व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तणावापासून मुक्‍त होण्याचा—व्यवहार्य उपाय

तणावापासून मुक्‍त होण्याचा—व्यवहार्य उपाय

तणावापासून मुक्‍त होण्याचा—व्यवहार्य उपाय

“अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.”मत्तय ११:२८.

१, २. (अ) बायबलमध्ये असे काय आहे ज्यामुळे अनावश्‍यक तणाव दूर होऊ शकतो? (ब) येशूच्या शिकवणुकी कितपत परिणामकारक होत्या?

 तणाव खूप वाढला तर तो हानीकारक ठरतो हे तुम्ही मान्य कराल; त्यामुळे माणूस जेरीस येतो. बायबल दाखवते की सर्व मानवसृष्टी आज निरनिराळ्या समस्यांच्या ओझ्याखाली इतकी दबून गेली आहे की या तणावपूर्ण जीवनापासून मुक्‍ती मिळण्याच्या दिवसाची लोक अक्षरशः अधीरतेने वाट पाहत आहेत. (रोमकर ८:२०-२२) पण शास्त्रवचने हे देखील दाखवतात की जीवनातील ताणतणावांपासून बऱ्‍याच अंशी मुक्‍त होण्याकरता आपल्याला उद्याची वाट पाहण्याची गरज नाही. आजपासून २० शतकांआधी होऊन गेलेल्या एक तरुणाचा सल्ला आणि आदर्श अनुसरल्यास हे साध्य करता येईल. हा तरुण एक सुतार होता पण आपल्या या पेशापेक्षा त्याला लोकांवर अधिक प्रेम होते. तो आपल्या शब्दाशब्दातून लोकांच्या हृदयाचा ठाव घेई, त्यांच्या गरजा ओळखून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन देई, निर्बलांना बळ व दुःखितांना सांत्वन देई. पण यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याने अनेकांना त्यांची आध्यात्मिक क्षमता गाठायला मदत केली. यामुळे त्या लोकांना अनावश्‍यक तणावापासून मुक्‍ती मिळाली आणि त्याचप्रकारे तुम्हालाही तणावमुक्‍त होता येईल.—लूक ४:१६-२१; १९:४७, ४८; योहान ७:४६.

हा मनुष्य होता नासरेथचा येशू. त्याकाळी रोम, अथेन्स किंवा ॲलेक्झॅन्ड्रिया येथील जगिक विद्वत्तेमुळे प्रभावित झालेल्या लोकांसारखा तो नव्हता. तरीसुद्धा त्याच्या शिकवणुकी जगप्रसिद्ध आहेत. त्याच्या या शिकवणुकींत एक मुख्य धागा होता: ज्याच्याद्वारे देव आपल्या या पृथ्वीवर यशस्वीरित्या राज्य करेल असे सरकार. येशूने अनेक जीवनोपयोगी मूलतत्त्वे देखील स्पष्ट केली; ही तत्त्वे आज अतिशय उपयोगी सिद्ध झाली आहेत. जे लोक येशूच्या शिकवणुकी आत्मसात करून त्यांचे पालन करतात त्यांना लगेच त्याचे फायदे दिसून येतात, त्यांपैकी एक म्हणजे अनावश्‍यक तणावापासून मुक्‍ती. तुम्हाला हे हवेहवेसे वाटत नाही का?

३. येशूने कोणते महान निमंत्रण दिले?

पण तुमच्या मनात कदाचित काही शंका येतील. ‘इतक्या शतकांआधी होऊन गेलेल्या एका व्यक्‍तीमुळे खरंच माझ्या जीवनात काही फरक पडेल का?’ येशूच्या या निमंत्रणाकडे लक्ष द्या: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवास विसावा मिळेल;’ कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय ११:२८-३०) येशू काय सांगू इच्छित होता? या शब्दांकडे जरा बारकाईने लक्ष देऊन, ते त्रासदायक तणावांपासून मुक्‍त होण्याचा मार्ग कसा मोकळा करतात ते पाहुया.

४. येशू कशाप्रकारच्या लोकांना उद्देशून बोलत होता आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्‍या अपेक्षा पूर्ण करणे त्यांना कठीण का जात असेल?

