व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राज्याच्या चांगल्या बातमीचे उत्तम परिणाम

राज्याच्या चांगल्या बातमीचे उत्तम परिणाम

राज्याच्या चांगल्या बातमीचे उत्तम परिणाम

“दीनांस शुभवृत्त सांगण्यास परमेश्‍वराने मला अभिषेक केला आहे; भग्न हृदयी जनांस पट्टी बांधावी, . . . सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे . . . म्हणून त्याने मला पाठविले आहे.”—यशया ६१:१-३.

१, २. (अ) येशूने आपण काय असल्याचे स्पष्ट केले आणि कशाप्रकारे? (ब) येशूने घोषित केलेल्या चांगल्या बातमीमुळे कोणते आशीर्वाद मिळाले?

आपल्या सेवाकार्याच्या सुरवातीला एकदा एका शब्बाथ दिवशी येशू नासरेथ येथील सभास्थानात होता. त्या घटनेच्या अहवालानुसार, “तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला; त्याने तो उलगडून जे स्थळ काढिले त्यात असे लिहिलेले आहे: ‘परमेश्‍वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला.’” मग येशूने त्या भविष्यसूचक वृत्तान्तातून आणखी काही वचने वाचली. वाचून झाल्यावर तो खाली बसला व म्हणाला: “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना, पूर्ण झाला आहे.”—लूक ४:१६-२१.

अशारितीने भविष्यवाणीत सांगितलेला सुवार्तिक, अर्थात एक चांगली बातमी सांगणारा आणि सांत्वन देणारा आपण असल्याचे येशूने स्पष्ट केले. (मत्तय ४:२३) येशूजवळ असलेली चांगली बातमी खरोखर किती अद्‌भुत होती! त्याचे ऐकणाऱ्‍यांना त्याने सांगितले: “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” (योहान ८:१२) त्याने असेही म्हटले: “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.” (योहान ८:३१, ३२) होय, येशूकडे “सार्वकालिक जीवनाची वचने” होती. (योहान ६:६८, ६९) प्रकाश, जीवन, मुक्‍तता—निश्‍चितच हे अतिशय हवेहवेसे आशीर्वाद आहेत!

३. येशूच्या शिष्यांनी कोणती चांगली बातमी पसरवली?

सा.यु. ३३ पेन्टेकॉस्टनंतर शिष्यांनी ही चांगली बातमी घोषित करण्याचे कार्य सुरू ठेवले. त्यांनी ‘राज्याची सुवार्ता’ इस्राएलातील व परराष्ट्रीयांतील लोकांनाही सांगितली. (मत्तय २४:१४; प्रेषितांची कृत्ये १५:७; रोमकर १:१६) ज्यांनी या चांगल्या बातमीला प्रतिसाद दिला त्यांना यहोवा देवाची ओळख घडली. त्यांना धार्मिक गुलामगिरीतून सुटका मिळाली आणि ते एका नव्या आध्यात्मिक राष्ट्राचे, ‘देवाच्या इस्राएलाचे’ भाग बनले; या नव्या राष्ट्राच्या सदस्यांना त्यांचा प्रभू, येशू ख्रिस्त याच्यासोबत स्वर्गात सर्वकाळ शासन करण्याची आशा आहे. (गलतीकर ५:१; ६:१६; इफिसकर ३:५-७; कलस्सैकर १:४, ५; प्रकटीकरण २२:५) हे खरोखरच अनमोल आशीर्वाद होते!

आजच्या काळात ही चांगली बातमी पसरवणे

४. राज्याची चांगली बातमी सांगण्याचे कार्य आज कशाप्रकारे पूर्ण केले जात आहे?

आज अभिषिक्‍त ख्रिस्ती व त्यांना साहाय्य करणारा ‘दुसऱ्‍या मेंढरांचा’ वाढत चाललेला “मोठा लोकसमुदाय” येशूला सोपवण्यात आलेले भविष्यसूचक कार्य पुढे चालवत आहेत. (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६) यामुळे राज्याविषयीची चांगली बातमी अभूतपूर्व प्रमाणावर पसरवली जात आहे. २३५ देशांत व प्रदेशांत यहोवाचे साक्षीदार “दीनांस शुभवृत्त सांगण्यास . . . भग्न हृदयी जनांस पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांस मुक्‍तता, व बंदिवानास बंधमोचन विदित करावे; परमेश्‍वराच्या प्रसादाचे वर्ष, व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा; सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे,” म्हणून झटत आहेत. (यशया ६१:१, २) त्यामुळे देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी सांगण्याचे ख्रिस्ती कार्य आजही अनेक लोकांना आशीर्वाद आणि “जे कोणी कोणत्याहि संकटात आहेत” त्यांना सांत्वन मिळवून देत आहे.—२ करिंथकर १:३, ४.

५. देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी सांगण्याच्या संबंधाने यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसपेक्षा कशाप्रकारे वेगळे आहेत?

ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसद्वारे अनेक प्रकारे प्रचार कार्य चालवले जाते हे खरे आहे. बरीच चर्चेस इतर देशांत, धर्मपरिवर्तन करण्यास मिशनरी पाठवतात. उदाहरणार्थ, दी ऑर्थोडॉक्स ख्रिस्चन मिशन सेंटर मॅग्झीन मादागास्कर, दक्षिणी आफ्रिका, टान्झानिया आणि झिंबाब्वे येथे ऑर्थोडॉक्स मिश्‍नऱ्‍यांच्या कार्याविषयी वृत्त देते. परंतु, ख्रिस्ती धर्मजगताच्या इतर चर्चेसप्रमाणेच ऑर्थोडॉक्स चर्चचे बहुतेक सदस्य या कार्यात सहभागी नाहीत. पण यहोवाचे सर्व समर्पित साक्षीदार मात्र देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी सांगण्याच्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. त्यांना जाणीव आहे की हे कार्य त्यांच्या विश्‍वासाच्या अस्सलपणाचा एक पुरावा आहे. पौलाने म्हटले: “जो अंतकरणाने विश्‍वास ठेवतो तो नीतिमान्‌ ठरतो व जो मुखाने कबूल करितो त्याचे तारण होते.” जो विश्‍वास व्यक्‍तीला कार्य करण्याची प्रेरणा देत नाही तो, वास्तवात मृत आहे.—रोमकर १०:१०; याकोब २:१७.

सार्वकालिक आशीर्वाद आणणारी देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी

६. आज कोणती चांगली बातमी पसरवली जात आहे?

यहोवाचे साक्षीदार सर्वात उत्तम बातमी लोकांना सांगत आहेत. ऐकून घेण्याची तयारी दाखवणाऱ्‍यांना ते आपले बायबल उघडून दाखवतात, की मानवजातीला देवाकडे जाता यावे, पापांची क्षमा मिळावी आणि सार्वकालिक जीवनाची आशा मिळावी म्हणून येशूने आपले जीवन अर्पण केले. (योहान ३:१६; २ करिंथकर ५:१८, १९) देवाचे राज्य स्वर्गात अभिषिक्‍त राजा येशू ख्रिस्त याच्या नेतृत्वाखाली स्थापित झाले असून लवकरच ते पृथ्वीवरून दुष्टाई काढून टाकेल आणि परादीस पुन्हा आणेल याची ते घोषणा करतात. (प्रकटीकरण ११:१५; २१:३, ४) यशयाच्या भविष्यवाणीनुसार, ते आपल्या क्षेत्रातल्या लोकांना सांगत आहेत की देवाच्या राज्याविषयीच्या चांगल्या बातमीला प्रतिसाद देण्याचा काळ अर्थात, “परमेश्‍वराच्या प्रसादाचे वर्ष” सध्या सुरू आहे. तसेच ते सर्वांना इशारा देत आहेत की यहोवा सर्व अपश्‍चात्तापी दुष्ट लोकांचा जेव्हा नाश करेल तो “देवाचा सूड घेण्याचा दिवस” लवकरच येणार आहे.—स्तोत्र ३७:९-११.

७. कोणत्या अनुभवावरून यहोवाच्या साक्षीदारांत असलेली एकता दिसून येते आणि त्यांच्यात ही एकता कशामुळे आहे?

