व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“माझ्यापासून शिका”

“माझ्यापासून शिका”

“माझ्यापासून शिका”

“मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.”मत्तय ११:२९.

१. येशूविषयी शिकणे हा एक आनंददायक आणि समृद्ध करणारा अनुभव का ठरू शकतो?

 येशू ख्रिस्त त्याच्या विचारांत, शिकवणुकींत आणि वागणुकीत कधीही चुकला नाही. तो पृथ्वीवर फार कमी काळ राहिला पण त्याला त्याच्या कामातून पुरेपूर समाधान व आनंद मिळाला. त्याने आपल्या शिष्यांना एकत्रित करून त्यांना देवाची उपासना कशी करावी, मानवजातीवर कशाप्रकारे प्रीती करावी आणि जगावर विजय कसा मिळवावा याविषयी शिकवले. (योहान १६:३३) त्याने त्यांच्या मनांत आशा उत्पन्‍न केली आणि “सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली.” (२ तीमथ्य १:१०) तुम्ही स्वतःला त्याचे शिष्य समजत असल्यास, शिष्य असण्याचा काय अर्थ होतो असे तुम्हाला वाटते? येशूने शिष्यांविषयी काय म्हटले हे लक्षात घेतल्यास आपल्याला अधिक समृद्ध जीवन कसे जगता येईल हे समजेल. यात त्याच्या दृष्टिकोनाचा स्वीकार करून काही मूळ तत्त्वांचे पालन करणे समाविष्ट आहे.—मत्तय १०:२४, २५; लूक १४:२६, २७; योहान ८:३१, ३२; १३:३५; १५:८.

२, ३. (अ) येशूचा शिष्य कोण आहे? (ब) ‘मी कोणाचा शिष्य बनलो आहे’ हे स्वतःला विचारणे का महत्त्वाचे आहे?

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, “शिष्य” असे भाषांतर केलेल्या शब्दाचा मूलभूत अर्थ, जो एखाद्या गोष्टीवर आपले मन लावतो किंवा शिकतो, असा होतो. याच मूळ शब्दाशी संबंधित असलेला एक शब्द मत्तय ११:२९ या आपल्या मुख्य वचनात आढळतो: “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.” (तिरपे वळण आमचे.) होय, शिष्य म्हणजे शिकणारा. शुभवर्तमानांत “शिष्य” हा शब्द सहसा येशूच्या जवळच्या अनुयायांना, अर्थात तो प्रचार करण्याकरता फिरत असता जे त्याच्यासोबत प्रवास करत होते आणि ज्यांना तो उपदेश करत असे त्यांना सूचित करतो. काही लोकांनी सहज आणि काहींनी कदाचित गुप्तपणे येशूच्या शिकवणुकी स्वीकारल्या असतील. (लूक ६:१७; योहान १९:३८) शुभवर्तमान लेखकांनी “[बाप्तिस्मा करणाऱ्‍या] योहानाचे शिष्य व परूश्‍यांचे शिष्य” असाही उल्लेख केला. (मार्क २:१८) येशूने आपल्या अनुयायांना “परूशी . . . ह्‍यांच्या शिकवणीविषयी” सावध राहण्यास सांगितले, त्याअर्थी आपणही स्वतःला विचारू शकतो, ‘मी कोणाचा शिष्य बनलो आहे?’—मत्तय १६:१२.

आपण जर येशूचे शिष्य असू आणि जर आपण त्याचे शिक्षण आत्मसात केले असेल तर इतरांना आपल्या सान्‍निध्यात आध्यात्मिक विसावा मिळाला पाहिजे. आपण अधिक सौम्य व लीन बनलो आहोत हे त्यांना दिसून आले पाहिजे. जर आपण जबाबदार पदावर असू, पालक असू, किंवा ख्रिस्ती मंडळीत आपल्यावर कळपाच्या जबाबदाऱ्‍या असतील तर मग आपल्या देखरेखीखाली नेमलेल्यांना आपण, येशूने त्याच्या देखरेखीखाली असलेल्यांना जसे वागवले तसेच वागवतो असे वाटते का?

