व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरा येशू

खरा येशू

खरा येशू

लोकांचे आपल्याविषयी काय मत आहे हे आपल्या प्रेषितांकडून कळाल्यावर येशूने त्यांना विचारले: “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” मत्तयाच्या शुभवर्तमानात प्रेषित पेत्राचे उत्तर नमूद केले आहे: “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.” (मत्तय १६:१५, १६) इतरांचेही तेच मत होते. कालांतराने, येशूचा प्रेषित बनलेल्या नथनेलने येशूला म्हटले: “गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहा.” (योहान १:४९) येशूने स्वतः त्याच्या भूमिकेच्या महत्त्वाविषयी असे म्हटले: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” (योहान १४:६) विविध प्रसंगी त्याने स्वतःला ‘देवाचा पुत्र’ म्हणवले. (योहान ५:२४, २५; ११:४) चमत्कारांद्वारे आणि मेलेल्या लोकांना उठवण्याद्वारेही त्याने आपला दावा खरा असल्याचे सिद्ध करून दाखवले.

साधार शंका?

पण शुभवर्तमानांनी चित्रित केलेल्या येशूवर आपण भरवसा करू शकतो का? ते खऱ्‍या येशूचे चित्र रेखाटतात का? इंग्लंडच्या मँचेस्टर विद्यापीठात बायबल आधारित टीका आणि स्पष्टीकरण या विषयाचे प्राध्यापक, फ्रेडरिक एफ. ब्रुस (जे सध्या हयात नाहीत) यांनी म्हटले: “एखाद्या प्राचीन लिखाणातील—मग ते बायबलचे असो नाहीतर दुसरे एखादे लिखाण असो—प्रत्येक तपशीलाची सत्यता ऐतिहासिक युक्‍तिवादाच्या आधारे सिद्ध करणे सहसा शक्य नसते. एखाद्या लेखकाच्या सर्वसाधारण विश्‍वसनीयतेवर माफक प्रमाणात आत्मविश्‍वास असणे पुरेसे आहे; असे झाल्यास आपोआपच त्याचे तपशील खरे असण्याची शक्यता आहे. . . . ख्रिस्ती लोक नव्या कराराला ‘पवित्र’ ग्रंथ मानतात याचा अर्थ तो ऐतिहासिकरित्या विश्‍वसनीय असण्याची शक्यता कमी आहे असे नाही.”

शुभवर्तमानांमधील येशूच्या संदर्भात असलेल्या शंकांचे परीक्षण केल्यावर अमेरिकेतील उत्तर डॅकोटा येथील जेम्सटाऊन महाविद्यालयातील धर्माचे प्राध्यापक, जेम्स आर. एडवड्‌र्स यांनी लिहिले: “आम्ही खात्रीने हे म्हणू शकतो की, शुभवर्तमानांमध्ये येशूविषयीच्या नेमक्या सत्याचा वैविध्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पुरावा टिकून राहिला आहे. . . . शुभवर्तमानांमध्ये येशूचे असे वर्णन का केले आहे या प्रश्‍नाचे सर्वात तर्कशुद्ध उत्तर हेच आहे की, येशू मुळातच तसा होता. येशूला देवाने पाठवले होते आणि त्याला आपला पुत्र व सेवक ठरवले होते ही त्याच्या अनुयायांवर पडलेली छाप शुभवर्तमानांमध्ये जशी का तशी टिकवून ठेवली आहे.” *

येशूच्या शोधात

येशू ख्रिस्ताविषयी बायबलच्या बाहेरील संदर्भांबाबत काय? त्यांच्या खरेपणाविषयी काय? टॅसिटस, सूटोनियस, जोसिफस, छोटा प्लायनी आणि इतर काही ग्रीक व रोमन लेखकांच्या साहित्यात येशूबद्दलचे अनेक संदर्भ आहेत. यांविषयी द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका (१९९५) म्हणते: “हे स्वतंत्र अहवाल सिद्ध करतात की, प्राचीन काळात ख्रिस्ती धर्माच्या विरोधकांनी देखील येशू एक खरी व्यक्‍ती होती याबद्दल शंका केली नाही; पण १८ व्या शतकाच्या शेवटी, १९ व्या शतकात आणि २० व्या शतकाच्या सुरवातीला पहिल्यांदा याबद्दल शंका व्यक्‍त करण्यात आली आणि तेही अपुऱ्‍या कारणांवरून.”

