व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनाच्या शिक्षकांना आपली कामगिरी पूर्ण करण्याचे आवाहन

देवाच्या वचनाच्या शिक्षकांना आपली कामगिरी पूर्ण करण्याचे आवाहन

देवाच्या वचनाच्या शिक्षकांना आपली कामगिरी पूर्ण करण्याचे आवाहन

अलीकडील महिन्यात लाखो शिक्षक प्रशिक्षणासाठी एकत्र जमले होते. हजारोंच्या संख्येने हे शिक्षक, गेल्या मे महिन्यापासून संपूर्ण जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या “देवाच्या वचनाचे शिक्षक” या प्रांतीय अधिवेशनांना उपस्थित राहिले. उपस्थित राहिलेल्या सर्व प्रतिनिधींना स्वतःला प्रशिक्षित करण्याचे, अधिक कार्यक्षम होण्याचे व शिक्षक या नात्याने मिळालेली कामगिरी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

तुम्ही यांपैकी कोणत्या अधिवेशनाला उपस्थित राहिलात का? असल्यास तुम्ही खरा देव यहोवा याच्या उपासनेसाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यांत जे उत्तम आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यात आले त्याबद्दल नक्कीच कृतज्ञ असाल. अधिवेशनाच्या बोधपर कार्यक्रमाची उजळणी करण्यात तुम्हीही आमच्याबरोबर सामील होऊ इच्छिता का?

पहिला दिवस—सद्‌बोधाकरिता उपयोगी असलेली प्रेरित शास्त्रवचने

अधिवेशन अध्यक्षांनी, “देवाच्या वचनाचे शिक्षकहो, बोध घ्या” या भाषणाद्वारे उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत केले. ‘महान शिक्षक’ यहोवा याच्याकडून शिक्षण प्राप्त करून येशू ख्रिस्त थोर शिक्षक झाला. (यशया ३०:२०, ईजी-टू-रीड व्हर्शन; मत्तय १९:१६) देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने प्रगती करण्याची आपलीसुद्धा इच्छा असेल तर आपणही यहोवाकडून शिक्षण घेतले पाहिजे.

यानंतर, “राज्याचे शिक्षण उत्तम फळ उत्पन्‍न करते,” हा भाग होता. यामध्ये देवाच्या वचनाच्या अनुभवी शिक्षकांच्या मुलाखतींद्वारे, शिष्य बनवण्याच्या कामातून मिळणाऱ्‍या आनंदावर व प्रतिफळांवर भर देण्यात आला.

कार्यक्रमात पुढे, “‘देवाची महत्कृत्ये’ पाहून प्रेरित झालेले” हे स्फूर्तीदायक भाषण देण्यात आले. पहिल्या शतकात, देवाच्या राज्यासंबंधी असलेल्या त्याच्या ‘महत्कृत्यांनी’ लोकांना कार्य करण्यास प्रेरित केले. (प्रेषितांची कृत्ये २:११) आपणही आज, खंडणी, पुनरुत्थान, नवीन करार अशा शास्त्रवचनीय शिकवणुकींसारख्या ‘महत्कृत्यांची’ घोषणा करून लोकांना कार्य करण्यास प्रवृत्त करू शकतो.

“यहोवाच्या धार्मिकतेत हर्षित व्हा” या नंतरच्या भाषणानेही सर्वांना प्रोत्साहन दिले. (स्तोत्र ३५:२७) धार्मिक गोष्टींवर प्रेम करण्यास व वाईटाचा वीट करण्यास शिकण्याद्वारे, बायबलचा अभ्यास करण्याद्वारे, आध्यात्मिक अर्थाने धोकेदायक प्रभावांचा सक्रियपणे प्रतिकार करण्याद्वारे आणि नम्रता विकसित करण्याद्वारे आपल्याला धार्मिकतेचा पाठलाग करण्यास मदत मिळते. असे केल्याने, हानीकारक संगतीपासून, जगाच्या भौतिकवादी मूल्यांपासून तसेच अनैतिक व हिंसक मनोरंजनापासून आपले संरक्षण होईल.