येशू अशा कित्येक लोकांच्या संपर्कात आला जे शास्त्रांनुसार आपले आचरण शुद्ध ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते. पण तरीही हे लोक “भाराक्रांत” होते कारण यहुदी धर्मपुढाऱ्‍यांनी धर्माला एखाद्या ओझ्याचे स्वरूप दिले होते. (मत्तय २३:४) जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूसंबंधी त्यांनी असंख्य नियम करून ठेवले होते. तुम्हाला जर सतत अमुक “करू नको” तमुक करू नको हेच ऐकावे लागले, तर साहजिकच तुम्हाला चीड येणार नाही का? पण याउलट येशूने लोकांना त्याची वचने ऐकून सत्याकडे, धार्मिकतेकडे आणि एका अधिक चांगल्या जीवनाकडे येण्याचे आमंत्रण दिले. होय, येशूच्या शिकवणुकींकडे लक्ष देणे हाच खऱ्‍या देवाला जाणून घेण्याचा मार्ग होता कारण त्याच्याकडे पाहून यहोवा कसा आहे हे लोक जाणून घेऊ शकत होते आणि आज आपणही जाणून घेऊ शकतो. येशूने म्हटले: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.”—योहान १४:९.

तुमचे जीवन अतिशय तणावपूर्ण आहे का?

५, ६. येशूच्या व आपल्या काळातील कामगारांच्या परिस्थितीची आणि वेतनाची कशी तुलना केली जाऊ शकते?

या बाबतीत कदाचित तुम्हीही चिंताक्रांत असाल; कदाचित तुमच्या नोकरीचे किंवा कौटुंबिक समस्यांचे तुमच्यावर दडपण असेल. किंवा इतर जबाबदाऱ्‍यांचा भार वाहणे तुम्हाला कठीण जात असेल. असे असल्यास तुम्हीही त्या प्रामाणिक लोकांसारखे आहात ज्यांना येशू भेटला व ज्यांना त्याने मदत केली. उदाहरणार्थ, उदरनिर्वाहाच्या समस्येचा विचार करा. आज बऱ्‍याच जणांना ही समस्या आहे आणि येशूच्या काळातही बऱ्‍याच जणांना होती.

त्या काळात एका मजुराला आठवड्यातून ६ दिवस, दररोज १२ तास ढोर मेहनत करूनही दिवसाला फक्‍त एक दिनार मिळत असे. (मत्तय २०:२-१०) तुमच्या किंवा तुमच्या परिचितांच्या पगाराशी याची तुलना करून पाहता येईल का? इतक्या प्राचीन काळातील वेतनाची तुलना आजच्या या आधुनिक काळातील मिळकतीशी करणे तसे कठीणच आहे. पण पैशाच्या क्रयशक्‍तीचा अर्थात पैशाने काय विकत घेता येईल याचा विचार केल्यास ही तुलना करणे शक्य आहे. एका विद्वानाच्या मते येशूच्या काळात चार कप गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या एक पावाची किंमत एक तासाच्या वेतनाइतकी होती. दुसऱ्‍या एका विद्वानानुसार चांगल्या प्रतीच्या एक कप द्राक्षारसाची किंमत दोन तासांच्या वेतनाइतकी होती. या माहितीवरून तुम्हाला लक्षात येईल की कसेबसे पोट भरण्यासाठी त्याकाळी लोकांना तासन्‌तास कष्ट उपसावे लागत होते. त्यांनाही आपल्याप्रमाणे तणावापासून सुटकेची व विसाव्याची गरज होती. तुम्ही नोकरी करत असल्यास, कदाचित तुमच्यावर अधिक कार्य साध्य करण्याचे दडपण असेल. कित्येकदा तर आपल्याला निवांत, विचारपूर्वक निर्णय घेण्याकरताही वेळ मिळत नाही. तुम्हालाही कदाचित या तणावपूर्ण परिस्थितीतून सुटका मिळावी असे वाटत असेल.

७. येशूच्या संदेशाला कसा प्रतिसाद मिळाला?

सर्व “कष्टी व भाराक्रांत” जनांना येशूने दिलेले निमंत्रण त्याकाळातील बहुतेक लोकांना अतिशय भावले असेल यात शंका नाही. (मत्तय ४:२५; मार्क ३:७, ८) येशूने त्यांना अशी प्रतिज्ञा देखील दिली की “मी तुम्हाला विसावा देईन.” आजही ती प्रतिज्ञा खरी आहे. आपण “कष्टी व भाराक्रांत” असल्यास ती आपल्या बाबतीतही खरी ठरेल. तसेच आपल्यासारख्याच परिस्थितीत असलेल्या आपल्या प्रिय जनांना देखील ती लागू होऊ शकते.

८. मुलांचे संगोपन व वार्धक्य यांमुळे तणावात कशाप्रकारे भर पडते?

बऱ्‍याच इतर गोष्टींचेही लोकांवर दडपण असते. मुलांचे संगोपन करणे एक मोठे आव्हान आहे. स्वतः मुलांना देखील अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. आज मानसिक व शारीरिक समस्यांना तोंड देणाऱ्‍या सर्व वयोगटातील लोकांची संख्या वाढत चालली आहे. मनुष्याचे आयुष्यमान वाढले आहे हे खरे आहे, शिवाय, वैद्यक शास्त्रातही विलक्षण प्रगती झाली आहे; तरीपण वाढत्या वयासोबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.—उपदेशक १२:१.