दुःख व विपत्तीने भरलेल्या या जगात सार्वकालिक हिताची ही एकच चांगली बातमी आहे. जे हा संदेश स्वीकारतात ते यहोवाच्या साक्षीदारांच्या एकजूट जागतिक बंधुसमाजाचा भाग बनतात; ते राष्ट्रीय, जातीय किंवा आर्थिक पार्श्‍वभूमीमुळे कधीच आपसात भेदभाव करत नाहीत. त्यांनी ‘पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती धारण’ केली आहे. (कलस्सैकर ३:१४; योहान १५:१२) मागच्या वर्षी एका आफ्रिकन देशात याचा प्रत्यय आला. राजधानी शहरात एके दिवशी सकाळी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. तत्कालीन सरकार उलथून पाडण्याचा प्रयत्न सुरू होता. या हिंसक घटनांना जातीय वळण देण्यात आले. एका साक्षीदार कुटुंबाने एका वेगळ्या जातीच्या सह साक्षीदारांना आश्रय दिला म्हणून त्यांची टीका केली जाऊ लागली. पण या कुटुंबाने उत्तर दिले: “आमच्या घरात फक्‍त यहोवाचे साक्षीदार आहेत.” त्यांच्या दृष्टीने जातीय भेदभावांना काहीही महत्त्व नव्हते; ख्रिस्ती प्रीती—गरजूंना सांत्वन देणे हेच केवळ त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. या कुटुंबाच्या साक्षीदार नसलेल्या नातलगांपैकी एका स्त्रीने म्हटले, “बाकी सर्व धर्मांच्या सदस्यांनी स्वधर्मीयांकडे पाठ फिरवली. फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांनी असे केले नाही.” गृह युद्धामुळे जर्जर झालेल्या कितीतरी देशांतून अशाचप्रकारची वृत्ते ऐकायला मिळतात व यावरून स्पष्ट दिसून येते की यहोवाच्या साक्षीदारांना खरोखर सबंध “बंधुवर्गावर प्रीती” आहे.—१ पेत्र २:१७.

देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी लोकांचे जीवन बदलते

८, ९. (अ) देवाच्या राज्याविषयीच्या चांगल्या बातमीचा स्वीकार करणारे कशाप्रकारचे बदल करतात? (ब) कोणत्या अनुभवांवरून देवाच्या राज्याविषयीच्या चांगल्या बातमीच्या सामर्थ्याची प्रचिती येते?

देवाच्या राज्याविषयीच्या चांगल्या बातमीचा संबंध, पौलाच्या शब्दांत, ‘आताच्या व पुढच्याहि जीवनाशी’ आहे. (१ तीमथ्य ४:८) त्याअर्थी ही चांगली बातमी केवळ भविष्याकरताच अद्‌भुत व निश्‍चित आशा देत नाही तर ‘आताच्या जीवनातही’ अनेक सुधारणा घडवून आणते. वैयक्‍तिक जीवनात यहोवाचे साक्षीदार बायबलचे अर्थात देवाच्या वचनाचे मार्गदर्शन स्वीकारतात आणि आपले जीवन देवाच्या इच्छेच्या एकवाक्यतेत आणण्याचा प्रयत्न करतात. (स्तोत्र ११९:१०१) धार्मिकता आणि एकनिष्ठता यांसारखे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचे सबंध व्यक्‍तिमत्त्व बदलते.—इफिसकर ४:२४.

फ्रॅन्कोचे उदाहरण विचारात घ्या. त्याची समस्या म्हणजे त्याचा अनियंत्रित राग. काहीही मनासारखे झाले नाही की तो अक्षरशः चवताळायचा आणि हातात येईल ती वस्तू उचलून फेकायचा. त्याची पत्नी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करत होती. त्यांच्या आदर्श ख्रिस्ती वागणुकीचा फ्रॅन्कोवर चांगला परिणाम झाला आणि आपण बदलले पाहिजे याची त्याला जाणीव झाली. त्याने देखील साक्षीदारांसोबत अभ्यास केला आणि शेवटी बराच प्रयत्न केल्यावर त्याला शांती व इंद्रियदमन यांसारखी आत्म्याची फळे प्रदर्शित करता आली. (गलतीकर ५:२२, २३) २००१ सेवा वर्षादरम्यान बेल्जियममध्ये बाप्तिस्मा झालेल्या ४९२ जणांपैकी तो एक होता. आलेहांद्रो याचेही उदाहरण पाहा. हा तरुण ड्रग्सच्या इतक्या आहारी गेला होता की तो अक्षरशः उकिरड्यांवर राहू लागला; जे काही सापडेल ते विकून तो आणखी ड्रग्स विकत घेत असे. तो २२ वर्षांचा असताना, यहोवाच्या साक्षीदारांनी त्याला बायबलचा अभ्यास करण्याचे निमंत्रण दिले आणि तो तयार झाला. तो दररोज बायबलचे वाचन करू लागला आणि ख्रिस्ती सभांनाही उपस्थित राहू लागला. त्याने आपल्या वाईट सवयी इतक्या लवकर सोडून दिल्या की सहा महिन्यांच्या आत तो स्वतः देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी सांगण्याच्या कार्यात सहभागी होणाऱ्‍या पनामा येथील १०,११५ लोकांपैकी एक होऊ शकला.

देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी —नम्र जनांकरता एक आशीर्वाद

१०. देवाच्या राज्याविषयीच्या चांगल्या बातमीला कशाप्रकारचे लोक प्रतिसाद देतात आणि त्यांचा दृष्टिकोन कशाप्रकारे बदलतो?

१० यशयाने भाकीत केले की देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी नम्र जनांना सांगितली जाईल. हे नम्र लोक कोण आहेत? प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात त्यांचे वर्णन “सार्वकालिक जीवनाकरता योग्य मनोवृत्ती असलेले” असे केले आहे. (प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW) यांत समाजातील सर्व थरांतील लोक आहेत जे स्वेच्छेने सत्याचा संदेश स्वीकारतात. त्यांना जाणीव झालेली असते की देवाची इच्छा पूर्ण केल्यामुळे मिळणारे आशीर्वाद या जगातील कोणत्याही आकर्षक गोष्टीपेक्षा अधिक मोलवान आहेत. (१ योहान २:१५-१७) पण देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी सांगण्याच्या कार्यात यहोवाचे साक्षीदार लोकांच्या हृदयाला कशाप्रकारे स्पर्श करतात?

११. पौलानुसार, देवाच्या राज्याविषयीच्या चांगल्या बातमीचा प्रचार कशाप्रकारे केला जावा?

११ प्रेषित पौलाचे उदाहरण विचारात घ्या. त्याने करिंथ येथील बांधवांना असे लिहिले: “बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो, तेव्हा मी देवाचे रहस्यमय सत्य मानवी ज्ञानाने किंवा वक्‍तृत्वकलेने सांगण्यासाठी आलो नाही. कारण तुमच्यामध्ये असताना फक्‍त येशू ख्रिस्त आणि तोही वधस्तंभावर खिळलेला याशिवाय कशाचेही ज्ञान असू नये असा मी निश्‍चय केला आहे.” (१ करिंथकर २:१, २, ईजी-टू-रीड व्हर्शन) पौलाने लोकांना आपल्या ज्ञानाने प्रभावित करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने केवळ ज्यांविषयी देवाने खात्री दिली होती अशा शिकवणुकी अर्थात आज बायबलमध्ये अभिलिखित असलेल्या वास्तविक गोष्टी शिकवल्या. तसेच पौलाने आपला सह सुवार्तिक तीमथ्य याला काय प्रोत्साहन दिले ते पाहा: “वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा.” (२ तीमथ्य ४:२) तीमथ्याला “वचनाची,” म्हणजे देवाच्या संदेशाची घोषणा करण्यास सांगण्यात आले. पौलाने तीमथ्याला असेही लिहिले: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.”—२ तीमथ्य २:१५.

१२. आज यहोवाचे साक्षीदार पौलाच्या शब्दांचे व उदाहरणाचे कशाप्रकारे पालन करतात?

१२ यहोवाचे साक्षीदार पौलाच्या उदाहरणाचे, तसेच तीमथ्याला त्याने लिहिलेल्या शब्दांचे पालन करतात. ते देवाच्या वचनाचे सामर्थ्य ओळखतात आणि आपल्या शेजाऱ्‍यांना उचित शब्दांमध्ये आशा व सांत्वन देण्याकरता ते त्याचा चांगला उपयोग करतात. (स्तोत्र ११९:५२; २ तीमथ्य ३:१६, १७; इब्री लोकांस ४:१२) इच्छुक व्यक्‍तींना त्यांच्या फावल्या वेळात बायबलचे अधिक ज्ञान घेता यावे म्हणून ते बायबलवर आधारित असलेल्या साहित्याचा उपयोग करतात हे खरे आहे. पण ते नेहमी लोकांना शास्त्रवचने दाखवू इच्छितात. देवाचे प्रेरित वचन नम्र लोकांच्या हृदयास अवश्‍य प्रेरित करेल हे त्यांना माहीत आहे. आणि त्याचा उपयोग केल्यामुळे त्यांचा स्वतःचा विश्‍वास देखील बळावतो.

“सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन”

१३. सन २००१ मध्ये कोणत्या घटनांमुळे अनेक शोकग्रस्तांना सांत्वन देण्याची गरज निर्माण झाली?

१३ सन २००१ दरम्यान कित्येक विपत्ती आल्या आणि यामुळे कित्येक जणांना सांत्वनाची गरज होती. याचे एक ठळक उदाहरण म्हणजे मागच्या सप्टेंबर महिन्यात संयुक्‍त संस्थानांतील न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन डी.सी. पासून काही अंतरावर असलेल्या पेंटेगॉन इमारतीवर झालेले अतिरेकी हल्ले. सबंध अमेरिकेला या हल्ल्यांनी किती जबरदस्त धक्का बसला! अशाप्रकारच्या घटना घडतात तेव्हा यहोवाचे साक्षीदार ‘सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन’ करण्याची आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. हे ते कशाप्रकारे करतात यासंदर्भात काही अनुभव विचारात घ्या.

१४, १५. दोन प्रसंगी साक्षीदार दुःखी लोकांना सांत्वन देण्यासाठी कशाप्रकारे शास्त्रवचनांचा परिणामकारक रितीने उपयोग करू शकले?

१४ पूर्णवेळची सेवा करणाऱ्‍या एका साक्षीदार स्त्रीने रस्त्यावर एका स्त्रीजवळ जाऊन विचारले की अलीकडेच झालेल्या या अतिरेकी हल्ल्यांविषयी तिचे काय मत आहे. ती स्त्री रडायला लागली. आपल्याला खूप दुःख झाले आहे आणि लोकांना मदत करण्याची आपली इच्छा असल्याचे तिने सांगितले. साक्षीदार बहिणीने तिला सांगितले की देव आपल्या सर्वांविषयी काळजी करतो आणि तिने यशया ६१:१, २ वाचून दाखवले. देवाच्या प्रेरणेने लिहिलेले हे शब्द त्या स्त्रीला भावले आणि खरोखर सर्वजण आज शोकग्रस्त आहेत असे तिने कबूल केले. तिने एक पत्रिका स्वीकारली आणि साक्षीदार बहिणीला आपल्या घरी येण्यास सांगितले.

१५ देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी सांगण्याचे कार्य करणाऱ्‍या दोन साक्षीदारांना एक माणूस आपल्या शेडमध्ये काम करत असलेला आढळला. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अलीकडील हल्ल्याच्या संदर्भात शास्त्रवचनांतून सांत्वनाचे शब्द वाचायला आवडेल का असे त्यांनी त्या माणसाला विचारले. त्याच्या परवानगीने त्यांनी २ करिंथकर १:३-७ वाचले; या वचनांत ‘ख्रिस्ताच्या द्वारे पुष्कळ सांत्वन’ असा उल्लेख आहे. आपले साक्षीदार शेजारी इतरांना सांत्वन देत आहेत याविषयी त्या माणसाने आनंद व्यक्‍त केला आणि म्हणाला: “देव तुमचे चांगले काम सफल करो.”

१६, १७. दुःखद घटनांमुळे खिन्‍न झालेल्यांचे सांत्वन करण्याचे बायबलमध्ये सामर्थ्य आहे हे कोणत्या दोन अनुभवांवरून दिसून येते?

१६ आस्थेवाईक लोकांकडे पुनर्भेट करत असताना एका साक्षीदार बांधवाला एका अशा स्त्रीचा मुलगा भेटला जिने आधी आस्था दाखवली होती. अलीकडील दुःखद घटनेनंतर आपल्याला लोकांची काळजी वाटत असल्याचे त्याने कबूल केले. त्या माणसाला याचे आश्‍चर्य वाटले की साक्षीदार स्वतःचा वेळ काढून लोकांना भेटी देत आहेत. त्याने पुढे सांगितले की हल्ला झाला तेव्हा तो वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जवळच काम करत होता आणि त्याने काय काय घडले हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. देव अशाप्रकारच्या दुःखाला का अनुमती देतो असे त्याने विचारले तेव्हा साक्षीदारांनी बायबलमधून काही वचने वाचली; यात स्तोत्र ३७:३९ हे वचन देखील होते ज्यात असे म्हटले आहे: “नीतिमानांचे तारण परमेश्‍वरापासून होते; संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे.” त्या माणसाने साक्षीदार बांधवाच्या कुटुंबाची विचारपूस केली आणि त्याला पुन्हा येण्याचे निमंत्रण दिले व आल्याबद्दल आभार व्यक्‍त केले.

