व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मी कैसराजवळ न्याय मागतो!”

“मी कैसराजवळ न्याय मागतो!”

“मी कैसराजवळ न्याय मागतो!”

एका जमावाने एका असहाय माणसाला धरले आणि बेदम मारायला सुरवात केली. त्यांच्या मते तो मरण्यास पात्र होता. पण तो ठार मारला जाणार इतक्यात, शिपाई तेथे पोहंचले आणि मोठ्या मुश्‍किलीने त्या व्यक्‍तीला खवळलेल्या जमावाच्या हातून सोडवून आपल्या ताब्यात घेतले. हा मनुष्य होता प्रेषित पौल. त्याच्यावर हल्ला करणारे यहूदी होते; पौलाच्या प्रचाराला त्यांचा कडा विरोध होता आणि त्याने मंदिर अशुद्ध केले होते असा त्यांनी त्याच्यावर आरोप लावला होता. त्याला सोडवणारे शिपाई रोमन होते व त्यांचा नायक क्लॉडियस लायसियस हा होता. या गोंधळात पौलाला संशयित गुन्हेगार म्हणून अटक केली जाते.

प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील शेवटल्या सात अध्यायांमध्ये या अटकेमुळे सुरू झालेल्या खटल्याची माहिती दिली आहे. पौलाची कायदेशीर पार्श्‍वभूमी, त्याच्याविरुद्ध केलेले आरोप, त्याची सफाई आणि रोमन फौजदारी पद्धत यांच्याविषयी समजून घेतल्याने या अध्यायांची आपल्याला अधिक समज प्राप्त होईल.

क्लॉडियस लायसियसच्या ताब्यात

जेरूसलेममध्ये शांती-सुरक्षा राखणे हे क्लॉडियस लायसियसचे काम होते. त्याचा वरिष्ठ अधिकारी अर्थात यहूदीयाचा रोमन सुभेदार सिसेरियात राहत होता. पौलाच्या बाबतीत लायसियसने केलेली कार्यवाही, हिंसेपासून एका व्यक्‍तीचे संरक्षण आणि शांती भंग करणाऱ्‍या व्यक्‍तीची अटक यासाठी होती असे पाहिले जाऊ शकते. यहूद्यांची प्रतिक्रिया पाहून लायसियसला आपल्या कैद्याला टावर ऑफ अँटोनियोतील शिपायांच्या क्वाटरमध्ये घेऊन जावे लागले.—प्रेषितांची कृत्ये २१:२७–२२:२४.

पौलाचा नेमका गुन्हा काय होता हे लायसियसला शोधून काढायचे होते. लोकांच्या गोंधळात त्याला काहीएक समजले नव्हते. त्यामुळे, अधिक वेळ न घालवता त्याने असा हुकूम दिला की, ‘लोक पौलावर इतके का ओरडत होते हे समजण्यासाठी त्याची चौकशी चाबकाखाली करावी.’ (प्रेषितांची कृत्ये २२:२४) गुन्हेगार, गुलाम आणि खालच्या स्तरातील कोणाकडूनही माहिती काढण्याची ही नेहमीची पद्धत होती. आणि यासाठी चाबूक (फ्लॅग्रम) परिणामकारकही ठरले असेल; पण ते एक भयंकर साधन होते. बहुतेक चाबकांवर लहान धातूचे गोळे असलेल्या लोंबकळत्या साखळ्या असत. इतर चाबके चामड्याच्या पट्ट्यांनी बनवलेले असत आणि अधूनमधून त्यांच्यावर टोकदार हाडांचे व धातूचे तुकडे लावलेले असत. यांच्या फटक्यांमुळे शरीरावर भयंकर जखमा होत; मांसाच्या चिंध्या होत.

या क्षणी पौलाने आपण रोमन नागरिक असल्याचे उघड केले. दोषी न ठरलेल्या रोमनाला चाबकाचा मार दिला जाऊ शकत नव्हता त्यामुळे पौलाने आपल्या हक्कांचा दावा करताच त्याचा लागलीच परिणाम झाला. एका रोमन नागरिकावर अत्याचार केल्याने किंवा त्याला शिक्षा दिल्याने एका रोमन अधिकाऱ्‍याचा हुद्दा देखील जाऊ शकत होता. तेव्हापासून पौलाला असाधारण कैद्याची वागणूक दिली जाऊ लागली; त्याला भेटायला कोणीही येऊ शकत होते.—प्रेषितांची कृत्ये २२:२५-२९; २३:१६, १७.

