व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवानं आम्हाला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ दिले

यहोवानं आम्हाला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ दिले

जीवन कथा

यहोवानं आम्हाला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ दिले

हेलन मार्क्स यांच्याद्वारे कथित

रखरखीत उन्हाळ्यातल्या १९८६ सालचा तो दिवस होता. युरोपच्या सर्वात शांत विमानतळांपैकी एका विमानतळावरच्या कस्टम कार्यालयासमोर मीच तेवढी एकटी उभी होते. हे अल्बेनिया राज्याची राजधानी, तिराना होते. “जगातलं पहिलं नास्तिक राज्य” असा दावा ते स्वतःबद्दल करत होते.

एक शस्त्रधारी अधिकारी माझ्याजवळची सूटकेस तपासत होता तेव्हा मला भीतीही वाटत होती आणि मी गोंधळूनही गेले होते. त्याला संशय येईल असे माझ्या हातून काही घडले असते किंवा मी बोलले असते तर मला देशाबाहेर घालवण्यात आलं असतं आणि विमानतळाबाहेर माझी वाट पाहत थांबलेल्यांना एकतर तुरुंगात जावं लागलं असतं नाहीतर मजूर छावणीत. मला पटकन्‌ कसं सुचलं कुणास ठाऊक, मी त्या अधिकाऱ्‍याला च्युईंगम आणि बिस्किटं देऊन त्याला मैत्रीपूर्ण बनवू शकले. पण, वयाची सत्तरी गाठणाऱ्‍या माझ्यावर ही परिस्थिती कशी गुदरली? मार्क्सवाद-लेनीनवादचा जबरदस्त पगडा असलेला हा शेवटला देश होता; तर, सुखाचा जीव दुःखात घालून मी राज्य आस्था वाढवण्याचा प्रयत्न का करत होते?

सतत प्रश्‍नं विचारणारी मी आजारी असलेली मुलगी

क्रीटमधील ईरापेट्रात १९२० साली माझा जन्म झाला होता; दोन वर्षांनी न्युमोनियामुळे बाबा गेले. आई गरीब आणि अशिक्षित होती. चौघा भावडांत मी सर्वात धाकटी होते; मला कावीळ झाली होती त्यामुळे मी अशक्‍त व निस्तेज दिसत होते. आमच्या शेजारपाजारचे लोक आईला माझ्याविषयी सांगायचे, की हिच्याकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आणि उरलासुरलेला पैसा खर्च करण्यापेक्षा धट्टेकट्टे असलेल्या बाकीच्या तिघांकडे जास्त लक्ष दे, हिला असंच मरू दे. पण आईनं त्यांचं बोलणं ऐकलं नाही, याबद्दल मी तिचे आभार मानते.

स्वर्गात बाबांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आई नेहमी कबरेकडे जाऊन एका कर्मठ पाळकाला प्रार्थना करायला सांगायची. पण हा पाळक काही फुकट प्रार्थना करत नव्हता! मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा मी, नाताळच्या एका कडाक्याच्या थंडीच्या दिवशी तिच्याबरोबर कब्रस्तानातून घरी आले होते, तेव्हा मला धड चालताही येत नव्हतं. आईनं तिच्याकडचे उरलेले शेवटचे पैसे पाळकाला दिले होते. आईनं आम्हा चौघांसाठी पालेभाजी बनवली आणि उपाशी पोटीच दुसऱ्‍या एका खोलीत जाऊन रडत बसली. काही दिवसांनी मी त्या पाळकाकडे जाण्याचं धैर्य केलं आणि त्याला विचारलं, की माझे बाबा का मेले आणि माझ्या आईला प्रार्थनेसाठी तुम्हाला पैसे का द्यावे लागतात. काहीशा दोषभावनेच्या सुरात तो कुजबुजला: “देवानं त्यांना नेलं. चालायचंच. थोड्या दिवसांनंतर तू या दुःखातून सावरशील.”

पण पाळकानं दिलेलं उत्तर आणि मला शाळेत शिकवलेली प्रभूची प्रार्थना, दोघांचा काही मेळ बसत नव्हता. मला त्या प्रार्थनेतील सुंदर व अर्थपूर्ण शब्द अजूनही आठवतात: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) पृथ्वीवरही देवाने त्याची इच्छा पूर्ण करण्याचा उद्देश बाळगला होता तर मग आपल्याला इतकं दुःख का सोसावं लागतं?

