व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्व खरे ख्रिस्ती एक चांगली बातमी सांगतात

सर्व खरे ख्रिस्ती एक चांगली बातमी सांगतात

सर्व खरे ख्रिस्ती एक चांगली बातमी सांगतात

“परमेश्‍वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा.”—स्तोत्र ९६:२.

१. लोकांना कोणती चांगली बातमी ऐकायला मिळणे आवश्‍यक आहे आणि ही बातमी पसरवण्यात यहोवाच्या साक्षीदारांनी कशाप्रकारे उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे?

जेथे दररोज नवनवीन संकटे उद्‌भवतात अशा एका जगात, बायबल सांगते त्यानुसार, लवकरच युद्धे, गुन्हेगारी, उपासमार आणि जुलूम कायमची संपुष्टात येतील हे जाणणे अतिशय दिलासा देणारे आहे. (स्तोत्र ४६:९; स्तोत्र ७२:३, ७, ८, १२, १६) ही चांगली बातमी सर्वांना ऐकायला मिळू नये का? यहोवाच्या साक्षीदारांना वाटते की ही सर्वांना ऐकायला मिळावी. सबंध जगात त्यांना ‘शुभवृत्त विदीत करणारे’ म्हणून ओळखले जाते. (यशया ५२:७) आणि ही चांगली बातमी सर्वांना सांगण्याचा साक्षीदारांचा निर्धार असल्यामुळे त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांना छळ सोसावा लागला. पण त्यांना लोकांच्या कल्याणाची चिंता आहे. त्यांनी आजपर्यंत दाखवलेला आवेश आणि चिकाटी निश्‍चितच कौतुकास्पद आहे!

२. यहोवाच्या साक्षीदारांच्या आवेशी असण्यामागे कोणते एक कारण.आहे?

यहोवाच्या साक्षीदारांचा आवेश, पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोकांची आठवण करून देतो. त्याकाळच्या ख्रिस्ती लोकांविषयी लॉसेरवाटोरे रोमानो या रोमन कॅथलिक वृत्तपत्राने अगदी अचूक विधान केले: “आरंभीचे ख्रिस्ती, त्यांचा बाप्तिस्मा होताच शुभवर्तमानाचा प्रचार करण्याची वैयक्‍तिक जबाबदारी पत्करायचे. तोंडचे तोंडी ते सेवक शुभवर्तमानाचा प्रसार करीत.” त्या सुरवातीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणेच यहोवाचे साक्षीदार इतके आवेशी का आहेत? पहिले कारण म्हणजे, ते जिची घोषणा करतात ती चांगली बातमी अर्थात सुवार्ता खुद्द यहोवा देवाकडून आहे. या कार्यात आवेशी असण्याचे आणखी चांगले कारण कोणते असू शकेल? त्यांचे प्रचार कार्य जणू स्तोत्रकर्त्याच्या पुढील शब्दांना दिलेला प्रतिसाद आहे: “परमेश्‍वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा.”—स्तोत्र ९६:२.

३. (अ) यहोवाच्या साक्षीदारांच्या आवेशी असण्यामागचे दुसरे कारण कोणते आहे? (ब) ‘देवाने दिलेल्या तारणात’ काय समाविष्ट आहे?

स्तोत्रकर्त्याचे हे शब्द यहोवाच्या साक्षीदारांच्या आवेशी असण्यामागचे आणखी एक कारण आपल्या दृष्टीस आणतात. त्यांचा संदेश तारणाचा संदेश आहे. काहीजण मानव कल्याणाकरता वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक किंवा इतर क्षेत्रात सेवा करतात आणि त्यांचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. पण एका मनुष्याने दुसऱ्‍या मनुष्याकरता कितीही केले तरीसुद्धा ‘देवाने केलेल्या तारणाच्या’ तुलनेत ते अगदीच मर्यादित असेल. येशू ख्रिस्ताच्या माध्यमाने यहोवा पाप, आजारपण व मृत्यू यांपासून नम्र लोकांचे तारण करेल. त्याच्याकडून तारण झालेले सर्वकाळ जगतील! (योहान ३:१६, ३६; प्रकटीकरण २१:३, ४) आजच्या काळात, हे तारण ख्रिस्ती लोक घोषित करत असलेल्या पुढील शब्दांतील ‘अद्‌भुतकृत्यांपैकी’ आहे: “राष्ट्रांमध्ये [देवाचे] गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्‌भुतकृत्ये जाहीर करा. कारण परमेश्‍वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.”—स्तोत्र ९६:३, ४.