येशू लोकांशी कसे वागत होता

४, ५. (अ) ज्यांच्या जीवनात समस्या होत्या अशा लोकांशी येशू कसे वागत होता हे जाणून घेणे कठीण का नाही? (ब) एका परूश्‍याच्या घरात जेवायला गेला असताना येशूला कोणता अनुभव आला?

येशू लोकांशी, विशेषतः जे गंभीर समस्यांत अडकलेले होते अशा लोकांशी कसा वागत होता हे आपण जाणून घेतले पाहिजे. हे कठीण नाही, कारण बायबलमध्ये येशू व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांविषयी बरेच वृत्तान्त आहेत; या लोकांपैकी बरेच लोक दुःखी होते. अशा या लोकांशी, त्याकाळच्या धार्मिक पुढाऱ्‍यांची खासकरून परूशांची वागणूक कशी होती याकडेही आपण लक्ष देऊ. येशूच्या वागणुकीच्या तुलनेत त्यांची वागणूक किती वेगळी होती हे पाहिल्यामुळे आपल्याला बरेच काही शिकता येईल.

सा.यु. ३१ साली, येशू गालीलात प्रचार यात्रा करत असताना, “परूश्‍यातील कोणाएकाने [येशूला] आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली.” येशूने त्याचे आमंत्रण स्वीकारण्यास टाळाटाळ केली नाही. “तो त्या परूश्‍याच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पाहा, त्या गावात कोणीएक पापी स्त्री होती; तो परूश्‍याच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली; आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले.”—लूक ७:३६-३८.

६. एक “पापी” स्त्री परूश्‍याच्या घरात का आली असावी?

तुम्ही त्या घटनेचे दृश्‍य डोळ्यापुढे उभे करू शकता का? एका संदर्भ ग्रंथात असे म्हटले आहे की “त्याकाळी अशाप्रकारच्या मेजवानीत उरलेसुरलेले भोजन घेण्यासाठी गोरगरिबांना येण्याची परवानगी होती. या स्त्रीने (३७ व्या वचनानुसार) या प्रथेचा फायदा उचलला.” निमंत्रण नसतानाही एखादी व्यक्‍ती येऊ शकत होती हे यावरून आपल्याला समजते. मेजवानी संपल्यावर आपल्याला काही मिळेल या आशेने कदाचित इतरजणही आले असावेत. पण या स्त्रीची वागणूक विलक्षण होती. ती पाहुण्यांचे जेवण कधी संपते याची वाटत पाहात उभी नव्हती. तिचे गावात वाईट नाव होते. ती “पापी” स्त्री आहे हे सर्वांना माहीत होते आणि त्यामुळे “हिची . . . पुष्कळ पापे आहेत,” हे येशूलाही माहीत होते.—लूक ७:४७.

७, ८. (अ) लूक ७:३६-३८ येथे वर्णन केलेल्या परिस्थितीत आपण असतो तर कदाचित आपली काय प्रतिक्रिया असती? (ब) शिमोनाची काय प्रतिक्रिया होती?

तुम्ही त्याकाळात जगत आहात आणि येशूच्या ठिकाणी आहात अशी कल्पना करा. या स्त्रीची वागणूक पाहून तुम्ही काय केले असते? ती आपल्याजवळ येत आहे हे पाहून तुम्ही काहीसे अस्वस्थ झाला असता का? या घटनेचा तुमच्यावर कसा परिणाम झाला असता? (लूक ७:४५) तुम्हाला धक्का बसला असता का?

तुम्ही जर इतर पाहुण्यांपैकी असता, तर तुमचे विचारही निदान थोडेफार शिमोन परुश्‍याप्रमाणेच असते का? “तेव्हा ज्या परूश्‍याने त्याला बोलाविले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.” (लूक ७:३९) येशू मात्र अतिशय सहानुभूतिशील होता. त्याला त्या स्त्रीची अवस्था कळली आणि तिचे दुःख त्याने जाणले. ही स्त्री पापी मार्गात कशी पडली हे आपल्याला सांगितलेले नाही. जर ती खरच एक वेश्‍या असेल, तर त्या गावातील पुरुषांनी, अर्थात धर्मपरायण यहुदी पुरुषांनी तिला निश्‍चितच मदत केली नव्हती.