१९२९ साली, ईमॅन्वेल लिओनुदाकीस हे यहोवाच्या साक्षीदारांचे पूर्ण वेळेचे प्रचारक आमच्या घरी आले तेव्हा मला माझ्या प्रश्‍नांची उत्तरे जवळजवळ मिळालीच. * ते आमच्या घरी आले तेव्हा आईनं त्यांना विचारलं, की त्यांना काय हवं आहे, त्यावर ईमॅन्वेलनी काही न बोलता तिच्या हातात एक कार्ड दिलं. तिनं मला ते कार्ड वाचायला दिलं. मी तेव्हा फक्‍त नऊ वर्षांची होती; त्यामुळे मला जास्त काही समजलं नाही. आईला वाटलं, की ईमॅन्वेलना बोलता येत नाही. ती म्हणाली: “बिचारा! तुम्हाला बोलता येत नाही आणि मला वाचता येत नाही.” असं म्हणून तिनं त्यांना हातानंच पुढं जायला सांगितलं.

काही वर्षांनंतर तर मला पूर्णपणेच माझ्या प्रश्‍नांची उत्तरं मिळाली. माझा भाऊ ईमॅन्वेल पतेराकीस याला त्याच पूर्ण वेळेच्या सेवकाकडून यहोवाच्या साक्षीदारांनी छापलेली मृत कोठे आहेत? (इंग्रजी) ही पुस्तिका मिळाली. * माझ्या बाबांना देवानं नेलं नव्हतं, हे पुस्तिकेतून वाचल्यावर मला किती हलकं वाटू लागलं. मनुष्यावर अपरिपूर्णतेमुळे मृत्यू ओढावतो व परादीस पृथ्वीवर माझ्या बाबाचं मेलेल्यांतून पुनरुत्थान होईल हे मला समजलं.

“या पुस्तकानंच तुला बरबाद केलं आहे”

बायबल सत्यामुळे आमचे डोळे उघडले. बाबांचं एक जुनं बायबल आम्हाला सापडलं. शेकोटीच्या उजेडात बसून आम्ही त्याचा अभ्यास करायला लागलो. आमच्या भागात, बायबलमध्ये आवड घेणारी मी एकटीच तरुणी असल्यामुळे साक्षीदारांच्या लहानशा स्थानिक गटाच्या कार्यात मला सामील केले जात नव्हते. त्यामुळे कितीतरी दिवस माझा असा चुकीचा परंतु प्रामाणिक ग्रह होता, की हा धर्म फक्‍त पुरुषांसाठी आहे.

प्रचार कार्याबद्दल माझ्या भावाच्या आवेशामुळेच खरं तर मला प्रेरणा मिळाली होती. पोलिसही लगेच आमच्या मागावर येऊ लागले; रात्री अपरात्री ईमॅन्वेलला व प्रकाशने शोधायला म्हणून ते आमच्या घरी येऊ लागले. मला एक प्रसंग अगदी चांगला आठवतो; आम्ही पुन्हा चर्चला यावं म्हणून एक पाळक आमच्या घरी आमची समजूत घालायला आला होता. ईमॅन्वेलनं त्याला बायबलमधून देवाचं नाव यहोवा आहे हे दाखवलं तेव्हा त्यानं त्याच्या हातून ते बायबल हिसकावून घेतलं आणि त्याच्या समोर ते नाचवत ओरडला: “या पुस्तकानंच तुला बरबाद केलं आहे.”

१९४० साली, ईमॅन्वेलनं लष्करात काम करायला नकार दिला तेव्हा त्याला अटक करून अल्बेनियन आघाडीवर पाठवण्यात आलं. त्यानंतर त्याच्याशी आमचा काहीच संपर्क राहिला नाही; त्याचं कदाचित काही बरंवाईट झालं असेल असाही आमच्या मनात विचार आला. पण दोन वर्षांनंतर, आम्हाला अचानक त्याचं एक पत्र आलं, त्यानं ते तुरुंगातून पाठवलं होतं. तो जिवंत होता आणि ठीकठाक होता! त्या पत्रात त्यानं लिहिलेलं एक वचन माझ्या मनात जणू कोरलं गेलं: “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.” (२ इतिहास १६:९) हेच उत्तेजन आम्हाला हवं होतं!

