स्वार्थाचा किळसवाणा गुण दिसू लागला. बायबलमध्ये उत्पत्ती ३ ऱ्‍या अध्यायात दिलेला पहिल्या मानवी दांपत्याचा अहवाल पुष्कळांना ठाऊक आहे. देवाचा अट्टल विरोधक, सैतान याच्या प्रभावात येऊन आदाम आणि हव्वेने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेता येण्यासाठी स्वार्थीपणे देवाचे अधिपत्य नाकारले. त्यांचे हे स्वार्थी आणि बंडखोरीचे कृत्य केवळ त्यांच्याकरताच हानीकारक ठरले नाही तर त्यांच्या सबंध भावी वंशजाकरताही नाशकारक ठरले. सुवर्ण नियम या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या शिकवणीकडे दुर्लक्ष केल्याच्या भयंकर परिणामाचा हा स्पष्ट पुरावा होता. याच कारणास्तव, “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ५:१२.

संपूर्ण मानवजातीनेच यहोवा देवाच्या प्रेमळ मार्गांकडे पाठ फिरवली तरीही त्याने त्यांना सोडले नाही. उदाहरणार्थ, यहोवाने इस्राएल राष्ट्राला मार्गदर्शनासाठी आपले नियमशास्त्र दिले. इतरांनी आपल्याला जशी वागणूक द्यावी असे आपल्याला वाटते तशी आपण स्वतः इतरांना द्यावी असे नियमशास्त्राने शिकवले. नियमशास्त्रामध्ये, गुलाम, अनाथ मुले आणि विधवा यांना कशाप्रकारे वागवावे याविषयी सूचना दिल्या होत्या. हल्ला, अपहरण आणि चोरी झाल्यास काय करावे हेसुद्धा सांगण्यात आले होते. स्वच्छतेविषयक नियमांद्वारे इतरांच्या आरोग्यासंबंधी चिंता दाखवली जात होती. लैंगिक संबंधांच्या बाबतीतही नियम देण्यात आले होते. “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर” असे आपल्या लोकांना सांगून यहोवाने त्याच्या नियमशास्त्राचा सार दिला. हे वाक्य नंतर येशूने उद्‌गारले. (लेवीय १९:१८; मत्तय २२:३९, ४०) नियमशास्त्रात, इस्राएलांमध्ये असलेल्या विदेश्‍यांना कशाप्रकारे वागणूक देण्यात यावी यासंबंधीही नियम होते. नियमशास्त्रात अशी आज्ञा होती: “उपऱ्‍यांवर जुलूम करू नको, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हाला जाणीव आहे; कारण मिसर देशात तुम्हीहि उपरी होता.” दुसऱ्‍या शब्दांत, इस्राएलांना प्रतिकूल परिस्थितीत असलेल्यांप्रती सहानुभूती दाखवायची होती.—निर्गम २३:९; लेवीय १९:३४; अनुवाद १०:१९.

इस्राएल राष्ट्राने नियमशास्त्राचे विश्‍वासूपणे पालन केले तोपर्यंत यहोवाने राष्ट्राला आशीर्वाद दिला. दावीद आणि शलमोन यांच्या कारकीर्दीत इस्राएल राष्ट्र संपन्‍न होते; लोक सुखी-समाधानी होते. एका ऐतिहासिक अहवालात असे म्हटले आहे: “यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनाऱ्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत. . . . सारे यहूदी व इस्राएल आपआपली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्‍यांच्याखाली . . . निर्भय राहत होते.”—१ राजे ४:२०, २५.

