व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“लोक मला कोण म्हणून म्हणतात?”

“लोक मला कोण म्हणून म्हणतात?”

“लोक मला कोण म्हणून म्हणतात?”

नाताळाचे पुन्हा आगमन झाले. जगाच्या कानाकोपऱ्‍यात लोक एक वाढदिवस पाळत आहेत. पण कोणाचा वाढदिवस? देवाच्या पुत्राचा की पहिल्या शतकात आपल्या प्रदेशात मानल्या जाणाऱ्‍या धर्मामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या एका धार्मिक प्रवृत्तीच्या यहुदी माणसाचा? की, गरीबांचा दाता असलेल्याचा किंवा ज्याच्या कपाळावर विद्रोही म्हणून शिक्का मारून रोमन साम्राज्याला धोका समजून मृत्यूदंड देण्यात आला त्याचा? की, ज्ञान व बुद्धीच्या गोष्टी शिकवणाऱ्‍या एका संताचा? ‘येशू ख्रिस्त नेमका कोण होता?’ हा प्रश्‍न विचारणे अगदी योग्य आहे.

याच प्रश्‍नाबद्दल लोकांचे मत काय आहे हे जाणून घ्यायला खुद्द येशू देखील उत्सुक होता. एकदा त्याने आपल्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” (मार्क ८:२७) असे विचारायची काय गरज होती? पुष्कळांनी येशूला सोडून दिले होते. इतरजण कदाचित गोंधळून गेले होते आणि निराश झाले होते कारण त्याने राजा व्हायला नकार दिला. शिवाय, त्याच्या शत्रुंनी त्याला आव्हान दिल्यावर तो कोण होता हे सिद्ध करायला येशूने स्वर्गातून चिन्ह दाखवले नाही. त्यामुळे, तो कोण होता याविषयी त्याच्या प्रेषितांनी काय उत्तर दिले? लोकांचे काय मत होते हे त्यांनी सांगितले: “कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलीया, कित्येक यिर्मया, किंवा संदेष्ट्यातील कोणी एक, असे म्हणतात.” (मत्तय १६:१३, १४) पण त्या वेळी पॅलेस्टाईनमध्ये त्याच्याविषयी पसरलेल्या

वाईट अफवांचा—तो निंदक, तोतया, खोटा संदेष्टा किंवा वेडा होता—यांचा त्यांनी उल्लेख केला नाही.

येशूचे विविध चेहरे

येशूने तोच प्रश्‍न आज विचारला तर तो अशाप्रकारे विचारू शकतो: “विद्वानांच्या मते मी कोण आहे?” पुन्हा एकदा कदाचित हेच उत्तर मिळेल की, येशूविषयी लोकांच्या पुष्कळ वेगवेगळ्या कल्पना आहेत. शिकागो विद्यापीठाच्या डेव्हिड ट्रेसी यांच्या मते, “येशूबद्दल आणि त्याने जे सांगितले आणि केले त्याबद्दल विविध लोकांची विविध मते आणि विविध स्पष्टीकरणे आहेत.” गेल्या शतकादरम्यान, येशू नेमका कोण होता याचे उत्तर देण्यासाठी विद्वानांनी अनेक जटिल सामाजिक, मानववंशशास्त्रविषयक आणि साहित्यिक पद्धतींचा उपयोग केला आहे. शेवटी, त्यांच्या मते येशू कोण होता?

काही विद्वान अजूनही असा दावा करतात की, इतिहासाचा येशू, मृत्यू आणि न्यायासंबंधीच्या सिद्धान्ताला मानणारा एक यहूदी संदेष्टा होता जो लोकांना पश्‍चात्ताप करायला सांगत होता. मात्र, ते त्याला देवाचा पुत्र, मशीहा आणि तारक असे म्हणत नाहीत. पुष्कळजण, त्याचा स्वर्गीय उगम आणि पुनरुत्थान याबद्दलच्या बायबलमधील अहवालाविषयी शंका व्यक्‍त करतात. इतरांच्या मते, येशू केवळ एक मानव होता ज्याचे आदर्श जीवन आणि शिकवणी अनेक धर्मांकरता प्रेरणा ठरली आणि हेच विविध धर्म मिळून शेवटी ख्रिस्ती धर्म बनला. थिओलॉजी टुडे यात सांगितल्यानुसार, आणखी इतरांच्या मते येशू “एक उपेक्षावादी, भटका संत किंवा आध्यात्मिक शक्‍ती असलेला शेतकरी; समाज सुधारक, व्यवस्थेची टीका करणारा हिप्पी कवी किंवा पॅलेस्टाईनच्या मागासलेल्या गावातील खवळलेल्या, दरिद्री, हिंसक लोकांमध्ये उघडपणे आपली मते व्यक्‍त करणारा चतुर मनुष्य होता.”