तुरुंगात असताना, ईमॅन्वेलनी काही बांधवांना माझी भेट घ्यायला सांगितलं. त्यानंतर काही दिवसांनी, शहराबाहेरच्या एका मळ्यातील घरात गुप्त ख्रिस्ती सभांची योजना करण्यात आली. पण आमच्यावर पाळत ठेवण्यात आली होती हे आमच्यापैकी कुणालाही माहीत नव्हतं! एकदा असंच रविवारच्या दिवशी आम्ही सभेला जमलो होतो तेव्हा शस्त्रधारी पोलिसांनी आम्हाला घेरलं. आणि एका उघड्या असलेल्या ट्रकमध्ये आम्हाला चढवून संपूर्ण शहरात फिरवलं. लोक आमची कशी थट्टा करत होते आम्हाला हिणवत होते हे मला अजूनही आठवतं, पण यहोवानं आम्हाला त्याचा आत्मा देऊन आंतरिक शांती दिली.

मग त्यांनी आम्हाला दुसऱ्‍या एका शहरात नेलं आणि तिथं एका काळ्याकुट्टं व अगदी घाणेरड्या कोठडीत डांबलं. माझ्या कोठडीतलं शौचालय म्हणजे एक बिन झाकणाची बादली, जी दिवसातून एकदा रिकामी केली जायची. मला, आठ महिन्यांसाठी तुरुंगाची शिक्षा मिळाली कारण त्या लोकांच्या मते, मी गटाची “शिक्षिका” होते. आमच्याबरोबरच तुरुंगात असलेल्या एका बांधवानं त्याच्या वकिलाला आमची केस घ्यायला सांगितली आणि आमची सुटका करण्यात आली.

नवे जीवन

तुरुंगातून सुटून आल्यावर ईमॅन्वेलनं प्रवासी पर्यवेक्षक म्हणून अथेन्समधील मंडळ्यांना भेटी देण्याचं काम सुरू केलं. १९४७ साली मी तेथे राहायला गेले. इथं मला साक्षीदारांचा एक मोठा गट भेटला—फक्‍त पुरुषंच नव्हे तर स्त्रिया व मुले देखील या गटात होती. १९४७ सालच्या जुलै महिन्यात मी यहोवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेतला. मिशनरी व्हायचं माझं स्वप्न होतं त्यामुळे मी इंग्रजी शिकण्यासाठी रात्र प्रशालेला जाऊ लागले. १९५० साली मी पायनियर झाले. आईपण माझ्याबरोबर राहायला आली आणि तिनेही बायबल सत्य स्वीकारलं. त्यानंतर ३४ वर्षांपर्यंत म्हणजे तिचा मृत्यू होईपर्यंत ती यहोवाची साक्षीदार होती.

त्याच वर्षी, माझी भेट जॉन मार्क्स (मार्कोपौलोस) नावाच्या अमेरिकेतील एका सन्माननीय व आध्यात्मिक मनोवृत्तीच्या गृहस्थाबरोबर झाली. जॉनचा जन्म अल्बेनियात झाला होता. अमेरिकेत राहायला गेल्यावर तो यहोवाचा साक्षीदार झाला होता. १९५० साली तो ग्रीसमध्ये होता आणि अल्बेनियाचा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. पण या वेळेपर्यंत अल्बेनिया कट्टर कम्युनिस्ट देश बनला होता. १९३६ पासून जॉन त्याच्या कुटुंबाला भेटला नव्हता तरीसुद्धा त्याला अल्बेनियात प्रवेश मिळाला नाही. यहोवाच्या सेवेबद्दलचा त्याचा ज्वलंत आवेश आणि बांधवांबद्दल त्याच्या मनात असलेली गाढ प्रीती पाहून मी खूप प्रभावीत झाले. एप्रिल ३, १९५३ रोजी आम्ही विवाहबद्ध झालो. त्याच्याबरोबर मी अमेरिकेतील न्यूजर्सी येथील माझ्या नवीन घरी गेले.