९. येशूने काय उत्तर दिले आणि यामुळे कदाचित काय परिणाम घडून आला असावा?

पण येशूला तिला मदत करण्याची इच्छा होती. त्याने तिला म्हटले: “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तसेच त्याने म्हटले, “तुझ्या विश्‍वासाने तुला तारिले आहे, शांतीने जा.” (लूक ७:४८-५०) येथे हा वृत्तान्त संपतो. कोणी कदाचित म्हणेल की येशूने तर तिच्यासाठी फारसे काही केले नाही. त्याने केवळ तिला आशीर्वाद देऊन पाठवले. ती पुन्हा आपल्या दुःखी जीवनशैलीकडे परतली असेल असे तुम्हाला वाटते का? याविषयी आपण खात्रीने काही म्हणू शकत नाही, पण लूक यानंतर काय सांगतो याकडे लक्ष द्या. तो सांगतो की येशू “देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता.” लूक असेही सांगतो, की “कित्येक स्त्रिया” येशू व त्याच्या शिष्यांसोबत होत्या व “त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करीत असत.” ती पश्‍चात्तापी व कृतज्ञ स्त्री देखील आता त्यांच्या सोबत असेल आणि एका शुद्ध विवेकाने, जीवनात एका नव्या उमेदीने आणि देवाबद्दल पूर्वीपेक्षा अधिक प्रेमाने तिने त्याच्या इच्छेनुसार जगण्यास सुरवात केली असेल अशी शक्यता नाकारता येत नाही.—लूक ८:१-३.

येशू व परुशी यांच्यातला फरक

१०. शिमोनाच्या घरात येशू आणि पापी स्त्रीचा वृत्तान्त विचारात घेणे का उपयोगी आहे?

१० या बोलक्या अहवालावरून आपण काय शिकतो? तो वाचताना आपल्या भावना उचंबळून येतात, नाही का? तुम्ही शिमोनाच्या घरात असल्याची कल्पना करा. तुम्हाला कसे वाटेल? तुमची प्रतिक्रिया येशूसारखी असेल, की काहीशी, त्याला मेजवानीला बोलवणाऱ्‍या परूश्‍यासारखी? येशू देवाचा पुत्र असल्यामुळे आपल्या भावना व कृती हुबेहूब त्याच्यासारख्या असू शकत नाही. पण त्याचवेळेस आपण शिमोन परूश्‍यासारखे आहोत असाही आपल्याला विचार करावासा वाटणार नाही. परूश्‍यांसारखे असायला कोणालाही आवडणार नाही.

११. आपल्याला परूश्‍यांसोबत गणले जाण्याची का इच्छा नाही?

११ बायबलमधील व इतर ऐतिहासिक पुराव्यावरून आपण अशा निष्कर्षावर येऊ शकतो की परूशी लोक स्वतःला समाजाच्या व राष्ट्राच्या कल्याणाचे ठेकेदार समजत होते आणि याविषयी त्यांना अतिशय घमंड होती. देवाचे नियमशास्त्र सुस्पष्ट आणि सर्वांना समजण्याजोगे आहे हे कबूल करायला ते तयार नव्हते. नियमशास्त्रात एखाद्या गोष्टीचा थेट उल्लेख केला नसेल तर ते स्वतःचे नियम व मर्यादा बनवून रिकाम्या जागा भरून काढण्याचा प्रयत्न करायचे; व्यक्‍तीला आपल्या विवेकबुद्धीचा वापर करण्याची त्यांनी गरजच ठेवली नाही. हे धर्मपुढारी एकूण एक, अगदी क्षुल्लक गोष्टीकरताही नियम बनवण्याचा प्रयत्न करायचे. *

१२. परूश्‍यांचा स्वतःविषयी कसा दृष्टिकोन होता?