गुरूचा आदर्श

४-६. (अ) यहोवाचे साक्षीदार आवेशी असण्यामागचे तिसरे कारण कोणते? (ब) येशूने देवाच्या राज्याविषयीची चांगली बातमी पसरवण्याच्या कार्याबद्दल कशाप्रकारे आवेश दाखवला?

यहोवाचे साक्षीदार आणखी एक तिसऱ्‍या कारणामुळे आवेशी आहेत. ते येशू ख्रिस्ताच्या आदर्शाचे अनुकरण करतात. (१ पेत्र २:२१) त्या परिपूर्ण मनुष्याने ‘दीनास शुभवृत्त सांगण्याची’ त्याला नेमून दिलेली जबाबदारी मनःपूर्वक स्वीकारली. (यशया ६१:१; लूक ४:१७-२१) अशाप्रकारे तो एक सुवार्तिक बनला अर्थात एक चांगली बातमी सांगणारा. त्याने गालील व यहूदीयाच्या प्रदेशातील कानाकोपऱ्‍यांत प्रवास करून ‘राज्याची सुवार्ता गाजवली.’ (मत्तय ४:२३) आणि बरेचजण या चांगल्या बातमीला प्रतिसाद देतील हे त्याला माहीत असल्यामुळे त्याने आपल्या शिष्यांना म्हटले: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”—मत्तय ९:३७, ३८.

आपल्या प्रार्थनेच्या अनुषंगाने, येशूने इतरांनाही सुवार्तिक होण्यास प्रशिक्षित केले. नंतर, त्याने आपल्या प्रेषितांना असे सांगून पाठवले, “जात असताना अशी घोषणा करीत जा की, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’” हे कार्य करण्यापेक्षा त्यांनी त्याकाळातील सामाजिक समस्या सोडवण्याकरता कार्यक्रम राबवायला हवे होते का? किंवा त्याकाळात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला खीळ घालण्यासाठी त्यांनी राजकारणात सामील व्हायला हवे होते का? नाही. असे करण्याऐवजी येशूने आपल्या अनुयायांना पुढील आज्ञा देऊन सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांकरता एक आदर्श मांडला: ‘जात असता, घोषणा करा.’—मत्तय १०:५-७.

नंतर, येशूने आपल्या शिष्यांच्या आणखी एका गटाला अशी घोषणा करण्यास पाठवले: “देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.” ही चांगली बातमी सर्वदूर पसरवून शिष्य आपल्याला मिळालेल्या सफलतेविषयी सांगण्यास परत आले तेव्हा येशूला अत्यानंद झाला. त्याने अशी प्रार्थना केली: “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करितो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्‍यांच्यापासून ह्‍या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रगट केल्या आहेत; होय, पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले.” (लूक १०:१, ८, ९, २१) येशूच्या शिष्यांपैकी काही पूर्वी कष्ट करणारे मच्छीमार, शेतकरी इत्यादी होते; त्या राष्ट्रातील उच्च शिक्षित धर्मपुढाऱ्‍यांच्या तुलनेत ते बालकांप्रमाणे होते. पण या शिष्यांना एक सर्वात चांगली बातमी पसरवण्याकरता प्रशिक्षित करण्यात आले.

७. येशू स्वर्गात गेल्यावर, त्याच्या अनुयायांनी तारणाविषयीची चांगली बातमी प्रथम कोणाला घोषित केली?