“देवाच्या वचनाचे शिक्षक या नात्याने पूर्णपणे तयार” या प्रमुख भाषणाने आपल्याला आठवण करून दिली, की यहोवा त्याचे वचन, त्याचा पवित्र आत्मा, पृथ्वीवरील त्याची संघटना यांच्याद्वारे आपल्याला त्याचे पात्र सेवक बनवतो. देवाच्या वचनाचा आपण कशाप्रकारे उपयोग केला पाहिजे या संदर्भात वक्‍त्‌याने असे सांगितले, की “बायबलच्या पानांवरील संदेश जणू काय उचलून आपल्या श्रोत्यांच्या अंतःकरणांवर त्याची छाप पाडण्याचे आपले ध्येय आहे.”

अधिवेशनाच्या पहिल्या परिसंवादाचा विषय होता: “इतरांना शिकवताना स्वतःला शिकवणे.” इतरांना आपण जो उच्च ख्रिस्ती नैतिक दर्जा शिकवतो तोच दर्जा आपणही पाळला पाहिजे यावर परिसंवादातील सुरवातीच्या भाषणात जोर देण्यात आला. त्यानंतरच्या भाषणात आपल्याला, ‘सत्याचे वचन नीट सांगण्याचा’ सल्ला देण्यात आला. (२ तीमथ्य २:१५) आपण देवाची कितीही वर्षांपासून सेवा करत असलो तरी, स्वतःला प्रशिक्षित करण्यासाठी, नियमितपणे व मनःपूर्वक बायबलचा व्यक्‍तिगत अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. परिसंवादाच्या शेवटल्या भागात हे दाखवण्यात आले, की गर्विष्ठपणा, स्वैराचारी आत्मा, स्वतःला अवाजवी महत्त्व देणे, हेवा, मत्सर, कटूता, राग, चुका शोधण्याची वृत्ती यांसारखे गुण आपल्यात आहेत का हे पाहण्यासाठी दियाबलाचे लक्ष आहे. आपण जर दियाबलाचा कडाडून विरोध केला तर तो आपल्यापासून दूर पळेल. परंतु त्याचा विरोध करता यावा म्हणून आपण स्वतः आधी देवाच्या जवळ गेले पाहिजे.—याकोब ४:७, ८.

“जगाला लागलेली अश्‍लीलतेची साथ टाळा” या समयोचित भाषणाने आपल्याला दाखवून दिले, की आपल्या आध्यात्मिकतेला धोक्यात आणणाऱ्‍या या गोष्टीचा आपण यशस्वीरीत्या सामना कसा करू शकतो. संदेष्टा हबक्कूक यहोवाविषयी म्हणाला: “तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टि लाववत नाही.” (हबक्कूक १:१३) आपण “वाइटाचा वीट” मानला पाहिजे. (रोमकर १२:९) आपली मुले इंटरनेटचा उपयोग करत असतात व टीव्ही पाहत असतात तेव्हा पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावे असा त्यांना सल्ला देण्यात आला होता. वक्‍त्‌याने म्हटले, की ज्यांना अश्‍लील चित्रे पाहण्याची सवय लागली आहे त्यांनी आध्यात्मिक अर्थाने प्रौढ असलेल्या एखाद्या मित्राकडून साहाय्य घेतले पाहिजे. स्तोत्र ९७:१०; मत्तय ५:२८; १ करिंथकर ९:२७; इफिसकर ५:३, १२; कलस्सैकर ३:५; व १ थेस्सलनीकाकर ४:४, ५ यांसारख्या वचनांवर मनन करून ती पाठ केल्यानेसुद्धा मदत मिळू शकते.

यानंतरचे भाषण होते, “देवाची शांती तुमचे रक्षण करो.” या भाषणात आपल्याला आश्‍वासन देण्यात आले, की चिंतेच्या ओझ्याखाली आपण दबून जातो तेव्हा आपण आपला पूर्ण भार यहोवावर टाकू शकतो. (स्तोत्र ५५:२२) प्रार्थनेद्वारे आपण यहोवापुढे आपले मन मोकळे केल्यास तो आपल्याला ‘त्याच्याकडून येणारी शांती’ देतो; ही शांती म्हणजे, त्याच्याबरोबरच्या आपल्या अमूल्य नातेसंबंधामुळे मिळणारी आंतरिक शांती व स्थैर्य होय.—फिलिप्पैकर ४:६, ७.