१२ पहिल्या शतकातील यहूदी इतिहासकार जोसीफस स्पष्टपणे सांगतो की परूशी स्वतःला दयाळू, सौम्य, न्यायप्रिय आणि त्यांच्या कार्याकरता पूर्णपणे पात्र समजत होते. काहीजण बऱ्‍याच प्रमाणात असे असतीलही, यात शंका नाही. कदाचित तुम्हाला निकदेम आठवत असेल. (योहान ३:१, २; ७:५०, ५१) कालांतराने त्यांच्यापैकी काहींनी ख्रिस्ती मार्ग पत्करला. (प्रेषितांची कृत्ये १५:५) ख्रिस्ती प्रेषित पौल याने परूश्‍यांसारख्या काही यहूद्यांबद्दल लिहिले, की “त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.” (रोमकर १०:२) पण शुभवर्तमानांत मात्र, सामान्य माणूस त्यांना ज्या दृष्टीने पाहात होता त्यानुसारच त्यांचे चित्र रेखाटले आहे—घमंडी, मगरूर, फाजील धार्मिक, चुका काढणारे, दोषी ठरवणारे आणि इतरांना तुच्छ लेखणारे.

येशूचा दृष्टिकोन

१३. येशूने परूश्‍यांविषयी काय म्हटले?

१३ येशूने शास्त्री व परूशी यांना ढोंगी म्हणून त्यांचा धिक्कार केला. “जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटहि लावावयाचे नाहीत.” होय, लोकांच्या खांद्यांवरील ओझे जड होते, आणि त्यांच्यावर लादलेले जू क्लेशदायक होते. पुढे येशूने शास्त्री व परूशी यांना ‘मूर्ख’ म्हणून संबोधले. मूर्ख मनुष्य समाजातील लोकांना त्रासदायक असतो. येशूने शास्त्री व परूशी यांना ‘आंधळे वाटाडी’ म्हटले आणि “नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्‍वास ह्‍या तुम्ही सोडल्या आहेत” असे त्यांना ठासून सांगितले. येशूने आपल्याला परूश्‍यांमध्ये गणावे असे कोणाला वाटेल का?—मत्तय २३:१-४, १६, १७, २३.

१४, १५. (अ) मत्तय लेवी याच्यासोबत येशूने ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरून परूश्‍यांविषयी काय दिसून येते? (ब) या अहवालातून आपण कोणते महत्त्वपूर्ण धडे शिकू शकतो?

१४ शुभवर्तमानांचे वाचन करणाऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीला बहुतेक परूश्‍यांची टीकात्मक प्रवृत्ती लगेच लक्षात येईल. जकातदार असलेल्या मत्तय लेवी याला येशूने आपला शिष्य होण्याकरता बोलावले तेव्हा लेवीने त्याच्याकरता मोठी मेजवानी दिली. या घटनेच्या अहवालात असे म्हटले आहे: “तेव्हा परुशी व त्यांच्यातील शास्री हे त्याच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले, जकातदार व पापी लोक ह्‍यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता? येशूने त्यांस उत्तर दिले, . . . मी नीतिमानांस बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्‍चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”—लूक ५:२७-३२.

१५ पण याच प्रसंगी येशूने आणखी काहीतरी म्हटले जे लेवीला समजले: “मला दया पाहिजे, यज्ञ नको ह्‍याचा अर्थ काय, हे जाऊन शिका.” (मत्तय ९:१३) परूशी लोक इब्री संदेष्ट्यांच्या लिखाणावर विश्‍वास ठेवत असल्याचा दावा करत होते, पण होशेय ६:६ येथे दिलेले हे विधान मात्र त्यांनी स्वीकारले नव्हते. त्यांनी काही चूक केली तरीही, ती संप्रदायाचे पालन करण्यासाठीच केली असे ते भासवायचे. प्रत्येकजण स्वतःला हा प्रश्‍न विचारू शकतो, ‘विशिष्ट नियमांच्या बाबतीत, उदाहरणार्थ, वैयक्‍तिक मत किंवा व्यवहारज्ञान यांवर आधारित असलेल्या गोष्टींच्या बाबतीत नियम करण्याची हेकेखोर वृत्ती असल्याची माझी ख्याती आहे का? की मुळात दयाळू आणि चांगला म्हणून लोक मला ओळखतात?’