आरोपांबद्दल खात्री नसल्यामुळे, हा सगळा दंगा कशामुळे झाला होता ते माहीत करून घेण्यासाठी लायसियसने पौलाला सन्हेद्रिनपुढे नेले. परंतु, पुनरुत्थानासंबंधाने आपली चौकशी होत आहे असे पौलाने म्हणताच तिथे वादविवाद सुरू झाला. भांडणाने हिंसक वळण घेतले तेव्हा यहुदी लोक पौलाच्या चिंथड्या करतील या भीतीने लायसियसला पुन्हा एकदा त्याला संतप्त यहूद्यांच्या मधून सोडवून आणावे लागले.—प्रेषितांची कृत्ये २२:३०-२३:१०.

कोणा रोमन व्यक्‍तीच्या खुनासाठी लायसियसला जबाबदार व्हायचे नव्हते. खूनाचा कट रचला जात आहे हे कळताच त्याने ताबडतोब आपल्या कैद्याला सिसेरियाला हलवले. तेव्हाच्या कायदेशीर गरजेनुसार कैद्यांसोबत त्या प्रकरणाचा अहवालही ज्येष्ठ न्यायिक अधिकाऱ्‍यांना पाठवावा लागत असे. त्या अहवालांमध्ये, प्राथमिक चौकशा, कार्यवाहीची कारणे आणि त्या प्रकरणाविषयी चौकशी करणाऱ्‍याचे मत हेसुद्धा सामील करण्याची गरज होती. लायसियसने असा अहवाल दिला की पौलावर, ‘यहूदी नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनांची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता’; आणि पौलावर आरोप करणाऱ्‍यांना त्यांच्या तक्रारींसह मुखत्यार, फेलिक्स याच्यासमोर हजर राहण्याची आज्ञा देण्यात आली.—प्रेषितांची कृत्ये २३:२९, ३०.

सुभेदार फेलिक्स शिक्षा सुनावण्यास असमर्थ

प्रांतीय अधिकारिता फेलिक्सच्या शक्‍तीवर व अधिकारावर आधारित होती. त्याच्या मर्जीप्रमाणे तो स्थानीय रूढी अनुसरू शकत होता किंवा उच्च स्तरातील लोकांना आणि सरकारी अधिकाऱ्‍यांना लागू होणारा कायदेशीर गुन्हेगारी कायदा अनुसरू शकत होता. याला ओर्डो किंवा यादी असे म्हटले जात होते. तो एक्स्ट्रा ओर्डिनेम अधिकारिता देखील उपयोगात आणू शकत होता जी कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यासाठी वापरली जाऊ शकत होती. प्रांतीय सुभेदाराला, ‘रोममध्ये काय केले जाते याचा नव्हे तर सर्वसामान्यपणे काय केले जावे याचा विचार’ करायचा होता. त्यामुळे, पुष्कळशा गोष्टी त्याच्यावर अवलंबून होत्या.

प्राचीन रोमन कायद्याचे सर्व तपशील आपल्याला ठाऊक नाहीत परंतु पौलाचा खटला “एक्स्ट्रा ओर्डिनेम या प्रांतीय फौजदारी पद्धतीचा उत्कृष्ट नमुना” मानला जातो. सुभेदार आणि त्याचे साहाय्यक सल्लागार, प्रत्येक व्यक्‍तीकडून आरोप ऐकून घेत. प्रतिवाद्याला आरोप करणाऱ्‍यासमोर आणले जात होते आणि तो आपली बाजू मांडू शकत होता परंतु बंधनाचा भार फिर्याद करणाऱ्‍यावर होता. फौजदारी न्यायाधीश आपल्याला योग्य वाटेल अशी शिक्षा देत असे. तो लगेच निर्णय सुनावू शकत होता किंवा अनिश्‍चित काळापर्यंत निकाल पुढे ढकलू शकत होता; असे केल्यास, प्रतिवाद्याला तुरुंगात ठेवले जाई. विद्वान हेन्री कॅडबरी म्हणतात की, “अशाप्रकारचा अनियंत्रित अधिकार असल्यामुळे मुखत्यारावर ‘गैर प्रभाव’ पडण्याची शक्यता होती आणि एखाद्याला निर्दोष ठरवण्यास, दोषी ठरवण्यास किंवा न्याय पुढे ढकलण्यास त्याला लाचलुचपत दिली जाऊ शकत होती.”

प्रमुख याजक हनन्या, यहूद्यांचे काही वडील आणि तिर्तुल्ल यांनी, पौल ‘हा एक पीडा असून सर्व यहूदी लोकांत बंड उठवणारा आहे’ असा त्याच्यावर फेलिक्ससमक्ष आरोप लावला. तो “नासोरी पंथाचा” पुढारी आहे आणि त्याने मंदिर विटाळविण्याचा प्रयत्न केला असा त्यांनी दावा केला.—प्रेषितांची कृत्ये २४:१-६.