येशू स्वर्गात गेल्यानंतर त्याच्या अनुयायांनी तारणाविषयीची चांगली बातमी सर्वदूर पसरवण्याचे कार्य सुरूच ठेवले. (प्रेषितांची कृत्ये २:२१, ३८-४०) ही चांगली बातमी सर्वप्रथम त्यांनी कोणाला सांगितली? ज्यांना देवाविषयी माहीत नव्हते अशा राष्ट्रांकडे ते आधी गेले का? नाही, त्यांचे प्रथम कार्यक्षेत्र इस्राएल होते, एक असे राष्ट्र जे १,५०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून यहोवाला ओळखत होते. पण जेथे आधीच यहोवाची उपासना केली जात होती तेथे ही चांगली बातमी घोषित करण्याचा त्यांना हक्क होता का? हो. येशूने त्यांना सांगितले होते: “यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रेषितांची कृत्ये १:८) इतर कोणत्याही राष्ट्राइतकेच, इस्राएल राष्ट्रालाही देवाच्या राज्याची चांगली बातमी ऐकायला मिळणे आवश्‍यक होते.

८. आज यहोवाचे साक्षीदार पहिल्या शतकातील येशूच्या अनुयायांचे कशाप्रकारे अनुकरण करतात?

त्याचप्रकारे, आज यहोवाचे साक्षीदार सबंध पृथ्वीवर हीच चांगली बातमी पसरवत आहेत. योहानाने “एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्‍यास म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती.” यहोवाचे साक्षीदार या देवदूताला सहकार्य देत आहेत. (प्रकटीकरण १४:६) सन २००१ दरम्यान ते २३५ देशांत आणि प्रदेशांत (ज्यांपैकी काही सर्वसामान्यपणे ख्रिस्ती समजले जातात) सक्रिय होते. ख्रिस्ती धर्मजगताने जेथे आधीच आपली चर्चेस सुस्थापित केली आहेत अशा देशांत यहोवाच्या साक्षीदारांनी देवाच्या राज्याविषयीच्या चांगल्या बातमीची घोषणा करणे अयोग्य आहे का? काहींना असे वाटते. आणि साक्षीदार या कार्याद्वारे चर्चचे सदस्य ‘चोरतात’ असेही काहींना वाटते. पण यहोवाचे साक्षीदार, येशू त्याच्या काळातील नम्र यहूद्यांकडे कोणत्या दृष्टीने पाहात होता हे आठवणीत ठेवतात. या यहूद्यांकरता एक याजकगण होता तरीसुद्धा येशू त्यांना राज्याची चांगली बातमी सांगण्यास कचरला नाही. “त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) ज्यांना यहोवाविषयी किंवा त्याच्या राज्याविषयी काहीही माहिती नाही असे नम्र लोक यहोवाच्या साक्षीदारांना भेटतात, तेव्हा केवळ या लोकांवर एखाद्या धर्माचा अधिकार आहे म्हणून साक्षीदारांनी त्यांना एक चांगली बातमी ऐकण्यापासून वंचित ठेवावे का? येशूच्या प्रेषितांच्या आदर्शानुसार, आपण या प्रश्‍नाचे उत्तर नाही असे देतो. देवाच्या राज्याच्या चांगल्या बातमीची घोषणा कोणत्याही अपवादाशिवाय, “सर्व राष्ट्रांत” झाली पाहिजे.—मार्क १३:१०.

आरंभीचे सर्व ख्रिस्ती एका चांगल्या बातमीचे उद्‌घोषक

९. पहिल्या शतकात ख्रिस्ती मंडळीत देवाच्या राज्याची चांगल्या बातमी सांगण्याच्या कार्यात कोण सामील झाले?