जुवाखाली सापडलेले

९, १०. प्राचीन काळात, जू कशाचे सूचक होते आणि येशूने लोकांना त्याचे जू स्वीकारण्याचे निमंत्रण का दिले?

मत्तय ११:२८, २९ येथे येशूने म्हटले: “माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका.” या शब्दांकडे तुम्ही लक्ष दिले का? त्या काळातल्या सामान्य माणसाला कदाचित आपण एखाद्या जुवाखाली सापडलो आहोत असे वाटत असावे. प्राचीन काळापासून जुवाचे रूपक गुलामगिरीच्या किंवा दास्यत्वाच्या संदर्भात वापरण्यात आले आहे. (उत्पत्ति २७:४०; लेवीय २६:१३; अनुवाद २८:४८) येशूला भेटलेल्या कित्येक मजुरांना अक्षरशः खांद्यावरील जुवावर अवजड ओझी वाहून न्यावी लागत असे. जुवांची बनावट वेगवेगळ्या प्रकारची असल्यामुळे काही जू मानेवर व खांद्यावर वाहायला सोपे तर काही रुतणारे होते. येशू स्वतः एक सुतार असल्यामुळे कदाचित त्याला जू बनवण्याचाही अनुभव असावा आणि ते “सोयीचे” वाटावे म्हणून त्याची रचना कशी करावी हे देखील त्याला माहीत असावे. जू वाहण्यास जास्तीतजास्त सोपे जावे म्हणून ज्या ठिकाणी ते मानेवर किंवा खांद्यांवर घासण्याची शक्यता होती त्या ठिकाणी तो काहीतरी अस्तर लावत असेल.

१० “माझे जू आपणावर घ्या” असे येशूने म्हटले तेव्हा कदाचित कामगारांच्या मानेला आणि खांद्यांना “सोयीचे” असलेले चांगल्या प्रतीचे जू पुरवणाऱ्‍याशी तो स्वतःची तुलना करत असावा. म्हणूनच त्याने पुढे म्हटले: “माझे ओझे हलके आहे.” याचा अर्थ, त्याचे जू त्रासदायक नव्हते आणि ते काम देखील गुलामगिरीचे नव्हते. ऐकणाऱ्‍यांना आपले जू स्वीकारण्याचे निमंत्रण देण्याद्वारे येशू त्यांना त्याकाळातील सर्व दुःसह परिस्थितीपासून लगेच मुक्‍ती मिळेल असे सुचवत नव्हता. पण त्याने दाखवलेली वेगळी मनोवृत्ती स्वीकारल्यामुळे त्या लोकांना विसावा मिळणार होता. शिवाय आपल्या जीवनशैलीत व आचरणात बदल केल्यामुळेही ते तणावमुक्‍त होणार होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांना एक जिवंत व निश्‍चित आशा मिळाल्यामुळे साहजिकच त्यांना त्यांचे जीवन तितके तणावपूर्ण भासणार नव्हते.

तुम्हालाही विसावा मिळू शकतो

११. येशू एका जुवाच्या ऐवजात दुसरा घेण्याचे का सुचवत नव्हता?

११ लोक एका जुवाच्या ऐवजात दुसरा घेतील असे येशूने म्हटले नाही, याकडे लक्ष द्या. आज ख्रिस्ती लोक वेगवेगळ्या सरकारांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या देशांत राहतात, त्याप्रमाणे त्या लोकांच्या देशावर रोमचे प्रभुत्व पुढेही राहणार होते. पहिल्या शतकात, रोमी लोकांनी लादलेले कर त्यांना कायम भरावे लागणार होते. आरोग्याच्या व आर्थिक समस्या देखील राहणार होत्या. अपरिपूर्णता व पाप पुढेही त्यांच्या जीवनावर परिणाम करणार होते. पण हे सर्व असूनसुद्धा, येशूच्या शिकवणुकींचा स्वीकार करण्याद्वारे त्यांना विसावा मिळू शकणार होता आणि आज आपल्याला देखील मिळू शकतो.

१२, १३. विसावा मिळण्याकरता येशूने कशावर जोर दिला आणि काहींनी याला कसा प्रतिसाद दिला?