सुरवातीला पौलावर हल्ला करणाऱ्‍यांना वाटले होते, की केवळ यहूद्यांकरता प्रवेश असलेल्या अंगणात त्रफिम नावाच्या विदेश्‍याला यायला त्यानेच प्रवृत्त केले होते. * (प्रेषितांची कृत्ये २१:२८, २९) खरे पाहता, त्रफिमने बेकायदा प्रवेश केला असा दावा करण्यात आला होता. पंरतु, पौलाने त्याला प्रवेश करायला मदत किंवा साहाय्य केले होते, असा यहूद्यांनी अर्थ काढला असल्यास हा देखील देहान्त शिक्षेस पात्र असलेला गुन्हा ठरू शकत होता. आणि असे दिसते की, रोमने या गुन्ह्यासाठी देहान्त शिक्षा मान्य केली होती. त्यामुळे, लायसियसऐवजी यहूदी मंदिराच्या शिपायांनी पौलाला अटक केली असती तर सन्हेद्रिनला त्याची चौकशी घेऊन त्याला शिक्षा सुनावण्यात कसलाच अडथळा नसता.

यहूद्यांचे असे म्हणणे होते की, पौल यहूदी धर्म किंवा कायदेशीर धर्म (रिलिजिओ लिकिटा) शिकवत नव्हता. उलट, त्याची शिकवण बेकायदेशीर किंवा विनाशकारक समजली जाण्यास हवी.

त्यांचा असाही दावा होता की, पौल ‘जगातल्या सर्व यहूदी लोकांत बंड उठवत होता.’ (प्रेषितांची कृत्ये २४:५) सम्राट क्लॉडियसने नुकतेच, “जगभरात अस्वस्थता निर्माण करण्याबद्दल” अलेक्झांड्रियातील यहूद्यांची टीका केली होती. ही समानता एकदम उल्लेखनीय आहे. “क्लॉडियसच्या शासन काळादरम्यान किंवा निरोच्या सुरवातीच्या शासनादरम्यान एका यहूद्याविरुद्ध हाच आरोप करणे सर्वात उत्तम होते,” असे इतिहासकार ए. एन. शर्वन-वाईट म्हणतात. “पौलाचा प्रचार रोमी साम्राज्यातील सर्व यहूदी लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासमान होता असा निष्कर्ष काढण्यास यहूदी लोक सुभेदाराला प्रवृत्त करत होते. त्यांना ठाऊक होते की, सुभेदार केवळ धार्मिक आरोपांवरून कोणालाही दोषी ठरवण्यास उत्सुक नव्हते आणि म्हणून त्यांनी या धार्मिक आरोपाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.”

पौलाने एक-एक करून स्वतःची बाजू मांडली. ‘मी कसलाही गोंधळ निर्माण केलेला नाही. इतके खरे की, ज्या मार्गाला ते “पाखंड” म्हणतात तो मार्ग मी अनुसरतो; म्हणजेच, मी यहूदी विधींचे पालन करतो. हा दंगा विशिष्ट आशियाई यहूद्यांनी माजवला होता. त्यांची काही तक्रार असल्यास त्यांनी येथे येऊन ती सादर करावी.’ अशाप्रकारे, पौलाने हे सिद्ध केले की, हे आरोप दूसरे तिसरे काही नसून यहूद्यांच्या आपसातला धार्मिक तंटा होता ज्यावर रोमनांचा काही अधिकार नव्हता. आधीच खवळलेल्या यहूद्यांना आणखी उत्तेजित करू नये म्हणून फेलिक्सने सभा स्थगित केली; अर्थात कारवाई पुढे चालवता येत नाही अशी ही कायदेशीर स्थिती होती. पौलाला यहूद्यांच्या ताब्यात देण्यात आले नाही (जे त्याला शिक्षा देण्याचा अधिकार असल्याचा दावा करत होते), किंवा त्याला रोमन कायद्यानुसार न्याय देण्यात आला नाही किंवा सोडवण्यातही आले नाही. न्याय देण्यास फेलिक्सला भाग पाडणे शक्य नव्हते आणि यहुद्यांची मर्जी संपादन करण्यासोबतच, दिरंगाई करण्याचा त्याचा आणखी एक उद्देश होता—पौल त्याला लाच देईल अशी त्याला आशा होती.—प्रेषितांची कृत्ये २४:१०-१९, २६. *