पूर्ण वेळ प्रचारकाम करताना, कौटुंबिक खर्च भागवण्याकरता न्यूजर्सीच्या समुद्रकिनाऱ्‍यावर आमचा लहानसा धंदा होता; मच्छीमारी करणाऱ्‍या कोळ्यांसाठी आम्ही नाश्‍ता बनवायचो. आम्ही फक्‍त उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पहाटेपासून सकाळी ९ वाजेपर्यंतच काम करायचो. आम्ही आमची राहणी अगदी साधी ठेवल्यामुळे व आध्यात्मिक कार्यांना प्राधान्य देत असल्यामुळे प्रचार कार्यात आम्हाला जास्तीत जास्त वेळ खर्च करायला मिळायचा. त्यानंतरच्या वर्षांत आम्हाला प्रचारकांची विशेष गरज असलेल्या अनेक शहरांमध्ये जायला सांगण्यात आलं. यहोवाच्या मदतीनं तिथंही आम्ही आस्थेवाईक लोकांना मदत केली, मंडळ्या स्थापन केल्या आणि राज्य सभागृह बांधायला मदत केली.

गरज असलेल्या आपल्या बांधवांना मदत

पण काही दिवसांतच आम्हाला एक आनंददायक संधी मिळाली. आपल्या कार्यांवर बंदी असलेल्या बाल्कन देशांतील ख्रिस्ती बंधूभगिनींबरोबर जबाबदार पदी असलेल्या बांधवांना संपर्क साधायचा होता. त्या राष्ट्रांतील यहोवाच्या साक्षीदारांचा कित्येक वर्ष आंतरराष्ट्रीय बंधूवर्गाबरोबर कसलाही संपर्क नव्हता. त्यांना फार कमी किंवा कधीकधी तर काहीच आध्यात्मिक अन्‍न मिळत नव्हतं शिवाय अतिशय क्रूर विरोधाचा त्यांना सामना करावा लागत होता. त्यांच्यातील बहुतेकांवर सतत पाळत ठेवली जायची, बहुतेक जण तुरुंगात किंवा मजूर छावणीत होते. त्यांना बायबल आधारित प्रकाशनांची, मार्गदर्शनाची आणि उत्तेजनाची अत्यंत आवश्‍यकता होती. जसे की, अल्बेनियातून आम्हाला एक संदेश मिळाला जो सांकेतिक भाषेत होता: “आमच्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा. घरोघरी दिलेली साहित्ये जप्त. अभ्यास करू देत नाहीत. तिघांना तुरुंगवास.”

त्यामुळे, १९६० सालच्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही अशा देशांत राहणाऱ्‍या बांधवांना भेटी द्यायला सहा महिन्यांच्या प्रवासाला निघालो. ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी आम्हाला निश्‍चितच, ‘पराकोटीचे सामर्थ्य,’ देवाकडून मिळणारे धैर्य, धाडस आणि चातुर्याची आवश्‍यकता होती. (२ करिंथकर ४:७) पहिल्यांदा आम्ही अल्बेनियात जाणार होतो. पॅरिसमधून आम्ही एक कार विकत घेतली आणि निघालो. रोममध्ये पोहंचल्यावर फक्‍त जॉनला अल्बेनियाचा व्हिसा मिळाला. मला ग्रीसच्या अथेन्स इथं जाऊन जॉन येईपर्यंत तिथंच राहावं लागणार होतं.

१९६१ सालच्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी जॉन अल्बेनियाला गेला. मार्चच्या शेवटपर्यंत तो तिथं राहिला. तिराना इथं तो ३० बंधूभगिनींना भेटला. त्यांना हवी असलेली प्रकाशने आणि उत्तेजन मिळाल्यावर किती तरी आनंद झाला! २४ वर्षं त्यांना असं कोणी भेटायला आलं नव्हतं.