लोकांची यापेक्षाही विचित्र मते आहेत. आता रॅप संगीत, शहरांमध्ये ठिकठिकाणी दिसणारी कला आणि नाच यांमध्येही आफ्रिकन येशूचे चित्रण केले जात आहे. * इतरांची अशी कल्पना आहे की, येशू एक स्त्री होता. १९९३ च्या उन्हाळ्यात, कॅलिफोर्नियातील ऑरेंज काउंटी फेअर (मेळा) पाहायला आलेल्या लोकांनी, “ख्रिस्टीची” मूर्ती अर्थात क्रूसावर खिळलेल्या नग्न, स्त्री “ख्रिस्ताची” प्रतिमा पाहिली. त्याच दरम्यान न्यूयॉर्कमध्ये, “ख्रिस्टा”—क्रूसावर खिळलेली स्त्री रूपातील “येशू”—ही मूर्ती देखील प्रदर्शित करण्यात आली होती. या दोन्ही मूर्ती बऱ्‍याच वादग्रस्त ठरल्या. १९९९ च्या सुरवातीला, “बालक येशू आणि त्याचा कुत्रा ऐंजल यांच्यातील प्रेम” यावर आधारित असलेले एक पुस्तक बाजारात आले होते. त्यांच्यातील नातेसंबंध “आध्यात्मिक प्रेरणा देणारा आणि एक मुलगा व कुत्रा एकमेकांसाठी प्राण देण्यास कशाप्रकारे तयार आहेत हे दाखवणारा” आहे असे म्हटले गेले.

हे जाणणे महत्त्वाचे आहे का?

पण येशू कोण होता आणि आहे याची तुम्हाला उत्सुकता का असावी? नेपोलियनच्या शब्दांत सांगायचे झाल्यास याचे एक कारण असे आहे की, “येशू ख्रिस्ताने प्रत्यक्षात आपल्या प्रजेसोबत न राहता त्यांच्यावर प्रभाव पाडला आहे व त्यांच्यावर प्रभुत्व केले.” आपल्या प्रभावी शिकवणींनी व आचरणाने येशूने सुमारे दोन हजार वर्षांपासून कोट्यवधी लोकांच्या जीवनावर जोरदार प्रभाव पाडला आहे. एका लेखकाने उचितपणे असे म्हटले: “आजपर्यंत चाल करून गेलेली सर्व सैन्ये, उभारलेल्या सर्व नौसेना, भरवलेल्या सर्व लोकसभा आणि शासन केलेले सर्व राजे यांनी मिळून जितका प्रभाव पाडला नाही तितका प्रभाव येशूने या पृथ्वीवरील मानवांच्या जीवनावर पाडला.”

शिवाय, येशू कोण होता व आहे हे तुम्ही जाणले पाहिजे कारण तुमच्या भविष्यावर त्याचा थेट प्रभाव पडेल. एका स्थापित स्वर्गीय सरकाराची—येशूच्या शासनाखालील देवाच्या राज्याची प्रजा होण्याची संधी तुमच्यासमोर आहे. येशूच्या निदर्शनाखाली, या संकटग्रस्त पृथ्वीवरील विपुल व वैविध्यपूर्ण अद्‌भुत सजीवसृष्टी आणि परिस्थितीकीमधील समतोल पूर्ववत केला जाईल. बायबलमधील भविष्यवाणी अशी हमी देते की, येशूचे राज्य उपासमारीला बळी पडलेल्यांना तृप्त करेल, गरीबांची काळजी घेईल, रोग्यांना बरे करील आणि मृतांना पुन्हा जिवंत करील.

मानवजातीला अशाच एका सरकारची गरज आहे; पण अशा या सरकाराचे नेतृत्व करणाऱ्‍या व्यक्‍तीविषयी तुम्हाला निश्‍चितच आणखी जाणून घ्यावेसे वाटेल. पुढील लेख तुम्हाला खऱ्‍या येशूविषयी अधिक समज मिळवण्यास मदत करील.

[तळटीप]

^ येशूच्या स्वरूपाविषयी, डिसेंबर ८, १९९८ सावध राहा! (इंग्रजी) अंकातील “येशू दिसायला कसा होता?” हा लेख पाहा.