पहिल्या दिवसाची समाप्ती एका खास आनंदी भाषणाने झाली ज्याचा विषय होता: “आपल्या प्रकाशाने यहोवा आपल्या लोकांना सुशोभित करतो.” यशयाच्या ६० व्या अध्यायाच्या पूर्णतेचे वर्णन यांत केले होते. जगात सध्याच्या अंधकारात, ‘परदेशी’ अर्थात अंधकारातून बाहेर येणारा मेंढरासमान लोकांचा मोठा लोकसमुदाय अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांबरोबर यहोवाकडून येणाऱ्‍या प्रकाशाचा उपभोग घेत आहे. १९ आणि २० वचनांचा उल्लेख करून वक्‍त्‌याने म्हटले: “सूर्याप्रमाणे यहोवा ‘ढळणार’ नाही किंवा चंद्र जसा ‘कमी’ होत जातो तसा होणार नाही. आपल्या लोकांवर प्रकाश टाकून तो सतत त्यांना सुशोभित करीत राहील. अंधकारमय जगाच्या शेवटल्या दिवसांत राहणाऱ्‍या आपल्यासाठी हे केवढे अद्‌भुत आश्‍वासन!” भाषणाच्या समाप्तीला वक्‍त्‌याने यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीसाठी प्रकाश, खंड २ या पुस्तकाचे अनावरण केले. हे नवीन पुस्तक तुम्ही वाचून काढले का?

दुसरा दिवस—इतरांना शिकवण्यास पूर्णपणे पात्र

दुसऱ्‍या दिवसाच्या दैनिक वचनाची चर्चा झाल्यानंतर आपण अधिवेशनातील दुसरा परिसंवाद लक्ष देऊन ऐकला ज्याचा विषय होता: “सेवकांद्वारे इतर जण देखील विश्‍वासू बनतात.” तीन भाग असलेल्या या परिसंवादातील वक्‍त्‌यांनी, लोकांना विश्‍वास ठेवण्यास सहाय्यक ठरतील अशा तीन टप्प्यांचे एकएक करून स्पष्टीकरण दिले. राज्य संदेशाचा प्रचार, आस्था दाखवणाऱ्‍या लोकांची आवड आणखी वाढवणे आणि ख्रिस्ताने आज्ञापिलेल्या गोष्टी पाळण्यास आस्थेवाईक लोकांना शिकवणे, हे ते तीन टप्पे आहेत. मुलाखतींद्वारे व अनुभवांचे प्रात्यक्षिक दाखवण्याद्वारे आपण, इतरांना शिष्य बनण्यास कसे शिकवू शकतो हे नेमके आपण पाहू शकलो.

यानंतरच्या भागाचा विषय होता: “धीरात ईश्‍वरी भक्‍तीची भर घाला.” खरे तर, ‘शेवटपर्यंत टिकून राहण्याला’ महत्त्व आहे हे वक्‍त्‌याने दाखवून दिले. (मत्तय २४:१३) ईश्‍वरी भक्‍ती वाढवण्यासाठी, प्रार्थना, व्यक्‍तिगत अभ्यास, सभा आणि सेवा या देवाने केलेल्या सर्व तरतूदींचा आपण उपयोग केला पाहिजे. आपल्या ईश्‍वरी भक्‍तीवर अतिक्रमण किंवा तिचा नाश करू पाहणाऱ्‍या सर्व जगिक इच्छा-आकांक्षा आणि कार्ये आपण टाळली पाहिजेत.