पोर्सियस फेस्टसच्या अधिकारातील महत्त्वाचा टप्पा

जेरूसलेममध्ये दोन वर्षांनंतर, पोर्सियस फेस्टसचे आगमन होताच यहूद्यांनी पुन्हा एकदा आरोप लावले आणि पौलाला आपल्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली. परंतु फेस्टसने ठामपणे सांगितले: “आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाहि शिक्षेकरिता सोपून देण्याची रोमन लोकांची रीत नाही.” इतिहासकार हॅरी डब्ल्यू. ताशरा यांनी असे म्हटले: “फेस्टसने पटकन ओळखले की, एका रोमन नागरिकाला आपल्या अधिकारात घेऊन जबरदस्तीने देहान्त शिक्षा देण्याचा कट रचला जात होता.” त्यामुळे, यहूद्यांना आपली तक्रार सिसेरियात सादर करायला सांगण्यात आले.—प्रेषितांची कृत्ये २५:१-६, १६.

तेथे यहूद्यांनी ठामपणे म्हटले, “ह्‍याला ह्‍यापुढे जिवंत ठेवू नये.” पण ते कोणताही पुरावा सादर करू शकले नाहीत आणि फेस्टसने समजून घेतले की, पौलाने मरणदंड मिळण्यासारखा कोणताही गुन्हा केला नव्हता. “केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे असे पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्‍याच्याविषयी ह्‍याचा व त्यांचा वाद होता,” असे फेस्टसने दुसऱ्‍या एका अधिकाऱ्‍याला स्पष्टीकरण दिले.—प्रेषितांची कृत्ये २५:७, १८, १९, २४, २५.

पौल कोणत्याही राजकीय आरोपावरून दोषी नव्हता हे स्पष्ट होते पण धार्मिक वादाच्या संदर्भात, हा खटला केवळ यहूद्यांच्या न्यायालयात सोडवला जाऊ शकतो असा बहुतेक यहूद्यांचा दावा होता. मग, न्यायाकरता पौल जेरूसलेमला जाणार होता का? फेस्टसने पौलाला हा प्रश्‍न विचारला, पण खरे पाहता, हे योग्य नव्हते. पौलाला जेरूसलेमला पाठवले असते तर आरोप लावणारे हे पंच झाले असते आणि पौलाला यहूद्यांच्या ताब्यात द्यावे लागले असते. “कैसराच्या न्यायासनापुढे मी उभा आहे; येथेच माझा न्याय झाला पाहिजे,” असे पौल म्हणाला. “मी यहूद्यांचा काही अपराध केला नाही . . . मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाहि अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो!”—प्रेषितांची कृत्ये २५:१०, ११, २०.

रोमन नागरिकाने हे शब्द उच्चारताच सर्व प्रांतीय अधिकार निकामी होतात. न्यायाची मागणी करण्याचा त्याचा हक्क “खरा, बहुव्यापक आणि परिणामकारक” होता. त्यामुळे, आपल्या सल्लागारांसोबत याच्या तांत्रिक बाजूचा विचार केल्यावर फेस्टस म्हणाला: “तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरापुढे जाशील.”—प्रेषितांची कृत्ये २५:१२.

नाहीतरी फेस्टसला पौलाच्या पीडेपासून सुटका हवीच होती. कारण काही दिवसांनंतर त्याने हेरोद अग्रीप्पा दुसरा याच्या पुढे असे कबूल केले की, या खटल्यामुळे तो गोंधळून गेला होता. फेस्टसला सम्राटासाठी या खटल्याचे निवेदन तयार करावे लागले; पण पौलावर केलेले आरोप फेस्टसच्या समजण्यापलीकडच्या यहूदी कायद्याच्या गुंतागुंतीच्या गोष्टी होत्या. परंतु, यहूदी कायदेविषयक बाबींत अग्रीप्पा चांगलाच मुरलेला होता म्हणून या खटल्याबद्दल त्याने रस दाखवताच त्याला पत्र तयार करायला सांगण्यात आले. त्यानंतर पौल अग्रीप्पासमोर बोलत असताना फेस्टस म्हणाला: “पौला तू वेडा आहेस; विद्येचे अध्ययन फार झाल्यामुळे तुझे डोके फिरले आहे.” परंतु अग्रीप्पाला पौलाचे बोलणे एकदम अचूकरीत्या समजले. “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवशील,” असे अग्रीप्पा त्याला म्हणाला. पौलाच्या युक्‍तीवादाविषयी फेस्टस आणि अग्रीप्पा या दोघांचीही कदाचित वेगळी मते असली तरीसुद्धा पौल निर्दोष होता आणि कैसराला त्याने अपील केले नसते तर त्याची सुटका झाली असती याबाबत त्या दोघांचे एकमत होते.—प्रेषितांची कृत्ये २५:१३-२७; २६:२४-३२.