या बांधवांची एकनिष्ठता, त्यांचा धीर पाहून जॉन खूप प्रभावित झाला. त्याला समजले, की साम्यवादी राज्याच्या कार्यांत भाग न घेतल्यामुळे अनेक बांधवांना आपल्या नोकरीला मुकावे लागले होते, अनेकांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. या बांधवांपैकी ८० वर्षांच्या दोन बांधवांनी प्रचार कार्यासाठी सुमारे ५,००० रुपये वर्गणी म्हणून दिली तेव्हा तर जॉनला गहिवरून आलं. या बांधवांनी त्यांना मिळणाऱ्‍या तुटपुंज्या पेन्शनमधून कितीतरी वर्षांपासून हे पैसे साठवले होते.

मार्च ३० १९६१ हा जॉनचा अल्बेनियातला शेवटला दिवस होता. आणि याच दिवशी येशूच्या मृत्यूचा स्मारक विधी देखील होता. जॉननं स्मारकविधीचं भाषण दिलं. ३७ लोक या भाषणासाठी जमले होते. भाषण संपताच काही बांधवांनी जॉनला मागच्या दारानं बाहेर नेलं आणि डूर्स बंदरावर सोडलं. तिथून जॉननं ग्रीसमधील पिरीफ्स (पायरीस) येथे जाणारं एक टर्कीश व्यापारी जहाज घेतलं.

त्याला सुखरुप आलेलं पाहून माझा जीव भांड्यात पडला. आता आम्हाला आमच्या उरलेल्या धोकेदायक प्रवासाला निघायचं होतं. आपल्या कामावर बंदी असलेल्या इतर तीन बाल्कन देशांत आम्ही गेलो; हे तसं धोकेदायकच होतं, कारण आमच्याजवळ बायबल प्रकाशने, टाईपरायटर आणि इतर सामग्री होती. पण, यहोवासाठी आपली नोकरी गमवायला, आपले स्वातंत्र्य गमवायला, इतकेच नव्हे तर आपला जीवही द्यायला तयार असलेल्या एकनिष्ठ बंधूभगिनींना भेटायची आम्हाला सुसंधी मिळाली. त्यांचा आवेश आणि खरं प्रेम पाहून आम्हाला प्रोत्साहन मिळालं. यहोवा खरंच ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देतो याचीही आम्हाला खात्री पटली.

आमचा सर्व प्रवास अगदी सुखरुप झाल्यानंतर आम्ही अमेरिकेला परतलो. त्यानंतरच्या वर्षांमध्ये आम्ही अल्बेनियातील बांधवांना या नाहीतर त्या मार्गाने प्रकाशनं पाठवत राहिलो आणि त्यांच्या कार्यांचा अहवाल मिळवत राहिलो.

प्रवास चालू राहिला, संकटेही येत राहिली

वर्षामागून वर्षे सरली; १९८१ साली वयाच्या ७६ व्या वर्षी जॉनचा मृत्यू झाला, मी एकटी पडले. माझी भाची एव्हॅन्जलिना आणि तिचा नवरा जॉर्ज ऑर्फनीडीस यांनी मला त्यांच्याबरोबर राहायला बोलवलं; तेव्हापासून त्या दोघांनी मला खूप चांगल्याप्रकारे सांभाळलं आहे. भावनिक आधार दिला आहे. मला लागणारी मदत दिली आहे. सुदानमध्ये बंदी असताना त्यांनी तिथं कार्य केलं होतं तेव्हा त्यांनीही यहोवाच्या आधाराचा अनुभव घेतला होता. *

कालांतरानं, अल्बेनियातील आपल्या बांधवांशी संपर्क साधण्याचा नव्यानं प्रयत्न करण्यात आला. माझ्या सासरचे लोक तिथं राहत असल्यामुळे मी त्या देशात जाऊ शकेन का असं मला विचारण्यात आलं. मी तर एका पायावर तयार झाले!

खूप महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर, १९८६ सालच्या मे महिन्यात मला अथेन्समधील अल्बेनियन दूतावासाकडून व्हिसा मिळाला. दूतावासातील अधिकाऱ्‍यांनी मला कडक इशारा दिला, की जर थोडीजरी काही चूक झाली तर बाहेरून मला कसलीही मदत दिली जाणार नाही. मी अल्बेनियाची विमानाची तिकिटे घ्यायला गेले तेव्हा तर एक ट्रॅव्हल एजंट अवाक्‌ झाला. आठवड्यातून एकदाच अथेन्सहून तिरानाला जाणाऱ्‍या विमानात मी न घाबरता बसले. प्रवाश्‍यांपैकी फक्‍त तीन वृद्ध अल्बेनियन होते; ग्रीसमध्ये ते उपचारासाठी आले होते.