१२ येशूने जुवाचे उदाहरण देण्याचा एक महत्त्वाचा अर्थ शिष्य बनवण्याच्या कार्याच्या संदर्भात स्पष्ट होतो. येशूचे सर्वात महत्त्वाचे कार्य इतरांना शिकवणे हेच होते यात शंका नाही व त्याने देवाच्या राज्यावर नेहमी भर दिला. (मत्तय ४:२३) त्यामुळे, “माझे जू आपणावर घ्या” असे त्याने म्हटले तेव्हा त्याने केलेल्या कार्याचे अनुसरण करण्याचा अर्थ त्यात निश्‍चितच गोवलेला होता. शुभवर्तमानाचा अहवाल दाखवतो की येशूने प्रांजळ मनोवृत्तीच्या लोकांना त्यांचा पेशा, जो साहजिकच त्यांच्या जीवनातील एक मुख्य प्रश्‍न असावा, तो बदलण्यास प्रेरित केले. पेत्र, आंद्रिया, याकोब व योहान यांना त्याने कसे बोलवले होते हे तुम्हाला आठवत असेल: “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.” (मार्क १:१६-२०) त्याने मासेमारी करणाऱ्‍या त्या चौघांना दाखवले की त्याने आपल्या जीवनात ज्या कार्याला प्राधान्य दिले होते ते कार्य त्यांनीही, त्याच्या मार्गदर्शनानुसार व त्याच्या साहाय्याने केले तर त्यांना किती समाधान प्राप्त होईल.

१३ त्याचे ऐकणाऱ्‍यांपैकी काही यहूद्यांना त्याच्या शिकवणुकींचा अर्थ समजला व त्यांनी त्यांचे पालन केले. लूक ५:१-११ येथील वर्णनानुसार, समुद्रकिनाऱ्‍यावर घडलेल्या त्या घटनेचे दृश्‍य डोळ्यापुढे उभे करा. चार कोळ्यांना रात्रभर मेहनत करूनही काहीही हाती लागलेले नाही. आणि अचानक त्यांच्या जाळ्या माशांनी लदबदून गेल्या! हे काही आपोआप घडले नाही; तर येशूने ते घडवून आणले. समुद्रकिनाऱ्‍याकडे पाहिल्यावर त्यांना येशूचे उपदेश ऐकण्याकरता आसूसलेल्या लोकांच्या झुंडी दिसल्या. ‘येथून पुढे तुम्ही माणसे धरणारे व्हाल’ असे जे येशूने त्यांना म्हटले त्याचा काय अर्थ होता हे आता त्यांना समजले. मग त्यांची काय प्रतिक्रिया होती? “मचवे किनाऱ्‍याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.”

१४. (अ) आज आपल्याला कशाप्रकारे विसावा मिळू शकतो? (ब) येशूने विसावा देणाऱ्‍या कोणत्या सुवार्तेची घोषणा केली?

१४ तुम्ही देखील अशाचप्रकारे प्रतिसाद देऊ शकता. लोकांना बायबलमधील सत्य शिकवण्याचे कार्य अद्याप सुरू आहे. जगभरात जवळजवळ ६० लाख यहोवाच्या साक्षीदारांनी “माझे जू आपणावर घ्या” या येशूच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे; ते “माणसे धरणारे” बनले आहेत. (मत्तय ४:१९) काहीजण पूर्णवेळ हे कार्य करतात; इतरजण पूर्णवेळ नाहीतरी जमेल तितका वेळ या कार्याला देतात. या सर्वांना या कार्यामुळे एकप्रकारचा तजेला मिळतो आणि यामुळे त्यांचे जीवन पूर्वीइतके तणावग्रस्त राहात नाही. हे कार्य म्हणजे इतरांना एक चांगली बातमी, अर्थात “राज्याची सुवार्ता” सांगण्याचे कार्य आहे ज्यामुळे त्यांना आनंद मिळतो. (मत्तय ४:२३) कोणत्याही चांगल्या वार्तेविषयी इतरांना सांगणे आनंददायक असते पण ही तर एक खास सुवार्ता आहे. जीवनातला तणाव कमी करणे शक्य आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी आवश्‍यक असलेली मूलभूत माहिती बायबलमध्ये आहे.—२ तीमथ्य ३:१६, १७.

१५. येशूने दिलेल्या जीवनोपयोगी शिकवणुकींपासून तुम्हाला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो?

१५ काही प्रमाणात, ज्या लोकांनी अलीकडेच देवाच्या राज्याविषयी शिकण्यास सुरवात केली आहे त्यांना देखील येशूने दिलेल्या जीवनोपयोगी शिकवणुकींचा फायदा झाला आहे. बरेचजण प्रामाणिकपणे हे कबूल करू शकतात की येशूच्या शिकवणुकींनी त्यांना विसावा देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यास मदत केली आहे. येशूचे जीवन व सेवाकार्य यांविषयीच्या अहवालांत, खासकरून मत्तय, मार्क व लूक यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानांत आढळणाऱ्‍या जीवनोपयोगी तत्त्वांचे परीक्षण करण्याद्वारे तुम्ही याची खात्री स्वतः करू शकता.