१६. परूशी सतत काय करायचे आणि आपण त्यांच्यासारखे होण्याचे कसे टाळू शकतो?

१६ सदान्‌कदा इतरांच्या चुका शोधणे. परूश्‍यांना दुसरे कामच नव्हते. कोणतीही चूक—मग ती खरी असो वा काल्पनिक, ती त्यांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते. त्यांच्या संपर्कात येणाऱ्‍या लोकांना ते, आता आपली काहीतरी चूक दाखवली जाणार या जाणीवेनेच वागायला लावायचे आणि त्यांना त्यांच्या चुकांची वारंवार आठवण करून द्यायचे. या परूश्‍यांना गर्व कशाचा होता, तर पुदिना, बडिशेप व जिरे यांसारख्या लहान वनस्पतींचाही दशमांश आपण देतो याचा. ते विशिष्ट प्रकारचे कपडे घालून आपल्या धार्मिकपणाचा टेंभा मिरवायचे आणि सबंध राष्ट्राचा कारभार आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करायचे. आपली वागणूक येशूच्या आदर्शानुसार असावी असे आपल्याला वाटत असल्यास, नेहमी इतरांच्या चुका शोधण्याची आणि त्या मोठ्या करून दाखवण्याची वृत्ती आपण टाळली पाहिजे.

येशूने समस्या कशा हाताळल्या?

१७-१९. (अ) ज्याचे अतिशय गंभीर परिणाम होऊ शकले असते असा एक प्रसंग येशूने कशाप्रकारे हाताळला? (ब) तो प्रसंग इतका नाजूक आणि असुखकारक का होता? (क) ती स्त्री येशूजवळ आली तेव्हा तुम्ही तेथे असता तर तुमची प्रतिक्रिया काय असती?

१७ समस्या हाताळण्याची येशूची पद्धत परूश्‍यांपेक्षा फार वेगळी होती. उदाहरणार्थ एक असा प्रसंग विचारात घ्या, जो अतिशय गंभीर ठरू शकला असता; पण येशूने तो कसा हाताळला ते पाहा. या घटनेत एक स्त्री गोवलेली होती व तिला १२ वर्षांपासून रक्‍तस्राव होत होता. लूक ८:४२-४८ येथे तुम्ही हा वृत्तान्त वाचू शकता.

१८ मार्कच्या अहवालात असे म्हटले आहे की ही स्त्री “भीत भीत व कापत कापत [येशूकडे] आली.” (मार्क ५:३३) का? साहजिकच कारण आपण देवाचा नियम मोडला आहे याची तिला जाणीव होती. लेवीय १५:२५-२८ यानुसार एखाद्या स्त्रीला अनैसर्गिक रक्‍तस्राव होत असला तर तिचे स्रावाचे सर्व दिवस शिवाय त्यानंतर आणखी एक आठवडा तिला अशुध्द समजले जायचे. ती जे काही शिवेल आणि ज्या कोणाला स्पर्श करेल तो देखील अशुद्ध झाला असे समजले जायचे. येशूजवळ येण्यासाठी या स्त्रीला गर्दीतून मार्ग काढणे भाग होते. आज २,००० वर्षांनंतर या स्त्रीचा अहवाल वाचताना आपल्याला त्या बिचारीची कीव आल्याशिवाय राहात नाही.