विमानातून उतरल्याबरोबर मला एका रिकाम्या शेडमध्ये नेण्यात आलं; ते त्यांचं कस्टम्सचं कार्यालय होतं. माझा धाकटा दीर आणि धाकटी नणंद या दोघांनी, ते यहोवाचे साक्षीदार नव्हते तरीपण, काही स्थानीय बांधवांना शोधण्याचं काम आनंदानं केलं. कायद्यानुसार त्यांना, माझ्या येण्याची खबर त्या भागातील प्रमुखाला द्यायची होती. त्यामुळे माझ्यावर पोलिसांची कडक नजर होती. म्हणून, माझ्या घरच्यांनी मला सुचवलं, की मी घराच्या बाहेर पडू नये व ते तिरानात राहणाऱ्‍या दोन बांधवांना शोधून माझ्याकडे आणतील.

त्याकाळी, अख्ख्या अल्बेनियात नऊ समर्पित बांधव असल्याची माहिती होती. इतक्या वर्षांपासूनच्या बंदीनं, छळानं व कडक पाळतीनं त्यांना सावध राहायला शिकवलं होतं. त्यांच्या चेहऱ्‍यावर खोल सुरकुत्या होत्या. मीसुद्धा एक साक्षीदार आहे याची मी त्यांना खात्री करून दिल्यानंतर, त्यांनी मला पहिला प्रश्‍न कोणता विचारला असेल: “वॉचटावर मासिकं कुठं आहेत?” किती वर्षांपर्यंत त्यांच्याजवळ फक्‍त दोन जुनी पुस्तकं होती—बायबलसुद्धा नव्हतं.

खूप वेळपर्यंत त्यांनी मला, तिथल्या राजवटीनं त्यांच्याविरुद्ध किती क्रूर पद्धतींचा वापर केला होता ते सांगितलं. त्यांनी एका प्रिय बांधवाबद्दलही सांगितलं, ज्यानं आगामी मतदानाच्या दरम्यान राजकारणाविषयी तटस्थ राहण्याचा निश्‍चय केला होता. तिथला सर्व कारभार राज्याच्या हातात असल्यामुळे, या बांधवाच्या भूमिकेमुळे त्याच्या कुटुंबाला रेशनवर कोणतेच अन्‍नधान्य मिळणार नव्हते. लग्न झालेल्या त्याच्या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबालाही, या बांधवाच्या धार्मिक विश्‍वासांशी त्यांचे काही घेणेदेणे नसतानाही तुरुंगात पाठवले जाऊ शकत होते. नंतर आम्हाला कळलं, की या बांधवाच्या कुटुंबानं भीतीमुळे मतदानाच्या आदल्या रात्री त्याला ठार मारलं आणि त्याचं शरीर एका विहिरीत टाकून दिलं व नंतर असं उठवलं, की त्यानंच भीतीपोटी आत्महत्या केली होती.

तिथले बांधव खूप हलाखीत दिवस काढत होते. मी त्यांना प्रत्येकाला एक एक हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ते पैसे घ्यायला नकार दिला व म्हटलं, “आम्हाला फक्‍त आध्यात्मिक अन्‍न हवंय.” हे प्रिय बांधव कित्येक दशके अशा एका एकपक्षीय राजवटीखाली राहिले होते जी, अधिकांश लोकसंख्येला नास्तिक बनवण्यात यशस्वी झाली होती. पण या बांधवांचा विश्‍वास आणि दृढनिश्‍चय इतर ठिकाणच्या साक्षीदारांसारखाच अगदी भक्कम होता. दोन आठवड्यांनंतर मी अल्बेनिया सोडले तेव्हा, कठीणातल्या कठीण परिस्थितीतही ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देण्याची यहोवाकडे क्षमता आहे, या गोष्टीनं माझ्या मनावर खोलवर छाप पाडली होती.