विसावा मिळण्याचा मार्ग

१६, १७. (अ) येशूच्या काही मुख्य शिकवणुकी तुम्हाला कोठे आढळतील? (ब) येशूच्या शिकवणुकींचे पालन केल्यामुळे आपल्याला विसावा मिळण्याकरता काय करण्याची गरज आहे?

१६ सा.यु. ३१ साली येशूने दिलेले एक प्रवचन आजपर्यंत जगप्रसिद्ध आहे. याला सहसा डोंगरावरील प्रवचन म्हणतात. हे प्रवचन मत्तयाच्या ५ ते ७ अध्यायांत आणि लूक शुभवर्तमानातील ६ व्या अध्यायात सापडते आणि यात त्याच्या बहुतेक शिकवणुकींचे सार आहे. शुभवर्तमानातील इतर भागांत तुम्हाला येशूच्या इतर शिकवणुकी आढळतील. त्याने सांगितलेल्या बहुतेक गोष्टी समजायला सोप्या आहेत पण त्या वागणुकीत आणणे तितके सोपे नसेल. तुम्हाला या अध्यायांचे लक्षपूर्वक, विचारपूर्वक वाचन करायला आवडेल का? यातील विचारांच्या शक्‍तीचा तुमच्या विचारसरणीवर आणि मनोवृत्तीवर प्रभाव पडू द्या.

१७ अर्थात, येशूच्या शिकवणुकींचे आपण वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करू शकतो. आपण त्याच्या मुख्य शिकवणुकींचे अशाप्रकारे वर्गीकरण करू या, जेणेकरून महिन्याच्या प्रत्येक दिवशी त्याच्या एका शिकवणुकीचे आपल्या जीवनात पालन करण्याचे ध्येय आपल्याला ठेवता येईल. कशाप्रकारे? हे मुद्दे केवळ वरवर वाचू नका. “काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” असे येशूला विचारणाऱ्‍या श्रीमंत अधिकाऱ्‍याची आठवण करा. येशूने त्याला देवाच्या नियमशास्त्रातील मुख्य अपेक्षांची आठवण करून दिली तेव्हा त्या माणसाने आपण आधीच या सर्व गोष्टी करत असल्याचे सांगितले. पण त्याला जाणीव झाली की यापेक्षाही अधिक करण्याची गरज आहे. येशूने त्याला व्यावहारिक मार्गांनी देवाच्या तत्त्वांचा जीवनात अवलंब करण्याचा, अर्थात येशूचा सक्रिय शिष्य बनण्याचा अधिक प्रयत्न करण्यास सांगितले. पण हा माणूस तितकी तसदी घ्यायला तयार नव्हता. (लूक १८:१८-२३) आजही, ज्याला येशूच्या शिकवणुकी जाणून घ्यायच्या आहेत त्याने हे आठवणीत ठेवले पाहिजे की या शिकवणुकींशी सहमत होणे आणि जीवनातील तणाव कमी करण्याइतपत त्यांचा सक्रियरित्या अवलंब करणे वेगळे आहे.

१८. सोबत दिलेल्या पेटीतील माहितीचा उपयोग कसा करता येईल याचे उदाहरण द्या.

१८ येशूच्या शिकवणुकींचे परीक्षण आणि अवलंब करण्यास सुरवात करण्यासाठी सोबत दिलेल्या पेटीतल्या १ ल्या मुद्द्‌याकडे लक्ष द्या. हा मुद्दा मत्तय ५:३-९ या वचनांवर आधारित आहे. निश्‍चितच, आपल्यापैकी कोणीही या वचनांतील सुंदर सल्ल्याविषयी बराच वेळ मनन करू शकतो. पण या वचनांवर एकंदर विचार केल्यावर माणसाच्या मनोवृत्तीबद्दल तुम्ही कोणता निष्कर्ष काढू शकता? जर तुम्हाला जीवनातील अनावश्‍यक तणावाच्या दुष्परिणामांवर खरोखर मात करायची असेल तर कशामुळे मदत होईल? तुम्ही आध्यात्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले, आपल्या विचारांत आध्यात्मिक गोष्टींना अधिक वाव दिला तर तुमच्या परिस्थितीत कोणता चांगला परिणाम होईल? तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी आहेत का ज्यांना कदाचित कमी महत्त्व देऊन त्यांऐवजी तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष देता येईल? तुम्ही असे केल्यास यामुळे तुमच्या आनंदात नक्कीच भर पडेल.

१९. अधिक ज्ञान व समज मिळण्याकरता तुम्ही काय करू शकता?