आधुनिक विद्वानांनी, “खरा” किंवा “ऐतिहासिक” येशू मिळवायच्या शोधात निराधार तर्क, अर्थहीन शंका आणि असत्य सिद्धान्तांच्या ढिगाऱ्‍याखाली त्याची खरी ओळख लपवून टाकली आहे. खरे पाहता, त्यांनी शुभवर्तमानाच्या लेखकांवर दंतकथा निर्माण करण्याविषयी खोटे आरोप लावले आहेत परंतु तेच मुळात दंतकथा निर्माण करण्यासाठी दोषी आहेत. काहीजण नावलौकिक मिळवण्यासाठी आणि एखादा नवीन सिद्धान्त शोधून काढल्याबद्दल स्वतःचे नाव गाजवण्यासाठी इतके उत्सुक असतात की, येशूबद्दलच्या पुराव्याचे प्रामाणिक परीक्षण करायला ते चुकतात. त्यांच्या प्रयत्नात ते विद्वानांच्या कल्पनेनुसार “येशूची” प्रतिमा तयार करतात.

ज्यांना खऱ्‍या येशूचा खरोखर शोध घ्यायचा आहे त्यांना तो बायबलमध्ये सापडू शकतो. एमरी विद्यापीठात कॅन्डलर थिओलॉजी शाळेत नवा करार आणि ख्रिस्ती उगम या विषयावरील प्राध्यापक, लूक जॉनसन म्हणतात की, ऐतिहासिक येशूवर केलेले बहुतेक संशोधन बायबलमधील उद्देशाकडे कानाडोळा करतात. ते म्हणतात की, येशूचे जीवन व कालखंड यांच्याशी संबंधित असलेले सामाजिक, राजकीय, मानववंशशास्त्रविषयक आणि सांस्कृतिक संदर्भांचे परीक्षण करणे खूप रंजक असू शकते. परंतु, विद्वान ज्याला ऐतिहासिक येशू म्हणतात त्याचा शोध लावणे “हा शास्त्रवचनांचा उद्देश नाही.” शास्त्रवचनांचा “मुख्य उद्देश “येशूच्या व्यक्‍तिमत्त्वाचे,” त्याच्या संदेशाचे आणि तारणकर्ता या नात्याने त्याच्या भूमिकेचे “वर्णन करणे हा आहे.” तेव्हा, येशूचे खरे व्यक्‍तिमत्त्व आणि त्याचा संदेश काय होता?

खरा येशू

शुभवर्तमानाची पुस्तके अर्थात येशूच्या जीवनाचे वर्णन करणारे चार बायबल अहवाल, एका सहानुभूतिशील व्यक्‍तीचे चित्र रेखाटतात. आजारी, आंधळे व इतर गोष्टींनी पीडित असलेल्यांबद्दल येशूला दया आणि कळवळा आल्यामुळे तो त्यांना मदत करण्यास प्रवृत्त झाला. (मत्तय ९:३६; १४:१४; २०:३४) आपला मित्र लाजर याचा मृत्यू आणि त्यामुळे लाजरच्या बहिणींना झालेले दुःख पाहून येशू ‘कण्हला आणि रडला.’ (योहान ११:३२-३६, पं.र.भा.) शुभवर्तमानांमध्ये येशूने विविध प्रसंगी दाखवलेल्या भावना—कोड झालेल्या व्यक्‍तीबद्दल सहानुभूती, आपल्या शिष्यांना यश मिळाल्याबद्दल आनंद, मात्र नियमांवर जोर देणाऱ्‍या पाषाणहृदयी लोकांबद्दल त्वेष आणि जेरूसलेमने मशीहाला नाकारल्याबद्दल खेद—यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