१९ त्या काळात तुम्ही तेथे असता तर या घटनेकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले असते? तुम्ही काय म्हटले असते? येशूने या स्त्रीला किती दयेने, प्रेमाने आणि सहानुभूतीने वागवले याकडे लक्ष द्या. तिच्यामुळे निर्माण झालेल्या कोणत्याही अडचणीविषयी त्याने उल्लेख देखील केला नाही.—मार्क ५:३४.

२०. लेवीय १५:२५-२८ यातील नियम आज ख्रिश्‍चनांकरता बंधनकारक असता तर आपल्याला कोणत्या आव्हानाला तोंड द्यावे लागले असते?

२० या घटनेवरून आपण काही शिकू शकतो का? आज तुम्ही ख्रिस्ती मंडळीत वडील आहात अशी कल्पना करा. शिवाय, लेवीय १५:२५-२८ येथील नियम आज ख्रिस्ती लोकांकरता बंधनकारक आहे आणि एका स्त्रीने आपल्या त्रासामुळे कासावीस होऊन असहायपणे या नियमाचे उल्लंघन केले आहे अशी कल्पना करा. तुम्ही काय कराल? सर्वांसमोर तिची चूक दाखवून तुम्ही तिला खजील कराल का? तुम्ही म्हणाल “छे, मी असे कधीच करणार नाही! येशूच्या पावलावर पाऊल ठेवून मी दयाळू, प्रेमळ, विचारशील आणि सहानुभूतीशील रितीने वागण्याचा जमेल तितका प्रयत्न करेन.” अगदी उत्तम! पण वास्तवात असे करून दाखवणे, येशूच्या पावलावर पाऊल ठेवणे हे एक आव्हान आहे.

२१. येशूने लोकांना नियमशास्त्राविषयी काय शिकवले?

२१ या सर्वाचे तात्पर्य असे, की येशूच्या संपर्कात येणाऱ्‍या लोकांना विसावा, उभारी व प्रोत्साहन मिळायचे. ज्या बाबतीत देवाचे नियम अटळ होते त्या बाबतीत हे नियमशास्त्रातच स्पष्टपणे व्यक्‍त केलेले होते. आणि ज्या बाबतीत ते तितकेसे स्पष्ट नव्हते त्या बाबतीत प्रत्येक व्यक्‍तीने आपल्या विवेकबुद्धीचा वापर करायचा होता आणि आपल्या निर्णयांतून आपल्याला देवाबद्दल प्रेम असल्याचे दाखवायचे होते. नियमशास्त्राने लोकांना मुक्‍तपणे श्‍वास घेण्याची मुभा दिली होती. (मार्क २:२७, २८) देवाचे आपल्या लोकांवर प्रेम होते, तो सतत त्यांच्या भल्याकरता कार्य करत होता आणि त्यांच्या हातून चूक झाल्यास तो त्यांना दया दाखवण्यास तयार होता. येशू देखील असाच होता.—योहान १४:९.

येशूच्या शिकवणुकींचा परिणाम

२२. येशूच्या शिकवणुकींमुळे त्याच्या शिष्यांना कसे वाटले?

२२ ज्यांनी येशूचे ऐकले आणि जे त्याचे शिष्य बनले त्यांना येशूच्या या विधानाची सत्यता पटली: “माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय ११:३०) त्याने आपल्यावर ओझे लादले आहे, किंवा तो आपल्याला त्रास देत आहे किंवा तो सतत आपली कानउघाडणी करतो असे त्याच्या शिष्यांना कधीच जाणवले नाही. ते अधिक स्वतंत्र व आनंदी होते आणि देवासोबतच्या व एकमेकांसोबतच्या आपल्या नातेसंबंधाविषयी त्यांना अधिक आत्मविश्‍वास वाटू लागला. (मत्तय ७:१-५; लूक ९:४९, ५०) त्याच्याकडून त्यांना हे शिकायला मिळाले की एक आध्यात्मिक नेता होण्याकरता इतरांना विसावा देऊ करणे आणि मनाने व हृदयाने लीन असणे अनिवार्य आहे.—१ करिंथकर १६:१७, १८; फिलिप्पैकर २:३.