कष्टी व भाराक्रांत लोकांना आज विसावा कोठे मिळू शकेल? “ख्रिस्ताच्या जुवाखाली विसावा मिळवणे,” असा विषय असलेल्या भाषणाने या प्रश्‍नाचे उत्तर दिले. येशूने अगदी दयाळुपणे आपल्या शिष्यांना त्याच्या जुवाखाली येण्याचे व त्याच्यापासून शिकण्याचे आमंत्रण दिले. (मत्तय ११:२८-३०) येशूसारखी साधीसुधी व संतुलित जीवनशैली आचरून आपण त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो व अशाप्रकारे आपण त्याच्या जुवाखाली येऊ शकतो. आपली जीवनशैली साधी बनवलेल्या बांधवांच्या मुलाखतींमुळे या भाषणातील मुख्य मुद्दे आणखी उठून दिसले.

यहोवाच्या साक्षीदारांच्या अशा मोठ्या मेळाव्यांच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे, नव्याने समर्पण करणाऱ्‍या देवाच्या सेवकांचा बाप्तिस्मा. “बाप्तिस्म्यामुळे शिकवण्याचे महान सुहक्क मिळतात,” असा विषय असलेले भाषण देणाऱ्‍या बांधवाने बाप्तिस्मा घेणाऱ्‍या सर्व उमेदवारांचे स्वागत केले आणि सेवेच्या महान सुहक्कांत सहभाग घेण्यास आमंत्रित केले. नव्याने बाप्तिस्मा घेतलेल्या देवाच्या वचनाच्या शिक्षकांना, शास्त्रवचनांतील पात्रता पूर्ण करून मंडळीत विविध जबाबदाऱ्‍या प्राप्त करता येऊ शकतात.

दुपारच्या सत्रातील पहिल्या भाषणाचा विषय होता: “महान शिक्षकाचे अनुकरण करा.” असीमित काळ स्वर्गात राहून येशूने आपल्या पित्याचे अगदी जवळून परीक्षण केले व त्याचे अनुकरण केले आणि अशाप्रकारे तो महान शिक्षक बनला. पृथ्वीवर असताना, त्याने शिकवण्याच्या अत्यंत प्रभावकारी पद्धतींचा उपयोग केला; जसे की भेदक प्रश्‍नांचा व साध्यासोप्या परंतु अगदी स्पष्ट अशा दाखल्यांचा त्याने उपयोग केला. देवाच्या वचनाच्या आधारावर त्याने शिकवण दिली आणि उत्साहाने, प्रेमळपणे व अधिकाराने तो बोलला. हे सर्व ऐकून महान शिक्षकाचे अनुकरण करण्यास आपण प्रवृत्त झालो नाही का?

दुसऱ्‍या एका प्रेरणादायक भाषणाचा विषय होता: “तुम्ही इतरांची सेवा करण्यास तयार आहात का?” या भाषणाद्वारे सर्वांना इतरांची सेवा करण्याकरता येशूने घालून दिलेल्या उदाहरणाचे पालन करण्यास उत्तेजन देण्यात आले. (योहान १३:१२-१५) इतरांना साहाय्य करण्याकरता मिळणाऱ्‍या संधींचा उपयोग करून तीमथ्याप्रमाणे व्हावे असे वक्‍त्‌याने योग्यताप्राप्त बांधवांना थेट आग्रह केला. (फिलिप्पैकर २:२०, २१) एलकाना व हन्‍नाप्रमाणे आपल्या मुलांना पूर्ण वेळेची सेवा निवडण्यास मदत करण्याचे पालकांना उत्तेजन देण्यात आले. तरुणांना, येशू ख्रिस्त तसेच तरुण तीमथ्य यांच्या उदाहरणाचे अनुकरण करून देवाच्या सेवेसाठी स्वतःहून पुढे येण्याचे उत्तेजन देण्यात आले. (१ पेत्र २:२१) इतरांची सेवा करण्याच्या संधींचा फायदा घेतलेल्या बंधूभगिनींचा अनुभव ऐकूनही आपल्याला किती प्रोत्साहन मिळाले.