येशू चमत्कार करत असे तेव्हा सहसा चमत्कार केल्या जाणाऱ्‍या व्यक्‍तीवर त्याचे लक्ष केंद्रीत असे: “तुझ्या विश्‍वासाने तुला बरे केले आहे.” (मत्तय ९:२२) नथनेल “खराखुरा इस्राएली आहे” असे त्याने त्याचे कौतुक केले व म्हटले की, “त्याच्याठायी कपट नाही!” (योहान १:४७) एका स्त्रीने कृतज्ञतेमुळे दिलेले बक्षीस खूप महागडे आहे असे काहींना वाटले तेव्हा येशूने तिची बाजू घेतली आणि तिचे उदारतेचे कृत्य वर्षानुवर्षांपर्यंत आठवणीत राहील असे तो म्हणाला. (मत्तय २६:६-१३) त्याने स्वतःला खरा मित्र व प्रेमळ सोबती शाबीत केले आणि आपल्या अनुयायांवर ‘शेवटपर्यंत प्रेम केले.’—योहान १३:१; १५:११-१५.

शुभवर्तमानांमध्ये हेसुद्धा दिसून येते की, त्याला भेटणाऱ्‍या बहुतेक लोकांच्या गरजा तो पटकन ओळखायचा. विहिरीजवळील एका स्त्रीशी, बागेतील एका धार्मिक शिक्षकाशी, तलावाच्या किनाऱ्‍यावरील एका कोळ्याशी त्याने केलेले संभाषण त्यांच्या अंतःकरणाला एकदम भिडणारे होते. यांतले बहुतेक लोक, येशूने बोलायला सुरवात करताच आपल्या मनातले विचार उगळू लागले. तो जणू त्यांच्या भावनांना स्पर्श करायचा. त्याच्या काळातील लोक मोठ्या पदावर असलेल्या व्यक्‍तींपासून चार हात दूरच राहत असावेत पण येशूच्या बाबतीत पाहिल्यास लोक त्याच्याजवळ गर्दी करायचे. त्यांना येशूचा सहवास आवडायचा; त्याच्यासोबत असताना त्यांना कसलाही अस्वस्थपणा जाणवायचा नाही. लहान मुलांनाही त्याच्यासोबत राहायला आवडायचे, बालकाचे उदाहरण देताने त्याने एका बालकाला आपल्या शिष्यांसमोर फक्‍त उभे केले नाही तर ‘त्याने त्याला कवटाळले.’ (मार्क ९:३६; १०:१३-१६) शुभवर्तमानांमध्ये केलेल्या वर्णनाप्रमाणे येशूचे व्यक्‍तिमत्त्व इतके आकर्षक होते की, लोक तीन दिवस त्याच्याजवळ केवळ त्याचे प्रभावी भाषण ऐकायला थांबले.—मत्तय १५:३२.

येशू परिपूर्ण होता तरीपण तो ज्यांच्यासोबत राहत होता व ज्यांना प्रचार करत होता त्या अपरिपूर्ण व पापी लोकांची तो फाजील टीका करत नव्हता, तो घमंडी नव्हता किंवा अरेरावीपणा करत नव्हता. (मत्तय ९:१०-१३; २१:३१, ३२; लूक ७:३६-४८; १५:१-३२; १८:९-१४) येशू लोकांकडून अवाजवी अपेक्षाही करत नव्हता. लोकांची ओझी आणखी वाढवत नव्हता. उलट तो म्हणाला: “अहो कष्टी . . . जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” त्याच्या शिष्यांना तो “मनाचा सौम्य व लीन” वाटला; त्याचे जू सोयीचे व ओझे हलके होते.—मत्तय ११:२८-३०.

शुभवर्तमानांच्या वृत्तान्तांत दिलेले येशूचे व्यक्‍तिमत्त्व एकदम खरे आहे. चार वेगवेगळ्या लोकांना एका व्यक्‍तिमत्त्वाची कल्पना करणे आणि चार विविध वृत्तान्तांतून त्या व्यक्‍तिमत्त्वाचे सुसंगत चित्र रेखाटणे हे सहजसोपे असू शकत नाही. तशा प्रकारची कोणी व्यक्‍ती अस्तित्वातच नसती तर चार वेगवेगळ्या लेखकांना एकाच व्यक्‍तीचे एकसारखे आणि सुसंगत वर्णन करणे जवळजवळ अशक्य ठरले असते.