१७ अतिरेकी हल्ले झाल्यानंतर यहोवाच्या साक्षीदारांनी ज्या हजारो शोकित लोकांना सांत्वन दिले, त्यांत आणखी एक स्त्री होती जिच्याशी साक्षीदारांची त्यांच्या शेजाऱ्‍यांना भेटी देताना गाठ पडली. झालेल्या घटनांविषयी ती अतिशय दुःखी होती आणि त्यांनी स्तोत्र ७२:१२-१४ वाचून दाखवले तेव्हा तिने लक्ष देऊन ऐकले. त्यात म्हटले आहे: “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील, दरिद्रयांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त अमोल ठरेल.” हे शब्द किती अर्थपूर्ण होते! त्या स्त्रीने साक्षीदारांना हे वचन पुन्हा वाचण्यास सांगितले आणि आणखी चर्चा करण्यासाठी त्यांना घरात बोलावले. चर्चा संपुष्टात आली तोपर्यंत त्या स्त्रीसोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला होता.

१८. एका साक्षीदाराला प्रार्थना करण्याचे आमंत्रण देण्यात आले तेव्हा त्याने आपल्या शेजाऱ्‍यांना कशाप्रकारे मदत केली?

१८ एक साक्षीदार एका उच्चभ्रू परिसरातील रेस्टॉरंटमध्ये काम करतो; या परिसरातील लोकांनी आजवर राज्याच्या चांगल्या बातमीकडे फारसे लक्ष दिलेले नाही. अतिरेक्यांचे हल्ले झाल्यानंतर लोक अगदी हादरून गेले होते. हल्ला झाल्यानंतरच्या शुक्रवारी संध्याकाळी रेस्टॉरंटच्या महिला मॅनेजरने सर्वांना बाहेर जाऊन हातात मेणबत्त्या घेऊन काही क्षण बळी पडलेल्यांकरता मौन धरण्याचे सुचवले. सर्वांच्या भावनांची कदर करून साक्षीदार बाहेर जाऊन एका बाजूला शांतपणे उभा राहिला. तो यहोवाच्या साक्षीदारांपैकी असल्याचे मॅनेजरला माहीत होते. मौन धरून झाल्यानंतर तिने त्याला सर्वांच्या वतीने प्रार्थना करण्यास सांगितले. साक्षीदार बांधवाने होकार दिला. प्रार्थनेत त्याने सर्वांच्या दुःखद मनस्थितीविषयी उल्लेख केला पण आशा नसल्याप्रमाणे दुःख करण्याची गरज नाही असे त्याने म्हटले. अशा भयंकर घटना पुन्हा कधीच घडणार नाहीत अशा काळाविषयी उल्लेख करून, सर्वजण बायबलमधील अचूक ज्ञान घेऊन सांत्वनाच्या देवाच्या निकट येऊ शकतात असे त्याने म्हटले. “आमेन” म्हटल्यानंतर मॅनेजर साक्षीदार बांधवाजवळ आली, तिने त्याचे आभार मानले व त्याला बिलगून आपण इतकी हृदयस्पर्शी प्रार्थना पहिल्यांदाच ऐकल्याचे कबूल केले; तिच्या मागोमाग तेथे जमलेले ६० पेक्षा अधिक लोकही आले.

समाजातल्या लोकांकरता एक आशीर्वाद

१९. काही व्यक्‍ती यहोवाच्या साक्षीदारांच्या उच्च आदर्शांचा सन्मान करतात हे कोणत्या अनुभवावरून दिसून येते?