तिसऱ्‍या परिसंवादाचा विषय होता: “ईश्‍वरशासित शिक्षणापासून पूर्ण लाभ मिळवा.” लक्ष देण्याचा आपला कालावधी वाढवणे किती महत्त्वपूर्ण आहे यावर पहिल्या वक्‍त्‌याने जोर दिला. हा कालावधी वाढवण्याचे आपण ध्येय ठेवल्यास, सुरवातीला व्यक्‍तिगत अभ्यासासाठी कमी वेळ देऊन मग हळूहळू या वेळेचा अवधी आपण वाढवत जाऊ शकतो. सभांमध्ये बायबलमधून वाचली जाणारी वचने उघडण्यास, नोट्‌स घेण्यास वक्‍त्‌याने आपल्याला प्रोत्साहन दिले. दुसऱ्‍या वक्‍त्‌याने आपल्याला, “सुवचनांचा नमुना” जपून ठेवण्याच्या गरजेविषयी सावध केले. (२ तीमथ्य १:१३, १४) अनैतिक प्रसारमाध्यमाचे कार्यक्रम, मानवी तत्त्वज्ञान, उच्च समीक्षा, धर्मत्यागी शिकवणुकी यांपासून आपण स्वतःचे संरक्षण केले पाहिजे आणि व्यक्‍तिगत अभ्यास तसेच सभांना उपस्थित राहण्याकरता वेळ काढला पाहिजे. (इफिसकर ५:१५, १६) परिसंवादातील शेवटल्या वक्‍त्‌याने, शिकलेल्या गोष्टी आचरण्यावर जोर दिला जेणेकरून ईश्‍वराकडून मिळालेल्या या शिक्षणाचा आपल्याला पूर्ण लाभ होऊ शकेल.—फिलिप्पैकर ४:९.

“आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी नवनवीन तरतूदी” हे भाषण ऐकून आपल्याला किती आनंद झाला होता! ईश्‍वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणातून फायदा मिळवणे (इंग्रजी) असे शीर्षक असलेले नवीन पुस्तक आपल्याला लवकरच मिळणार आहे हे ऐकूनसुद्धा आपण सर्व खूष झालो. वक्‍ता त्यातील विषय आपल्याला सांगत होते तेव्हा कधी एकदाचे ते पुस्तक आपल्या हातात पडते असेच आपल्या सर्वांना वाटले. भाषणाबाबतचे अनेक सल्ले असलेल्या या पुस्तकातील विभागाबद्दल वक्‍ता म्हणाले: “उत्तम वाचन करण्याकरता, वक्‍ता होण्याकरता आणि शिकवण देण्याकरता जे ५३ पैलू या पुस्तकात दिले आहेत ते जगिक विचारानुसार नाहीत तर शास्त्रवचनीय तत्त्वांच्या आधारावर आहेत.” वेगवेगळे संदेष्टे, येशू, त्याचे शिष्य यांनी प्रविणतेने कसे शिकवले ते या पुस्तकात सांगितले आहे. होय, हे पाठ्यपुस्तक आणि ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची नवीन वैशिष्ट्ये आपल्याला निश्‍चितच देवाच्या वचनाचे उत्तम शिक्षक होण्यास मदत करतील.

तिसरा दिवस—काळ लक्षात ठेवून शिक्षक व्हा

शेवटल्या दिवसाची सुरवात दैनिक वचनाने झाल्यावर सर्वांनी अधिवेशनाच्या शेवटल्या परिसंवादाकडे एकाग्रतेने लक्ष दिले; “मलाखीची भविष्यवाणी आपल्याला यहोवाच्या दिवसासाठी तयार करते,” असा या परिसंवादाचा विषय होता. बाबेलमधून यहुद्यांना परतून जवळजवळ शंभर वर्ष झाल्यानंतर मलाखीने भविष्यवाणी केली. हे यहुदी लोक पुन्हा एकदा धर्मत्यागी बनले होते, दुष्टाईत सरसावले होते, यहोवाच्या धार्मिक नियमांकडे दुर्लक्ष करून व बलिदानासाठी अंधळे, लुळे, रोगट पशू आणून त्याच्या नावाला त्यांनी बट्टा लावला होता. एवढेच नव्हे तर, मूर्तीपूजक स्त्रियांबरोबर पुन्हा लग्न करण्यासाठी ते, तरुणपणीच्या आपल्या बायकांना सूटपत्र देत होते.