पहिल्या शतकात देवाच्या राज्याची चांगली बातमी सांगण्याच्या कार्यात कोणी सहभाग घेतला? वास्तविक अहवाल दाखवतात की सर्व ख्रिस्ती या कार्यात सामील होते. लेखक डब्ल्यू. एस. विल्यम्स सांगतात: “सर्वसामान्य पुरावा हेच दाखवतो की मूळ चर्चचे सर्व ख्रिस्ती . . . शुभवर्तमानाचा प्रचार करत होते.” सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी घडलेल्या घटनांविषयी बायबल सांगते: “ते सर्व जण [स्त्रीपुरुष] पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.” या कार्यात स्त्री व पुरुष, तरुण व वयस्क, दास व स्वतंत्र असे सर्व सामील झाले. (प्रेषितांची कृत्ये १:१४; २:१, ४, १७, १८; योएल २:२८, २९; गलतीकर ३:२८) छळामुळे अनेक ख्रिश्‍चनांना जेरूसलेममधून पळ काढणे भाग पडले तेव्हा, “ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले.” (प्रेषितांची कृत्ये ८:४) केवळ काही नेमलेले नव्हे, तर “ज्यांची पांगापांग झाली होती ते” सर्वजण देवाच्या राज्याची चांगली बातमी पसरवत होते.

१०. यहुदी व्यवस्थीकरणाचा नाश होण्याआधी कोणत्या दुहेरी आज्ञेचे पालन करण्यात आले?

१० त्या सुरवातीच्या वर्षांत हे सातत्याने खरे ठरले. येशूने भाकीत केले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) या शब्दांच्या पहिल्या शतकातील पूर्णतेत, रोमी सैन्याने यहुदी धार्मिक आणि राजकीय संरचनेचा नाश करण्याआधी सुवार्ता विस्तारित प्रमाणात पसरवण्यात आली होती. (कलस्सैकर १:२३) शिवाय, येशूच्या सर्व अनुयायांनी त्याच्या या आज्ञेचे पालन केले: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) आधुनिक काळातील काही प्रचारकांसारखे, सुरवातीच्या ख्रिश्‍चनांनी नम्र लोकांना केवळ येशूवर विश्‍वास ठेवा असा आग्रह करून पुढे कसलेच मार्गदर्शन न देता त्यांना आपल्याच मनाने देवाची सेवा करण्याकरता सोडून दिले नाही. उलट, त्यांनी त्यांना येशूचे शिष्य होण्यास शिकवले, त्यांना मंडळ्यांमध्ये संघटित केले आणि त्यांना प्रशिक्षण दिले जेणेकरून ते देखील एका चांगल्या बातमीचे प्रचारक बनू शकतील व शिष्य बनवू शकतील. (प्रेषितांची कृत्ये १४:२१-२३) यहोवाचे साक्षीदार आज त्यांच्याच आदर्शाचे पालन करतात.

११. मानवजातीकरता सर्वात उत्तम अशी वार्ता पसरवण्यात आज कोण सहभाग घेत आहेत?

११ पहिल्या शतकातील पौल, बर्णबा व त्यांच्यासारख्या इतरांच्या उदाहरणाचे अनुकरण करून यहोवाच्या साक्षीदारांपैकी कित्येकजण देवाच्या राज्याची चांगली बातमी पसरवण्याकरता इतर ठिकाणी राहायला गेले आहेत. त्यांचे कार्य खरोखर फायदेकारक ठरले आहे कारण राजकारणात किंवा इतर गोष्टींत गुंतून देवाच्या राज्याची चांगली बातमी सांगण्याच्या आज्ञेचे पालन करण्यापासून ते कधीही विचलित झाले नाहीत. त्यांनी केवळ ‘जात असता, घोषणा करा’ या येशूच्या आज्ञेचे पालन केले. पण यहोवाच्या साक्षीदारांपैकी बहुतेकजण हे कार्य करण्याकरता दुसऱ्‍या ठिकाणी गेलेले नाहीत. त्यांच्यापैकी बरेचजण नोकरीव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात आणि काही अद्याप शिकत आहेत. काहींना मुले आहेत. पण सर्व साक्षीदार आपल्याला समजलेली राज्याची चांगली बातमी इतरांना सांगतात. अबालवृद्ध, स्त्रीपुरूष सर्व बायबलच्या या आर्जवाला आनंदाने प्रतिसाद देत आहेत: “वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा.” (२ तीमथ्य ४:२) पहिल्या शतकातील त्यांच्या अग्रगामी प्रचारकांप्रमाणे त्यांनी देखील ‘येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे सोडले नाही.’ (प्रेषितांची कृत्ये ५:४२) मानवजातीकरता सर्वात उत्तम अशी वार्ता ते सर्वदूर पसरवत आहेत.