२३. येशूच्या सहवासातून त्याच्या शिष्यांना कोणता महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला आणि यावरून त्यांना कोणते निष्कर्ष काढण्यास मदत झाली?

२३ शिवाय, ख्रिस्तासोबत एकतेत राहण्याचे आणि त्याच्यासारखीच मनोवृत्ती दाखवण्याचे महत्त्व बऱ्‍याच जणांच्या मनात कोरले गेले. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली तशी मीहि तुम्हावर प्रीति केली आहे; तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.” (योहान १५:९, १०) देवाचे यशस्वी सेवक होण्याकरता, त्यांना देवाच्या अद्‌भुत सुवार्तेचा प्रचार करताना, इतरांना त्याविषयी शिकवताना आणि आपल्या कुटुंबातील व ओळखीच्या लोकांशी व्यवहार करताना येशूकडून शिकलेल्या गोष्टी आचरणात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागेल हे त्यांना समजले. बांधवांच्या संख्येत भर पडून नवनवीन मंडळ्या निर्माण होतील तसतसे त्यांना स्वतःला वारंवार याची आठवण करून द्यायची होती, की येशूने शिकवलेला मार्गच योग्य मार्ग होता. त्याने जे शिकवले तेच सत्य होते आणि त्याच्या जीवनातून त्यांना जे शिकायला मिळाले तशाचप्रकारे जीवन जगण्याचा त्यांनी प्रयत्न करायचा होता.—योहान १४:६; इफिसकर ४:२०, २१.

२४. येशूच्या उदाहरणावरून कोणत्या गोष्टी मनावर घेणे आवश्‍यक आहे?

२४ आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या गोष्टींवर विचार करत असताना तुम्हाला स्वतःत सुधारणा करण्याजोग्या काही गोष्टी आढळल्या का? येशू ख्रिस्त त्याच्या विचारांत, शिकवणुकींत आणि वागणुकीत कधीही चुकला नाही याजशी तुम्ही सहमत आहात का? मग हिंमत हारू नका. त्याने आपल्याला असे प्रोत्साहन दिले आहे: “जर ह्‍या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहा.”—योहान १३:१७.

[तळटीप]

^ “[येशू व परूशी] यांच्यातला फरक, देवाविषयीच्या त्यांच्या दोन विरुद्ध दृष्टिकोनांवरून स्पष्ट होतो. परूशी देवाला निव्वळ मागणी करणारा समजत होते, तर येशूकरता तो दयाळू व कनवाळू होता. परूशी देवाचे चांगुलपण व प्रेम नाकारत नव्हते, पण त्यांच्या मते, देवाने तोरह [नियमशास्त्र] देण्याद्वारे व त्यातील मागण्या पूर्ण करणे शक्य करण्याद्वारे ते व्यक्‍त केले होते. . . . परूश्‍याच्या मते तोरह पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मौखिक संप्रदाय अर्थात नियमशास्त्राचा उलगडा करणारे त्यातील नियम काटेकोरपणे पाळणे. . . . येशूने प्रीतीच्या दुहेरी आज्ञेला (मत्त. २२:३४-४०) नियमशास्त्राचा उलगडा करण्याचे स्वीकार्य मानक ठरवले, शिवाय त्याने मौखिक संप्रदायाचे बंधन मुळीच जुमानले नाही . . . त्यामुळे त्याच्या शिकवणुकी परूशांच्या आचारविचारांशी विसंगत होत्या.”—द न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट थियॉलॉजी.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• येशूचे शिष्य असण्याचा काय अर्थ होतो असे तुम्हाला वाटते?

• येशू लोकांशी कशाप्रकारे वागला?

• येशूच्या शिकवण्याच्या पद्धतीवरून आपल्याला काय शिकायला मिळते?

• परूशी आणि येशू कोणत्या अर्थाने वेगळे होते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८, १९ पानांवरील चित्रे]

लोकांप्रती येशूची वृत्ती परूशांच्या तुलनेत किती वेगळी होती!