मलाखीच्या भविष्यवाणीचा पहिला अध्याय आपल्याला असे आश्‍वासन देतो, की यहोवाला त्याच्या लोकांवर प्रेम आहे. आपण देवाबद्दल आदरयुक्‍त भय बाळण्याची तसेच पवित्र गोष्टींची कदर बाळगण्याची गरज आहे यावर तो अध्याय जोर देतो. आपण यहोवाला आपल्याजवळील सर्वात उत्तम दिले पाहिजे आणि निःस्वार्थ प्रीतीने त्याची उपासना केली पाहिजे अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. आपली पवित्र सेवा ही नाममात्र असू नये व आपल्याला देवाला हिशेब द्यायचा आहे.

मलाखीचा दुसरा अध्याय आपल्या दिवसाला लागू करत परिसंवादातील दुसऱ्‍या वक्‍त्‌याने विचारले, की: “आपल्या ‘वाणीत कुठलीही कुटिलता आढळू नये’ म्हणून आपण व्यक्‍तिगतपणे सावधगिरी बाळगत आहोत का?” (मलाखी २:६) शिकवण्यात पुढाकार घेणाऱ्‍यांनी याची खात्री करावी, की त्यांची शिकवण ही केवळ देवाच्या वचनावर आधारित असावी. अन्यायीपणे सूटपत्र देण्यासारख्या विश्‍वासघातकी कृत्यांचा आपण वीट मानला पाहिजे.—मलाखी २:१४-१६.

“यहोवाच्या दिवसातून कोण वाचेल?” या विषयावर परिसंवादाच्या शेवटल्या वक्‍त्‌याने भाषण देऊन आम्हा सर्वांना यहोवाच्या दिवसासाठी तयार केले. ते असेही म्हणाले, की “मलाखीच्या ३ऱ्‍या अध्यायाच्या १७ व्या वचनाची मोठी पूर्णता ही आपल्याबाबतीत होत आहे, हे जाणून यहोवाच्या सेवकांना किती सांत्वन मिळते! त्या वचनात असे म्हटले आहे: ‘सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणाऱ्‍या पुत्रावर दया करितो तसा मी त्यांजवर दया करीन.”’”

अधिवेशनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, प्राचीन काळातील लोकांच्या वेशभूषेतील नाटक. “यहोवाच्या अधिकाराचा आदर करणे” हा त्या नाटकाचा विषय होता; यात कोरहाच्या मुलांचे उदाहरण देण्यात आले होते. मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कोरहने बंडखोर मनोवृत्ती दाखवली तरीसुद्धा कोरहचे पुत्र, यहोवा आणि त्याचे प्रतिनिधी यांच्याशी एकनिष्ठ राहिले. कोरह आणि त्याच्या साथीदारांचा नाश झाला परंतु कोरहचे पुत्र मात्र वाचले. नाटकानंतरच्या भाषणाचा विषय होता, “एकनिष्ठेने ईश्‍वरी अधिकाराच्या अधीन होणे.” या भाषणात, नाटकात दाखवण्यात आलेल्या सर्व गोष्टी आपल्याला लागू होतात असे सांगण्यात आले. कोरह आणि त्याचे साथीदार ज्या सहा बाबतीत उणे पडले त्याविषयी आपण दक्ष राहावे असे वक्‍त्‌याने सांगितले: त्यांनी यहोवाच्या अधिकाराला एकनिष्ठपणे सहकार्य दिले नव्हते; त्यांच्यावर गर्व, स्वाभिमान आणि हेवा यांनी कब्जा मिळवला होता; त्यांचे सर्व लक्ष यहोवाने नियुक्‍त केलेल्यांच्या चुकांवरच होते; त्यांची कुरकूर करण्याची प्रवृत्ती झाली होती; आहे त्या नेमणुकीत ते समाधानी नव्हते; ते यहोवाला एकनिष्ठा दाखवण्यापेक्षा मित्रांना व कौटुंबिक सदस्यांना एकनिष्ठा दाखवत होते.