१९ आता आणखी एक पाऊल पुढे जाऊ. या वचनांसंबंधी तुम्हाला देवाच्या सेवकांपैकी इतर कोणाशी उदाहरणार्थ, पती किंवा पत्नी, जवळचे नातेवाईक किंवा मित्र अथवा मैत्रिणीशी चर्चा करता येईल का? (नीतिसूत्रे १८:२४; २०:५) त्या श्रीमंत अधिकाऱ्‍याने दुसऱ्‍या व्यक्‍तीला, अर्थात येशूला एका समर्पक विषयावर प्रश्‍न केला हे लक्षात घ्या. येशूने दिलेल्या उत्तरामुळे आनंदी व सार्वकालिक जीवन मिळण्याची त्याची आशा अधिक बळकट होऊ शकली असती. तुम्ही ज्या सह उपासकासोबत या वचनांची चर्चा कराल तो येशूच्या तुल्य नसेल; पण तरीसुद्धा येशूच्या शिकवणुकींसंबंधी चर्चा केल्यामुळे तुम्हा दोघांना फायदा होईल. लवकरात लवकर हा प्रयोग करून पाहा.

२०, २१. येशूच्या शिकवणुकी जाणून घेण्याकरता तुम्ही कोणत्या कार्यक्रमाचे पालन करू शकता आणि आपण किती प्रगती केली हे तुम्हाला कसे ठरवता येईल?

२० “तुम्हाला सहायक ठरतील अशा शिकवणुकी” या पेटीकडे पुन्हा लक्ष द्या. या शिकवणुकी अशारितीने मांडण्यात आल्या आहेत की तुम्हाला दररोज निदान एक शिकवणुकीवर विचार करता येईल. आधी तुम्ही या वचनात येशूने काय म्हटले हे वाचू शकता. मग त्याच्या शब्दांवर विचार करा. जीवनात त्यांचे कशाप्रकारे पालन करता येईल यावर मनःपूर्वक विचार करा. आपण या तत्त्वांचे आधीच पालन करत आहोत असे वाटल्यास, देवाच्या या शिकवणुकीनुसार जगण्याकरता आणखी काय करता येईल याविषयी चिंतन करा. त्या अनुषंगाने दिवसभर प्रयत्न करा. ती विशिष्ट वचने समजण्यास किंवा त्यांचे कसे पालन करायचे हे समजण्यास कठीण जात असेल तर त्या मुद्द्‌याकरता आणखी एक दिवस द्या. पण, एका मुद्द्‌याचे पालन करण्यात यश आल्यावरच पुढचा मुद्दा विचारात घ्यायचा असा काही नियम नाही. पुढच्या दिवशी तुम्ही दुसऱ्‍या शिकवणुकीवर विचार करू शकता. आठवड्याच्या शेवटी येशूच्या चार किंवा पाच शिकवणुकींचे अवलंब करण्यात तुम्ही कितपत यशस्वी झाला आहात याची उजळणी करा. दुसऱ्‍या आठवड्यात दररोज एकेका शिकवणुकीची भर घालत राहा. एखाद्या शिकवणुकीचे पालन करण्यात आपण पुन्हा चुकलो असे लक्षात आल्यास निराश होऊ नका. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीला हा अनुभव येईल. (२ इतिहास ६:३६; स्तोत्र १३०:३; उपदेशक ७:२०; याकोब ३:८) तिसऱ्‍या व चवथ्या आठवड्यातही त्या शिकवणुकींचे पालन करणे सुरूच ठेवा.

२१ एकदीड महिन्यात कदाचित तुम्ही सर्व ३१ मुद्दे संपवले असतील. परिणामस्वरूप, तुम्हाला कसे वाटेल? तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी, अधिक तणावमुक्‍त नसाल का? तुम्ही थोडीशीच सुधारणा केली असली तरीसुद्धा तुम्हाला तुमचा तणाव कमी झाल्याचे जाणवेल, किंवा निदान तुम्ही तणावाला अधिक चांगल्याप्रकारे तोंड देण्यास समर्थ झाला असाल आणि पुढेही तसेच करत राहण्याची पद्धत तुम्हाला माहीत झालेली असेल. येशूच्या शिकवणुकींत, या यादीत नसलेल्या इतरही अनेक उत्तम मुद्द्‌यांचा समावेश आहे हे विसरू नका. त्या मुद्द्‌यांचा तुम्हाला स्वतःहून शोध घेऊन त्यांचा अवलंब करता येईल का?—फिलिप्पैकर ३:१६.

२२. येशूच्या शिकवणुकींचे पालन केल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो पण यासंदर्भात आणखी कोणता पैलू परीक्षण करण्याजोगा आहे?