इतिहासकार मायकल ग्रँट एक विचार-प्रवर्तक प्रश्‍न विचारतात: “शुभवर्तमानांच्या सर्वच वृत्तान्तांत, सर्व प्रकारच्या स्त्रियांमध्ये, अगदी बदनाम असलेल्या स्त्रियांमध्येही, मोकळेपणाने वावरणाऱ्‍या आकर्षक युवकाचे उल्लेखनीय वर्णन केले आहे ज्याच्यामध्ये भावनाविवशता, अस्वाभाविकपणा किंवा सोवळेपणाचा अंश नाही आणि तरीही प्रत्येक प्रसंगी तो साधासरळ आहे; हे कसे शक्य आहे?” याचे उचित उत्तर हेच आहे की, अशाप्रकारची व्यक्‍ती खरोखर अस्तित्वात होती आणि बायबलमध्ये दिलेल्या वर्णनानुसार तिचे वर्तन देखील होते.

खरा येशू आणि तुमचे भविष्य

येशूचे पृथ्वीवरील जीवनाचे खरे वर्णन देण्याव्यतिरिक्‍त बायबल दाखवते की, “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ,” देवाचा एकुलता एक पुत्र यानात्याने त्याचे मानवपूर्व अस्तित्व देखील होते. (कलस्सैकर १:१५) वीस शतकांआधी, देवाने आपल्या स्वर्गीय पुत्राचा जीव एका यहूदी कुमारिकेच्या उदरेत घातला जेणेकरून तो मानव म्हणून जन्माला येऊ शकला. (मत्तय १:१८) येशूने आपल्या पार्थिव सेवेदरम्यान, त्रस्त मानवजातीसाठी देवाचे राज्य हीच एकमेव आशा आहे असा प्रचार केला आणि आपल्या शिष्यांना हे प्रचाराचे कार्य पुढे चालू ठेवायला प्रशिक्षित केले.—मत्तय ४:१७; १०:५-७; २८:१९, २०.

सा.यु. ३३ च्या निसान १४ (सुमारे एप्रिल १) रोजी, येशूला राजद्रोहाच्या खोट्या आरोपावर अटक करण्यात आली, चौकशी घेण्यात आली आणि शिक्षा सुनावून ठार मारण्यात आले. (मत्तय २६:१८-२०, मत्तय २६:४८–२७:५०) येशूचा मृत्यू ही खंडणी आहे ज्याद्वारे विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांना त्यांच्या पापमय स्थितीतून सुटका मिळते आणि त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांकरता अनंतकाळाच्या जीवनाचा मार्ग मोकळा होतो. (रोमकर ३:२३, २४; १ योहान २:२) निसान १६ रोजी, येशूचे पुनरुत्थान झाले आणि त्यानंतर लगेचच त्याचे स्वर्गारोहण झाले. (मार्क १६:१-८; लूक २४:५०-५३; प्रेषितांची कृत्ये १:६-९) यहोवाचा नियुक्‍त राजा यानात्याने पुनरुत्थित येशूला मानवजातीसाठी असलेला देवाचा मूळ उद्देश शेवटास नेण्याचा पूर्ण अधिकार आहे. (यशया ९:६, ७; लूक १:३२, ३३) होय, बायबलमध्ये देवाचे उद्देश पूर्ण करण्यासंबंधी येशूची मुख्य भूमिका असल्याचे दाखवले आहे.

पहिल्या शतकात जनसमुहांनी येशूला, यहोवा हाच विश्‍वातील सर्वश्रेष्ठ आहे याचे समर्थन करण्यासाठी आणि मानवजातीकरता खंडणी म्हणून प्राण देण्यासाठी पाठवण्यात आलेला वचनदत्त मशीहा, किंवा ख्रिस्त म्हणून स्वीकारले. (मत्तय २०:२८; लूक २:२५-३२; योहान १७:२५, २६; १८:३७) येशू नेमका कोण आहे हे लोकांना ठाऊक नसते तर भयंकर छळ सहन करून ते त्याचे शिष्य व्हायला प्रेरित झाले नसते. “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य” बनवण्यासंबंधी त्याने त्यांना दिलेली कामगिरी त्यांनी धिटाईने व आवेशाने पूर्ण केली.—मत्तय २८:१९.

