व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुवर्ण नियम सार्वत्रिक शिकवण

सुवर्ण नियम सार्वत्रिक शिकवण

सुवर्ण नियम सार्वत्रिक शिकवण

“लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”मत्तय ७:१२.

येशू ख्रिस्ताने हे शब्द पर्वतावरील प्रसिद्ध प्रवचनात जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी उद्‌गारले होते. या साध्याशा वाक्याविषयी, शतकानुशतकांपासून पुष्कळ काही म्हटले गेले आहे आणि लिहिले गेले आहे. उदाहरणार्थ, “शास्त्रवचनांचा गाभा,” “ख्रिश्‍चनाचे आपल्या शेजाऱ्‍याप्रती असलेल्या कर्तव्याचे सार,” आणि “मूलभूत नैतिक तत्त्व” असे प्रशंसोद्‌गार या वाक्याविषयी काढण्यात आले आहेत. हे वाक्य इतके जगप्रसिद्ध आहे की त्याला सुवर्ण नियम या नावाने सहसा ओळखले जाते.

परंतु, सुवर्ण नियम केवळ तथाकथित ख्रिस्ती जगापुरताच मर्यादित नाही. यहुदी धर्म, बौद्ध धर्म आणि ग्रीक तत्त्वज्ञान या सर्वांमध्ये अनेक पद्धतींनी हे नीतिवचन समजावण्यात आले आहे. पौवार्त्य देशांमध्ये सर्वात महान संत आणि शिक्षक यानात्याने पूज्य मानलेल्या कन्फ्यूशसचे एक वाक्य दूरच्या पूर्वेकडील लोकांना खासकरून अवगत आहे. कन्फ्यूशसच्या फोर बुक्स नावाच्या चार पुस्तकांच्या संग्रहातील द ॲनलेक्ट्‌स या तिसऱ्‍या पुस्तकात हा विचार तीन वेळा व्यक्‍त करण्यात आला आहे. आपल्या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना दोनदा कन्फ्यूशस असे म्हणाला: “जे तुम्हाला होऊ नये असे तुम्हाला वाटते, ते इतरांना करू नका.” दुसऱ्‍या एके प्रसंगी, ड्‌जगाँग नावाच्या त्याच्या शिष्याने अशी फुशारकी मारली की, “इतरांनी माझ्याशी जसे वागू नये असे मला वाटते तसे मीही इतरांशी वागत नाही.” यावर गुरूने असे प्रत्युत्तर दिले, “खरे आहे, पण हे तुला अद्याप जमलेले नाही.”

हे वाचल्यावर असे लक्षात येते की, येशूने जे नंतर म्हटले ते कन्फ्यूशसने नकारात्मक पद्धतीने मांडले होते. यातला स्पष्ट फरक हा आहे की, येशूने दिलेल्या सुवर्ण नियमानुसार इतरांचे चांगले करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. समजा, इतरांची काळजी घेऊन, इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करून दररोजच्या जीवनात या नियमाचा अंमल करण्याद्वारे येशूच्या या सकारात्मक विधानाचे लोक पालन करू लागले तर? जग सुधारेल असे तुम्हाला वाटते का? शंकाच नाही.

हा नियम सकारात्मक, नकारात्मक किंवा इतर कोणत्याही पद्धतीने सांगितला असला तरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की, वेगवेगळ्या कालखंडातील, ठिकाणांतील आणि पार्श्‍वभूमीतील लोकांनी सुवर्ण नियमावर भरवसा केला आहे. यावरून हेच दिसते की, डोंगरावरील प्रवचनात येशूने दिलेली शिकवण विश्‍वव्यापी आहे, कोणत्याही कालखंडात, कोठेही राहत असलेल्या व्यक्‍तीच्या जीवनाला ती लागू होते.

स्वतःला विचारा: ‘मला आदराने, निःपक्षपातीपणे, प्रामाणिकपणे वागवलेले आवडेल का? मला जातीय भेदभाव, गुन्हेगारी, युद्ध नसलेल्या जगात राहायला आवडेल का? एकमेकांबद्दल काळजी दाखवणाऱ्‍या आणि एकमेकांच्या हिताची चिंता करणाऱ्‍या कुटुंबात असायला मला आवडेल का?’ खरे पाहता, कोणीही याला नकार देणार नाही. पण वास्तविकता ही आहे की, बोटांवर मोजणाऱ्‍या लोकांनाच हे सुख मिळते. बहुसंख्य लोक याची कल्पनासुद्धा करू शकत नाहीत.

डागाळलेला सुवर्ण नियम

लोकांच्या हक्कांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मानवतेविरुद्ध केलेले गुन्हे इतिहासात पाहायला मिळतात. आफ्रिकेतील लोकांची गुलामगिरी, नात्सींच्या मृत्यूच्या छावण्या, जबरदस्तीने करवलेली बालमजुरी, अनेक ठिकाणी घडणारे अत्यंत क्रूर नरसंहार ही याची काही उदाहरणे आहेत. या भयंकर अत्याचारांच्या यादीला काही अंत नाही.

आज, अत्याधुनिक साधनांनी युक्‍त असलेले आपले प्रगत जग स्वार्थी आहे. स्वतःच्या सोयीनुसार एखादी गोष्ट नसेल किंवा स्वतःच्या हक्कांना हानी पोहंचत असेल तर इतरांचा विचार कोणी करत नाही. (२ तीमथ्य ३:१-५) लोक इतके स्वार्थी, क्रूर, निर्दयी आणि आत्म-केंद्रीत का बनले आहेत? आज सुवर्ण नियम सर्वांना ठाऊक असला तरीही तो अव्यावहारिक आणि केवळ एक पुरातन नैतिक तत्त्व आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे हे त्याचे कारण असावे का? दुःखाची गोष्ट म्हणजे, देवावर विश्‍वास ठेवण्याचा दावा करणारे अनेक लोकही असाच विचार करतात. ज्याप्रकारे आज सर्वकाही चालले आहे ते पाहून तर हाच निष्कर्ष काढता येईल की लोक अधिक आत्म-केंद्रीत बनतील.

त्यामुळे, विचारात घेण्याजोगे महत्त्वाचे प्रश्‍न असे आहेत: सुवर्ण नियमाचे पालन करण्याचा काय अर्थ होतो? आज याचे पालन कोणी करते का? सुवर्ण नियमाचे तंतोतंत पालन केले जाईल अशा काळाचा अनुभव मानवजातीला कधी येईल का? या प्रश्‍नांची सत्य उत्तरे मिळवण्यासाठी, कृपया पुढील लेख वाचा.

[३ पानांवरील चित्र]

कन्फ्यूशस आणि इतरांनी सुवर्ण नियम विविध पद्धतींनी शिकवला