१९ या दिवसांत खासकरून, ज्या समाजांत यहोवाचे साक्षीदार सक्रिय आहेत त्यांना त्यांच्यामुळे फायदा होतो. बऱ्‍याच लोकांनी हे कबूल केले आहे. जे लोक शांती, प्रामाणिकता आणि शुद्ध नीतीमूल्यांचे समर्थन करतात त्यांच्या कार्यामुळे साहजिकच सर्वांचे भले होईल. मध्य आशियातील एका देशात साक्षीदारांना एक सेवानिवृत्त ऑफिसर भेटले जे पूर्वी राष्ट्रीय सुरक्षा संस्थानात कार्य करत होते. त्यांनी सांगितले की एकदा त्यांना वेगवेगळ्या धार्मिक संस्थांविषयी तपास करण्यास नेमण्यात आले होते. जेव्हा त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसंबंधी माहिती गोळा केली तेव्हा त्यांची प्रामाणिकता आणि उत्तम आचरण पाहून ते थक्क राहिले. साक्षीदारांच्या दृढ विश्‍वासाचे त्यांनी कौतुक केले आणि कबूल केले की खरोखरच त्यांचे विश्‍वास शास्त्रवचनांवर आधारित आहेत. या गृहस्थांनी बायबल अभ्यास करण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे.

२०. (अ) यहोवाच्या साक्षीदारांच्या मागच्या वर्षाच्या अहवालातील कार्यावरून काय दिसून येते? (ब) अजून बरेच काम करायचे बाकी आहे हे कशावरून दिसून येते आणि आपल्याला मिळालेल्या प्रचाराच्या विशेषाधिकाराकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो?

२० या लेखात केवळ काही अनुभव सांगण्यात आले; असे हजारो अनुभव सांगता येतील, पण या अनुभवांवरून हेच स्पष्ट होते की २००१ सेवा वर्षादरम्यान यहोवाचे साक्षीदार अत्यंत क्रियाशील होते. * ते लाखो लोकांशी बोलले, कित्येक शोकग्रस्तांचे त्यांनी सांत्वन केले आणि देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी सांगण्याचे कार्य आशीर्वादित ठरले. २,६३,४३१ जणांनी बाप्तिस्मा घेऊन देवाला केलेले समर्पण जाहीर केले. सबंध जगात प्रचारकांच्या संख्येत १.७ टक्के वाढ झाली. शिवाय वार्षिक स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्या १,५३,७४,९८६ जणांचा विचार केल्यास, बरेच काम अद्यापही करायचे बाकी आहे हेच दिसून येते. (१ करिंथकर ११:२३-२६) देवाच्या राज्याविषयीच्या चांगल्या बातमीला प्रतिसाद देणाऱ्‍या नम्र लोकांना शोधण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करू या. आणि यहोवाच्या प्रसादाचे वर्ष जोवर सुरू आहे तोवर आपण “भग्न हृदयी जनांस” सांत्वन देत राहू या. आपल्याला हा किती अद्‌भुत विशेषाधिकार मिळाला आहे! निश्‍चितच आपण सर्वजण यशयाच्या पुढील शब्दांशी सहमत आहोत: “मी परमेश्‍वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो.” (यशया ६१:१०) “प्रभु परमेश्‍वर सर्व राष्ट्रांदेखत धार्मिकता व कीर्ति अंकुरित करील,” या भविष्यसूचक शब्दांची पूर्णता करण्याकरता देव सदोदित आपला उपयोग करून घेवो.—यशया ६१:११.

[तळटीप]

^ परि. 20 १९ ते २२ पृष्ठांवर दिलेल्या तक्‍त्‌यावर २००१ सेवा वर्षादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांनी केलेल्या कार्याचा अहवाल आहे.

तुम्हाला आठवते का?

• येशूने घोषित केलेल्या चांगल्या बातमीमुळे नम्र लोकांना कशाप्रकारे आशीर्वाद प्राप्त झाला?

• येशूच्या पहिल्या शतकातील शिष्यांनी केलेल्या प्रचाराच्या कार्याला प्रतिसाद देणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद प्राप्त झाले?

• इच्छुक मनोवृत्तीच्या लोकांना आज देवाच्या राज्याविषयीच्या चांगल्या बातमीमुळे कोणते आशीर्वाद प्राप्त झाले आहेत?

• देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी सांगण्याच्या आपल्या विशेषाधिकाराकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्रे]

यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याची चांगली बातमी सांगण्याच्या आपल्या जबाबदारीविषयी नेहमी जागरूक असतात

[१७ पानांवरील चित्रे]

जे देवाच्या राज्याविषयीच्या चांगल्या बातमीला प्रतिसाद देतात ते एका एकजूट, जागतिक बंधुसमाजात सामील होतात