एका कायदेशीर कारवाईची समाप्ती

रोम येथे परतल्यावर, पौलाने यहूद्यांच्या प्रमुख लोकांना बोलावले. केवळ त्यांना प्रचार करण्याच्या उद्देशाने नव्हे तर त्याच्याविषयी त्यांना किती माहीत होते हे जाणून घेण्यासाठी. यावरून त्याच्या फिर्यादींचे हेतू काय आहेत हे त्याला कळाले असावेत. एखादा खटला चालू असताना, जेरूसलेममधील अधिकाऱ्‍यांना रोमन यहूद्यांची मदत घेणे सामान्य पद्धत होती. पण त्यांना पौलाविषयी कोणत्याही सूचना मिळाल्या नव्हत्या असे पौलाला कळाले. पौलाच्या चौकशीला अद्याप अवकाश होता; त्याला भाड्याने घर घेऊन बिनदिक्कत प्रचार करायला परवानगी देण्यात आली. त्याला इतकी सूट दिली होती याचा अर्थ रोमनांच्या दृष्टीत तो निर्दोष होता.—प्रेषितांची कृत्ये २८:१७-३१.

पौल आणखी दोन वर्षे ताब्यात राहिला. का? बायबलमध्ये याविषयी काही तपशील दिलेला नाही. फिर्यादींनी येऊन आरोप करेपर्यंत अपील करणाऱ्‍या व्यक्‍तीला सहसा ताब्यात ठेवले जात होते; परंतु, जेरूसलेममधील यहूद्यांनी आपली बाजू किती कमकुवत आहे हे ओळखल्यामुळे ते कदाचित आलेच नसावेत. कदाचित आरोप करायला पुढे न येणे हाच पौलाला होता होईल तितक्या काळापर्यंत शांत ठेवण्याचा एक परिणामकारक मार्ग होता. तथापि, असे दिसते की, पौल निरोपुढे गेला, त्याला निर्दोष घोषित करण्यात आले आणि शेवटी म्हणजे, अटकेनंतर पाच वर्षांनी, त्याला आपले मिशनरी कार्य पुन्हा सुरू करण्याची मोकळीक मिळाली.—प्रेषितांची कृत्ये २७:२४.

ख्रिस्ती प्रचार कार्यात अडथळा आणण्यासाठी सत्याच्या विरोधकांनी ‘कायद्याने अरिष्ट योजल्याची’ इतिहासात कितीतरी उदाहरणे आहेत. याचे आपल्याला नवल वाटू नये. येशूने म्हटले: “ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील.” (स्तोत्र ९४:२०, पं.र.भा.; योहान १५:२०) पण, संपूर्ण जगाला सुवार्ता सांगण्याच्या स्वातंत्र्याची हमी देखील येशू आपल्याला देतो. (मत्तय २४:१४) त्यामुळे, प्रेषित पौलाने छळ आणि विरोधाचा सामना केला त्याचप्रमाणे आज यहोवाचे साक्षीदारही ‘सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देतात व कायदेशीररित्या तिचे समर्थन करतात.’—फिलिप्पैकर १:७, NW.

[तळटीपा]

^ आतले अंगण आणि विदेश्‍यांचे अंगण यांच्यामध्ये तीन क्युबीट उंच दगडी खांबांची एक रांग आहे. या भिंतीवर ठिकठिकाणी ग्रीक व लॅटिन भाषेत अशा सूचना आहेत: “कोणा विदेश्‍याला या हद्दीपलीकडे आणि पवित्रस्थानाबाहेरील कुंपणाच्या आत प्रवेश करू देऊ नये. ज्या कोणाला पकडले जाईल त्याला लागलीच मृत्यूदंड दिला जाईल आणि तो स्वतः याला जबाबदार ठरेल.”

^ अर्थात हे बेकायदेशीर होते. एका सूत्रानुसार, “लेक्स रेपेटुनडारम या पैशांच्या वसुलीसंबंधीच्या कायद्याच्या तरतुदींप्रमाणे, अधिकाराच्या अथवा प्रशासकीय पदावर असलेल्या कोणत्याही व्यक्‍तीला कोणाला तुरुंगात टाकण्यासाठी किंवा सुटका करण्यासाठी, न्याय देण्यासाठी किंवा न देण्यासाठी किंवा कैद्याला सोडवण्यासाठी लाच मागायला किंवा स्वीकारायला मनाई होती.”