दुःखाची गोष्ट म्हणजे, इस्राएल राष्ट्राची शांती किंवा निर्भयता फार काळ टिकली नाही. देवाचे नियमशास्त्र असूनही इस्राएलांनी त्याचे पालन केले नाही; त्यांनी आपल्या स्वार्थीपणामुळे इतरांबद्दल काळजी करण्याचे सोडून दिले. यामुळे तसेच धर्मत्यागामुळे त्यांना व्यक्‍तिगतरित्या आणि राष्ट्र या नात्याने कष्ट सहन करावे लागले. शेवटी, सा.यु.पू. ६०७ मध्ये, यहोवाने बॅबिलोनी लोकांना यहूदाचे राष्ट्र, जेरूसलेम शहर आणि तेथील भव्य मंदिर देखील नष्ट करण्यास परवानगी दिली. का? कारण “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, तुम्ही माझी वचने ऐकली नाहीत, म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर याला बोलावून आणितो, असे परमेश्‍वर म्हणतो; त्यांस या देशावर, त्यातील रहिवाश्‍यांवर आणि आसपासच्या या सर्व राष्ट्रांवर आणितो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.” (यिर्मया २५:८, ९) यहोवाची शुद्ध उपासना त्यागल्याची केवढी मोठी किंमत मोजावी लागली!

अनुकरण करण्याजोगे उदाहरण

दुसऱ्‍या बाजूला पाहता, येशू ख्रिस्ताने केवळ सुवर्ण नियम शिकवला नाही तर त्याचे पालन करण्यात स्वतःचा उत्तम आदर्श देखील मांडला. इतरांच्या हिताची त्याला मनापासून चिंता होती. (मत्तय ९:३६; १४:१४; लूक ५:१२, १३) एकदा, नाईन गावाजवळ येशूला एक प्रेतयात्रा दिसली; एका विधवेच्या एकुलत्या एक मुलाची ती प्रेतयात्रा होती. त्या विधवेची स्थिती अगदी हृदयद्रावक होती. बायबलमधील अहवाल त्याविषयी असे सांगतो: “तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला.” (लूक ७:११-१५) व्हाईन्स एक्सपोसिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टमेंट वड्‌र्सनुसार, “कळवळा आला” या शब्दांतून “पोटातून उगळणे” हा अर्थ सूचित होतो. तिच्या अंतःकरणातील दुःख त्याला जाणवले आणि त्यामुळे तिचे दुःख दूर करण्यासाठी त्याने सकारात्मक पावले उचलली. त्याने त्या मुलाला पुनरुत्थित करून “त्याला त्याच्या आईच्या हवाली केले” तेव्हा त्या विधवेला किती आनंद झाला असावा हे वर्णन करण्यापलीकडे आहे!

मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या दास्यातून सुटका मिळावी म्हणून शेवटी, देवाच्या उद्देशानुरूप येशूने स्वेच्छेने त्रास सहन केला आणि खंडणी म्हणून आपले जीवन देऊ केले. सुवर्ण नियमानुसार जगण्याचा हा सर्वश्रेष्ठ नमुना होता.—मत्तय २०:२८; योहान १५:१३; इब्री लोकांस ४:१५.

सुवर्ण नियमाचे पालन करणारे लोक

आपल्या काळात, सुवर्ण नियमानुसार जगणारे लोक खरोखरच आहेत का? होय आहेत आणि हे लोक फक्‍त जमेल तेव्हाच या नियमाचे पालन करत नाहीत. उदाहरणार्थ, दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान नात्सींचे शासन असलेल्या जर्मनीत, यहोवाच्या साक्षीदारांनी देवावरील विश्‍वास आणि शेजाऱ्‍याप्रती प्रेम कायम ठेवले आणि सुवर्ण नियमाशी हातमिळवणी करायला नकार दर्शवला. पूर्ण राष्ट्र यहुद्यांचा द्वेष आणि विरोध करत असताना यहोवाचे साक्षीदार मात्र सुवर्ण नियमाचे पालन करत राहिले. छळ छावण्यांमध्ये देखील त्यांना इतर लोकांबद्दल चिंता होती; स्वतःजवळचे थोडेफार अन्‍न देखील ते यहुदी तसेच गैर-यहुदी यांच्यामध्ये वाटून खात असत. शिवाय, राष्ट्राने त्यांना इतरांची हत्या करण्यासाठी शस्त्र घेण्याची आज्ञा दिली तरी त्यांनी नकार दिला; स्वतःची हत्या होऊ नये त्याचप्रमाणे इतरांचीही हत्या होऊ नये असे त्यांना वाटत होते. ज्यांच्यावर स्वतःप्रमाणे प्रेम करण्याची आज्ञा देण्यात आली होती, त्यांना ते कसे मारू शकत होते? नकार दिल्यामुळे पुष्कळांना फक्‍त छळ छावण्यांमध्येच पाठवण्यात आले नाही तर मृत्यूदंडही देण्यात आला.—मत्तय ५:४३-४८.