चांगली बातमी पसरवणे की जबरदस्तीने धर्मपरिवर्तन?

१२. प्रचार करणे किंवा एखाद्या व्यक्‍तीचा धर्म बदलणे चुकीचे आहे असे आजकाल बऱ्‍याचजणांना का वाटते?

१२ आजकाल, प्रचार आणि धर्मपरिवर्तन या शब्दांना बऱ्‍याच लोकांच्या मनात एक नकारात्मक अर्थ आला आहे. काहीजण असे म्हणतात की आपला धर्म बदलणे किंवा इतरांनी आपला विश्‍वास स्वीकारावा या इच्छेने प्रचार करणे हे एक पाप आहे. पण हे लोक जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्याविषयी विचार करत असल्यामुळे त्यांना असे वाटते.

१३. धर्मपरिवर्तन अपायकारक ठरू शकते हे दाखवणारी काही उदाहरणे कोणती आहेत?

१३ धर्मपरिवर्तन केल्यामुळे काही नुकसान होते का? होऊ शकते. येशूने म्हटले होते की शास्त्री व परूशी, लोकांना यहुदी मतानुयायी बनवण्याचे खूप प्रयत्न करतात पण हे त्या लोकांकरता फायद्याचे नाही. (मत्तय २३:१५) “जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करणे” निश्‍चितच चुकीचे आहे. उदाहरणार्थ, इतिहासकार जोसीफसनुसार, जॉन हरकेनस या मक्काबीने इदुमियन लोकांना परास्त केले तेव्हा त्याने “त्यांना त्यांच्या देशात राहू देण्याची परवानगी या शर्तीवर देऊ केली की त्यांनी सुंता करून घ्यावी आणि यहूद्यांच्या नियमांचे पालन करावे.” यहुदी शासनाखाली राहायचे असल्यास या इदुमियन लोकांना यहुदी धर्माचे पालन करायचे होते. इतिहासकार सांगतात की सा.यु. आठव्या शतकात शार्लमेन याने उत्तर युरोपातील विदेशी सॅक्सन्सवर विजय मिळवला आणि त्यांना अतिशय क्रूरतेने धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले. * पण या सॅक्सन्स किंवा इदुमियन लोकांच्या धर्मपरिवर्तनाला काही अर्थ होता का? उदाहरणार्थ, बाळ येशूला ठार मारण्याचा प्रयत्न करणारा इदुमियन राजा हेरोद हा मोशेच्या देवप्रेरित नियमशास्त्राला कितपत एकनिष्ठ होता?—मत्तय २:१-१८.

१४. ख्रिस्ती धर्मजगताचे काही मिशनरी कशाप्रकारे लोकांवर धर्मांतर करण्याचा दबाव आणतात?

१४ आजही लोकांना जबरदस्तीने धर्म बदलायला लावले जाते का? एका अर्थाने, आजही हे घडत आहे. ख्रिस्ती धर्मजगताचे काही मिशनरी धर्मान्तर करण्याजोग्या व्यक्‍तींना परदेशांतील शिष्यवृत्त्या देऊ करतात अशी वृत्ते आहेत. किंवा काही धर्मपरिवर्तक एखाद्या लाचार, उपाशी निर्वासिताला अन्‍नसामुग्री देण्याचे आमीष दाखवून आधी आपला उपदेश ऐकायला लावतात. ऑर्थोडॉक्स बिशपांच्या एका अधिवेशनात १९९२ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार “कधी आर्थिक फायद्याचे आमीष दाखवून तर कधी वेगवेगळ्या प्रकारे हिंसाचाराचा अवलंब करून धर्मांतर केले जाते.”