२२ तुम्हाला लक्षात आले असेल की येशूचे जू अजिबातच वजन नसलेले नाही तरीसुद्धा ते खरोखर सोयीचे आहे. त्याच्या शिकवणुकी आणि शिष्यत्वाचे ओझे हलके आहे. ६० वर्षांच्या वैयक्‍तिक अनुभवानंतर येशूचा प्रिय मित्र प्रेषित योहान याने असा निष्कर्ष काढला: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) तुम्ही देखील हाच भरवसा बाळगू शकता. येशूच्या शिकवणुकींचे तुम्ही जितका काळ पालन करत राहाल तितकेच तुम्हाला हे लक्षात येईल की लोकांना तणावदायक वाटणाऱ्‍या गोष्टींचा तुमच्यावर तितकासा परिणाम होत नाही. तुम्हाला बऱ्‍याच प्रमाणात विसावा मिळाल्याचे जाणवेल. (स्तोत्र ३४:८) पण येशूच्या जुवासंबंधी विचारात घेण्याजोगा आणखी एक पैलू आहे. येशूने आपण “सौम्य व लीन” असल्याविषयीही उल्लेख केला होता. येशूच्या शिकवणुकी आत्मसात करण्याशी व त्याचे अनुकरण करण्याशी हे कशाप्रकारे संबंधित आहे? पुढील लेखात आपण याविषयी पाहू या.—मत्तय ११:२९.

तुमचे उत्तर काय?

• अनावश्‍यक तणावापासून मुक्‍त होण्याकरता आपण येशूकडे का पाहावे?

• जू कशाचे सूचक होते आणि का?

• येशूने लोकांना आपले जू घेण्याचे आमंत्रण का दिले?

• तुम्हाला आध्यात्मिक विसावा कसा मिळू शकेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील संक्षिप्त आशय]

यहोवाच्या साक्षीदारांचे वर्ष २००२ दरम्यान हे वार्षिक वचन असेल: “माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.”—मत्तय ११:२८.

[१२, १३ पानांवरील चौकट/चित्र]

तुम्हाला सहायक ठरतील अशा शिकवणुकी

मत्तयाच्या ५ ते ७ अध्यायांतून कोणती ज्ञानसुमने वेचता येतील? या अध्यायांत थोर शिक्षक, येशू याने गालीलातील एका डोंगरावर शिकवलेल्या शिकवणुकी सापडतात. खाली दिलेली शास्त्रवचने तुमच्याच बायबलमधून कृपया वाचा आणि त्यासंबंधी स्वतःला प्रश्‍न विचारा.

१. ५:३-९ यावरून मला माझ्या एकंदर मनोवृत्तीबद्दल काय समजते? अधिक आनंदी होण्याच्या दिशेने मला कोणती पावले उचलता येतील? मला माझ्या आध्यात्मिक गरजांकडे अधिक लक्ष कसे देता येईल?

२. ५:२५, २६ आज बहुतेक लोकांत पाहायला मिळणाऱ्‍या भांडखोर वृत्तीचे अनुकरण करण्यापेक्षा काय करणे अधिक चांगले आहे?—लूक १२:५८, ५९.

३. ५:२७-३० प्रणय कल्पनांत रमण्याच्या संदर्भात येशूचे शब्द कशावर जोर देतात? अशाप्रकारचे विचार टाळल्यामुळे माझ्या आनंदात आणि मनःशांतीत कशाप्रकारे भर पडेल?

४. ५:३८-४२ आधुनिक समाजात स्वतःचेच मत पुढे करण्यावर जोर दिला जात असला तरीही हे टाळण्याचा प्रयत्न मला कशाप्रकारे करता येईल?

५. ५:४३-४८ मला जे पूर्वी शत्रू वाटायचे, अशा सोबत्यांशी अधिक चांगल्याप्रकारे ओळख करून घेतल्यामुळे मला कशाप्रकारे फायदा होईल? तणाव कमी करण्यात किंवा तो पूर्णपणे दूर करण्यात यामुळे कशाप्रकारे हातभार लागू शकतो?

६. ६:१४, १५ कधीकधी दुसऱ्‍या व्यक्‍तीला क्षमा न करण्याची माझी वृत्ती, त्या व्यक्‍तीचा हेवा वाटत असल्यामुळे किंवा तिच्याविषयी मनात राग बाळगल्यामुळे तर नसेल? मला हे कशाप्रकारे बदलता येईल?

७. ६:१६-१८ मला स्वतःच्या आंतरिक स्वरूपापेक्षा सहसा बाह्‍य दिखाव्याबद्दल अधिक काळजी असते का? मी कशाविषयी अधिक जागरूक असले पाहिजे?

८. ६:१९-३२ पैसा व संपत्ती याचीच मी नको तितकी चिंता केल्यास काय परिणाम होऊ शकतो? याबाबतीत संतुलन साधण्याकरता कशाविषयी विचार करणे सहायक ठरेल?

९. ७:१-५ जे लोक सतत इतरांवर दोष लावत असतात किंवा त्यांची टीका करतात किंवा चुका शोधत राहतात, त्यांच्या सहवासात मला कसे वाटते? मी अशाप्रकारची वृत्ती टाळणे का महत्त्वाचे आहे?