१९८९ आणि १९९१ मध्ये मला पुन्हा एकदा अल्बेनियाला जाण्याची सुसंधी मिळाली. भाषण आणि धर्माचे स्वातंत्र्य जसजसे मिळत गेले तसतसे यहोवाच्या उपासकांची संख्या जलद गतीने वाढत गेली. १९८६ साली मुठभर असलेल्या समर्पित ख्रिश्‍चनांची संख्या वाढत वाढत २,२०० इतकी झाली आहे; हे सर्व सक्रिय प्रचारक आहेत. यांपैकी माझी धाकटी नणंद मेल्पो ही देखील आहे. या विश्‍वासू गटावर यहोवाचा आशीर्वाद आहे यासाठी आणखी कोणता पुरावा हवा?

यहोवाच्या शक्‍तीनंच मी समाधानी जीवन जगले

जॉन व मी केलेल्या कार्याकडे मी आता पाहते तेव्हा मला समजतं, की आमच्या प्रयत्नांचं काहीतरी सार्थक झालं. आमच्या तरुणपणाची शक्‍ती आम्ही सर्वात फायदेकारक मार्गाने वापरली होती. पूर्णवेळेच्या सेवेचं आमचं जीवन-ध्येय हे, आम्ही इतर कोणतंही ध्येय ठेवलं असतं तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अर्थपूर्ण ठरलं आहे. बायबलमधील सत्य शिकायला आम्ही अनेक प्रिय जनांना मदत केल्याचा आनंद मला वाटतो. माझ्या या म्हातारवयात मी पूर्ण भरवशानं तरुणांना हे उत्तेजन देऊ शकते, की ‘आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा.’—उपदेशक १२:१.

मी आता ८१ वर्षांची आहे. तरीपण मी सुवार्तेची पूर्ण वेळेची प्रचारक म्हणून कार्य करू शकते. मी सकाळी लवकर उठते आणि बसस्टॉप, पार्किंगच्या क्षेत्रात, रस्त्यावर, दुकानांत किंवा बागांमध्ये लोकांना साक्ष देते. वाढत्या वयाबरोबर येणाऱ्‍या समस्यांमुळे माझं जीवन कठीण झालं असलं तरी, आपले प्रिय आध्यात्मिक बंधूभगिनी—माझा मोठा आध्यात्मिक परिवार—आणि माझ्या भाचीचा परिवार माझी खूप काळजी घेतात. या सर्वापेक्षा, “सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही,” ही गोष्ट मी शिकले आहे.—२ करिंथकर ४:७.

[तळटीपा]

^ परि. 10 ईमॅन्वेल लिओनुदाकीस यांची जीवन कथा टेहळणी बुरूज सप्टेंबर १, १९९९, पृष्ठे २५-९ वर आहे.

^ परि. 11 ईमॅन्वेल पतेराकीस यांची जीवन कथा टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, १९९६, पृष्ठे २२-७ वर आहे.

^ परि. 31 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, १९९२ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक, (इंग्रजी) पृष्ठे ९१-२ पाहा.

[२५ पानांवरील चित्र]

वर: जॉन, (एकदम डावीकडं), मी (मधे) आणि माझ्या डावीकडं माझा भाऊ ईमॅन्वेल आणि त्याच्या डावीकडं आमची आई; १९५० साली अथेन्समधील बेथेल सदस्यांबरोबर काढलेला आमचा फोटो

[२५ पानांवरील चित्र]

डावीकडं: १९५६ साली न्यूजर्सीच्या समुद्रकिनाऱ्‍यावर जॉनबरोबर

[२६ पानांवरील चित्र]

१९९५ साली अल्बानियाच्या तिराना येथील प्रांतीय अधिवेशन

[२६ पानांवरील चित्र]

बेथेल कॉम्प्लेक्स, तिराना, अल्बानिया. १९९६ साली याचे बांधकाम पूर्ण झाले

[२६ पानांवरील चित्र]

वर: १९४० सालच्या एका “टेहळणी बुरूज” मासिकातला गुप्तपणे अल्बानियन भाषेत भाषांतरीत केलेला एक लेख

[२६ पानांवरील चित्र]

माझी भाची एव्हॅन्जलिना ऑर्फनीडीस (उजवीकडं) आणि तिचा नवरा जॉर्ज