व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वर्गभेदाच्या समस्या

वर्गभेदाच्या समस्या

वर्गभेदाच्या समस्या

“समानता हा कदाचित एक हक्क असेल परंतु पृथ्वीवरील कोणतीही शक्‍ती तो देऊ शकणार नाही.”

१९ व्या शतकातील फ्रेंच कादंबरीकार ओनोरे डे बेल्झॅक यांचे हे शब्द. त्यांच्याशी तुम्ही सहमत आहात का? पुष्कळांना स्वाभाविकपणे असे वाटते की, भेदभाव करणे चुकीचे आहे. परंतु, या २१ व्या शतकातही मानव समाज अजूनही असंख्य सामाजिक वर्गांमध्ये विभाजित आहे.

कॅल्व्हन कुलीज सन १९२३ ते १९२९ पर्यंत संयुक्‍त संस्थानाचे अध्यक्ष—यांना सामाजिक वर्गभेदाच्या समस्येची चिंता होती आणि “सर्व उच्च वर्गीयांचे समूळ उच्चाटन” करण्याबद्दल ते बोलले होते. परतुं, कुलीज यांच्या अध्यक्ष पदाच्या ४० वर्षांनंतर, विविध जातींमधील संबंधांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या कर्नर कमिशनने अशी भीती व्यक्‍ती केली की, संयुक्‍त संस्थानांत दोन समाज निश्‍चित बनतील: “एक काळ्या लोकांचा आणि दुसरा गोऱ्‍या लोकांचा [हे दोन्ही समाज] विभाजित आणि असमान असतील.” काहींचा असा दावा आहे की, हे भाकीत केव्हाच पूर्ण झाले आणि त्या देशातील “आर्थिक व जातीय दुरावा वाढतच चालला” आहे.

परंतु, मानवांमध्ये समानता आणण्याची कल्पना साकारणे इतके कठीण का आहे? त्याचे एक प्रमुख कारण आहे मानवी स्वभाव. अमेरिकेच्या कायदेमंडळाचे भूतपूर्व सदस्य विल्यम रॅन्डॉल्फ हर्स्ट एकदा असे म्हणाले: “सर्व मानव निदान एका बाबतीत तरी समान आहेत आणि ती बाब म्हणजे असमान असण्याची इच्छा.” त्यांचा काय अर्थ होता? कदाचित १९ व्या शतकाचे फ्रेंच नाटककार ऑन्री बेक यांनी हा विचार अधिक स्पष्ट शब्दांत अशाप्रकारे मांडला: “समानता आणणे इतके कठीण आहे कारण आपल्याला केवळ आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्यांच्या बरोबरीचे होण्याची इच्छा असते.” दुसऱ्‍या शब्दांत, लोकांना आपल्यापेक्षा उच्च सामाजिक स्तरातील लोकांशी बरोबरी करायला आवडते; पण आपल्यापेक्षा खालच्या स्तरातील लोकांना समानता प्राप्त व्हावी म्हणून स्वतःचे विशेष हक्क किंवा फायदे सोडून द्यायला बहुतेक लोकांना आवडणार नाही.

गतकाळात, लोकांचा जन्म सामान्यांच्या, उमरावांच्या किंवा राजेशाही घराण्यात होत असे. काही ठिकाणी हे अजूनही घडते. तथापि, आज अनेक राष्ट्रांमध्ये, एखादी व्यक्‍ती खालच्या, मध्यम किंवा उच्च वर्गातील आहे किंवा नाही हे पैसा ठरवतो. परंतु, जात, शिक्षण आणि साक्षरता यांच्या आधारेही समाजातील विविध वर्ग ठरवले जातात. काही ठिकाणी, भेदभावाचे मुख्य कारण असते लिंग—स्त्रिया कनिष्ठ जातीच्या आहेत असे समजले जाते.

आशेची किरणे?

मानवी हक्कांसंबंधी नियम बनवल्यामुळे काही अंशी वर्गभेद मोडायला मदत मिळाली आहे. अमेरिकेत वर्णभेदाविरुद्ध नियम मान्य करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद बेकायदेशीर ठरवण्यात आला. गुलामगिरी—आजही अस्तित्वात असली तरीही—जगातील बहुतांश भागांमध्ये बेकायदेशीर आहे. कोर्टाच्या निर्णयांमुळे काही विशिष्ट स्थानिक लोकांचे जमिनीसंबंधीचे हक्क मान्य झाले आहेत आणि भेदभावाविरुद्धच्या नियमांमुळे काही मागास वर्गीयांना मदत मिळाली आहे.

याचा अर्थ समाजातील वर्गभेद नाहीसा झाला आहे का? नाही. समाजातील काही वर्गभेद कमी झाले असले तरीही नवीन भेद निर्माण होऊ लागले आहेत. ज्ञान युगात वर्गयुद्ध (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “भांडवलदार आणि कामगार अशी लोकांची वर्गवारी करणे आज उचित ठरणार नाही, कारण या मोठ्या वर्गांचे आता संतप्त लोकांच्या लहान लहान गटांमध्ये विभाजन झाले आहे.”

समाजातील वर्गांमुळे लोकांमध्ये नेहमीच भेदभाव राहतील का? पुढील लेखात दाखवल्याप्रमाणे ही परिस्थिती आशाहीन नाही.