१५. यहोवाचे साक्षीदार एखाद्या व्यक्‍तीला धर्म बदलण्याकरता दबाव आणतात किंवा भाग पाडतात का?

१५ लोकांवर त्यांचा धर्म बदलण्याकरता दबाव आणणे चुकीचे आहे. निश्‍चितच यहोवाचे साक्षीदार अशाप्रकारे कार्य करत नाहीत. * ते कधीही आपली मते इतरांवर लादत नाहीत. उलट, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे ते सर्वांना एक चांगली बातमी सांगतात. जो कोणी स्वेच्छेने या संदेशाविषयी आस्था व्यक्‍त करतो त्याला बायबलचा अभ्यास करून अधिक ज्ञान घेण्याचे आमंत्रण दिले जाते. हे आस्थेवाईक लोक, देवाविषयी व त्याच्या उद्देशांविषयी बायबलमधील अचूक ज्ञानाच्या आधारावर विश्‍वास ठेवायला शिकतात. आणि यामुळे ते तारणाकरता देवाचे अर्थात यहोवाचे नाव घेऊन त्याचा धावा करतात. (रोमकर १०:१३, १४, १७) ते या संदेशाचा स्वीकार करतील अथवा नाही हा सर्वस्वी त्यांचा वैयक्‍तिक निर्णय आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही. किंबहुना, जबरदस्ती केली तर धर्मांतर निरर्थक ठरेल. देवाने एखाद्या व्यक्‍तीची उपासना स्वीकारण्यासाठी ती उपासना मनःपूर्वक असली पाहिजे.—अनुवाद ६:४, ५; १०:१२.

आधुनिक काळात राज्याची चांगली बातमी पसरवणे

१६. यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य आधुनिक काळात कसे वाढले आहे?

१६ आधुनिक काळात आजपर्यंत, यहोवाच्या साक्षीदारांनी राज्याची सुवार्ता पसरवण्याद्वारे मत्तय २४:१४ या वचनाच्या मोठ्या प्रमाणातील पूर्णतेत भाग घेतला आहे. त्यांच्या या कार्यातील महत्त्वाचे साधन म्हणजे टेहळणी बुरूज नियतकालिक. * १८७९ साली टेहळणी बुरूजचे पहिले अंक प्रकाशित करण्यात आले तेव्हा या नियतकालिकाचे केवळ एका भाषेत जवळजवळ ६,००० प्रती इतके वितरण होते. १२१ वर्षांपेक्षा अधिक काळ उलटल्यानंतर २००१ साली या नियतकालिकाचे वितरण १४१ भाषांत २,३०,४२,००० प्रती इतके वाढले. यासोबतच यहोवाच्या साक्षीदारांच्या, राज्याची सुवार्ता पसरवण्याच्या कार्यातही वाढ झाली आहे. १९ व्या शतकात दरवर्षी या कार्यात खर्च केल्या जाणाऱ्‍या दोन तीन हजार तासांची, २००१ सालादरम्यान या कार्यासाठी वाहिलेल्या १,१६,९०,८२,२२५ तासांशी तुलना करा. याच वर्षादरम्यान दर महिन्यात चालवण्यात आलेल्या सरासरी ४९,२१,७०२ बायबल अभ्यासांचा विचार करा. एक उत्तम कार्य किती अद्‌भुत प्रमाणात करण्यात आले! या कार्यात ६१,१७,६६६ सक्रिय राज्य उद्‌घोषकांचे योगदान होते.

१७. (अ) आज कोणकोणत्या खोट्या देवतांची उपासना केली जाते? (ब) एखाद्याची भाषा, राष्ट्रीयत्व, किंवा सामाजिक दर्जा काहीही असला तरीसुद्धा त्याला काय समजणे आवश्‍यक आहे?