आज, लाखो प्रांजळ आणि जाणकार ख्रिश्‍चनांना हे ठाऊक आहे की, येशू कोणी काल्पनिक व्यक्‍ती नाही. लवकरच पृथ्वी आणि तिचे कारभार हाती घेणारा स्वर्गातील देवाच्या स्थापित राज्याचा सिंहासनाधिष्ठ राजा म्हणून ते त्याचा स्वीकार करतात. हे दैवी सरकार म्हणजे सर्वांकरता आनंदाची बातमी आहे कारण ते जगाच्या समस्यांपासून सुटका देण्याचे आश्‍वासन देते. खरे ख्रिस्ती, इतरांना ‘राज्याच्या सुवार्तेविषयी’ सांगून यहोवाच्या निवडलेल्या राजाला त्यांचे निष्ठापूर्वक समर्थन असल्याचे प्रदर्शित करतात.—मत्तय २४:१४.

जिवंत देवाचा पुत्र, ख्रिस्त याच्याद्वारे राज्य व्यवस्थेला पाठबळ देणारे अनंतकाळाचे आशीर्वाद उपभोगण्यास जिवंत राहतील. हे आशीर्वाद तुम्हालाही मिळू शकतात! या मासिकाच्या प्रकाशकांना तुम्हाला खऱ्‍या येशूची अधिक माहिती द्यायला आनंद होईल.

[तळटीप]

^ शुभवर्तमानांच्या अहवालांचे तपशीलवार परीक्षण करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी) या पुस्तकातील अध्याय ५ ते ७ पाहा.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

इतरांचे मत

“माझ्या मते, नासरेथचा येशू जगातील प्रभावी शिक्षकांपैकी एक आहे. . . . मी हिंदूंना असे सांगीन की, येशूच्या शिकवणींचा तुम्ही श्रद्धेने अभ्यास केला नाही तर तुमचे जीवन अपुरे राहील.” मोहनदास क. गांधी, येशू ख्रिस्ताचा संदेश (इंग्रजी).

“अगदी खरे, संपूर्ण, सुसंगत, परिपूर्ण, मानवी आणि तरीही कोणत्याही मानवी महानतेपेक्षा श्रेष्ठ असलेले व्यक्‍तिमत्त्व खोटे असू शकत नाही आणि काल्पनिकही असू शकत नाही. . . . येशूसारख्या व्यक्‍तिमत्त्वाचा शोध, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्‍तीच लावू शकली असती.” फिलिप्प शाफ, ख्रिस्ती चर्चचा इतिहास (इंग्रजी).

“दोन-चार साध्यासुध्या माणसांनी इतके प्रभावी आणि आकर्षक व्यक्‍तिमत्त्व असलेली व्यक्‍ती, उच्च नैतिक मूल्ये व मानवी बंधुत्वाचे प्रेरक चित्र आपल्या कल्पनेतून निर्माण केले हा शुभवर्तमानांच्या पुस्तकांतील कोणत्याही चमत्कारापेक्षा अद्‌भुत चमत्कार ठरेल.” विल ड्यूरंट, कैसर आणि ख्रिस्त (इंग्रजी).

“निर्विवादपणे वास्तविक असलेल्या व्यक्‍तीसुद्धा धर्म स्थापण्याचा प्रयत्न करून अपयशी ठरले असताना अस्तित्वात नसलेल्या कोणा एका काल्पनिक व्यक्‍तीचा प्राचीन काळातील विक्रीतंत्रासारखा उपयोग करून एक जगव्याप्त धार्मिक चळवळ सुरू करण्यात आली असावी ही गोष्ट बुद्धीला पटत नाही.” ग्रेग इस्टरब्रुक, संथ पाण्याजवळ (इंग्रजी).

‘वाङ्‌मयीन इतिहासकार या नात्याने मला पूर्ण खात्री पटली आहे की, शुभवर्तमानांची पुस्तके मिथ्यकथा असूच शकत नाहीत. कथांमध्ये असते तशी कल्पकता यांच्यात मुळीच दिसून येत नाही. येशूच्या जीवनाबद्दल बहुतेक प्रश्‍न अनुत्तरीत राहतात, पण कल्पनेच्या आधारे कथा लिहिणाऱ्‍यांनी ते कधीच राहू दिले नसते.’ सी. एस. लुइस, गॉड इन द डॉक.

[७ पानांवरील चित्रे]

शुभवर्तमानांच्या पुस्तकांमधून येशूच्या विविध भावनांचे दर्शन घडते