“सर्व राष्ट्रांना सत्य कोण शिकवत आहेत?” हा जाहीर भाषणाचा विषय होता. या भाषणात ज्या सत्याची चर्चा करण्यात आली ते सर्वसामान्य अर्थाने समजले जाणारे सत्य नव्हे तर येशू ख्रिस्ताने ज्याची साक्ष दिली त्या यहोवाच्या उद्देशाच्या संबंधाने असलेले सत्य होते. विश्‍वास, उपासनेची पद्धत, व्यक्‍तिगत आचरण यांसंबंधाने असलेल्या सत्याची वक्‍त्‌याने चर्चा केली. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चन आणि आजचे यहोवाचे साक्षीदार यांची तुलना केल्यावर, ‘आम्हामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे’ ही आपली खात्री आणखीनच पक्की झाली.—१ करिंथकर १४:२५.

आठवड्याच्या टेहळणी बुरूज अभ्यास लेखाच्या सारांशानंतर उपस्थित असलेल्या देवाच्या वचनाच्या सर्व शिक्षकांना, “आपली शिकवण्याची कामगिरी तातडीने पूर्ण करणे” या भाषणाने कार्य करण्याची प्रेरणा दिली. शिकवताना शास्त्रवचनांचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे, कोणकोणत्या मार्गांनी आपण योग्यताप्राप्त शिक्षक होऊ शकतो, आपण लोकांना जे सत्य शिकवतो त्यावर आधी आपला भरवसा पाहिजे, या गोष्टींवर संपूर्ण कार्यक्रमाच्या संक्षिप्त उजळणीत जोर देण्यात आला. आपली ‘प्रगती सर्वांस दिसून आली पाहिजे,’ व आपण ‘आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष’ दिले पाहिजे, असा सल्ला वक्‍त्‌याने दिला.—१ तीमथ्य ४:१५, १६.

“देवाच्या वचनाचे शिक्षक” या प्रांतीय अधिवेशनात आपण सर्वांनी आध्यात्मिक मेजवानीचा स्वाद घेतला, नाही का? इतरांना देवाचे वचन शिकवताना आपण आपला महान शिक्षक यहोवा देव आणि आपला थोर शिक्षक येशू ख्रिस्त यांचे अनुकरण करीत राहू या!

[२८ पानांवरील चौकट/चित्रे]

खास गरजा पूर्ण करणारी नवीन प्रकाशने

“देवाच्या वचनाचे शिक्षक” प्रांतीय अधिवेशनाच्या उपस्थितांना दोन नवीन प्रकाशने मिळाली जी जगाच्या विशिष्ट भागातील लोकांना शास्त्रवचनांतील सत्य शिकवण्यास मदतदायक ठरतील. तुमच्यात अमर आत्मा आहे का? (इंग्रेजी) नावाची हस्तपत्रिका, सहज हाताळण्याजोगी आहे. “सोल” आणि “स्पिरिट” यांत कसलाही फरक न दाखवणाऱ्‍या स्थानीय भाषा ज्या देशांत बोलल्या जातात तेथील लोकांबरोबर संभाषण सुरू करण्यासाठी ही पत्रिका अतिशय फायदेकारक आहे. आत्मिक शक्‍ती ही आत्मिक प्राण्यापासून अतिशय वेगळी आहे आणि मृत्यूनंतर लोक आत्मिक प्राणी होत नाहीत हे या नवीन पत्रिकेत अगदी स्पष्टरीत्या दाखवले आहे.

समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? हे माहितीपत्रक अधिवेशनाच्या दुसऱ्‍या दिवसाच्या शेवटी प्रकाशित करण्यात आले. व्यक्‍तिमत्त्व असलेला निर्माणकर्ता आहे व ईश्‍वराच्या प्रेरणेने लिहिलेले एक पुस्तक आहे यावर ज्यांचा विश्‍वास नाही, अशा लोकांबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने हे माहितीपत्रक तयार करण्यात आले होते. तुमच्या सेवेत तुम्ही या नवीन प्रकाशनांचा उपयोग करू शकलात का?

[२६ पानांवरील चित्रे]

इटलीतील मिलान येथे आणि जगभरातील अधिवेशनांमध्ये शेकडो लोकांनी बाप्तिस्मा घेतला

[२९ पानांवरील चित्र]

“यहोवाच्या अधिकाराचा आदर करणे” हे नाटक पाहून श्रोतेजन भारावून गेले