१७ स्तोत्रकर्ता म्हणतो: “लोकांचे सर्व देव मूर्ती आहेत, पण यहोवाने आकाशे निर्माण केली.” (स्तोत्र ९६:५, पं.र.भा.) आजच्या प्रापंचिक जगात राष्ट्रवाद, राष्ट्रीय प्रतीके, प्रतिष्ठित व्यक्‍ती, भौतिक वस्तू, आणि धनसंपत्तीची देखील पूजा केली जाते. (मत्तय ६:२४; इफिसकर ५:५; कलस्सैकर ३:५) मोहनदास के. गांधी यांनी एकदा म्हटले: “माझे ठाम मत असे आहे की . . . आज युरोप हे केवळ नावापुरते ख्रिस्ती आहे. खरे पाहता, ते मॅमन [धनसंपत्ती] याचे उपासक बनले आहे.” वस्तुस्थिती अशी आहे की जगाच्या कानाकोपऱ्‍यांत देवाच्या राज्याची चांगली बातमी सांगणे आवश्‍यक आहे. सर्वांना, मग त्यांची भाषा, राष्ट्रीयत्व, किंवा सामाजिक दर्जा काहीही असो त्यांना यहोवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल समजणे आवश्‍यक आहे. आम्ही अशी आशा करतो की सर्वांनी स्तोत्रकर्त्याच्या पुढील शब्दांना प्रतिसाद द्यावा: “परमेश्‍वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. परमेश्‍वराच्या नावाची थोरवी गा”! (स्तोत्र ९६:७, ८) इतरांनाही यहोवाचे योग्यप्रकारे गौरव करता यावे म्हणून यहोवाचे साक्षीदार त्याच्याविषयी शिकण्यास त्यांना मदत करतात. या शिक्षणाला प्रतिसाद देणाऱ्‍यांना याचा मोठा फायदा होतो? त्यांना कोणते फायदे प्राप्त होतात? याविषयी पुढील लेखात चर्चा केली जाईल.

[तळटीपा]

^ परि. 13 द कॅथलिक एन्सायक्लोपिडिया यात सांगितल्यानुसार धर्मसुधारणेच्या काळादरम्यान विशिष्ट राष्ट्राच्या लोकांवर एखादा धर्म जबरदस्तीने लादण्याचा प्रकार, कूयुस रेज्यो, इल्युस एट रेलिज्यो (याचा अर्थ: “ज्याचे राज्य त्याचा धर्म”) या ब्रीदवाक्याखाली करण्यात आला.

^ परि. 15 अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य समितीच्या एका सभेत नोव्हेंबर १६, २००० रोजी एका सभासदाने, जे जबरदस्तीने धर्मांतर करतात त्यांच्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यात असलेला फरक स्पष्ट केला. त्या प्रसंगी असे म्हणण्यात आले की, यहोवाचे साक्षीदार इतरांना प्रचार करतात तेव्हा ते अशाप्रकारे करतात की एक व्यक्‍ती केवळ “मला यात रस नाही” असे म्हणून आपले दार बंद करू शकते.

^ परि. 16 या नियतकालिकाचे संपूर्ण नाव टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक असे आहे.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• यहोवाचे साक्षीदार आवेशी प्रचारक का आहेत?

• ज्या ठिकाणी ख्रिस्ती धर्मजगताची चर्चेस सुस्थापित आहेत त्या ठिकाणीही यहोवाचे साक्षीदार प्रचार का करतात?

• धर्मांतर करणाऱ्‍या इतरांपेक्षा यहोवाचे साक्षीदार वेगळे का आहेत?

• यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्यात या आधुनिक काळात कशाप्रकारे वृद्धी झाली आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

येशू एक आवेशी प्रचारक होता आणि त्याने इतरांनाही हेच कार्य करण्याचे प्रशिक्षण दिले

[१० पानांवरील चित्र]

पहिल्या शतकातील मंडळीत सर्वजण राज्याची चांगली बातमी पसरवण्याच्या कार्यात सहभागी झाले

[११ पानांवरील चित्र]

लोकांना जबरदस्तीने त्यांचा धर्म बदलायला भाग पाडणे चुकीचे आहे