हा लेख वाचत असताना, सुवर्ण नियमाच्या प्रत्यक्ष आचरणाच्या आणखी एका उदाहरणाचा तुम्हाला फायदा होत आहे. यहोवाच्या साक्षीदारांना याची जाणीव आहे की, अनेक लोकांची अगदी दयनीय आणि असहाय स्थिती आहे. यामुळेच, साक्षीदार स्वच्छेने पुढे येऊन लोकांना बायबलमधील आशा आणि व्यावहारिक मार्गदर्शन देतात. हे जागतिक स्तरावर आणि अभूतपूर्व प्रमाणात होणारे एक शैक्षणिक कार्य आहे. याचा परिणाम? यशया २:२-४ येथे भविष्यवाणी केल्याप्रमाणे, “लोकांच्या झुंडी” अर्थात जगभरात जवळजवळ ६० लाखांहून अधिक लोकांना ‘यहोवाचे मार्ग शिकवले आहेत आणि ते त्याच्या पथांनी चालत आहेत.’ लाक्षणिकरित्या, ते ‘आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करायला आणि आपल्या भाल्याच्या कोयत्या करायला’ शिकले आहेत. या संकटमय काळात त्यांना शांती आणि सुरक्षिततेचा शोध लागला आहे.

तुमच्याबद्दल काय?

दियाबल सैतानाने एदेन बागेत बंडाळीला प्रवृत्त केल्यापासून सुवर्ण नियम न जुमानल्यामुळे मानवजातीवर किती कष्ट आणि दुःख आले आहे याची क्षणभर कल्पना करा. या परिस्थितीला फार लवकर बदलून टाकण्याचा यहोवाचा उद्देश आहे. कशाप्रकारे? “सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला.” (१ योहान ३:८) हे देवाच्या राज्याच्या शासनामध्ये येशू ख्रिस्ताच्या—ज्याने सुवर्ण नियमाचे पालन करायला शिकवले आणि स्वतःही केले—सुज्ञ आणि कार्यक्षम राजकारभारात घडेल.—स्तोत्र ३७:९-११; दानीएल २:४४.

प्राचीन इस्राएलच्या राजा दावीदाने असे निरीक्षण केले: “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही. तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो; त्याची संतति आशीर्वादित असते.” (स्तोत्र ३७:२५, २६) आज बहुतेक लोकांची ‘उदार असण्याची किंवा उसने देण्याची’ प्रवृत्ती नाही तर घेण्याची आणि हिसकावण्याची प्रवृत्ती आहे, नाही का? स्पष्टतः, सुवर्ण नियमाचे पालन केल्याने खरी शांती आणि सुरक्षितता मिळते कारण त्यामुळे सद्य काळातही आशीर्वाद मिळतात आणि भविष्यात देवाच्या राज्यातही मिळतील. देवाचे राज्य पृथ्वीवरून स्वार्थीपणा आणि दुष्टपणाचे नामोनिशाण मिटवून टाकील तसेच सध्याचे भ्रष्ट मानवी शासन काढून देवाची नवीन व्यवस्था स्थापन करील. मग, सर्वांना सुवर्ण नियमानुसार जगण्यात आनंद मिळेल.—स्तोत्र २९:११; २ पेत्र ३:१३.

[४, ५ पानांवरील चित्रे]

येशूने सुवर्ण नियम केवळ शिकवला नाही तर त्याचे पालन करण्यात स्वतःचा सर्वोत्तम आदर्श मांडला

[७ पानांवरील चित्रे]

सुवर्ण नियम पालन केल्याने खरी शांती आणि सुरक्षितता मिळू शकते