१०. ७:७-११ देवाला विनंती करण्याच्या संदर्भात जर मी चिकाटी धरणे आवश्‍यक आहे तर मग जीवनाच्या इतर बाबींविषयी काय?—लूक ११:५-१३.

११. ७:१२ मला सुवर्णनियम माहीत आहे, पण इतरांशी व्यवहार करताना मी कितीदा याचे पालन करतो/करते?

१२. ७:२४-२७ माझ्या जीवनाला आकार देण्याचे दायित्व माझे स्वतःचे आहे याची जाणीव ठेवून जीवनात येणाऱ्‍या वादळांना किंवा संकटांना अधिक चांगल्याप्रकारे तोंड देण्याकरता मी स्वतःला कसे तयार करू शकतो/शकते? मी आताच याविषयी विचार करणे का आवश्‍यक आहे?—लूक ६:४६-४९.

विचारात घेण्याजोग्या इतर शिकवणुकी

१३. ८:२, ३ येशूने कित्येकदा गोरगरिबांविषयी सहानुभूती व्यक्‍त केली त्याप्रमाणे मलाही कशाप्रकारे करता येईल?

१४. ९:९-३८ क्षमाशीलता दाखवण्याला माझ्या जीवनात कितपत महत्त्व आहे आणि मला हा गुण अधिक चांगल्याप्रकारे कसा दाखवता येईल?

१५. १२:१९ येशूविषयीच्या भविष्यवाणीवरून धडा घेऊन मी वितंडवाद टाळण्याचा प्रयत्न करतो/करते का?

१६. १२:२०, २१ मी इतरांना आपल्या शब्दांमुळे किंवा कृतींमुळे न दुखावल्यास कोणता चांगला परिणाम होईल?

१७. १२:३४-३७ माझे संभाषण सहसा कोणत्या विषयांवर असते? संत्रे पिळल्यास संत्र्याचाच रस निघेल याची जाणीव ठेवून माझ्या अंतरंगात, माझ्या हृदयात काय आहे याकडे मी का लक्ष द्यावे?—मार्क ७:२०-२३.

१८. १५:४-६ येशूच्या विधानांवरून वयस्कांची प्रेमळपणे काळजी वाहण्यासंबंधी काय दिसून येते?

१९. १९:१३-१५ मी कशासाठी वेळ काढला पाहिजे?

२०. २०:२५-२८ अधिकार केवळ गाजवायचा म्हणून गाजवणे का निरर्थक आहे? या बाबतीत मला येशूचे कशाप्रकारे अनुकरण करता येईल?

मार्कने नोंदलेले अतिरिक्‍त मुद्दे:

२१. ४:२४, २५ इतरांशी माझी वागणूक कशी आहे याचा विचार करणे का महत्त्वाचे आहे?

२२. ९:५० माझे संभाषण व कृती नेहमी सुरूचीपूर्ण असल्यास यामुळे कोणते चांगले परिणाम होऊ शकतात?

शेवटी, लूकने नोंदवलेल्या काही शिकवणुकी:

२३. ८:११, १४ चिंता, संपत्ती आणि सुखोपभोग यांनाच मी माझ्या जीवनावर प्रभुत्व करू दिल्यास काय परिणाम होईल?

२४. ९:१-६ येशूजवळ आजारी लोकांना बरे करण्याचे सामर्थ्य होते तरीसुद्धा त्याने कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले?

२५. ९:५२-५६ मला कोणत्याही गोष्टीचे लगेच वाईट वाटते का? जशास तसे या नियमाप्रमाणे वागण्याची वृत्ती मी टाळतो/टाळते का?

२६. ९:६२ देवाच्या राज्याविषयी इतरांना सांगण्याच्या माझ्या जबाबदारीविषयी माझा कसा दृष्टिकोन असला पाहिजे?

२७. १०:२९-३७ मी एक अनोळखी व्यक्‍ती नाही तर शेजारी आहे हे मला कसे दाखवता येईल?

२८. ११:३३-३६ राहणी साधी ठेवण्याकरता मला कोणते बदल करता येतील?

२९. १२:१५ जीवन व संपत्ती यांत काय संबंध आहे?

३०. १४:२८-३० सर्व गोष्टींचा नीट विचार करून निर्णय घेतल्यास काय टाळता येईल आणि यामुळे कोणता फायदा होईल?

३१. १६:१०-१२ विश्‍वासूपणामुळे मला कोणते फायदे मिळू शकतील?

[१० पानांवरील चित्रे]

येशूच्या जुवाखाली राहून लोकांचे जीवन वाचवणारे कार्य केल्यामुळे विसावा मिळतो